॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥
॥ अथ पञ्चदशोऽध्यायः - अध्याय पंधरावा ॥
॥ पुरुषोत्तमयोगः ॥
आतां हृदय हें आपुलें ।
चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें ।
श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी ।
सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी ।
अर्घ्यु देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट ।
वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट ।
चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें ।
निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें ।
पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी ।
अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी ।
आंगोळिया ॥ ५ ॥
आनंदामोदबहळ ।
सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ ।
ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं ।
नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं ।
निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण ।
इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण ।
पायां तयां ॥ ८ ॥
इया श्रीगुरुचरणसेवा ।
हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा ।
पाटु बांधे ॥ ९ ॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी ।
उन्मेख लाहे उजरी ।
जें वाचेतें इयें करी ।
सुधासिंधु ॥ १० ॥
पूर्णचंद्राचिया कोडी ।
वक्तृत्वा घापें कुरोंडी ।
तैसी आणी गोडी ।
अक्षरांतें ॥ ११ ॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची ।
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥ १२ ॥
नादब्रह्म खुजें ।
कैवल्यही तैसें न सजे ।
ऐसा बोलु देखिजे ।
जेणें दैवें ॥ १३ ॥
श्रवणसुखाच्या मांडवीं ।
विश्व भोगी माधवीं ।
तैसी सासिन्नली बरवी ।
वाचावल्ली ॥ १४ ॥
ठावो न पवता जयाचा ।
मनेंसी मुरडली वाचा ।
तो देवो होय शब्दाचा ।
चमत्कारु ॥ १५ ॥
जें ज्ञानासि न चोजवे ।
ध्यानासिही जें नागवे ।
तें अगोचर फावे ।
गोठीमाजीं ॥ १६ ॥
येवढें एक सौभग ।
वळघे वाचेचें आंग ।
श्रीगुरुपादपद्मपराग ।
लाहे जैं कां ॥ १७ ॥
तरी बहु बोलूं काई ।
आजि तें आनीं ठाईं ।
मातेंवाचूनि नाहीं ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ १८ ॥
जे तान्हेनि मियां अपत्यें ।
आणि माझे गुरु एकलौतें ।
म्हणौनि कृपेंसि एकहातें ।
जालें तिये ॥ १९ ॥
पाहा पां भरोवरी आघवी ।
मेघ चातकांसी रिचवी ।
मजलागीं गोसावी ।
तैसें केलें ॥ २० ॥
म्हणौनि रिकामें तोंड ।
करूं गेलें बडबड ।
कीं गीता ऐसें गोड ।
आतुडलें ॥ २१ ॥
होय अदृष्ट आपैतें ।
तैं वाळूचि रत्नेंच परते ।
उजू आयुष्य तैं मारिते ।
लोभु करी ॥ २२ ॥
आधणीं घातलिया हरळ ।
होती अमृताचे तांदुळ ।
जरी भुकेची राखे वेळ ।
श्रीजगन्नाथु ॥ २३ ॥
तयापरी श्रीगुरु ।
करिती जैं अंगीकारु ।
तैं होऊनि ठाके संसारु ।
मोक्षमय आघवा ॥ २४ ॥
पाहा पां श्रीनारायणें ।
तया पांडवांचें उणें ।
कीजेचि ना पुराणें ।
विश्ववंद्यें ? ॥ २५ ॥
तैसें श्रीनिवृत्तिराजें ।
अज्ञानपण हें माझें ।
आणिलें वोजें ।
ज्ञानाचिया ॥ २६ ॥
परी हें असो आतां ।
प्रेम रुळतसे बोलतां ।
कें गुरुगौरव वर्णितां ।
उन्मेष असे ? ॥ २७ ॥
आतां तेणेंचि पसायें ।
तुम्हां संताचे मी पायें ।
वोळगेन अभिप्रायें ।
गीतेचेनि ॥ २८ ॥
तरी तोचि प्रस्तुतीं ।
चौदाविया अध्यायाच्या अंतीं ।
निर्णयो कैवल्यपती ।
ऐसा केला ॥ २९ ॥
जें ज्ञान जयाच्या हातीं ।
तोचि समर्थु मुक्ति ।
जैसा शतमख संपत्ती ।
स्वर्गींचिये ॥ ३० ॥
कां शत एक जन्मां ।
जो जन्मोनि ब्रह्मकर्मा ।
करी तोचि ब्रह्मा ।
आनु नोहे ॥ ३१ ॥
नाना सूर्याचा प्रकाशु ।
लाहे जेवीं डोळसु ।
तेवीं ज्ञानेंचि सौरसु ।
मोक्षाचा तो ॥ ३२ ॥
तरी तया ज्ञानालागीं ।
कवणा पां योग्यता आंगीं ।
हें पाहतां जगीं ।
देखिला एकु ॥ ३३ ॥
जें पाताळींचेंही निधान ।
दावील कीर अंजन ।
परी होआवे लोचन ।
पायाळाचे ॥ ३४ ॥
तैसें मोक्ष देईल ज्ञान ।
येथें कीर नाहीं आन ।
परी तेंचि थारे ऐसें मन ।
शुद्ध होआवें ॥ ३५ ॥
तरी विरक्तीवांचूनि कहीं ।
ज्ञानासि तगणेंचि नाहीं ।
हें विचारूनि ठाईं ।
ठेविलें देवें ॥ ३६ ॥
आतां विरक्तीची कवण परी ।
जे येऊनि मनातें वरी ।
हेंही सर्वज्ञें श्रीहरी ।
देखिलें असे ॥ ३७ ॥
जे विषें रांधिली रससोये ।
जैं जेवणारा ठाउवी होये ।
तैं तो ताटचि सांडूनि जाये ।
जयापरी ॥ ३८ ॥
तैसी संसारा या समस्ता ।
जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दवडितां ।
पाठी लागे ॥ ३९ ॥
आतां अनित्यत्व या कैसें ।
तेंचि वृक्षाकारमिषें ।
सांगिजत असे विश्वेशें ।
पंचदशीं ॥ ४० ॥
उपडिलें कवतिकें ।
झाड येरिमोहरा ठाके ।
तें वेगें जैसें सुके ।
तैसें हें नोहे ॥ ४१ ॥
यातें एकेपरी ।
रूपकाचिया कुसरी ।
सारीतसे वारी ।
संसाराची ॥ ४२ ॥
करूनि संसार वावो ।
स्वरूपीं अहंते ठावो ।
होआवया अध्यावो ।
पंधरावा हा ॥ ४३ ॥
आतां हेंचि आघवें ।
ग्रंथगर्भींचें चांगावें ।
उपलविजेल जीवें ।
आकर्णिजे ॥ ४४ ॥
तरी महानंद समुद्र ।
जो पूर्ण पूर्णीमा चंद्र ।
तो द्वारकेचा नरेंद्र ।
ऐसें म्हणे ॥ ४५ ॥
अगा पैं पंडुकुमरा ।
येतां स्वरूपाचिया घरा ।
करीतसे आडवारा ।
विश्वाभासु जो ॥ ४६ ॥
तो हा जगडंबरु ।
नोहे येथ संसारु ।
हा जाणिजे महातरु ।
थांवला असे ॥ ४७ ॥
परी येरां रुखांसारिखा ।
हा तळीं मूळें वरी शाखा ।
तैसा नोहे म्हणौनि लेखा ।
नयेचि कवणा ॥ ४८ ॥
आगी कां कुर्हाडी ।
होय रिगावा जरी बुडीं ।
तरी हो कां भलतेवढी ।
वरिचील वाढी ॥ ४९ ॥
जे तुटलिया मूळापाशीं ।
उलंडेल कां शाखांशीं ।
परी तैशी गोठी कायशी ।
हा सोपा नव्हे ॥ ५० ॥
अर्जुना हें कवतिक ।
सांगतां असे अलौकिक ।
जे वाढी अधोमुख ।
रुखा यया ॥ ५१ ॥
जैसा भानू उंची नेणों कें ।
रश्मिजाळ तळीं फांके ।
संसार हें कावरुखें ।
झाड तैसें ॥ ५२ ॥
आणि आथी नाथी तितुकें ।
रुंधलें असे येणेंचि एकें ।
कल्पांतींचेनि उदकें ।
व्योम जैसें ॥ ५३ ॥
कां रवीच्या अस्तमानीं ।
आंधारेनि कोंदे रजनी ।
तैसा हाचि गगनीं ।
मांडला असे ॥ ५४ ॥
यया फळ ना चुंबितां ।
फूल ना तुरंबितां ।
जें कांहीं पंडुसुता ।
तें रुखुचि हा ॥ ५५ ॥
हा ऊर्ध्वमूळ आहे ।
परी उन्मूळिला नोहे ।
येणेंचि हा होये ।
शाड्वळु गा ॥ ५६ ॥
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें ।
निगदिलें कीर असे ।
परी अधींही असोसें ।
मूळें यया ॥ ५७ ॥
प्रबळला चौमेरी ।
पिंपळा कां वडाचिया परी ।
जे पारंबियांमाझारीं ।
डहाळिया असती ॥ ५८ ॥
तेवींचि गा धनंजया ।
संसारतरु यया ।
अधींचि आथी खांदिया ।
हेंही नाहीं ॥ ५९ ॥
तरी ऊर्ध्वाहीकडे ।
शाखांचे मांदोडे ।
दिसताति अपाडें ।
सासिन्नलें ॥ ६० ॥
जालें गगनचि पां वेलिये ।
कां वारा मांडला रुखाचेनि आयें ।
नाना अवस्थात्रयें ।
उदयला असे ॥ ६१ ॥
ऐसा हा एकु ।
विश्वाकार विटंकु ।
उदयला जाण रुखु ।
ऊर्ध्वमूळु ॥ ६२ ॥
आतां ऊर्ध्व या कवण ।
येथें मूळ तें किं लक्षण ।
कां अधोमुखपण ।
शाखा कैसिया ॥ ६३ ॥
अथवा द्रुमा यया ।
अधीं जिया मूळिया ।
तिया कोण कैसिया ।
ऊर्ध्व शाखा ॥ ६४ ॥
आणि अश्वत्थु हा ऐसी ।
प्रसिद्धी कायसी ।
आत्मविदविलासीं ।
निर्णयो केला ॥ ६५ ॥
हें आघवेंचि बरवें ।
तुझिये प्रतीतीसि फावे ।
तैसेनि सांगों सोलिंवें ।
विन्यासें गा ॥ ६६ ॥
परी ऐकें गा सुभगा ।
हा प्रसंगु असे तुजचि जोगा ।
कानचि करीं हो सर्वांगा ।
हियें आथिलिया ॥ ६७ ॥
ऐसें प्रेमरसें सुरफुरें ।
बोलिलें जंव यादववीरें ।
तंव अवधान अर्जुनाकारें ।
मूर्त जालें ॥ ६८ ॥
देव निरूपिती तें थेंकुलें ।
येवढें श्रोतेपण फांकलें ।
जैसे आकाशा खेंव पसरिलें ।
दाही दिशीं ॥ ६९ ॥
श्रीकृष्णोक्तिसागरा ।
हा अगस्तीचि दुसरा ।
म्हणोनि घोंटु भरों पाहे एकसरा ।
अवघेयाचा ॥ ७० ॥
ऐसी सोय सांडूनि खवळिली ।
आवडी अर्जुनीं देवें देखिली ।
तेथ जालेनि सुखें केली ।
कुरवंडी तया ॥ ७१ ॥
श्रीभगवानुवाच ।
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि
यस्तं वेद स वेदवित् ॥ १ ॥
मग म्हणे धनंजया ।
तें ऊर्ध्व गा तरू यया ।
येणें रुखेंचि कां जया ।
ऊर्ध्वता गमे ॥ ७२ ॥
एर्हवीं मध्योर्ध्व अध ।
हे नाहीं जेथ भेद ।
अद्वयासीं एकवद ।
जया ठायीं ॥ ७३ ॥
जो नाइकिजतां नादु ।
जो असौरभ्य मकरंदु ।
जो आंगाथिला आनंदु ।
सुरतेविण ॥ ७४ ॥
जया जें आर्हां परौतें ।
जया जें पुढें मागौतें ।
दिसतेविण दिसतें ।
अदृश्य जें ॥ ७५ ॥
उपाधीचा दुसरा ।
घालितां वोपसरा ।
नामरूपाचा संसारा ।
होय जयातें ॥ ७६ ॥
ज्ञातृज्ञेयाविहीन ।
नुसधेंचि जें ज्ञान ।
सुखा भरलें गगन ।
गाळींव जें ॥ ७७ ॥
जें कार्य ना कारण ।
जया दुजें ना एकपण ।
आपणयां जें जाण ।
आपणचि ॥ ७८ ॥
ऐसें वस्तु जें साचें ।
तें ऊर्ध्व्व गा यया तरूचें ।
तेथ आर घेणें मूळाचें ।
तें ऐसें असे ॥ ७९ ॥
तरी माया ऐसी ख्याती ।
नसतीच यया आथी ।
कां वांझेची संतती ।
वानणें जैशी ॥ ८० ॥
तैशी सत् ना असत् होये ।
जे विचाराचें नाम न साहे ।
ऐसेया परीची आहे ।
अनादि म्हणती ॥ ८१ ॥
जे नानातत्त्वांची मांदुस ।
जे जगदभ्राचें आकाश ।
जे आकारजाताचें दुस ।
घडी केलें ॥ ८२ ॥
जे भवद्रुमबीजिका ।
जे प्रपंचचित्र भूमिका ।
विपरीत ज्ञानदीपिका ।
सांचली जे ॥ ८३ ॥
ते माया वस्तूच्या ठायीं ।
असे जैसेनि नाहीं ।
मग वस्तुप्रभाचि पाही ।
प्रगट होये ॥ ८४ ॥
जे व्हां आपणया आली निद ।
करी आपणपें जेवीं मुग्ध ।
कां काजळी आणी मंद ।
प्रभा दीपीं ॥ ८५ ॥
स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी ।
निदेली चेववूनि वेगीं ।
आलिंगिलेनिवीण आलिंगी ।
सकामु करी ॥ ८६ ॥
तैसी स्वरूपीं जाली माया ।
आणी स्वरूप नेणे धनंजया ।
तेंचि रुखा यया ।
मूळ पहिलें ॥ ८७ ॥
वस्तूसी आपुला जो अबोधु ।
तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु ।
वेदांतीं हाचि प्रसिद्धु ।
बीजभावो ॥ ८८ ॥
घन अज्ञान सुषुप्ती ।
तो बीजांकुरभावो म्हणती ।
येर स्वप्न हन जागृती ।
हा फळभावो तियेचा ॥ ८९ ॥
ऐसी यया वेदांतीं ।
निरूपणभाषाप्रतीती ।
परी तें असो प्रस्तुतीं ।
अज्ञान मूळ ॥ ९० ॥
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें ।
अधोर्ध्व सूचिती मूळें ।
बळिया बांधोनि आळें ।
मायायोगाचें ॥ ९१ ॥
मग आधिलीं सदेहांतरें ।
उठती जियें अपारें ।
ते चौपासि घेऊनि आगारें ।
खोलावती ॥ ९२ ॥
ऐसें भवद्रुमाचें मूळ ।
हें ऊर्ध्वीं करी बळ ।
मग आणियांचें बेंचळ ।
अधीं दावी ॥ ९३ ॥
तेथ चिद्वृत्ति पहिलें ।
महत्तत्त्व उमललें ।
तें पान वाल्हेंदुल्हें ।
एक निघे ॥ ९४ ॥
मग सत्त्वरजतमात्मकु ।
त्रिविध अहंकारु जो एकु ।
तो तिवणा अधोमुखु ।
डिरु फुटे ॥ ९५ ॥
तो बुद्धीची घेऊनि आगारी ।
भेदाची वृद्धि करी ।
तेथे मनाचे डाळ धरी ।
साजेपणें ॥ ९६ ॥
ऐसा मूळाचिया गाढिका ।
विकल्परस कोंवळिका ।
चित्तचतुष्टय डाहाळिका ।
कोंभैजे तो ॥ ९७ ॥
मग आकाश वायु द्योतक ।
आप पृथ्वी हें पांच फोंक ।
महाभूतांचें सरोख ।
सरळे होती ॥ ९८ ॥
तैसीं श्रोत्रादि तन्मात्रें ।
तियें अंगवसां गर्भपत्रें ।
लुळलुळितें विचित्रें ।
उमळती गा ॥ ९९ ॥
तेथ शब्दांकुर वरिपडी ।
श्रोत्रा वाढी देव्हडी ।
होता करित कांडीं ।
आकांक्षेचीं ॥ १०० ॥
अंगत्वचेचे वेलपल्लव ।
स्पर्शांकुरीं घेती धांव ।
तेथ बांबळ पडे अभिनव ।
विकारांचें ॥ १०१ ॥
पाठीं रूपपत्र पालोवेलीं ।
चक्षु लांब तें कांडें घाली ।
ते वेळीं व्यामोहता भली ।
पाहाळीं जाय ॥ १०२ ॥
आणि रसाचें आंगवसें ।
वाढतां वेगें बहुवसें ।
जिव्हे आर्तीची असोसें ।
निघती बेंचें ॥ १०३ ॥
तैसेंचि कोंभैलेनि गंधें ।
घ्राणाची डिरी थांबुं बांधे ।
तेथ तळु घे स्वानंदें ।
प्रलोभाचा ॥ १०४ ॥
एवं महदहंबुद्धि ।
मनें महाभूतसमृद्धी ।
इया संसाराचिया अवधी ।
सासनिजे ॥ १०५ ॥
किंबहुना इहीं आठें ।
आंगीं हा अधिक फांटे ।
परी शिंपीचियेवढें उमटे ।
रुपें जेवीं ॥ १०६ ॥
कां समुद्राचेनि पैसारें ।
वरी तरंगता आसारे ।
तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें ।
अज्ञानमूळ ॥ १०७ ॥
आतां याचा हाचि विस्तारु ।
हाचि यया पैसारु ।
जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु ।
येकाकिया ॥ १०८ ॥
परी तें असो हें ऐसें ।
कावरें झाड उससे ।
यया महदादि आरवसें ।
अधोशाखा ॥ १०९ ॥
आणि अश्वत्थु ऐसें ययातें ।
म्हणती जे जाणते ।
तेंही परिस हो येथें ।
सांगिजैल ॥ ११० ॥
तरी श्वः म्हणिजे उखा ।
तोंवरी एकसारिखा ।
नाहीं निर्वाहो यया रुखा ।
प्रपंचरूपा ॥ १११ ॥
जैसा न लोटतां क्षणु ।
मेघु होय नानावर्णु ।
कां विजु नसे संपूर्णु ।
निमेषभरी ॥ ११२ ॥
ना कांपतया पद्मदळा ।
वरीलिया बैसका नाहीं जळा ।
कां चित्त जैसें व्याकुळा ।
माणुसाचें ॥ ११३ ॥
तैसीचि ययाची स्थिती ।
नासत जाय क्षणक्षणाप्रती ।
म्हणौनि ययातें म्हणती ।
अश्वत्थु हा ॥ ११४ ॥
आणि अश्वत्थु येणें नांवें ।
पिंपळु म्हणती स्वभावें ।
परी तो अभिप्राय नव्हे ।
श्रीहरीचा ॥ ११५ ॥
एर्हवीं पिंपळु म्हणतां विखीं ।
मियां गति देखिली असे निकी ।
परी तें असो काय लौकिकीं ।
हेतु काज ॥ ११६ ॥
म्हणौनि हा प्रस्तुतु ।
अलौकिकु परियेसा ग्रंथु ।
तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु ।
बोलिजे हा ॥ ११७ ॥
आणीकुही येकु थोरु ।
यया अव्ययत्वाचा डगरु ।
आथी परी तो भीतरु ।
ऐसा आहे ॥ ११८ ॥
जैसा मेघांचेनि तोंडें ।
सिंधु एके आंगें काढे ।
आणि नदी येरीकडे ।
भरितीच असती ॥ ११९ ॥
तेथ वोहटे ना चढे ।
ऐसा परिपूर्णुचि आवडे ।
परी ते फुली जंव नुघडे ।
मेघानदींची ॥ १२० ॥
ऐसें या रुखाचें होणें जाणें ।
न तर्के होतेनि वहिलेपणें ।
म्हणौनि ययातें लोकु म्हणे ।
अव्ययु हा ॥ १२१ ॥
एर्हवीं दानशीळु पुरुषु ।
वेंचकपणेंचि संचकु ।
तैसा व्ययेंचि हा रुखु ।
अव्ययो गमे ॥ १२२ ॥
जातां वेगें बहुवसें ।
न वचे कां भूमीं रुतलें असे ।
रथाचें चक्र दिसे।
जियापरी ॥ १२३ ॥
तैसें काळातिक्रमें जे वाळे ।
ते भूतशाखा जेथ गळे ।
तेथ कोडीवरी उमाळे ।
उठती आणिक ॥ १२४ ॥
परी येकी केधवां गेली।
शाखाकोडी केधवां जाली ।
हें नेणवे जेवीं उमललीं ।
आषाढाभ्रें ॥ १२५ ॥
महाकल्पाच्या शेवटीं ।
उदेलिया उमळती सृष्टी ।
तैसेंचि आणिखीचें दांग उठी ।
सासिन्नलें ॥ १२६ ॥
संहारवातें प्रचंडें ।
पडती प्रळयांतींचीं सालडें ।
तंव कल्पादीचीं जुंबाडें ।
पाल्हेजती ॥ १२७ ॥
रिगे मन्वंतर मनूपुढें ।
वंशावरी वंशांचे मांडे ।
जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें ।
जिंके जेवीं ॥ १२८ ॥
कलियुगांतीं कोरडीं ।
चहुं युगांची सालें सांडी ।
तंव कृतयुगाची पेली देव्हडी ।
पडे पुढती ॥ १२९ ॥
वर्ततें वर्ष जाये ।
तें पुढिला मुळहारी होये ।
जैसा दिवसु जात कीं येत आहे ।
हें चोजवेना ॥ १३० ॥
जैशा वारियाच्या झुळकां ।
सांदा ठाउवा नव्हे देखा ।
तैसिया उठती पडती शाखा ।
नेणों किती ॥ १३१ ॥
एकी देहाची डिरी तुटे ।
तंव देहांकुरीं बहुवी फुटे ।
ऐसेनि भवतरु हा वाटे ।
अव्ययो ऐसा ॥ १३२ ॥
जैसें वाहतें पाणी जाय वेगें ।
तैसेंचि आणिक मिळे मागें ।
येथ असंतचि असिजे जगें ।
मानिजे संत ॥ १३३ ॥
कां लागोनि डोळां उघडे ।
तंव कोडीवरी घडे मोडे ।
नेणतया तरंगु आवडे ।
नित्यु ऐसा ॥ १३४ ॥
वायसा एकें बुबुळें दोहींकडे ।
डोळा चाळीतां अपाडें ।
दोन्ही आथी ऐसा पडे ।
भ्रमु जेवीं जगा ॥ १३५ ॥
पैं भिंगोरी निधिये पडली ।
ते गमे भूमीसी जैसी जडली ।
ऐसा वेगातिशयो भुली ।
हेतु होय ॥ १३६ ॥
हें बहु असो झडती ।
आंधारें भोवंडितां कोलती ।
ते दिसे जैसी आयती ।
चक्राकार ॥ १३७ ॥
हा संसारवृक्षु तैसा ।
मोडतु मांडतु सहसा ।
न देखोनि लोकु पिसा ।
अव्ययो मानी ॥ १३८ ॥
परि ययाचा वेगु देखे ।
जो हा क्षणिक ऐसा वोळखे ।
जाणे कोडिवेळां निमिखें ।
होत जात ॥ १३९ ॥
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ ।
ययाचें असिलेंपण टवाळ ।
ऐसें झाड सिनसाळ ।
देखिलें जेणें ॥ १४० ॥
तयातें गा पंडुसुता ।
मी सर्वज्ञुही म्हणें जाणता ।
पैं वाग्ब्रह्म सिद्धांता ।
वंद्यु तोची ॥ १४१ ॥
योगजाताचें जोडलें ।
तया एकासीचि उपेगा गेलें ।
किंबहुना जियालें ।
ज्ञानही त्याचेनी ॥ १४२ ॥
हें असो बहु बोलणें ।
वानिजैल तो कवणें ।
जो भवरुखु जाणें ।
उखि ऐसा ॥ १४३ ॥
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसंततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २ ॥
मग ययाचि प्रपंचरूपा ।
अधोशाखिया पादपा ।
डाहाळिया जाती उमपा ।
ऊर्ध्वाही उजू ॥ १४४ ॥
आणि अधीं फांकली डाळें ।
तिये होती मूळें ।
तयाही तळीं पघळे ।
वेल पालवु ॥ १४५ ॥
ऐसें जें आम्हीं ।
म्हणितलें उपक्रमीं ।
तेंही परिसें सुगमीं ।
बोलीं सांगों ॥ १४६ ॥
तरी बद्धमूळ अज्ञानें ।
महदादिकीं सासिनें ।
वेदांचीं थोरवनें ।
घेऊनियां ॥ १४७ ॥
परी आधीं तंव स्वेदज ।
जारज उद्भिज अंडज ।
हे बुडौनि महाभुज ।
उठती चारी ॥ १४८ ॥
यया एकैकाचेनि आंगवटें ।
चौर्यांशीं लक्षधा फुटे ।
ते वेळीं जीवशाखीं फांटे ।
सैंधचि होती ॥ १४९ ॥
प्रसवती शाखा सरळिया ।
नानासृष्टि डाहाळिया ।
आड फुटती माळिया ।
जातिचिया ॥ १५० ॥
स्त्री पुरुष नपुंसकें ।
हे व्यक्तिभेदांचे टके ।
आंदोळती आंगिकें ।
विकारभारें ॥ १५१ ॥
जैसा वर्षाकाळु गगनीं ।
पाल्हेजे नवघनीं ।
तैसें आकारजात अज्ञानीं ।
वेलीं जाय ॥ १५२ ॥
मग शाखांचेनि आंगभारें ।
लवोनि गुंफिती परस्परें ।
गुणक्षोभाचे वारे ।
उदयजती ॥ १५३ ॥
तेथ तेणें अचाटें ।
गुणांचेनि झडझडाटें ।
तिहीं ठायीं हा फांटे ।
ऊर्ध्वमूळ ॥ १५४ ॥
ऐसा रजाचिया झुळुका ।
झडाडितां आगळिका ।
मनुष्यजाती शाखा ।
थोरावती ॥ १५५ ॥
तिया ऊर्ध्वीं ना अधीं ।
माझारींचि कोंदाकोंदी ।
आड फुटती खांदी ।
चतुर्वर्णांच्या ॥ १५६ ॥
तेथ विधिनिषेध सपल्लव ।
वेदवाक्यांचें अभिनव ।
पालव डोलती बरव ।
नीच नवे ॥ १५७ ॥
अर्थु कामु पसरे ।
अग्रवनें घेती थारे ।
तेथ क्षणिकें पदांतरें ।
इहभोगाचीं ॥ १५८ ॥
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें ।
खांकरेजती शुभाशुभें ।
नानाकर्मांचे खांबे ।
नेणों किती ॥ १५९ ॥
तेवींचि भोगक्षीणें मागिलें ।
पडती देहांतींचीं बुडसळें ।
तंव पुढां वाढी पेले ।
नवेया देहांची ॥ १६० ॥
आणि शब्दादिक सुहावे ।
सहज रंगें हवावे ।
विषयपल्लव नवे ।
नीत्य होती ॥ १६१ ॥
ऐसे रजोवातें प्रचंडें ।
मनुष्यशाखांचे मांदोडे ।
वाढती तो एथ रुढे ।
मनुष्यलोकु ॥ १६२ ॥
तैसाचि तो रजाचा वारा ।
नावेक धरी वोसरा ।
मग वाजों लागे घोरा ।
तमाचा तो ॥ १६३ ॥
तेधवां याचिया मनुष्यशाखा ।
नीच वासना अधीं देखा ।
पाल्हेजती डाहाळिका ।
कुकर्माचिया ॥ १६४ ॥
अप्रवृत्तींचे खणुवाळे ।
कोंभ निघती सरळे ।
घेत पान पालव डाळे ।
प्रमादाचीं ॥ १६५ ॥
बोलती निषेधनियमें ।
जिया ऋचा यजुःसामें ।
तो पाला तया घुमें ।
टकेयावरी ॥ १६६ ॥
प्रतिपादिती अभिचार ।
आगम जे परमार ।
तिहीं पानीं घेती प्रसर ।
वासना वेली ॥ १६७ ॥
तंव तंव होतीं थोराडें ।
अकर्मांचीं तळबुडें ।
आणि जन्मशाखा पुढें पुढें ।
घेती धांव ॥ १६८ ॥
तेथ चांडाळादि निकृष्टा ।
दोषजातीचा थोर फांटा ।
जाळ पडे कर्मभ्रष्टां ।
भुलोनियां ॥ १६९ ॥
पशु पक्षी सूकर ।
व्याघ्र वृश्चिक विखार ।
हे आडशाखा प्रकार ।
पैसु घेती ॥ १७० ॥
परी ऐशा शाखा पांडवा ।
सर्वांगींहि नित्य नवा ।
निरयभोग यावा ।
फळाचा तो ॥ १७१ ॥
आणि हिंसाविषयपुढारी ।
कुकर्मसंगें धुर धुरी ।
जन्मवरी आगारी ।
वाढतीचि असे ॥ १७२ ॥
ऐसे होती तरु तृण ।
लोह लोष्ट पाषाण ।
इया खांदिया तेवीं जाण ।
फळेंही हेंची ॥ १७३ ॥
अर्जुना गा अवधारीं ।
मनुष्यालागोनि इया परी ।
वृद्धि स्थावरांतवरी ।
अधोशाखांची ॥ १७४ ॥
म्हणौनि जीं मनुष्यडाळें ।
तियें जाणावीं अधींचि मूळें ।
जे एथूनि हा पघळे ।
संसारतरु ॥ १७५ ॥
एर्हवीं ऊर्ध्वींचें पार्था ।
मुद्दल मूळ पाहतां ।
अधींचिया मध्यस्था ।
शाखा इया ॥ १७६ ॥
परी तामसी सात्त्विकी ।
सुकृतदुष्कृतात्मकी ।
विरुढती या शाखीं ।
अधोर्ध्वींचिया ॥ १७७ ॥
आणि वेदत्रयाचिया पाना ।
नये अन्यत्र लागों अर्जुना ।
जे मनुष्यावांचूनि विधाना ।
विषय नाहीं ॥ १७८ ॥
म्हणौनि तनु मानुषा ।
इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा ।
तरी कर्मवृद्धीसि देखा ।
इयेंचि मूळें ॥ १७९ ॥
आणि आनीं तरी झाडीं ।
शाखा वाढतां मुळें गाढीं ।
मूळ गाढें तंव वाढी ।
पैस आथी ॥ १८० ॥
तैसेंचि इया शरीरा ।
कर्म तंव देहा संसारा ।
आणि देह तंव व्यापारा ।
ना म्हणोंचि नये ॥ १८१ ॥
म्हणौनि देहें मानुषें ।
इयें मुळें होती न चुके ।
ऐसें जगज्जनकें ।
बोलिलें तेणें ॥ १८२ ॥
मग तमाचें तें दारुण ।
स्थिरावलेया वाउधाण ।
सत्त्वाची सुटे सत्राण ।
वाहुटळी ॥ १८३ ॥
तैं याचि मनुष्याकारा ।
मुळीं सुवासना निघती आरा ।
घेऊनि फुटती कोंबारा ।
सुकृतांकुरीं ॥ १८४ ॥
उकलतेनि उन्मेखें ।
प्रज्ञाकुशलतेंची तिखें ।
डिरिया निघती निमिखें ।
बाबळैजुनी ॥ १८५ ॥
मतीचे सोट वांवे ।
घालिती स्फूर्तींचेनि थांवें ।
बुद्धि प्रकाश घे धांवे ।
विवेकावरी ॥ १८६ ॥
तेथ मेधारसें सगर्भ ।
अस्थापत्रीं सबोंब ।
सरळ निघती कोंभ ।
सद्वृत्तीचे ॥ १८७ ॥
सदाचाराचिया सहसा ।
टका उठती बहुवसा ।
घुमघुमिति घोषा ।
वेदपद्याच्या ॥ १८८ ॥
शिष्टागमविधानें ।
विविधयागवितानें ।
इये पानावरी पानें ।
पालेजती ॥१८९ ॥
ऐशा यमदमीं घोंसाळिया ।
उठती तपाचिया डाहाळिया ।
देती वैराग्यशाखा कोंवळिया ।
वेल्हाळपणें ॥ १९० ॥
विशिष्टां व्रतांचे फोक ।
धीराच्या अणगटी तिख ।
जन्मवेगें ऊर्ध्वमुख ।
उंचावती ॥ १९१ ॥
माजीं वेदांचा पाला दाट ।
तो करी सुविद्येचा झडझडाट ।
जंव वाजे अचाट ।
सत्त्वानिळु तो ॥ १९२ ॥
तेथ धर्मडाळ बाहाळी ।
दिसती जन्मशाखा सरळी ।
तिया आड फुटती फळीं ।
स्वर्गादिकीं ॥ १९३ ॥
पुढां उपरति रागें लोहिवी ।
धर्ममोक्षाची शाखा पालवी ।
पाल्हाजत नित्य नवी ।
वाढतीचि असे ॥ १९४ ॥
पैं रविचंद्रादि ग्रहवर ।
पितृ ऋषी विद्याधर ।
हे आडशाखा प्रकार ।
पैसु घेती ॥ १९५ ॥
याहीपासून उंचवडें ।
गुढले फळाचेनि बुडें ।
इंद्रादिक ते मांदोडे ।
थोर शाखांचे ॥ १९६ ॥
मग तयांही उपरी डाहाळिया ।
तपोज्ञानीं उंचावलिया ।
मरीचि कश्यपादि इया ।
उपरी शाखा ॥ १९७ ॥
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु ।
ऊर्ध्वशाखांचा पैसारु ।
बुडीं साना अग्रीं थोरु ।
फळाढ्यपणें ॥ १९८ ॥
वरी उपरिशाखाही पाठीं ।
येती फळभार जे किरीटी ।
ते ब्रह्मेशांत अणगटीं ।
कोंभ निघती ॥ १९९ ॥
फळाचेनि वोझेपणें ।
ऊर्ध्वीं वोवांडें दुणें ।
जंव माघौतें बैसणें ।
मूळींचि होय ॥ २०० ॥
प्राकृताही तरी रुखा ।
जें फळें दाटलीं होय शाखा ।
ते वोवांडली देखा ।
बुडासि ये ॥ २०१ ॥
तैसें जेथूनि हा आघवा ।
संसारतरूचा उठावा ।
तियें मूळीं टेंकती पांडवा ।
वाढतेनि ज्ञानें ॥ २०२ ॥
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें ।
वाढणें नाहीं जीवातें ।
तेथूनि मग वरौतें ।
ब्रह्मचि कीं ॥ २०३ ॥
परी हें असो ऐसें ।
ब्रह्मादिक ते आंगवसें ।
ऊर्ध्वमुळासरिसें ।
न तुकती गा ॥ २०४ ॥
आणीकही शाखा उपरता ।
जिया सनकादिक नामें विख्याता ।
तिया फळीं मूळीं नाडळता ।
भरलिया ब्रह्मीं ॥ २०५ ॥
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी ।
ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी ।
शाखांची वाढी बरवी ।
उंचावे पैं ॥ २०६ ॥
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि ।
मनुष्यत्वचि होय आदि ।
म्हणौनि इयें अधीं ।
म्हणितलीं मूळें ॥ २०७ ॥
एवं तुज अलौकिकु ।
हा अधोर्ध्वशाखु ।
सांगितला भवरुखु ।
ऊर्ध्वमूळु ॥ २०८ ॥
आणि अधींचीं हीं मूळें ।
उपपत्ती परिसविली सविवळें ।
आतां परिस उन्मूळें ।
कैसेनि हा ॥ २०९ ॥
न रूपमस्येह तथोपलभ्यते
नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल
मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३ ॥
परी तुझ्या हन पोटीं ।
ऐसें गमेल किरीटी ।
जे एवढें झाड उत्पाटी ।
ऐसें कायि असे ? ॥ २१० ॥
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी ।
ऊर्ध्व शाखांची थोरी ।
आणि मूळ तंव निराकारीं ।
ऊर्ध्वीं असे ॥ २११ ॥
हा स्थावराही तळीं ।
फांकत असे अधींच्या डाळीं ।
माजीं धांवतसे दुजा मूळीं ।
मनुष्यरूपीं ॥ २१२ ॥
ऐसा गाढा आणि अफाटु ।
आतां कोण करी यया शेवटु ।
तरी झणीं हा हळुवटु ।
धरिसी भावो ॥ २१३ ॥
परी हा उन्मूळावया दोषें ।
येथ सायासचि कायिसे ।
काय बाळा बागुल देशें ।
दवडावा आहे ? ॥ २१४ ॥
गंधर्वदुर्ग कायी पाडावे ।
काय शशविषाण मोडावें ।
होआवें मग तोडावें ।
खपुष्प कीं ? ॥ २१५ ॥
तैसा संसारु हा वीरा ।
रुख नाहीं साचोकारा ।
मा उन्मूळणीं दरारा ।
कायिसा तरी ? ॥ २१६ ॥
आम्हीं सांगितली जे परी ।
मूळडाळांची उजरी ।
ते वांझेचीं घरभरी ।
लेकुरें जैशीं ॥ २१७ ॥
काय कीजती चेइलेपणीं ।
स्वप्नींचीं तिये बोलणीं ।
तैशी जाण ते काहाणी ।
दुबळीचि ते ॥ २१८ ॥
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें ।
ययाचे अचळ मूळ असे तैसें ।
आणि तैसाचि जरी हा असे ।
साचोकारा ॥ २१९ ॥
तरी कोणाचेनि संतानें ।
निपजती तया उन्मूळणें ।
काय फुंकिलिया गगनें ।
जाइजेल गा ॥ २२० ॥
म्हणौनि पैं धनंजया ।
आम्हीं वानिलें रूप तें माया ।
कासवीचेनि तुपें राया ।
वोगरिलें जैसें ॥ २२१ ॥
मृगजळाचीं गा तळीं ।
तिये दिठी दुरूनि न्याहाळीं ।
वांचूनि तेणें पाणियें साळी केळी ।
लाविसी काई ? ॥ २२२ ॥
मूळ अज्ञानचि तंव लटिकें ।
मा तयाचें कार्य हें केतुकें ।
म्हणौनि संसाररुख सत्यकें ।
वावोचि गा ॥ २२३ ॥
आणि अंतु यया नाहीं ।
ऐसें बोलिजे जें कांहीं ।
तेंही साचचि पाहीं ।
येकें परी ॥ २२४ ॥
तरी प्रबोधि जंव नोहे ।
तंव निद्रे काय अंतु आहे ? ।
कीं रात्री न सरे तंव न पाहे ।
तया आरौतें ? ॥ २२५ ॥
तैसा जंव पार्था ।
विवेकु नुधवी माथा ।
तंव अंतु नाहीं अश्वत्था ।
भवरूपा या ॥ २२६ ॥
वाजतें वारें निवांत ।
जंव न राहे जेथिंचें तेथ ।
तंव तरंगतां अनंत ।
म्हणावीचि कीं ॥ २२७ ॥
म्हणौनि सूर्यु जैं हारपे ।
तैं मृगजळाभासु लोपे ।
कां प्रभा जाय दीपें ।
मालवलेनि ॥ २२८ ॥
तैसें मूळ अविद्या खाये ।
तें ज्ञान जैं उभें होये ।
तैंचि यया अंतु आहे ।
एर्हवीं नाहीं ॥ २२९ ॥
तेवींचि हा अनादी ।
ऐसी ही आथी शाब्दी ।
तो आळु नोहे अनुरोधी ।
बोलातें या ॥ २३० ॥
जें संसारवृक्षाच्या ठायीं ।
साचोकार तंव नाहीं ।
मा नाहीं तया आदि काई ।
कोण होईल ? ॥ २३१ ॥
जो साच जेथूनि उपजे ।
तयातें आदि हें साजे ।
आतां नाहींचि तो म्हणिजे ।
कोठूनियां ? ॥ २३२ ॥
म्हणौनि जन्मे ना आहे ।
ऐसिया सांगों कवण माये ।
यालागीं नाहींपणेंचि होये ।
अनादि हा ॥ २३३ ॥
वांझेचिया लेंका ।
कैंची जन्मपत्रिका ।
नभीं निळी भूमिका ।
कें कल्पूं पां ॥ २३४ ॥
व्योमकुसुमांचा पांडवा ।
कवणें देंठु तोडावा ।
म्हणौनि नाहीं ऐसिया भवा ।
आदि कैंची ? ॥ २३५ ॥
जैसें घटाचें नाहींपण ।
असतचि असे केलेनिवीण ।
तैसा समूळ वृक्षु जाण ।
अनादि हा ॥ २३६ ॥
अर्जुना ऐसेनि पाहीं ।
आद्यंतु ययासि नाहीं ।
माजीं स्थिती आभासे कांहीं ।
परी टवाळ ते ॥ २३७ ॥
ब्रह्मगिरीहूनि न निगे ।
आणि समुद्रींही कीर न रिगे ।
माजीं दिसे वाउगें ।
मृगांबु जैसें ॥ २३८ ॥
तैसा आद्यंती कीर नाहीं ।
आणि साचही नोहे कहीं ।
परी लटिकेपणाची नवाई ।
पडिभासे गा ॥ २३९ ॥
नाना रंगीं गजबजे ।
जैसें इंद्रधनुष्य देखिजे ।
तैसा नेणतया आपजे ।
आहे ऐसा ॥ २४० ॥
ऐसेनि स्थितीचिये वेळे ।
भुलवी अज्ञानाचे डोळे ।
लाघवी हरी मेखळे ।
लोकु जैसा ॥ २४१ ॥
आणि नसतीचि श्यामिका ।
व्योमीं दिसे तैसी दिसो कां ।
तरी दिसणेंही क्षणा एका ।
होय जाय ॥ २४२ ॥
स्वप्नींही मानिलें लटिकें ।
तरी निर्वाहो कां एकसारिखें ।
तेवीं आभासु हा क्षणिकें ।
रिताचि गा ॥ २४३ ॥
देखतां आहे आवडें ।
घेऊं जाइजे तरी नातुडे ।
जैसा टिकु कीजे माकडें ।
जळामाजीं ॥ २४४ ॥
तरंगभंगु सांडीं पडे ।
विजूही न पुरे होडे ।
आभासासि तेणें पाडें ।
होणें जाणें गा ॥ २४५ ॥
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा ।
नेणिजे समोर कीं पाठीमोरा ।
तैसी स्थिती नाहीं तरुवरा ।
भवरूपा यया ॥ २४६ ॥
एवं आदि ना अंतु स्थिती ।
ना रूप ययासि आथी ।
आतां कायसी कुंथाकुंथी ।
उन्मूळणी गा ॥ २४७ ॥
आपुलिया अज्ञानासाठीं ।
नव्हता थांवला किरीटी ।
तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं ।
खांडेनि गा ॥ २४८ ॥
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें ।
उपाय करिसी जितुके ।
तिहीं गुंफसि अधिकें ।
रुखीं इये ॥ २४९ ॥
मग किती खांदोखांदीं ।
यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं ।
म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं ।
सम्यक् ज्ञानें ॥ २५० ॥
एर्हवीं दोरीचिया उरगा ।
डांगा मेळवितां पैं गा ।
तो शिणुचि वाउगा ।
केला होय ॥ २५१ ॥
तरावया मृगजळाची गंगा ।
डोणीलागीं धांवतां दांगा- ।
माजीं वोहळें बुडिजे पैं गा ।
साच जेवीं ॥ २५२ ॥
तेवीं नाथिलिया संसारा ।
उपाईं जाचतया वीरा ।
आपणपें लोपे वारा ।
विकोपीं जाय ॥ २५३ ॥
म्हणौनि स्वप्नींचिया घाया ।
ओखद चेवोचि धनंजया ।
तेवीं अज्ञानमूळा यया ।
ज्ञानचि खड्ग ॥ २५४ ॥
परी तेचि लीला परजवे ।
तैसें वैराग्याचें नवें ।
अभंगबळ होआवें ।
बुद्धीसी गा ॥ २५५ ॥
उठलेनि वैराग्यें जेणें ।
हा त्रिवर्गु ऐसा सांडणें ।
जैसें वमुनियां सुणें ।
आतांचि गेलें ॥ २५६ ॥
हा ठायवरी पांडवा ।
पदार्थजातीं आघवा ।
विटवी तो होआवा ।
वैराग्य लाठु ॥ २५७ ॥
मग देहाहंतेचें दळें ।
सांडूनि एकेचि वेळे ।
प्रत्यक्बुद्धी करतळें ।
हातवसावें ॥ २५८ ॥
निसळें विवेकसाहणें ।
जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें ।
मग पुरतेनि बोधें उटणें ।
एकलेचि ॥ २५९ ॥
परी निश्चयाचें मुष्टिबळ ।
पाहावें एकदोनी वेळ ।
मग तुळावें अति चोखाळ ।
मननवरी ॥ २६० ॥
पाठीं हतियेरां आपणयां ।
निदिध्यासें एक जालिया ।
पुढें दुजें नुरेल घाया- ।
पुरतें गा ॥ २६१ ॥
तें आत्मज्ञानाचें खांडें ।
अद्वैतप्रभेचेनि वाडें ।
नेदील उरों कवणेकडे ।
भववृक्षासी ॥ २६२ ॥
शरदागमींचा वारा ।
जैसा केरु फेडी अंबरा ।
का उदयला रवी आंधारा ।
घोंटु भरी ॥ २६३ ॥
नाना उपवढ होतां खेंवो ।
नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो ।
स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो ।
करील तैसें ॥ २६४ ॥
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ ।
कां अधींचें हन शाखाजाळ ।
तें कांहींचि न दिसे मृगजळ ।
चांदिणां जेवीं ॥ २६५ ॥
ऐसेनि गा वीरनाथा ।
आत्मज्ञानाचिया खड्गलता ।
छेदुनिया भवाश्वत्था ।
ऊर्ध्वमूळातें ॥ २६६ ॥
ततः पदं तत्परिमार्गितव्यं
यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये
यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४ ॥
मग इदंतेसि वाळलें ।
जें मीपणेंवीण डाहारलें ।
तें रूप पाहिजे आपलें ।
आपणचि ॥ २६७ ॥
परी दर्पणाचेनि आधारें ।
एकचि करून दुसरें ।
मुख पाहाती गव्हारें ।
तैसें नको हो ॥ २६८ ॥
हें पाहाणें ऐसें असे वीरा ।
जैसा न बोडलिया विहिरा ।
मग आपलिया उगमीं झरा ।
भरोनि ठाके ॥ २६९ ॥
नातरी आटलिया अंभ ।
निजबिंबीं प्रतिबिंब ।
निहटे कां नभीं नभ ।
घटाभावीं ॥ २७० ॥
नाना इंधनांशु सरलेया ।
वन्हि परते जेवीं आपणपयां ।
तैसें आपेंआप धनंजया ।
न्याहाळणें जें गा ॥ २७१ ॥
जिव्हे आपली चवी चाखणें ।
चक्षू निज बुबुळ देखणें ।
आहे तया ऐसें निरीक्षणें ।
आपुलें पैं ॥ २७२ ॥
कां प्रभेसि प्रभा मिळे ।
गगन गगनावरी लोळे ।
नाना पाणी भरलें खोळे ।
पाणियाचिये ॥ २७३ ॥
आपणचि आपणयातें ।
पाहिजे जें अद्वैतें ।
तें ऐसें होय निरुतें ।
बोलिजतु असे ॥ २७४ ॥
जें पाहिजतेनवीण पाहिजे ।
कांहीं नेणणाचि जाणिजे ।
आद्यपुरुष कां म्हणिजे ।
जया ठायातें ॥ २७५ ॥
तेथही उपाधीचा वोथंबा ।
घेऊनि श्रुति उभविती जिभा ।
मग नामरूपाचा वडंबा ।
करिती वायां ॥ २७६ ॥
पैं भवस्वर्गा उबगले ।
मुमुक्षु योगज्ञाना वळघले ।
पुढती न यों इया निगाले ।
पैजा जेथ ॥ २७७ ॥
संसाराचिया पायां पुढां ।
पळती वीतराग होडा ।
ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा ।
घालिती मागां ॥ २७८ ॥
अहंतादिभावां आपुलियां ।
झाडा देऊनि आघवेया ।
पत्र घेती ज्ञानिये जया ।
मूळघरासी ॥ २७९ ॥
पैं जेथुनी हे एवढी ।
विश्वपरंपरेची वेलांडी ।
वाढती आशा जैशी कोरडी ।
निदैवाची ॥ २८० ॥
जिये कां वस्तूचें नेणणें ।
आणिलें थोर जगा जाणणें ।
नाहीं तें नांदविलें जेणें ।
मी तूं जगीं ॥ २८१ ॥
पार्था तें वस्तु पहिलें ।
आपणपें आपुलें ।
पाहिजे जैसें हिंवलें ।
हिंव हिंवें ॥ २८२ ॥
आणीकही एक तया ।
वोळखण असे धनंजया ।
तरी जया कां भेटलिया ।
येणेंचि नाहीं ॥ २८३ ॥
परी तया भेटती ऐसें ।
जे ज्ञानें सर्वत्र सरिसे ।
महाप्रळयांबूचे जैसें ।
भरलेपण ॥ २८४ ॥
निर्मानमोहा जितसङ्गदोषा
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः
पदमव्ययं तत् ॥ ५ ॥
जया पुरुषांचें कां मन ।
सांडोनि गेलें मोह मान ।
वर्षांतीं जैसें घन ।
आकाशातें ॥ २८५ ॥
निकवड्या निष्ठुरा ।
उबगिजे जेवीं सोयरा ।
तैसें नागवती विकारां ।
वेटाळूं जे ॥ २८६ ॥
फळली केळी उन्मूळे ।
तैसी आत्मलाभें प्रबळे ।
तयाची क्रिया ढाळेंढाळें ।
गळती आहे ॥ २८७ ॥
आगी लगलिया रुखीं ।
देखोनि सैरा पळती पक्षी ।
तैसें सांडिलें अशेखीं ।
विकल्पीं जे ॥ २८८ ॥
आइकें सकळ दोषतृणीं ।
अंकुरिजती जिये मेदिनी ।
तिये भेदबुद्धीची काहाणी ।
नाहीं जयातें ॥ २८९ ॥
सूर्योदयासरिसी ।
रात्री पळोनि जाय अपैसी ।
गेली देहाहंता तैसी ।
अविद्येसवें ॥ २९० ॥
पैं आयुष्यहीना जीवातें ।
शरीर सांडी जेवीं अवचितें ।
तेवीं निदसुरें द्वैतें ।
सांडिले जे ॥ २९१ ॥
लोहाचें सांकडें परिसा ।
न जोडे अंधारु रवि जैसा ।
द्वैतबुद्धीचा तैसा ।
सदा दुकाळ जया ॥ २९२ ॥
अगा सुखदुःखाकारें ।
द्वंद्वें देहीं जियें गोचरें ।
तियें जयां कां समोरें ।
होतीचिना ॥ २९३ ॥
स्वप्नींचें राज्य कां मरण ।
नोहे हर्षशोकांसि कारण ।
उपवढलिया जाण ।
जियापरी ॥ २९४ ॥
तैसें सुखदुःखरूपीं ।
द्वंद्वीं जे पुण्यपापीं ।
न घेपिजती सर्पीं ।
गरुड जैसें ॥ २९५ ॥
आणि अनात्मवर्गनीर ।
सांडूनि आत्मरसाचें क्षीर ।
चरताति जे सविचार ।
राजहंसु ॥ २९६ ॥
जैसा वर्षोनि भूतळीं ।
आपला रसु अंशुमाळी ।
मागौता आणी रश्मिजाळीं ।
बिंबासीचि ॥ २९७ ॥
तैसें आत्मभ्रांतीसाठीं ।
वस्तु विखुरली बारावाटीं ।
ते एकवटिती ज्ञानदृष्टी ।
अखंड जे ॥ २९८ ॥
किंबहुना आत्मयाचा ।
निर्धारीं विवेकु जयांचा ।
बुडाला वोघु गंगेचा ।
सिंधूमाजीं जैसा ॥ २९९ ॥
पैं आघवेंचि आपुलेंपणें ।
नुरेचि जया अभिलाषणें ।
जैसें येथूनि पर्हां जाणें ।
आकाशा नाहीं ॥ ३०० ॥
जैसा अग्नीचा डोंगरु ।
नेघे कोणी बीज अंकुरु ।
तैसा मनीं जयां विकारु ।
उदैजेना ॥ ३०१ ॥
जैसा काढिलिया मंदराचळु ।
राहे क्षीराब्धि निश्चळु ।
तैसा नुठी जयां सळु ।
कामोर्मीचा ॥ ३०२ ॥
चंद्रमा कळीं धाला ।
न दिसे कोणें आंगी वोसावला ।
तेवीं अपेक्षेचा अवखळा ।
न पडे जयां ॥ ३०३ ॥
हें किती बोलूं असांगडें ।
जेवीं परमाणु नुरे वायूपुढें ।
तैसें विषयांचें नावडे ।
नांवचि जयां ॥ ३०४ ॥
एवं जे जे कोणी ऐसे ।
केले ज्ञानाग्नि हुताशें ।
ते तेथ मिळती जैसें ।
हेमीं हेम ॥ ३०५ ॥
तेथ म्हणिजे कवणें ठाईं ।
ऐसेंही पुससी कांहीं ।
तरी तें पद गा नाहीं ।
वेंचु जया ॥ ३०६ ॥
दृश्यपणें देखिजे ।
कां ज्ञेयत्वें जाणिजे ।
अमुकें ऐसें म्हणिजे ।
तें जें नव्हे ॥ ३०७ ॥
न तद्भासयते सूर्यो न
शशाङ्को न पवकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते
तद्धाम परमं मम ॥ ६ ॥
पैं दीपाचिया बंबाळीं ।
कां चंद्र हन जें उजळी ।
हें काय बोलों अंशुमाळी ।
प्रकाशी जें ॥ ३०८ ॥
तें आघवेंचि दिसणें ।
जयाचें कां न देखणें ।
विश्व भासतसे जेणें ।
लपालेनी ॥ ३०९ ॥
जैसें शिंपीपण हारपे ।
तंव तंव खरें होय रुपें ।
कां दोरी लोपतां सापें ।
फार होइजे ॥ ३१० ॥
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें ।
इयें तेजें जियें फारें ।
तियें जयाचेनि आधारें ।
प्रकाशती ॥ ३११ ॥
ते वस्तु कीं तेजोराशी ।
सर्वभूतात्मक सरिसी ।
चंद्रसूर्याच्या मानसीं ।
प्रकाशे जे ॥ ३१२ ॥
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां ।
पडती वस्तूच्या प्रकाशा ।
यालागीं तेज जें तेजसा ।
तें वस्तूचें आंग ॥ ३१३ ॥
आणि जयाच्या प्रकाशीं ।
जग हारपे चंद्रार्केंसीं ।
सचंद्र नक्षत्रें जैसीं ।
दिनोदयीं ॥ ३१४ ॥
नातरी प्रबोधलिये वेळे ।
ते स्वप्नींची डिंडीमा मावळे ।
कां नुरेचि सांजवेळे ।
मृगतृष्णिका ॥ ३१५ ॥
तैसा जिये वस्तूच्या ठायीं ।
कोण्हीच कां आभासु नाहीं ।
तें माझें निजधाम पाहीं ।
पाटाचें गा ॥ ३१६ ॥
पुढती जे तेथ गेले ।
ते न घेती माघौतीं पाउलें ।
महोदधीं कां मिनले ।
स्रोत जैसे ॥ ३१७ ॥
कां लवणाची कुंजरी ।
सूदलिया लवणसागरीं ।
होयचि ना माघारी ।
परती जैसी ॥ ३१८ ॥
नाना गेलिया अंतराळा ।
न येतीचि वन्हिज्वाळा ।
नाहीं तप्तलोहौनि जळा ।
निघणें जेवीं ॥ ३१९ ॥
तेवीं मजसीं एकवट ।
जे जाले ज्ञानें चोखट ।
तयां पुनरावृत्तीची वाट ।
मोडली गा ॥ ३२० ॥
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो ।
पार्थु म्हणे जी जी पसावो ।
परी विनंती एकी देवो ।
चित्त देतु ॥ ३२१ ॥
तरी देवेंसि स्वयें एक होती ।
मग माघौते जे न येती ।
ते देवेंसि भिन्न आथी ।
कीं अभिन्न जी ॥ ३२२ ॥
जरी भिन्नचि अनादिसिद्ध ।
तरी न येती हें असंबद्ध ।
जे फुलां गेलें षट्पद ।
ते फुलेंचि होती पां ॥ ३२३ ॥
पैं लक्ष्याहूनि अनारिसे ।
बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें ।
मागुते पडती तैसे ।
येतीचि ते ॥ ३२४ ॥
नातरी तूंचि ते स्वभावें ।
तरी कोणें कोणासि मिळावें ।
आपणयासी आपण रुपावें ।
शस्त्रें केवीं ? ॥ ३२५ ॥
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां ।
तुझा संयोगवियोगु देवा ।
नये बोलों अवयवां ।
शरीरेंसीं ॥ ३२६ ॥
आणि जे सदां वेगळें तुजसीं ।
तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं ।
मा येती न येती हे कायसी ।
वायबुद्धि ? ॥ ३२७ ॥
तरी कोण गा ते तूंतें ।
पावोनि न येती माघौते ।
हें विश्वतोमुखा मातें ।
बुझावीं जी ॥ ३२८ ॥
इये आक्षेपीं अर्जुनाच्या ।
तो शिरोमणि सर्वज्ञांचा ।
तोषला बोध शिष्याचा ।
देखोनियां ॥ ३२९ ॥
मग म्हणे गा महामती ।
मातें पावोनि न येती पुढती ।
ते भिन्नाभिन्न रिती ।
आहाती दोनी ॥ ३३० ॥
जैं विवेकें खोलें पाहिजे ।
तरी मी तेचि ते सहजें ।
ना आहाचवाहाच तरी दुजे ।
ऐसेही गमती ॥ ३३१ ॥
जैसे पाणियावरी वेगळ ।
तळपतां दिसती कल्लोळ ।
एर्हवीं तरी निखिळ ।
पाणीचि तें ॥ ३३२ ॥
कां सुवर्णाहुनि आनें ।
लेणीं गमती भिन्नें ।
मग पाहिजे तंव सोनें ।
आघवेंचि तें ॥ ३३३ ॥
तैसें ज्ञानाचिये दिठी ।
मजसीं अभिन्नचि ते किरीटी ।
येर भिन्नपण तें उठी ।
अज्ञानास्तव ॥ ३३४ ॥
आणि साचोकारेनि वस्तुविचारें ।
कैचें मज एकासि दुसरें ।
भिन्नाभिन्नव्यवहारें ।
उमसिजेल ॥ ३३५ ॥
आघवेंचि आकाश सूनि पोटीं ।
बिंबचि जैं आते खोटी ।
तैं प्रतिबिंब कें उठी ।
कें रश्मि शिरे ? ॥ ३३६ ॥
कां कल्पांतींचिया पाणिया ।
काय वोत भरिती धनंजया ? ।
म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया ।
एका मज ॥ ३३७ ॥
परी ओघाचेनि मेळें ।
पाणी उजू परी वांकुडें जालें ।
रवी दुजेपण आलें ।
तोयबगें ॥ ३३८ ॥
व्योम चौफळें कीं वाटोळें ।
हें ऐसें कायिसयाही मिळे ।
परी घटमठीं वेंटाळें ।
तैसेंही आथी ॥ ३३९ ॥
हां गा निद्रेचेनि आधारें ।
काय एकलेनि जग न भरे ? ।
स्वप्नींचेनि जैं अवतरे ।
रायपणें ॥ ३४० ॥
कां मिनलेनि किडाळें ।
वानिभेदासि ये सोळें ।
तैसा स्वमाये वेंटाळें ।
शुद्ध जैं मी ॥ ३४१ ॥
तैं अज्ञान एक रूढे ।
तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे ।
मग विवरूनि कीजे फुडें ।
देहो मी ऐसें ॥ ३४२ ॥
ममैवांशो जीवलोके
जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि
प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७ ॥
ऐसें शरीराचि येवढें ।
जै आत्मज्ञान वेगळें पडे ।
तैं माझा अंशु आवडे ।
थोडेपणें ॥ ३४३ ॥
समुद्र कां वायुवशें ।
तरंगाकार उल्लसें ।
तो समुद्रांशु ऐसा दिसे ।
सानिवा जेवीं ॥ ३४४ ॥
तेवीं जडातें जीवविता ।
देहाहंता उपजविता ।
मी जीव गमें पंडुसुता ।
जीवलोकीं ॥ ३४५ ॥
पैं जीवाचिया बोधा ।
गोचरु जो हा धांदा ।
तो जीवलोकशब्दा ।
अभिप्रावो ॥ ३४६ ॥
अगा उपजणें निमणें ।
हें साचचि जे कां मानणें ।
तो जीवलोकु मी म्हणे ।
संसारु हन ॥ ३४७ ॥
एवंविध जीवलोकीं ।
तूं मातें ऐसा अवलोकीं ।
जैसा चंद्रु कां उदकीं ।
उदकातीत ॥ ३४८ ॥
पैं काश्मीराचा रवा ।
कुंकुमावरी पांडवा ।
आणिका गमे लोहिवा ।
तो तरी नव्हे ॥ ३४९ ॥
तैसें अनादिपण न मोडे ।
माझें अक्रियत्व न खंडे ।
परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे ।
ते जाण गा भ्रांती ॥ ३५० ॥
किंबहुना आत्मा चोखटु ।
होऊनि प्रकृतीसी एकवटु ।
बांधे प्रकृतिधर्माचा पाटु ।
आपणपयां ॥ ३५१ ॥
पैं मनादि साही इंद्रियें ।
श्रोत्रादि प्रकृतिकार्यें ।
तियें माझीं म्हणौनि होये ।
व्यापारारूढ ॥ ३५२ ॥
जैसें स्वप्नीं परिव्राजें ।
आपणपयां आपण कुटुंब होईजे ।
मग तयाचेनि धांविजे ।
मोहें सैरा ॥ ३५३ ॥
तैसा आपलिया विस्मृती ।
आत्मा आपणचि प्रकृती- ।
सारिखा गमोनि पुढती ।
तियेसीचि भजे ॥ ३५४ ॥
मनाच्या रथीं वळघे ।
श्रवणाचिया द्वारें निघे ।
मग शब्दाचिया रिघे ।
रानामाजीं ॥ ३५५ ॥
तोचि प्रकृतीचा वागोरा ।
त्वचेचिया मोहरा ।
आणि स्पर्शाचिया घोरा ।
वना जाय ॥ ३५६ ॥
कोणे एके अवसरीं ।
रिघोनि नेत्राच्या द्वारीं ।
मग रूपाच्या डोंगरीं ।
सैरा हिंडे ॥ ३५७ ॥
कां रसनेचिया वाटा ।
निघोनि गा सुभटा ।
रसाचा दरकुटा ।
भरोंचि लागे ॥ ३५८ ॥
नातरी येणेंचि घ्राणें ।
जैं देहांशु करी निघणें ।
मग गंधाची दारुणें ।
आडवें लंघी ॥ ३५९ ॥
ऐसेनि देहेंद्रियनायकें ।
धरूनि मन जवळिकें ।
भोगिजती शब्दादिकें ।
विषयभरणें ॥ ३६० ॥
शरीरं यदवाप्नोति
यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति
वायुर्गन्धानिवाशयात् ॥ ८ ॥
परी कर्ता भोक्ता ऐसें ।
हें जीवाचे तैंचि दिसे ।
जैं शरीरीं कां पैसे ।
एकाधिये ॥ ३६१ ॥
जैसा आथिला आणि विलासिया ।
तैंचि वोळखों ये धनंजया ।
जैं राजसेव्या ठाया ।
वस्तीसि ये ॥ ३६२ ॥
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु ।
कां विषयेंद्रियांचा धुमाडु ।
हा जाणिजे तैं निवाडु ।
जैं देह पाविजे ॥ ३६३ ॥
अथवा शरीरातें सांडी ।
तर्ही इंद्रियांची तांडी ।
हे आपणयांसवें काढी ।
घेऊनि जाय ॥ ३६४ ॥
जैसा अपमानिला अतिथी ।
ने सुकृताची संपत्ति ।
कां साइखडेयाची गती ।
सूत्रतंतू ॥ ३६५ ॥
नाना मावळतेनि तपनें ।
नेइजेती लोकांचीं दर्शनें ।
हें असो द्रुती पवनें ।
नेईजे जैसी ॥ ३६६ ॥
तेवीं मनःषष्ठां ययां ।
इंद्रियांतें धनंजया ।
देहराजु ने देहा- ।
पासूनि गेला ॥ ३६७ ॥
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च
रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं
विषयानुपसेवते ॥ ९ ॥
मग येथ अथवा स्वर्गीं ।
जेथ जें देह आपंगी ।
तेथ तैसेंचि पुढती पांगी ।
मनादिक ॥ ३६८ ॥
जैसा मालवलिया दिवा ।
प्रभेसी जाय पांडवा ।
मग उजळिजे तेथ तेधवां ।
तैसाचि फांके ॥ ३६९ ॥
तरी ऐसैसिया राहाटी ।
अविवेकियांचे दिठी ।
येतुलें हें किरीटी ।
गमेचि गा ॥ ३७० ॥
जे आत्मा देहासि आला ।
आणि विषयो येणेंचि भोगिला ।
अथवा देहोनि गेला ।
हें साचचि मानिती ॥ ३७१ ॥
एर्हवीं येणें आणि जाणें ।
कां करणें हा भोगणें ।
हें प्रकृतीचें तेणें ।
मानियेलें ॥ ३७२ ॥
उत्क्रामन्तं स्थितं वापि
भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति
पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १० ॥
यतन्तो योगिनश्चैनं
पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो
नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥
परी देहाचे मोटकें उभें ।
आणि चेतना तेथ उपलभे ।
तिये चळवळेचेनि लोभें ।
आला म्हणती ॥ ३७३ ॥
तैसेंचि तयां संगती ।
इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती ।
तया नांव सुभद्रापती ।
भोगणें जया ॥ ३७४ ॥
पाठीं भोगक्षीण आपैसे ।
देह गेलिया ते न दिसे ।
तेथें गेला गेला ऐसें ।
बोभाती गा ॥ ३७५ ॥
पैं रुखु डोलतु देखावा ।
तरी वारा वाजतु मानावा ।
रुखु नसे तेथें पांडवा ।
नाहीं तो गा ? ॥ ३७६ ॥
कां आरिसा समोर ठेविजे ।
आणि आपणपें तेथ देखिजे ।
तरी तेधवांचि जालें मानिजे ।
काय आधीं नाहीं ? ॥ ३७७ ॥
कां परता केलिया आरिसा ।
लोपु जाला तया आभासा ।
तरी आपणपें नाहीं ऐसा ।
निश्चयो करावा ? ॥ ३७८ ॥
शब्द तरी आकाशाचा ।
परी कपाळीं पिटे मेघाचा ।
कां चंद्रीं वेगु अभ्राचा ।
अरोपिजे ॥ ३७९ ॥
तैसें होइजे जाइजे देहें ।
तें आत्मसत्ते अविक्रिये ।
निष्टंकिती गा मोहें ।
आंधळे ते ॥ ३८० ॥
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं ।
देखिजे देहींचा धर्मु देहीं ।
ऐसें देखणें तें पाहीं ।
आन आहाती ॥ ३८१ ॥
ज्ञानें कां जयाचे डोळे ।
देखोनि न राहती देहींचे खोळे ।
सूर्यरश्मी आणियाळे ।
ग्रीष्मीं जैसें ॥ ३८२ ॥
तैसे विवेकाचेनि पैसें ।
जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे ।
ते ज्ञानिये देखती ऐसें ।
आत्मयातें ॥ ३८३ ॥
जैसें तारांगणीं भरलें ।
गगन समुद्रीं बिंबलें ।
परी तें तुटोनि नाहीं पडिलें ।
ऐसें निवडे ॥ ३८४ ॥
गगन गगनींचि आहे ।
हें आभासे तें वाये ।
तैसा आत्मा देखती देहें ।
गंवसिलाही ॥ ३८५ ॥
खळाळाच्या लगबगीं ।
फेडूनि खळाळाच्या भागीं ।
देखिजे चंद्रिका कां उगी ।
चंद्रीं जेवीं ॥ ३८६ ॥
कां नाडरचि भरे शोषें ।
सूर्यु तो जैसा तैसाचि असे ।
देह होतां जातां तैसें ।
देखती मातें ॥ ३८७ ॥
घटु मठु घडले ।
तेचि पाठीं मोडले ।
परी आकाश तें संचलें ।
असतचि असे ॥ ३८८ ॥
तैसें अखंडे आत्मसत्ते ।
अज्ञानदृष्टि कल्पितें ।
हें देहचि होतें जातें ।
जाणती फुडें ॥ ३८९ ॥
चैतन्य चढे ना वोहटे ।
चेष्टवी ना चेष्टे ।
ऐसें आत्मज्ञानें चोखटें ।
जाणती ते ॥ ३९० ॥
आणि ज्ञानही आपैतें होईल ।
प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल ।
सकळ शास्त्रांचें येईल ।
सर्वस्व हातां ॥ ३९१ ॥
परी ते व्युत्पत्ति ऐसी ।
जरी विरक्ति न रिगे मानसीं ।
तरी सर्वात्मका मजसीं ।
नव्हेचि भेटी ॥ ३९२ ॥
पैं तोंड भरो कां विचारा ।
आणि अंतःकरणीं विषयांसि थारा ।
तरी नातुडें धनुर्धरा ।
त्रिशुद्धी मी ॥ ३९३ ॥
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं ।
काई तुटती संसारगुंती ? ।
कीं परिवसिलिया पोथी ।
वाचिली होय ? ॥ ३९४ ॥
नाना बांधोनियां डोळे ।
घ्राणीं लाविजती मुक्ताफळें ।
तरी तयांचें काय कळे ।
मोल मान ? ॥ ३९५ ॥
तैसा चित्तीं अहंते ठावो ।
आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो ।
ऐसेनि कोडी एक जन्म जावो ।
परी न पविजे मातें ॥ ३९६ ॥
जो एक मी कां समस्तीं ।
व्यापकु असें भूतजातीं ।
ऐक तिये व्याप्ती ।
रूप करूं ॥ ३९७ ॥
यदादित्यगतं तेजो
जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ
तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १२ ॥
तरी सूर्यासकट आघवी ।
हे विश्वरचना जे दावी ।
ते दीप्ति माझी जाणावी ।
आद्यंतीं आहे ॥ ३९८ ॥
जल शोषूनि गेलिया सविता ।
ओलांश पुरवीतसे जे माघौता ।
ते चंद्रीं पंडुसुता ।
ज्योत्स्ना माझी ॥ ३९९ ॥
आणि दहन-पाचनसिद्धी ।
करीतसे जें निरवधी ।
ते हुताशीं तेजोवृद्धी ।
माझीचि गा ॥ ४०० ॥
गामाविश्य च भूतानि
धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः
सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १३ ॥
मी रिगालों असें भूतळीं ।
म्हणौनि समुद्र महाजळीं ।
हे पांसूचि ढेंपुळी ।
विरेचिना ॥ ४०१ ॥
आणी भूतेंही चराचरें ।
हे धरितसे जियें अपारें ।
तियें मीचि धरी धरे ।
रिगोनियां ॥ ४०२ ॥
गगनीं मी पंडुसुता ।
चंद्राचेनि मिसें अमृता ।
भरला जालों चालता ।
सरोवरु ॥ ४०३ ॥
तेथूनि फांकती रश्मिकर ।
ते पाट पेलूनि अपार ।
सर्वौषधींचे आगर ।
भरित असें मी ॥ ४०४ ॥
ऐसेनि सस्यादिकां सकळां ।
करी धान्यजाती सुकाळा ।
दें अन्नद्वारां जिव्हाळा ।
भूतजातां ॥ ४०५ ॥
आणि निपजविलें अन्न ।
तरी तैसें कैचें दीपन ।
जेणें जिरूनि समाधान ।
भोगिती जीव ॥ ४०६ ॥
अहं वैश्वानरो भूत्वा
प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः
पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १४ ॥
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं ।
करूनि कंदावरी आगिठी ।
दीप्ति जठरींही किरीटी ।
मीचि जालों ॥ ४०७ ॥
प्राणापानाच्या जोडभातीं ।
फुंकफुंकोनियां अहोराती ।
आटीतसें नेणों किती ।
उदरामाजीं ॥ ४०८ ॥
शुष्कें अथवा स्निग्धें ।
सुपक्वें कां विदग्धें ।
परी मीचि गा चतुर्विधें ।
अन्नें पचीं ॥ ४०९ ॥
एवं मीचि आघवें जन ।
जना निरवितें मीचि जीवन ।
जीवनीं मुख्य साधन ।
वन्हिही मीचि ॥ ४१० ॥
आतां ऐसियाहीवरी काई ।
सांगों व्याप्तीची नवाई ।
येथ दुजें नाहींचि घेईं ।
सर्वत्र मी गा ॥ ४११ ॥
तरी कैसेनि पां वेखें ।
सदा सुखियें एकें ।
एकें तियें बहुदुःखें ।
क्रांत भूतें ॥ ४१२ ॥
जैसी सगळिये पाटणीं ।
एकेंचि दीपें दिवेलावणी ।
जालिया कां न देखणी ।
उरलीं एकें ॥ ४१३ ॥
ऐसी हन उखिविखी ।
करित आहासि मानसीं कीं ।
तरी परिस तेही निकी ।
शंका फेडुं ॥ ४१४ ॥
पैं आघवा मीचि असें ।
येथ नाहीं कीर अनारिसें ।
परी प्राणियांचिया उल्लासें ।
बुद्धि ऐसा ॥ ४१५ ॥
जैसें एकचि आकाशध्वनी ।
वाद्यविशेषीं आनानीं ।
वाजावें पडे भिन्नीं ।
नादांतरीं ॥ ४१६ ॥
कां लोकचेष्टीं वेगळालां ।
जो हा एकचि भानु उदैला ।
तो आनानी परी गेला ।
उपयोगासी ॥ ४१७ ॥
नाना बीजधर्मानुरूप ।
झाडीं उपजविलें आप ।
तैसें परिणमलें स्वरूप ।
माझें जीवां ॥ ४१८ ॥
अगा नेणा आणि चतुरा ।
पुढां निळयांचा दुसरा ।
नेणा सर्पत्वें जाला येरा ।
सुखालागीं ॥ ४१९ ॥
हें असो स्वातीचें उदक ।
शुक्तीं मोतीं व्याळीं विख ।
तैसा सज्ञानांसी मी सुख ।
दुःख तों अज्ञानांसी ॥ ४२० ॥
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो
वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥ १५ ॥
एर्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं ।
मी अमुका आहें ऐसी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं ।
ते वस्तु गा मी ॥ ४२१ ॥
परी संतासवें वसतां ।
योगज्ञानीं पैसतां ।
गुरुचरण उपासितां ।
वैराग्येंसीं ॥ ४२२ ॥
येणेंचि सत्कर्में ।
अशेषही अज्ञान विरमे ।
जयांचें अहं विश्रामे ।
आत्मरूपीं ॥ ४२३ ॥
ते आपेआप देखोनि देखीं ।
मियां आत्मेनि सदा सुखी ।
येथें मीवांचून अवलोकीं ।
आन हेतु असे ? ॥ ४२४ ॥
अगा सूर्योदयो जालिया ।
सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया ।
तेवीं मातें मियां जाणावया ।
मीचि हेतु ॥ ४२५ ॥
ना शरीरपरातें सेवितां ।
संसारगौरवचि ऐकतां ।
देहीं जयांची अहंता ।
बुडोनि ठेली ॥ ४२६ ॥
ते स्वर्गसंसारालागीं ।
धांवतां कर्ममार्गीं ।
दुःखाच्या सेलभागीं ।
विभागी होती ॥ ४२७ ॥
परी हेंही होणें अर्जुना ।
मजचिस्तव तया अज्ञाना ।
जैसा जागताचि हेतु स्वप्ना ।
निद्रेतें होय ॥ ४२८ ॥
पैं अभ्रें दिवसु हरपला ।
तोहि दिवसेंचि जाणों आला ।
तेवीं मी नेणोनि विषयो देखिला ।
मजचिस्तव भूतीं ॥ ४२९ ॥
एवं निद्रा कां जागणिया ।
प्रबोधुचि हेतु धनंजया ।
तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां ।
मीचि मूळ ॥ ४३० ॥
जैसें सर्पत्वा कां दोरा ।
दोरुचि मूळ धनुर्धरा ।
तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा ।
मियांचि सिद्धु ॥ ४३१ ॥
म्हणौनि जैसा असें तैसया ।
मातें नेणोनि धनंजया ।
वेदु जाणों गेला तंव तया ।
जालिया शाखा ॥ ४३२ ॥
तरी तिहीं शाखाभेदीं ।
मीचि जाणिजे त्रिशुद्धी ।
जैसा पूर्वापरा नदी ।
समुद्रचि ठी ॥ ४३३ ॥
आणि महासिद्धांतापासीं ।
श्रुति हारपतीं शब्देंसीं ।
जैसिया सगंधा आकाशीं ।
वातलहरी ॥ ४३४ ॥
तैसें समस्तही श्रुतिजात ।
ठाके लाजिले ऐसें निवांत ।
तें मीचि करीं यथावत ।
प्रकटोनियां ॥ ४३५ ॥
पाठीं श्रुतिसकट अशेष ।
जग हारपे जेथ निःशेष ।
तें निजज्ञानही चोख ।
जाणता मीचि ॥ ४३६ ॥
जैसें निदेलिया जागिजे ।
तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें ।
परी एकत्वही देखों पाविजे ।
आपलेंचि ॥ ४३७ ॥
तैसें आपलें अद्वयपण ।
मी जाणतसें दुजेनवीण ।
तयाही बोधाकारण ।
जाणता मीचि ॥ ४३८ ॥
मग आगी लागलिया कापुरा ।
ना काजळी ना वैश्वानरा ।
उरणें नाहीं वीरा ।
जयापरी ॥ ४३९ ॥
तेवीं समूळ अविद्या खाये ।
तें ज्ञानही जैं बुडोनि जाये ।
तर्ही नाहीं कीर नोहे ।
आणि न साहे असणेंही ॥ ४४० ॥
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं ।
तया चोरातें कवण कें गिंवसी ? ।
जे कोणी एकी दशा ऐसी ।
शुद्ध ते मी ॥ ४४१ ॥
ऐसी जडाजडव्याप्ती ।
रूप करितां कैवल्यपती ।
ठी केली निरुपहितीं ।
आपुल्या रूपीं ॥ ४४२ ॥
तो आघवाचि बोधु सहसा ।
अर्जुनीं उमटला कैसा ।
व्योमींचा चंद्रोदयो जैसा ।
क्षीरार्णवीं ॥ ४४३ ॥
कां प्रतिभिंती चोखटे ।
समोरील चित्र उमटे ।
तैसा अर्जुनें आणि वैकुंठें ।
नांदतसे बोधु ॥ ४४४ ॥
तरी बाप वस्तुस्वभावो ।
फावे तंव तंव गोडिये थांवो ।
म्हणौनि अनुभवियांचा रावो ।
अर्जुन म्हणे ॥ ४४५ ॥
जी व्यापकपण बोलतां ।
निरुपाधिक जें आतां ।
स्वरूप प्रसंगता ।
बोलिले देवो ॥ ४४६ ॥
ते एक वेळ अव्यंगवाणें ।
कीजो कां मजकारणें ।
तेथ द्वारकेचा नाथु म्हणे ।
भलें केलें ॥ ४४७ ॥
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें ।
अखंडा बोलों आवडे ।
परी काय कीजे न जोडे ।
पुसतें ऐसें ॥ ४४८ ॥
आजि मनोरथांसि फळ ।
जोडलासि तूं केवळ ।
जे तोंड भरूनि निखळ ।
आलासि पुसों ॥ ४४९ ॥
जें अद्वैताहीवरी भोगिजे ।
तें अनुभवींच तूं विरजे ।
पुसोनि मज माझें ।
देतासि सुख ॥ ४५० ॥
जैसा आरिसा आलिया जवळां ।
दिसे आपणपें आपला डोळा ।
तैसा संवादिया तूं निर्मळा ।
शिरोमणी ॥ ४५१ ॥
तुवां नेणोनि पुसावें ।
मग आम्ही परिसऊं बैसावें ।
तो गा हा पाडु नव्हे ।
सोयरेया ॥ ४५२ ॥
ऐसें म्हणौनि आलिंगिलें ।
कृपादृष्टी अवलोकिलें ।
मग देवो काय बोलिले ।
अर्जुनेंसीं ॥ ४५३ ॥
पैं दोहीं वोठीं एक बोलणें ।
दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें ।
तुझें माझें ॥ ४५४ ॥
एवं आम्ही तुम्ही येथें ।
देखावें एका अर्थातें ।
सांगतें पुसतें येथें ।
दोन्ही एक ॥ ४५५ ॥
ऐसा बोलत देवो भुलला मोहें ।
अर्जुनातें आलिंगूनि ठाये ।
मग बिहाला म्हणे नोहें ।
आवडी हे ॥ ४५६ ॥
जाले इक्षुरसाचें ढाळ ।
तरी लवण देणें किडाळ ।
जे संवादसुखाचें रसाळ ।
नासेल थितें ॥ ४५७ ॥
आधींच आम्हां यया कांहीं ।
नरनारायणासी भिन्न नाहीं ।
परी आतां जिरो माझ्या ठाईं ।
वेगु हा माझा ॥ ४५८ ॥
इया बुद्धी सहसा ।
श्रीकृष्ण म्हणे वीरेशा ।
पैं गा तो तुवां कैसा ।
प्रश्नु केला ? ॥ ४५९ ॥
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता ।
तो परतोनि मागुता ।
प्रश्नावळीची कथा ।
ऐकों आला ॥ ४६० ॥
तेथ सद्गदें बोलें ।
अर्जुनें जी जी म्हणितलें ।
निरुपाधिक आपुलें ।
रूप सांगा ॥ ४६१ ॥
यया बोला तो शारङ्गी ।
तेंचि सांगावयालागीं ।
उपाधी दोहीं भागीं ।
निरूपीत असे ॥ ४६२ ॥
पुसिलिया निरुपहित ।
उपाधि कां सांगे येथ ।
हें कोण्हाही प्रस्तुत ।
गमे जरी ॥ ४६३ ॥
तरी ताकाचें अंश फेडणें ।
याचि नांव लोणी काढणें ।
चोखाचिये शुद्धी तोडणें ।
कीडचि जेवीं ॥ ४६४ ॥
बाबुळीचि सारावी हातें ।
परी पाणी तंव असे आइतें ।
अभ्रचि जावें गगन तें ।
सिद्धचि कीं ॥ ४६५ ॥
वरील कोंडियाचा गुंडाळा ।
झाडूनि केलिया वेगळा ।
कणु घेतां विरंगोळा ।
असे काई ? ॥ ४६६ ॥
तैसा उपाधि उपहितां ।
शेवटु जेथ विचारितां ।
तें कोणातेंही न पुसतां ।
निरुपाधिक ॥ ४६७ ॥
जैसें न सांगणेंवरी ।
बाळा पतीसी रूप करी ।
बोल निमालेपणें विवरी ।
अचर्चातें ॥ ४६८ ॥
पैं सांगणेया जोगें नव्हे ।
तेथींचें सांगणें ऐसें आहे ।
म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे ।
बोलिजे आदीं ॥ ४६९ ॥
पाडिव्याची चंद्ररेखा ।
निरुती दावावया शाखा ।
दाविजे तेवीं औपाधिका ।
बोली इया ॥ ४७० ॥
द्वाविमौ पुरुषौ लोके
क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि
कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६ ॥
मग तो म्हणे गा सव्यसाची ।
पैं इये संसारपाटणींची ।
वस्ती साविया टांची ।
दुपुरुषीं ॥ ४७१ ॥
जैसी आघवांचि गगनीं ।
नांदत दिवोरात्री दोन्ही ।
तैसे संसार राजधानीं ।
दोन्हीचि हे ॥ ४७२ ॥
आणिकही तिजा पुरुष आहे ।
परी तो या दोहींचें नांव न साहे ।
जो उदेला गांवेंसीं खाये ।
दोहींतें ययां ॥ ४७३ ॥
परी ते तंव गोठी असो ।
आधीं दोन्हींची हे परियेसों ।
जें संसारग्रामा वसों ।
आले असती ॥ ४७४ ॥
एक आंधळा वेडा पंगु ।
येर सर्वांगें पुरता चांगु ।
परी ग्रामगुणें संगु ।
घडला दोघां ॥ ४७५ ॥
तया एका नाम क्षरु ।
येरातें म्हणती अक्षरु ।
इहीं दोहींचि परी संसारु ।
कोंदला असे ॥ ४७६ ॥
आतां क्षरु तो कवणु ।
अक्षरु तो किं लक्षणु ।
हा अभिप्रायो संपूर्णु ।
विवंचूं गा ॥ ४७७ ॥
तरी महदहंकारा- ।
लागुनियां धनुर्धरा ।
तृणांतींचा पांगोरा- ।
वरी पैं गा ॥ ४७८ ॥
जें कांहीं सानें थोर ।
चालतें अथवा स्थिर ।
किंबहुना गोचर ।
मनबुद्धींसि जें ॥ ४७९ ॥
जेतुलें पांचभौतिक घडतें ।
जें नामरूपा सांपडतें ।
गुणत्रयाच्या पडतें ।
कामठां जें ॥ ४८० ॥
भूताकृतीचें नाणें ।
घडत भांगारें जेणें ।
काळासि जूं खेळणें ।
जिहीं कवडां ॥ ४८१ ॥
जाणणेंचि विपरीतें ।
जें जें कांहीं जाणिजेतें ।
जें प्रतिक्षणीं निमतें ।
होऊनियां ॥ ४८२ ॥
अगा काढूनि भ्रांतीचे दांग ।
उभवी सृष्टीचें आंग ।
हें असो बहु जग ।
जया नाम ॥ ४८३ ॥
पैं अष्टधा भिन्न ऐसें ।
जें दाविलें प्रकृतिमिसें ।
जें क्षेत्रद्वारां छत्तिसें ।
भागी केलें ॥ ४८४ ॥
हें मागील सांगों किती ।
अगा आतांचि जें प्रस्तुतीं ।
वृक्षाकार रूपाकृती ।
निरूपिलें ॥ ४८५ ॥
तें आघवेंचि साकारें ।
कल्पुनी आपणपयां पुरे ।
जालें असें तदनुसारें ।
चैतन्यचि ॥ ४८६ ॥
जैसा कुहां आपणचि बिंबें ।
सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे ।
मग क्षोभला समारंभें ।
घाली तेथ ॥ ४८७ ॥
कां सलिलीं असतचि असे ।
व्योमावरी व्योम बिंबे जैसें ।
अद्वैत होऊनि तैसें ।
द्वैत घेपे ॥ ४८८ ॥
अर्जुना गा यापरी ।
साकार कल्पूनि पुरीं ।
आत्मा विस्मृतीचि करी ।
निद्रा तेथ ॥ ४८९ ॥
पैं स्वप्नीं सेजार देखिजे ।
मग पहुडणें जैसें तेथ कीजे ।
तैसें पुरीं शयन देखिजे ।
आत्मयासी ॥ ४९० ॥
पाठीं तिये निद्रेचेनि भरें ।
मी सुखी दुःखी म्हणत घोरें ।
अहंममतेचेनि थोरें ।
वोसणायें सादें ॥ ४९१ ॥
हा जनकु हे माता ।
हा मी गौर हीन पुरता ।
पुत्र वित्त कांता ।
माझें हें ना ॥ ४९२ ॥
ऐसिया वेंघोनि स्वप्ना ।
धांवत भवस्वर्गाचिया राना ।
तया चैतन्या नाम अर्जुना ।
क्षर पुरुषु गा ॥ ४९३ ॥
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें ।
नामें जयातें बोलणें ।
जग जीवु कां म्हणे ।
जिये दशेतें ॥ ४९४ ॥
जो आपुलेनि विसरें ।
सर्व भूतत्वें अनुकरें ।
तो आत्मा बोलिजे क्षरें ।
पुरुष नामें ॥ ४९५ ॥
जे तो वस्तुस्थिती पुरता ।
म्हणौनि आली पुरुषता ।
वरी देहपुरीं निदैजतां ।
पुरुषनामें ॥ ४९६ ॥
आणि क्षरपणाचा नाथिला ।
आळु यया ऐसेनि आला ।
जे उपाधींचि आतला ।
म्हणौनियां ॥ ४९७ ॥
जैसी खळाळीचिया उदका- ।
सरसीं आंदोळे चंद्रिका ।
तैसा विकारां औपाधिका ।
ऐसाचि गमे ॥ ४९८ ॥
कां खळाळु मोटका शोषे ।
आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे ।
तैसा उपाधिनाशीं न दिसे ।
उपाधिकु ॥ ४९९ ॥
ऐसें उपाधीचेनि पाडें ।
क्षणिकत्व यातें जोडे ।
तेणें खोंकरपणें घडे ।
क्षर हें नाम ॥ ५०० ॥
एवं जीवचैतन्य आघवें ।
हें क्षर पुरुष जाणावें ।
आतां रूप करूं बरवें ।
अक्षरासी ॥ ५०१ ॥
तरी अक्षरु जो दुसरा ।
पुरुष पैं धनुर्धरा ।
तो मध्यस्थु गा गिरिवरां ।
मेरु जैसा ॥ ५०२ ॥
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गीं ।
इहीं न भेदे तिहीं भागीं ।
तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं ।
पडेना जो ॥ ५०३ ॥
ना यथार्थज्ञानें एक होणें ।
ना अन्यथात्वें दुजें घेणें ।
ऐसें निखिळ जें नेणणें ।
तेंचि तें रूप ॥ ५०४ ॥
पांसुता निःशेष जाये ।
ना घटभांडादि होये ।
तया मृत्पिंडा ऐसें आहे ।
मध्यस्थ जें ॥ ५०५ ॥
पैं आटोनि गेलिया सागरु ।
मग तरंगु ना नीरु ।
तया ऐशी अनाकारु ।
जे दशा गा ॥ ५०६ ॥
पार्था जागणें तरी बुडे ।
परी स्वप्नाचें कांहीं न मांडे ।
तैसिये निद्रे सांगडें ।
न्याहाळणें जें ॥ ५०७ ॥
विश्व आघवेंचि मावळे ।
आणि आत्मबोधु तरी नुजळे ।
तिये अज्ञानदशे केवळे ।
अक्षरु नाम ॥ ५०८ ॥
सर्वां कळीं सांडिलें जैसें ।
चंद्रपण उरे अंवसे ।
रूप जाणावें तैसें ।
अक्षराचें ॥ ५०९ ॥
पैं सर्वोपाधिविनाशें ।
हे जीवदशा जेथ पैसे ।
फळपाकांत जैसें ।
झाड बीजीं ॥ ५१० ॥
तैसें उपाधी उपहित ।
थोकोनि ठाके जेथ ।
तयातें अव्यक्त ।
बोलती गा ॥ ५११ ॥
घन अज्ञान सुषुप्ती ।
तो बीजभावो म्हणती ।
येर स्वप्न हन जागृती ।
फळभावो तयाचा ॥ ५१२ ॥
जयासी कां बीजभावो ।
वेदांतीं केला ऐसा आवो ।
तो तया पुरुषा ठावो ।
अक्षराचा ॥ ५१३ ॥
जेथूनि अन्यथाज्ञान ।
फांकोनि जागृति स्वप्न ।
नानाबुद्धीचें रान ।
रिगालें असे ॥ ५१४ ॥
जीवत्व जेथुनी किरीटी ।
विश्व उठतचि उठी ।
ते उभय भेदांची मिठी ।
अक्षरु पुरुषु ॥ ५१५ ॥
येरु क्षर पुरुषु कां जनीं ।
जिहीं खेळे जागृतीं स्वप्नीं ।
तिया अवस्था जो दोन्ही ।
वियाला गा ॥ ५१६ ॥
पैं अज्ञानघनसुषुप्ती ।
ऐसैसी जे कां ख्याती ।
या उणी एकी प्राप्ती ।
ब्रह्माची जे ॥ ५१७ ॥
साचचि पुढती वीरा ।
जरी न येतां स्वप्न जागरा ।
तरी ब्रह्मभावो साचोकारा ।
म्हणों येता ॥ ५१८ ॥
परी प्रकृतिपुरुषें दोनी ।
अभ्रें जालीं जियें गगनीं ।
क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं ।
देखिला जियें ॥ ५१९ ॥
हें असो अधोशाखा ।
या संसाररूपा रुखा ।
मूळ तें रूप पुरुषा ।
अक्षराचें ॥ ५२० ॥
हा पुरुषु कां म्हणिजे ।
जे पूर्णपणेंचि निजें ।
पैं मायापुरीं पहुडिजे ।
तेणेंही बोलें ॥ ५२१ ॥
आणि विकारांची जे वारी ।
ते विपरीत ज्ञानाची परी ।
नेणिजे जिये माझारीं ।
ते सुषुप्ती गा हा ॥ ५२२ ॥
म्हणौनि यया आपैसें ।
क्षरणें या नसे ।
आणिकेंही हा न नाशे ।
ज्ञानाउणें ॥ ५२३ ॥
यालागीं हा अक्षरु ।
ऐसा वेदांतीं डगरु ।
केला देशी थोरु ।
सिद्धांताच्या ॥ ५२४ ॥
ऐसें जीवकार्य कारण ।
जया मायासंगुचि लक्षण ।
अक्षर पुरुषु जाण ।
चैतन्य तें ॥ ५२५ ॥
उत्तमः पुरुषस्त्वन्यः
परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविश्य
बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १७ ॥
आतां अन्यथाज्ञानीं ।
या दोनी अवस्था जया जनीं ।
तया हरपती घनीं ।
अज्ञानतत्त्वीं ॥ ५२६ ॥
तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया ।
ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया ।
जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां ।
स्वयें जळे ॥ ५२७ ॥
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें ।
आपण वस्तु देऊनि गेलें ।
ऐसें जाणणेंनिवीण उरलें ।
जाणतें जें ॥ ५२८ ॥
तें तो गा उत्तम पुरुषु ।
जो तृतीय कां निष्कर्षु ।
दोहींहून आणिकु ।
मागिला जो ॥ ५२९ ॥
सुषुप्तीं आणि स्वप्ना- ।
पासूनि बहुवें अर्जुना ।
जागणें जैसें आना ।
बोधाचेंचि ॥ ५३० ॥
कां रश्मी हन मृगजळा- ।
पासूनि अर्कमंडळा ।
अफाटु तेवीं वेगळा ।
उत्तमु गा ॥ ५३१ ॥
हें ना काष्ठींचा काष्ठाहुनी ।
अनारिसा जैसा वन्ही ।
तैसा क्षराक्षरापासुनी ।
आनचि तो ॥ ५३२ ॥
पैं ग्रासूनि आपली मर्यादा ।
एक करीत नदीनदां ।
उठी कल्पांतीं उदावादा ।
एकार्णवाचा ॥ ५३३ ॥
तैसें स्वप्न ना सुषुप्ती ।
ना जागराची गोठी आथी ।
जैसी गिळिली दिवोराती ।
प्रळयतेजें ॥ ५३४ ॥
मग एकपण ना दुजें ।
असें नाहीं हें नेणिजे ।
अनुभव निर्बुजे ।
बुडाला जेथें ॥ ५३५ ॥
ऐसें आथि जें कांहीं ।
तें तो उत्तम पुरुषु पाहीं ।
जें परमात्मा इहीं ।
बोलिजे नामीं ॥ ५३६ ॥
तेंही एथ न मिसळतां ।
बोलणें जीवत्वें पंडुसुता ।
जैसी बुडणेयाची वार्ता ।
थडियेचा कीजे ॥ ५३७ ॥
तैसें विवेकाचिये कांठीं ।
उभें ठाकलिया किरीटी ।
परावराचिया गोठी ।
करणें वेदां ॥ ५३८ ॥
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु ।
दोन्ही देखोनि अवर ।
यातें म्हणती परु ।
आत्मरूप ॥ ५३९ ॥
अर्जुना ऐसिया परी ।
परमात्मा शब्दवरी ।
सूचिजे गा अवधारीं ।
पुरुषोत्तमु ॥ ५४० ॥
एर्हवीं न बोलणेंचि बोलणें ।
जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें ।
कांहींच न होनि होणें ।
जे वस्तु गा ॥ ५४१ ॥
सोऽहं तेंही अस्तवलें ।
जेथ सांगतेंचि सांगणें जालें ।
द्रष्टत्वेंसी गेलें ।
दृश्य जेथ ॥ ५४२ ॥
आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- ।
माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा ? ।
जर्ही कैसेनि हे लाभा ।
जायेचि ना ॥ ५४३ ॥
कां घ्राणा फुला दोहीं ।
द्रुती असे जे माझारिलां ठायीं ।
ते न दिसे तरी नाहीं ।
ऐसें बोलों नये ॥ ५४४ ॥
तैसें द्रष्टा दृश्य हें जाये ।
मग कोण म्हणे काय आहे ।
हेंचि अनुभवें तेंचि पाहें ।
रूप तया ॥ ५४५ ॥
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु ।
ईशितव्येंवीण ईशु ।
आपणेंनीचि अवकाशु ।
वसवीत असे जो ॥ ५४६ ॥
जो नादें ऐकिजता नादु ।
स्वादें चाखिजता स्वादु ।
जो भोगिजतसे आनंदु ।
आनंदेंचि ॥ ५४७ ॥
जो पूर्णतेचा परिणामु ।
पुरुषु गा पुरुषोत्तमु ।
विश्रांतीचाही विश्रामु ।
विराला जेथें ॥ ५४८ ॥
सुखासि सुख जोडिलें ।
जें तेज तेजासि सांपडलें ।
शून्यही बुडालें ।
महाशून्यीं जिये ॥ ५४९ ॥
जो विकासाहीवरी उरता ।
ग्रासातेंही ग्रासूनि पुरता ।
जो बहुतें पाडें बहुतां- ।
पासूनि बहु ॥ ५५० ॥
पैं नेणतयाप्रती ।
रुपेपणाची प्रतीती ।
रुपें न होनि शुक्ती ।
दावी जेवीं ॥ ५५१ ॥
कां नाना अलंकारदशे ।
सोनें न लपत लपालें असे ।
विश्व न होनियां तैसें ।
विश्व जो धरी ॥ ५५२ ॥
हें असो जलतरंगा ।
नाहीं सिनानेपण जेवीं गा ।
तेवीं दिसता प्रकाशु जगा ।
आपणचि जो ॥ ५५३ ॥
आपुलिया संकोचविकाशा ।
आपणचि रूप वीरेशा ।
हा जळीं चंद्र हन जैसा ।
समग्र गा ॥ ५५४ ॥
तैसा विश्वपणें कांहीं होये ।
विश्वलोपीं कहीं न जाये ।
जैसा रात्रीं दिवसें नोहे ।
द्विधा रवि ॥ ५५५ ॥
तैसा कांहींचि कोणीकडे ।
कायिसेनिहि वेंचीं न पडे ।
जयाचें सांगडें ।
जयासीचि ॥ ५५६ ॥
यस्मात्क्षरमतीतोऽ
हमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च
प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥
जो आपणपेंचि आपणया ।
प्रकाशीतसे धनंजया ।
काय बहु बोलों जया ।
नाहीं दुजें ॥ ५५७ ॥
तो गा मी निरुपाधिकु ।
क्षराक्षरोत्तमु एकु ।
म्हणौनि म्हणे वेद लोकु ।
पुरुषोत्तमु ॥ ५५८ ॥
यो मामेवमसंमूढो
जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां
सर्वभावेन भारत ॥ १९ ॥
परी हें असो ऐसिया ।
मज पुरुषोत्तमातें धनंजया ।
जाणे जो पाहलेया ।
ज्ञानमित्रें ॥ ५५९ ॥
चेइलिया आपुलें ज्ञान ।
जैसें नाहींचि होय स्वप्न ।
तैसें स्फुरतें त्रिभुवन ।
वावों जालें ॥ ५६० ॥
कां हातीं घेतलिया माळा ।
फिटे सर्पाभासाचा कांटाळा ।
तैसा माझेनि बोधें टवाळा ।
नागवे तो ॥ ५६१ ॥
लेणें सोनेंचि जो जाणें ।
तो लेणेंपण तें वावो म्हणे ।
तेवीं मी जाणोनि जेणें ।
वाळिला भेदु ॥ ५६२ ॥
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु ।
मीचि एकु स्वतःसिद्धु ।
जो आपणेनसीं भेदु ।
नेणोनियां जाणे ॥ ५६३ ॥
तेणेंचि सर्व जाणितलें ।
हेंही म्हणणें थेंकुलें ।
जे तया सर्व उरलें ।
द्वैत नाहीं ॥ ५६४ ॥
म्हणौनि माझिया भजना ।
उचितु तोचि अर्जुना ।
गगन जैसें आलिंगना ।
गगनाचिया ॥ ५६५ ॥
क्षीरसागरा परगुणें ।
कीजे क्षीरसागरचिपणें ।
अमृतचि होऊनि मिळणें ।
अमृतीं जेवीं ॥ ५६६ ॥
साडेपंधरा मिसळावें ।
तैं साडेपंधरेंचि होआवें ।
तेवीं मी जालिया संभवे ।
भक्ति माझी ॥ ५६७ ॥
हां गा सिंधूसि आनी होती ।
तरी गंगा कैसेनि मिळती ? ।
म्हणौनि मी न होतां भक्ती ।
अन्वयो आहे ? ॥ ५६८ ॥
ऐसियालागीं सर्व प्रकारीं ।
जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं ।
तैसा मातें अवधारीं ।
भजिन्नला जो ॥ ५६९ ॥
सूर्या आणि प्रभे ।
एकवंकी जेणें लोभें ।
तो पाडु मानूं लाभे ।
भजना तया ॥ ५७० ॥
इति गुह्यतमं
शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥
एतद्बुहद्ध्वा बुद्धिमान्स्यात्
कृतकृत्यश्च भारत ॥ २० ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम
योगोनाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥
एवं कथिलयादारभ्य ।
हें जें सर्व शास्त्रैकलभ्य ।
उपनिषदां सौरभ्य ।
कमळदळां जेवीं ॥ ५७१ ॥
हें शब्दब्रह्माचें मथितें ।
श्रीव्यासप्रज्ञेचेंनि हातें ।
मथुनि काढिलें आयितें ।
सार आम्हीं ॥ ५७२ ॥
जे ज्ञानामृताची जाह्नवी ।
जे आनंदचंद्रींची सतरावी ।
विचारक्षीरार्णवींची नवी ।
लक्ष्मी जे हे ॥ ५७३ ॥
म्हणौनि आपुलेनि पदें वर्णें ।
अर्थाचेनि जीवेंप्राणें ।
मीवांचोनि हों नेणें ।
आन कांहीं ॥ ५७४ ॥
क्षराक्षरत्वें समोर जालें ।
तयांचें पुरुषत्व वाळिलें ।
मग सर्वस्व मज दिधलें ।
पुरुषोत्तमीं ॥ ५७५ ॥
म्हणौनि जगीं गीता ।
मियां आत्मेनि पतिव्रता ।
जे हे प्रस्तुत तुवां आतां ।
आकर्णिली ॥ ५७६ ॥
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र ।
पैं संसारु जिणतें हें शस्त्र ।
आत्मा अवतरविते मंत्र ।
अक्षरें इयें ॥ ५७७ ॥
परी तुजपुढां सांगितलें ।
तें अर्जुना ऐसें जालें ।
जें गौप्यधन काढिलें ।
माझें आजि ॥ ५७८ ॥
मज चैतन्यशंभूचा माथां ।
जो निक्षेपु होता पार्था ।
तया गौतमु जालासि आस्था- ।
निधी तूं गा ॥ ५७९ ॥
चोखटिवा आपुलिया ।
पुढिला उगाणा घेयावया ।
तया दर्पणाचीचि परी धनंजया ।
केली आम्हां ॥ ५८० ॥
कां भरलें चंद्रतारांगणीं ।
नभ सिंधू आपणयामाजीं आणी ।
तैसा गीतेसीं मी अंतःकरणीं ।
सूदला तुवां ॥ ५८१ ॥
जे त्रिविधमळिकटा ।
तूं सांडिलासि सुभटा ।
म्हणौनि गीतेसीं मज वसौटा ।
जालासि गा ॥ ५८२ ॥
परी हें बोलों काय गीता ।
जे हे माझी उन्मेषलता ।
जाणे तो समस्ता ।
मोहा मुके ॥ ५८३ ॥
सेविली अमृतसरिता ।
रोगु दवडूनि पंडुसुता ।
अमरपण उचितां ।
देऊनि घाली ॥ ५८४ ॥
तैसी गीता हे जाणितलिया ।
काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणापयां ।
मिळिजे येथ ॥ ५८५ ॥
जया आत्मज्ञानाच्या ठायीं ।
कर्म आपुलेया जीविता पाहीं ।
होऊनियां उतराई ।
लया जाय ॥ ५८६ ॥
हरपलें दाऊनि जैसा ।
मागु सरे वीरविलासा ।
ज्ञानचि कळस वळघे तैसा ।
कर्मप्रासादाचा ॥ ५८७ ॥
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा ।
कृत्य करूं सरलें देखा ।
ऐसा अनाथांचा सखा
। बोलिला तो ॥ ५८८ ॥
तें श्रीकृष्णवचनामृत ।
पार्थीं भरोनि असे वोसंडत ।
मग व्यासकृपा प्राप्त ।
संजयासी ॥ ५८९ ॥
तो धृतराष्ट्र राया ।
सूतसे पान करावया ।
म्हणौनि जीवितांतु तया ।
नोहेचि भारी ॥ ५९० ॥
एर्हवीं गीताश्रवण अवसरीं ।
आवडों लागतां अनधिकारी ।
परि सेखीं तेचि उजरी ।
पातला भली ॥ ५९१ ॥
जेव्हां द्राक्षीं दूध घातलें ।
तेव्हां वायां गेलें गमलें ।
परी फळपाकीं दुणावलें ।
देखिजे जेवीं ॥ ५९२ ॥
तैसी श्रीहरीवक्त्रींचीं अक्षरें ।
संजयें सांगितलीं आदरें ।
तिहीं अंधु तोही अवसरें ।
सुखिया जाला ॥ ५९३ ॥
तेंचि मर्हाटेनि विन्यासें ।
मियां उन्मेषें ठसेंठोंबसें ।
जी जाणें नेणें तैसें ।
निरोपिलें ॥ ५९४ ॥
सेवंतीये अरिसि कांहीं ।
आंग पाहतां विशेषु नाहीं ।
परी सौरभ्य नेलें तिहीं ।
भ्रमरीं जाणिजे ॥ ५९५ ॥
तैसें घडतें प्रमेय घेइजे ।
उणें तें मज देइजे ।
जें नेणणें हेंचि सहजें ।
रूप कीं बाळा ॥ ५९६ ॥
तरी नेणतें जर्ही होये ।
तर्हीं देखोनि बाप कीं माये ।
हर्ष केंहि न समाये ।
चोज करिती ॥ ५९७ ॥
तैसें संत माहेर माझें ।
तुम्ही मिनलिया मी लाडैजें ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें ।
जाणिजो जी ॥ ५९८ ॥
आतां विश्वात्मकु हा माझा ।
स्वामी श्रीनिवृत्तिराजा ।
तो अवधारू वाक्पूजा ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ५९९ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां
भावार्थदीपिकायां पंचदशोऽध्यायः ॥