दशक चवथा
दशक चवथा
॥ नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥
समास पहिला : श्रवणभक्ति
॥ श्रीराम ॥
जयजय जी गणनाथा ।
तूं विद्यावैभवें समर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्था ।
मज बोलवावें ॥ १॥
नमूं शारदा वेदजननी ।
सकळ सिद्धि जयेचेनी ।
मानस प्रवर्तलें मननीं ।
स्फूर्तिरूपें ॥ २॥
आतां आठऊं सद्गुरु ।
जो पराचाहि परु ।
जयाचेनि ज्ञानविचारु ।
कळों लागे ॥ ३॥
श्रोतेन पुसिलें बरवें ।
भगवद्भजन कैसें करावें ।
म्हणौनि बोलिलें स्वभावें ।
ग्रंथांतरीं ॥ ४॥
सावध होऊन श्रोतेजन ।
ऐका नवविधा भजन ।
सत्शास्त्रीं बोलिले, पावन- ।
होईजे येणें ॥ ५॥
श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं
विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
नवविधा भजन बोलिलें ।
तेंचि पुढें प्रांजळ केलें ।
श्रोतीं अवधान दिधलें ।
पाहिजे आतां ॥ ६॥
प्रथम भजन ऐसें जाण ।
हरिकथापुराणश्रवण ।
नाना अध्यात्मनिरूपण ।
ऐकत जावें ॥ ७॥
कर्ममार्ग उपासनामार्ग ।
ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
योगमार्ग वैराग्यमार्ग ।
ऐकत जावे ॥ ८॥
नाना व्रतांचे महिमे ।
नाना तीर्थांचे महिमे ।
नाना दानांचे महिमे ।
ऐकत जावे ॥ ९॥
नाना माहात्म्यें नाना स्थानें ।
नाना मंत्र नाना साधनें ।
नाना तपें पुरश्चरणें ।
ऐकत जावीं ॥ १०॥
दुग्धाहारी निराहारी ।
फळाहारी पर्णाहारी ।
तृणाहारी नानाहारी ।
कैसे ते ऐकावे ॥ ११॥
उष्णवास जळवास ।
सीतवास आरण्यवास ।
भूगर्भ आणी आकाशवास ।
कैसे ते ऐकावे ॥ १२॥
जपी तपी तामस योगी ।
नाना निग्रह हटयोगी ।
शाक्तआगम आघोरयोगी ।
कैसे ते ऐकावे ॥ १३॥
नाना मुद्रा नाना आसनें ।
नाना देखणीं लक्षस्थानें ।
पिंडज्ञानें तत्वज्ञानें ।
कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥
नाना पिंडांची रचना ।
नाना भूगोळरचना ।
नाना सृष्टीची रचना ।
कैसी ते ऐकावी ॥ १५॥
चंद्र सूर्य तारामंडळें ।
ग्रहमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें ।
कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥
ब्रह्माविष्णुमहेशस्थानें ।
इन्द्रदेवऋषीस्थानें ।
वायोवरुणकुबेरस्थानें ।
कैसीं ते ऐकावीं ॥ १७॥
नव खंडे चौदा भुवनें ।
अष्ट दिग्पाळांची स्थानें ।
नाना वनें उपवनें गहनें ।
कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥
गण गंधर्व विद्याधर ।
येक्ष किन्नर नारद तुंबर ।
अष्ट नायका संगीतविचार ।
कैसा तो ऐकावा ॥ १९॥
रागज्ञान ताळज्ञान ।
नृत्यज्ञान वाद्यज्ञान ।
अमृतवेळ प्रसंगज्ञान ।
कैसें तें ऐकावें ॥ २०॥
चौदा विद्या चौसष्टी कळा ।
सामुद्रिक लक्षणें सकळ कळा ।
बत्तीस लक्षणें नाना कळा ।
कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥
मंत्र मोहरे तोटके सिद्धी ।
नाना वल्ली नाना औषधी ।
धातु रसायण बुद्धी ।
नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥
कोण्या दोषें कोण रोग ।
कोणा रोगास कोण प्रयोग ।
कोण्या प्रयोगास कोण योग ।
साधे तो ऐकावा ॥ २३॥
रवरवादि कुंभपाक ।
नाना यातना येमेलोक ।
सुखसुःखादि स्वर्गनर्क ।
कैसा तो ऐकावा ॥ २४॥
कैशा नवविधा भक्ती ।
कैशा चतुर्विधा मुक्ती ।
कैसी पाविजे उत्तम गती ।
ऐसें हें ऐकावें ॥ २५॥
पिंडब्रह्मांडाची रचना ।
नाना तत्वविवंचना ।
सारासारविचारणा ।
कैसी ते ऐकावी ॥ २६॥
सायोज्यता मुक्ती कैसी होते ।
कैसें पाविजे मोक्षातें ।
याकारणें नाना मतें ।
शोधित जावीं ॥ २७॥
वेद शास्त्रें आणी पुराणें ।
माहावाक्याचीं विवरणें ।
तनुशतुष्टयनिर्शनें ।
कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥
ऐसें हें अवघेंचि ऐकावें ।
परंतु सार शोधून घ्यावें ।
असार तें जाणोनि त्यागावें ।
या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥
सगुणाचीं चरित्रें ऐकावीं ।
कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं ।
श्रवणभक्तीचीं जाणावीं ।
लक्षणें ऐसीं ॥ ३०॥
सगुण देवांचीं चरित्रें ।
निर्गुणाचीं तत्वें यंत्रें ।
हे दोनी परम पवित्रें ।
ऐकत जावीं ॥ ३१॥
जयंत्या उपोषणें नाना साधनें ।
मंत्र यंत्र जप ध्यानें ।
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें ।
नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥
ऐसें श्रवण सगुणाचें ।
अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें ।
विभक्ती सांडून भक्तीचें ।
मूळ शोधावें ॥ ३३॥
श्रवणभक्तीचें निरूपण ।
निरोपिलें असे जाण ।
पुढें कीर्तन भजनाचें लक्षण ।
बोलिलें असे ॥ ३४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रवणभक्तिनिरूपणनाम
समास पहिला ॥ १॥
समास दुसरा : किर्तन भक्ति
॥ श्रीराम् ॥
श्रोतीं भगवद्भजन पुसिलें ।
तें नवविधा प्रकारें बोलिलें ।
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें ।
दुसरें कीर्तन ऐका ॥१॥
सगुण हरिकथा करावी ।
भगवत्कीर्ती वाढवावी ।
अक्षंड वैखरी वदवावी ।
येथायोग्य ॥ २॥
बहुत करावें पाठांतर ।
कंठीं धरावें ग्रन्थांतर ।
भगवत्कथा निरंतर ।
करीत जावी ॥ ३॥
अपुलिया सुखस्वार्था ।
केलीच करावी हरिकथा ।
हरिकथेवीण सर्वथा ।
राहोंचि नये ॥ ४॥
नित्य नवा हव्यास धरावा ।
साक्षेप अत्यंतचि करावा ।
हरिकीर्तनें भरावा ।
ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥
मनापासून आवडी ।
जीवापासून अत्यंत गोडी ।
सदा सर्वदा तांतडी ।
हरिकीर्तनाची ॥ ६॥
भगवंतास कीर्तन प्रिये ।
कीर्तनें समाधान होये ।
बहुत जनासी उपाये ।
हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥
विविध विचित्रें ध्यानें ।
वर्णावीं आळंकार भूषणें ।
ध्यानमूर्ति अंतःकरणें- ।
लक्षून, कथा करावी ॥ ८॥
येश कीर्ति प्रताप महिमा ।
आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भक्तांचा आत्मा ।
संतुष्ट होये ॥ ९॥
कथा अन्वय लापणिका ।
नामघोष करताळिका ।
प्रसंगें बोलाव्या अनेका ।
धात माता नेमस्त ॥ १०॥
ताळ मृदांग हरिकीर्तन ।
संगीत नृत्य तान मान ।
नाना कथानुसंधान ।
तुटोंचि नेदावें ॥ ११॥
करुणा कीर्तनाच्या लोटें ।
कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांचीं श्रवणपुटें ।
आनंदें भरावीं ॥ १२॥
कंप रोमांच स्फुराणें ।
प्रेमाश्रुसहित गाणें ।
देवद्वारीं लोटांगणें ।
नमस्कार घालावे ॥ १३॥
पदें दोहडें श्लोक प्रबंद ।
धाटी मुद्रा अनेक छंद ।
बीरभाटिंव विनोद ।
प्रसंगें करावे ॥ १४॥
नाना नवरसिक श्रृंघारिक ।
गद्यपद्याचें कौतुक ।
नाना वचनें प्रस्ताविक ।
शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥
भक्तिज्ञान वैराग्य लक्षण ।
नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण ।
प्रांजळ बोलावें ॥ १६॥
प्रसंगें हरिकथा करावी ।
सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।
निर्गुणप्रसंगें वाढवावी ।
अध्यात्मविद्या ॥ १७॥
पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- ।
निरूपण करावें नेमस्त ।
बहुधा बोलणें अव्यावेस्त ।
बोलोंचि नये ॥ १८॥
करावें वेदपारायेण ।
सांगावें जनासी पुराण ।
मायाब्रह्मीचें विवरण ।
साकल्य वदावें ॥ १९॥
ब्राह्मण्य रक्षावें आदरें ।
उपासनेचीं भजनद्वारें ।
गुरुपरंपरा निर्धारें ।
चळोंच नेदावी ॥ २०॥
करावें वैराग्यरक्षण ।
रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।
परम दक्ष विचक्षण ।
सर्वहि सांभाळी ॥ २१॥
कीर्तन ऐकतां संदेह पडे ।
सत्य समाधान तें उडे ।
नीतिन्यायसाधन मोडे ।
ऐसें न बोलावें ॥ २२॥
सगुणकथा या नांव कीर्तन ।
अद्वैत म्हणिजे निरूपण ।
सगुण रक्षून निर्गुण ।
बोलत जावें ॥ २३॥
असो वक्त्रुत्वाचा अधिकार ।
अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार ।
अनुभवाचा ॥ २४॥
सकळ रक्षून ज्ञान सांगे ।
जेणें वेदज्ञा न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे ।
प्राणीमात्रासी ॥ २५॥
असो हें सकळ सांडून ।
करावें गुणानुवादकीर्तन ।
या नांव भगवद्भजन ।
दुसरी भक्ती ॥ २६॥
कीर्तनें माहादोष जाती ।
कीर्तनें होये उत्तमगती ।
कीर्तनें भगवत्प्राप्ती ।
येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥
कीर्तनें वाचा पवित्र ।
कीर्तनें होये सत्पात्र ।
हरिकीर्तनें प्राणीमात्र ।
सुसिळ होती ॥ २८॥
कीर्तनें अवेग्रता घडे ।
कीर्तनें निश्चये सांपडे ।
कीर्तनें संदेह बुडे ।
श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥
सदा सर्वदा हरिकीर्तन ।
ब्रह्मसुत करी आपण ।
तेणें नारद तोचि नारायेण ।
बोलिजेत आहे ॥ ३०॥
म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा ।
कीर्तनें संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थें आणी जगदात्मा ।
हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कीर्तनभजननिरूपणनाम
समास दुसरा ॥ २॥
समास तिसरा : नामस्मरणभक्ति
॥ श्रीराम् ॥
मागां निरोपिलें कीर्तन ।
जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण ।
तिसरी भक्ती ॥ १॥
स्मरण देवाचें करावें ।
अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें ।
समाधान ॥ २॥
नित्य नेम प्रातःकाळीं ।
माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं ।
करीत जावें ॥ ३॥
सुख दुःख उद्वेग चिंता ।
अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा ।
राहोंच नये ॥ ४॥
हरुषकाळीं विषमकाळीं ।
पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं ।
नामस्मरण करावें ॥ ५॥
कोडें सांकडें संकट ।
नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट ।
नामस्मरण करावें ॥ ६॥
चालतां बोलतां धंदा करितां ।
खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां ।
नाम विसरों नये ॥ ७॥
संपत्ती अथवा विपत्ती ।
जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती ।
सांडूंच नये ॥ ८॥
वैभव सामर्थ्य आणी सत्ता ।
नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां ।
नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥
आधीं आवदसा मग दसा ।
अथवा दसेउपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा ।
परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥
नामें संकटें नासतीं ।
नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती ।
उत्तम पदें ॥ ११॥
भूत पिशाच्च नाना छंद ।
ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद ।
नामनिष्ठें नासती ॥ १२॥
नामें विषबाधा हरती ।
नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती ।
अंतकाळीं ॥ १३॥
बाळपणीं तारुण्यकाळीं ।
कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतकाळीं ।
नामस्मरण असावें ॥ १४॥
नामाचा महिमा जाणे शंकर ।
जना उपदेसी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र ।
रामनामेंकरूनी ॥ १५॥
उफराट्या नामासाठीं ।
वाल्मिक तरला उठाउठी ।
भविष्य वदला शतकोटी ।
चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥
हरिनामें प्रल्हाद तरला ।
नाना आघातापासून सुटला ।
नारायेणनामें पावन जाला ।
अजामेळ ॥ १७॥
नामें पाषाण तरले ।
असंख्यात भक्त उद्धरले ।
माहापापी तेचि जाले ।
परम पवित्र ॥ १८॥
परमेश्वराचीं अनंत नामें ।
स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां, येमें- ।
बाधिजेना ॥ १९॥
सहस्रा नामामधें कोणी येक ।
म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक ।
होईजे स्वयें ॥ २०॥
कांहींच न करूनि प्राणी ।
रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी ।
भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥
नाम स्मरे निरंतर ।
तें जाणावें पुण्यशरीर ।
माहादोषांचे गिरिवर ।
रामनामें नासती ॥ २२॥
अगाध महिमा न वचे वदला ।
नामें बहुत जन उद्धरला ।
हळहळापासून सुटला ।
प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥
चहुं वर्णां नामाधिकार ।
नामीं नाहीं लाहानथोर ।
जढ मूढ पैलपार ।
पावती नामें ॥ २४॥
म्हणौन नाम अखंड स्मरावें ।
रूप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें ।
निरोपिली ॥ २५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नामस्मरणभक्तिनिरूपणनाम
समास तिसरा ॥ ३॥
समास चवथा : पादसेवन भक्ति
॥ श्रीराम् ॥
मागां जालें निरूपण ।
नामस्मरणाचें लक्षण ।
आतां ऐका पादसेवन ।
चौथी भक्ती ॥ १॥
पादसेवन तेंचि जाणावें ।
कायावाचामनोभावें ।
सद्गुरूचे पाय सेवावे ।
सद्गतिकारणें ॥ २॥
या नांव पादसेवन ।
सद्गुरुपदीं अनन्यपण ।
निरसावया जन्ममरण ।
यातायाती ॥ ३॥
सद्गुरुकृपेविण कांहीं ।
भवतरणोपाव तों नाहीं ।
याकारणें लवलाहीं ।
सद्गुरुपाय सेवावे ॥ ४॥
सद्वस्तु दाखवी सद्गुरु ।
सकळ सारासारविचारु ।
परब्रह्माचा निर्धारु ।
अंतरीं बाणे ॥ ५॥
जे वस्तु दृष्टीस दिसेना ।
आणी मनास तेहि भासेना ।
संगत्यागेंविण ये ना ।
अनुभवासी ॥ ६॥
अनुभव घेतां संगत्याग नसे ।
संगत्यागें अनुभव न दिसे ।
हें अनुभवी यासीच भासे ।
येरां गथागोवी ॥ ७॥
संगत्याग आणी निवेदन ।
विदेहस्थिती अलिप्तपण ।
सहजस्थिती उन्मनी विज्ञान ।
हे सप्तहि येकरूप ॥ ८॥
याहिवेगळीं नामाभिधानें ।
समाधानाचीं संकेतवचनें ।
सकळ कांहीं पादसेवनें ।
उमजों लागे ॥ ९॥
वेद वेदगर्भ वेदांत ।
सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत ।
अनुभव अनुर्वाच्य धादांत ।
सत्य वस्तु ॥ १०॥
बहुधा अनुभवाचीं आंगें ।
सकळ कळती संतसंगें ।
चौथे भक्तीचे प्रसंगें ।
गोप्य तें प्रगटे ॥ ११॥
प्रगट वसोनि नसे ।
गोप्य असोनि भासे ।
भासाअभासाहून अनारिसे ।
गुरुगम्य मार्ग ॥ १२॥
मार्ग होये परी अंतरिक्ष ।
जेथें सर्वहि पूर्वपक्ष ।
पाहों जातां अलक्ष ।
लक्षवेना ॥ १३॥
लक्षें जयासी लक्षावें ।
ध्यानें जयासी ध्यावें ।
तें गे तेंचि आपण व्हावें ।
त्रिविधा प्रचिती ॥ १४॥
असो हीं अनुभवाचीं द्वारें ।
कळती सारासारविचारें ।
सत्संगेंकरून सत्योत्तरें ।
प्रत्ययासि येतीं ॥ १५॥
सत्य पाहातां नाहीं असत्य ।
असत्य पाहातां नाहीं सत्य ।
सत्याअसत्याचें कृत्य ।
पाहाणारापासीं ॥ १६॥
पाहाणार पाहाणें जया लागलें ।
तें तद्रूपत्वें प्राप्त जालें ।
तरी मग जाणावें बाणलें ।
समाधान ॥ १७॥
नाना समाधानें पाहातां ।
बाणती सद्गुरु करितां ।
सद्गुरुविण सर्वथा ।
सन्मार्ग नसे ॥ १८॥
प्रयोग साधनें सायास ।
नाना साक्षेपें विद्याअभ्यास ।
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास ।
पाविजेत नाहीं ॥ १९॥
जें अभ्यासें अभ्यासितां न ये ।
जें साधनें असाध्य होये ।
तें हें सद्गुरुविण काये ।
उमजों जाणे ॥ २०॥
याकारणें ज्ञानमार्ग- ।
कळाया, धरावा सत्संग ।
सत्संगेंविण प्रसंग ।
बोलोंचि नये ॥ २१॥
सेवावे सद्गुरूचे चरण ।
या नांव पादसेवन ।
चौथे भक्तीचें लक्षण ।
तें हें निरोपिलें ॥ २२॥
देव ब्राह्मण माहानुभाव ।
सत्पात्र भजनाचे ठाव ।
ऐसिये ठाईं सद्भाव ।
दृढ धरावा ॥ २३॥
हें प्रवृत्तीचें बोलणें ।
बोलिलें रक्षाया कारणें ।
परंतु सद्गुरुपाय सेवणें ।
या नांव पादसेवन ॥ २४॥
पादसेवन चौथी भक्ती ।
पावन करितसे त्रिजगतीं ।
जयेकरितां सायोज्यमुक्ती ।
साधकास होये ॥ २५॥
म्हणौनि थोराहून थोर ।
चौथे भक्तीचा निर्धार ।
जयेकरितां पैलपार ।
बहुत प्राणी पावती ॥ २६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पादसेवनभक्तिनिरूपणनाम
समास चवथा ॥ ४॥
समास पाचवा : अर्चनभक्ति
॥ श्रीराम् ॥
मागां जालें निरूपण ।
चौथे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान ।
पांचवी भक्ती ॥ १॥
पांचवी भक्ती तें आर्चन ।
आर्चन म्हणिजे देवतार्चन ।
शास्त्रोक्त पूजाविधान ।
केलें पाहिजे ॥ २॥
नाना आसनें उपकर्णें ।
वस्त्रें आळंकार भूषणें ।
मानसपूजा मूर्तिध्यानें ।
या नांव पांचवी भक्ती ॥ ३॥
देवब्राह्मणाग्नीपूजन ।
साधुसंतातीतपूजन ।
इति महानुभाव गाइत्रीपूजन ।
या नांव पांचवी भक्ती ॥ ४॥
धातुपाषाणमृत्तिकापूजन ।
चित्र लेप सत्पात्रपूजन ।
आपले गृहींचें देवतार्चन ।
या नांव पांचवी भक्ती ॥ ५॥
सीळा सप्तांकित नवांकित ।
शालिग्राम शकलें चक्रांकित ।
लिंगें सूर्यकांत सोमकांत ।
बाण तांदळे नर्बदे ॥ ६॥
भैरव भगवती मल्लारी ।
मुंज्या नृसिंह बनशंकरी ।
नाग नाणी नानापरी ।
पंचायेत्नपूजा ॥ ७॥
गणेशशारदाविठलमूर्ती ।
रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।
श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती ।
देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८॥
मत्छकूर्मवऱ्हावमूर्ती ।
नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती ।
देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९॥
केशवनारायणमाधवमूर्ती ।
गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती ।
रुषीकेश पद्मनाभि ॥ १०॥
दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती ।
प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती ।
अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती ।
जनार्दन आणी उपेंद्र ॥ ११॥
हरिहरांच्या अनंत मूर्ती ।
भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती ।
देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२॥
अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण ।
लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।
श्रीहरीनारायण आदिनारायण ।
शेषशाई परमात्मा ॥ १३॥
ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती ।
पाहों जातां उदंड असती ।
त्यांचें आर्चन करावें, भक्ती- ।
पांचवी ऐसी ॥ १४॥
याहि वेगळे कुळधर्म ।
सोडूं नये अनुक्रम ।
उत्तम अथवा मध्यम ।
करीत जावें ॥ १५॥
जाखमाता मायराणी ।
बाळा बगुळा मानविणी ।
पूजा मांगिणी जोगिणी ।
कुळधर्में करावीं ॥ १६॥
नाना तीर्थांक्षत्रांस जावें ।
तेथें त्या देवाचें पूजन करावें ।
नाना उपचारीं आर्चावें ।
परमेश्वरासी ॥ १७॥
पंचामृतें गंधाक्षतें ।
पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।
धूपदीप असंख्यातें ।
नीरांजनें कर्पुराचीं ॥ १८॥
नाना खाद्य नैवेद्य सुंदर ।
नाना फळें तांबोलप्रकार ।
दक्षणा नाना आळंकार ।
दिव्यांबरें वनमाळा ॥ १९॥
सिबिका छत्रें सुखासनें ।
माहि मेघडंब्रें सूर्यापानें ।
दिंड्या पताका निशाणें ।
टाळ घोळ मृदांग ॥ २०॥
नाना वाद्यें नाना उत्साव ।
नाना भक्तसमुदाव ।
गाती हरिदास सद्भाव- ।
लागला भगवंतीं ॥ २१॥
वापी कूप सरोवरें ।
नाना देवाळयें सिखरें ।
राजांगणें मनोहरें ।
वृंदावनें भुयरीं ॥ २२॥
मठ मंड्या धर्मशाळा ।
देवद्वारीं पडशाळा ।
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा ।
नाना वस्त्र सामुग्री ॥ २३॥
नाना पडदे मंडप चांदोवे ।
नाना रत्नघोष लोंबती बरवे ।
नाना देवाळईं समर्पावे ।
हस्थि घोडे शक्कटें ॥ २४॥
आळंकार आणि आळंकारपात्रें ।
द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें ।
नाना प्रकारीचीं ॥ २५॥
वनें उपवनें पुष्पवाटिका ।
तापस्यांच्या पर्णकुटिका ।
ऐसी पूजा जगन्नायका ।
येथासांग समर्पावी ॥ २६॥
शुक शारिका मयोरें ।
बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें सामरें ।
देवाळईं समर्पावीं ॥ २७॥
सुगंधमृगें आणी मार्जरें ।
गाई म्हैसी वृषभ वानरें ।
नाना पदार्थ आणी लेंकुरें ।
देवाळईं समर्पावीं ॥ २८॥
काया वाचा आणी मनें ।
चित्तें वित्तें जीवें प्राणें ।
सद्भावें भगवंत आर्चनें ।
या नांव आर्चनभक्ती ॥ २९॥
ऐसेंचि सद्गुरूचें भजन- ।
करून, असावें अनन्य ।
या नांव भगवद्भजन ।
पांचवी भक्ती ॥ ३०॥
ऐसी पूजा न घडे बरवी ।
तरी मानसपूजा करावी ।
मानसपूजा अगत्य व्हावी ।
परमेश्वरासी ॥ ३१॥
मनें भगवंतास पूजावें ।
कल्पून सर्वहि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें ।
लक्षण ऐसें ॥ ३२॥
जें जें आपणांस पाहिजे ।
तें तें कल्पून वाहिजे ।
येणें प्रकारें कीजे ।
मानसपूजा ॥ ३३॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आर्चनभक्तिनाम समास पंचवा ॥ ५॥
समास सहावा : वंदनभक्ति ॥
श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण ।
पांचवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान ।
साहावी भक्ती ॥ १॥
साहावी भक्ती तें वंदन ।
करावें देवासी नमन ।
संत साधु आणी सज्जन ।
नमस्कारीत जावे ॥ २॥
सूर्यासि करावे नमस्कार ।
देवासि करावे नमस्कार ।
सद्गुरूस करावे नमस्कार ।
साष्टांग भावें ॥ ३॥
साष्टांग नमस्कारास अधिकारु ।
नानाप्रतिमा देव गुरु ।
अन्यत्र नमनाचा विचारु ।
अधिकारें करावा ॥ ४॥
छपन्न कोटी वसुमती ।
मधें विष्णुमूर्ती असती ।
तयांस नमस्कार प्रीतीं ।
साष्टांग घालावे ॥ ५॥
पशुपति श्रीपति आणी गभस्ती ।
यांच्या दर्शनें दोष जाती ।
तैसाचि नमावा मारुती ।
नित्य नेमे । म् विशेष ॥ ६॥
श्लोक ॥ शंकरः शेषशायी च
मार्तंडो मारुतिस्तथा ।
एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥
भक्त ज्ञानी आणी वीतरागी ।
माहानुभाव तापसी योगी ।
सत्पात्रें देखोनि वेगीं ।
नमस्कार घालावे ॥ ७॥
वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ ।
पंडित पुराणिक आणी विद्वज्जन ।
याज्ञिक वैदिक पवित्रजन ।
नमस्कारीत जावे ॥ ८॥
जेथें दिसती विशेष गुण ।
तें सद्गुरूचें अधिष्ठान ।
याकारणें तयासी नमन ।
अत्यादरें करावें ॥ ९॥
गणेश शारदा नाना शक्ती ।
हरिहरांच्या अवतारमूर्ती ।
नाना देव सांगों किती ।
पृथकाकारें ॥ १०॥
सर्व देवांस नमस्कारिलें ।
ते येका भगवंतास पावलें ।
येदर्थीं येक वचन बोलिलें- ।
आहे, तें ऐका ॥ ११॥
श्लोक ॥ आकाशात्पतितं
तोयं यथा गच्छति सागरं ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
याकारणें सर्व देवांसी ।
नमस्कारावें अत्यादरेंसीं ।
अधिष्ठान मानितां, देवांसी- ।
परम सौख्य वाटे ॥ १२॥
देव देवाचीं अधिष्ठानें ।
सत्पात्रें सद्गुरूचीं स्थानें ।
या कारणें नमस्कार करणें ।
उभय मार्गीं ॥ १३॥
नमस्कारें लीनता घडे ।
नमस्कारें विकल्प मोडे ।
नमस्कारें सख्य घडे ।
नाना सत्पात्रासीं ॥ १४॥
नमस्कारें दोष जाती ।
नमस्कारें अन्याय क्ष्मती ।
नमस्कारें मोडलीं जडतीं ।
समाधानें ॥ १५॥
सिसापरता नाहीं दंड ।
ऐसें बोलती उदंड ।
याकारणें अखंड ।
देव भक्त वंदावे ॥ १६॥
नमस्कारें कृपा उचंबळे ।
नमस्कारें प्रसन्नता प्रबळे ।
नमस्कारें गुरुदेव वोळे ।
साधकांवरीं ॥ १७॥
निशेष करितां नमस्कार ।
नासती दोषांचे गिरिवर ।
आणी मुख्य परमेश्वर ।
कृपा करी ॥ १८॥
नमस्कारें पतित पावन ।
नमस्कारें संतांसी शरण ।
नमस्कारें जन्ममरण ।
दुरी दुऱ्हावे ॥ १९॥
परम अन्याय करुनि आला ।
आणी साष्टांग नमस्कार घातला ।
तरी तो अन्याये क्ष्मा केला ।
पाहिजे श्रेष्ठीं ॥ २०॥
याकारणें नमस्कारापरतें ।
आणीक नाहीं अनुसरतें ।
नमस्कारें प्राणीयातें ।
सद्बुद्धि लागे ॥ २१॥
नमस्कारास वेचावें नलगे ।
नमस्कारास कष्टावें नलगे ।
नमस्कारांस कांहींच नलगे ।
उपकर्ण सामग्री ॥ २२॥
नमस्कारा ऐसें नाहीं सोपें ।
नमस्कार करावा अनन्यरूपें ।
नाना साधनीं साक्षपें ।
कासया सिणावें ॥ २३॥
साधक भावें नमस्कार घाली ।
त्याची चिंता साधूस लागली ।
सुगम पंथे नेऊन घाली ।
जेथील तेथें ॥ २४॥
याकारणें नमस्कार श्रेष्ठ ।
नमस्कारें वोळती वरिष्ठ ।
येथें सांगितली पष्ट ।
साहावी भक्ती ॥ २५॥
इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे
वंदनभक्तिनाम समास सहावा ॥ ६॥
समास सातवा : दास्यभक्ति
॥ श्रीराम् ॥
मागां जालें निरूपण ।
साहवें भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान ।
सातवी भक्ती ॥ १॥
सातवें भजन तें दास्य जाणावें ।
पडिलें कार्य तितुकें करावें ।
सदा सन्निधचि असावें ।
देवद्वारीं ॥ २॥
देवाचें वैभव संभाळावें ।
न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।
चढतें वाढतें वाढवावें ।
भजन देवाचें ॥ ३॥
भंगलीं देवाळयें करावीं ।
मोडलीं सरोवरें बांधावीं ।
सोफे धर्मशाळा चालवावीं ।
नूतनचि कार्यें ॥ ४॥
नाना रचना जीर्ण जर्जर ।
त्यांचे करावे जीर्णोद्धार ।
पडिलें कार्य तें सत्वर ।
चालवित जावें ॥ ५॥
गज रथ तुरंग सिंहासनें ।
चौकिया सिबिका सुखासनें ।
मंचक डोल्हारे विमानें ।
नूतनचि करावीं ॥ ६॥
मेघडंब्रें छत्रें चामरें ।
सूर्यापानें निशाणें अपारें ।
नित्य नूतन अत्यादरें ।
सांभाळित जावीं ॥ ७॥
नाना प्रकारीचीं यानें ।
बैसावयाचीं उत्तम स्थानें ।
बहुविध सुवर्णासनें ।
येत्नें करीत जावीं ॥ ८॥
भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा ।
रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।
संपूर्ण द्रव्यांश ऐसा ।
अति येत्नें करावा ॥ ९॥
भुयेरीं तळघरें आणी विवरें ।
नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें ।
येत्नें करीत जावीं ॥ १०॥
आळंकार भूषणें दिव्यांबरें ।
नाना रत्नें मनोहरें ।
नाना धातु सुवर्णपात्रें ।
येत्नें करीत जावीं ॥ ११॥
पुष्पवाटिका नाना वनें ।
नाना तरुवरांचीं बनें ।
पावतीं करावीं जीवनें ।
तया वृक्षांसी ॥ १२॥
नाना पशूंचिया शाळा ।
नाना पक्षी चित्रशाळा ।
नाना वाद्यें नाट्यशाळा ।
गुणी गायेक बहुसाल ॥ १३॥
स्वयंपाकगृहें भोजनशाळा ।
सामग्रीगृहें धर्मशाळा ।
निद्रिस्तांकारणें पडशाळा ।
विशाळ स्थळें ॥ १४॥
नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें ।
नाना खाद्यफळांचीं स्थळें ।
नाना रसांचीं नाना स्थळें ।
येत्नें करीत जावीं ॥ १५॥
नाना वस्तांची नाना स्थानें ।
भंगलीं करावीं नूतनें ।
देवाचें वैभव वचनें ।
किती म्हणौनि बोलावें ॥ १६॥
सर्वां ठाई अतिसादर ।
आणी दास्यत्वासहि तत्पर ।
कार्यभागाचा विसर ।
पडणार नाहीं ॥ १७॥
जयंत्या पर्वें मोहोत्साव ।
असंभाव्य चालवी वैभव ।
जें देखतां स्वर्गींचे देव ।
तटस्त होती ॥ १८॥
ऐसें वैभव चालवावें ।
आणी नीच दास्यत्वहि करावें ।
पडिले प्रसंगीं सावध असावें ।
सर्वकाळ ॥ १९॥
जें जें कांहीं पाहिजे ।
तें तें तत्काळचि देजे ।
अत्यंत आवडीं कीजे ।
सकळ सेवा ॥ २०॥
चरणक्षाळळें स्नानें आच्मनें ।
गंधाक्षतें वसनें भूषणें ।
आसनें जीवनें नाना सुमनें ।
धूप दीप नैवेद्य ॥ २१॥
शयेनाकारणें उत्तम स्थळें ।
जळें ठेवावीं सुसीतळें ।
तांबोल गायनें रसाळें ।
रागरंगें करावीं ॥ २२॥
परिमळद्रव्यें आणी फुलीलीं ।
नाना सुगंधेल तेलें ।
खाद्य फळें बहुसालें ।
सन्निधचि असावीं ॥ २३॥
सडे संमार्जनें करावीं ।
उदकपात्रें उदकें भरावीं ।
वसनें प्रक्षालून आणावीं ।
उत्तमोत्तमें ॥ २४॥
सकळांचें करावें पारपत्य ।
आलयाचें करावें आतित्य ।
ऐसी हे जाणावी सत्य ।
सातवी भक्ती ॥ २५॥
वचनें बोलावीं करुणेचीं ।
नाना प्रकारें स्तुतीचीं ।
अंतरें निवतीं सकळांचीं ।
ऐसें वदावें ॥ २६॥
ऐसी हे सातवी भक्ती ।
निरोपिली येथामती ।
प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं ।
मानसपूजा करावी ॥ २७॥
ऐसें दास्य करावें देवाचें ।
येणेंचि प्रकारें सद्गुरूचें ।
प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें ।
करित जावें ॥ २८॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
दास्यभक्तिनाम समास सातवा ॥ ७॥
समास आठवा : सख्यभक्ति
॥ श्रीराम् ॥
मागां जालें निरूपण ।
सातवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान ।
आठवी भक्ती ॥ १॥
देवासी परम सख्य करावें ।
प्रेम प्रीतीनें बांधावें ।
आठवे भक्तीचें जाणावें ।
लक्षण ऐसें ॥ २॥
देवास जयाची अत्यंत प्रीती ।
आपण वर्तावें तेणें रीतीं ।
येणें करितां भगवंतीं ।
सख्य घडे नेमस्त ॥ ३॥
भक्ति भाव आणी भजन ।
निरूपण आणी कथाकीर्तन ।
प्रेमळ भक्तांचें गायन ।
आवडे देवा ॥ ४॥
आपण तैसेंचि वर्तावें ।
आपणासि तेंच आवडावें ।
मनासारिखें होतां स्वभावें ।
सख्य घडे नेमस्त ॥ ५॥
देवाच्या सख्यत्वाकारणें ।
आपलें सौख्य सोडून देणें ।
अनन्यभावें जीवें प्राणें ।
शरीर तेंहि वेंचावें ॥ ६॥
सांडून आपली संसारवेथा ।
करित जावी देवाची चिंता ।
निरूपण कीर्तन कथा वार्ता ।
देवाच्याचि सांगाव्या ॥ ७॥
देवाच्या सख्यत्वासाठीं ।
पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें, सेवटीं- ।
प्राण तोहि वेचावा ॥ ८॥
आपुलें आवघेंचि जावें ।
परी देवासी सख्य राहावें ।
ऐसी प्रीती जिवें भावें ।
भगवंतीं लागावी ॥ ९॥
देव म्हणिजे आपुला प्राण ।
प्राणासी न करावें निर्वाण ।
परम प्रीतीचें लक्षण ।
तें हें ऐसें असे ॥ १०॥
ऐसें परम सख्य धरितां ।
देवास लागे भक्ताची चिंता ।
पांडव लाखाजोहरीं जळतां ।
विवरद्वारें काढिले ॥ ११॥
देव सख्यत्वें राहे आपणासी ।
तें तों वर्म आपणाचि पासी ।
आपण वचनें बोलावीं जैसीं ।
तैसीं येती पडसादें ॥ १२॥
आपण असतां अनन्यभावें ।
देव तत्काळचि पावे ।
आपण त्रास घेतां जीवें ।
देवहि त्रासे ॥ १३॥
श्लोक ॥ ये यथा मां प्रपद्यंते
तांस्तथैव भजाम्यहम् ।
जैसें जयाचे भजन ।
तैसाचि देवहि आपण ।
म्हणौन हें आवघें जाण ।
आपणाचि पासीं ॥ १४॥
आपुल्या मनासारिखें न घडे ।
तेणें गुणें निष्ठा मोडे ।
तरी गोष्टी आपणांकडे ।
सहजचि आली ॥ १५॥
मेघ चातकावरी वोळेना ।
तरी चातक पालटेना ।
चंद्र वेळेसि उगवेना ।
तऱ्ही चकोर अनन्य ॥ १६॥
ऐसें असावें सख्यत्व ।
विवेकें धरावें सत्व ।
भगवंतावरील ममत्व ।
सांडूंचि नये ॥ १७॥
सखा मानावा भगवंत ।
माता पिता गण गोत ।
विद्या लक्ष्मी धन वित्त ।
सकळ परमात्मा ॥ १८॥
देवावेगळें कोणीं नाहीं ।
ऐसें बोलती सर्वहि ।
परंतु त्यांची निष्ठा कांहीं ।
तैसीच नसे ॥ १९॥
म्हणौनी ऐसें न करावें ।
सख्य तरी खरेंचि करावें ।
अंतरीं सदृढ धरावें ।
परमेश्वरासी ॥ २०॥
आपुलिया मनोगताकारणें ।
देवावरी क्रोधास येणें ।
ऐसीं नव्हेत किं लक्षणें ।
सख्यभक्तीचीं ॥ २१॥
देवाचें जें मनोगत ।
तेंचि आपुलें उचित ।
इच्छेसाठीं भगवंत ।
अंतरूं नये कीं ॥ २२॥
देवाचे इच्छेनें वर्तावें ।
देव करील तें मानावें ।
मग सहजचि स्वभावें ।
कृपाळु देव ॥ २३॥
पाहातां देवाचे कृपेसी ।
मातेची कृपा कायेसी ।
माता वधी बाळकासी ।
विपत्तिकाळीं ॥ २४॥
देवें भक्त कोण वधिला ।
कधीं देखिला ना ऐकिला ।
शरणागतांस देव जाला ।
वज्रपंजरु ॥ २५॥
देव भक्तांचा कैवारी ।
देव पतितांसि तारी ।
देव होये साहाकारी ।
अनाथांचा ॥ २६॥
देव अनाथांचा कैपक्षी ।
नाना संकटांपासून रक्षी ।
धांविन्नला अंतरसाक्षी ।
गजेंद्राकारणें ॥ २७॥
देव कृपेचा सागरु ।
देव करुणेचा जळधरु ।
देवासि भक्तांचा विसरु ।
पडणार नाहीं ॥ २८॥
देव प्रीती राखों जाणे ।
देवासी करावें साजणें ।
जिवलगें आवघीं पिसुणें ।
कामा न येती ॥ २९॥
सख्य देवाचें तुटीना ।
प्रीति देवाची विटेना ।
देव कदा पालटेना ।
शरणागतांसी ॥ ३०॥
म्हणौनि सख्य देवासी करावें ।
हितगुज तयासी सांगावें ।
आठवे भक्तीचें जाणावें ।
लक्षण ऐसें ॥ ३१॥
जैसा देव तैसा गुरु ।
शास्त्रीं बोलिला हा विचारु ।
म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु ।
सद्गुरूसीं असावा ॥ ३२॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सख्यभक्तिनाम समास आठवा ॥ ८॥
समास नववा : आत्मनिवेदन
॥ श्रीराम् ॥
मागां जालें निरूपण ।
आठवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान ।
भक्ति नवमी ॥ १॥
नवमी निवेदन जाणावें ।
आत्मनिवेदन करावें ।
तेंहि सांगिजेल स्वभावें ।
प्रांजळ करूनि ॥ २॥
ऐका निवेदनाचें लक्षण ।
देवाअसि वाहावें आपण ।
करावें तत्त्वविवरण ।
म्हणिजे कळे ॥ ३॥
मी भक्त ऐसें म्हणावें ।
आणी विभक्तपणेंचि भजावें ।
हें आवघेंचि जाणावें ।
विलक्षण ॥ ४॥
लक्षण असोन विलक्षण ।
ज्ञान असोन अज्ञान ।
भक्त असोन विभक्तपण ।
तें हें ऐसें ॥ ५॥
भक्त म्हणिजे विभक्त नव्हे ।
आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण कांहींच नव्हे ।
समाधान ॥ ६॥
तस्मात् विचार करावा ।
देव कोण तो वोळखावा ।
आपला आपण शोध घ्यावा ।
अंतर्यामीं ॥ ७॥
मी कोण ऐसा निवाडा ।
पाहों जातां तत्वझाडा ।
विचार करितां उघडा ।
आपण नाहीं ॥ ८॥
तत्वें तत्व जेव्हां सरे ।
तेव्हां आपण कैंचा उरे ।
आत्मनिवेदन येणेंप्रकारें ।
सहजचि जालें ॥ ९॥
तत्वरूप सकळ भासे ।
विवेक पाहातां निरसे ।
प्रकृतिनिरासें आत्मा असे ।
आपण कैंचा ॥ १०॥
येक मुख्य परमेश्वरु ।
दुसरी प्रकृति जगदाकारु ।
तिसरा आपण कैंचा चोरु ।
आणिला मधें ॥ ११॥
ऐसें हें सिद्धचि असतां ।
नाथिली लागे देहाहंता ।
परंतु विचारें पाहों जातां ।
कांहींच नसे ॥ १२॥
पाहातां तत्त्वविवेचना ।
पिंडब्रह्मांडतत्वरचना ।
विश्वाकारें वेक्ती, नाना- ।
तत्वें विस्तारलीं ॥ १३॥
तत्वें साक्षत्वें वोसरतीं ।
साक्षत्व नुरे आत्मप्रचिती ।
आत्मा असे आदिअंतीं ।
आपण कैंचा ॥ १४॥
आत्मा एक स्वानंदघन ।
आणी अहमात्मा हें वचन ।
तरी मग आपण कैंचा भिन्न ।
उरला तेथें ॥ १५॥
सोहं हंसा हें उत्तर ।
याचें पाहावें अर्थांतर ।
पाहतां आत्मयाचा विचार ।
आपण कैंचा तेथें ॥ १६॥
आत्मा निर्गुण निरंजन ।
तयासी असावें अनन्य ।
अनन्य म्हणिजे नाहीं अन्य ।
आपण कैंचा तेथें ॥ १७॥
आत्मा म्हणिजे तो अद्वैत ।
जेथें नाहीं द्वैताद्वैत ।
तेथें मीपणाचा हेत ।
उरेल कैंचा ॥ १८॥
आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण ।
जेथें नाहीं गुणागुण ।
निखळ निर्गुणी आपण ।
कोण कैंचा ॥ १९॥
त्वंपद तत्पद असिपद ।
निरसुनि सकळ भेदाभेद ।
वस्तु ठाईंची अभेद ।
आपण कैंचा ॥ २०॥
निरसितां जीवशिवौपाधी ।
जीवशिवचि कैंचे आधी ।
स्वरूपीं होतां दृढबुद्धि ।
आपण कैंचा ॥ २१॥
आपण मिथ्या, साच देव ।
देव भक्त अनन्यभाव ।
या वचनाचा अभिप्राव ।
अनुभवी जाणती ॥ २२॥
या नांव आत्मनिवेदन ।
ज्ञानियांचें समाधान ।
नवमे भक्तींचे लक्षण ।
निरोपिलें ॥ २३॥
पंचभूतांमध्यें आकाश ।
सकळ देवांमधें जगदीश ।
नवविधा भक्तीमध्यें विशेष ।
भक्ति नवमी ॥ २४॥
नवमी भक्ती आत्मनिवेदन ।
न होतां न चुके जन्ममरण ।
हें वचन सत्य, प्रमाण- ।
अन्यथा नव्हे ॥ २५॥
ऐसी हे नवविधा भक्ती ।
केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती ।
सायोज्यमुक्तीस कल्पांतीं ।
चळण नाहीं ॥ २६॥
तिहीं मुक्तींस आहे चळण ।
सायोज्यमुक्ती अचळ जाण ।
त्रैलोक्यास होतां निर्वाण ।
सायोज्यमुक्ती चळेना ॥ २७॥
आवघीया चत्वार मुक्ती ।
वेदशास्त्रें बोलती ।
तयांमध्यें तीन नासती ।
चौथी ते अविनाश ॥ २८॥
पहिली मुक्ती ते स्वलोकता ।
दुसरी ते समीपता ।
तिसरी ते स्वरूपता ।
चौथी सायोज्यमुक्ती ॥ २९॥
ऐसिया चत्वार मुक्ती ।
भगवद्भजनें प्राणी पावती ।
हेंचि निरूपण प्रांजळ श्रोतीं ।
सावध पुढें परिसावें ॥ ३०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मनिवेदनभक्तिनाम समास नववा ॥ ९॥
समास दहावा : मुक्तिचतुष्टय
॥ श्रीराम् ॥
मुळीं ब्रह्म निराकार ।
तेथें स्फूर्तिरूप अहंकार ।
तो पंचभूतांचा विचार ।
ज्ञानदशकीं बोलिला ॥ १॥
तो अहंकार वायोरूप ।
तयावरी तेजाचें स्वरूप ।
तया तेजाच्या आधारें आप ।
आवर्णोदक दाटलें ॥ २॥
तया आवर्णोदकाच्या आधारें ।
धरा धरिली फणिवरें ।
वरती छपन्न कोटी विस्तारें ।
वसुंधरा हे ॥ ३॥
इयेवरी परिघ सप्त सागर ।
मध्य मेरू माहां थोर ।
अष्ट दिग्पाळ तो परिवार ।
अंतरें वेष्टित राहिला ॥ ४॥
तो सुवर्णाचा माहा मेरू ।
पृथ्वीस तयाचा आधारु ।
चौरुआसी सहस्र विस्तारु ।
रुंदी तयाची ॥ ५॥
उंच तरी मर्यादेवेगळा ।
भूमीमधें सहस्र सोळा ।
तया भोवता वेष्टित पाळा ।
लोकालोक पर्वताचा ॥ ६॥
तया ऐलिकडे हिमाचळ ।
जेथें पांडव गळाले सकळ ।
धर्म आणी तमाळनीळ ।
पुढें गेले ॥ ७॥
जेथें जावया मार्ग नाहीं ।
मार्गी पसरले माहा अही ।
सितसुखें सुखावले ते ही ।
पर्वतरूप भासती ॥ ८॥
तया ऐलिकडे सेवटीं जाण ।
बद्रिकाश्रम बद्रिनारायण ।
तेथें माहां तापसी, निर्वाण- ।
देहत्यागार्थ जाती ॥ ९॥
तया ऐलिकडे बद्रिकेदार ।
पाहोन येती लहानथोर ।
ऐसा हा अवघा विस्तार ।
मेरुपर्वताचा ॥ १०॥
तया मेरुपर्वतापाठारीं ।
तीन श्रृंगे विषमहारी ।
परिवारें राहिले तयावरी ।
ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११॥
ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा ।
विष्णुश्रृंग तो मर्गजाचा ।
शिवश्रृंग तो स्फटिकाचा ।
कैळास नाम त्याचें ॥ १२॥
वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचें ।
सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें ।
अमरावती इंद्राचें ।
स्थळ खालतें । १३॥
तेथें गण गंधर्व लोकपाळ ।
तेतिस कोटी देव सकळ ।
चौदा लोक, सुवर्णाचळ- ।
वेष्टित राहिले ॥ १४॥
तेथें कामधेनूचीं खिलांरें ।
कल्पतरूचीं बनें अपारें ।
अमृताचीं सरोवरें ।
ठाईं ठाईं उचंबळतीं ॥ १५॥
तेथें उदंड चिंतामणी ।
हिरे परिसांचियां खाणी ।
तेथें सुवर्णमये धरणी ।
लखलखायमान ॥ १६॥
परम रमणीये फांकती किळा ।
नव्वरत्नाचिया पाषाणसिळा ।
तेथें अखंड हरुषवेळा ।
आनंदमये ॥ १७॥
तेथें अमृतांचीं भोजनें ।
दिव्य गंधें दिव्य सुमनें ।
अष्ट नायका गंधर्वगायनें ।
निरंतर ॥ १८॥
तेथें तारुण्य वोसरेना ।
रोगव्याधीहि असेना ।
वृधाप्य आणी मरण येना ।
कदाकाळीं ॥ १९॥
तेथें येकाहूनि येक सुंदर ।
तेथें येकाहूनि येक चतुर ।
धीर उदार आणी शूर ।
मर्यादेवेगळे ॥ २०॥
तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें ।
विद्युल्यतेसारिखीं स्वरूपें ।
तेथें येश कीर्ति प्रतापें ।
सिमा सांडिली ॥ २१॥
ऐसें तें स्वर्गभुवन ।
सकळ देवांचें वस्तें स्थान ।
तयां स्थळाचें महिमान ।
बोलिजे तितुकें थोडें ॥ २२॥
येथें ज्या देवाचें भजन करावें ।
तेथें ते देवलोकीं राहावें ।
स्वलोकता मुक्तीचें जाणावें ।
लक्षण ऐसें ॥ २३॥
लोकीं राहावें ते स्वलोकता ।
समीप असावें ते समीपता ।
स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता- ।
तिसरी मुक्ती ॥ २४॥
देवस्वरूप जाला देही ।
श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।
स्वरूपतेचें लक्षण पाहीं ।
ऐसें असे ॥ २५॥
सुकृत आहे तों भोगिती ।
सुकृत सरतांच ढकलून देती ।
आपण देव ते असती ।
जैसे तैसे ॥ २६॥
म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत ।
सायोज्यमुक्ती ते शाश्वत ।
तेहि निरोपिजेल सावचित्त ।
ऐक आतां ॥ २७॥
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं ।
पर्वतासहित जळेल क्षिती ।
तेव्हां अवघेच देव जाती ।
मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ ।
निर्गुण भक्ती तेहि अचळ ।
सायोज्यमुक्ती ते केवळ ।
जाणिजे ऐसी ॥ २९॥
निर्गुणीं अनन्य असतां ।
तेणें होये सायोज्यता ।
सायोज्यता म्हणिजे स्वरूपता- ।
निर्गुण भक्ती ॥ ३०॥
सगुण भक्ती ते चळे ।
निर्गुण भक्ती ते न चळे ।
हें अवघें प्रांजळ कळे ।
सद्गुरु केलियां ॥ ३१॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ॥ १०॥
॥ दशक चवथा समाप्त ॥