९०१
जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥१॥
बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥
९०२
द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥
तुका म्हणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥
९०३
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥
आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥
प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥
तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥
९०४
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥
९०५
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥
तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥३॥
९०६
सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥२॥
घरास आगि लावुनि जागा । न पळे तो गा वांचे ना ॥३॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥
९०७
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥
९०८
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥१॥
संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥
९०९
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥
भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥
तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥३॥
तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हे चि धणी ॥४॥
९१०
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥३॥
तुका म्हणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥४॥
९११
धाई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥
अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥
साधनाची सिद्धि । मोन करा र बुद्धि ॥४॥
तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रम्हवृंदें ॥५॥
९१२
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥
तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥३॥
९१३
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तो चि जाणे ॥४॥
९१४
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥
साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोट्या बाळां धाकुटियां ॥२॥
तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥३॥
९१५
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥१॥
शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥
भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्तांची परी नावडेती ॥३॥
न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥
९१६
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥
वोळगती जया अष्टमासिद्धि । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥३॥
लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥४॥
तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥
९१७
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥१॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥
कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥
तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥
९१८
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥
तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥
९१९
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥
सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥
तुका म्हणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥३॥
९२०
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥
होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥
तुका म्हणे माझें । काय होईंल तुम्हां ओझें ॥३॥
९२१
एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥
आम्ही देवा शक्तिहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥
पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥
तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
९२२
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी । परवडी न लभों ॥२॥
तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥
९२३
कैवल्याच्या तुम्हां घरीं । रासी हरी उदंड ॥१॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥
९२४
आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥
तुका म्हणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥३॥
९२५
न मनावी चिंता तुम्हीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥१॥
पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥
बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥२॥
तुका म्हणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥३॥
९२६
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥१॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥
मंगळ तें तुम्ही जाणां । नारायणा काय तें ॥२॥
तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥
९२७
भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं । तें या रसीं बुडालें ॥२॥
तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥
९२८
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥१॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥२॥
महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥
९२९
हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥
बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥
तुका म्हणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥
९३०
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हां करीं खेळावया ॥३॥
तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥४॥
९३१
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥
तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥
९३२
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥३॥
९३३
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥
वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥३॥
९३४
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥
होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥
एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥२॥
आला नांवा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥३॥
९३५
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥१॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥२॥
तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥३॥
९३६
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥३॥
९३७
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
तो चि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥
९३८
विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥
लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥२॥
बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥
९३९
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥
धन्यधन्य हरिचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रम्हादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस । वाट कर जोडोनियां ॥२॥
रिद्धिसिद्धि पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दरुषणें ॥५॥
९४०
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥१॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥२॥
तुका म्हणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावईल ॥३॥
९४१
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥
आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥
भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥२॥
तुका म्हणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥
९४२
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥
९४३
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥
९४४
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥
९४५
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥
मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥
भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥
तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥
९४६
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥
कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥
ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥
९४७
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥
तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥३॥
९४८
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥२॥
तुका म्हणे मोह परते चि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥
९४९
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥१॥
तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥३॥
९५०
तुज च पासाव जालोंसों निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥
पाहावा जी ठायीं करूनि विचार । नुन्य कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥
ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥२॥
तुका म्हणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥३॥
९५१
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुम्हीं ॥१॥
म्हणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥
न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥
तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥३॥
९५२
लटिका ऐसा म्हणतां देव । संदेहसा वाटतसे ॥१॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥
९५३
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥
उदास तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्ही च ॥ध्रु.॥
ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥२॥
एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥३॥
९५४
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥
आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥
तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥
तुका म्हणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥३॥
९५५
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥
मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥३॥
९५६
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥२॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥
९५७
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥
न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥२॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥३॥
९५८
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥
९५९
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥
आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥
तुका म्हणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥३॥
९६०
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥
आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥
तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥३॥
९६१
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥१॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥
९६२
आम्ही बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥
जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥३॥
९६३
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥
सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥
९६४
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आम्हीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥२॥
तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥
९६५
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥
ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥
गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥२॥
तुका म्हणे ठावे । तुम्ही असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥
९६६
आम्ही शक्तिहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥
माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥
नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥
नाहीं येत बळा । आतां तुम्हासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥
९६७
काय कृपेविण घालावें सांकडें । निश्चिंती निवाडें कोण्या एका ॥१॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥
धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥३॥
९६८
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥१॥
अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान निश्चिंतीचें ॥ध्रु.॥
दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥३॥
९६९
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥३॥
९७०
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥
तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥
९७१
काय आतां आम्हीं पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त म्हुण ॥१॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥
काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥
तुका म्हणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥
९७२
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥
तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥
९७३
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासें जाणतसां ॥२॥
तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥
९७४
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तई नाचेन ॥ध्रु.॥
स्वामी कळे सावधान । तरि मन उल्हासे ॥२॥
तुका म्हणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥
९७५
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥
नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
पारुशला संवसार । मोडली बैसण्याची थार ॥२॥
आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥
९७६
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥
तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥
सेवेच्या अभिळासें । मन बहु जालें पिसें ॥२॥
अरे भक्तापराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
९७७
तुमचा तुम्हीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥
तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥
९७८
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥
मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥
आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥२॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥
९७९
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥
तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥
तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥
९८०
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥
देह समर्पिजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥
९८१
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
९८२
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥
तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥
९८३
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥
गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धि करुनी ठेवा ॥ध्रु.॥
विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥२॥
तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥३॥
९८४
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया ॥१॥
उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥
९८५
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥
सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥
मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥२॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥३॥
बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥४॥
तुका म्हणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
९८६
वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥१॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥
सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥
याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥३॥
तुका म्हणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥
९८७
अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुनि सांडिलें कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥
तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥
९८८
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥१॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥२॥
तुका म्हणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥३॥
९८९
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥
९९०
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥३॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥
९९१
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥१॥
तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥
हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥
उष्णें छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥
तुका म्हणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥
९९२
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥
जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥३॥
९९३
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥
पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥
तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥३॥
९९४
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥
न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥
तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥
९९५
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता फुंज अंगीं ॥१॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धि ॥२॥
तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥
९९६
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥
लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥
मधुरा वाणी ओटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥३॥
९९७
कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥
तरटापुढें बरें नाचे । सुतकाचें मुसळ ॥२॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥
९९८
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥
जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥
आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥३॥
९९९
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥
लIमी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥
१०००
शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥
पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥
तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥
१००१
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥२॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥३॥
तुका म्हणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥४॥
१००२
आम्हीं गावें तुम्हीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥
सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥
येथें नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥
सदैव ज्यां कथा काळ घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले पाषाण ॥५॥
१००३
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥
देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥
दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥४॥
१००४
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥
साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥
तुका म्हणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥३॥
१००५
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥ध्रु.॥
वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥२॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥
१००६
कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥१॥
अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि निश्चिंत जालों देवा ॥ध्रु.॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥२॥
तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥३॥
तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेईं देवा ॥४॥
१००७
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥
देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥
बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । म्हणोनियां जीवा भय वाटे ॥२॥
होईंल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संदेह हा चि मज ॥३॥
तुका म्हणे मी कमाईंचे हीण । म्हणऊनि सीण करीं देवा ॥४॥
१००८
ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥
काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥२॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥३॥
तुका म्हणे वांयां जालों भूमी भार । होईंल विचार काय नेणों ॥४॥
१००९
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥
करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥
शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देई निवडूनि ॥२॥
उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥४॥
१०१०
नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥
जन वन आम्हां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥२॥
म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥३॥
म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥
१०११
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥
जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥
१०१२
न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥१॥
आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥
कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥२॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥३॥
मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥४॥
तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥५॥
१०१३
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥२॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥३॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥४॥
१०१४
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥
माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥२॥
नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥३॥
तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥४॥
१०१५
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥
करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥
बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥२॥
जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥३॥
तुका म्हणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥४॥
१०१६
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥१॥
दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥
पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥२॥
पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥
तुका म्हणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥४॥
१०१७
मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥
पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥२॥
गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥३॥
प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥४॥
पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥५॥
तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥६॥
१०१८
तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥१॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥
अनाथाचा नाथ बोलतील संत । ऐकोनियां मात विश्वासलों ॥२॥
न करावी निरास न धरावें उदास । देई याचकास कृपादान ॥३॥
तुका म्हणे मी तों पातकांची रासी । देई पायापासीं ठाव देवा ॥४॥
१०१९
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥१॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥
घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मस्थिती तया अंगीं वसे ॥२॥
नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनि तो जनीं जनार्दन ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥४॥
१०२०
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हातीं चढे ॥१॥
कुळधर्म भक्ति कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥२॥
कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥३॥
तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरीं होय ॥४॥
१०२१
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥
गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥
संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥
तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥
१०२२
न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥
न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥
न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥२॥
न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥३॥
तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥४॥
१०२३
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥
कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईंल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥
पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥२॥
करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥३॥
तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥४॥
१०२४
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥
तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥
कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥
सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥३॥
जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥४॥
तुका म्हणे तुम्ही तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥५॥
१०२५
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥
न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥
मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥
सांगावे ते किती तुम्हांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥३॥
ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥४॥
तुका म्हणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होई देवा ॥५॥
१०२६
शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥
गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥२॥
भागलियाचा होई रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥
अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥
तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥
१०२७
कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥
कोणापाशीं आम्हीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥
कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥३॥
कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥४॥
तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥५॥
१०२८
तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काईं ॥१॥
धांवा केला आतां होईंल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥
गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आलें ॥२॥
देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥३॥
तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥४॥
तुका म्हणे आम्हीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥५॥
१०२९
तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शक्तिहीन ॥१॥
कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥
तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥२॥
चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥
तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥४॥
तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥५॥
१०३०
अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥
अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रम्हानंदे ॥ध्रु.॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥४॥
तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥५॥
१०३१
संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥
भय चिंता धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥
पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥
नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां भार सर्व वाहे ॥३॥
तुका म्हणे देव भक्तां वेळाईंत । भक्त ते निश्चिंत त्याचियानें ॥४॥
१०३२
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥
देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥
एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥
तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तो चि देव देव भक्त ॥४॥
१०३३
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥
गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥
चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥२॥
निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥
तुका म्हणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥५॥
१०३४
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सद्धि घरीं ॥१॥
आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥
न म्हणे सोइरा सुहुर्द आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥३॥
भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥३॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥
तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥५॥
१०३५
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥
उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥
तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥
१०३६
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥
माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥२॥
तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥
१०३७
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥
प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥
राहे लोकाचार पडे । अवघा विसर ॥२॥
तुका म्हणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥३॥
१०३८
टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥१॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥
तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥
१०३९
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥
आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥
करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥
तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईंन ॥३॥
१०४०
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥
बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥२॥
भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥३॥
नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥
तुम्हां आम्हां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥५॥
१०४१
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥
आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥
पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईंचा पती ॥३॥
१०४२
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥
तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥
१०४३
आतां आम्हां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥१॥
अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥
१०४४
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥
ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥
नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥२॥
तुका म्हणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥३॥
१०४५
मुनि मुक्त जाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥
अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥
पुराणीं उपदेश साधन उध्दट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥२॥
तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥२॥
१०४६
न करावी स्तुति माझी संतजनीं । होईंल या वचनीं अभिमान ॥१॥
भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईंल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥
१०४७
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥१॥
नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥
१०४८
चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥
बुद्धिहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥३॥
१०४९
समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥
अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥
१०५०
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥१॥
सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥२॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥३॥
१०५१
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥
शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥
वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥
१०५२
जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥
म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥
संतां ब्रम्हरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥
तुका म्हणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥३॥
१०५३
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥
कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥२॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥
१०५४
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥
तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥
रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे तुमचें सेवितों उच्चिष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥
१०५५
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥
आतां उतरला भार । तुम्हीं केला अंगीकार ॥ध्रु.॥
बहु काकुलती । आलों मागें किती ॥२॥
तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥३॥
पाईंक - अभंग ११
१०५६
पाईंकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥
पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥
तरि व्हावें पाईंक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥३॥
तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईंक अपार सुख भोगी ॥४॥
१०५७
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥१॥
येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टी वरी ॥ध्रु.॥
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥
पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥
तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥
१०५८
पाईंक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥
आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईंक त्या जग स्वामी मानी ॥२॥
ऐसें जन केलें पाइकें पाईंक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईंक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥४॥
१०५९
पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥
पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥
आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥२॥
सांडितां मारग मारिती पाईंक । आणिकांसी शीक लागावया ॥३॥
तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईंक तयास सुख देती ॥४॥
१०६०
पाईंक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईंक पाइकां नाईंक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥२॥
विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥४॥
१०६१
धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥
जिवाचे उदार शोभती पाईंक । मिरवती नाईंक मुगुटमणि ॥ध्रु.॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥२॥
कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥३॥
तुका म्हणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥४॥
१०६२
पाइकपणें खरा मुशारा । पाईंक तो खरा पाइकीनें ॥१॥
पाईंक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥
एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईंक तो पणें निवडला ॥२॥
करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥३॥
तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥४॥
१०६३
उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥
प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईंक तो नांव मिरवी वांयां ॥२॥
गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥३॥
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईंक पाहोन मोल करी ॥४॥
१०६४
एका च स्वामीचे पाईंक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥
हीन कमाईंचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥
पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या ठाव ॥३॥
तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥४॥
१०६५
प्रजी तो पाईंक ओळीचा नाईंक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥१॥
आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥
पाठीवरी घाय म्हणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥२॥
घेईंल दरवडा देहा तो पाईंक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥
तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईंचा पण सिद्धी पावे ॥४॥
१०६६
जातीचा पाईंक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥
जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥२॥
तुका म्हणे नमूं देव म्हुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥३॥
॥११॥
१०६७
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥
अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥
यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥
तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥
१०६८
आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥
दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥३॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥४॥
१०६९
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥ध्रु.॥
थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥२॥
तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥३॥
१०७०
अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥१॥
पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥
तुम्ही आम्ही पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥२॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥३॥
१०७१
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥
१०७२
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥२॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥
१०७३
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं ।
ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥
ब्रम्हानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥
शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रम्हार्पण ॥२॥
संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका ।
संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥३॥
शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता ।
क्षमा क्षमापणें प्रसद्धि प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तिमंत ॥४॥
दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रम्ह ऐक्यभावें भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥६॥
देहबुद्धि जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे ।
न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
१०७४
भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥
आम्हीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥
जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥३॥
॥घोंगड्याचे अभंग-॥१२॥
१०७५
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥
पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥२ ॥
तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥
१०७६
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥
कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥
तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥२॥
तुका म्हणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥३॥
१०७७
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेई गोपाळा देई झाडा ॥ध्रु.॥
मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥३॥
१०७८
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥२॥
तुका म्हणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥३॥
१०७९
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥२॥
तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥
१०८०
तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥
माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥२॥
तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥३॥
१०८१
मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥
तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥३॥
१०८२
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥
हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥
नोळखवे म्यां धरिला हातीं । देह्यादिप माय लाविली वाती ॥२॥
न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥३॥
१०८३
आतां मी देवा पांघरों काईं । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥
सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥
नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥२॥
तुका म्हणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥३॥
१०८४
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥१॥
मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥
घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥२॥
तुका म्हणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥३॥
१०८५
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥
पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥
घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जंव भरला हाट ॥३॥
१०८६
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥
चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥२॥
आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥३॥
आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥४॥
तुका म्हणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥५॥
॥१२॥
१०८७
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे।
हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥
आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥२॥
पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥३॥
गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥
१०८८
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥२॥
तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥
१०८९
शीतळ साउली आमुची माउली । विठाईं वोळली प्रेमपान्हा ॥१॥
जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥२॥
आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥
सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥४॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईंचें ॥५॥
रामचरित्र - अभंग ॥१४॥
१०९०
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥
केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥
वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥२॥
तुका म्हणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥३॥
१०९१
राम म्हणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥१॥
धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥
राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥
राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥३॥
राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥४॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥५॥
१०९२
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥
तो हा न करी तें काईं । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥
सीळा मनुष्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥
वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥३॥
१०९३
राम म्हणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१॥
ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥२॥
तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥
१०९४
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥
कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥
हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥
जुन्हाट नागर नीच नवें । तुका म्हणें म्यां धरिलें जीवें भावें ॥३॥
१०९५
राम म्हणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥
राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥
राम म्हणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत म्हणतां राम ॥२॥
राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥३॥
तुका म्हणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥४॥
१०९६
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥
अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होईं शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥
तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेईं आतां संवंघेसी तुटी ॥३॥
१०९७
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥
कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥२॥
तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥
१०९८
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥
लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥
उदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥२॥
तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥३॥
१०९९
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ।
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥
अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥२॥
स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥३॥
रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥४॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
११००
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥१॥
आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जेजेकार आळंगिला भरत ॥ध्रु.॥
करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥
जालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईंवत्सें नरनारीबाळें ॥३॥
११०१
जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाईं वोळल्या म्हैसी ॥१॥
राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥
स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥२॥
तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥३॥
११०२
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥
कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥२॥
तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥३॥
नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥४॥
नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥५॥
११०३
मी तों अल्प मतिहीन । काय वर्णू तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥
नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥
द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥२॥
शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥३॥
राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥
॥१४॥
श्लोकरूपी अभंग - ॥६॥
११०४
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना ।
जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका ।
मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥२॥
हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी ।
करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥
भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ।
असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥४॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ।
तुका राहिला पायिं तो राख देव । असें मागतसे तुझी चरणसेवा ॥५॥
११०५
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे ।
महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥
गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख ।
लागलें मुनिवरां गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥
ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार ।
जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाईं ॥३॥
असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनि भक्तिलोभा ।
पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धीसाधकांची ॥४॥
करा वेगु हा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं ।
म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥५॥
११०६
धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं ।
मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥१॥
न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंद्रियां थोर घातीं ।
जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥२॥
असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता ।
क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥३॥
निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ यी भीत आहे ।
तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥
करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी ।
नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥
११०७
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बिलीं साजिरीं मोरवीसें ।
हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥२॥
असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ।
महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥३॥
कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवांची।
जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । धरा मानसीं आपला देहभाव ॥४॥
मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय।
तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥५॥
११०८
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नि हा काष्ठ तेवीं ।
घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥
तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥
फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये ।
धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥
असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें । असे बिंब तें या मळा आहे ठेलें ।
कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥४॥
करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका वीनवीतो पडों काय पायां ।
तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥५॥
११०९
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥
ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों ।
भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥२॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये ।
करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥३॥
॥६॥
१११०
सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धि बळ माझें ॥ध्रु.॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥
विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥३॥
सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥
तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशक्तिहीन जालों देवा ॥५॥
११११
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥
ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥
विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥
१११२
येगा येगा पांडुरंगा । घेईं उचलुनि वोसंगा ॥१॥
ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥
तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥४॥
१११३
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥१॥
कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ कोंवळी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
१११४
आम्ही उतराईं । भाव निरोपूनि पायीं ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥
आमचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥२॥
तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥
१११५
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥१॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥
देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक म्हुण ॥२॥
तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥३॥
१११६
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥२॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥
तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥
१११७
दास जालों हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ॥१॥
तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥
ऐकतां हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्तां ॥२॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥
हें सुख ब्रम्हादिकां । म्हणे नाहीं नाहीं तुका ॥४॥
१११८
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥
जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥
मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥२॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौर्यांशीचा ॥३॥
१११९
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥
पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥
तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥
११२०
द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥
गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥
वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥
लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥३॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥
११२१
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रम्हानंदु ॥३॥ तु
का म्हणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥
११२२
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥
११२३
देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥
दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥
तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥
११२४
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥
तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥
११२५
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां ते गुण न सरती ॥३॥
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥
११२६
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आम्हा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥२॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥
तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥
११२७
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥१॥
सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥
पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥२॥
चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥३॥
तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥४॥
११२८
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥४॥
११२९
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥
तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥२॥
नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरिली ॥३॥
तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥४॥
११३०
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥
सर्वभावें नाम गाईंन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥
११३१
जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥१॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥२॥
आम्हां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥३॥
तुका म्हणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥४॥
११३२
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरितां सांगे कुठोर्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥
११३३
धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥
जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥३॥
११३४
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥
तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥
११३५
दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येर्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥३॥
११३६
वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥१॥
करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥
तुका म्हणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥
११३७
ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धि म्हणियारीं ॥२॥
सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें आम्हीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥५॥
११३८
न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥
अविनाश सुख देईंल निर्वाणी । चुकतील खाणी चौर्याशीच्या ॥ध्रु.॥
आणिकिया जीवां होईंल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥
आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥३॥
तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥
११३९
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥
आणीक ही भोग आणिकां इंद्रियांचे । नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥२॥
रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥
तुका म्हणे कां रे नाशिवंतासाटीं । देवासवें तुटी करितोसी ॥४॥
११४०
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईंल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥
काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥
न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥
तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥४॥
११४१
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥
काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥२॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥
सेतावर - अभंग ३
११४२
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥
कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥
ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥४॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोर्याच्या नेटें ॥६॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥
सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥९॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥
११४३
वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥
चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥ २॥
डोळे झांकुनि राती । कूर्पी पडे दिवसा जोती ॥३॥
पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥
११४४
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥
सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥
गोफणेसी गुंडा घालीं पागोर्याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुद्धि व्हावीं दोनी ॥३॥
खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देई त्यासी ॥४॥
तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥
॥३॥
११४५
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥
उतराधिपदें - २२
११४६
क्या गाऊं कोईं सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥१॥
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥
काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥२॥
गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥३॥
११४७
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥
तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥
तुलसीमाला बभूत चर्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥
कहे तुका जो साई हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥३॥
११४८
मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥
राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥
अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥२॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥
११४९
चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥१॥
काहे बडाईं दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥
और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥२॥
फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥३॥
११५०
हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥१॥
मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥
हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥२॥
देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥३॥
११५१
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥
क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥
किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥२॥
कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥३॥
११५२
कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥
जग रडे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदमाहि पैठा ॥ध्रु.॥
भला पाऊं जनम ईंक्तहे बेर । बस मायाके असंग फेर ॥२॥
कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलीयें पसारा ॥३॥
११५३
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥
प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥
आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥२॥
तुका प्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥३॥
११५४
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥
इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥१॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥३॥
११५५
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥
हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥
जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥२॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥
११५६
आपे तरे त्याकी कोण बराईं । औरनकुं भलो नाम घराईं ॥ध्रु.॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥१॥
बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥२॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥३॥
काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥४॥
कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥५॥
११५७
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥
नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥
उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥२॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥३॥
११५८
भले रे भाईं जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥१॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥२॥
कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥३॥
११५९
लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥
कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥१॥
नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥२॥
और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥३॥
११६०
राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंब न पाईं ॥ध्रु.॥
कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥१॥
कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥
कहे तुका सब हि चेलक्तहार । एकारामविन नहिं वासार ॥३॥
११६१
काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥
राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥१॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥
राना रंग डोंगरकी राईं । कहे तुका करे इलाहि ॥३॥
११६२
काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥
केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥१॥
बाप भाईं लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥२॥
काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥३॥
११६३
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुम्हारा ॥ध्रु.॥
तनजोबनकी कोन बराईं । ब्याधपीडादि स काटहि खाईं ॥१॥
कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥२॥
कहे तुका नहिं समज्यात मात । तुम्हारे शरन हे जोडहि हात ॥३॥
११६४
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥
मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥१॥
कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥२॥
कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥३॥
११६५
रामभजन सब सार मिठाईं । हरि संताप जनमदुख राईं ॥ध्रु.॥
दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥
११६६
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥
ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥
रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥
कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥
११६७
हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिईं लंका ॥ध्रु.॥
गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥
वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥२॥
स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाईं तुकयाका ॥३॥
॥२२॥
॥ साख्या ॥ ३० ॥
११६८
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय ।
भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
११६९
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज ।
बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥
११७०
लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम ।
माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥१॥
११७१
तुका पंखिबहिरन मानुं । बोईं जनावर बाग ।
असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥१॥
११७२
तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर ।
तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥१॥
११७३
संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार ।
चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥१॥
११७४
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम ।
बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥१॥
११७५
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड ।
हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥१॥
११७६
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख ।
आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥१॥
११७७
कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार ।
मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥१॥
११७८
तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।
क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥१॥
११७९
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख ।
पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥१॥
११८०
कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय ।
हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥१॥
११८१
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ।
चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥१॥
११८२
तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये ।
एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥१॥
११८३
तुका मार्य़ा पेटका । और न जाने कोये ।
जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥१॥
११८४
काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर ।
कहे तुका तुम्हें सुनो रे भाईं । हिरिदा जिन्होका कठोर ॥१॥
११८५
भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये ।
निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥१॥
११८६
फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद ।
बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥१॥
११८७
तुका दास रामका । मनमे एक हि भाव ।
तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥१॥
११८८
तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात ।
धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥१॥
११८९
चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये ।
तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥१॥
११९०
चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग ।
पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥१॥
११९१
तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये ।
दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥१॥
११९२
तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय ।
उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराईं ॥१॥
११९३
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय ।
जबथे इच्छा नहिं मुईं । तब तूं किया काय ॥१॥
११९४
तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक ।
मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥१॥
११९५
ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास ।
सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥१॥
११९६
कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास ।
क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥१॥
११९७
तुका और मिठाईं क्या करूं रे । पाले विकारपिंड ।
राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥१॥
॥३०॥
११९८
म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥
लाहो घेई हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥
गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि म्हणसी ॥२॥
पुरलासाटीं देहाडा । ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥३॥
नरदेह दुबळा । ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥
तुका म्हणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥५॥
११९९
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥
बहु धड जरी जाली म्हैस गाय । तरी होईंल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येईंल कळों ॥३॥
१२००
नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥३॥