गुरुवर्णन
गुरुवर्णन
गुरु हा संतकुलीचा राजा ।
गुरु हा प्राणविसांवा माझा ।
गुरुवीण देव नाही दुजा ।
पाहतां नाहीं त्रिलोकी॥१॥
गुरु हा सुखाचा सागरु ।
गुरु हा प्रेमाचा आगरु ।
गुरु हा धैर्याचा डोंगरू ।
कदाकाळीं डळमळीना ॥२॥
गुरुवैराग्याचें मूळ ।
गुरु हा परब्रम केवळ ।
गुरु हा सोडवी तात्काळ ।
गांठ लिंगदेहाची ॥३॥
गुरु हा साधकाशी साय ।
गुरु हा भक्तालागीं माय ।
गुरु हा कामधेनु गाय ।
भक्तांपरीं दुभतसे ॥४॥
गुरुघाली ज्ञानांजन ।
गुरु दाखवी निजधन ।
गुरु सौभाग्य देऊन ।
साधुबोध नांदवी ॥५॥
गुरु मुक्तीचें मंडन ।
गुरु दुष्टाचें दंडन ।
गुरु पापाचें खंडन ।
नानापरी वारितसे ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी ।
तारक मंत्र दिला आम्हाशीं ।
बापरखुमादेविवराशी ।
ध्यान मानसीं लागलें ||७||