॥ मंत्रांचा पंचम दशक ॥
समास पहिला : गुरुनिश्चय
॥ श्रीराम ॥
जय जज जी सद्गुरु पूर्णकामा ।
परमपुरुषा आत्मयारामा ।
अनुर्वाच्य तुमचा महिमा ।
वर्णिला न वचे ॥ १॥
जें वेदांस सांकडें ।
जें शब्दासि कानडें ।
तें सत्शिष्यास रोकडें ।
अलभ्य लाभे ॥ २॥
जें योगियांचें निजवर्म ।
जें शंकराचें निजधाम ।
जें विश्रांतीचें निजविश्राम ।
परम गुह्य अगाध ॥ ३॥
तें ब्रह्म तुमचेनि योगें ।
स्वयें आपणचि होईजे आंगें ।
दुर्घट संसाराचेनि पांगें ।
पांगिजेना सर्वथा ॥ ४॥
आतां स्वामिचेनि लडिवाळपणें ।
गुरुशिष्यांचीं लक्षणें ।
सांगिजेती तेणें प्रमाणें - ।
मुमुक्षें शरण जावें ॥ ५॥
गुरु तों सकळांसी ब्राह्मण ।
जऱ्हीं तो जाला क्रियाहीन ।
तरी तयासीच शरण ।
अनन्यभावें असावें ॥ ६॥
अहो या ब्राह्मणाकारणें ।
अवतार घेतला नारायेणें ।
विष्णूनें श्रीवत्स मिरविणें ।
तेथें इतर ते किती ॥ ७॥
ब्राह्मणवचनें प्रमाण ।
होती शूद्रांचे ब्राह्मण ।
धातुपाषाणीं देवपण ।
ब्राह्मणचेनि मंत्रें ॥ ८॥
मुंजीबंधनेंविरहित ।
तो शूद्रचि निभ्रांत ।
द्विजन्मी म्हणोनि सतंत ।
द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९॥
सकळांसि पूज्य ब्राह्मण ।
हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण ।
वेदविरहित तें अप्रमाण ।
अप्रिये भगवंता ॥ १०॥
ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें ।
ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें ।
कर्ममार्ग ब्राह्मणाविणें ।
होणार नाहीं ॥ ११॥
ब्राह्मण वेद मूर्तिमंत ।
ब्राह्मण तोचि भगवंत ।
पूर्ण होती मनोरथ ।
विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥
ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- ।
होऊन, जडे भगवंतीं ।
ब्राह्मणतीर्थे उत्तम गती ।
पावती प्राणी ॥ १३॥
लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण ।
आन यातिसि पुसे कोण ।
परी भगवंतासि भाव प्रमाण ।
येरा चाड नाहीं ॥ १४॥
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती ।
तेथें मानव बापुडें किती ।
जरी ब्राह्मण मूढमती ।
तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥
अंत्येज शब्दज्ञाता बरवा ।
परी तो नेऊन कायी करावा ।
ब्राह्मणासन्निध पुजावा ।
हें तों न घडे कीं ॥ १६॥
जें जनावेगळें केलें ।
तें वेदें अव्हेरिलें ।
म्हणोनि तयासि नाम ठेविलें ।
पाषांडमत ॥ १७॥
असो जे हरिहरदास ।
तयास ब्राह्मणीं विस्वास ।
ब्राह्मणभजनें बहुतांस ।
पावन केलें ॥ १८॥
ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा ।
तरी किमर्थ सद्गुरु करावा ।
ऐसें म्हणाल तरी निजठेवा ।
सद्गुरुविण नाहीं ॥ १९॥
स्वधर्मकर्मी । म् पूज्य ब्राह्मण ।
परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण ।
ब्रह्मज्ञान नस्तां सीण ।
जन्ममृत्य चुकेना ॥ २०॥
सद्गुरुविण ज्ञान कांहीं ।
सर्वथा होणार नाहीं ।
अज्ञान प्राणी प्रवाहीं ।
वाहातचि गेले ॥ २१॥
ज्ञानविरहित जें जें केलें ।
तें तें जन्मासि मूळ जालें ।
म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें ।
सुधृढ धरावीं ॥ २२॥
जयास वाटे देव पाहावा ।
तेणें सत्संग धरावा ।
सत्संगेंविण देवाधिदेवा ।
पाविजेत नाहीं ॥ २३॥
नाना साधनें बापुडीं ।
सद्गुरुविण करिती वेडीं ।
गुरुकृपेविण कुडकुडीं ।
वेर्थचि होती ॥ २४॥
कार्तिकस्नानें माघस्नानें ।
व्रतें उद्यापनें दानें ।
गोरांजनें धूम्रपानें ।
साधिती पंचाग्नी ॥ २५॥
हरिकथा पुराणश्रवण ।
आदरें करिती निरूपण ।
सर्व तीर्थें परम कठिण ।
फिरती प्राणी ॥ २६॥
झळफळित देवतार्चनें ।
स्नानें संध्या दर्भासनें ।
टिळे माळा गोपीचंदनें ।
ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥
अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें ।
मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें ।
नाना प्रकारीचीं उपकर्णें ।
साहित्यशोभा ॥ २८॥
घंटा घणघणा वाजती ।
स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती ।
आसनें मुद्रा ध्यानें करिती ।
प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९॥
पंचायेत्न पूजा केली ।
मृत्तिकेचीं लिंगें लाखोली ।
बेलें नारिकेळें भरिली ।
संपूर्ण सांग पूजा ॥ ३०॥
उपोषणें निष्ठा नेम ।
परम सायासीं केलें कर्म ।
फळचि पावती, वर्म- ।
चुकले प्राणी ॥ ३१॥
येज्ञादिकें कर्में केलीं ।
हृदईं फळाशा कल्पिली ।
आपले इछेनें घेतली ।
सूति जन्मांची ॥ ३२॥
करूनि नाना सायास ।
केला चौदा विद्यांचा अभ्यास ।
रिद्धि सिद्धि सावकास ।
वोळल्या जरी ॥ ३३॥
तरी सद्गुरुकृपेविरहित ।
सर्वथा न घडे स्वहित ।
येमेपुरीचा अनर्थ ।
चुकेना येणें ॥ ३४॥
जंव नाहीं ज्ञानप्राप्ती ।
तंव चुकेना यातायाती ।
गुरुकृपेविण अधोगती ।
गर्भवास चुकेना ॥ ३५॥
ध्यान धारणा मुद्रा आसन ।
भक्ती भाव आणी भजन ।
सकळहि फोल ब्रह्मज्ञान - ।
जंव तें प्राप्त नाहीं ॥ ३६॥
सद्गुरुकृपा न जोडे ।
आणी भलतीचकडे वावडे ।
जैसें आंधळें चाचरोन पडे ।
गारीं आणी गडधरां ॥ ३७॥
जैसें नेत्रीं घालितां अंजन ।
पडे दृष्टीस निधान ।
तैसें सद्गुरुवचनें ज्ञान- ।
प्रकाश होये ॥ ३८॥
सद्गुरुविण जन्म निर्फळ ।
सद्गुरुविण दुःख सकळ ।
सद्गुरुविण तळमळ ।
जाणार नाहीं ॥ ३९॥
सद्गुरुचेनि अभयंकरें ।
प्रगट होईजे ईश्वरें ।
संसारदुःखें अपारें ।
नासोन जाती ॥ ४०॥
मागें जाले थोर थोर ।
संत महंत मुनेश्वर ।
तयांसहि ज्ञानविज्ञानविचार ।
सद्गुरुचेनी ॥ ४१॥
श्रीरामकृष्ण आदिकरूनी ।
अतितत्पर गुरुभजनीं ।
सिद्ध साधु आणी संतजनीं ।
गुरुदास्य केलें ॥ ४२॥
सकळ सृष्टीचे चाळक ।
हरिहरब्रह्मादिक ।
तेहि सद्गुपदीं रंक ।
महत्वा न चढेती ॥ ४३॥
असो जयासि मोक्ष व्हावा ।
तेणें सद्गुरु करावा ।
सद्गुरुविण मोक्ष पावावा ।
हें कल्पांतीं न घडे ॥ ४४॥
आतां सद्गुरु ते कैसे ।
नव्हेति इतरां गुरु ऐसे ।
जयांचे कृपेनें प्रकाशे ।
शुद्ध ज्ञान ॥ ४५॥
त्या सद्गुरूची वोळखण ।
पुढिले समासीं निरूपण ।
बोलिलें असे श्रोतीं श्रवण ।
अनुक्रमें करावें ॥ ४६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गुरुनिश्चयेनाम समास पहिला ॥ १॥
समास दुसरा : गुरुलक्षण
॥श्रीराम् ॥
जे करामती दाखविती ।
तेहि गुरु म्हणिजेती ।
परंतु सद्गुरु नव्हेती ।
मोक्षदाते ॥ १॥
सभामोहन भुररीं चेटकें ।
साबरमंत्र कौटालें अनेकें ।
नाना चमत्कार कौतुकें ।
असंभाव्य सांगती ॥ २॥
सांगती औषधीप्रयोग ।
कां सुवर्णधातूचा मार्ग ।
दृष्टिबंधनें लागवेग ।
अभिळाषाचा ॥ ३॥
साहित संगीत रागज्ञान ।
गीत नृत्य तान मान ।
नाना वाद्यें सिकविती जन ।
तेहि येक गुरु ॥ ४॥
विद्या सिकविती पंचाक्षरी ।
ताडेतोडे नानापरी ।
कां पोट भरे जयावरी ।
ते विद्या सिकविती ॥ ५॥
जो यातीचा जो व्यापार ।
सिकविती भरावया उदर ।
तेहि गुरु परी साचार- ।
सद्गुरु नव्हेती ॥ ६॥
आपली माता आणी पिता ।
तेहि गुरुचि तत्वतां ।
परी पैलापार पावविता ।
तो सद्गुरु वेगळा ॥ ७॥
गाईत्रीमंत्राचा इचारू ।
सांगे तो साचार कुळगुरु ।
परी ज्ञानेंविण पैलपारु ।
पाविजेत नाहीं ॥ ८॥
जो ब्रह्मज्ञान उपदेसी ।
अज्ञानांधारें निरसी ।
जीवात्मयां परमात्मयांसी ।
ऐक्यता करी ॥ ९॥
विघडले देव आणी भक्त ।
जीवशिवपणें द्वैत ।
तया देवभक्तां येकांत- ।
करी, तो सद्गुरु ॥ १०॥
भवव्याघ्रें घालूनि उडी ।
गोवत्सास तडातोडी ।
केली, देखोनि सीघ्र सोडी ।
तो सद्गुरु जाणावा ॥ ११॥
प्राणी मायाजाळीं पडिलें ।
संसारदुःखें दुःखवलें ।
ऐसें जेणें मुक्त केलें ।
तो सद्गुरु जाणावा ॥ १२॥
वासनानदीमाहांपुरीं ।
प्राणी बुडतां ग्लांती करी ।
तेथें उडी घालूनि तारी ।
तो सद्गुरु जाणावा ॥ १३॥
गर्भवास अति सांकडी ।
इछाबंधनाची बेडी ।
ज्ञान देऊन सीघ्र सोडी ।
तो सद्गुरु स्वामी ॥ १४॥
फोडूनि शब्दाचें अंतर ।
वस्तु दाखवी निजसार ।
तोचि गुरु माहेर ।
अनाथांचें ॥ १५॥
जीव येकदेसी बापुडें ।
तयास ब्रह्मचि करी रोकडें ।
फेडी संसारसांकडे ।
वचनमात्रें ॥ १६॥
जें वेदांचे अभ्यांतरीं ।
तें काढून अपत्यापरी ।
शिष्यश्रवणीं कवळ भरी ।
उद्गारवचनें ॥ १७॥
वेद शास्त्र माहानुभाव ।
पाहातां येकचि अनुभव ।
तोचि येक गुरुराव ।
ऐक्यरूपें ॥ १८॥
संदेह निःशेष जाळी ॥
स्वधर्म आदरें प्रतिपाळी ।
वेदविरहित टवाळी ।
करूंच नेणे ॥ १९॥
जें जें मन अंगिकारी ।
तें तें स्वयें मुक्त करी ।
तो गुरु नव्हे, भिकारी- ।
झडे आला ॥ २०॥
शिष्यास न लविती साधन ।
न करविती इंद्रियेंदमन ।
ऐसे गुरु आडक्याचे तीन ।
मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥
जो कोणी ज्ञान बोधी ।
समूळ अविद्या छेदी ।
इंद्रियेंदमन प्रतिपादी ।
तो सद्गुरु जाणावा ॥ २२॥
येक द्रव्याचे विकिले ।
येक शिष्याचे आखिले ।
अतिदुराशेनें केले ।
दीनरूप ॥ २३॥
जें जें रुचे शिष्यामनीं ।
तैसीच करी मनधरणी ।
ऐसी कामना पापिणी ।
पडली गळां । २४॥
जो गुरु भीडसारु ।
तो अद्धमाहून अद्धम थोरु ।
चोरटा मंद पामरु ।
द्रव्यभोंदु ॥ २५॥
जैसा वैद्य दुराचारी ।
केली सर्वस्वें बोहरी ।
आणी सेखीं भीड करी ।
घातघेणा ॥ २६॥
तैसा गुरु नसावा ।
जेणें अंतर पडे देवा ।
भीड करूनियां, गोवा- ।
घाली बंधनाचा ॥ २७॥
जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान ।
आणी स्थूळ क्रियेचें साधन ।
तोचि सद्गुरु निधान ।
दाखवी डोळां ॥ २८॥
देखणें दाखविती आदरें ।
मंत्र फु । म्किती कर्णद्वारें ।
इतुकेंच ज्ञान, तें पामरें- ।
अंतरलीं भगवंता ॥ २९॥
बाणे तिहींची खूण ।
तोचि गुरु सुलक्षण ।
तेथेंचि रिघावें शरण ।
अत्यादरें मुमुक्षें ॥ ३०॥
अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता ।
परी विषईं लोलंगता ।
ऐसिया गुरूचेनि सार्थकता ।
होणार नाहीं ॥ ३१॥
जैसा निरूपणसमयो ।
तैसेंचि मनहि करी वायो ।
कृतबुद्धीचा जयो ।
जालाच नाहीं ॥ ३२॥
निरूपणीं सामर्थ्य सिद्धी ।
श्रवण होतां दुराशा बाधी ।
नाना चमत्कारें बुद्धी ।
दंडळूं लागे ॥ ३३॥
पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त ।
तयांसि सादृश्य भगवंत ।
आणी सामर्थ्यहि अद्भुत ।
सिद्धीचेनि योगें ॥ ३४॥
ऐसें तयांचें सामर्थ्य ।
आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ ।
ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ ।
अंतरीं वसे ॥ ३५॥
निशेष दुराशा तुटे ।
तरीच भगवंत भेटे ।
दुराशा धरिती ते वोखटे ।
शब्दज्ञाते कामिक ॥ ३६॥
बहुत ज्ञातीं नागवलीं ।
कामनेनें वेडीं केलीं ।
कामना इच्छितांच मेलीं ।
बापुडीं मूर्खें ॥ ३७॥
निशेष कामनारहित ।
ऐसा तो विरुळा संत ।
अवघ्यांवेगळें मत ।
अक्षै ज्याचें ॥ ३८॥
अक्षै ठेवा सकळांचा ।
परी पांगडा फिटेना शरीराचा ।
तेणें मार्ग ईश्वराचा ।
चुकोनि जाती ॥ ३९॥
सिद्धि आणी सामर्थ्य जालें ।
सामर्थ्यें देहास महत्त्व आलें ।
तेणें वेंचाड वळकावलें ।
देहबुद्धीचें ॥ ४०॥
सांडूनि अक्षै सुख ।
सामर्थ्य इछिती ते मूर्ख ।
कामनेसारिखें दुःख ।
आणीक कांहींच नाहीं ॥ ४१॥
ईश्वरेंविण जे कामना ।
तेणींचि गुणें नाना यातना ।
पावती, होती पतना- ।
वरपडे प्राणी ॥ ४२॥
होतां शरीरासी अंत ।
सामर्थ्यहि निघोन जात ।
सेखीं अंतरला भगवंत ।
कामनागुणें ॥ ४३॥
म्हणोनि निःकामताविचारु ।
दृढबुद्धीचा निर्धारु ।
तोचि सद्गुरु पैलपारु ।
पाववी भवाचा ॥ ४४॥
मुख्य सद्गुरूचें लक्षण ।
आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।
निश्चयाचें समाधान ।
स्वरूपस्थिती ॥ ४५॥
याहीवरी वैराग्य प्रबळ ।
वृत्ति उदास केवळ ।
विशेष आचारें निर्मळ ।
स्वधर्मविषईं ॥ ४६॥
याहिवरी अध्यात्मश्रवण ।
हरिकथा निरूपण ।
जेथें परमार्थविवरण ।
निरंतर ॥ ४७॥
जेथें सारासारविचार ।
तेथें होये जगोद्धार ।
नवविधा भक्तीचा आधार ।
बहुता जनासी ॥ ४८॥
म्हणोनि नवविधा भजन ।
जेथें प्रतिष्ठलें साधन ।
हें सद्गुरूचें लक्षण ।
श्रोतीं वोळखावें ॥ ४९॥
अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान ।
बाह्य निष्ठेचें भजन ।
तेथें बहु भक्त जन ।
विश्रांति पावती ॥ ५०॥
नाहीं उपासनेचा आधार ।
तो परमार्थ निराधार ।
कर्मेंविण अनाचार ।
भ्रष्ट होती ॥ ५१॥
म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन ।
स्वधर्मकर्म आणि साधन ।
कथा निरूपण श्रवण मनन ।
नीति न्याये मर्यादा ॥ ५२॥
यामधें येक उणें असे ।
तेणें तें विलक्षण दिसे ।
म्हणौन सर्वहि विलसे ।
सद्गुरुपासीं ॥ ५३॥
तो बहुतांचें पाळणकर्ता ।
त्यास बहुतांची असे चिंता ।
नाना साधनें समर्था ।
सद्गुरुपासीं ॥ ५४॥
साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे ।
तो मागुतां सवेंच भ्रष्टे ।
याकारणे दुरीद्रष्टे ।
माहानुभाव ॥ ५५॥
आचार उपासना सोडिती ।
ते भ्रष्ट अभक्त दिसती ।
जळो तयांची महंती ।
कोण पुसे ॥ ५६॥
कर्म उपासनेचा अभाव ।
तेथें भकाधेसि जाला ठाव ।
तो कानकोंडा समुदाव ।
प्रपंची हांसती ॥ ५७॥
नीच यातीचा गुरु ।
तोही कानकोंड विचारु ।
ब्रह्मसभेस जैसा चोरू ।
तैसा दडे ॥ ५८॥
ब्रह्मसभे देखतां ।
त्याचें तीर्थ नये घेतां ।
अथवा प्रसाद सेवितां ।
प्राश्चित पडे ॥ ५९॥
तीर्थप्रसादाची सांडी केली ।
तेथें नीचता दिसोन आली ।
गुरुभक्ति ते सटवली ।
येकायेकी ॥ ६०॥
गुरुची मर्यादा राखतां ।
ब्राह्मण क्षोभती तत्वतां ।
तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां ।
गुरुक्षोभ घडे ॥ ६१॥
ऐसीं सांकडीं दोहींकडे ।
तेथें प्रस्तावा घडे ।
नीच यातीस गुरुत्व न घडे ।
याकारणें ॥ ६२॥
तथापि आवडी घेतली जीवें ।
तरी आपणचि भ्रष्टावें ।
बहुत जनांसी भ्रष्टवावें ।
हें तों दूषणचि कीं ॥ ६३॥
आतां असो हा विचारू ।
स्वयातीचा पाहिजे गुरु ।
नाहीं तरी भ्रष्टाकारु ।
नेमस्त घडे ॥ ६४॥
जे जे कांहीं उत्तम गुण ॥
तें तें सद्गुरूचें लक्षण ।
तथापि संगों वोळखण ।
होये जेणें ॥ ६५॥
येक गुरु येक मंत्रगुरु ।
येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु ।
येक वस्तादगुरु येक राजगुरु ।
म्हणती जनीं ॥ ६६॥
येक कुळगुरु येक मानिला गुरु ।
येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु ।
येक असद्गुरु येक यातिगुरु ।
दंडकर्ते ॥ ६७॥
येक मातागुरु येक पितागुरु ।
येक राजागुरु येक देवगुरु ।
येक बोलिजे जगद्गुरु ।
सकळकळा ॥ ६८॥
ऐसे हे सत्रा गुरु ।
याहिवेगळे आणीक गुरु ।
ऐक तयांचा विचारु ।
सांगिजेल ॥ ६९॥
येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु ।
येक म्हणती प्रतिमागुरु ।
येक म्हणती स्वयें गुरु ।
आपला आपण ॥ ७०॥
जे जे यातीचा जो व्यापारु ।
ते ते त्याचे तितुके गुरु ।
याचा पाहातां विचारु ।
उदंड आहे ॥ ७१॥
असो ऐसे उदंड गुरु ।
नाना मतांचा विचारु ।
परी जो मोक्षदाता सद्गुरु ।
तो वेगळाचि असे ॥ ७२॥
नाना सद्विद्येचे गुण ।
याहिवरी कृपाळूपण ।
हें सद्गुरूचें लक्षण ।
जाणिजे श्रोतीं ॥ ७३॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गुरुलक्षणनाम समास दुसरा ॥ २॥
समास तिसरा : शिष्यलक्षण
॥ श्रीराम् ॥
माअगां सद्गुरूचें लक्षण ।
विशद केलें निरूपण ।
आतां सच्छिष्याची वोळखण ।
सावध ऐका ॥ १॥
सद्गुरुविण सच्छिष्य ।
तो वायां जाय निशेष ।
कां सच्छिष्येंविण विशेष ।
सद्गुरु सिणे ॥ २॥
उत्तमभूमि शोधिली शुद्ध ।
तेथें बीज पेरिलें किडखाद ।
कां तें उत्तम बीज परी समंध ।
खडकेंसि पडिला ॥ ३॥
तैसा सच्छिष्य तें सत्पात्र ।
परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र ।
तेथें अरत्र ना परत्र ।
कांहिंच नाहीं ॥ ४॥
अथवा गुरु पूर्ण कृपा करी ।
परी शिष्य अनाधिकारी ।
भाअग्यपुरुषाचा भिकारी ।
पुत्र जैसा ॥ ५॥
तैसें येकाविण येक ।
होत असे निरार्थक ।
परलोकींचें सार्थक ।
तें दुऱ्हावे ॥ ६॥
म्हणौनि सद्गुरु आणी सच्छिष्य ।
तेथें न लगती सायास ।
त्यां उभयतांचा हव्यास ।
पुरे येकसरा ॥ ७॥
सुभूमि आणी उत्तम कण ।
उगवेना प्रजन्येंविण ।
तैसें अध्यात्मनिरूपण ।
नस्तां होये ॥ ८॥
सेत पेरिलें आणी उगवलें ।
परंतु निगेविण गेलें ।
साधनेंविण तैसें जालें ।
साधकांसी ॥ ९॥
जंवरी पीक आपणास भोगे ।
तंवरी अवघेंचि करणें लागे ।
पीक आलियांहि, उगें- ।
राहोंचि नये ॥ १०॥
तैसें आत्मज्ञान जालें ।
परी साधन पाहिजे केलें ।
येक वेळ उदंड जेविलें ।
तऱ्हीं सामग्री पाहिजे ॥ ११॥
म्हणौन साधन अभ्यास आणी सद्गुगु ।
सच्छिष्य आणी सच्छास्त्रविचारु ।
सत्कर्म सद्वासना, पारु- ।
पाववी भवाचा ॥ १२॥
सदुपासना सत्कर्म ।
सत्क्रिया आणी स्वधर्म ।
सत्संग आणी नित्य नेम ।
निरंतर ॥ १३॥
ऐसें हें अवघेंचि मिळे ।
तरीच विमळ ज्ञान निवळे ।
नाहीं तरी पाषांड संचरे बळें ।
समुदाईं ॥ १४॥
येथें शब्द नाहीं शिष्यासी ।
हें अवघें सद्गुरुपासीं ।
सद्गुरु पालटी अवगुणासी ।
नाना येत्नें करूनी ॥ १५॥
सद्गुरुचेनि असच्छिष्य पालटे ।
परंतु सच्छिष्यें असद्गुरु न पालटे ।
कां जें थोरपण तुटे ।
म्हणौनिया ॥ १६॥
याकरणें सद्गुरु पाहिजे ।
तरीच सन्मार्ग लाहिजे ।
नाहिं तरी होईजे ।
पाषांडा वरपडे ॥ १७॥
येथें सद्गुरुचि कारण ।
येर सर्व निःकारण ।
तथापि सांगो वोळखण ।
सच्छिष्याची ॥ १८॥
मुख्य सच्छिष्याचें लक्षण ।
सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
अनन्यभावें शरण ।
त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥
शिष्य पाहिजे निर्मळ ।
शिष्य पाहिजे आचारसीळ ।
शिष्य पाहिजे केवळ ।
विरक्त अनुतापी ॥ २०॥
शिष्य पाहिजे निष्ठावंत ।
शिष्य पाहिजे सुचिष्मंत ।
शिष्य पाहिजे नेमस्त ।
सर्वप्रकारीं ॥ २१॥
शिष्य पाहिजे साक्षपी विशेष ।
शिष्य पाहिजे परम दक्ष ।
शिष्य पाहिजे अलक्ष ।
लक्षी ऐसा ॥ २२॥
शिष्य पाहिजे अति धीर ।
शिष्य पाहिजे अति उदार ।
शिष्य पाहिजे अति तत्पर ।
परमार्थविषईं ॥ २३॥
शिष्य पाहिजे परोपकारी ।
शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।
शिष्य पाहिजे अर्थांतरीं ।
प्रवेशकर्ता ॥ २४॥
शिष्य पाहिजे परम शुद्ध ।
शिष्य पाहिजे परम सावध ।
शिष्य पाहिजे अगाध ।
उत्तम गुणांचा ॥ २५॥
शिष्य पाहिजे प्रज्ञावंत ।
शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त ।
शिष्य पाहिजे नीतिवंत ।
मर्यादेचा ॥ २६॥
शिष्य पाहिजे युक्तिवंत ।
शिष्य पाहिजे बुद्धिवंत ।
शिष्य पाहिजे संतासंत ।
विचार घेता ॥ २७॥
शिष्य पाहिजे धारिष्टाचा ।
शिष्य पाहिजे दृढ व्रताचा ।
शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा ।
पुण्यसीळ ॥ २८॥
शिष्य असावा सात्विक ।
शिष्य असावा भजक ।
शिष्य असावा साधक ।
साधनकर्ता ॥ २९॥
शिष्य असावा विश्वासी ।
शिष्य असावा कायाक्लेशी ।
शिष्य असावा परमार्थासी ।
वाढऊं जाणे ॥ ३०॥
शिष्य असावा स्वतंत्र ।
शिष्य असावा जगमित्र ।
शिष्य असावा सत्पात्र ।
सर्व गुणें ॥ ३१॥
शिष्य असावा सद्विद्येचा ।
शिष्य असावा सद्भावाचा ।
शिष्य असावा अंतरींचा ।
परमशुद्ध ॥ ३२॥
शिष्य नसावा अविवेकी ।
शिष्य नसावा गर्भसुखी ।
शिष्य असावा संसारदुःखी ।
संतप्त देही ॥ ३३॥
जो संसारदुःखें दुःखवला ।
जो त्रिविधतापें पोळला ।
तोचि अधिकारी जाला ।
परमार्थविषीं ॥ ३४॥
बहु दुःख भोगिलें जेणें ।
तयासीच परमार्थ बाणे ।
संसारदुःखाचेनि गुणें ।
वैराग्य उपजे ॥ ३५॥
जया संसाराचा त्रास ।
तयासीच उपजे विस्वास ।
विस्वासबळें दृढ कास ।
धरिली सद्गुरूची ॥ ३६॥
अविस्वासें कास सोडिली ।
ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं ।
नाना जळचरीं तोडिलीं ।
मध्येंचि सुखदुःखें ॥ ३७॥
याकारणें दृढ विस्वास ।
तोचि जाणावा सच्छिष्य ।
मोक्षाधिकारी विशेष ।
आग्रगण्यु ॥ ३८॥
जो सद्गुरुवचनें निवाला ।
तो सयोज्यतेचा आंखिला ।
सांसारसंगे पांगिला ।
न वचे कदा ॥ ३९॥
सद्गुरुहून देव मोठा ।
जयास वाटे तो करंटा ।
सुटला वैभवाचा फांटा ।
सामरथ्यपिसें ॥ ४०॥
सद्गुरुस्वरूप तें संत ।
आणी देवांस मांडेल कल्पांत ।
तेथें कैचें उरेल सामर्थ्य ।
हरिहरांचें ॥ ४१॥
म्हणौन सद्गुरुसामर्थ्य आधीक ।
जेथें आटती ब्रह्मादिक ।
अल्पबुद्धी मानवी रंक ।
तयांसि हें कळेना ॥ ४२॥
गुरुदेवांस बराबरी- ।
करी तो शिष्य दुराचारी ।
भ्रांति बैसली अभ्यांतरीं ।
सिद्धांत नेणवे ॥ ४३॥
देव मनिषीं भाविला ।
मंत्रीं देवपणासि आला ।
सद्गुरु न वचे कल्पिला ।
ईश्वराचेनि ॥ ४४॥
म्हणौनि सद्गुरु पूर्णपणें ।
देवाहून आधीक कोटिगुणें ।
जयासि वर्णितां भांडणें ।
वेदशास्त्रीं लागलीं ॥ ४५॥
असो सद्गुरुपदापुढें ।
दुजें कांहींच न चढे ।
देवसामर्थ्य तें केवढें ।
मायाजनित ॥ ४६॥
अहो सद्गुरुकृपा जयासी ।
सामर्थ्य न चले तयापासीं ।
ज्ञानबळें वैभवासी ।
तृणतुछ केलें ॥ ४७॥
अहो सद्गुरुकृपेचेनि बळें ।
अपरोक्षज्ञानाचेनि उसाळें ।
मायेसहित ब्रह्मांड सगळें ।
दृष्टीस न यें ॥ ४८॥
ऐसें सच्छिष्याचें वैभव ।
सद्गुरुवचनीं दृढ भाव ।
तेणें गुणें देवराव ।
स्वयेंचि होती ॥ ४९॥
अंतरीं अनुतापें तापले ।
तेणें अंतर शुद्ध जालें ।
पुढें सद्गुरुवचनें निवाले ।
सच्छिष्य ऐसे ॥ ५०॥
लागतां सद्गुरुवचनपंथें ।
जालें ब्रह्मांड पालथें ।
तरी जयाच्या शुद्ध भावार्थें ।
पालट न धरिजे ॥ ५१॥
शरण सद्गुरूस गेले ।
सच्छिष्य ऐसे निवडले ।
क्रियापालटें जाले ।
पावन ईश्वरीं ॥ ५२॥
ऐसा सद्भाव अंतरीं ।
तेचि मुक्तीचे वाटेकरी ।
येर माईक वेषधारी ।
असच्छिष्य ॥ ५३॥
वाटे विषयांचे सुख ।
परमार्थ संपादणे लौकिक ।
देखोवेखीं पढतमूर्ख ।
शरण गेले ॥ ५४॥
जाली विषईं वृत्ति अनावर ।
दृढ धरिला संसार ।
परमार्थचर्चेचा विचार ।
मळिण झाला ॥ ५५॥
मोड घेतला परमार्थाचा ।
हव्यास धरिला प्रपंचाचा ।
भार वाहिला कुटुंबाचा ।
काबाडी जाला ॥ ५६॥
मानिला प्रपंचीं आनंद ।
केला परमार्थी विनोद ।
भ्रांत मूढ मतिमंद ।
लोधला कामीं ॥ ५७॥
सूकर पूजिलें विलेपनें ।
म्हैसा मर्दिला चंदनें ।
तैसा विषई ब्रह्मज्ञानें ।
विवेकें बोधिला ॥ ५८॥
रासभ उकिरडां लोळे ।
तयासि परिमळसोहळे ।
उलूक अंधारीं पळे ।
तया केवी हंसपंगती ॥ ५९॥
तैसा विषयदारींचा बराडी ।
घाली अधःपतनीं उडी ।
तयास भगवंत आवडी ।
सत्संग कैंचा ॥ ६०॥
वर्ती करून दांताळीं ।
स्वानपुत्र हाडें चगळी ।
तैसा विषई तळमळी ।
विषयसुखाकारणे । ॥ ६१॥
तया स्वानमुखीं परमान्न ।
कीं मर्कटास सिंहासन ।
तैसें विषयशक्तां ज्ञान ।
जिरेल कैंचें ॥ ६२॥
रासभें राखतां जन्म गेला ।
तो पंडितांमध्यें प्रतिष्ठला ।
न वचे, तैसा आअशक्ताला ।
परमार्थ नाहीं ॥ ६३॥
मिळाला राजहंसांचा मेळा ।
तेथें आला डोंबकावळा ।
लक्षून विष्ठेचा गोळा ।
हंस म्हणवी ॥ ६४॥
तैसे सज्जनाचे संगती ।
विषई सज्जन म्हणविती ।
विषय आमेद्य चित्तीं ।
गोळा लक्षिला ॥ ६५॥
काखे घेऊनियां दारा ।
म्हणे मज संन्यासी करा ।
तैसा विषई सैरावैरा ।
ज्ञान बडबडी ॥ ६६॥
असो ऐसे पढतमूर्ख ।
ते काय जाणती अद्वैतसुख ।
नारकी प्राणी नर्क ।
भोगिती स्वैच्छा ॥ ६७॥
वैषेची करील सेवा ।
तो कैसा मंत्री म्हणावा ।
तैसा विषयदास मानावा ।
भक्तराज केवी ॥ ६८॥
तैसे विषई बापुडे ।
त्यांस ज्ञान कोणीकडे ।
वाचाळ शाब्दिक बडबडे ।
वरपडे जाले ॥ ६९॥
ऐसे शिष्य परम नष्ट ।
कनिष्ठांमधें कनिष्ठ ।
हीन अविवेकी आणी दृष्ट ।
खळ खोटे दुर्जन ॥ ७०॥
ऐसे जे पापरूप ।
दीर्घदोषी वज्रलेप ।
तयांस प्राश्चीत, अनुताप- ।
उद्भवतां ॥ ७१॥
तेंहि पुन्हां शरण जावें ।
सद्गुरूस संतोषवावें ।
कृपादृष्टी जालियां व्हावें ।
पुन्हां शुद्ध ॥ ७२॥
स्वामीद्रोह जया घडे ।
तो यावश्चंद्र नरकीं पडे ।
तयास उपावचि न घडे ।
स्वामी तुष्टल्यावांचुनी ॥ ७३॥
स्मशानवैराग्य आलें ।
म्हणोन लोटांगण घातलें ।
तेणें गुणें उपतिष्ठले- ।
नाहीं ज्ञान । ७४॥
भाव आणिला जायाचा ।
मंत्र घेतला गुरूचा ।
शिष्य जाला दो दिसांचा ।
मंत्राकारणें ॥ ७५॥
ऐसे केले गुरु उदंड ।
शब्द सिकला पाषांड ।
जाला तोंडाळ तर्मुंड ।
माहापाषांडी ॥ ७६॥
घडी येक रडे आणी पडे ।
घडी येक वैराग्य चढे ।
घडी येक अहंभाव जडे ।
ज्ञातेपणाचा ॥ ७७॥
घडी येक विस्वास धरी ।
सवेंच घडि येक गुर्गुरी ।
ऐसे नाना छंद करी ।
पिसाट जैसा ॥ ७८॥
काम क्रोध मद मत्सर ।
लोभ मोह नाना विकार ।
अभिमान कापट्य तिरस्कार ।
हृदईं नांदती ॥ ७९॥
अहंकार आणी देहपांग ।
अनाचार आणी विषयसंग ।
संसार प्रपंच उद्वेग ।
अंतरीं वसे ॥ ८०॥
दीर्घसूत्री कृतघ्न पापी ।
कुकर्मी कुतर्की विकल्पी ।
अभक्त अभाव सीघ्रकोपी ।
निष्ठुर परघातक ॥ ८१॥
हृदयेंसुन्य आणी आळसी ।
अविवेकी आणि अविस्वासी ।
अधीर अविचार, संदेहासी- ।
दृढ धर्ता ॥ ८२॥
आशा ममता तृष्णा कल्पना ।
कुबुद्धी दुर्वृत्ति दुर्वासना ।
अल्पबुद्धि विषयकामना ।
हृदईं वसे ॥ ८३॥
ईषणा असूया तिरस्कारें ।
निंदेसि प्रवर्ते आदरें ।
देहाभिमानें हुंबरे ।
जाणपणें ॥ ८४॥
क्षुधा तृष्णा आवरेना ।
निद्रा सहसा धरेना ।
कुटुंबचिंता वोसरेना ।
भ्रांति पडिली ॥ ८५॥
शाब्दिक बोले उदंड वाचा ।
लेश नाहीं वैराग्याचा ।
अनुताप धारिष्ट साधनाचा ।
मार्ग न धरी ॥ ८६॥
भक्ति विरक्ति ना शांती ।
सद्वृत्ति लीनता ना दांती ।
कृपा दया ना तृप्ती ।
सुबुद्धि असेच ना ॥ ८७॥
कायाक्लेसीं शेरीरहीन ।
धर्मविषईं परम कृपण ।
क्रिया पालटेना कठिण ।
हृदये जयाचें ॥ ८८॥
आर्जव नाहीं जनासी ।
जो अप्रिये सज्जनासी ।
जयाचे जिवीं आहिर्णेसीं ।
परन्यून वसे ॥ ८९॥
सदा सर्वकाळ लटिका ।
बोले माईक लापणिका ।
क्रिया विचार पाहतां, येका ।
वचनीं सत्य नाहीं ॥ ९०॥
परपीडेविषईं तत्पर ।
जैसे विंचु आणि विखार ।
तैसा कुशब्दें जिव्हार ।
भेदी सकळांचें ॥ ९१॥
आपले झांकी अवगुण ।
पुढिलांस बोले कठिण ।
मिथ्या गुणदोषेंविण ।
गुणदोष लावी ॥ ९२॥
स्वयें पापात्मा अंतरीं ।
पुढिलांचि कणव न करी ।
जैसा हिंसक दुराचारी ।
परदुःखें शिणेना ॥ ९३॥
दुःख पराव्याचें नेणती ।
दुर्जन गांजिले चि गांजिती ।
श्रम पावतां आनंदती ।
आपुले मनीं ॥ ९४॥
स्वदुःखें झुरे अंतरीं ।
आणी परदुःखें हास्य करी ।
तयास प्राप्त येमपुरी ।
राजदूत ताडिती ॥ ९५॥
असो ऐसें मदांध बापुडें ।
तयांसि भगवंत कैंचा जोडे ।
जयांस सुबुद्धि नावडे ।
पूर्वपातकेंकरूनी ॥ ९६॥
तयास देहाचा अंतीं ।
गात्रें क्षीणता पावती ।
जिवलगें वोसंडिती ।
जाणवेल तेव्हां ॥ ९७॥
असो ऐसे गुणावेगळे ।
ते सच्छिष्य आगळे ।
दृढभावार्थें सोहळे ।
भोगिती स्वानंदाचे ॥ ९८॥
जये स्थळीं विकल्प जागे ।
कुळाभिमान पाठीं लागे ।
ते प्राणी प्रपंचसंगें ।
हिंपुटी होती ॥ ९९॥
जेणेंकरितां दुःख जालें ।
तेंचि मनीं दृढ धरिलें ।
तेणें गुणें प्राप्त जालें ।
पुन्हां दुःख ॥ १००॥
संसारसंगें सुख जालें ।
ऐसें देखिलें ना ऐकिलें ।
ऐसें जाणोन अनहित केलें ।
ते दुःखी होती स्वयें ॥ १०१॥
संसारीं सुख मानिती ।
ते प्राणी मूढमती ।
जाणोन डोळे झांकिती ।
पढतमूर्ख ॥ १०२॥
प्रपंच सुखें करावा ।
परी कांहीं परमार्थ वाढवावा ।
परमार्थ अवघाचि बुडवावा ।
हें विहित नव्हे ॥ १०३॥
मागां जालें निरूपण ।
गुरुशिष्यांची वोळखण ।
आतां उपदेशाचें लक्षण ।
सांगिजेल ॥ १०४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शिष्यलक्षणनाम समास तिसरा ॥ ३॥
समास चवथा : उपदेशलक्षण
॥ श्रीराम् ॥
ऐका उपदेशाचीं लक्षणें ।
बहुविधें कोण कोणें ।
सांगतां तें असाधारणें ।
परी कांहीं येक सांगों ॥ १॥
बहुत मंत्र उपदेशिती ।
कोणी नाम मात्र सांगती ।
येक ते जप करविती ।
वोंकाराचा ॥ २॥
शिवमंत्र भवानीमंत्र ।
विष्णुमंत्र माहाल्क्ष्मीमंत्र ।
अवधूतमंत्र गणेशमंत्र ।
मार्तंडमंत्र सांगती ॥ ३॥
मछकूर्मवऱ्हावमंत्र ।
नृसिंहमंत्र वामनमंत्र ।
भार्गवमंत्र रघुनाथमंत्र ।
कृष्णमंत्र सांगती ॥ ४॥
भैरवमंत्र मल्लारिमंत्र ।
हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र ।
नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र ।
अघोरमंत्र सांगती ॥ ५॥
शेषमंत्र गरुडमंत्र ।
वायोमन्त्र वेताळमंत्र ।
झोटिंगमंत्र बहुधा मंत्र ।
किती म्हणौनि सांगावे ॥ ६॥
बाळामंत्र बगुळामंत्र ।
काळिमंत्र कंकाळिमंत्र ।
बटुकमंत्र नाना मंत्र ।
नाना शक्तींचे ॥ ७॥
पृथकाकारें स्वतंत्र ।
जितुके देव तितुके मंत्र ।
सोपे अवघड विचित्र ।
खेचर दारुण बीजाचे ॥ ८॥
पाहों जातां पृथ्वीवरी ।
देवांची गणना कोण करी ।
तितुके मंत्र वैखरी ।
किती म्हणौनि वदवावी ॥ ९॥
असंख्यात मंत्रमाळा ।
येकाहूनि येक आगळा ।
विचित्र मायेची कळा ।
कोण जाणे ॥ १०॥
कित्येक मंत्रीं भूतें जाती ।
कित्येक मंत्रीं वेथा नासती ।
कित्येक मंत्रीं उतरती ।
सितें विंचू विखार ॥ ११॥
ऐसे नाना परीचे मंत्री ।
उपदेशिती कर्णपात्रीं ।
जप ध्यान पूजा यंत्री ।
विधानयुक्त सांगती ॥ १२॥
येक शिव शिव सांगती ॥
येक हरि हरि म्हणविती ।
येक उपदेशिती ।
विठल विठल म्हणोनी ॥ १३॥
येक सांगती कृष्ण कृष्ण ।
येक सांगती विष्ण विष्ण ।
येक नारायण नारायण ।
म्हणौन उपदेशिती ॥ १४॥
येक म्हणती अच्युत अच्युत ।
येक म्हणती अनंत अनंत ।
येक सांगती दत्त दत्त ।
म्हणत जावें ॥ १५॥
येक सांगती राम राम ।
येक सांगती ऒं ऒं म ।
येक म्हणती मेघशाम ।
बहुतां नामीं स्मरावा ॥ १६॥
येक सांगती गुरु गुरु ।
येक म्हणती परमेश्वरु ।
येक म्हणती विघ्नहरु ।
चिंतीत जावा ॥ १७॥
येक सांगती शामराज ।
येक सांगती गरुडध्वज ।
येक सांगती अधोक्षज ।
म्हणत जावें ॥ १८॥
येक सांगती देव देव ।
येक म्हणती केशव केशव ।
येक म्हणती भार्गव भार्गव ।
म्हणत जावें ॥ १९॥
येक विश्वनाथ म्हणविती ।
येक मल्लारि सांगती ।
येक ते जप करविती ।
तुकाई तुकाई म्हणौनी ॥ २०॥
हें म्हणौनी सांगावें ।
शिवशक्तीचीं अनंत नांवें ।
इछेसारिखीं स्वभावें ।
उपदेशिती ॥ २१॥
येक सांगती मुद्रा च्यारी ।
खेचरी भूचरी चाचरी अगोचरी ।
येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२॥
येक दाखविती देखणी ।
येक अनुहातध्वनी ।
येक गुरु पिंडज्ञानी ।
पिंडज्ञान सांगती ॥ २३॥
येक संगती कर्ममार्ग ।
येक उपासनामार्ग ।
येक सांगती अष्टांग योग ।
नाना चक्रें ॥ २४॥
येक तपें सांगती ।
येक अजपाअ निरोपिती ।
येक तत्वें विस्तारिती ,
तत्वज्ञानी ॥ २५॥
येक सांगती सगुण ।
येक निरोपिती निर्गुण ।
येक उपदेशिती तीर्थाटण ।
फिरावें म्हणूनी ॥ २६॥
येक माहावाक्यें सांगती ।
त्यांचा जप करावा म्हणती ।
येक उपदेश करिती ।
सर्व ब्रह्म म्हणोनी ॥ २७॥
येक शाक्तमार्ग सांगती ।
येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती ।
येक इंद्रियें पूजन करविती ।
येका भावें ॥ २८॥
येक सांगती वशीकर्ण ।
स्तंबन मोहन उच्चाटण ।
नाना चेटकें आपण ।
स्वयें निरोपिती ॥ २९॥
ऐसी उपदेशांची स्थिती ।
पुरे आतां सांगों किती ।
ऐसे हे उपदेश असती ।
असंख्यात । ३०॥
ऐसे उपदेश अनेक ।
परी ज्ञानेविण निरार्थक ।
येविषईं असे येक । भगवद्वचन ॥ ३१॥
श्लोक ॥ नानाशास्त्रं पठेल्लोको
नाना दैवतपूजनम् ।
आत्मज्ञानं विना पार्थ
सर्वकर्म निरर्थकम् ॥
शैवशाक्तागमाद्या ये
अन्ये च बहवो मताः ।
अपभ्रंशसमास्ते ।
अपि जीवानां भ्रांतचेतसाम् ॥
न हि ज्ञानेन सदृशं
पवित्रमिदमुत्तमम् ॥
याकारणें ज्ञानासमान ।
पवित्र उत्तम न दिसे अन्न ।
म्हणौन आधीं आत्मज्ञान ।
साधिलें पाहिजे ॥ ३२॥
सकळ उपदेशीं विशेष ।
आत्मज्ञानाचा उपदेश ।
येविषईं जगदीश ।
बहुतां ठाईं बोलिला ॥ ३३॥
श्लोक ॥ यस्य कस्य च
वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् ।
तस्य दासस्य दासोहं भवे
जन्मनि जन्मनि ॥
आत्मज्ञानाचा महिमा ।
नेणे चतुर्मुख ब्रह्मा ।
प्राणी बापुडा जीवात्मा ।
काये जाणे ॥ ३४॥
सकळ तीर्थांची संगती ।
स्नानदानाची फळश्रुती ।
त्याहूनि ज्ञानाची स्थिती ।
विशेष कोटिगुणें ॥ ३५॥
श्लोक: ॥ पृथिव्यां यानि
तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् ।
तत्फलं कोटिगुणितं
ब्रह्मज्ञानसमोपमम् ॥
म्हणौनि जें आत्मज्ञान ।
तें गहनाहूनि गहन ।
ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उपदेशनाम समास चवथा ॥ ४॥
समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण
॥श्रीराम् ॥
जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ ।
तंव सर्व कांहीं निर्फळ ।
ज्ञानरहित तळमळ ।
जाणार नाहीं ॥ १॥
ज्ञान म्हणतां वाटे भस्म ।
काये रे बा असेल वर्म ।
म्हणौनि हा अनुक्रम ।
सांगिजेल आतां ॥ २॥
भूत भविष्य वर्तमान ।
ठाऊकें आहे परिछिन्न ।
यासीहि म्हणिजेत ज्ञान ।
परी तें ज्ञान नव्हे ॥ ३॥
बहुत केलें विद्यापठण ।
संगीतशास्त्र रागज्ञान ।
वैदिक शास्त्र वेदाधेन ।
हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४॥
नाना वेवसायाचें ज्ञान ।
नाना दिक्षेचें ज्ञान ।
नाना परीक्षेचें ज्ञान ।
हें ज्ञान नव्हे ॥ ५॥
नाना वनितांची परीक्षा ।
नाना मनुष्यांची परीक्षा ।
नाना नरांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ६॥
नाना अश्वांची परीक्षा ।
नाना गजांची परीक्षा ।
नाना स्वापदांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ७॥
नाना पशूंची परीक्षा ।
नाना पक्षांची परीक्षा ।
नाना भूतांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ८॥
नाना यानांची परीक्षा ।
नाना वस्त्रांची परीक्षा ।
नाना शस्त्रांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ९॥
नाना धातूंची परीक्षा ।
नाना नाण्यांची परीक्षा ।
नाना रत्नांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १०॥
नाना पाषाण परीक्षा ।
नाना काष्ठांची परीक्षा ।
नाना वाद्यांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ११॥
नाना भूमींची परीक्षा ।
नाना जळांची परीक्षा ।
नाना सतेज परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १२॥
नाना रसांची परीक्षा ।
नाना बीजांची परीक्षा ।
नाना अंकुर परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १३॥
नाना पुष्पांची परीक्षा ।
नाना फळांची परीक्षा ।
नाना वल्लींची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १४॥
नाना दुःखांची परीक्षा ।
नाना रोगांची परीक्षा ।
नाना चिन्हांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १५॥
नाना मंत्रांची परीक्षा ।
नाना यंत्रांची परीक्षा ।
नाना मूर्तींची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १६॥
नाना क्षत्रांची परीक्षा ।
नाना गृहांची परीक्षा ।
नाना पात्रांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १७॥
नाना होणार परीक्षा ।
नाना समयांची परीक्षा ।
नाना तर्कांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १८॥
नाना अनुमान परीक्षा ।
नाना नेमस्त परीक्षा ।
नाना प्रकार परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ १९॥
नाना विद्येची परीक्षा ।
नाना कळेची परीक्षा ।
नाना चातुर्य परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २०॥
नाना शब्दांची परीक्षा ।
नाना अर्थांची परीक्षा ।
नाना भाषांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २१॥
नाना स्वरांची परीक्षा ।
नाना वर्णांची परीक्षा ।
नाना लेक्षनपरीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २२॥
नाना मतांची परीक्षा ।
नाना ज्ञानांची परीक्षा ।
नाना वृत्तींची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २३॥
नाना रूपांची परीक्षा ।
नाना रसनेची परीक्षा ।
नाना सुगंधपरीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २४॥
नाना सृष्टींची परीक्षा ।
नाना विस्तारपरीक्षा ।
नाना पदार्थपरीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २५॥
नेमकेचि बोलणें ।
तत्काळचि प्रतिवचन देणें ।
सीघ्रचि कवित्व करणें ।
हें ज्ञान नव्हे ॥ २६॥
नेत्रपालवी नादकळा ।
करपालवी भेदकळा ।
स्वरपालवी संकेतकळा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २७॥
काव्यकुशळ संगीतकळा ।
गीत प्रबंद नृत्यकळा ।
सभाच्यातुर्य शब्दकळा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २८॥
वग्विळास मोहनकळा ।
रम्य रसाळ गायनकळा ।
हास्य विनोद कामकळा ।
हें ज्ञान नव्हे ॥ २९॥
नाना लाघवें चित्रकळा ।
नाना वाद्यें संगीतकळा ।
नाना प्रकारें विचित्र कळा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ३०॥
आदिकरूनि चौसष्टि कळा ।
याहि वेगळ्या नाना कळा ।
चौदा विद्या सिद्धि सकळा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ३१॥
असो सकळ कळाप्रवीण ।
विद्यामात्र परिपूर्ण ।
तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- ।
म्हणोंचि नये ॥३२॥
हें ज्ञान होयेसें भासे ।
परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें ।
जेथें प्रकृतीचें पिसें ।
समूळ वाव ॥ ३३॥
जाणावें दुसर्याचें जीवीचें ।
हे ज्ञान वाटे साचें ।
परंतु हें आत्मज्ञानाचें ।
लक्षण नव्हे ॥ ३४॥
माहानुभाव माहाभला ।
मानसपूजा करितां चुकला ।
कोणी येकें पाचारिला ।
ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५॥
ऐसी जाणे अंतरस्थिती ।
तयासि परम ज्ञाता म्हणती ।
परंतु जेणें मोक्षप्राप्ती ।
तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६॥
बहुत प्रकारींची ज्ञानें ।
सांगों जातां असाधारणें ।
सायोज्यप्राप्ती होये जेणें ।
तें ज्ञान वेगळें ॥ ३७॥
तरी तें कैसें आहे ज्ञान ।
समाधानाचें लक्षण ।
ऐसें हें विशद करून ।
मज निरोपावें ॥ ३८॥
ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें ।
तें पुढिले समासीं निरोपिलें ।
श्रोतां अवधान दिधलें ।
पाहिजे पुढें ॥ ३९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बहुधाज्ञाननाम समास पंचवा ॥ ५॥
समास सहावा : शुद्धज्ञान निरूपण
॥ श्रीराम् ॥
ऐक ज्ञानाचें लक्षण ।
ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणासि आपण ।
या नांव ज्ञान ॥ १॥
मुख्य देवास जाणावें ।
सत्य स्वरूप वोळखावें ।
नित्यानित्य विचारावें ।
या नांव ज्ञान ॥ २॥
जेथें दृश्य प्रकृति सरे ।
पंचभूतिक वोसरे ।
समूळ द्वैत निवारे ।
या नांव ज्ञान ॥ ३॥
मनबुद्धि अगोचर ।
न चले तर्काचा विचार ।
उल्लेख परेहुनि पर ।
या नांव ज्ञान ॥ ४॥
जेथें नाहीं दृश्यभान ।
जेथें जाणीव हें अज्ञान ।
विमळ शुद्ध स्वरूपज्ञान ।
यासि बोलिजे ॥ ५॥
सर्वसाक्षी अवस्ता तुर्या ।
ज्ञान ऐसें म्हणती तया ।
परी तें जाणिजे वायां ।
पदार्थज्ञान ॥ ६॥
दृश्य पदार्थ जाणिजे ।
त्यास पदार्थज्ञान बोलिजे ।
शुद्ध स्वरूप जाणिजे ।
या नांव स्वरूपज्ञान ॥ ७॥
जेथें सर्वचि नाहीं ठाईंचें ।
तेथें सर्वसाक्षत्व कैंचें ।
म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें ।
मानूंचि नये ॥ ८॥
ज्ञान म्हणिजे अद्वैत ।
तुर्या प्रत्यक्ष द्वैत ।
म्हणौनि शुद्ध ज्ञान सतंत ।
वेगळेंचि असे ॥ ९॥
ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण ।
शुद्ध स्वरूपचि आपण ।
या नांव शुद्ध स्वरूपज्ञान ।
जाणिजे श्रोतीं ॥ १०॥
माहावाक्यौपदेश भला ।
परी त्याचा जप नाहीं बोलिला ।
तेथीचा तो विचारचि केला ।
पाहिजे साधकें ॥ ११॥
माहावाक्य उपदेशसार ।
परी घेतला पाहिजे विचार ।
त्याच्या जपें, अंधकार- ।
न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥
माहावाक्याचा अर्थ घेतां ।
आपण वस्तुचि तत्वतां ।
त्याचा जप करितां वृथा ।
सीणचि होये ॥ १३॥
माहावाक्याशें विवरण ।
हें मुख्य ज्ञानाचें लक्षण ।
शुद्ध लक्ष्यांचें आपण ।
वस्तुच आहे ॥ १४॥
आपला आपणासि लाभ ।
हें ज्ञान परम दुल्लभ ।
जें आदिअंतीं स्वयंभ ।
स्वरूपचि स्वयें ॥ १५॥
जेथून हें सर्व ही प्रगटे ।
आणि सकळही जेथें आटे ।
तें ज्ञान जालियां फिटे ।
भ्रांति बंधनाची ॥ १६॥
मतें आणी मतांतरें ।
जेथें होती निर्विकारें ।
अतिसूक्ष्म विचारें ।
पाहातां ऐक्य ॥ १७॥
जे या चराचराचें मूळ ।
शुद्ध स्वरूप निर्मळ ।
या नांव ज्ञान केवळ ।
वेदांतमतें ॥ १८॥
शोधितां आपलें मूळ स्थान ।
सहजचि उडे अज्ञान ।
या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान ।
मोक्षदायेक ॥ १९॥
आपणासि वोळखों जातां ।
आंगीं बाणे सर्वज्ञता ।
तेणें येकदेसी वार्ता ।
निशेष उडे ॥ २०॥
मी कोण ऐसा हेत- ।
धरून, पाहातां देहातीत ।
आवलोकितां नेमस्त ।
स्वरूपचि होये ॥ २१॥
असो पूर्वीं थोर थोर ।
जेणें ज्ञानें पैलपार- ।
पावले, ते साचार ।
ऐक आतां ॥ २२॥
व्यास वसिष्ठ माहामुनी ।
शुक नारद समाधानी ।
जनकादिक माहाज्ञानी ।
येणेंचि ज्ञानें ॥ २३॥
वामदेवादिक योगेश्वर ।
वाल्मीक अत्रि ऋषेश्वर ।
शोनिकादि अध्यात्मसार ।
वेदांतमतें ॥ २४॥
सनकादिक मुख्यकरूनी ।
आदिनाथ मीन गोरक्षमुनी ।
आणीक बोलतां वचनी ।
अगाध असती ॥ २५॥
सिद्ध मुनी माहानुभाव ।
सकळांचा जो अंतर्भाव ।
जेणें सुखें माहादेव ।
डुल्लत सदा ॥ २६॥
जें वेदशास्त्रांचें सार ।
सिद्धांत धादांत विचार ।
ज्याची प्राप्ती भाग्यानुसार ।
भाविकांस होये ॥ २७॥
साधु संत आणी सज्जन ।
भूत भविष्य वर्तमान ।
सर्वत्रांचें गुह्य ज्ञान ।
तें संगिजेल आतां ॥ २८॥
तीर्थें व्रतें तपें दानें ।
जें न जोडे धूम्रपानें ।
पंचाग्नी गोरांजनें ।
जें प्राप्त नव्हे ॥ २९॥
सकळ साधनाचें फळ ।
ज्ञानाची सिगचि केवळ ।
जेणें संशयाचें मूळ ।
निशेष तुटे ॥ ३०॥
छपन्न भाषा तितुके ग्रंथ ।
आदिकरून वेदांत ।
या इतुकियांचा गहनार्थ ।
येकचि आहे ॥ ३१॥
जें नेणवे पुराणीं ।
जेथें सिणल्या वेदवाणी ।
तेंचि आतां येचि क्षणीं ।
बोधीन गुरुकृपें ॥ ३२॥
पाहिलें नस्तां संस्कृतीं ।
रीग नाहीं मऱ्हाष्ट ग्रंथीं ।
हृदईं वसल्या कृपामुर्ती ।
सद्गुरु स्वामी ॥ ३३॥
आतां नलगे संस्कृत ।
अथवा ग्रंथ प्राकृत ।
माझा स्वामी कृपेसहित ।
हृदईं वसे ॥ ३४॥
न करितां वेदाभ्यास ।
अथवा श्रवणसायास ।
प्रेत्नेंविण सौरस ।
सद्गुरुकृपा ॥ ३५॥
ग्रंथ मात्र मऱ्हाष्ट ।
त्याहून संस्कृत श्रेष्ठ ।
त्या संस्कृतामधें पष्ट ।
थोर तो वेदांत ॥ ३६॥
त्या वेदांतापरतें कांहीं ।
सर्वथा श्रेष्ठ नाहीं ।
जेथें वेदगर्भ सर्वही ।
प्रगटजाला ॥ ३७॥
असो ऐसा जो वेदांत ।
त्या वेदांताचाहि मथितार्थ ।
अतिगहन जो परमार्थ ।
तो तूं ऐक आतां ॥ ३८॥
अरे गहनाचेंही गहन ।
तें तूं जाण सद्गुरुवचन ।
सद्गुरुवचनें समाधान ।
नेमस्त आहे ॥ ३९॥
सद्गुरुवचन तोचि वेदांत ।
सद्गुरुवचन तोचि सिद्धांत ।
सद्गुरुवचन तोचि धादांत ।
सप्रचीत आतां ॥ ४०॥
जें अत्यंत गहन ।
माझ्या स्वामीचें वचन ।
जेणें माझे समाधान ।
अत्यंत जालें ॥ ४१॥
तें हें माझें जीवीचें गुज ।
मी सांगैन म्हणतों तुज ।
जरी अवधान देसी मज ॥
तरी आतां येच क्षणीं ॥ ४२॥
शिष्य म्लान्वदनें बोले ।
धरिले सदृढ पाउले ।
मग बोलों आरंभिलें ।
गुरुदेवें ॥ ४३॥
अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य ।
येथीचा अर्थ अतर्क्ये ।
तोही सांगतों, ऐक्य- ।
गुरुशिष्य जेथें ॥ ४४॥
ऐक शिष्या येथीचें वर्म ।
स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।
ये विषईं संदेह भ्रम ।
धरूंचि नको ॥ ४५॥
नवविधा प्रकारें भजन ।
त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन ।
तें समग्र प्रकारें कथन ।
कीजेल आतां ॥ ४६॥
निर्माण पंचभूतें यीयें ।
कल्पांतीं नासतीं येथान्वयें ।
प्रकृति पुरुष जीयें ।
तेही ब्रह्म होती ॥ ४७॥
दृश्य पदार्थ आटतां ।
आपणहि नुरे तत्वतां ।
ऐक्यरूपें ऐक्यता ।
मुळींच आहे ॥ ४८॥
सृष्टीची नाहीं वार्ता ।
तेथें मुळींच ऐक्यता ।
पिंड ब्रह्मांड पाहों जातां ।
दिसेल कोठें ॥ ४९॥
ज्ञानवन्ही प्रगटे ।
तेणें दृश्य केर आटे ।
तदाकारें मूळ तुटे ।
भिन्नत्वाचें ॥ ५०॥
मिथ्यत्वें वृत्ति फिरे ।
तों दृश्य असतांच वोसरे ।
सहजचि येणें प्रकारें ।
जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥
असो गुरूचे ठाईं अनन्यता ।
तरी तुज कायेसी रे चिंता ।
वेगळेंपणें अभक्ता ।
उरोंचि नको ॥ ५२॥
आतां हेंचि दृढीकर्ण- ।
व्हावया, करीं सद्गुरुभजन ।
सद्गुरुभजनें समाधान ।
नेमस्त आहे ॥ ५३॥
या नांव शिष्या आत्मज्ञान ।
येणें पाविजे समाधान ।
भवभयाचें बंधन ।
समूळ मिथ्या ॥ ५४॥
देह मी वाटे ज्या नरा ।
तो जाणावा आत्महत्यारा ।
देहाभिनानें येरझारा ।
भोगिल्याच भोगी ॥ ५५॥
असो चहूं देहावेगळा ।
जन्मकर्मासी निराळा ।
सकळ आबाळगोबळा ।
सबाह्य तूं ॥ ५६॥
कोणासीच नाहीं बंधन ।
भ्रांतिस्तव भुलले जन ।
दृढ घेतला देहाभिमान ।
म्हणौनियां ॥ ५७॥
शिष्या येकांतीं बैसावें ।
स्वरूपीं विश्रांतीस जावें ।
तेणें गुणें दृढावे ।
परमार्थ हा ॥ ५८॥
अखंड घडे श्रवणमनन ।
तरीच पाविजे समाधान ।
पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान ।
वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥
शिष्या मुक्तपणें अनर्गळ ।
करिसीं इंद्रियें बाष्कळ ।
तेणें तुझी तळमळ ।
जाणार नाहीं ॥ ६०॥
विषईं वैराग्य उपजलें ।
तयासीच पूर्ण ज्ञान जालें ।
मणी टाकितांचि लाधलें ।
राज्य जेवीं ॥ ६१॥
मणी होतां सीगटाचा ।
लोभ धरूनिया तयाचा ।
मूर्खपणें राज्याचा ।
अव्हेर केला ॥ ६२॥
ऐक शिष्या सावधान ।
आतां भविष्य मी सांगेन ।
जया पुरुषास जें ध्यान ।
तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३॥
म्हणोनि जे अविद्या ।
सांडून धरावी सुविद्या ।
तेणें गुणें जगद्वंद्या ।
पाविजे सीघ्र ॥ ६४॥
सन्यपाताचेनि दुःखें ।
भयानक दृष्टीस देखे ।
औषध घेतांचि सुखें ।
आनंद पावे ॥ ६५॥
तैसें अज्ञानसन्यपातें ।
मिथ्या दृष्टीस दिसतें ।
ज्ञानाउषध घेतां तें ।
मुळींच नाहीं ॥ ६६॥
मिथ्या स्वप्नें वोसणाला ।
तो जागृतीस आणिला ।
तेणें पूर्वदशा पावला ।
निर्भय जे ॥ ६७॥
मिथ्याच परी सत्य वाटलें ।
तेणें गुणें दुःख जालें ।
मिथ्या आणी निरसलें ।
हें तों घडेना ॥ ६८॥
मिथ्या आहे जागृतासी ।
परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी ।
जागा जालियां तयासी ।
भयेंचि नाहीं॥ ६९॥
परी अविद्याझोंप येते भरें ।
भरे सर्वांगी काविरें ।
पूर्ण जागृती श्रवणद्वारें- ।
मननें करावी ॥ ७०॥
जागृतीची वोळखण ।
ऐक तयाचें लक्षण ।
जो विषईं विरक्त पूर्ण ।
अंतरापासुनी ॥ ७१॥
जेणें विरक्तीस न यावें ।
तो साधक ऐसें जाणावें ।
तेणें साधन करावें ।
थोरीव सांडुनी ॥ ७२॥
साधन न मने जयाला ।
तो सिद्धपणे बद्ध जाला ।
त्याहूनि मुमुक्ष भला ।
ज्ञानाधिकारी ॥ ७३॥
तंव शिष्यें केला प्रश्न ।
कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण ।
साधक सिद्ध वोळखण ।
कैसी जाणावी ॥ ७४॥
याचें उत्तर श्रोतयांसी ।
दिधलें पुढिलीये समासीं ।
सावध श्रोतीं कथेसी ।
अवधान द्यावें ॥ ७५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शुद्धज्ञाननिरूपणनाम
समास सहावा ॥ ६॥
समास सातवा : बद्धलक्षण
॥ श्रीराम् ॥
सृष्टी जे कां चराचर ।
जीव दाटले अपार ।
परी ते अवघे चत्वार ।
बोलिजेती ॥ १॥
ऐक तयांचें लक्षण ।
चत्वार ते कोण कोण ।
बद्ध मुमुक्ष साधक जाण ।
चौथा सिद्ध ॥ २॥
यां चौघांविरहित कांहीं ।
सचराचरीं पांचवा नाहीं ।
आतां असो हें सर्वही ।
विशद करूं ॥ ३॥
बद्ध म्हणिजे तो कोण ।
कैसें मुमुक्षाचें लक्षण ।
साधकसिद्धवोळखण ।
कैसी जाणावी ॥ ४॥
श्रोतीं व्हावें सावध ।
प्रस्तुत ऐका बद्ध ।
मुमुक्ष साधक आणि सिद्ध ।
पुढें निरोपिले ॥ ५॥
आतां बद्ध तो जाणिजे ऐसा ।
अंधारींचा अंध जैसा ।
चक्षुविण दाही दिशा ।
सुन्याकार ॥ ६॥
भक्त ज्ञाते तापसी ।
योगी वीतरागी संन्यासी ।
पुढें देखतां दृष्टीसी ।
येणार नाहीं ॥ ७॥
न दिसे नेणे कर्माकर्म ।
न दिसे नेणे धर्माधर्म ।
न दिसे नेणे सुगम ।
परमार्थपंथ ॥ ८॥
तयास न दिसे सच्छास्त्र ।
सत्संगति सत्पात्र ।
सन्मार्ग जो कां पवित्र ।
तो ही न दिसे ॥ ९॥
न कळे सारासार विचार ।
न कळे स्वधर्म आचार ।
न कळे कैसा परोपकार ।
दानपुण्य ॥ १०॥
नाहीं पोटीं भूतदया ।
नाहीं सुचिष्मंत काया ।
नाहीं जनासि निववावया ।
वचन मृद ॥ ११॥
न कळे भक्ति न कळे ज्ञान ।
न कळे वैराग्य न कळे ध्यान ।
न कळे मोक्ष न कळे साधन ।
या नांव बद्ध ॥ १२॥
न कळे देव निश्चयात्मक ।
न कळे संतांचा विवेक ।
न कळे मायेचें कौतुक ।
या नांव बद्ध ॥ १३॥
न कळे परमार्थाची खूण ।
न कळे अध्यात्मनिरूपण ।
न कळे आपणासि आपण ।
या नांव बद्ध ॥ १४॥
न कळे जीवाचें जन्ममूळ ।
न कळे साधनाचें फळ ।
न कळे तत्वतां केवळ ।
या नांव बद्ध ॥ १५॥
न कळे कैसें तें बंधन ।
न कळे मुक्तीचें लक्षण ।
न कळे वस्तु विलक्षण ।
या नांव बद्ध ॥ १६॥
न कळे शास्त्रार्थ बोलिला ।
न कळे निजस्वार्थ आपुला ।
न कळे संकल्पें बांधला ।
या नांव बद्ध ॥ १७॥
जयासि नाहीं आत्मज्ञान ।
हें मुख्य बद्धाचें लक्षण ।
तीर्थ व्रत दान पुण्य ।
कांहींच नाहीं ॥ १८॥
दया नाहीं करुणा नाहीं ।
आर्जव नाहीं मित्रि नाहीं ।
शांति नाहीं क्ष्मा नाहीं ।
या नांव बद्ध ॥ १९॥
जें ज्ञानविशिं उणें ।
तेथें कैचीं ज्ञानाचीं लक्षणें ।
बहुसाल कुलक्षणें ।
या नांव बद्ध ॥ २०॥
नाना प्रकारीचे दोष- ।
करितां, वाटे परम संतोष ।
बाष्कळपणाचा हव्यास ।
या नांव बद्ध ॥ २१॥
बहु काम बहु क्रोध ।
बहु गर्व बहु मद ।
बहु द्वंद बहु खेद ।
या नांव बद्ध ॥ २२॥
बहु दर्प बहु दंभ ।
बहु विषये बहु लोभ ।
बहु कर्कश बहु अशुभ ।
या नांव बद्ध ॥ २३॥
बहु ग्रामणी बहु मत्सर ।
बहु असूया तिरस्कार ।
बहु पापी बहु विकार ।
या नांव बद्ध ॥ २४॥
बहु अभिमान बहु ताठा ।
बहु अहंकार बहु फांटा ।
बहु कुकर्माचा सांठा ।
या नांव बद्ध ॥ २५॥
बहु कापट्य वादवेवाद ।
बहु कुतर्क भेदाभेद ।
बहु क्रूइर कृपामंद ।
या नांव बद्ध ॥ २६॥
बहु निंदा बहु द्वेष ।
बहु अधर्म बहु अभिळाष ।
बहु प्रकारीचे दोष ।
या नांव बद्ध ॥ २७॥
बहु भ्रष्ट अनाचार ।
बहु नष्ट येकंकार ।
बहु आनित्य अविचार ।
या नांव बद्ध ॥ २८॥
बहु निष्ठुर बहु घातकी ।
बहु हत्यारा बहु पातकी ।
तपीळ कुविद्या अनेकी ।
या नांव बद्ध ॥ २९॥
बहु दुराशा बहु स्वार्थी ।
बहु कळह बहु अनर्थी ।
बहु डाईक दुर्मती ।
या नांव बद्ध ॥ ३०॥
बहु कल्पना बहु कामना ।
बहु तृष्णा बहु वासना ।
बहु ममता बहु भावना ।
या नांव बद्ध ॥ ३१॥
बहु विकल्पी बहु विषादी ।
बहु मूर्ख बहु समंधी ।
बहु प्रपंची बहु उपाधी ।
या नांव बद्ध ॥ ३२॥
बहु वाचाळ बहु पाषंडी ।
बहु दुर्जन बहु थोतांडी ।
बहु पैशून्य बहु खोडी ।
या नांव बद्ध ॥ ३३॥
बहु अभाव बहु भ्रम ।
बहु भ्रांति बहु तम ।
बहु विक्षेप बहु विराम ।
या नांव बद्ध ॥ ३४॥
बहु कृपण बहु खंदस्ती ।
बहु आदखणा बहु मस्ती ।
बहु असत्क्रिया व्यस्ती ।
या नांव बद्ध ॥ ३५॥
परमार्थविषईं अज्ञान ।
प्रपंचाचें उदंड ज्ञान ।
नेणे स्वयें समाधान ।
या नांव बद्ध ॥ ३६॥
परमार्थाचा अनादर ।
प्रपंचाचा अत्यादर ।
संसारभार जोजार ।
या नांव बद्ध ॥ ३७॥
सत्संगाची नाहीं गोडी ।
संतनिंदेची आवडी ।
देहेबुद्धीची घातली बेडी ।
या नाव बद्ध ॥ ३८॥
हातीं द्रव्याची जपमाळ ।
कांताध्यान सर्वकाळ ।
सत्संगाचा दुष्काळ ।
या नांव बद्ध ॥ ३९॥
नेत्रीं द्रव्य दारा पाहावी ।
श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी ।
चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी ।
या नांव बद्ध ॥ ४०॥
काया वाचा आणि मन ।
चित्त वित्त जीव प्राण ।
द्रव्यदारेचें करी भजन ।
या नांव बद्ध ॥ ४१॥
इंद्रियें करून निश्चळ ।
चंचळ होऊं नेदी पळ ।
द्रव्यदारेसि लावी सकळ ।
या नांव बद्ध ॥ ४२॥
द्रव्य दारा तेंचि तीर्थ ।
द्रव्य दारा तोचि परमार्थ ।
द्रव्य दारा सकळ स्वार्थ ।
म्हणे तो बद्ध ॥ ४३॥
वेर्थं जाऊं नेदी काळ ।
संसारचिंता सर्वकाळ ।
कथा वार्ता तेचि सकळ ।
या नांव बद्ध ॥ ४४॥
नाना चिंता नाना उद्वेग ।
नाना दुःखाचे संसर्ग ।
करी परमार्थाचा त्याग ।
या नांव बद्ध ॥ ४५॥
घटिका पळ निमिष्यभरी ।
दुश्चीत नव्हतां अंतरीं ।
सर्वकाळ ध्यान करी ।
द्रव्यदाराप्रपंचाचें ॥ ४६॥
तीर्थ यात्रा दान पुण्य ।
भक्ति कथा निरूपण ।
मंत्र पूजा जप ध्यान ।
सर्वही द्रव्य दारा ॥ ४७॥
जागृति स्वप्न रात्रि दिवस ।
ऐसा लागला विषयेध्यास ।
नाहीं क्षणाचा अवकाश ।
या नांव बद्ध ॥ ४८॥
ऐसें बद्धाचें लक्षण ।
मुमुक्षपणीं पालटे जाण ।
ऐक तेही वोळखण ।
पुढिलीये समासीं ॥ ४९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बद्धलक्षणनाम समास सातवा ॥ ७॥
समास आठवा : मुमुक्षलक्षण
॥ श्रीराम् ॥
संसारमदाचेनि गुणें ।
नाना हीनें कुलक्षणें ।
जयाचेनि मुखावलोकनें ।
दोषचि लागे ॥ १॥
ऐसा प्रणी जो कां बद्ध ।
संसारीं वर्ततां अबद्ध ।
तायस प्राप्त जाला खेद ।
काळांतरीं ॥ २॥
संसारदुःखें दुखवला ।
त्रिविधतापें पोळला ।
निरूपणें प्रस्तावला ।
अंतर्यामीं ॥ ३॥
जाला प्रपंचीं उदास ।
मनें घेतला विषयत्रास ।
म्हणे आतां पुरे सोस ।
संसारींचा ॥ ४॥
प्रपंच जाईल सकळ ।
येथील श्रम तों निर्फळ ।
आतां कांहीं आपुला काळ ।
सार्थक करूं ॥ ५॥
ऐसी बुद्धि प्रस्तावली ।
पोटीं आवस्ता लागली ।
म्हणे माझी वयेसा गेली ।
वेर्थचि आवघी ॥ ६॥
पूर्वी नाना दोष केले ।
ते अवघेचि आठवले ।
पुढें येउनि उभे ठेले ।
अंतर्यामीं ॥ ७॥
आठवे येमाची यातना ।
तेणें भयेचि वाटे मना ।
नाहीं पापासि गणना ।
म्हणौनियां ॥ ८॥
नाहीं पुण्याचा विचार ।
जाले पापाचे डोंगर ।
आतां दुस्तर हा संसार ।
कैसा तरों ॥ ९॥
आपले दोष आछ्यादिले ।
भल्यांस गुणदोष लाविले ।
देवा म्यां वेर्थच निंदिले ।
संत साधु सज्जन ॥ १०॥
निंदे ऐसे नाहीं दोष ।
तें मज घडले कीं विशेष ।
माझे अवगुणीं आकाश ।
बुडों पाहे ॥ ११॥
नाहीं वोळखिले संत ।
नाहीं अर्चिला भगवंत ।
नाहीं अतित अभ्यागत ।
संतुष्ट केले ॥ १२॥
पूर्व पाप वोढवलें ।
मज कांहींच नाहीं घडलें ।
मन अव्हाटीं पडिलें ।
सर्वकाळ ॥ १३॥
नाहीं कष्टविलें शेरीर ।
नाहीं केला परोपकार ।
नाहीं रक्षिला आचार ।
काममदें ॥ १४॥
भक्तिमाता हे बुडविली ।
शांति विश्रांति मोडिली ।
मूर्खपणें म्यां विघडिली ।
सद्बुद्धि सद्वासना ॥ १५॥
आतां कैसें घडे सार्थक ।
दोष केले निरार्थक ।
पाहों जातां विवेक ।
उरला नाहीं ॥ १६॥
कोण उपाये करावा ।
कैसा परलोक पावावा ।
कोण्या गुणें देवाधिदेवा ।
पाविजेल ॥ १७॥
नाहीं सद्भाव उपजला ।
अवघा लोकिक संपादिला ।
दंभ वरपंगें केला ।
खटाटोप कर्माचा ॥ १८॥
कीर्तन केलें पोटासाठीं ।
देव मांडिले हाटवटीं ।
आहा देवा बुद्धि खोटी ।
माझी मीच जाणें ॥ १९॥
पोटीं धरूनि अभिमान ।
शब्दीं बोले निराभिमान ।
अंतरीं वांछूनियां धन ।
ध्यानस्त जालों ॥ २०॥
वित्पत्तीनें लोक भोंदिले ।
पोटासाठीं संत निंदिले ।
माझे पोटीं दोष भरले ।
नाना प्रकारींचे ॥ २१॥
सत्य तेंचि उछेदिलें ।
मिथ्य तेंचि प्रतिपादलें ।
ऐसें नाना कर्म केलें ।
उदरंभराकारणें ॥ २२॥
ऐसा पोटीं प्रस्तावला ।
निरूपणें पालटला ।
तोचि मुमुक्ष बोलिला ।
ग्रंथांतरीं ॥ २३॥
पुण्यमार्ग पोटीं धरी ।
सत्संगाची वांछा करी ।
विरक्त जाला संसारीं ।
या नांव मुमुक्ष ॥ २४॥
गेले राजे चक्रवर्ती ।
माझें वैभव तें किती ।
म्हणे धरूं सत्संगती ।
या नांव मुमुक्ष ॥ २५॥
आपुले अवगुण देखे ।
विरक्तिबळें वोळखे ।
आपणासि निंदी दुःखें ।
या नांव मुमुक्ष ॥ २६॥
म्हणे मी काये अनोपकारी ।
म्हणे मी काय दंभधारी ।
म्हणे मी काये अनाचारी ।
या नांव मुमुक्ष ॥ २७॥
म्हणे मी पतित चांडाळ ।
म्हणे मी दुराचारी खळ ।
म्हणे मी पापी केवळ ।
या नांव मुमुक्ष ॥ २८॥
म्हणे मी अभक्त दुर्जन ।
म्हणे मी हीनाहूनि हीन ।
म्हणे मी जन्मलो पाषाण ।
या नांव मुमुक्ष ॥ २९॥
म्हणे मी दुराभिमानी ।
म्हणे मी तपीळ जनीं ।
म्हणे मी नाना वेसनी ।
या नांव मुमुक्ष ॥ ३०॥
म्हणे मी आळसी आंगचोर ।
म्हणे मी कपटी कातर ।
म्हणे मी मूर्ख अविचार ।
या नांव मुमुक्ष ॥ ३१॥
म्हणे मी निकामी वाचाळ ।
म्हणे मी पाषांडी तोंडाळ ।
म्हणे मी कुबुद्धि कुटीळ ।
या नांव मुमुक्ष ॥ ३२॥
म्हणे मी कांहींच नेणे ।
म्हणे मी सकळाहूनि उणें ।
आपलीं वर्णी कुलक्षणें ।
या नांव मुमुक्ष ॥ ३३॥
म्हणे मी अनाधिकारी ।
म्हणे मी कुश्चिळ अघोरी ।
म्हणे मी नीच नानापरी ।
या नांव मुमुक्ष ॥ ३४॥
म्हणे मी काये आपस्वार्थी ।
म्हणे मी काये अनर्थी ।
म्हणे मी नव्हे परमार्थी ।
या नांव मुमुक्ष ॥ ३५॥
म्हणे मी अवगुणाची रासी ।
म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी ।
म्हणे मी भार जालों भूमीसी ।
या नांव मुमुक्ष ॥ ३६॥
आपणास निंदी सावकास ।
पोटीं संसाराचा त्रास ।
धरी सत्संगाचा हव्यास ।
या नांव मुमुक्ष ॥ ३७॥
नाना तीर्थे धुंडाळिलीं ।
शमदमादि साधनें केलीं ।
नाना ग्रन्थांतरें पाहिलीं ।
शोधूनियां ॥ ३८॥
तेणें नव्हे समाधान ।
वाटे अवघाच अनुमान ।
म्हणे रिघों संतांस शरण ।
या नांव मुमुक्ष ॥ ३९॥
देहाभिमान कुळाभिमान ।
द्रव्याभिमान नानाभिमान ।
सांडूनि, संतचरणीं अनन्य- ।
या नांव मुमुक्ष ॥ ४०॥
अहंता सांडूनि दूरी ।
आपणास निंदी नानापरी ।
मोक्षाची अपेक्षा करी ।
या नांव मुमुक्ष ॥ ४१॥
ज्याचें थोरपण लाजे ।
जो परमार्थाकारणें झिजे ।
संतापाईं विश्वास उपजे ।
या नांव मुमुक्ष ॥ ४२॥
स्वार्थ सांडून प्रपंचाचा ।
हव्यास धरिला परमार्थाचा ।
अंकित होईन सज्जनाचा ।
म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३॥
ऐसा मुमुक्ष जाणिजे ।
संकेतचिन्हें वोळखिजे ।
पुढें श्रोतीं अवधान दीजे ।
साधकलक्षणीं ॥ ४४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मुमुक्षलक्षणनाम समास आठवा ॥ ८॥
समास नववा : साधकनिरूपण
॥ श्रीराम् ॥
मागां मुमुक्षाचें लक्षण ।
संकेतें केलें कथन ।
आतां परिसा सावधान ।
साधक तो कैसा ॥ १॥
अवगुणाचा करूनि त्याग ।
जेणें धरिला संतसंग ।
तयासि बोलिजे मग ।
साधक ऐसा ॥२॥
जो संतांसि शरण गेला ।
संतजनीं आश्वासिला ।
मग तो साधक बोलिला ।
ग्रन्थांतरीं ॥ ३॥
उपदेशिलें आत्मज्ञान ।
तुटलें संसारबंधन ।
दृढतेकारणें करी साधन ।
या नांव साधक ॥ ४॥
धरी श्रवणाची आवडी ।
अद्वैतनिरूपणाची गोडी ।
मननें अर्थांतर काढी ।
या नांव साधक ॥ ५॥
होतां सारासार विचार ।
ऐके होऊनि तत्पर ।
संदेह छेदूनि, दृढोत्तर- ।
आत्मज्ञान पाहे ॥ ६॥
नाना संदेहनिवृत्ती- ।
व्हावया, धरी सत्संगती ।
आत्मशास्त्रगुरुप्रचीती ।
ऐक्यतेसी आणी ॥ ७॥
देहबुद्धि विवेकें वारी ।
आत्मबुद्धि सदृढ धरी ।
श्रवण मन केलेंचि करी ।
या नांव साधक ॥ ८॥
विसंचूनि दृश्यभान ।
दृढ धरी आत्मज्ञान ।
विचारें राखे समाधान ।
या नांव साधक ॥ ९॥
तोडूनि द्वैताची उपाधी ।
अद्वैत वस्तु साधनें साधी ।
लावी ऐक्यतेची समाधी ।
या नांव साधक ॥ १०॥
आत्मज्ञान जीर्ण जर्जर ।
त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेकें पावे पैलपार ।
या नांव साधक ॥ ११॥
उत्तमें साधूचीं लक्षणें ।
आंगिकारी निरूपणें ।
बळेंचि स्वरूपाकार होणें ।
या नांव साधक ॥ १२॥
असत्क्रिया ते सोडिली ।
आणी सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरूपस्थिती बळावली ।
या नांव साधक ॥ १३॥
अवगुण त्यागी दिवसेंदिवस ।
करी उत्तम गुणाचा अभ्यास ।
स्वरूपीं लावी निजध्यास ।
या नांव साधक ॥ १४॥
दृढ निश्चयाचेनि बळें ।
दृश्य असतांच नाडळे ।
सदा स्वरूपीं मिसळे ।
या नांव साधक ॥ १५॥
प्रत्यक्ष माया अलक्ष करी ।
अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं ।
आत्मस्थितीची धारणा धरी ।
या नांव साधक ॥ १६॥
जें या जनासि चोरलें ।
मनास न वचे अनुमानलें ।
तेंचि जेणें दृढ केलें ।
या नांव साधक ॥ १७॥
जें बोलतांचि वाचा धरी ।
जें पाहातांचि अंध करी ।
तें साधी नाना परी ।
या नांव साधक ॥ १८॥
जें साधूं जाता साधवेना ।
जें लक्षूं जातां लक्षवेना ।
तेंचि अनुभवें आणी मना ।
या नांव साधक ॥ १९॥
जेथें मनचि मावळे ।
जेथे तर्कचि पांगुळे ।
तेंचि अनुभवा आणी बळें ।
या नांव साधक ॥ २०॥
स्वानुभवाचेनि योगें ।
वस्तु साधी लागवेगें ।
तेंचि वस्तु होये आंगें ।
या नांव साधक ॥ २१॥
अनुभवाचीं आंगें जाणे ।
योगियांचे खुणे बाणे ।
कांहींच नहोन असणें ।
या नांव साधक ॥ २२॥
परती सारून उपाधी ।
असाध्य वस्तु साधनें साधी ।
स्वरूपीं करी दृढ बुद्धी ।
या नांव साधक ॥ २३॥
देवाभक्ताचें मूळ ।
शोधून पाहे सकळ ।
साध्यचि होये तत्काळ ।
या नांव साधक ॥ २४॥
विवेकबळें गुप्त जाला ।
आपेंआप मावळला ।
दिसतो, परी देखिला ।
नाहींच कोणीं ॥ २५॥
मीपण मागें सांडिलें ।
स्वयें आपणास धुंडिलें ।
तुर्येसहि वोलांडिलें ।
या नांव साधक ॥ २६॥
पुढें उन्मनीचा सेवटीं ।
आपली आपण अखंड भेटी ।
अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी ।
या नांव साधक ॥ २७॥
द्वैताचा तटका तोडिला ।
भासाचा भास मोडिला ।
देहीं असोनि विदेह जाला ।
या नांव साधक ॥ २८॥
जयास अखंड स्वरूपस्थिती ।
नाहीं देहाची अहंकृती ।
सकळ संदेहनिवृत्ती ।
या नांव साधक ॥ २९॥
पंचभूतांचा विस्तार ।
जयासि वाटे स्वप्नाकार ।
निर्गुणीं जयाचा निर्धार ।
या नांव साधक ॥ ३०॥
स्वप्नीं भये जें वाटलें ।
तें जागृतास नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें ।
या नांव साधक ॥ ३१॥
मायेचें जें प्रत्यक्षपण ।
जनास वाटे हें प्रमाण ।
स्वानुभवें अप्रमाण ।
साधकें केलें ॥ ३२॥
निद्रा सांडूनि चेइरा जाला ।
तो स्वप्नभयापासून सुटला ।
माया सांडून तैसा गेला ।
साधक स्वरूपीं ॥ ३३॥
ऐसि अंतरस्थिती बाणली ।
बाह्य निस्पृहता अवलंबिली ।
संसारौपाधी त्यागिली ।
या नांव साधक ॥ ३४॥
कामापासूनि सुटला ।
क्रोधापासूनि पळाला ।
मद मत्सर सांडिला ।
येकीकडे ॥ ३५॥
कुळाभिमानासि सांडिलें ।
लोकलाजेस लाजविलें ।
परमार्थास माजविलें ।
विरक्तिबळें ॥ ३६॥
अविद्येपासूनि फडकला ।
प्रपञ्चापासूनि निष्टला ।
लोभाचे हातींचा गेला ।
अकस्मात ॥ ३७॥
थोरपणासि पाडिलें ।
वैभवासि लाथाडिलें ।
महत्वासि झिंजाडिलें ।
विरक्तिबळें ॥ ३८॥
भेदाचा मडगा मोडिला ।
अहंकार झोडूनि पाडिला ।
पाईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥
विकल्पाचा केला वधू ।
थापें मारिला भवसिंधू ।
सकळ भूतांचा विरोधू ।
तोडूनि टाकिला ॥ ४०॥
भवभयासि भडकाविलें ।
काळाचें टांगें मोडिलें ।
मस्तक हाणोनि फोडिलें ।
जन्ममृत्याचें ॥ ४१॥
देह समंधावरी लोटला ।
संकल्पावरी उठावला ।
कल्पनेचा घात केला ।
अकस्मात ॥ ४२॥
अपधाकासि ताडिलें ।
लिंगदेहासि विभांडिलें ।
पाषांडासि पछाडिलें ।
विवेकबळें ॥ ४३॥
गर्वावरी गर्व केला ।
स्वार्थ अनर्थीं घातला ।
अनर्थ तोही निर्दाळिला ।
नीतिन्यायें ॥ ४४॥
मोहासि मध्येंचि तोडिलें ।
दुःखासि दुःधडचि केलें ।
शोकासि खंडून सांडिलें ।
एकीकडे ॥ ४५॥
द्वेष केला देशधडी ।
अभावाची घेतली नरडी ।
धाकें उदर तडाडी ।
कुतर्काचे ॥ ४६॥
ज्ञानें विवेक माजला ।
तेणें निश्चयो बळावला ।
अवगुणांचा संव्हार केला ।
वैराग्यबळें ॥ ४७॥
अधर्मास स्वधर्में लुटिलें ।
कुकर्मासि सत्कर्में झुगटिलें ।
लांटुन वाटा लाविलें ।
विचारें अविचारासी ॥ ४८॥
तिरस्कार तो चिरडिला ।
द्वेष खिरडूनि सांडिला ।
विषाद अविषादें घातला ।
पायांतळीं ॥ ४९॥
कोपावरी घालणें घातलें ।
कापट्य अन्तरीं कुटिलें ।
सख्य आपुलें मानिलें ।
विश्वजनीं ॥ ५०॥
प्रवृत्तीचा केला त्याग ।
सुहृदांचा सोडिला संग ।
निवृत्तिपंथें ज्ञानयोग ।
साधिता जाहला ॥ ५१॥
विषयमैंदासि सिंतरिलें ।
कुविद्येसी वेढा लाविलें ।
आपणास सोडविलें ।
आप्ततस्करांपासूनी ॥ ५२॥
पराधीनतेवरी कोपला ।
ममतेवरी संतापला ।
दुराशेचा त्याग केला ।
येकायेकीं ॥ ५३॥
स्वरूपीं घातलें मना ।
यातनेसि केली यातना ।
साक्षेप आणि प्रेत्ना ।
प्रतिष्ठिलें ॥ ५४॥
अभ्यासाचा संग धरिला ।
साक्षपासरिसा निघाला ।
प्रेत्न सांगातीं घेतला ।
साधनपंथें ॥ ५५॥
सावध दक्ष तो साधक ।
पाहे नित्यानित्यविवेक ।
संग त्यागूनि एक ।
सत्संग धरी ॥ ५६॥
बळेंचि सारिला संसार ।
विवेकें टाकिला जोजार ।
शुद्धाचारें अनाचार ।
भ्रष्टविला ॥ ५७॥
विसरास विसरला ।
आळसाचा आळस केला ।
सावध नाहीं दुश्चित्त झाला ।
दुश्चित्तपणासी ॥ ५८॥
आतां असो हें बोलणें ।
अवगुण सांडी निरूपणें ।
तो साधक ऐसा येणें- ।
प्रमाणें बुझावा ॥ ५९॥
बळेंचि अवघा त्याग कीजे ।
म्हणोनि साधक बोलिजे ।
आतां सिद्ध तोचि जाणिजे ।
पुढिले समासीं ॥ ६०॥
येथें संशयो उठिला ।
निस्पृह तोचि साधक जाहला ।
त्याग न घडे संसारिकाला ।
तरि तो साधक नव्हे कीं ॥ ६१॥
ऐसें श्रोतयाचें उत्तर ।
त्याचें कैसें प्रत्युत्तर ।
पुढिले समासीं तत्पर ।
होऊनि ऐका ॥ ६२॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
साधकलक्षणनिरूपण नाम
समास नववा ॥ ९॥
समास दहावा : सिद्धलक्षण निरूपण
॥ श्रीराम् ॥
मागां बोलिला संसारिक ।
त्यागेंविण नव्हे कीं साधक ।
ऐका याचा विवेक ।
ऐसा असे ॥ १॥
सन्मार्ग तोचि जीवीं धरणें ।
अन्मार्गाचा त्याग करणें ।
संसारिका त्याग येणें ।
प्रकारें ऐसा ॥ २॥
कुबुद्धित्यागेंविण कांहीं ।
सुबुद्धि लागणार नाहीं ।
संसारिकां त्याग पाहीं ।
ऐसा असे ॥ ३॥
प्रपंचीं वीट मानिला ।
मनें विषयेत्याग केला ।
तरीच पुढें अवलंबिला ।
परमार्थमार्ग ॥ ४॥
त्याग घडे अभावाचा ।
त्याग घडे संशयाचा ।
त्याग घडे अज्ञानाचा ।
शनै शनै ॥ ५॥
ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग ।
उभयतांस घडे सांग ।
निस्पृहास बाह्य त्याग ।
विशेष आहे ॥ ६॥
संसारिका ठाईं ठाईं ।
बाह्य त्याग घडे कांहीं ।
नित्य नेम श्रवण नाहीं ।
त्यागेंविण ॥ ७॥
फिटली आशंका स्वभावें ।
त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेचा अन्वय ।
सावध ऐका ॥ ८॥
मागां झालें निरूपण ।
साधकाची ओळखण ।
आतां सांगिजेल खूण ।
सिद्धलक्षणाची ॥ ९॥
साधु वस्तु होऊनि ठेला ।
संशयें ब्रह्मांडाबाहेरी गेला ।
निश्चयें चळेना ऐसा झाला ।
या नांव सिद्ध ॥ १०॥
बद्धपणाचे अवगुण ।
मुमुक्षुपणीं नाहीं जाण ।
मुमुक्षुपणाचें लक्षण ।
साधकपणीं नाहीं ॥ ११॥
साधकासि संदेहवृत्ति ।
पुढें होतसे निवृत्ती ।
या कारणें निःसंदेह श्रोतीं ।
साधु वोळखावा ॥ १२॥
संशयरहित ज्ञान ।
तेंचि साधूचें लक्षण ।
सिद्धाआंगीं संशयो हीन ।
लागेल कैसा ॥ १३॥
कर्ममार्ग संशयें भरला ।
साधनीं संशय कालवला ।
सर्वांमध्यें संशयो भरला ।
साधु तो निःसंदेह ॥ १४॥
संशयाचें ज्ञान खोटें ।
संशयाचें वैराग्य पोरटें ।
संशयाचें भजन वोखटें ।
निर्फळ होय ॥ १५॥
व्यर्थ संशयाचा देव ।
व्यर्थ संशयाचा भाव ।
व्यर्थ संशयाचा स्वभाव ।
सर्व कांही ॥ १६॥
व्यर्थ संशयाचें व्रत ।
व्यर्थ संशयाचें तीर्थ ।
व्यर्थ संशयाचा परमार्थ ।
निश्चयेंवीण ॥ १७॥
व्यर्थ संशयाची भक्ती ।
व्यर्थ संशयाची प्रीती ।
व्यर्थ संशयाची संगती ।
संशयो वाढवी ॥ १८॥
व्यर्थ संशयाचें जिणें ।
व्यर्थ संशयाचें धरणें ।
व्यर्थ संशयाचें करणें ।
सर्व कांहीं ॥ १९॥
व्यर्थ संशयाची पोथी ।
व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती ।
व्यर्थ संशयाची गती ।
निश्चयेंविण ॥ २०॥
व्यर्थ संशयाचा दक्ष ।
व्यर्थ संशयाचा पक्ष ।
व्यर्थ संशयाचा मोक्ष ।
होणार नाहीं ॥ २१॥
व्यर्थ संशयाचा संत ।
व्यर्थ संशयाचा पंडित ।
व्यर्थ संशयाचा बहुश्रुत ।
निश्चयेंविण ॥ २२॥
व्यर्थ संशयाची श्रेष्ठता ।
व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता ।
व्यर्थ संशयाचा ज्ञाता ।
निश्चयेंविण ॥ २३॥
निश्चयेंविण सर्व कांहीं ।
अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।
व्यर्थचि पडिले प्रवाहीं ।
संदेहाचे ॥ २४॥
निश्चयेंविण जें बोलणें ।
तें अवघेंचि कंटाळवाणें ।
बाष्कळ बोलिजे वाचाळपणें ।
निरर्थक ॥ २५॥
असो निश्चयेंविण जे वल्गना ।
ते अवघीच विटंबना ।
संशयें काहीं समाधाना ।
उरी नाहीं ॥ २६॥
म्हणोनि संदेहरहित ज्ञान ।
निश्चयाचें समाधान ।
तेंचि सिद्धाचें लक्षण ।
निश्चयेंसीं ॥ २७॥
तंव श्रोता करी प्रश्न ।
निश्चय करावा कवण ।
मुख्य निश्चयाचें लक्षण ।
मज निरूपावें ॥ २८॥
ऐक निश्चय तो ऐसा ।
मुख्य देव आहे कैसा ।
नाना देवांचा वळसा ।
करूंचि नये ॥ २९॥
जेणें निर्मिलें सचराचर ।
त्याचा करावा विचार ।
शुद्ध विवेकें परमेश्वर ।
ओळखावा ॥ ३०॥
मुख्य देव तो कोण ।
भक्तांचें कैसें लक्षण ।
असत्य सांडून वोळखण ।
सत्याची धरावी ॥ ३१॥
आपुल्या देवास वोळखावें ।
मग मी कोण हें पहावें ।
संग त्यागून रहावें ।
वस्तुरूप ॥ ३२॥
तोडावा बंधनाचा संशयो ।
करावा मोक्षाचा निश्चयो ।
पहावा भूतांचा अन्वयो ।
वितिरेकेंसीं ॥ ३३॥
पूर्वपक्षें सिद्धांत ।
पहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत ।
निश्चयो देवाचा ॥ ३४॥
देहाचेनि योगें संशयो ।
करी समाधानाचा क्षयो ।
चळों नेदावा निश्चयो ।
आत्मत्वाचा ॥ ३५॥
सिद्ध असतां आत्मज्ञान ।
संदेह वाढवी देहाभिमान ।
याकारणें समाधान ।
आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६॥
आठवतां देहबुद्धी ।
उडे विवेकाची शुद्धी ।
याकारणें आत्मबुद्धी ।
सदृढ करावी ॥ ३७॥
आत्मबुद्धी निश्चयाची ।
तेचि दशा मोक्षश्रीची ।
अहमात्मा हें कधींची ।
विसरों नये ॥ ३८॥
निरोपिलें निश्चयाचें लक्षण ।
परी हें न कळे सत्संगेंविण ।
संतांसी गेलिया शरण ।
संशये तुटती ॥ ३९॥
आतां असो हें बोलणें ।
ऐका सिद्धाचीं लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें ।
सिद्ध बोलिजे ॥ ४०॥
सिद्धस्वरूपीं नाहीं देहो ।
तेथें कैंचा हो संदेहो ।
याकारणें सिद्ध पाहो ।
निःसंदेही ॥ ४१॥
देहसमंधाचेनि गुणें ।
लक्षणासि काये उणें ।
देहातीतांचीं लक्षणें ।
काय म्हणोनि सांगावीं ॥ ४२॥
जें लक्षवेना चक्षूंसी ।
त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी ।
लक्षणें कैंसीं ॥ ४३॥
लक्षणें म्हणिजे केवळ गुण ।
वस्तु ठाईंची निर्गुण ।
तेंचि सिद्धांचें लक्षण ।
वस्तुरूप ॥ ४४॥
तथापि ज्ञानदशकीं बोलिलें ।
म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें ।
न्यून पूर्ण क्षमा केलें ।
पाहिजे श्रोतीं ॥ ४५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सिद्धलक्षणनिरूपणनाम
समास दहावा ॥ १०॥
॥ दशक पांचवा समाप्त ॥