॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥
॥ अथ चतुर्दशोऽध्यायः - अध्याय चौदावा ॥
॥ गुणत्रयविभागयोगः ॥
जय जय आचार्या ।
समस्तसुरवर्या ।
प्रज्ञाप्रभातसूर्या ।
सुखोदया ॥ १ ॥
जय जय सर्व विसांवया ।
सोहंभावसुहावया ।
नाना लोक हेलावया ।
समुद्रा तूं ॥ २ ॥
आइकें गा आर्तबंधू ।
निरंतरकारुण्यसिंधू ।
विशदविद्यावधू- ।
वल्लभा जी ॥ ३ ॥
तू जयांप्रति लपसी ।
तया विश्व हें दाविसी ।
प्रकट तैं करिसी ।
आघवेंचि तूं ॥ ४ ॥
कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे ।
हा दृष्टिबंधु निफजे ।
परी नवल लाघव तुझें ।
जें आपणपें चोरें ॥ ५ ॥
जी तूंचि तूं सर्वां यया ।
मा कोणा बोधु कोणा माया ।
ऐसिया आपेंआप लाघविया ।
नमो तुज ॥ ६ ॥
जाणों जगीं आप वोलें ।
तें तुझिया बोला सुरस जालें ।
तुझेनि क्षमत्व आलें ।
पृथ्वियेसी ॥ ७ ॥
रविचंद्रादि शुक्ती ।
उदो करिती त्रिजगतीं ।
तें तुझिया दीप्ती ।
तेज तेजां ॥ ८ ॥
चळवळिजे अनिळें ।
तें दैविकेनि जी निजबळें ।
नभ तुजमाजीं खेळे ।
लपीथपी ॥ ९ ॥
किंबहुना माया असोस ।
ज्ञान जी तुझेनि डोळस ।
असो वानणें सायास ।
श्रुतीसि हे ॥ १० ॥
वेद वानूनि तंवचि चांग ।
जंव न दिसे तुझें आंग ।
मग आम्हां तया मूग ।
एके पांती ॥ ११ ॥
जी एकार्णवाचे ठाईं ।
पाहतां थेंबाचा पाडु नाहीं ।
मा महानदी काई ।
जाणिजती ॥ १२ ॥
कां उदयलिया भास्वतु ।
चंद्र जैसा खद्योतु ।
आम्हां श्रुति तुज आंतु ।
तो पाडु असे ॥ १३ ॥
आणि दुजया थांवो मोडे ।
जेथ परेशीं वैखरी बुडे ।
तो तूं मा कोणें तोंडें ।
वानावासी ॥ १४ ॥
यालागीं आतां ।
स्तुति सांडूनि निवांता ।
चरणीं ठेविजे माथा ।
हेंचि भलें ॥ १५ ॥
तरी तू जैसा आहासि तैसिया ।
नमो जी श्रीगुरुराया ।
मज ग्रंथोद्यमु फळावया ।
वेव्हारा होईं ॥ १६ ॥
आतां कृपाभांडवल सोडीं ।
भरीं मति माझी पोतडी ।
करीं ज्ञानपद्य जोडी ।
थोरा मातें ॥ १७ ॥
मग मी संसरेन तेणें ।
करीन संतांसी कर्णभूषणें ।
लेववीन सुलक्षणें ।
विवेकाचीं ॥ १८ ॥
जी गीतार्थनिधान ।
काढू माझें मन ।
सुयीं स्नेहांजन ।
आपलें तूं ॥ १९ ॥
हे वाक्सृष्टि एके वेळे ।
देखतु माझे बुद्धीचे डोळे ।
तैसा उदैजो जो निर्मळें ।
कारुण्यबिंबें ॥ २० ॥
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ ।
काव्यें होय सफळ ।
तो वसंतु होय स्नेहाळ- ।
शिरोमणी ॥ २१ ॥
प्रमेय महापूरें ।
हे मतिगंगा ये थोरें ।
तैसा वरिष उदारें ।
दिठीवेनी ॥ २२ ॥
अगा विश्वैकधामा ।
तुझा प्रसाद चंद्रमा ।
करूं मज पूर्णिमा ।
स्फूर्तीची जी ॥ २३ ॥
जी अवलोकिलिया मातें ।
उन्मेषसागरीं भरितें ।
वोसंडेल स्फूर्तीतें ।
रसवृत्तीचें ॥ २४ ॥
तंव संतोषोनि श्रीगुरुराजें ।
म्हणितलें विनतिव्याजें ।
मांडिलें देखोनि दुजें ।
स्तवनमिषें ॥ २५ ॥
हें असो आतां वांजटा ।
तो ज्ञापनार्थ करूनि गोमटा ।
ग्रंथु दावीं उत्कंठा ।
भंगो नेदीं ॥ २६ ॥
हो कां जी स्वामी ।
हेंचि पाहत होतों मी ।
जे श्रीमुखें म्हणा तुम्ही ।
ग्रंथु सांग ॥ २७ ॥
सहजें दुर्वेचा डिरु ।
आंगेंचि तंव अमरु ।
वरी आला पूरु ।
पीयूषाचा ॥ २८ ॥
तरी आतां येणें प्रसादें ।
विन्यासें विदग्धें ।
मूळशास्त्रपदें ।
वाखाणीन ॥ २९ ॥
परी जीवा आंतुलीकडे ।
जैसी संदेहाची डोणी बुडे ।
ना श्रवणीं तरी चाडे ।
वाढी दिसे ॥ ३० ॥
तैसी बोली साचारी ।
अवतरो माझी माधुरी ।
माले मागूनि घरीं ।
गुरुकृपेच्या ॥ ३१ ॥
तरी मागां त्रयोदशीं ।
अध्यायीं गोठी ऐसी ।
श्रीकृष्ण अर्जुनेंसी ।
चावळले ॥ ३२ ॥
जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें ।
होईजे येणें जगें ।
आत्मा गुणसंगें ।
संसारिया ॥ ३३ ॥
आणि हाचि प्रकृतिगतु ।
सुखदुःख भोगीं हेतु ।
अथवा गुणातीतु ।
केवळु हा ॥ ३४ ॥
तरी कैसा पां असंगा संगु ।
कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञायोगु ।
सुखदुःखादि भोगु ।
केवीं तया ? ॥ ३५ ॥
गुण ते कैसे किती ।
बांधती कवणे रीती ।
नातरी गुणातीतीं ।
चिन्हें काई ? ॥ ३६ ॥
एवं इया आघवेया ।
अर्था रूप करावया ।
विषो एथ चौदाविया ।
अध्यायासी ॥ ३७ ॥
तरी तो आतां ऐसा ।
प्रस्तुत परियेसा ।
अभिप्रायो विश्वेशा ।
वैकुंठाचा ॥ ३८ ॥
तो म्हणे गा अर्जुना ।
अवधानाची सर्व सेना ।
मेळऊनि इया ज्ञाना ।
झोंबावें हो ! ॥ ३९ ॥
आम्हीं मागां तुज बहुतीं ।
दाविलें हें उपपत्ती ।
तरी आझुनी प्रतीती- ।
कुशीं न निघे ॥ ४० ॥
श्रीभगवानुवाच ।
परं भूयः प्रवक्ष्यामि
ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यद्ज्ञाःत्वा मुनयः सर्वे
परां सिद्धिमितो गताः ॥ १ ॥
म्हणौनि गा पुढती ।
सांगिजैल तुजप्रती ।
पर म्हण म्हणौनि श्रुतीं ।
डाहारिलें जें ॥ ४१ ॥
एर्हवीं ज्ञान हें आपुलें ।
परी पर ऐसेनि जालें ।
जे आवडोनि घेतलें ।
भवस्वर्गादिक ॥ ४२ ॥
अगा याचि कारणें ।
हें उत्तम सर्वांत्परी मी म्हणें ।
जे वन्हि हें तृणें ।
येरें ज्ञानें ॥ ४३ ॥
जियें भवस्वर्गातें जाणती ।
यागचि चांग म्हणती ।
पारखी फुडी आथी ।
भेदीं जया ॥ ४४ ॥
तियें आघवींचि ज्ञानें ।
केलीं येणें स्वप्नें ।
जैशा वातोर्मी गगनें ।
गिळिजती अंतीं ॥ ४५ ॥
कां उदितें रश्मिराजें ।
लोपिलीं चंद्रादि तेजें ।
नाना प्रळयांबुमाजें ।
नदी नद ॥ ४६ ॥
तैसें येणें पाहलेया ।
ज्ञानजात जाय लया ।
म्हणौनियां धनंजया ।
उत्तम हे ॥ ४७ ॥
अनादि जे मुक्तता ।
आपुली असे पंडुसुता ।
तो मोक्षु हातां येता ।
होय जेणें ॥ ४८ ॥
जयाचिया प्रतीती ।
विचारवीरीं समस्तीं ।
नेदिजेचि संसृती ।
माथां उधऊं ॥ ४९ ॥
मनें मन घालूनि मागें ।
विश्रांति जालिया आंगें ।
ते देहीं देहाजोगे ।
होतीचि ना ॥ ५० ॥
मग तें देहाचें बेळें ।
वोलांडूनि एकेचि वेळे ।
संवतुकी कांटाळें ।
माझें जालें ॥ ५१ ॥
इदं ज्ञानमुपाश्रित्य
मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते
प्रलये न व्यथन्ति च ॥ २ ॥
जे माझिया नित्यता ।
तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता ।
माझियाची ॥ ५२ ॥
मी जैसा अनंतानंदु ।
जैसाचि सत्यसिंधु ।
तैसेचि ते भेदु ।
उरेचि ना ॥ ५३ ॥
जें मी जेवढें जैसें ।
तेंचि ते जाले तैसें ।
घटभंगीं घटाकाशें ।
आकाश जेवीं ॥ ५४ ॥
नातरीं दीपमूळकीं ।
दीपशिखा अनेकीं ।
मीनलिया अवलोकीं ।
होय जैसें ॥ ५५ ॥
अर्जुना तयापरी ।
सरली द्वैताची वारी ।
नांदे नामार्थ एकाहारीं ।
मीतूंविण ॥ ५६ ॥
येणेंचि पैं कारणें ।
जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें ।
तेंही तया होणें ।
पडेचिना ॥ ५७ ॥
सृष्टीचिये सर्वादी ।
जयां देहाची नाही बांधी ।
ते कैचें प्रळयावधी ।
निमतील पां ? ॥ ५८ ॥
म्हणौनि जन्मक्षयां- ।
अतीत ते धनंजया ।
मी जालें ज्ञाना ।
अनुसरोनी ॥ ५९ ॥
ऐसी ज्ञानाची वाढी ।
वानिली देवें आवडी ।
तेवींचि पार्थाही गोडी ।
लावावया ॥ ६० ॥
तंव तया जालें आन ।
सर्वांगीं निघाले कान ।
सणई अवधान ।
आतला पां ॥ ६१ ॥
आतां देवाचिया ऐसें ।
जाकळीजत असे वोरसें ।
जें निरूपण आकाशें ।
वेंटाळेना ॥ ६२ ॥
मग म्हणे गा प्रज्ञाकांता ।
उजवली आजि वक्तृत्वता ।
जे बोलायेवढा श्रोता ।
जोडलासी ॥ ६३ ॥
तरि एकु मी अनेकीं ।
गोंविजे देहपाशकीं ।
त्रिगुणीं लुब्धकीं ।
कवणेपरी ॥ ६४ ॥
कैसा क्षेत्रयोगें ।
वियें इयें जगें ।
तें परिस सांगें ।
कवणेपरी ॥ ६५ ॥
पैं क्षेत्र येणें व्याजें ।
यालागीं हें बोलिजे ।
जे मत्संगबीजें ।
भूतीं पिके ॥ ६६ ॥
मम योनिर्महद्ब्र ह्म
तस्मिन्गर्भं दधामहम्यम् ।
संभवः सर्वभूतानां
ततो भवति भारत ॥ ३ ॥
एर्हवीं तरी महद्ब्रह्म ।
यालागीं हें ऐसें नाम ।
जे महदादिविश्राम ।
शालिका हें ॥ ६७ ॥
विकारां बहुवस थोरी ।
अर्जुना हेंचि करी ।
म्हणौनि अवधारीं ।
महद्ब्रुह्म ॥ ६८ ॥
अव्यक्तवादमतीं ।
अव्यक्त ऐसी वदंती ।
सांख्याचिया प्रतीती ।
प्रकृति हेचि ॥ ६९ ॥
वेदांतीं इयेतें माया ।
ऐसें म्हणिजे प्राज्ञराया ।
असो किती बोलों वायां ।
अज्ञान हें ॥ ७० ॥
आपला आपणपेयां ।
विसरु जो धनंजया ।
तेंचि रूप यया ।
अज्ञानासी ॥ ७१ ॥
आणिकही एक असे ।
जें विचारावेळे न दिसे ।
वातीं पाहतां जैसें ।
अंधारें कां ॥ ७२ ॥
हालविलिया जाय ।
निश्चळीं तरी होय ।
दुधीं जैसी साय ।
दुधाची ते ॥ ७३ ॥
पैं जागरु ना स्वप्न ।
ना स्वरूप अवस्थान ।
ते सुषुप्ति कां घन ।
जैसी होय ॥ ७४ ॥
कां न वियतां वायूतें ।
वांझें आकाश रितें ।
तया ऐसें निरुतें ।
अज्ञान गा ॥ ७५ ॥
पैल खांबु कां पुरुखु ।
ऐसा निश्चयो नाहीं एकु ।
परी काय नेणों आलोकु ।
दिसत असे ॥ ७६ ॥
तेवीं वस्तु जैसी असे ।
तैसी कीर न दिसे ।
परी कांहीं अनारिसें ।
देखिजेना ॥ ७७ ॥
ना राती ना तेज ।
ते संधि जेवीं सांज ।
तेवीं विरुद्ध ना निज ।
ज्ञान आथी ॥ ७८ ॥
ऐसी कोण्ही एकी दिशा ।
तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा ।
क्षेत्रज्ञु नाम ॥ ७९ ॥
अज्ञान थोरिये आणिजे ।
आपणपें तरी नेणिजे ।
तें रूप जाणिजे ।
क्षेत्रज्ञाचें ॥ ८० ॥
हाचि उभय योगु ।
बुझें बापा चांगु ।
सत्तेचा नैसर्गु ।
स्वभावो हा ॥ ८१ ॥
आतां अज्ञानासारिखें ।
वस्तु आपणपांचि देखे ।
परी रूपें अनेकें ।
नेणों कोणें ॥ ८२ ॥
जैसा रंकु भ्रमला ।
म्हणे जा रे मी रावो आला ।
कां मूर्च्छितु गेला ।
स्वर्गलोकां ॥ ८३ ॥
तेवीं लचकलिया दिठी ।
मग देखणें जें जें उठी ।
तया नाम सृष्टी ।
मीचि वियें पैं गा ॥ ८४ ॥
जैसें कां स्वप्नमोहा ।
तो एकाकी देखे बहुवा ।
तोचि पाडु आत्मया ।
स्मरणेंवीण असे ॥ ८५ ॥
हेंचि नीभ्रांती ।
प्रमेय उपलवूं पुढती ।
परी तूं प्रतीती ।
याचि घे पां ॥ ८६ ॥
तरी माझी हे गृहिणी ।
अनादि तरुणी ।
अनिर्वाच्यगुणी ।
अविद्या हे ॥ ८७ ॥
इये नाहीं हेंचि रूप ।
ठाणें हें अति उमप ।
हें निद्रितां समीप ।
चेतां दुरी ॥ ८८ ॥
पैं माझेनिचि आंगें ।
पहुडल्या हे जागे ।
आणि सत्तासंभुगें ।
गुर्विणी होय ॥ ८९ ॥
महद्ब्रह्मउदरीं ।
प्रकृतीं आठै विकारीं ।
गर्भाची करी ।
पेलोवेली ॥ ९० ॥
उभयसंगु पहिलें ।
बुद्धितत्त्वें प्रसवलें ।
बुद्धितत्त्व भारैलें ।
होय मन ॥ ९१ ॥
तरुणी ममता मनाची ।
ते अहंकार तत्त्व रची ।
तेणें महाभूतांची ।
अभिव्यक्ति होय ॥ ९२ ॥
आणि विषयेंद्रियां गौसी ।
स्वभावें तंव भूतांसी ।
म्हणौनि येती सरिसीं ।
तियेंही रूपा ॥ ९३ ॥
जालेनि विकारक्षोभें ।
पाठीं त्रिगुणाचें उभें ।
तेव्हां ये वासनागर्भें ।
ठायेंठावों ॥ ९४ ॥
रुखाचा आवांका ।
जैसी बीजकणिका ।
जीवीं बांधें उदका ।
भेटतखेंवो ॥ ९५ ॥
तैसी माझेनि संगें ।
अविद्या नाना जगें ।
आर घेवों लागे ।
आणियाची ॥ ९६ ॥
मग गर्भगोळा तया ।
कैसें रूप तैं ये आया ।
तें परियेसें राया ।
सुजनांचिया ॥ ९७ ॥
पैं मणिज स्वेदज ।
उद्भिज जारज ।
उमटती सहज ।
अवयव हें ॥ ९८ ॥
व्योमवायुवशें ।
वाढलेनि गर्भरसें ।
मणिजु उससे ।
अवयव तो ॥ ९९ ॥
पोटीं सूनि तमरजें ।
आगळिकां तोय तेजें ।
उठितां निफजे ।
स्वेदजु गा ॥ १०० ॥
आपपृथ्वी उत्कटें ।
आणि तमोमात्रें निकृष्टें ।
स्थावरु उमटे ।
उद्भिजु हा ॥ १०१ ॥
पांचां पांचही विरजीं ।
होती मनबुद्ध्यादि साजीं ।
हीं हेतु जारजीं ।
ऐसें जाण ॥ १०२ ॥
ऐसे चारी हे सरळ ।
करचरणतळ ।
महाप्रकृति स्थूळ ।
तेंचि शिर ॥ १०३ ॥
प्रवृत्ति पेललें पोट ।
निवृत्ति ते पाठी नीट ।
सुर योनी आंगें आठ ।
ऊर्ध्वाचीं ॥ १०४ ॥
कंठु उल्हासता स्वर्गु ।
मृत्युलोकु मध्यभागु ।
अधोदेशु चांगु ।
नितंबु तो ॥ १०५ ॥
ऐसें लेकरूं एक ।
प्रसवली हें देख ।
जयाचें तिन्ही लोक ।
बाळसें गा ॥ १०६ ॥
चौर्यांशीं लक्ष योनी ।
तियें कांडां पेरां सांदणी ।
वाढे प्रतिदिनीं ।
बाळक हें ॥ १०७ ॥
नाना देह अवयवीं ।
नामाचीं लेणीं लेववी ।
मोहस्तन्यें वाढवी ।
नित्य नवें ॥ १०८ ॥
सृष्टी वेगवेगळीया ।
तिया करांघ्रीं आंगोळियां ।
भिन्नाभिमान सूदलिया ।
मुदिया तेथें ॥ १०९ ॥
हें एकलौतें चराचर ।
अविचारित सुंदर ।
प्रसवोनि थोर ।
थोरावली ॥ ११० ॥
पै ब्रह्मा प्रातःकाळु ।
विष्णु तो माध्यान्ह वेळु ।
सदाशिव सायंकाळु ।
बाळा यया ॥ १११ ॥
महाप्रळयसेजे ।
खिळोनि निवांत निजे ।
विषमज्ञानें उमजें ।
कल्पोदयीं ॥ ११२ ॥
अर्जुना इयापरी ।
मिथ्यादृष्टीच्या घरीं ।
युगानुवृत्तीचीं करी ।
चोज पाउलें ॥ ११३ ॥
संकल्पु जयाचा इष्टु ।
अहंकारु तो विनटु ।
ऐसिया होय शेवटु ।
ज्ञानें यया ॥ ११४ ॥
आतां असो हे बहु बोली ।
ऐसें विश्व माया व्याली ।
तेथ साह्य जाली ।
माझी सत्ता ॥ ११५ ॥
सर्वयोनिषु कौन्तेय
मूर्तयः संभवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं
बीजप्रदः पिता ॥ ४ ॥
याकारणें मी पिता ।
महद्ब्रह्म हे माता ।
अपत्य पंडुसुता ।
जगडंबरु ॥ ११६ ॥
आतां शरीरें बहुतें ।
देखोनि न भेदें हो चित्तें ।
जे मनबुद्ध्यादि भूतें ।
एकेंचि येथें ॥ ११७ ॥
हां गा एकाचि देहीं ।
काय अनारिसें अवयव नाहीं ? ।
तेवीं विचित्र विश्व पाहीं ।
एकचि हें ॥ ११८ ॥
पैं उंचा नीचा डाहाळिया ।
विषमा वेगळालिया ।
येकाचि जेवीं जालिया ।
बीजाचिया ॥ ११९ ॥
आणि संबंधु तोही ऐसा ।
मृत्तिके घटु लेंकु जैसा ।
कां पटत्व कापुसा ।
नातू होय ॥ १२० ॥
नाना कल्लोळपरंपरा ।
संतती जैसी सागरा ।
आम्हां आणि चराचरा ।
संबंधु तैसा ॥ १२१ ॥
म्हणौनि वन्हि आणि ज्वाळ ।
दोन्ही वन्हीचि केवळ ।
तेवीं मी गा सकळ ।
संबंधु वावो ॥ १२२ ॥
जालेनि जगें मी झांकें ।
तरी जगत्वें कोण फांके ? ।
किळेवरी माणिकें ।
लोपिजे काई ? ॥ १२३ ॥
अळंकारातें आलें ।
तरी सोनेपण काइ गेलें ? ।
कीं कमळ फांकलें ।
कमळत्वा मुके ? ॥ १२४ ॥
सांग पां धनंजया ।
अवयवीं अवयविया ।
आच्छादिजे कीं तया ।
तेंचि रूप ? ॥ १२५ ॥
कीं विरूढलिया जोंधळा ।
कणिसाचा निर्वाळा ।
वेंचला कीं आगळा ।
दिसतसे ॥ १२६ ॥
म्हणौनि जग परौतें ।
सारूनि पाहिजे मातें ।
तैसा नोव्हें उखितें ।
आघवें मीचि ॥ १२७ ॥
हा तूं साचोकारा ।
निश्चयाचा खरा ।
गांठीं बांध वीरा ।
जीवाचिये ॥ १२८ ॥
आतां मियां मज दाविला ।
शरीरीं वेगळाला ।
गुणीं मीचि बांधला ।
ऐसा आवडें ॥ १२९ ॥
जैसें स्वप्नीं आपण ।
उठूनियां आत्ममरण ।
भोगिजे गा जाण ।
कपिध्वजा ॥ १३० ॥
कां कवळातें डोळे ।
प्रकाशूनि पिवळें ।
देखती तेंही कळे ।
तयांसीचि ॥ १३१ ॥
नाना सूर्यप्रकाशें ।
प्रकटी तैं अभ्र भासे ।
तो लोपला हेंही दिसे ।
सूर्येंचि कीं ॥ १३२ ॥
पैं आपणपेनि जालिया ।
छाया गा आपुलिया ।
बिहोनि बिहालिया ।
आन आहे ? ॥ १३३ ॥
तैसीं इयें नाना देहें ।
दाऊनि मी नाना होयें ।
तेथ ऐसा जो बंधु आहे ।
तेंही देखें ॥ १३४ ॥
बंधु कां न बंधिजे ।
हें जाणणें मज माझें ।
नेणणेनि उपजे ।
आपलेनि ॥ १३५ ॥
तरी कोणें गुणें कैसा ।
मजचि मी बंधु ऐसा ।
आवडे तें परियेसा ।
अर्जुनदेवा ॥ १३६ ॥
गुण ते किती किंधर्म ।
कायि ययां रूपनाम ।
कें जालें हें वर्म ।
अवधारीं पां ॥ १३७ ॥
सत्त्वं रजस्तम इति
गुणाः प्रकृतिसंभवाः ।
निबध्नन्ति महाबाहो
देहे देहिनमव्ययम् ॥ ५ ॥
तरी सत्त्वरजतम ।
तिघांसि हें नाम ।
आणि प्रकृति जन्म- ।
भूमिका ययां ॥ १३८ ॥
येथ सत्त्व तें उत्तम ।
रज तें मध्यम ।
तिहींमाजीं तम ।
सावियाधारें ॥ १३९ ॥
हें एकेचि वृत्तीच्या ठायीं ।
त्रिगुणत्व आवडे पाहीं ।
वयसात्रय देहीं ।
येकीं जेवीं ॥ १४० ॥
कां मीनलेनि कीडें ।
जंव जंव तूक वाढे ।
तंव तंव सोनें हीन पडे ।
पांचिका कसीं ॥ १४१ ॥
पैं सावधपण जैसें ।
वाहविलें आळसें ।
सुषुप्ति बैसे ।
घणावोनि ॥ १४२ ॥
तैसी अज्ञानांगीकारें ।
निगाली वृत्ति विखुरे ।
ते सत्त्वरजद्वारें ।
तमही होय ॥ १४३ ॥
अर्जुना गा जाण ।
ययां नाम गुण ।
आतां दाखऊं खूण ।
बांधिती ते ॥ १४४ ॥
तरी क्षेत्रज्ञदशे ।
आत्मा मोटका पैसे ।
हें देह मी ऐसें ।
मुहूर्त करी ॥ १४५ ॥
आजन्ममरणांतीं ।
देहधर्मीं समस्तीं ।
ममत्वाची सूती ।
घे ना जंव ॥ १४६ ॥
जैसी मीनाच्या तोंडीं ।
पडेना जंव उंडी ।
तंव गळ आसुडी ।
जळपारधी ॥ १४७ ॥
तत्र सत्त्वं निर्मलत्वात्
प्रकाशकमनामयम् ।
सुखसंगेन बध्नाति
ज्ञानसंगेन चानघ ॥ ६ ॥
तेवीं सत्त्वें लुब्धकें ।
सुखज्ञानाचीं पाशकें ।
वोढिजती मग खुडके ।
मृगु जैसा ॥ १४८ ॥
मग ज्ञानें चडफडी ।
जाणिवेचे खुरखोडी ।
स्वयं सुख हें धाडी ।
हातींचें गा ॥ १४९ ॥
तेव्हां विद्यामानें तोखे ।
लाभमात्रें हरिखे ।
मी संतुष्ट हेंही देखे ।
श्लाघों लागे ॥ १५० ॥
म्हणे भाग्य ना माझें ? ।
आजि सुखियें नाहीं दुजें ।
विकाराष्टकें फुंजे ।
सात्त्विकाचेनि ॥ १५१ ॥
आणि येणेंही न सरे ।
लांकण लागे दुसरें ।
जें विद्वत्तेचें भरे ।
भूत आंगीं ॥ १५२ ॥
आपणचि ज्ञानस्वरूप आहे ।
तें गेलें हें दुःख न वाहे ।
कीं विषयज्ञानें होये ।
गगनायेवढा ॥ १५३ ॥
रावो जैसा स्वप्नीं ।
रंकपणें रिघे धानीं ।
तो दों दाणां मानी ।
इंद्रु ना मी ॥ १५४ ॥
तैसें गा देहातीता ।
जालेया देहवंता ।
हों लागे पंडुसुता ।
बाह्यज्ञानें ॥ १५५ ॥
प्रवृत्तिशास्त्र बुझे ।
यज्ञविद्या उमजे ।
किंबहुना सुझे ।
स्वर्गवरी ॥ १५६ ॥
आणि म्हणे आजि आन ।
मीवांचूनि नाहीं सज्ञान ।
चातुर्यचंद्रा गगन ।
चित्त माझें ॥ १५७ ॥
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं ।
जीवासि लावूनि कानी ।
बैलाची करी वानी ।
पांगुळाचिया ॥ १५८ ॥
आतां हाचि शरीरीं ।
रजें जियापरी ।
बांधिजे तें अवधारीं ।
सांगिजैल ॥ १५९ ॥
रजो रागात्मकं विद्धि
तृष्णासंगसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय
कर्मसंगेन देहिनम् ॥ ७ ॥
हें रज याचि कारणें ।
जीवातें रंजऊं जाणे ।
हें अभिलाखाचें तरुणें ।
सदाचि गा ॥ १६० ॥
हें जीवीं मोटकें रिगे ।
आणि कामाच्या मदीं लागे ।
मग वारया वळघे ।
तृष्णेचिया ॥ १६१ ॥
घृतें आंबुखूनि आगियाळें ।
वज्राग्नीचें सादुकलें ।
आतां बहु थेंकुलें ।
आहे तेथ ? ॥ १६२ ॥
तैसी खवळें चाड ।
होय दुःखासकट गोड ।
इंद्रश्रीहि सांकड ।
गमों लागे ॥ १६३ ॥
तैसी तृष्णा वाढिनलिया ।
मेरुही हाता आलिया ।
तर्ही म्हणे एखादिया ।
दारुणा वळघो ॥ १६४ ॥
जीविताचि कुरोंडी ।
वोवाळूं लागे कवडी ।
मानी तृणाचिये जोडी ।
कृतकृत्यता ॥ १६५ ॥
आजि असतें वेंचिजेल ।
परी पाहे काय कीजेल ।
ऐसा पांगीं वडील ।
व्यवसाय मांडी ॥ १६६ ॥
म्हणे स्वर्गा हन जावें ।
तरी काय तेथें खावें ।
इयालागीं धांवें ।
याग करूं ॥ १६७ ॥
व्रतापाठीं व्रतें ।
आचरें इष्टापूर्तें ।
काम्यावांचूनि हातें ।
शिवणें नाहीं ॥ १६८ ॥
पैं ग्रीष्मांतींचा वारा ।
विसांवो नेणें वीरा ।
तैसा न म्हणे व्यापारा ।
रात्रदिवस ॥ १६९ ॥
काय चंचळु मासा ? ।
कामिनीकटाक्षु जैसा ।
लवलाहो तैसा ।
विजूही नाहीं ॥ १७० ॥
तेतुलेनि गा वेगें ।
स्वर्गसंसारपांगें ।
आगीमाजीं रिगे ।
क्रियांचिये ॥ १७१ ॥
ऐसा देहीं देहावेगळा ।
ले तृष्णेचिया सांखळा ।
खटाटोपु वाहे गळां ।
व्यापाराचा ॥ १७२ ॥
हें रजोगुणाचें दारुण ।
देहीं देहियासी बंधन ।
परिस आतां विंदाण ।
तमाचें तें ॥ १७३ ॥
तमस्त्वज्ञानजं विद्धि
मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८ ॥
व्यवहाराचेहि डोळे ।
मंद जेणें पडळें ।
मोहरात्रीचें काळें ।
मेहुडें जें ॥ १७४ ॥
अज्ञानाचें जियालें ।
जया एका लागलें ।
जेणें विश्व भुललें ।
नाचत असे ॥ १७५ ॥
अविवेकमहामंत्र ।
जें मौढ्यमद्याचें पात्र ।
हें असो मोहनास्त्र ।
जीवांसि जें ॥ १७६ ॥
पार्था तें गा तम ।
रचूनि ऐसें वर्म ।
चौखुरी देहात्म- ।
मानियातें ॥ १७७ ॥
हें एकचि कीर शरीरीं ।
माजों लागे चराचरीं ।
आणि तेथ दुसरी ।
गोठी नाहीं ॥ १७८ ॥
सर्वेंद्रिया जाड्य ।
मनामाजीं मौढ्य ।
माल्हाती जे दार्ढ्य ।
आलस्याचें ॥ १७९ ॥
आंगें आंग मोडामोडी ।
कार्यजाती अनावडी ।
नुसती परवडी ।
जांभयांची ॥ १८० ॥
उघडियाची दिठी ।
देखणें नाहीं किरीटी ।
नाळवितांचि उठी ।
वो म्हणौनि ॥ १८१ ॥
पडलिये धोंडी ।
नेणे कानी मुरडी ।
तयाचि परी मुरकुंडी ।
उकलूं नेणें ॥ १८२ ॥
पृथ्वी पाताळीं जांवो ।
कां आकाशही वरी येवो ।
परी उठणें हा भावो ।
उपजों नेणें ॥ १८३ ॥
उचितानुचित आघवें ।
झांसुरता नाठवे जीवें ।
जेथींचा तेथ लोळावें ।
ऐसी मेधा ॥ १८४ ॥
उभऊनि करतळें ।
पडिघाये कपोळें ।
पायाचें शिरियाळें ।
मांडूं लागे ॥ १८५ ॥
आणि निद्रेविषयीं चांगु ।
जीवीं आथि लागु ।
झोंपीं जातां स्वर्गु ।
वावो म्हणे ॥ १८६ ॥
ब्रह्मायु होईजे ।
मा निजलेयाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें ।
व्यसन नाहीं ॥ १८७ ॥
कां वाटें जातां वोघें ।
कल्हातांही डोळा लागे ।
अमृतही परी नेघे ।
जरी नीद आली ॥ १८८ ॥
तेवींचि आक्रोशबळें ।
व्यापारे कोणे एके वेळे ।
निगालें तरी आंधळें ।
रोषें जैसें ॥ १८९ ॥
केधवां कैसे राहाटावें ।
कोणेसीं काय बोलावें ।
हें ठाकतें कीं नागवें ।
हेंही नेणें ॥ १९० ॥
वणवा मियां आघवा ।
पांखें पुसोनि घेयावा ।
पतंगु पां हांवा ।
घाली जेवीं ॥ १९१ ॥
तैसा वळघे साहसा ।
अकरणींच धिंवसा ।
किंबहुना ऐसा ।
प्रमादु रुचे ॥ १९२ ॥
एवं निद्रालस्यप्रमादीं ।
तम इया त्रिबंधीं ।
बांधे निरुपाधी ।
चोखटातें ॥ १९३ ॥
जैसा वन्ही काष्ठीं भरे ।
तैं दिसे काष्ठाकारें ।
व्योम घटें आवरे ।
तें घटाकाश ॥ १९४ ॥
नाना सरोवर भरलें ।
तैं चंद्रत्व तेथें बिंबलें ।
तैसें गुणाभासीं बांधलें ।
आत्मत्व गमे ॥ १९५ ॥
सत्त्वं सुखे संजयति
रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः
प्रमादे संजयत्युत ॥ ९ ॥
रजस्तमश्चाभिभूय
सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्चैव
तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १० ॥
पैं हरूनि कफवात ।
जैं देही आटोपे पित्त ।
तैं करी संतप्त ।
देह जेवीं ॥ १९६ ॥
कां वरिष आतप जैसें ।
जिणौनि शीतचि दिसे ।
तेव्हां होय हिंव ऐसें ।
आकाश हें ॥ १९७ ॥
नाना स्वप्न जागृती ।
लोपूनि ये सुषुप्ती ।
तैं क्षणु एक चित्तवृत्ती ।
तेचि होय ॥ १९८ ॥
तैसीं रजतमें हारवी ।
जैं सत्त्व माजु मिरवी ।
तैं जीवाकरवीं म्हणवी ।
सुखिया ना मी ? ॥ १९९ ॥
तैसेंचि सत्त्व रज ।
लोपूनि तमाचें भोज ।
वळघें तैं सहज ।
प्रमादीं होय ॥ २०० ॥
तयाचि गा परिपाठीं ।
सत्त्व तमातें पोटीं ।
घालूनि जेव्हां उठी ।
रजोगुण ॥ २०१ ॥
तेव्हां कर्मावांचूनि कांहीं ।
आन गोमटें नाहीं ।
ऐसें मानी देहीं ।
देहराजु ॥ २०२ ॥
त्रिगुण वृद्धि निरूपण ।
तीं श्लोकीं सांगितलें जाण ।
आतां सत्त्वादि वृद्धिलक्षण ।
सादर परियेसीं ॥ २०३ ॥
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्
प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा
विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११ ॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः
कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते
विवृद्धे भरतर्षभ ॥ १२ ॥
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च
प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते
विवृद्धे कुरुनन्दन ॥ १३ ॥
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु
प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान्
प्रतिपद्यते ॥ १४ ॥
रजसि प्रलयं गत्वा
कर्मसंगिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि
मूढयोनिषु जायते ॥ १५ ॥
पैं रजतमविजयें ।
सत्त्व गा देहीं इयें ।
वाढतां चिन्हें तियें ।
ऐसीं होती ॥ २०४ ॥
जे प्रज्ञा आंतुलीकडे ।
न समाती बाहेरी वोसंडें ।
वसंतीं पद्मखंडें ।
द्रुती जैसी ॥ २०५ ॥
सर्वेंद्रियांच्या आंगणीं ।
विवेक करी राबणी ।
साचचि करचरणीं ।
होती डोळे ॥ २०६ ॥
राजहंसापुढें ।
चांचूचें आगरडें ।
तोडी जेवीं झगडे ।
क्षीरनीराचे ॥ २०७ ॥
तेवीं दोषादोषविवेकीं ।
इंद्रियेंचि होती पारखीं ।
नियमु बा रे पायिकी ।
वोळगे तैं ॥ २०८ ॥
नाइकणें तें कानचि वाळी ।
न पहाणें तें दिठीचि गाळी ।
अवाच्य तें टाळी ।
जीभचि गा ॥ २०९ ॥
वाती पुढां जैसें ।
पळों लागे काळवसें ।
निषिद्ध इंद्रियां तैसें ।
समोर नोहे ॥ २१० ॥
धाराधरकाळें ।
महानदी उचंबळे ।
तैसी बुद्धि पघळे ।
शास्त्रजातीं ॥ २११ ॥
अगा पुनवेच्या दिवशीं ।
चंद्रप्रभा धांवें आकाशीं ।
ज्ञानीं वृत्ति तैसी ।
फांके सैंघ ॥ २१२ ॥
वासना एकवटे ।
प्रवृत्ति वोहटे ।
मानस विटे ।
विषयांवरी ॥ २१३ ॥
एवं सत्त्व वाढे ।
तैं हें चिन्ह फुडें ।
आणि निधनही घडे ।
तेव्हांचि जरी ॥ २१४ ॥
कां पाहालेनि सुयाणें ।
जालया परगुणें ।
पढियंतें पाहुणें ।
स्वर्गौनियां ॥ २१५ ॥
तरी जैसीचि घरींची संपत्ती ।
आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती ।
मा परत्रा आणि कीर्ती ।
कां नोहावें ? ॥ २१६ ॥
मग गोमटेया तया ।
जावळी असे धनंजया ।
तेवीं सत्त्वीं जाणे देहा ।
कें आथि गा ? ॥ २१७ ॥
जे स्वगुणीं उद्भट ।
घेऊनि सत्त्व चोखट ।
निगे सांडूनि कोपट ।
भोगक्षम हें ॥ २१८ ॥
अवचटें ऐसा जो जाये ।
तो सत्त्वाचाचि नवा होये ।
किंबहुना जन्म लाहे ।
ज्ञानियांमाजीं ॥ २१९ ॥
सांग पां धनुर्धरा ।
रावो रायपणें डोंगरा ।
गेलिया अपुरा ।
होय काई ? ॥ २२० ॥
नातरी येथिंचा दिवा ।
नेलिया सेजिया गांवा ।
तो तेथें तरी पांडवा ।
दीपचि कीं ॥ २२१ ॥
तैसी ते सत्त्वशुद्धी ।
आगळी ज्ञानेंसी वृद्धी ।
तरंगावों लागें बुद्धी ।
विवेकावरी ॥ २२२ ॥
पैं महदादि परिपाठीं ।
विचारूनि शेवटीं ।
विचारासकट पोटीं ।
जिरोनि जाय ॥ २२३ ॥
छत्तिसां सदतिसावें ।
चोविसां पंचविसावें ।
तिन्ही नुरोनि स्वभावें ।
चतुर्थ जें ॥ २२४ ॥
ऐसें सर्व जें सर्वोत्तम ।
जालें असे जया सुगम ।
तयासवें निरुपम ।
लाहे देह ॥ २२५ ॥
इयाचि परी देख ।
तमसत्त्व अधोमुख ।
बैसोनि जैं आगळीक ।
धरी रज ॥ २२६ ॥
आपलिया कार्याचा ।
धुमाड गांवीं देहाचा ।
माजवी तैं चिन्हांचा ।
उदयो ऐसा ॥ २२७ ॥
पांजरली वाहुटळी ।
करी वेगळ वेंटाळी ।
तैसी विषयीं सरळी ।
इंद्रियां होय ॥ २२८ ॥
परदारादि पडे ।
परी विरुद्ध ऐसें नावडे ।
मग शेळियेचेनि तोंडें ।
सैंघ चारी ॥ २२९ ॥
हा ठायवरी लोभु ।
करी स्वैरत्वाचा राबु ।
वेंटाळितां अलाभु ।
तें तें उरे ॥ २३० ॥
आणि आड पडलिया ।
उद्यमजाती भलतिया ।
प्रवृत्ती धनंजया ।
हातु न काढी ॥ २३१ ॥
तेवींचि एखादा प्रासादु ।
कां करावा अश्वमेधु ।
ऐसा अचाट छंदु ।
घेऊनि उठी ॥ २३२ ॥
नगरेंचि रचावीं ।
जळाशयें निर्मावीं ।
महावनें लावावीं ।
नानाविधें ॥ २३३ ॥
ऐसैसां अफाटीं कर्मीं ।
समारंभु उपक्रमीं ।
आणि दृष्टादृष्ट कामीं ।
पुरे न म्हणे ॥ २३४ ॥
सागरुही सांडीं पडे ।
आगी न लाहे तीन कवडे ।
ऐसें अभिलषीं जोडे ।
दुर्भरत्व ॥ २३५ ॥
स्पृहा मना पुढां पुढां ।
आशेचा घे दवडा ।
विश्व घापे चाडा ।
पायांतळीं ॥ २३६ ॥
इत्यादि वाढतां रजीं ।
इयें चिन्हें होतीं साजीं ।
आणि ऐशा समाजीं ।
वेंचे जरी देह ॥ २३७ ॥
तरी आघवाचि इहीं ।
परिवारला आनी देहीं ।
रिगे परी योनिही ।
मानुषीचि ॥ २३८ ॥
सुरवाडेंसिं भिकारी ।
वसो पां राजमंदिरीं ।
तरी काय अवधारीं ।
रावो होईल ? ॥ २३९ ॥
बैल तेथें करबाडें ।
हें न चुके गा फुडें ।
नेईजो कां वर्हाडें ।
समर्थाचेनी ॥ २४० ॥
म्हणौनि व्यापारा हातीं ।
उसंतु दिहा ना राती ।
तैसयाचिये पांती ।
जुंपिजे तो ॥ २४१ ॥
कर्मजडाच्या ठायीं ।
किंबहुना होय देहीं ।
जो रजोवृत्तीच्या डोहीं ।
बुडोनि निमे ॥ २४२ ॥
मग तैसाचि पुढती ।
रजसत्त्ववृत्ती ।
गिळूनि ये उन्नती ।
तमोगुण ॥ २४३ ॥
तैंचि जियें लिंगें ।
देहींचीं सबाह्य सांगें ।
तियें परिस चांगें ।
श्रोत्रबळें ॥ २४४ ॥
तरी होय ऐसें मन ।
जैसें रविचंद्रहीन ।
रात्रींचें कां गगन ।
अंवसेचिये ॥ २४५ ॥
तैसें अंतर असोस ।
होय स्फूर्तिहीन उद्वस ।
विचाराची भाष ।
हारपे तैं ॥ २४६ ॥
बुद्धि मेचवेना धोंडीं ।
हा ठायवरी मवाळें सांडी ।
आठवो देशधडी ।
जाला दिसे ॥ २४७ ॥
अविवेकाचेनि माजें ।
सबाह्य शरीर गाजे ।
एकलेनि घेपे दीजे ।
मौढ्य तेथ ॥ २४८ ॥
आचारभंगाचीं हाडें ।
रुपतीं इंद्रियांपुढें ।
मरे जरी तेणेंकडे ।
क्रिया जाय ॥ २४९ ॥
पैं आणिकही एक दिसे ।
जे दुष्कृतीं चित्त उल्हासे ।
आंधारी देखणें जैसें ।
डुडुळाचें ॥ २५० ॥
तैसें निषिद्धाचेनि नांवें ।
भलतेंही भरे हावे ।
तियेविषयीं धांवे ।
घेती करणें ॥ २५१ ॥
मदिरा न घेतां डुले ।
सन्निपातेंवीण बरळे ।
निष्प्रेमेंचि भुले ।
पिसें जैसें ॥ २५२ ॥
चित्त तरी गेलें आहे ।
परी उन्मनी ते नोहे ।
ऐसें माल्हातिजे मोहें ।
माजिरेनि ॥ २५३ ॥
किंबहुना ऐसैसीं ।
इयें चिन्हें तम पोषीं ।
जैं वाढे आयितीसी ।
आपुलिया ॥ २५४ ॥
आणि हेंचि होय प्रसंगें ।
मरणाचें जरी पडे खागें ।
तरी तेतुलेनि निगे ।
तमेंसीं तो ॥ २५५ ॥
राई राईपण बीजीं ।
सांठवूनियां अंग त्यजी ।
मग विरूढे तैं दुजी ।
गोठी आहे ? ॥ २५६ ॥
पैं होऊनि दीपकलिका ।
येरु आगी विझो कां ।
कां जेथ लागे तेथ असका ।
तोचि आहे ॥ २५७ ॥
म्हणौनि तमाचिये लोथें ।
बांधोनियां संकल्पातें ।
देह जाय तैं मागौतें ।
तमाचेचि होय ॥ २५८ ॥
आतां काय येणें बहुवे ।
जो तमोवृद्धि मृत्यु लाहे ।
तो पशु कां पक्षी होये ।
झाड कां कृमी ॥ २५९ ॥
कर्मणः सुकृतस्याहुः
सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं
तमसः फलम् ॥ १६ ॥
येणेंचि पैं कारणें ।
जें निपजे सत्त्वगुणें ।
तें सुकृत ऐसें म्हणे ।
श्रौत समो ॥ २६० ॥
म्हणौनि तया निर्मळा ।
सुखज्ञानी सरळा ।
अपूर्व ये फळा ।
सात्त्विक तें ॥ २६१ ॥
मग राजसा जिया क्रिया ।
तया इंद्रावणी फळलिया ।
जें सुखें चितारूनियां ।
फळती दुःखें ॥ २६२ ॥
कां निंबोळियेचें पिक ।
वरि गोड आंत विख ।
तैसें तें राजस देख ।
क्रियाफळ ॥ २६३ ॥
तामस कर्म जितुकें ।
अज्ञानफळेंचि पिके ।
विषांकुर विखें ।
जियापरी ॥ २६४ ॥
सत्त्वात्संजायते ज्ञानं
रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो
भवतोऽज्ञानमेव च ॥ १७ ॥
म्हणौनि बा रे अर्जुना ।
येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना ।
जैसा कां दिनमाना ।
सूर्य हा पैं ॥ २६५ ॥
आणि तैसेंचि हें जाण ।
लोभासि रज कारण ।
आपुलें विस्मरण ।
अद्वैता जेवीं ॥ २६६ ॥
मोह अज्ञान प्रमादा ।
ययां मैळेया दोषवृंदा ।
पुढती पुढती प्रबुद्धा ।
तमचि मूळ ॥ २६७ ॥
ऐसें विचाराच्या डोळां ।
तिन्ही गुण हे वेगळवेगळां ।
दाविले जैसा आंवळा ।
तळहातींचा ॥ २६८ ॥
तंव रजतमें दोन्हीं ।
देखिलीं प्रौढ पतनीं ।
सत्त्वावांचूनि नाणीं ।
ज्ञानाकडे ॥ २६९ ॥
म्हणौनि सात्त्विक वृत्ती ।
एक जाले गा जन्मव्रती ।
सर्वत्यागें चतुर्थी ।
भक्ति जैसी ॥ २७० ॥
ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था
मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो
गच्छन्ति तामसाः ॥ १८ ॥
तैसें सत्त्वाचेनि नटनाचें ।
असणें जाणें जयांचें ।
ते तनुत्यागीं स्वर्गींचे ।
राय होती ॥ २७१ ॥
इयाचि परी रजें ।
जिहीं कां जीजे मरिजे ।
तिहीं मनुष्य होईजे ।
मृत्युलोकीं ॥ २७२ ॥
तेथ सुखदुःखाचें खिचटें ।
जेविजें एकेचि ताटें ।
जेथ इये मरणवाटे ।
पडिलें नुठी ॥ २७३ ॥
आणि तयाचि स्थिति तमीं ।
जे वाढोनि निमती भोगक्षमीं ।
ते घेती नरकभूमी ।
मूळपत्र ॥ २७४ ॥
एवं वस्तूचिया सत्ता ।
त्रिगुणासी पंडुसुता ।
दाविली सकारणता ।
आघवीचि ॥ २७५ ॥
पैं वस्तु वस्तुत्वें असिकें ।
तें आपणपें गुणासारिखें ।
देखोनि कार्यविशेखें ।
अनुकरे गा ॥ २७६ ॥
जैसें कां स्वप्नींचेनि राजें ।
जैं परचक्र देखिजे ।
तैं हारी जैत होईजे ।
आपणपांचि ॥ २७७ ॥
तैसे मध्योर्ध्व अध ।
हे जे गुणवृत्तिभेद ।
ते दृष्टीवांचूनि शुद्ध ।
वस्तुचि असे ॥ २७८ ॥
नान्यं गुणेभ्यः कर्तारं
यदा द्रष्टाऽनुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं
सोऽधिगच्छति ॥ १९ ॥
परी हे वाहणी असो ।
तरी तुज आन न दिसो ।
परिसें तें सांगतसों ।
मागील गोठी ॥ २७९ ॥
तरी ऐसें जाणिजे ।
सामर्थ्यें तिन्ही सहजें ।
होती देहव्याजें ।
गुणचि हे ॥ २८० ॥
इंधनाचेनि आकारें ।
अग्नि जैसा अवतरे ।
कां आंगवे तरुवरें ।
भूमिरसु ॥ २८१ ॥
नाना दहिंयाचेनि मिसें ।
परिणमे दूधचि जैसें ।
कां मूर्त होय ऊंसें ।
गोडी जेवीं ॥ २८२ ॥
तैसें हे स्वांतःकरण ।
देहचि होती त्रिगुण ।
म्हणौनि बंधासि कारण ।
घडे कीर ॥ २८३ ॥
परी चोज हें धनुर्धरा ।
जे एवढा हा गुंफिरा ।
मोक्षाचा संसारा ।
उणा नोहे ॥ २८४ ॥
त्रिगुण आपुलालेनि धर्में ।
देहींचे माघुत साउमें ।
चाळितांही न खोमें ।
गुणातीतता ॥ २८५ ॥
ऐसी मुक्ति असे सहज ।
ते आतां परिसऊं तुज ।
जे तूं ज्ञानांबुज- ।
द्विरेफु कीं ॥ २८६ ॥
आणि गुणीं गुणाजोगें ।
चैतन्य नोहे मागें ।
बोलिलों तें खागें ।
तेवींचि हें ॥ २८७ ॥
तरी पार्था जैं ऐसें ।
बोधलेनि जीवें दिसे ।
स्वप्न कां जैसें ।
चेइलेनी ॥ २८८ ॥
नातरी आपण जळीं ।
बिंबलों तीरोनी न्याहळी ।
चळण होतां कल्लोळीं ।
अनेकधा ॥ २८९ ॥
कां नटलेनि लाघवें ।
नटु जैसा न झकवे ।
तैसें गुणजात देखावें ।
न होनियां ॥ २९० ॥
पैं ऋतुत्रय आकाशें ।
धरूनियांही जैसें ।
नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ॥ २९१ ॥
तैसें गुणीं गुणापरौतें ।
जें आपणपें असे आयितें ।
तिये अहं बैसे अहंतें ।
मूळकेचिये ॥ २९२ ॥
तैं तेथूनि मग पाहतां ।
म्हणे साक्षी मी अकर्ता ।
हे गुणचि क्रियाजातां ।
नियोजित ॥ २९३ ॥
सत्त्वरजतमांचा ।
भेदीं पसरु कर्माचा ।
होत असे तो गुणांचा ।
विकारु हा ॥ २९४ ॥
ययामाजीं मी ऐसा ।
वनीं कां वसंतु जैसा ।
वनलक्ष्मीविलासा ।
हेतुभूत ॥ २९५ ॥
कां तारांगणीं लोपावें ।
सूर्यकांतीं उद्दीपावें ।
कमळीं विकासावें ।
जावें तमें ॥ २९६ ॥
ये कोणाचीं काजें कहीं ।
सवितिया जैसी नाहीं ।
तैसा अकर्ता मी देहीं ।
सत्तारूप ॥ २९७ ॥
मी दाऊनि गुण देखे ।
गुणता हे मियां पोखे ।
ययाचेनि निःशेखें ।
उरे तें मी ॥ २९८ ॥
ऐसेनि विवेकें जया ।
उदो होय धनंजया ।
ये गुणातीतत्व तया ।
अर्थपंथें ॥ २९९ ॥
गुणानेतानतीत्य
त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २० ॥
आतां निर्गुण असे आणिक ।
तें तो जाणें अचुक ।
जे ज्ञानें केलें टीक ।
तयाचिवरी ॥ ३०० ॥
किंबहुना पंडुसुता ।
ऐसी तो माझी सत्ता ।
पावे जैसी सरिता ।
सिंधुत्व गा ॥ ३०१ ॥
नळिकेवरूनि उठिला ।
जैसा शुक शाखे बैसला ।
तैसा मूळ अहंतें वेढिला ।
तो मी म्हणौनि ॥ ३०२ ॥
अगा अज्ञानाचिया निदा ।
जो घोरत होता बदबदा ।
तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा ।
चेइला कीं ॥ ३०३ ॥
पैं बुद्धिभेदाचा आरिसा ।
तया हातोनि पडिला वीरेशा ।
म्हणौनि प्रतिमुखाभासा ।
मुकला तो ॥ ३०४ ॥
देहाभिमानाचा वारा ।
आतां वाजो ठेला वीरा ।
तैं ऐक्य वीचिसागरां ।
जीवेशां हें ॥ ३०५ ॥
म्हणौनि मद्भावेंसी ।
प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी ।
वर्षांतीं आकाशीं ।
घनजात जेवीं ॥ ३०६ ॥
तेवीं मी होऊनि निरुता ।
मग देहींचि ये असतां ।
नागवे देहसंभूतां ।
गुणांसि तो ॥ ३०७ ॥
जैसा भिंगाचेनि घरें ।
दीपप्रकाशु नावरे ।
कां न विझेचि सागरें ।
वडवानळु ॥ ३०८ ॥
तैसा आला गेला गुणांचा ।
बोधु न मैळे तयाचा ।
तो देहीं जैसा व्योमींचा ।
चंद्र जळीं ॥ ३०९ ॥
तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी ।
देहीं नाचविती बागडीं ।
तो पाहोंही न धाडी ।
अहंतेतें ॥ ३१० ॥
हा ठायवरी ।
नेहटोनि ठेला अंतरीं ।
आतां काय वर्ते शरीरीं ।
हेंहीं नेणे ॥ ३११ ॥
सांडुनि आंगींची खोळी ।
सर्प रिगालिया पाताळीं ।
ते त्वचा कोण सांभाळी ।
तैसें जालें ॥ ३१२ ॥
कां सौरभ्य जीर्णु जैसा ।
आमोदु मिळोनि जाय आकाशा ।
माघारा कमळकोशा ।
नयेचि तो ॥ ३१३ ॥
पैं स्वरूपसमरसें ।
ऐक्य गा जालें तैसें ।
तेथ किं धर्म हें कैसें ।
नेणें देह ॥ ३१४ ॥
म्हणौनि जन्मजरामरण ।
इत्यादि जे साही गुण ।
ते देहींचि ठेले कारण ।
नाहीं तया ॥ ३१५ ॥
घटाचिया खापरिया ।
घटभंगीं फेडिलिया ।
महदाकाश अपैसया ।
जालेंचि असे ॥ ३१६ ॥
तैसी देहबुद्धी जाये ।
जैं आपणपां आठौ होय ।
तैं आन कांहीं आहे ।
तेंवांचुनी ? ॥ ३१७ ॥
येणें थोर बोधलेपणें ।
तयासि गा देहीं असणें ।
म्हणूनि तो मी म्हणें ।
गुणातीत ॥ ३१८ ॥
यया देवाचिया बोला ।
पार्थु अति सुखावला ।
मेघें संबोखिला ।
मोरु जैसा ॥ ३१९ ॥
अर्जुन उवाच ।
कैर्लिंगैस्त्रीन्गुणात्नेर
तानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथंचैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ २१ ॥
तेणें तोषें वीर पुसे ।
जी कोण्ही चिन्हीं तो दिसे ।
जयामाजीं वसे ।
ऐसा बोधु ॥ ३२० ॥
तो निर्गुण काय आचरे ।
कैसेनि गुण निस्तरे ।
हें सांगिजो माहेरें ।
कृपेचेनि ॥ ३२१ ॥
यया अर्जुनाचिया प्रश्ना ।
तो षड्गुणांचा राणा ।
परिहारु आकर्णा ।
बोलतु असे ॥ ३२२ ॥
म्हणे पार्था तुझी नवाई ।
हें येतुलेंचि पुससी काई ।
तें नामचि तया पाहीं ।
सत्य लटिकें ॥ ३२३ ॥
गुणातीत जया नांवें ।
तो गुणाधीन तरी नव्हे ।
ना होय तरी नांगवे ।
गुणां यया ॥ ३२४ ॥
परी अधीन कां नांगवें ।
हेंचि कैसेनि जाणावें ।
गुणांचिये रवरवे- ।
माजीं असतां ॥ ३२५ ॥
हा संदेह जरी वाहसी ।
तरी सुखें पुसों लाहसी ।
परिस आतां तयासी ।
रूप करूं ॥ ३२६ ॥
श्रीभगवानुवाच ।
प्रकाशं च प्रवृत्तिं च
मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न
निवृत्तानि कांक्षति ॥ २२ ॥
तरी रजाचेनि माजें ।
देहीं कर्माचें आणोजें ।
प्रवृत्ति जैं घेईजे ।
वेंटाळुनि ॥ ३२७ ॥
तैं मीचि कां कर्मठ ।
ऐसा न ये श्रीमाठ ।
दरिद्रलिये बुद्धी वीट ।
तोही नाहीं ॥ ३२८ ॥
अथवा सत्त्वेंचि अधिकें ।
जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांके ।
तैं सुविद्यता तोखें ।
उभजेही ना ॥ ३२९ ॥
कां वाढिन्नलेनि तमें ।
न गिळिजेचि मोहभ्रमें ।
तैं अज्ञानत्वें न श्रमे ।
घेणेंही नाहीं ॥ ३३० ॥
पैं मोहाच्या अवसरीं ।
ज्ञानाची चाड न धरी ।
ज्ञानें कर्में नादरी ।
होतां न दुःखी ॥ ३३१ ॥
सायंप्रातर्मध्यान्हा ।
या तिन्ही काळांची गणना ।
नाहीं जेवीं तपना ।
तैसा असे ॥ ३३२ ॥
तया वेगळाचि काय प्रकाशें ।
ज्ञानित्व यावें असें ।
कायि जळार्णव पाउसें ।
साजा होय ? ॥ ३३३ ॥
ना प्रवर्तलेनि कर्में ।
कर्मठत्व तयां कां गमे ।
सांगें हिमवंतु हिमें ।
कांपे कायी ? ॥ ३३४ ॥
नातरी मोह आलिया ।
काई पां ज्ञाना मुकिजैल तया ।
हो मा आगीतें उन्हाळेया ।
जाळवत असे ? ॥ ३३५ ॥
उदासीनवदासीनो
गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव
यो~वतिष्ठति नेङ्गते ॥ २३ ॥
तैसे गुणागुणकार्य हें ।
आघवेंचि आपण आहे ।
म्हणौनि एकेका नोहे ।
तडातोडी ॥ ३३६ ॥
येवढे गा प्रतीती ।
तो देहा आलासे वस्ती ।
वाटे जातां गुंती- ।
माजीं जैसा ॥ ३३७ ॥
तो जिणता ना हरवी ।
तैसा गुण नव्हे ना करवी ।
जैसी कां श्रोणवी ।
संग्रामींची ॥ ३३८ ॥
कां शरीराआंतील प्राणु ।
घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु ।
नाना चोहटांचा स्थाणु ।
उदासु जैसा ॥ ३३९ ॥
आणि गुणाचा यावाजावा ।
ढळे चळे ना पांडवा ।
मृगजळाचा हेलावा ।
मेरु जैसा ॥ ३४० ॥
हें बहुत कायि बोलिजे ।
व्योम वारेनि न वचिजे ।
कां सूर्य ना गिळिजे ।
अंधकारें ? ॥ ३४१ ॥
स्वप्न कां गा जियापरी ।
जागतयातें न सिंतरी ।
गुणीं तैसा अवधारीं ।
न बंधिजे तो ॥ ३४२ ॥
गुणांसि कीर नातुडे ।
परी दुरूनि जैं पाहे कोडें ।
तैं गुणदोष सायिखडें ।
सभ्यु जैसा ॥ ३४३ ॥
सत्कर्में सात्त्विकीं ।
रज तें रजोविषयकीं ।
तम मोहादिकीं ।
वर्तत असे ॥ ३४४ ॥
परिस तयाचिया गा सत्ता ।
होती गुणक्रिया समस्ता ।
हें फुडें जाणे सविता ।
लौकिका जेवीं ॥ ३४५ ॥
समुद्रचि भरती ।
सोमकांतचि द्रवती ।
कुमुदें विकासती ।
चंद्रु तो उगा ॥ ३४६ ॥
कां वाराचि वाजे विझे ।
गगनें निश्चळ असिजे ।
तैसा गुणाचिये गजबजे ।
डोलेना जो ॥ ३४७ ॥
अर्जुना येणें लक्षणें ।
तो गुणातीतु जाणणें ।
परिस आतां आचरणें ।
तयाचीं जीं ॥ ३४८ ॥
समदुःखसुखः स्वस्थः
समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियोधीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ २४ ॥
तरी वस्त्रासि पाठीं पोटीं ।
नाहीं सुतावांचूनि किरीटी ।
ऐसें सुये दिठी ।
चराचर मद्रूपें ॥ ३४९ ॥
म्हणौनि सुखदुःखासरिसें ।
कांटाळें आचरे ऐसें ।
रिपुभक्तां जैसें ।
हरीचें देणें ॥ ३५० ॥
एर्हवीं तरी सहजें ।
सुखदुःख तैंचि सेविजे ।
देहजळीं होईजे ।
मासोळी जैं ॥ ३५१ ॥
आतां तें तंव तेणें सांडिलें ।
आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांतीं निवडिलें ।
बीज जैसें ॥ ३५२ ॥
कां वोघ सांडूनि गांग ।
रिघोनि समुद्राचें आंग ।
निस्तरली लगबग ।
खळाळाची ॥ ३५३ ॥
तेवीं आपणपांचि जया ।
वस्ती जाली गा धनंजया ।
तया देहीं अपैसया ।
सुख तैसें दुःख ॥ ३५४ ॥
रात्रि तैसें पाहलें ।
हें धारणा जेवीं एक जालें ।
आत्माराम देहीं आतलें ।
द्वंद्व तैसें ॥ ३५५ ॥
पैं निद्रिताचेनि आंगेंशीं ।
सापु तैशी उर्वशी ।
तेवीं स्वरूपस्था सरिशीं ।
देहीं द्वंद्वें ॥ ३५६ ॥
म्हणौनि तयाच्या ठायीं ।
शेणा सोनया विशेष नाहीं ।
रत्ना गुंडेया कांहीं ।
नेणिजे भेदु ॥ ३५७ ॥
घरा येवों पां स्वर्ग ।
कां वरिपडो वाघ ।
परी आत्मबुद्धीसि भंग ।
कदा नव्हे ॥ ३५८ ॥
निवटलें न उपवडे ।
जळीनलें न विरूढे ।
साम्यबुद्धी न मोडे ।
तयापरी ॥ ३५९ ॥
हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो ।
कां नीच म्हणौनि निंदिजो ।
परी नेणें जळों विझों ।
राखोंडी जैसी ॥ ३६० ॥
तैसी निंदा आणि स्तुती ।
नये कोण्हेचि व्यक्ती ।
नाहीं अंधारें कां वाती ।
सूर्या घरीं ॥ ३६१ ॥
मानापमानयोस्तुल्य
स्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी
गुणातीतः स उच्यते ॥ २५ ॥
ईश्वर म्हणौनि पूजिला ।
कां चोरु म्हणौनि गांजिला ।
वृषगजीं वेढिला ।
केला रावो ॥ ३६२ ॥
कां सुहृद पासीं आले ।
अथवा वैरी वरपडे जाले ।
परी नेणें राती पाहालें ।
तेज जेवीं ॥ ३६३ ॥
साहीं ऋतु येतां आकाशें ।
लिंपिजेचि ना जैसें ।
तेवीं वैशम्य मानसें ।
जाणिजेना ॥ ३६४ ॥
आणीकही एकु पाहीं ।
आचारु तयाच्या ठायीं ।
तरी व्यापारासि नाहीं ।
जालें दिसे ॥ ३६५ ॥
सर्वांरंभा उटकलें ।
प्रवृत्तीचें तेथ मावळले ।
जळती गा कर्मफळें ।
ते तो आगी ॥ ३६६ ॥
दृष्टादृष्टाचेनि नांवें ।
भावोचि जीवीं नुगवें ।
सेवी जें कां स्वभावें ।
पैठें होये ॥ ३६७ ॥
सुखे ना शिणे ।
पाषाणु कां जेणें मानें ।
तैसी सांडीमांडी मनें ।
वर्जिली असे ॥ ३६८ ॥
आतां किती हा विस्तारु ।
जाणें ऐसा आचारु ।
जयातें तोचि साचारु ।
गुणातीतु ॥ ३६९ ॥
गुणांतें अतिक्रमणें ।
घडे उपायें जेणें ।
तो आतां आईक म्हणे ।
श्रीकृष्णनाथु ॥ ३७० ॥
मां च योऽव्यभिचारेण
भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान्
ब्रह्मभूयाय कल्पते ॥ २६ ॥
तरी व्यभिचाररहित चित्तें ।
भक्तियोगें मातें ।
सेवी तो गुणातें ।
जाकळूं शके ॥ ३७१ ॥
तरी कोण मी कैसी भक्ती ।
अव्यभिचारा काय व्यक्ती ।
हे आघवीचि निरुती ।
होआवी लागे ॥ ३७२ ॥
तरी पार्था परियेसा ।
मी तंव येथ ऐसा ।
रत्नीं किळावो जैसा ।
रत्नगचि कीं तो ॥ ३७३ ॥
कां द्रवपणचि नीर ।
अवकाशचि अंबर ।
गोडी तेचि साखर ।
आन नाहीं ॥ ३७४ ॥
वन्हि तेचि ज्वाळ ।
दळाचि नांव कमळ ।
रूख तेंचि डाळ- । फळादिक ॥ ३७५ ॥
अगा हिम जें आकर्षलें ।
तेंचि हिमवंत जेवीं जालें ।
नाना दूध मुरालें ।
तेंचि दहीं ॥ ३७६ ॥
तैसें विश्व येणें नांवें ।
हें मीचि पैं आघवें ।
घेईं चंद्रबिंब सोलावें ।
न लगे जेवीं ॥ ३७७ ॥
घृताचें थिजलेंपण ।
न मोडितां घृतचि जाण ।
कां नाटितां कांकण ।
सोनेंचि तें ॥ ३७८ ॥
न उकलितां पटु ।
तंतुचि असे स्पष्टु ।
न विरवितां घटु ।
मृत्तिका जेवीं ॥ ३७९ ॥
म्हणौनि विश्वपण जावें ।
मग तैं मातें घेयावें ।
तैसा नव्हे आघवें ।
सकटचि मी ॥ ३८० ॥
ऐसेनि मातें जाणिजे ।
ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे ।
येथ भेदु कांहीं देखिजे ।
तरी व्यभिचारु तो ॥ ३८१ ॥
याकारणें भेदातें ।
सांडूनि अभेदें चित्तें ।
आपणया सकट मातें ।
जाणावें गा ॥ ३८२ ॥
पार्था सोनयाची टिका ।
सोनयासी लागली देखा ।
तैसें आपणपें आणिका ।
मानावें ना ॥ ३८३ ॥
तेजाचा तेजौनि निघाला ।
परी तेजींचि असे लागला ।
तया रश्मी ऐसा भला ।
बोधु होआवा ॥ ३८४ ॥
पैं परमाणु भूतळीं ।
हिमकणु हिमाचळीं ।
मजमाजीं न्याहाळीं ।
अहं तैसें ॥ ३८५ ॥
हो कां तरंगु लहानु ।
परी सिंधूसी नाहीं भिन्नु ।
तैसा ईश्वरीं मी आनु ।
नोहेचि गा ॥ ३८६ ॥
ऐसेनि बा समरसें ।
दृष्टि जे उल्हासे ।
ते भक्ति पैं ऐसे ।
आम्ही म्हणों ॥ ३८७ ॥
आणि ज्ञानाचें चांगावें ।
इयेचि दृष्टि नांवें ।
योगाचेंही आघवें ।
सर्वस्व हें ॥ ३८८ ॥
सिंधू आणि जळधरा- ।
माजीं लागली अखंड धारा ।
तैसी वृत्ति वीरा ।
प्रवर्ते ते ॥ ३८९ ॥
कां कुहेसीं आकाशा ।
तोंडीं सांदा नाहीं तैसा ।
तो परमपुरुषीं तैसा ।
एकवटे गा ॥ ३९० ॥
प्रतिबिंबौनि बिंबवरी ।
प्रभेची जैसी उजरी ।
ते सोऽहंवृत्ती अवधारीं ।
तैसी होय ॥ ३९१ ॥
ऐसेनि मग परस्परें ।
ते सोऽहंवृत्ति जैं अवतरे ।
तैं तियेहि सकट सरे ।
अपैसया ॥ ३९२ ॥
जैसा सैंधवाचा रवा ।
सिंधूमाजीं पांडवा ।
विरालेया विरवावा ।
हेंही ठाके ॥ ३९३ ॥
नातरी जाळूनि तृण ।
वन्हिही विझे आपण ।
तैसें भेदु नाशूनि जाण ।
ज्ञानही नुरे ॥ ३९४ ॥
माझें पैलपण जाये ।
भक्त हें ऐलपण ठाये ।
अनादि ऐक्य जें आहे ।
तेंचि निवडे ॥ ३९५ ॥
आतां गुणातें तो किरीटी ।
जिणे या नव्हती गोष्टी ।
जे एकपणाही मिठी ।
पडों सरली ॥ ३९६ ॥
किंबहुना ऐसी दशा ।
तें ब्रह्मत्व गा सुदंशा ।
हें तो पावें जो ऐसा ।
मातें भजे ॥ ३९७ ॥
पुढतीं इहीं लिंगीं ।
भक्तु जो माझा जगीं ।
हे ब्रह्मता तयालागीं ।
पतिव्रता ॥ ३९८ ॥
जैसें गंगेचेनि वोघें ।
डळमळित जळ जें निघे ।
सिंधुपद तयाजोगें ।
आन नाहीं ॥ ३९९ ॥
तैसा ज्ञानाचिया दिठी ।
जो मातें सेवी किरीटी ।
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं ।
चूडारत्न ॥ ४०० ॥
यया ब्रह्मत्वासीचि पार्था ।
सायुज्य ऐसी व्यवस्था ।
याचि नांवें चौथा ।
पुरुषार्थ गा ॥ ४०१ ॥
परी माझें आराधन ।
ब्रह्मत्वीं होय सोपान ।
एथ मी हन साधन ।
गमेन हो ॥ ४०२ ॥
तरी झणीं ऐसें ।
तुझ्या चित्तीं पैसें ।
पैं ब्रह्म आन नसे ।
मीवांचूनि ॥ ४०३ ॥
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य
सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगोनाम
चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अगा ब्रह्म या नांवा ।
अभिप्रायो मी पांडवा ।
मीचि बोलिजे आघवा ।
शब्दीं इहीं ॥ ४०४ ॥
पैं मंडळ आणि चंद्रमा ।
दोन्ही नव्हती सुवर्मा ।
तैसा मज आणि ब्रह्मा ।
भेदु नाहीं ॥ ४०५ ॥
अगा नित्य जें निष्कंप ।
अनावृत धर्मरूप ।
सुख जें उमप ।
अद्वितीय ॥ ४०६ ॥
विवेकु आपलें काम ।
सारूनि ठाकी जें धाम ।
निष्कर्षाचें निःसीम ।
किंबहुना मी ॥ ४०७ ॥
ऐसेसें हो अवधारा ।
तो अनन्याचा सोयरा ।
सांगतसे वीरा ।
पार्थासी ॥ ४०८ ॥
येथ धृतराष्ट्र म्हणे ।
संजया हें तूतें कोणें ।
पुसलेनिविण वायाणें ।
कां बोलसी ? ॥ ४०९ ॥
माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं ।
गोठी यया ॥ ४१० ॥
संजयो विस्मयो मानसीं ।
आहा करूनि रसरसी ।
म्हणे कैसें पां देवेंसी ।
द्वंद्व यया ? ॥ ४११ ॥
तरी तो कृपाळु तुष्टो ।
यया विवेकु हा घोंटो ।
मोहाचा फिटो ।
महारोगु ॥ ४१२ ॥
संजयो ऐसें चिंतितां ।
संवादु तो सांभाळितां ।
हरिखाचा येतु चित्ता ।
महापूरु ॥ ४१३ ॥
म्हणौनि आतां येणें ।
उत्साहाचेनि अवतरणें ।
श्रीकृष्णाचें बोलणें ।
सांगिजैल ॥ ४१४ ॥
तया अक्षराआंतील भावो ।
पाववीन मी तुमचा ठावो ।
आइका म्हणे ज्ञानदेवो ।
निवृत्तीचा ॥ ४१५ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां
गुणत्रयविभागयोगोनाम चतुर्दशोऽध्यायः ॥