॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥
॥ अथ षोडशोशोऽध्यायः - अध्याय सोळावा ॥
॥ दैवासुरसंपत्तिविभागयोगः ॥
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।
अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥ १ ॥
जो अविद्याराती रुसोनियां ।
गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया ।
जो सुदिनु करी ज्ञानियां ।
स्वबोधाचा ॥ २ ॥
जेणें विवळतिये सवळे ।
लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।
सांडिती देहाहंतेचीं अविसाळें ।
जीवपक्षी ॥ ३ ॥
लिंगदेहकमळाचा ।
पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा ।
बंदिमोक्षु जयाचा ।
उदैला होय ॥ ४ ॥
शब्दाचिया आसकडीं ।
भेद नदीच्या दोहीं थडीं ।
आरडाते विरहवेडीं ।
बुद्धिबोधु ॥ ५ ॥
तया चक्रवाकांचें मिथुन ।
सामरस्याचें समाधान ।
भोगवी जो चिद्गगन ।
भुवनदिवा ॥ ६ ॥
जेणें पाहालिये पाहांटे ।
भेदाची चोरवेळ फिटे ।
रिघती आत्मानुभववाटे ।
पांथिक योगी ॥ ७ ॥
जयाचेनि विवेककिरणसंगें ।
उन्मेखसूर्यकांतु फुणगे ।
दीपले जाळिती दांगें ।
संसाराचीं ॥ ८ ॥
जयाचा रश्मिपुंजु निबरु ।
होता स्वरूप उखरीं स्थिरु ।
ये महासिद्धीचा पूरु ।
मृगजळ तें ॥ ९ ॥
जो प्रत्यग्बोधाचिया माथया ।
सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया ।
लपे आत्मभ्रांतिछाया ।
आपणपां तळीं ॥ १० ॥
ते वेळीं विश्वस्वप्नासहितें ।
कोण अन्यथामती निद्रेतें ।
सांभाळी नुरेचि जेथें ।
मायाराती ॥ ११ ॥
म्हणौनि अद्वयबोधपाटणीं ।
तेथ महानंदाची दाटणी ।
मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं ।
मंदावो लागती ॥ १२ ॥
किंबहुना ऐसैसें ।
मुक्तकैवल्य सुदिवसें ।
सदा लाहिजे कां प्रकाशें ।
जयाचेनि ॥ १३ ॥
जो निजधामव्योमींचा रावो ।
उदैलाचि उदैजतखेंवो ।
फेडी पूर्वादि दिशांसि ठावो ।
उदोअस्तूचा ॥ १४ ॥
न दिसणें दिसणेंनसीं मावळवी ।
दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी ।
काय बहु बोलों ते आघवी ।
उखाचि आनी ॥ १५ ॥
तो अहोरात्रांचा पैलकडु ।
कोणें देखावा ज्ञानमार्तंडु ।
जो प्रकाश्येंवीण सुरवाडु ।
प्रकाशाचा ॥ १६ ॥
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती ।
आतां नमों म्हणों पुढतपुढती ।
जे बाधका येइजतसे स्तुती ।
बोलाचिया ॥ १७ ॥
देवाचें महिमान पाहोनियां ।
स्तुति तरी येइजे चांगावया ।
जरी स्तव्यबुद्धीसीं लया ।
जाईजे कां ॥ १८ ॥
जो सर्वनेणिवां जाणिजे ।
मौनाचिया मिठीया वानिजे ।
कांहींच न होनि आणिजे ।
आपणपयां जो ॥ १९ ॥
तया तुझिया उद्देशासाठीं ।
पश्यंती मध्यमा पोटीं ।
सूनि परेसींही पाठीं ।
वैखरी विरे ॥ २० ॥
तया तूतें मी सेवकपणें ।
लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें ।
हें उपसाहावेंही म्हणतां उणें ।
अद्वयानंदा ॥ २१ ॥
परी रंकें अमृताचा सागरु ।
देखिलिया पडे उचिताचा विसरु ।
मग करूं धांवे पाहुणेरु ।
शाकांचा तया ॥ २२ ॥
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा ।
तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा ।
उजळोनि दिव्यतेजा हातिवा ।
ते भक्तीचि पाहावी ॥ २३ ॥
बाळा उचित जाणणें होये ।
तरी बाळपणचि कें आहे ? ।
परी साचचि येरी माये ।
म्हणौनि तोषे ॥ २४ ॥
हां गा गांवरसें भरलें ।
पाणी पाठीं पाय देत आलें ।
तें गंगा काय म्हणितलें ।
परतें सर ? ॥ २५ ॥
जी भृगूचा कैसा अपकारु ।
कीं तो मानूनि प्रियोपचारु ।
तोषेचिना शारङ्गधरु ।
गुरुत्वासीं ? ॥ २६ ॥
कीं आंधारें खतेलें अंबर ।
झालेया दिवसनाथासमोर ।
तेणें तयातें पर्हा सर ।
म्हणितलें काई ? ॥ २७ ॥
तेवीं भेदबुद्धीचिये तुळे ।
घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे ।
तुकिलासि तें येकी वेळे ।
उपसाहिजो जी ॥ २८ ॥
जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी ।
वेदादि वाचां वानिलासी ।
जें उपसाहिलें तयासी ।
तें आम्हांही करीं ॥ २९ ॥
परी मी आजि तुझ्या गुणीं ।
लांचावलों अपराधु न गणीं ।
भलतें करीं परी अर्धधणीं ।
नुठी कदा ॥ ३० ॥
मियां गीता येणें नांवें ।
तुझें पसायामृत सुहावें ।
वानूं लाधलों तें दुणेन थावें ।
दैवलों दैवें ॥ ३१ ॥
माझिया सत्यवादाचें तप ।
वाचा केलें बहुत कल्प ।
तया फळाचें हें महाद्वीप ।
पातली प्रभु ॥ ३२ ॥
पुण्यें पोशिलीं असाधरणें ।
तियें तुझें गुण वानणें ।
देऊनि मज उत्तीर्णें ।
जालीं आजी ॥ ३३ ॥
जी जीवित्वाच्या आडवीं ।
आतुडलों होतों मरणगांवीं ।
ते अवदसाची आघवी ।
फेडिली आजी ॥ ३४ ॥
जे गीता येणें नांवें नावाणिगी ।
जे अविद्या जिणोनि दाटुगी ।
ते कीर्ती तुझी आम्हांजोगी ।
वानावया जाली ॥ ३५ ॥
पैं निर्धना घरीं वानिवसें ।
महालक्ष्मी येऊनि बैसे ।
तयातें निर्धन ऐसें ।
म्हणों ये काई ? ॥ ३६ ॥
कां अंधकाराचिया ठाया ।
दैवें सुर्यु आलिया ।
तो अंधारुचि जगा यया ।
प्रकाशु नोहे ? ॥ ३७ ॥
जया देवाची पाहतां थोरी ।
विश्व परमाणुही दशा न धरी ।
तो भावाचिये सरोभरी ।
नव्हेचि काई ? ॥ ३८ ॥
तैसा मी गीता वाखाणी ।
हे खपुष्पाची तुरंबणी ।
परी समर्थें तुवां शिरयाणी ।
फेडिली ते ॥ ३९ ॥
म्हणौनि तुझेनि प्रसादें ।
मी गीतापद्यें अगाधें ।
निरूपीन जी विशदें ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ४० ॥
तरी अध्यायीं पंधरावा ।
श्रीकृष्णें तया पांडवा ।
शास्त्रसिद्धांतु आघवा ।
उगाणिला ॥ ४१ ॥
जे वृक्षरूपक परीभाषा ।
केलें उपाधि रूप अशेषा ।
सद्वैद्यें जैसें दोषा ।
अंगलीना ॥ ४२ ॥
आणि कूटस्थु जो अक्षरु ।
दाविला पुरुषप्रकारु ।
तेणें उपहिताही आकारु ।
चैतन्या केला ॥ ४३ ॥
पाठीं उत्तम पुरुष ।
शब्दाचें करूनि मिष ।
दाविलें चोख ।
आत्मतत्त्व ॥ ४४ ॥
आत्मविषयीं आंतुवट ।
साधन जें आंगदट ।
ज्ञान हेंही स्पष्ट ।
चावळला ॥ ४५ ॥
म्हणौनि इये अध्यायीं ।
निरूप्य नुरेचि कांहीं ।
आतां गुरुशिष्यां दोहीं ।
स्नेहो लाहणा ॥ ४६ ॥
एवं इयेविषयीं कीर ।
जाणते बुझावले अपार ।
परी मुमुक्षु इतर ।
साकांक्ष जाले ॥ ४७ ॥
त्या मज पुरुषोत्तमा ।
ज्ञानें भेटे जो सुवर्मा ।
तो सर्वज्ञु तोचि सीमा ।
भक्तीचीही ॥ ४८ ॥
ऐसें हें त्रैलोक्यनायकें ।
बोलिलें अध्यायांत श्लोकें ।
तेथें ज्ञानचि बहुतेकें ।
वानिलें तोषें ॥ ४९ ॥
भरूनि प्रपंचाचा घोंटु ।
कीजे देखतांचि देखतया द्रष्टु ।
आनंदसाम्राज्यीं पाटु ।
बांधिजे जीवा ॥ ५० ॥
येवढेया लाठेपणाचा उपावो ।
आनु नाहींचि म्हणे देवो ।
हा सम्यक्ज्ञानाचा रावो ।
उपायांमाजीं ॥ ५१ ॥
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते ।
तिहीं तोषलेनि चित्तें ।
आदरें तया ज्ञानातें ।
वोंवाळिलें जीवें ॥ ५२ ॥
आतां आवडी जेथ पडे ।
तयाचि अवसरीं पुढें पुढें ।
रिगों लागें हें घडे ।
प्रेम ऐसें ॥ ५३ ॥
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं ।
ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी ।
तंव योग क्षेमु ज्ञानविखीं ।
स्फुरेलचि कीं ॥ ५४ ॥
म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान ।
कैसेनि होय स्वाधीन ।
जालिया वृद्धियत्न ।
घडेल केवीं ॥ ५५ ॥
कां उपजोंचि जें न लाहे ।
जें उपजलेंही अव्हांटा सूये ।
तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे ।
हें जाणावें कीं ॥ ५६ ॥
मग जाणतयां जें विरू ।
तयाचीं वाट वाहती करूं ।
ज्ञाना हित तेंचि विचारूं ।
सर्वभावें ॥ ५७ ॥
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं ।
भावो जो धरिला असे चित्तीं ।
तो पुरवावया लक्ष्मीपती ।
बोलिजेल ॥ ५८ ॥
ज्ञानासि सुजन्म जोडे ।
आपली विश्रांतिही वरी वाढे ।
ते संपत्तीचे पवाडे ।
सांगिजेल दैवी ॥ ५९ ॥
आणि ज्ञानाचेनि कामाकारें ।
जे रागद्वेषांसि दे थारे ।
तिये आसुरियेहि घोरे ।
करील रूप ॥ ६० ॥
सहज इष्टानिष्टकरणी ।
दोघीचि इया कवतुकिणी ।
हे नवमाध्यायीं उभारणी ।
केली होती ॥ ६१ ॥
तेथ साउमा घेयावया उवावो ।
तंव वोडवला आन प्रस्तावो ।
तरी तयां प्रसंगें आतां देवो ।
निरूपीत असे ॥ ६२ ॥
तया निरूपणाचेनि नांवें ।
अध्याय पद सोळावें ।
लावणी पाहतां जाणावें ।
मागिलावरी ॥ ६३ ॥
परी हें असो आतां प्रस्तुतीं ।
ज्ञानाच्या हिताहितीं ।
समर्था संपत्ती ।
इयाचि दोन्ही ॥ ६४ ॥
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी ।
जे मोहरात्रीची धर्मदिवी ।
ते आधीं तंव दैवी ।
संपत्ती ऐका ॥ ६५ ॥
जेथ एक एकातें पोखी ।
ऐसे बहुत पदार्थ येकीं ।
संपादिजती ते लोकीं ।
संपत्ति म्हणिजे ॥ ६६ ॥
ते दैवी सुखसंभवी ।
तेथ दैवगुणें येकोपजीवीं ।
जाली म्हणौनि दैवी ।
संपत्ति हे ॥ ६७ ॥
श्री भगवानुवाच ।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥ १ ॥
आतां तयाचि दैवगुणां- ।
माजीं धुरेचा बैसणा ।
बैसे तया आकर्णा ।
अभय ऐसें ॥ ६८ ॥
तरी न घालूनि महापुरीं ।
न घेपे बुडणयाची शियारी ।
कां रोगु न गणिजे घरीं ।
पथ्याचिया ॥ ६९ ॥
तैसा कर्माकर्माचिया मोहरा ।
उठूं नेदूनि अहंकारा ।
संसाराचा दरारा ।
सांडणें येणें ॥ ७० ॥
अथवा ऐक्यभावाचेनि पैसें ।
दुजे मानूनि आत्मा ऐसें ।
भयवार्ता देशें ।
दवडणें जें ॥ ७१ ॥
पाणी बुड{ऊं} ये मिठातें ।
तंव मीठचि पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें ।
नाशे भय ॥ ७२ ॥
अगा अभय येणें नांवें ।
बोलिजे तें हें जाणावें ।
सम्यक्ज्ञानाचें आघवें ।
धांवणें हें ॥ ७३ ॥
आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे ।
ते ऐशा चिन्हीं जाणिजे ।
तरी जळे ना विझे ।
राखोंडी जैसी ॥ ७४ ॥
कां पाडिवा वाढी न मगे ।
अंवसे तुटी सांडूनि मागे ।
माजीं अतिसूक्ष्म अंगें ।
चंद्रु जैसा राहे ॥ ७५ ॥
नातरी वार्षिया नाहीं मांडिली ।
ग्रीष्में नाहीं सांडिली ।
माजीं निजरूपें निवडली ।
गंगा जैसी ॥ ७६ ॥
तैसी संकल्पविकल्पाची वोढी ।
सांडूनि रजतमाची कावडी ।
भोगितां निजधर्माची आवडी ।
बुद्धि उरे ॥ ७७ ॥
इंद्रियवर्गीं दाखविलिया ।
विरुद्धा अथवा भलीया ।
विस्मयो कांहीं केलिया ।
नुठी चित्तीं ॥ ७८ ॥
गांवा गेलिया वल्लभु ।
पतिव्रतेचा विरहक्षोभु ।
भलतेसणी हानिलाभु ।
न मनीं जेवीं ॥ ७९ ॥
तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें ।
बुद्धी जें ऐसें अनन्य होणें ।
ते सत्त्वशुद्धी म्हणे ।
केशिहंता ॥ ८० ॥
आतां आत्मलाभाविखीं ।
ज्ञानयोगामाजीं एकीं ।
जे आपुलिया ठाकी ।
हांवें भरे ॥ ८१ ॥
तेथ सगळिये चित्तवृत्ती ।
त्यागु करणें या रीती ।
निष्कामें पूर्णाहुती ।
हुताशीं जैसी ॥ ८२ ॥
कां सुकुळीनें आपुली ।
आत्मजा सत्कुळींचि दिधली ।
हें असो लक्ष्मी स्थिरावली ।
मुकुंदीं जैसी ॥ ८३ ॥
तैसे निर्विकल्पपणें ।
जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें ।
तो तिजा गुण म्हणे ।
श्रीकृष्णनाथु ॥ ८४ ॥
आतां देहवाचाचित्तें ।
यथासंपन्नें वित्तें ।
वैरी जालियाही आर्तातें ।
न वंचणे जें कां ॥ ८५ ॥
पत्र पुष्प छाया ।
फळें मूळ धनंजया ।
वाटेचा न चुके आलिया ।
वृक्षु जैसा ॥ ८६ ॥
तैसें मनौनि धनधान्यवरी ।
विद्यमानें आल्या अवसरीं ।
श्रांताचिये मनोहारीं ।
उपयोगा जाणें ॥ ८७ ॥
तयां नांव जाण दान ।
जें मोक्षनिधानाचें अंजन ।
हें असो आइक चिन्ह ।
दमाचें तें ॥ ८८ ॥
तरी विषयेंद्रियां मिळणी ।
करूनि घापे वितुटणी ।
जैसें तोडिजे खड्गपाणी ।
पारकेया ॥ ८९ ॥
तैसा विषयजातांचा वारा ।
वाजों नेदिजे इंद्रियद्वारां ।
इये बांधोनि प्रत्याहारा ।
हातीं वोपी ॥ ९० ॥
आंतुला चित्ताचें अंगवरीं ।
प्रवृत्ति पळे पर बाहेरी ।
आगी सुयिजे दाहींहि द्वारीं ।
वैराग्याची ॥ ९१ ॥
श्वासोश्वासाहुनी बहुवसें ।
व्रतें आचरे खरपुसें ।
वोसंतिता रात्रिदिवसें ।
नाराणुक जया ॥ ९२ ॥
पैं दमु ऐसा म्हणिपे ।
तो हा जाण स्वरूपें ।
यागार्थुही संक्षेपें ।
सांगों ऐक ॥ ९३ ॥
तरी ब्राह्मण करूनि धुरे ।
स्त्रियादिक पैल मेरे ।
माझारीं अधिकारें ।
आपुलालेनि ॥ ९४ ॥
जया जे सर्वोत्तम ।
भजनीय देवताधर्म ।
ते तेणें यथागम ।
विधी यजिजे ॥ ९५ ॥
जैसा द्विज षट्कर्में करी ।
शूद्र तयातें नमस्कारी ।
कीं दोहींसही सरोभरी ।
निपजे यागु ॥ ९६ ॥
तैसें अधिकारपर्यालोचें ।
हें यज्ञ करणें सर्वांचें ।
परी विषय विष फळाशेचें ।
न घापे माजीं ॥ ९७ ॥
आणि मी कर्ता ऐसा भावो ।
नेदिजे देहाचेनि द्वारें जावों ।
ना वेदाज्ञेसि तरी ठावो ।
होइजे स्वयें ॥ ९८ ॥
अर्जुना एवं यज्ञु ।
सर्वत्र जाण साज्ञु ।
कैवल्यमार्गींचा अभिज्ञु ।
सांगाती हा ॥ ९९ ॥
आतां चेंडुवें भूमी हाणिजे ।
नव्हे तो हाता आणिजे ।
कीं शेतीं बीं विखुरिजे ।
परी पिकीं लक्ष ॥ १०० ॥
नातरी ठेविलें देखावया ।
आदर कीजे दिविया ।
कां शाखा फळें यावया ।
सिंपिजे मूळ ॥ १०१ ॥
हें बहु असो आरिसा ।
आपणपें देखावया जैसा ।
पुढतपुढती बहुवसा ।
उटिजे प्रीती ॥ १०२ ॥
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु ।
तो होआवयालागीं गोचरु ।
श्रुतीचा निरंतरु ।
अभ्यासु करणें ॥ १०३ ॥
तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र ।
येरा स्तोत्र कां नाममंत्र ।
आवर्तवणें पवित्र ।
पावावया तत्त्व ॥ १०४ ॥
पार्था गा स्वाध्यावो ।
बोलिजे तो हा म्हणे देवो ।
आतां तप शब्दाभिप्रावो ।
आईक सांगों ॥ १०५ ॥
तरी दानें सर्वस्व देणें ।
वेंचणें तें व्यर्थ करणें ।
जैसे फळोनि स्वयें सुकणें ।
इंद्रावणी जेवीं ॥ १०६ ॥
नाना धूपाचा अग्निप्रवेशु ।
कनकीं तुकाचा नाशु ।
पितृपक्षु पोषिता र्हासु ।
चंद्राचा जैसा ॥ १०७ ॥
तैसा स्वरूपाचिया प्रसरा -।
लागीं प्राणेंद्रियशरीरां ।
आटणी करणें जें वीरा ।
तेंचि तप ॥ १०८ ॥
अथवा अनारिसें ।
तपाचें रूप जरी असे ।
तरी जाण जेवीं दुधीं हंसें ।
सूदली चांचू ॥ १०९ ॥
तैसें देहजीवाचिये मिळणीं ।
जो उदयजत सूये पाणी ।
तो विवेक अंतःकरणीं ।
जागवीजे ॥ ११० ॥
पाहतां आत्मयाकडे ।
बुद्धीचा पैसु सांकडें ।
सनिद्र स्वप्न बुडे ।
जागणीं जैसें ॥ १११ ॥
तैसा आत्मपर्यालोचु ।
प्रवर्ते जो साचु ।
तपाचा हा निर्वेचु ।
धनुर्धरा ॥ ११२ ॥
आतां बाळाच्या हितीं स्तन्य ।
जैसें नानाभूतीं चैतन्य ।
तैसें प्राणिमात्रीं सौजन्य ।
आर्जव तें ॥ ११३ ॥
अहिंसा सत्यमक्रोध्स्त्यागः
शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं
मार्दवं ह्रीरचापलम् ॥ २ ॥
आणि जगाचिया सुखोद्देशें ।
शरीरवाचामानसें ।
राहाटणें तें अहिंसे ।
रूप जाण ॥ ११४ ॥
आतां तीख होऊनि मवाळ ।
जैसें जातीचें मुकुळ ।
कां तेज परी शीतळ ।
शशांकाचें ॥ ११५ ॥
शके दावितांचि रोग फेडूं ।
आणि जिभे तरी नव्हे कडु ।
ते वोखदु नाहीं मा घडू ।
उपमा कैंची ॥ ११६ ॥
तरी मऊपणें बुबुळे ।
झगडतांही परी नाडळे ।
एर्हवीं फोडी कोंराळें ।
पाणी जैसें ॥ ११७ ॥
तैसें तोडावया संदेह ।
तीख जैसें कां लोह ।
श्राव्यत्वें तरी माधुर्य ।
पायीं घालीं ॥ ११८ ॥
ऐकों ठातां कौतुकें ।
कानातें निघती मुखें ।
जें साचारिवेचेनि बिकें ।
ब्रह्मही भेदी ॥ ११९ ॥
किंबहुना प्रियपणे ।
कोणातेंही झकऊं नेणे ।
यथार्थ तरी खुपणें ।
नाहीं कवणा ॥ १२० ॥
एर्हवीं गोरी कीर काना गोड ।
परी साचाचा पाखाळीं कीड ।
आगीचें करणें उघड ।
परी जळों तें साच ॥ १२१ ॥
कानीं लागतां महूर ।
अर्थें विभांडी जिव्हार ।
तें वाचा नव्हे सुंदर ।
लांवचि पां ॥ १२२ ॥
परी अहितीं कोपोनि सोप ।
लालनीं मऊ जैसें पुष्प ।
तिये मातेचें स्वरूप ।
जैसें कां होय ॥ १२३ ॥
तैसें श्रवणसुख चतुर ।
परीणमोनि साचार ।
बोलणें जें अविकार ।
तें सत्य येथें ॥ १२४ ॥
आतां घालितांही पाणी ।
पाषाणीं न निघे आणी ।
कां मथिलिया लोणी ।
कांजी नेदी ॥ १२५ ॥
त्वचा पायें शिरीं ।
हालेयाही फडे न करी ।
वसंतींही अंबरीं ।
न होती फुलें ॥ १२६ ॥
नाना रंभेचेनिही रूपें ।
शुकीं नुठिजेचि कंदर्पें ।
कां भस्मीं वन्हि न उद्दीपे ।
घृतेंही जेवीं ॥ १२७ ॥
तेवींचि कुमारु क्रोधें भरे ।
तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें ।
तियें निमित्तेंही अपारें ।
मीनलिया ॥ १२८ ॥
परी धातयाही पायां पडतां ।
नुठी गतायु पंडुसुता ।
तैसी नुपजे उपजवितां ।
क्रोधोर्मी गा ॥ १२९ ॥
अक्रोधत्व ऐसें ।
नांव तें ये दशे ।
जाण ऐसें श्रीनिवासें ।
म्हणितलें तया ॥ १३० ॥
आतां मृत्तिकात्यागें घटु ।
तंतुत्यागें पटु ।
त्यजिजे जेवीं वटु ।
बीजत्यागें ॥ १३१ ॥
कां त्यजुनि भिंतिमात्र ।
त्यजिजे आघवेंचि चित्र ।
कां निद्रात्यागें विचित्र ।
स्वप्नजाळ ॥ १३२ ॥
नाना जळत्यागें तरंग ।
वर्षात्यागें मेघ ।
त्यजिजती जैसे भोग ।
धनत्यागें ॥ १३३ ॥
तेवीं बुद्धिमंतीं देहीं ।
अहंता सांडूनि पाहीं ।
सांडिजे अशेषही ।
संसारजात ॥ १३४ ॥
तया नांव त्यागु ।
म्हणे तो यज्ञांगु ।
हे मानूनि सुभगु ।
पार्थु पुसे ॥ १३५ ॥
आतां शांतीचें लिंग ।
तें व्यक्त मज सांग ।
देवो म्हणती चांग ।
अवधान देईं ॥ १३६ ॥
तरी गिळोनि ज्ञेयातें ।
ज्ञाता ज्ञानही माघौतें ।
हारपें निरुतें ।
ते शांति पैं गा ॥ १३७ ॥
जैसा प्रळयांबूचा उभडु ।
बुडवूनि विश्वाचा पवाडु ।
होय आपणपें निबिडु ।
आपणचि ॥ १३८ ॥
मग उगम ओघ सिंधु ।
हा नुरेचि व्यवहारभेदु ।
परी जलैक्याचा बोधु ।
तोही कवणा ? ॥ १३९ ॥
तैसी ज्ञेया देतां मिठी ।
ज्ञातृत्वही पडे पोटीं ।
मग उरे तेंचि किरीटी ।
शांतीचें रूप ॥ १४० ॥
आतां कदर्थवीत व्याधी ।
बळीकरणाचिया आधीं ।
आपपरु न शोधी ।
सद्वैद्यु जैसा ॥ १४१ ॥
का चिखलीं रुतली गाये ।
धडभाकड न पाहे ।
जो तियेचिया ग्लानी होये ।
कालाभुला ॥ १४२ ॥
नाना बुडतयातें सकरुणु ।
न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु ।
काढूनि राखे प्राणु ।
हेंचि जाणे ॥ १४३ ॥
कीं माय वनीं पापियें ।
उघडी केली विपायें ।
ते नेसविल्यावीण न पाहे ।
शिष्टु जैसा ॥ १४४ ॥
तैसे अज्ञानप्रमादादिकीं ।
कां प्राक्तनहीन सदोखीं ।
निंदत्वाच्या सर्वविखीं ।
खिळिले जे ॥ १४५ ॥
तयां आंगीक आपुलें ।
देऊनियां भलें ।
विसरविजती सलें ।
सलतीं तियें ॥ १४६ ॥
अगा पुढिलाचा दोखु ।
करूनि आपुलिये दिठी चोखु ।
मग घापे अवलोकु ।
तयावरी ॥ १४७ ॥
जैसा पुजूनि देवो पाहिजे ।
पेरूनि शेता जाइजे ।
तोषौनि प्रसादु घेइजे ।
अतिथीचा ॥ १४८ ॥
तैसें आपुलेनि गुणें ।
पुढिलाचें उणें ।
फेडुनियां पाहणें ।
तयाकडे ॥ १४९ ॥
वांचूनि न विंधिजें वर्मीं ।
नातुडविजे अकर्मीं ।
न बोलविजे नामीं ।
सदोषीं तिहीं ॥ १५० ॥
वरी कोणे एकें उपायें ।
पडिलें तें उभें होये ।
तेंच कीजे परी घाये ।
नेदावे वर्मीं ॥ १५१ ॥
पैं उत्तमाचियासाठीं ।
नीच मानिजे किरीटी ।
हें वांचोनि दिठी ।
दोषु न घेपे ॥ १५२ ॥
अगा अपैशून्याचें लक्षण ।
अर्जुना हें फुडें जाण ।
मोक्षमार्गींचें सुखासन ।
मुख्य हें गा ॥ १५३ ॥
आतां दया ते ऐसी ।
पूर्णचंद्रिका जैसी ।
निववितां न कडसी ।
सानें थोर ॥ १५४ ॥
तैसें दुःखिताचें शिणणें ।
हिरतां सकणवपणें ।
उत्तमाधम नेणें ।
विवंचूं गा ॥ १५५ ॥
पैं जगीं जीवनासारिखें ।
वस्तु अंगवरी उपखें ।
परी जातें जीवित राखे ।
तृणाचेंहि ॥ १५६ ॥
तैसें पुढिलाचेनि तापें ।
कळवळलिये कृपें ।
सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें ।
थोडेंचि गमे ॥ १५७ ॥
निम्न भरलियाविणें ।
पाणी ढळोंचि नेणे ।
तेवीं श्रांता तोषौनि जाणें ।
सामोरें पां ॥ १५८ ॥
पैं पायीं कांटा नेहटे ।
तंव व्यथा जीवीं उमटे ।
तैसा पोळे संकटें ।
पुढिलांचेनि ॥ १५९ ॥
कां पावो शीतळता लाहे ।
कीं ते डोळ्याचिलागीं होये ।
तैसा परसुखें जाये ।
सुखावतु ॥ १६० ॥
किंबहुना तृषितालागीं ।
पाणी आरायिलें असे जगीं ।
तैसें दुःखितांचे सेलभागीं ।
जिणें जयाचें ॥ १६१ ॥
तो पुरुषु वीरराया ।
मूर्तिमंत जाण दया ।
मी उदयजतांचि तया ।
ऋणिया लाभें ॥ १६२ ॥
आतां सूर्यासि जीवें ।
अनुसरलिया राजीवें ।
परी तें तो न शिवे ।
सौरभ्य जैसें ॥ १६३ ॥
कां वसंताचिया वाहाणीं ।
आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी ।
ते न करीतुचि घेणी ।
निगाला तो ॥ १६४ ॥
हें असो महासिद्धीसी ।
लक्ष्मीही आलिया पाशीं ।
परी महाविष्णु जैसी ।
न गणीच ते ॥ १६५ ॥
तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे ।
भोग पाईक जालिया इच्छेचे ।
परी भोगावे हें न रुचे ।
मनामाजीं ॥ १६६ ॥
बहुवें काय कौतुकीं ।
जीव नोहे विषयाभिलाखी ।
अलोलुप्त्वदशा ठाउकी ।
जाण ते हे ॥ १६७ ॥
आतां माशियां जैसें मोहळ ।
जळचरां जेवीं जळ ।
कां पक्षियां अंतराळ ।
मोकळें हें ॥ १६८ ॥
नातरी बाळकोद्देशें ।
मातेचें स्नेह जैसें ।
कां वसंतीच्या स्पर्शें ।
मऊ मलयानिळु ॥ १६९ ॥
डोळ्यां प्रियाची भेटी ।
कां पिलियां कूर्मीची दिठी ।
तैसीं भूतमात्रीं राहटी ।
मवाळ ते ॥ १७० ॥
स्पर्शें अतिमृदु ।
मुखीं घेतां सुस्वादु ।
घ्राणासि सुगंधु ।
उजाळु आंगें ॥ १७१ ॥
तो आवडे तेवढा घेतां ।
विरुद्ध जरी न होतां ।
तरी उपमे येता ।
कापूर कीं ॥ १७२ ॥
परी महाभूतें पोटीं वाहे ।
तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।
या विश्वानुसार होये ।
गगन जैसें ॥ १७३ ॥
काय सांगों ऐसें जिणें ।
जें जगाचेनि जीवें प्राणें ।
तया नांव म्हणें ।
मार्दव मी ॥ १७४ ॥
आतां पराजयें राजा ।
जैसा कदर्थिजे लाजा ।
कां मानिया निस्तेजा ।
निकृष्टास्तव ॥ १७५ ॥
नाना चांडाळ मंदिराशीं ।
अवचटें आलिया संन्याशी ।
मग लाज होय जैसी ।
उत्तमा तया ॥ १७६ ॥
क्षत्रिया रणीं पळोनि जाणें ।
तें कोण साहे लाजिरवाणें ।
कां वैधव्यें पाचारणें ।
महासतियेतें ॥ १७७ ॥
रूपसा उदयलें कुष्ट ।
संभावितां कुटीचें बोट ।
तया लाजा प्राणसंकट ।
होय जैसें ॥ १७८ ॥
तैसें औटहातपणें ।
जें शव होऊनि जिणें ।
उपजों उपजों मरणें ।
नावानावा ॥ १७९ ॥
तियें गर्भमेदमुसें ।
रक्तमूत्ररसें ।
वोंतीव होऊनि असे ।
तें लाजिरवाणें ॥ १८० ॥
हें बहु असो देहपणें ।
नामरूपासि येणें ।
नाहीं गा लाजिरवाणें ।
तयाहूनी ॥ १८१ ॥
ऐसैसिया अवकळा ।
घेपे शरीराचा कंटाळा ।
ते लाज पैं निर्मळा ।
निसुगा गोड ॥ १८२ ॥
आतां सूत्रतंतु तुटलिया ।
चेष्टाचि ठाके सायखडिया ।
तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां ।
खुंटे गती ॥ १८३ ॥
कीं मावळलिया दिनकरु ।
सरे किरणांचा प्रसरु ।
तैसा मनोजयें प्रकारु ।
ज्ञानेंद्रियांचा ॥ १८४ ॥
एवं मनपवननियमें ।
होती दाही इंद्रियें अक्षमें ।
तें अचापल्य वर्में ।
येणें होय ॥ १८५ ॥
तेजः क्षमा धृतिः
शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति संपदं
दैवीमभिजातस्य भारत ॥ ३ ॥
आतां ईश्वरप्राप्तीलागीं ।
प्रवर्ततां ज्ञानमार्गीं ।
धिंवसेयाचि आंगी ।
उणीव नोहे ॥ १८६ ॥
वोखटें मरणा{ऐ}सें ।
तेंही आलें अग्निप्रवेशें ।
परी प्राणेश्वरोद्देशें ।
न गणीचि सती ॥ १८७ ॥
तैसें आत्मनाथाचिया आधी ।
लाऊनि विषयविषाची बाधी ।
धांवों आवडे पाणधी ।
शून्याचिये ॥ १८८ ॥
न ठाके निषेधु आड ।
न पडे विधीची भीड ।
नुपजेचि जीवीं कोड ।
महासिद्धीचें ॥ १८९ ॥
ऐसें ईश्वराकडे निज ।
धांवे आपसया सहज ।
तया नांव तेज ।
आध्यात्मिक तें ॥ १९० ॥
आतां सर्वही साहातिया गरिमा ।
गर्वा न ये तेचि क्षमा ।
जैसें देह वाहोनि रोमा ।
वाहणें नेणें ॥ १९१ ॥
आणि मातलिया इंद्रियांचे वेग ।
कां प्राचीनें खवळले रोग ।
अथवा योगवियोग ।
प्रियाप्रियांचे ॥ १९२ ॥
यया आघवियांचाचि थोरु ।
एके वेळे आलिया पूरु ।
तरी अगस्त्य कां होऊनि धीरु ।
उभा ठाके ॥ १९३ ॥
आकाशीं धूमाची रेखा ।
उठिली बहुवा आगळिका ।
ते गिळी येकी झुळुका ।
वारा जेवीं ॥ १९४ ॥
तैसें अधिभूताधिदैवां ।
अध्यात्मादि उपद्रवां ।
पातलेयां पांडवा ।
गिळुनि घाली ॥ १९५ ॥
ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं ।
उचलूनि धैर्या जें चांगावें करी ।
धृति म्हणिपे अवधारीं ।
तियेतें गा ॥ १९६ ॥
आतां निर्वाळूनि कनकें ।
भरिला गांगें पीयूखें ।
तया कलशाचियासारिखें ।
शौच असें ॥ १९७ ॥
जे आंगीं निष्काम आचारु ।
जीवीं विवेकु साचारु ।
तो सबाह्य घडला आकारु ।
शुचित्वाचाचि ॥ १९८ ॥
कां फेडित पाप ताप ।
पोखीत तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप ।
गंगेचें जैसें ॥ १९९ ॥
कां जगाचें आंध्य फेडितु ।
श्रियेचीं राउळें उघडितु ।
निघे जैसा भास्वतु ।
प्रदक्षिणे ॥ २०० ॥
तैसीं बांधिलीं सोडिता ।
बुडालीं काढिता ।
सांकडी फेडिता ।
आर्तांचिया ॥ २०१ ॥
किंबहुना दिवसराती ।
पुढिलांचें सुख उन्नति ।
आणित आणित स्वार्थीं ।
प्रवेशिजे ॥ २०२ ॥
वांचूनि आपुलिया काजालागीं ।
प्राणिजाताच्या अहितभागीं ।
संकल्पाचीही आडवंगी ।
न करणें जें ॥ २०३ ॥
पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ।
ऐकसी जिया किरीटी ।
तें सांगितलें हें दिठी ।
पाहों ये तैसें ॥ २०४ ॥
आणि गंगा शंभूचा माथां ।
पावोनि संकोचे जेवीं पार्था ।
तेवीं मान्यपणें सर्वथा ।
लाजणें जें ॥ २०५ ॥
तें हें पुढत पुढती ।
अमानित्व जाण सुमती ।
मागां सांगितलेंसे किती ।
तेंचि तें बोलों ॥ २०६ ॥
एवं इहीं सव्विसें ।
ब्रह्मसंपदा हे वसत असे ।
मोक्षचक्रवर्तीचें जैसें ।
अग्रहार होय ॥ २०७ ॥
नाना हे संपत्ति दैवी ।
या गुणतीर्थांची नीच नवी ।
निर्विण्णसगरांची दैवी ।
गंगाचि आली ॥ २०८ ॥
कीं गणकुसुमांची माळा ।
हे घेऊनि मुक्तिबाळा ।
वैराग्यनिरपेक्षाचा गळा ।
गिंवसीत असे ॥ २०९ ॥
कीं सव्विसें गुणज्योती ।
इहीं उजळूनि आरती ।
गीता आत्मया निजपती ।
नीरांजना आली ॥ २१० ॥
उगळितें निर्मळें ।
गुण इयेंचि मुक्ताफळें ।
दैवी शुक्तिकळें ।
गीतार्णवींची ॥ २११ ॥
काय बहु वानूं ऐसी ।
अभिव्यक्ती ये अपैसी ।
केलें दैवी गुणराशी ।
संपत्तिरूप ॥ २१२ ॥
आतां दुःखाची आंतुवट वेली ।
दोषकाट्यांची जरी भरली ।
तरी निजाभिधानी घाली ।
आसुरी ते ॥ २१३ ॥
पैं त्याज्य त्यजावयालागीं ।
जाणावी जरी अनुपयोगी ।
तरी ऐका ते चांगी ।
श्रोत्रशक्ती ॥ २१४ ॥
तरी नरकव्यथा थोरी ।
आणावया दोषींघोरीं ।
मेळु केला ते आसुरी ।
संपत्ति हे ॥ २१५ ॥
नाना विषवर्गु एकवटु ।
तया नांव जैसा बासटु ।
आसुरी संपत्ती हा खोटु ।
दोषांचा तैसा ॥ २१६ ॥
दम्भो दर्पोऽभिमानश्च
क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य
पार्थ संपदमासुरीम् ॥ ४ ॥
तरी तयाचि असुरां ।
दोषांमाजीं जया वीरा ।
वाडपणाचा डांगोरा ।
तो दंभु ऐसा ॥ २१७ ॥
जैसी आपुली जननी ।
नग्न दाविलिया जनीं ।
ते तीर्थचि परी पतनीं ।
कारण होय ॥ २१८ ॥
कां विद्या गुरूपदिष्टा ।
बोभाइलिया चोहटां ।
तरी इष्टदा परी अनिष्टा ।
हेतु होती ॥ २१९ ॥
पैं आंगें बुडतां महापूरीं ।
जे वेगें काढी पैलतीरीं ।
ते नांवचि बांधिलिया शिरीं ।
बुडवी जैसी ॥ २२० ॥
कारण जें जीविता ।
तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता ।
होय विष ॥ २२१ ॥
तैसा दृष्टादृष्टाचा सखा ।
धर्मु जाला तो फोकारिजे देखा ।
तरी तारिता तोचि दोखा- ।
लागीं होय ॥ २२२ ॥
म्हणौनि वाचेचा चौबारा ।
घातलिया धर्माचा पसारा ।
धर्मुचि तो अधर्मु होय वीरा ।
तो दंभु जाणे ॥ २२३ ॥
आतां मूर्खाचिये जिभे ।
अक्षरांचा आंबुखा सुभे ।
आणि तो ब्रह्मसभे ।
न रिझे जैसा ॥ २२४ ॥
कां मादुरी लोकांचा घोडा ।
गजपतिही मानी थोडा ।
कां कांटियेवरिल्या सरडा ।
स्वर्गुही नीच ॥ २२५ ॥
तृणाचेनि इंधनें ।
आगी धांवे गगनें ।
थिल्लरबळें मीनें ।
न गणिजे सिंधु ॥ २२६ ॥
तैसा माजे स्त्रिया धनें ।
विद्या स्तुती बहुतें मानें ।
एके दिवसींचेनि परान्नें ।
अल्पकु जैसा ॥ २२७ ॥
अभ्रच्छायेचिया जोडी ।
निदैवु घर मोडी ।
मृगांबु देखोनि फोडी ।
पणियाडें मूर्ख ॥ २२८ ॥
किंबहुना ऐसैसें ।
उतणें जें संपत्तिमिसें ।
तो दर्पु गा अनारिसें ।
न बोलें घेईं ॥ २२९ ॥
आणि जगा वेदीं विश्वासु ।
आणि विश्वासीं पूज्य ईशु ।
जगीं एक तेजसु ।
सूर्युचि हा ॥ २३० ॥
जगस्पृहे आस्पद ।
एक सार्वभौमपद ।
न मरणें निर्विवाद ।
जगा पढियें ॥ २३१ ॥
म्हणौनि जग उत्साहें ।
यातें वानूं जाये ।
कीं तें आइकोनि मत्सरु वाहे ।
फुगों लागे ॥ २३२ ॥
म्हणे ईश्वरातें खायें ।
तया वेदा विष सूयें ।
गौरवामाजीं त्राये ।
भंगीत असे ॥ २३३ ॥
पतंगा नावडे ज्योती ।
खद्योता भानूची खंती ।
टिटिभेनें आपांपती ।
वैरी केला ॥ २३४ ॥
तैसा अभिमानाचेनि मोहें ।
ईश्वराचेंही नाम न साहे ।
बापातें म्हणे मज हे ।
सवती जाली ॥ २३५ ॥
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु ।
तो अभिमानी परमलंडु ।
रौरवाचा रूढु ।
मार्गुचि पै ॥ २३६ ॥
आणि पुढिलांचें सुख ।
देखणियाचें होय मिख ।
चढे क्रोधाग्नीचें विख ।
मनोवृत्ती ॥ २३७ ॥
शीतळाचिये भेटी ।
तातला तेलीं आगी उठी ।
चंद्रु देखोनि जळे पोटीं ।
कोल्हा जैसा ॥ २३८ ॥
विश्वाचें आयुष्य जेणें उजळे ।
तो सूर्यु उदैला देखोनि सवळे ।
पापिया फुटती डोळे ।
डुडुळाचे ॥ २३९ ॥
जगाची सुखपहांट ।
चोरां मरणाहूनि निकृष्ट ।
दुधाचें काळकूट ।
होय व्याळीं ॥ २४० ॥
अगाधें समुद्रजळें ।
प्राशितां अधिक जळे ।
वडवाग्नी न मिळे ।
शांति कहीं ॥ २४१ ॥
तैसा विद्याविनोदविभवें ।
देखे पुढिलांचीं दैवें ।
तंव तंव रोषु दुणावे ।
क्रोधु तो जाण ॥ २४२ ॥
आणि मन सर्पाची कुटी ।
डोळे नाराचांची सुटी ।
बोलणें ते वृष्टी ।
इंगळांची ॥ २४३ ॥
येर जें क्रियाजात ।
तें तिखयाचें कर्वत ।
ऐसें सबाह्य खसासित ।
जयाचें गा ॥ २४४ ॥
तो मनुष्यांत अधमु जाण ।
पारुष्याचें अवतरण ।
आतां आइक खूण ।
अज्ञानाची ॥ २४५ ॥
तरी शीतोष्णस्पर्शा ।
निवाडु नेणें पाषाणु जैसा ।
कां रात्री आणि दिवसा ।
जात्यंधु तो ॥ २४६ ॥
आगी उठिला आरोगणें ।
जैसा खाद्याखाद्य न म्हणे ।
कां परिसा पाडु नेणें ।
सोनया लोहा ॥ २४७ ॥
नातरी नानारसीं ।
रिघोनि दर्वी जैसी ।
परी रसस्वादासी ।
चाखों नेणें ॥ २४८ ॥
कां वारा जैसा पारखी ।
नव्हेचि गा मार्गामार्गविखीं ।
तैसे कृत्याकृत्यविवेकीं ।
अंधपण जें ॥ २४९ ॥
हें चोख हें मैळ ।
ऐसें नेणोनियां बाळ ।
देखे तें केवळ ।
मुखींचि घाली ॥ २५० ॥
तैसें पापपुण्याचें खिचटें ।
करोनि खातां बुद्धिचेष्टे ।
कडु मधुर न वाटे ।
ऐसी जे दशा ॥ २५१ ॥
तिये नाम अज्ञान ।
या बोला नाहीं आन ।
एवं साही दोषांचें चिन्ह ।
सांगितलें ॥ २५२ ॥
इहींच साही दोषांगीं ।
हे आसुरी संपत्ति दाटुगी ।
जैसें थोर विषय सुभगे अंगीं ।
अंग सानें ॥ २५३ ॥
कां तिघा वन्हींच्या पांती ।
पाहतां थोडे ठाय गमती ।
परी विश्वही प्राणाहुती ।
करूं न पुरे ॥ २५४ ॥
धातयाही गेलिया शरण ।
त्रिदोषीं न चुके मरण ।
तया तिहींची दुणी जाण ।
साही दोष हे ॥ २५५ ॥
इहीं साही दोषीं संपूर्णीं ।
जाली इयेचि उभारणी ।
म्हणौनि आसुरी उणी ।
संपदा नव्हे ॥ २५६ ॥
परी क्रूरग्रहांची जैसी ।
मांदी मिळे एकेचि राशी ।
कां येती निंदकापासीं ।
अशेष पापें ॥ २५७ ॥
मरणाराचें आंग ।
पडिघाती अवघेचि रोग ।
कां कुमुहूर्तीं दुर्योग ।
एकवटती ॥ २५८ ॥
विश्वासला आतुडवीजे चोरा ।
शिणला सुइजे महापुरा ।
तैसें दोषीं इहीं नरा ।
अनिष्ट कीजे ॥ २५९ ॥
कां आयुष्य जातिये वेळे ।
शेळिये सातवेउळी मिळे ।
तैसे साही दोष सगळे ।
जोडती तया ॥ २६० ॥
मोक्षमार्गाकडे ।
जैं यांचा आंबुखा पडे ।
तैं न निघे म्हणौनि बुडे ।
संसारीं तो ॥ २६१ ॥
अधमां योनींच्या पाउटीं ।
उतरत जो किरीटी ।
स्थावरांही तळवटीं ।
बैसणें घे ॥ २६२ ॥
हें असो तयाच्या ठायीं ।
मिळोनि साही दोषीं इहीं ।
आसुरी संपत्ति पाहीं ।
वाढविजे ॥ २६३ ॥
ऐसिया या दोनी ।
संपदा प्रसिद्धा जनीं ।
सांगितलिया चिन्हीं ।
वेगळाल्या ॥ २६४ ॥
दैवी संपद्विमोक्षाय
निबन्धायासुरी मता ।
मा शुचः संपदं
दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५ ॥
इया दोन्हींमाजीं पहिली ।
दैवी जे म्हणितली ।
ते मोक्षसूर्यें पाहली ।
उखाचि जाण ॥ २६५ ॥
येरी जे दुसरी ।
संपत्ति कां आसुरी ।
ते मोहलोहाची खरी ।
सांखळी जीवां ॥ २६६ ॥
परी हें आइकोनि झणें ।
भय घेसी हो मनें ।
काय रात्रीचा दिनें ।
धाकु धरिजे ॥ २६७ ॥
हे आसुरी संपत्ति तया ।
बंधालागीं धनंजया ।
जो साही दोषां ययां ।
आश्रयो होय ॥ २६८ ॥
तूं तंव पांडवा ।
सांगितलेया दैवा ।
गुणनिधी बरवा ।
जन्मलासी ॥ २६९ ॥
म्हणौनि पार्था तूं या ।
दैवी संपत्ती स्वामिया ।
होऊनि यावें उवाया ।
कैवल्याचिया ॥ २७० ॥
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन्
दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त
आसुरं पार्थ मे श्रुणु ॥ ६ ॥
आणि दैवां आसुरां ।
संपत्तिवंतां नरां ।
अनादिसिद्ध उजगरा ।
राहाटीचा आहे ॥ २७१ ॥
जैसें रात्रीच्या अवसरीं ।
व्यापारिजे निशाचरीं ।
दिवसा सुव्यवहारीं ।
मनुष्यादिकीं ॥ २७२ ॥
तैसिया आपुलालिया राहाटीं ।
वर्तती दोन्ही सृष्टी ।
दैवी आणि किरीटी ।
आसुरी येथ ॥ २७३ ॥
तेवींचि विस्तारूनि दैवी ।
ज्ञानकथनादि प्रस्तावीं ।
मागील ग्रंथीं बरवी ।
सांगितली ॥ २७४ ॥
आतां आसुरी जे सृष्टी ।
तेथिंची उपलऊं गोठी ।
अवधानाची दिठी ।
दे पां निकी ॥ २७५ ॥
तरी वाद्येंवीण नादु ।
नेदी कवणाही सादु ।
कां अपुष्पीं मकरंदु ।
न लभे जैसा ॥ २७६ ॥
तैसी प्रकृति हे आसुर ।
एकली नोहे गोचर ।
जंव एकाधें शरीर ।
माल्हातीना ॥ २७७ ॥
मग आविष्कारला लांकुडें ।
पावकु जैसा जोडे ।
तैसी प्राणिदेहीं सांपडे ।
आटोपली हे ॥ २७८ ॥
ते वेळीं जे वाढी ऊंसा ।
तेचि आंतुला रसा ।
देहाकारु होय तैसा ।
प्राणियांचा ॥ २७९ ॥
आतां तयाचि प्राणियां ।
रूप करूं धनंजया ।
घडले जे आसुरीया ।
दोषवृंदीं ॥ २८० ॥
प्रवृत्तिं च निवृत्तिं च
जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो
न सत्यं तेषु विद्यते ॥ ७ ॥
तरी पुण्यालागीं प्रवृत्ती ।
कां पापाविषयीं निवृत्ती ।
या जाणणेयाची राती ।
तयांचें मन ॥ २८१ ॥
निगणेया आणि प्रवेशा ।
चित्त नेदीतु आवेशा ।
कोशकिटु जैसा ।
जाचिन्नला पैं ॥ २८२ ॥
कां दिधलें मागुती येईल ।
कीं न ये हें पुढील ।
न पाहातां दे भांडवल ।
मूर्ख चोरां ॥ २८३ ॥
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी ।
नेणिजती आसुरीं जनीं ।
आणि शौच ते स्वप्नीं ।
देखती ना ते ॥ २८४ ॥
काळिमा सांडील कोळसा ।
वरी चोखी होईल वायसा ।
राक्षसही मांसा ।
विटों शके ॥ २८५ ॥
परी आसुरां प्राणियां ।
शौच नाहीं धनंजया ।
पवित्रत्व जेवीं भांडिया ।
मद्याचिया ॥ २८६ ॥
वाढविती विधीची आस ।
कां पाहाती वडिलांची वास ।
आचाराची भाष ।
नेणतीचि ते ॥ २८७ ॥
जैसें चरणें शेळियेचें ।
कां धावणें वारियाचें ।
जाळणें आगीचें ।
भलतेउतें ॥ २८८ ॥
तैसें पुढां सूनि स्वैर ।
आचरती ते गा आसुर ।
सत्येंसि कीर वैर ।
सदाचि तयां ॥ २८९ ॥
जरी नांगिया आपुलिया ।
विंचू करी गुदगुलिया ।
तरी साचा बोली बोलिया ।
बोलती ते ॥ २९० ॥
आपानाचेनि तोंडें ।
जरी सुगंधा येणें घडे ।
तरी सत्य तयां जोडे ।
आसुरांतें ॥ २९१ ॥
ऐसें ते न करितां कांहीं ।
आंगेंचि वोखटे पाहीं ।
आतां बोलती ते नवाई ।
सांगिजैल ॥ २९२ ॥
एर्हवीं करेयाच्या ठायीं चांग ।
तें तयासि कैचें नीट आंग ।
तैसा आसुरांचा प्रसंग ।
प्रसंगें परीस ॥ २९३ ॥
उधवणीचें जेवीं तोंड ।
उभळी धुंवाचे उभड ।
हें जाणिजे तेवीं उघड ।
सांगों ते बोल ॥ २९४ ॥
असत्यमप्रतिष्ठं ते
जगदाहुरनीश्वरम् ।
अपरस्परसंभूतं
किमन्यत् कामहैतुकम् ॥ ८ ॥
तरी विश्व हा अनादि ठावो ।
येथ नियंता ईश्वररावो ।
चावडिये न्यावो अन्यावो ।
निवडी वेदु ॥ २९५ ॥
वेदीं अन्यायीं पडे ।
तो निरयभोगें दंडे ।
सन्यायी तो सुरवाडें ।
स्वर्गीं जिये ॥ २९६ ॥
ऐसी हे विश्वव्यवस्था ।
अनादि जे पार्था ।
इयेतें म्हणती ते वृथा ।
अवघेंचि हें ॥ २९७ ॥
यज्ञमूढ ठकिले यागीं ।
देवपिसें प्रतिमालिंगीं ।
नागविले भगवे योगी ।
समाधिभ्रमें ॥ २९८ ॥
येथ आपुलेनि बळें ।
भोगिजे जें जें वेंटाळें ।
हें वांचोनि वेगळें ।
पुण्य आहे ? ॥ २९९ ॥
ना अशक्तपणें आंगिकें ।
वेगळवेंटाळीं न टकें ।
ऐसा गादिजेवीण विषयसुखें ।
तेंचि पाप ॥ ३०० ॥
प्राण घेपती संपन्नांचे ।
ते पाप जरी साचें ।
तरी सर्वस्व हाता ये तयांचें ।
हें पुण्यफळ कीं ? ॥ ३०१ ॥
बळी अबळातें खाय ।
हेंचि बाधित जरी होय ।
तरी मासयां कां न होय ।
निसंतान ? ॥ ३०२ ॥
आणि कुळें शोधूनि दोन्ही ।
कुमारेंचि शुभलग्नीं ।
मेळवीजती प्रजासाधनीं ।
हेतु जरी ॥ ३०३ ॥
तरी पशुपक्षादि जाती ।
जया मिती नाहीं संतती ।
तयां कोणें प्रतिपत्तीं ।
विवाह केले ? ॥ ३०४ ॥
चोरियेचें धन आलें ।
तरी तें कोणासि विष जालें ? ।
वालभें परद्वार केलें ।
कोढी कोणी होय ? ॥ ३०५ ॥
म्हणौनि देवो गोसांवी ।
तो धर्माधर्मु भोगवी ।
आणि परत्राच्या गांवीं ।
करी तो भोगी ॥ ३०६ ॥
परी परत्र ना देवो ।
न दिसे म्हणौनि तें वावो ।
आणि कर्ता निमे मा ठावो ।
भोग्यासि कवणु ? ॥ ३०७ ॥
येथ उर्वशिया इंद्र सुखी ।
जैसा कां स्वर्गलोकीं ।
तैसाचि कृमिही नरकीं ।
लोळतु श्लाघे ॥ ३०८ ॥
म्हणौनि नरक स्वर्गु ।
नव्हे पापपुण्यभागु ।
जे दोहीं ठायीं सुखभोगु ।
कामाचाचि तो ॥ ३०९ ॥
याकारणें कामें ।
स्त्रीपुरुषयुग्में ।
मिळती तेथ जन्मे ।
आघवें जग ॥ ३१० ॥
आणि जें जें अभिलाषें ।
स्वार्थालागीं हें पोषे ।
पाठीं परस्परद्वेषें ।
कामचि नाशी ॥ ३११ ॥
एवं कामावांचूनि कांहीं ।
जगा मूळचि आन नाहीं ।
ऐसें बोलती पाहीं ।
आसुर गा ते ॥ ३१२ ॥
आतां असो हें किडाळ ।
बोली न करूं पघळ ।
सांगतांचि सफोल ।
होतसे वाचा ॥ ३१३ ॥
एतां दृष्टिमवष्टभ्य
नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः
क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९ ॥
आणि ईश्वराचिया खंती ।
नुसधियाचि करिती चांथी ।
हेंही नाहीं चित्तीं ।
निश्चयो एकु ॥ ३१४ ॥
किंबहुना उघड ।
आंगी लाऊनियां पाखांड ।
नास्तिकपणाचें हाड ।
रोंविलें जीवीं ॥ ३१५ ॥
ते वेळीं स्वर्गालागीं आदरु ।
कां नरकाचा अडदरु ।
या वासनांचा अंकुरु ।
जळोनि गेला ॥ ३१६ ॥
मग केवळ ये देहखोडां ।
अमेध्योदकाचा बुडबुडा ।
विषयपंकीं सुहाडा ।
बुडाले गा ॥ ३१७ ॥
जैं आटावें होती जळचर ।
तैं डोहीं मिळतीं ढीवर ।
कां पडावें होय शरीर ।
तैं रोगा उदयो ॥ ३१८ ॥
उदैजणें केतूचें जैसें ।
विश्वा अनिष्टोद्देशें ।
जन्मती ते तैसे ।
लोकां आटूं ॥ ३१९ ॥
विरूढलिया अशुभ ।
फुटती तैं ते कोंभ ।
पापाचे कीर्तिस्तंभ ।
चालते ते ॥ ३२० ॥
आणि मागांपुढां जाळणें ।
वांचूनि आगी कांहीं नेणें ।
तैसें विरुद्धचि एक करणें ।
भलतेयां ॥ ३२१ ॥
परी तेंचि गा करणें ।
आदरिती संभ्रमें जेणें ।
तो आइक पार्था म्हणे ।
श्रीनिवासु ॥ ३२२ ॥
काममाश्रित्य दुष्पूरं
दम्भमानमदान्विताः ।
मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १० ॥
तरी जाळ पाणियें न भरे ।
आगी इंधन न पुरे ।
तयां दुर्भरांचिये धुरे ।
भुकाळु जो ॥ ३२३ ॥
तया कामाचा वोलावा ।
जीवीं धरुनिया पांडवा ।
दंभमानाचा मेळावा ।
मेळविती ॥ ३२४ ॥
मातलिया कुंजरा ।
आगळी जाली मदिरा ।
तैसा मदाचा ताठा तंव जरा ।
चढतां आंगीं ॥ ३२५ ॥
आणि आग्रहा तोचि ठावो ।
वरी मौढ्या{ऐ}सा सावावो ।
मग काय वानूं निर्वाहो ।
निश्चयाचा ॥ ३२६ ॥
जिहीं परोपतापु घडे ।
परावा जीवु रगडे ।
तिहीं कर्मीं होऊनि गाढे ।
जन्मवृत्ती ॥ ३२७ ॥
मग आपुलें केलें फोकारिती ।
आणि जगातें धिक्कारिती ।
दाहीं दिशीं पसरिती ।
स्पृहाजाळ ॥ ३२८ ॥
ऐसेनि गा आटोपें ।
थोरियें आणती पापें ।
धर्मधेनु खुरपें ।
सुटलें जैसें ॥ ३२९ ॥
चिन्तामपरिमेयां च
प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा
एतावदिति निश्चिताः ॥ ११ ॥
याचि एका आयती ।
तयाचिया कर्मप्रवृत्ती ।
आणि जिणियाही परौती ।
वाहती चिंता ॥ ३३० ॥
पाताळाहूनि निम्न ।
जियेचिये उंचीये सानें गगन ।
जें पाहातां त्रिभुवन ।
अणुही नोहे ॥ ३३१ ॥
ते योगपटाची मवणी ।
जीवीं अनियम चिंतवणी ।
जे सांडूं नेणें मरणीं ।
वल्लभा जैसी ॥ ३३२ ॥
तैसी चिंता अपार ।
वाढविती निरंतर ।
जीवीं सूनि असार ।
विषयादिक ॥ ३३३ ॥
स्त्रिया गाइलें आइकावें ।
स्त्रीरूप डोळां देखावें ।
सर्वेंद्रियें आलिंगावें ।
स्त्रियेतेंचि ॥ ३३४ ॥
कुरवंडी कीजे अमृतें ।
ऐसें सुख स्त्रियेपरौतें ।
नाहींचि म्हणौनि चित्तें ।
निश्चयो केला ॥ ३३५ ॥
मग तयाचि स्त्रीभोगा- ।
लागीं पाताळ स्वर्गा ।
धांवती दिग्विभागा ।
परौतेही ॥ ३३६ ॥
आशापाशशतैर्बद्धाः
कामक्रोधपरायाणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२ ॥
आमिषकवळु थोरी आशा ।
न विचारितां गिळी मासा ।
तैसें कीजे विषयाशा ।
तयांसि गा ॥ ३३७ ॥
वांछित तंव न पवती ।
मग कोरडियेचि आशेची संतती ।
वाढऊं वाढऊं होती ।
कोशकिडे ॥ ३३८ ॥
आणि पसरिला अभिलाषु ।
अपूर्णु होय तोचि द्वेषु ।
एवं कामक्रोधांहूनि अधिकु ।
पुरुषार्थु नाहीं ॥ ३३९ ॥
दिहा खोलणें रात्रीं जागोवा ।
ठाणांतरीयां जैसा पांडवा ।
अहोरात्रींही विसांवा ।
भेटेचिना ॥ ३४० ॥
तैसें उंचौनि लोटिलें कामें ।
नेहटती क्रोधाचिये ढेमे ।
तरी रागद्वेष प्रेमें ।
न माती केंही ॥ ३४१ ॥
तेवींचि जीवींचिया हांवा ।
विषयवासनांचा मेळावा ।
केला तरी भोगावा ।
अर्थें कीं ना ? ॥ ३४२ ॥
म्हणौनि भोगावयाजोगा ।
पुरता अर्थु पैं गा ।
आणावया जगा ।
झोंबती सैरा ॥ ३४३ ॥
एकातें साधूनि मारिती ।
एकाचि सर्वस्वें हरिती ।
एकालागीं उभारिती ।
अपाययंत्रें ॥ ३४४ ॥
पाशिकें पोतीं वागुरा ।
सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा ।
घेऊनि निघती डोंगरा ।
पारधी जैसें ॥ ३४५ ॥
ते पोसावया पोट ।
मारूनि प्राणियांचे संघाट ।
आणिती ऐसें निकृष्ट ।
तेंही करिती ॥ ३४६ ॥
परप्राणघातें ।
मेळविती वित्तें ।
मिळाल्या चित्तें ।
तोषणें कैसें ॥ ३४७ ॥
इदमद्य मया लब्धमिमं
प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे
भविष्यति पुनर्धनम् ॥ १३ ॥
म्हणे आजि मियां ।
संपत्ति बहुतेकांचिया ।
आपुल्या हातीं केलिया ।
धन्यु ना मी ? ॥ ३४८ ॥
ऐसा श्लाघों जंव जाये ।
तंव मन आणीकही वाहे ।
सवेंचि म्हणे पाहे ।
आणिकांचेंही आणूं ॥ ३४९ ॥
हें जेतुलें असे जोडिलें ।
तयाचेनि भांडवलें ।
लाभा घेईन उरलें ।
चराचर हें ॥ ३५० ॥
ऐसेनि धना विश्वाचिया ।
मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया ।
उरों नेदी ॥ ३५१ ॥
असौ मया हतः
शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी
सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥ १४ ॥
हे मारिले वैरी थोडे ।
आणीकही साधीन गाढे ।
मग नांदेन पवाडें ।
येकलाचि मी ॥ ३५२ ॥
मग माझी होतील कामारीं ।
तियेंवांचूनि येरें मारीं ।
किंबहुना चराचरीं ।
ईश्वरु तो मी ॥ ३५३ ॥
मी भोगभूमीचा रावो ।
आजि सर्वसुखासी ठावो ।
म्हणौनि इंद्रुही वावो ।
मातें पाहुनि ॥ ३५४ ॥
मी मनें वाचा देहें ।
करीं ते कैसें नोहे ।
कें मजवांचूनि आहे ।
आज्ञासिद्ध आन ? ॥ ३५५ ॥
तंवचि बळिया काळु ।
जंव न दिसें मी अतुर्बळु ।
सुखाचा कीर निखिळु ।
रासिवा मीचि ॥ ३५६ ॥
आढ्योऽभिजनवानस्मि
कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य
इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५ ॥
कुबेरु आथिला होये ।
परी तो नेणें माझी सोये ।
संपत्ती मजसम नव्हे ।
श्रीनाथाही ॥ ३५७ ॥
माझिया कुळाचा उजाळू ।
कां जातिगोतांचा मेळू ।
पाहतां ब्रह्माही हळू ।
उणाचि दिसे ॥ ३५८ ॥
म्हणौनि मिरविती नांवें ।
वायां ईश्वरादि आघवे ।
नाहीं मजसीं सरी पावे ।
ऐसें कोण्ही ॥ ३५९ ॥
आतां लोपला अभिचारु ।
तया करीन मी जीर्णोद्धारु ।
प्रतिष्ठीन परमारु ।
यागवरी ॥ ३६० ॥
मातें गाती वानिती ।
नटनाचें रिझविती ।
तयां देईन मागती ।
ते ते वस्तु ॥ ३६१ ॥
माजिरा अन्नपानीं ।
प्रमदांच्या आलिंगनीं ।
मी होईन त्रिभुवनीं ।
आनंदाकारु ॥ ३६२ ॥
काय बहु सांगों ऐसें ।
ते आसुरीप्रकृती पिसें ।
तुरंबिती असोसें ।
गगनौळें तियें ॥ ३६३ ॥
अनेकचित्तविभ्रान्ता
मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु
पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥
ज्वराचेनि आटोपें ।
रोगी भलतैसें जल्पे ।
चावळती संकल्पें ।
जाण ते तैसें ॥ ३६४ ॥
अज्ञान आतुले धुळी ।
म्हणौनि आशा वाहटुळी ।
भोवंडीजती अंतराळीं ।
मनोरथांच्या ॥ ३६५ ॥
अनियम आषाढ मेघ ।
कां समुद्रोर्मी अभंग ।
तैसे कामिती अनेग ।
अखंड काम ॥ ३६६ ॥
मग पैं कामनाचि तया ।
जीवीं जाल्या वेलरिया ।
वोरपिली कांटिया ।
कमळें जैसीं ॥ ३६७ ॥
कां पाषाणाचिया माथां ।
हांडी फुटली पार्था ।
जीवीं तैसें सर्वथा ।
कुटके जाले ॥ ३६८ ॥
तेव्हां चढतिये रजनी ।
तमाची होय पुरवणी ।
तैसा मोहो अंतःकरणीं ।
वाढोंचि लागे ॥ ३६९ ॥
आणि वाढे जंव जंव मोहो ।
तंव तंव विषयीं रोहो ।
विषय तेथ ठावो ।
पातकासी ॥ ३७० ॥
पापें आपलेनि थांवें ।
जंव करिती मेळावे ।
तंव जितांचि आघवे ।
येती नरकां ॥ ३७१ ॥
म्हणौनि गा सुमती ।
जे कुमनोरथां पाळिती ।
ते आसुर येती वस्ती ।
तया ठाया ॥ ३७२ ॥
जेथ असिपत्रतरुवर ।
खदिरांगाराचे डोंगर ।
तातला तेलीं सागर ।
उतताती ॥ ३७३ ॥
जेथ यातनांची श्रेणी ।
हे नित्य नवी यमजाचणी ।
पडती तिये दारुणीं ।
नरकलोकीं ॥ ३७४ ॥
ऐसे नरकाचिये शेले ।
भागीं जे जे जन्मले ।
तेही देखों भुलले ।
यजिती यागीं ॥ ३७५ ॥
एर्हवीं यागादिक क्रिया ।
आहाण तेचि धनंजया ।
परी विफळती आचरोनियां ।
नाटकी जैसी ॥ ३७६ ॥
वल्लभाचिया उजरिया ।
आपणयाप्रति कुस्त्रिया ।
जोडोनि तोषिती जैसियां ।
अहेवपणें ॥ ३७७ ॥
आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७ ॥
तैसें आपणयां आपण ।
मानितां महंतपण ।
फुगती असाधारण ।
गर्वें तेणें ॥ ३७८ ॥
मग लवों नेणती कैसे ।
आटिवा लोहाचे खांब जैसे ।
कां उधवले आकाशें ।
शिळाराशी ॥ ३७९ ॥
तैसें आपुलिये बरवे ।
आपणचि रिझतां जीवें ।
तृणाहीहूनि आघवें ।
मानिती नीच ॥ ३८० ॥
वरी धनाचिया मदिरा ।
माजूनि धनुर्धरा ।
कृत्याकृत्यविचारा ।
सवतें केलें ॥ ३८१ ॥
जया आंगीं आयती ऐसी ।
तेथ यज्ञाची गोठी कायसी ।
तरी काय काय पिसीं ।
न करिती गा ? ॥ ३८२ ॥
म्हणौनि कोणे एके वेळे ।
मौढ्यमद्याचेनि बळें ।
यागाचींही टवाळें ।
आदरिती ॥ ३८३ ॥
ना कुंड मंडप वेदी ।
ना उचित साधनसमृद्धी ।
आणि तयांसी तंव विधी ।
द्वंद्वचि सदा ॥ ३८४ ॥
देवां ब्राह्मणांचेनि नांवें ।
आडवारेनहि नोहावें ।
ऐसें आथी तेथ यावें ।
लागे कवणा ? ॥ ३८५ ॥
पैं वासरुवाचा भोकसा ।
गाईपुढें ठेवूनि जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा ।
बुद्धिवंत ॥ ३८६ ॥
तैसें यागाचेनि नांवें ।
जग वाऊनि हांवें ।
नागविती आघवें ।
अहेरावारी ॥ ३८७ ॥
ऐशा कांहीं आपुलिया ।
होमिती जे उजरिया ।
तेणें कामिती प्राणिया ।
सर्वनाशु ॥ ३८८ ॥
अहङ्कारं बलं दर्पं
कामं क्रोधम् च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु
प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८ ॥
मग पुढां भेरी निशाण ।
लाउनी ते दीक्षितपण ।
जगीं फोकारिती आण ।
वावो वावो ॥ ३८९ ॥
तेव्हां महत्त्वें तेणें अधमा ।
गर्वा चढे महिमा ।
जैसे लेवे दिधले तमा ।
काजळाचे ॥ ३९० ॥
तैसें मौढ्य घणावे ।
औद्धत्य उंचावे ।
अहंकारु दुणावे ।
अविवेकुही ॥ ३९१ ॥
मग दुजयाची भाष ।
नुरवावया निःशेष ।
बळीयेपणा अधिक ।
होय बळ ॥ ३९२ ॥
ऐसा अहंकार बळा ।
जालिया एकवळा ।
दर्पसागरु मर्यादवेळा ।
सांडूनि उते ॥ ३९३ ॥
मग वोसंडिलेनि दर्पें ।
कामाही पित्त कुरुपे ।
तया धगीं सैंघ पळिपे ।
क्रोधाग्नि तो ॥ ३९४ ॥
तेथ उन्हाळा आगी खरमरा ।
तेलातुपाचिया कोठारा ।
लागला आणि वारा ।
सुटला जैसा ॥ ३९५ ॥
तैसा अहंकारु बळा आला ।
दर्पु कामक्रोधीं गूढला ।
या दोहींचा मेळु जाला ।
जयांच्या ठायीं ॥ ३९६ ॥
ते आपुलिया सवेशा ।
मग कोणी कोणी हिंसा ।
या प्राणियांते वीरेशा ।
न साधती गा ? ॥ ३९७ ॥
पहिलें तंव धनुर्धरा ।
आपुलिया मांसरुधिरा ।
वेंचु करिती अभिचारा- ।
लागोनियां ॥ ३९८ ॥
तेथ जाळिती जियें देहें ।
यामाजीं जो मी आहें ।
तया आत्मया मज घाये ।
वाजती ते ॥ ३९९ ॥
आणि अभिचारकीं तिहीं ।
उपद्रविजे जेतुलें कांहीं ।
तेथ चैतन्य मी पाहीं ।
सीणु पावे ॥ ४०० ॥
आणि अभिचारावेगळें ।
विपायें जे अवगळें ।
तया टाकिती इटाळें ।
पैशून्याचीं ॥ ४०१ ॥
सती आणि सत्पुरुख ।
दानशीळ याज्ञिक ।
तपस्वी अलौकिक ।
संन्यासी जे ॥ ४०२ ॥
कां भक्त हन महात्मे ।
इयें माझीं निजाचीं धामें ।
निर्वाळलीं होमधर्में ।
श्रौतादिकीं ॥ ४०३ ॥
तयां द्वेषाचेनि काळकूटें ।
बासटोनि तिखटें ।
कुबोलांचीं सदटें ।
सूति कांडें ॥ ४०४ ॥
तानहं द्विषतः क्रूरान्
संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९ ॥
ऐसे आघवाचि परी ।
प्रवर्तले माझ्या वैरी ।
तयां पापियां जें मी करीं ।
तें आइक पां ॥ ४०५ ॥
तरी मनुष्यदेहाचा तागा ।
घेऊनि रुसती जे जगा ।
ते पदवी हिरोनि पैं गा ।
ऐसे ठेवीं ॥ ४०६ ॥
जे क्लेशगांवींचा उकरडा ।
भवपुरींचा पानवडा ।
ते तमोयोनि तयां मूढां ।
वृत्तीचि दें ॥ ४०७ ॥
मग आहाराचेनि नांवें ।
तृणही जेथ नुगवे ।
ते व्याघ्र वृश्चिक आडवे ।
तैसिये करीं ॥ ४०८ ॥
तेथ क्षुधादुःखें बहुतें ।
तोडूनि खाती आपणयातें ।
मरमरों मागुतें ।
होतचि असती ॥ ४०९ ॥
कां आपुला गरळजाळीं ।
जळिती आंगाची पेंदळी ।
ते सर्पचि करीं बिळीं ।
निरुंधला ॥ ४१० ॥
परी घेतला श्वासु घापे ।
येतुलेनही मापें ।
विसांवा तयां नाटोपे ।
दुर्जनांसी ॥ ४११ ॥
ऐसेनि कल्पांचिया कोडी ।
गणितांही संख्या थोडी ।
तेतुला वेळु न काढी ।
क्लेशौनि तयां ॥ ४१२ ॥
तरी तयांसी जेथ जाणें ।
तेथिंचें हें पहिलें पेणें ।
तें पावोनि येरें दारुणें ।
न होती दुःखें ॥ ४१३ ॥
आसुरीं योनिमापन्ना
मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय
ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २० ॥
हा ठायवरी ।
संपत्ति ते आसुरी ।
अधोगती अवधारीं ।
जोडिली तिहीं ॥ ४१४ ॥
पाठीं व्याघ्रादि तामसा ।
योनी तो अळुमाळु ऐसा ।
देहाधाराचा उसासा ।
आथी जोही ॥ ४१५ ॥
तोही मी वोल्हावा हिरें ।
मग तमचि होती एकसरें ।
जेथे गेलें आंधारें ।
काळवंडैजे ॥ ४१६ ॥
जयांची पापा चिळसी ।
नरक घेती विवसी ।
शीण जाय मूर्च्छी ।
सिणें जेणें ॥ ४१७ ॥
मळु जेणें मैळे ।
तापु जेणें पोळे ।
जयाचेनि नांवें सळे ।
महाभय ॥ ४१८ ॥
पापा जयाचा कंटाळा ।
उपजे अमंगळ अमंगळा ।
विटाळुही विटाळा ।
बिहे जया ॥ ४१९ ॥
ऐसें विश्वाचेया वोखटेया ।
अधम जे धनंजया ।
तें ते होती भोगूनियां ।
तामसा योनी ॥ ४२० ॥
अहा सांगतां वाचा रडे ।
आठवितां मन खिरडे ।
कटारे मूर्खीं केवढे ।
जोडिले निरय ॥ ४२१ ॥
कायिसया ते आसुर ।
संपत्ति पोषिती वाउर ।
जिया दिधलें घोर ।
पतन ऐसें ॥ ४२२ ॥
म्हणौनि तुवां धनुर्धरा ।
नोहावें गा तिया मोहरा ।
जेउता वासु आसुरा ।
संपत्तिवंता ॥ ४२३ ॥
आणि दंभादि दोष साही ।
हे संपूर्ण जयांच्या ठायीं ।
ते त्यजावे हें काई ।
म्हणों कीर ? ॥ ४२४ ॥
त्रिविधं नरकस्येदं
द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा
लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥ २१ ॥
परी काम क्रोध लोभ ।
या तिहींचेंही थोंब ।
थांवे तेथें अशुभ ।
पिकलें जाण ॥ ४२५ ॥
सर्व दुःखां आपुलिया ।
दर्शना धनंजया ।
पाढाऊ हे भलतया ।
दिधलें आहाती ॥ ४२६ ॥
कां पापियां नरकभोगीं ।
सुवावयालागीं जगीं ।
पातकांची दाटुगी ।
सभाचि हे ॥ ४२७ ॥
ते रौरव गा तंवचिवरी ।
आइकिजती पटांतरीं ।
जंव हे तिन्ही अंतरीं ।
उठती ना ॥ ४२८ ॥
अपाय तिहीं आसलग ।
यातना इहीं सवंग ।
हाणी हाणी नोहे हे तिघ ।
हेचि हाणी ॥ ४२९ ॥
काय बहु बोलों सुभटा ।
सांगितलिया निकृष्टा ।
नरकाचा दारवंटा ।
त्रिशंकु हा ॥ ४३० ॥
या कामक्रोधलोभां- ।
माजीं जीवें जो होय उभा ।
तो निरयपुरीची सभा ।
सन्मानु पावे ॥ ४३१ ॥
म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी ।
हे कामादि दोष त्रिपुटी ।
त्यजावींचि गा वोखटी ।
आघवा विषयीं ॥ ४३२ ॥
एतैर्विमुक्तः कौन्तेय
तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो
याति परां गतिम् २२ ॥
धर्मादिकां चौंही आंतु ।
पुरुषार्थाची तैंचि मातु ।
करावी जैं संघातु ।
सांडील हा ॥ ४३३ ॥
हे तिन्ही जीवीं जंव जागती ।
तंववरी निकियाची प्राप्ती ।
हे माझे कान नाइकती ।
देवोही म्हणे ॥ ४३४ ॥
जया आपणपें पढिये ।
आत्मनाशा जो बिहे ।
तेणें न धरावी हे सोये ।
सावधु होईजे ॥ ४३५ ॥
पोटीं बांधोनि पाषाण ।
समुद्रीं बाहीं आंगवण ।
कां जियावया जेवण ।
काळकूटाचें ॥ ४३६ ॥
इहीं कामक्रोधलोभेंसी ।
कार्यसिद्धि जाण तैसी ।
म्हणौनि ठावोचि पुसीं ।
ययांचा गा ॥ ४३७ ॥
जैं कहीं अवचटें ।
हे तिकडी सांखळ तुटे ।
तैं सुखें आपुलिये वाटे ।
चालों लाभे ॥ ४३८ ॥
त्रिदोषीं सांडिलें शरीर ।
त्रिकुटीं फिटलिया नगर ।
त्रिदाह निमालिया अंतर ।
जैसें होय ॥ ४३९ ॥
तैसा कामादिकीं तिघीं ।
सांडिला सुख पावोनि जगीं ।
संगु लाहे मोक्षमार्गीं ।
सज्जनांचा ॥ ४४० ॥
मग सत्संगें प्रबळें ।
सच्छास्त्राचेनि बळें ।
जन्ममृत्यूचीं निमाळें ।
निस्तरें रानें ॥ ४४१ ॥
ते वेळीं आत्मानंदें आघवें ।
जें सदा वसतें बरवें ।
तें तैसेंचि पाटण पावे ।
गुरुकृपेचें ॥ ४४२ ॥
तेथ प्रियाची परमसीमा ।
तो भेटे माउली आत्मा ।
तयें खेवीं आटे डिंडिमा ।
सांसारिक हे ॥ ४४३ ॥
ऐसा जो कामक्रोधलोभां ।
झाडी करूनि ठाके उभा ।
तो येवढिया लाभा ।
गोसावी होय ॥ ४४४ ॥
यः शास्त्रविधिमुत्सृज्य
वर्तते कामकारत ।
न स सिद्धिमवाप्नोति न
सुखं न परां गतिम् ॥ २३ ॥
ना हें नावडोनि कांहीं ।
कामादिकांच्याचि ठायीं ।
दाटिली जेणें डोई ।
आत्मचोरें ॥ ४४५ ॥
जो जगीं समान सकृपु ।
हिताहित दाविता दीपु ।
तो अमान्यु केला बापु ।
वेदु जेणें ॥ ४४६ ॥
न धरीचि विधीची भीड ।
न करीचि आपली चाड ।
वाढवीत गेला कोड ।
इंद्रियांचें ॥ ४४७ ॥
कामक्रोधलोभांची कास ।
न सोडीच पाळिली भाष ।
स्वैराचाराचें असोस ।
वळघला रान ॥ ४४८ ॥
तो सुटकेचिया वाहिणीं ।
मग पिवों न लाहे पाणी ।
स्वप्नींही ते कहाणी ।
दूरीचि तया ॥ ४४९ ॥
आणि परत्र तंव जाये ।
हें कीर तया आहे ।
परी ऐहिकही न लाहे ।
भोग भोगूं ॥ ४५० ॥
तरी माशालागीं भुलला ।
ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला ।
नास्तिकवादु ॥ ४५१ ॥
तैसें विषयांचेनि कोडें ।
जेणें परत्रा केलें उबडें ।
तंव तोचि आणिकीकडे ।
मरणें नेला ॥ ४५२ ॥
एवं परत्र ना स्वर्गु ।
ना ऐहिकही विषयभोगु ।
तेथ केउता प्रसंगु ।
मोक्षाचा तो ? ॥ ४५३ ॥
म्हणौनि कामाचेनि बळें ।
जो विषय सेवूं पाहे सळें ।
तया विषयो ना स्वर्गु मिळे ।
ना उद्धरे तो ॥ ४५४ ॥
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते
कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं
कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २४ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगोनाम
षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
याकारणें पैं बापा ।
जया आथी आपुली कृपा ।
तेणें वेदांचिया निरोपा ।
आन न कीजे ॥ ४५५ ॥
पतीचिया मता ।
अनुसरोनि पतिव्रता ।
अनायासें आत्महिता ।
भेटेचि ते ॥ ४५६ ॥
नातरी श्रीगुरुवचना ।
दिठी देतु जतना ।
शिष्य आत्मभुवना- ।
माजीं पैसे ॥ ४५७ ॥
हें असो आपुला ठेवा ।
हाता आथी जरी यावा ।
तरी आदरें जेवीं दिवा ।
पुढां कीजे ॥ ४५८ ॥
तैसा अशेषांही पुरुषार्था ।
जो गोसावी हो म्हणे पार्था ।
तेणें श्रुतिस्मृति माथां ।
बैसणें घापे ॥ ४५९ ॥
शास्त्र म्हणेल जें सांडावें ।
तें राज्यही तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें ।
विषही विरु ॥ ४६० ॥
ऐसिया वेदैकनिष्ठा ।
जालिया जरी सुभटा ।
तरी कें आहे अनिष्टा ।
भेटणें गा ? ॥ ४६१ ॥
पैं अहितापासूनि काढिती ।
हित देऊनि वाढविती ।
नाहीं गा श्रुतिपरौती ।
माउली जगा ॥ ४६२ ॥
म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी ।
तंव हे कोणें न सांडावी ।
अगा तुवांही ऐसीचि भजावी ।
विशेषेंसीं ॥ ४६३ ॥
जे आजि अर्जुना तूं येथें ।
करावया सत्य शास्त्रें सार्थें ।
जन्मलासि बळार्थें ।
धर्माचेनि ॥ ४६४ ॥
आणि धर्मानुज हें ऐसें ।
बोधेंचि आलें अपैसें ।
म्हणौनि आनारिसें ।
करूं नये ॥ ४६५ ॥
कार्याकार्यविवेकीं ।
शास्त्रेंचि करावीं पारखीं ।
अकृत्य तें कुडें लोकीं ।
वाळावें गा ॥ ४६६ ॥
मग कृत्यपणें खरें निगे ।
तें तुवां आपुलेनि आंगें ।
आचरोनि आदरें चांगें ।
सारावें गा ॥ ४६७ ॥
जे विश्वप्रामाण्याची मुदी ।
आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी ।
लोकसंग्रहासि त्रिशुद्धी ।
योग्यु होसी ॥ ४६८ ॥
एवं आसुरवर्गु आघवा ।
सांगोनि तेथिंचा निगावा ।
तोहि देवें पांडवा ।
निरूपिला ॥ ४६९ ॥
इयावरी तो पंडूचा ।
कुमरु सद्भावो जीवींचा ।
पुसेल तो चैतन्याचा ।
कानीं ऐका ॥ ४७० ॥
संजयें व्यासाचिया निरोपा ।
तो वेळु फेडिला तया नृपा ।
तैसा मीहि निवृत्तिकृपा ।
सांगेन तुम्हां ॥ ४७१ ॥
तुम्ही संत माझिया कडा ।
दिठीचा कराल बहुडा ।
तरी तुम्हां माने येवढा ।
होईन मी ॥ ४७२ ॥
म्हणौनि निज अवधान ।
मज वोळगे पसायदान ।
दीजो जी सनाथु होईन ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ४७३ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां
भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः ॥