श्री गुरुगीता
श्री गुरुगीता
श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम: ।
ॐ नमो सत्गुरु परब्रह्म ।
तूं निर्विकल्प कल्पद्रुम ।
हर हृदय विश्राम धाम ।
निज मूर्ति राम तूं स्वयें ॥ १ ॥
तुझा अनुग्रह जया घडे ।
तया नाही कांही सांकडे ।
दर्शनें मोक्षद्वार उघडे ।
तुझेनि पडिपाडे तूंचि तूं ॥ २ ॥
कोणे एके दिवशी ।
श्री सदाशिव कैलासीं ।
ध्यानस्थ असे तो मानसीं ।
पुसे तयासी पार्वति ।। ३ ॥
जय जया जी परात्परा ।
जगत्गुरू कर्पूरगौरा ।
गुरुदीक्षा निर्विकारा ।
श्री शंकरा मज देई ।। ४ ॥
कवणे मार्गे जी स्वामी ।
जीव परब्रह्म होती ते मी ।
पुसतसे तरी सांगिजे तुम्हीं ।
अंतर्यामीं कळें ऐसें ॥ ५ ॥
कृपा करावी अनाथनाथा ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा ।
नासोनिया भवव्यथा ।
कैवल्यपंथा मज दावीं ॥ ६ ॥
ईश्वर म्हणे वो देवी ।
तुझी आवडी मातें वदवी ।
लोकोपकारक प्रश्न पूर्वीं ।
देवीं दानवीं जो न केला ॥ ७ ॥
तरी दुर्लभ या त्रिभुवनांत ।
ते तूं ऐके वो सुनिश्चित ।
सत्गुरु ब्रह्म सदोदित ।
सत्य सत्य वरानने ॥ ८ ॥
वेद शास्त्र पुराणा ।
मंत्रतंत्रादि विद्या नाना ।
करितां तीर्थव्रततपसाधना ।
भवबंधमोचना न पवती ॥ ९ ॥
शैव शाक्त आगमादिकें ।
अनेक मते अपभ्रंशके ।
समस्तजीवां भ्रांतिदायके ।
मोक्षप्रापके नव्हतीच ॥ १० ॥
जया चाड पराभक्ती ।
तेणे सत्गुरु सेवावा एकांतीं ।
गुरुतत्व न जाणती ।
मूढमती जन कोणी ॥ ११ ॥
होवोनि नि:संशय ।
सेवावे सत्गुरुपाय । भवसिंधु तरणोपाय ।
तत्काळ होय जडजीवां ॥ १२ ॥
गूढ अविद्या जगन्माया ।
अज्ञानसंहारित जीवा या ।
मोहांधकारा गुरुसूर्या ।
सन्मुख यावया मुख कैंचे ॥ १३ ॥
जीव ब्रह्मत्व त्याचिये कृपा ।
होती, निरसुनी सर्व पापा ।
सत्गुरु स्वयंप्रकाशदीपा ।
शरण निर्विकल्पा रिघावे ॥ १४ ॥
सर्व तीर्थांचे माहेर ।
सत्गुरु चरणतीर्थ निरंतर ।
सत्भावे सत्शिष्य नर ।
सेवितां परपार पावले ॥ १५ ॥
शोषण पापपंकाचे ।
ज्ञानतेज करी साचे ।
वंदितां चरणतीर्थ सत्गुरुचे ।
भवाब्धीचे भय काय ॥ १६ ॥
अज्ञानमूल हरण ।
जन्मकर्म निवारण ।
ज्ञानसिध्दीचे कारण ।
गुरुचरणतीर्थ ते ॥ १७ ॥
गुरुचरणतीर्थ प्राशन ।
गुरुआज्ञा उच्छिष्टभोजन ।
गुरुमूर्तिचे अंतरी ध्यान ।
गुरुमंत्र वदनी जपे सदा ॥ १८ ॥
गुरुसान्निध्य तो काशीवास ।
जान्हवी चरणोदक नि:शेष ।
गुरु विश्वेश्वर निर्विशेष ।
तारकमंत्र उपदेशिता ॥ १९ ॥
गुरुचरणतीर्थ पडे शिरीं ।
प्रयागस्नान ते निर्धारी ।
गयागदाधर सबाह्यांतरी ।
सर्वांतरी साधकां ॥ २० ॥
गुरुमूर्ति नित्य स्मरे ।
गुरुनाम जपे आदरे ।
गुरुआज्ञा पालक नरें ।
नेणिजे दुसरे गुरुविना ॥ २१ ॥
गुरुस्मरण मुखीं राहे ।
तोचि ब्रह्मरूप पाहे ।
गुरुमूर्ति ध्यानी वाहे ।
जैशी कां हे स्वैरिणी ॥ २२ ॥
वर्णाश्रम धर्म सत्कीर्ती ।
वाढवावी सद्वृत्ती ।
अन्यत्र त्यजोनिया गुंती ।
सत्गुरुभक्ती करावी ॥ २३ ॥
अनन्यभावें गुरुसी भजतां ।
सुलभ परम पद तत्वतां ।
तस्मात् सर्वप्रयत्नें आतां ।
सत्गुरुनाथा आराधीं ॥ २४ ॥
गुरुमुखींचे महावाक्य बीज ।
गुरुभक्तीस्तव लाभे सहज ।
त्रैलोक्यीं नाचे भोज ।
तो पूज्य होय सुरनरां ॥ २५ ॥
गुकार तो अज्ञानांधकार ।
रुकार वर्ण तो दिनकर ।
स्वयंप्रकाश तेजासमोर ।
न राहे तिमिर क्षणभरी ॥ २६ ॥
प्रथम गुकार शब्द ।
गुणमयी मायास्पद ।
रुकार तो ब्रह्मानंद ।
करी विच्छेद मायेचा ॥ २७ ॥
ऐसे गुरुपद श्रेष्ठ ।
देवां दुर्लभ उत्कृष्ठ ।
गणगंधर्वादि वरिष्ठ ।
महिमा स्पष्ट नेणती ॥ २८ ॥
शाश्वत सर्वी सर्वदाही ।
गुरुपरते तत्त्व नाही ।
कायावाचामनें पाही ।
जीवित तेहि समर्पावे ॥ २९ ॥
देहादिभुवनत्रय समस्त ।
इतर पदार्थ नाशिवंत ।
वंचोनिया विमुख होत ।
अध:पात घडे तयां ॥ ३० ॥
म्हणोनि आराधावा श्रीगुरु ।
करोनि दीर्घदंड नमस्कारु ।
निर्लज्ज होऊनिया परपारू ।
भवसागरु तरावा ॥ ३१ ॥
आत्मदारादिकम् चैव ।
निवेदन करूनि सर्व ।
हा नाही जयां अनुभव ।
तयांस वाटे अभिनव वरानने ॥ ३२ ॥
जे संसारवृक्षारूढ झाले ।
पतन नरकार्णवीं पावले ।
ते गुरुरायें उध्दरिले ।
सुखी केले निजभजनीं ॥ ३३ ॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव ।
गुरुरूप ते स्वयमेव ।
गुरु परब्रह्म सर्वथैव ।
गुरुगौरव न वर्णवे ॥ ३४ ॥
अज्ञानतिमिरें अंध ।
ज्ञानांजन शलाका प्रसिध्द ।
दिव्य चक्षु शुध्द बुध्द ।
महानिधी दाखविला ॥ ३५ ॥
अखंड मंडलाकार ।
जेणे व्यापिले चराचर ।
तयें पदी केले स्थिर ।
नमस्कार तया गुरुवर्या ॥ ३६ ॥
श्रुतिसार शिरोरत्न ।
चरणांबुज परम पावन ।
वेदांतकमलिनी चित् भानु ।
तया नमन गुरुवर्या ॥ ३७ ॥
ज्याचे स्मरणमात्रें ज्ञान ।
साधकां होय उत्पन्न ।
ते निजसंपत्ति जाण ।
दिधली संपूर्ण गुरुरायें ॥ ३८ ॥
चैतन्य शाश्वत शांत ।
नित्य निरंजन अच्युत ।
नादबिंदुकलातीत ।
नमन प्रणिपात गुरुवर्या ॥ ३९ ॥
ज्ञानशक्तीसमारूढ ।
तत्त्वमाला भूषित दृढ ।
भुक्तिमुक्तिदाता प्रौढ ।
सत्गुरु गूढ सुखदानी ॥ ४० ॥
अनेक जन्मींचे सुकृत ।
निरहंकृति निर्हेत ।
तरीच प्रबोध प्राप्त ।
जरी श्रीगुरुहस्त मस्तकीं ॥ ४१ ॥
जगन्नाथ जगत्गुरु एक ।
तो माझा स्वामी देशिक ।
ममात्मा सर्वभूतव्यापक ।
वैकुंठनायक श्रीगुरु ॥ ४२ ॥
ध्यानमूल गुरुराय ।
पूजामूल गुरुपाय ।
मंत्रमूल नि:संशय ।
मोक्षमूल गुरुकृपा ॥ ४३ ॥
सप्तसिंधु अनेक तीर्थीं ।
स्नानें पानें जे फलप्राप्ती ।
एक बिंदुसम न पवती ।
सत्गुरुचरणतीर्थाच्या ॥ ४४ ॥
ज्ञानेविण सायुज्यपद ।
अलभ्य लाभे अगाध ।
सत्गुरुभक्तीने प्रबोध ।
स्वत:सिध्द पाविजे ॥ ४५ ॥
सत्गुरुहूनि परात्पर ।
नाही नाही वो साचार ।
’नेति’ शब्दे निरंतर ।
श्रुतिशास्त्रें गर्जती ॥ ४६ ॥
मदाहंकारगर्वेंकरुनी ।
विद्यातपबळान्वित होवोनि ।
संसारकुहरावर्तीं पडोनि ।
नाना योनी भ्रमताति ॥ ४७ ॥
न मुक्त देवगणगंधर्व ।
न मुक्त यक्षचारणादि सर्व ।
सत्गुरुकृपेने अपूर्व ।
सायुज्यवैभव पाविजे ॥ ४८ ॥
ऐके वो देवी ध्यानसुख ।
सर्वानंद प्रदायक ।
मोहमायार्णवतारक ।
चित्सुख कारक श्रीगुरु ॥ ४९ ॥
ब्रह्मानंद परमाद्भूत ।
ज्ञानबिंदुकलातीत ।
निरतिशय सुखसंतत ।
साक्षभूत सत्गुरु ॥ ५० ॥
नित्य शुध्द निराभास ।
नित्यबोध चिदाकाश ।
नित्यानंद स्वयंप्रकाश ।
सत्गुरु ईश सर्वांचा ॥ ५१ ॥
हृदयकमळीं सिंहासनीं ।
सत्गुरुमूर्ति चिंतावी ध्याबी ।
श्वेतांबर दिव्यभूषणीं ।
चिद्रत्नकिरणीं सुशोभित ॥ ५२ ॥
आनंदमानंदकर प्रसन्न ।
ज्ञानस्वरूप निजबोधपूर्ण ।
भवरोग भेषज जाण ।
सद्वैद्य चिद्घन सत्गुरु ॥ ५३ ॥
सत्गुरुपरतें अधिक काही ।
आहे ऐसा पदार्थ नाही ।
अवलोकितां दिशा दाही ।
न दिसे तिहीं त्रिभुवनी ॥ ५४ ॥
प्रज्ञाबळें प्रत्योत्तर ।
गुरुसी विवादती जे नर ।
ते भोगिती नरक घोर ।
यावच्चंद्र दिनमणी ॥ ५५ ॥
अरण्य निर्जल स्थानी ।
भ्रमती ब्रह्मराक्षस होवोनि ।
गुरुसी बोलती उध्दट वाणी ।
एकवचनी सर्वदा जे ॥ ५६ ॥
क्षोभतां देव ऋषी काळ ।
सत्गुरु रक्षी न लागतां पळ ।
दीनानाथ दीनदयाळ ।
भक्तवत्सल सत्गुरु ॥ ५७ ॥
सत्गुरुचा क्षोभ होतां ।
देव ऋषी मुनी तत्वतां ।
रक्षिती हे दुर्वार्ता ।
मूर्खही सर्वथा नायकती ॥ ५८ ॥
मंत्रराज हे देवी ।
’गुरु’ ही दोनी अक्षरें बरवीं ।
वेदार्थवचनें जाणावी ।
ब्रह्मपदवी प्रत्यक्ष ॥ ५९ ॥
श्रुतिस्मृति न जाणती ।
(परी) गुरुभक्तीची परम प्रीति ।
ते संन्यासी निश्चिती ।
इतर दुर्मति वेषधारी ॥ ६० ॥
नित्य ब्रह्म निराकार ।
निर्गुणबोध परात्पर ।
तो सत्गुरु पूर्णावतार ।
दीपासी दीपांतर नाही जैसे ॥ ६१ ॥
गुरुकृपाप्रसादें ।
निजात्मदर्शन स्वानंदे ।
पावोनियां पूर्ण पदें ।
पेलती दोंदे मुक्तीसी ॥ ६२ ॥
आब्रह्मस्तंबपर्यंत ।
स्थावरजंगमादि पंचभूते ।
सच्चिदानंदाद्वय अव्यक्त ।
अच्युतानंत सत्गुरु ॥ ६३ ॥
परात्परतर ध्यान ।
नित्यानंद सनातन ।
हृदयीं सिंहासनीं बैसवून ।
चित्तीं चिंतन करावे ॥ ६४ ॥
अगोचर अगम्य सर्वगत ।
नामरूप विवर्जित ।
निःशब्द जाण निभ्रांत ।
ब्रह्म सदोदित पार्वती ॥ ६५ ॥
अंगुष्ठमात्र पुरुष ।
हृदयीं ध्याता स्वप्रकाश ।
तेथे स्फुरती भावविशेष ।
निर्विशेष पार्वती ॥ ६६ ॥
ऐसे ध्यान करिता नित्य ।
तादृश होय सत्य सत्य ।
कीटकी भृकुटीचे निमित्य ।
तद्रूप झाली ते जैशी ॥ ६७ ॥
अवलोकितां तयाप्रति ।
सर्वसंग विनिर्मुक्ति ।
एकाकी निस्पृहता शांति ।
आत्मस्थिती रहावे ॥ ६८ ॥
सर्वज्ञपद त्या बोलती ।
जेणे देही ब्रह्म होती ।
सदानंदे स्वरूपप्राप्ती ।
योगी रमती पैं जेथे ॥ ६९ ॥
उपदेश होतां पार्वती ।
गुरुमार्गीं होय मुक्ति ।
म्हणोनि करावी गुरुभक्ती ।
हे तुजप्रति बोलतसे ॥ ७० ॥
जे मी बोलिलो तुज ।
तें गुजाचे निजगुज ।
लोकोपकारक सहज ।
हें तूं बुझ वरानने ॥ ७१ ॥
लौकिक कर्म तें हीन ।
तेथें कैंचे आत्मज्ञान ।
गुरुभक्तासी समाधान ।
गुरुगीता ऐकतां ॥ ७२ ॥
एवम् या भक्तिभावें ।
श्रवणें पठणें मुक्त व्हावें ।
ऐसे बोलतां सदाशिवे ।
डोलती अनुभवें गुरुभक्त ॥ ७३ ॥
गुरुगीता हे देवी ।
शुध्द तत्त्व पूर्ण पदवी ।
भवव्याधिविनाशिनी स्वभावी ।
स्वयमेव देवी जपे सदा ॥ ७४ ॥
गुरुगीतेचे अक्षर एक ।
मंत्रराज हा सम्यक् ।
अन्यत्र मंत्र दुःखदायक ।
मुख्य नायक हा मंत्र ॥ ७५ ॥
अनंत फळे पावविती ।
गुरुगीता हे पार्वती ।
सर्वपाप विनिर्मुक्ती ।
दुःखदारिद्र्यनाशिनी ॥ ७६ ॥
कालमृत्युभयहर्ती ।
सर्वसंकटनाशकर्ती ।
यक्ष राक्षस प्रेत भूतीं ।
निर्भय वृत्ती सर्वदा ॥ ७७ ॥
महाव्याधिविनाशिनी ।
विभूतीसिध्दिदायिनी ।
अथवा वशीकरण मोहिनी ।
पुण्यपावनी गुरुगीता ॥ ७८ ॥
कुश अथवा दूर्वासन ।
शुभ्र कंबल समसमान ।
एकाग्र करूनियां मन ।
सत्गुरुध्यान करावे ॥ ७९ ॥
शुक्ल शांत्यर्थ जाण ।
रक्तासनें वशीकरण ।
अभिचारीं कृष्णवर्ण ।
पीतवर्ण धनागमीं ॥ ८० ॥
शांत्यर्थ उत्तराभिमुख ।
वशीकरणा पूर्व देख ।
दक्षिण मारण उल्लेख ।
धनागमा मुख पश्चिमे ॥ ८१ ॥
मोहन सर्वभूतांसीं ।
बंधमोक्षकर विशेषीं ।
राजा वश्य निश्चयेसीं ।
प्रिय देवासी सर्वदा ॥ ८२ ॥
स्तंभनकारक जप ।
गुणविवर्धन निर्विकल्प ।
दुष्कर्मनाशक अमूप ।
सुखस्वरूप सनातन ॥ ८३ ॥
सर्वशांतिकर विशद ।
वंध्यापुत्रफलप्रद ।
अवैधव्य सौभाग्यप्रद ।
अगाध बोध जपतां हे ॥ ८४ ॥
आयुष्य आरोग्य ऐश्वर्य ।
पुत्रपौत्र धैर्योदार्य ।
विधवा जपतां परमाश्चर्य ।
मोक्षैश्वर्य पावती ॥ ८५ ॥
अवैधव्याची कामना ।
धरितां पूर्ण होय वासना ।
सर्वदुःखभयविघ्ना ।
पासोनि सुजना सोडवी ॥ ८६ ॥
सर्वबाधाप्रशमनी प्रत्यक्ष ।
धर्मार्थ काममोक्ष ।
जें जें चिंतिले तो पक्ष ।
गुरुदास दक्ष पावती ॥ ८७ ॥
कामिकां कामधेनु गाय ।
कल्पिती तयां कल्पतरू होय ।
चिंतिती त्यां चिंतामणिमय ।
मंगलमय सर्वांसी ॥ ८८ ॥
गाणपत्य शाक्त सौर ।
शैव वैष्णव गुरुकिंकर ।
सिध्दी पावती सत्त्वर ।
सत्य सत्य वरानने ॥ ८९ ॥
संसारमलनाशार्थ ।
भवबंधपाशनिवृत्त ।
गुरुगीतास्नानें सुस्नात ।
शुचिर्भूत सर्वदा ॥ ९० ॥
आसनीं शयनीं गमनागमनीं ।
अश्व गज अथवा यानीं ।
जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ।
पढतां होय ज्ञान गुरुगीता ॥ ९१ ॥
गुरुगीता पढतां भक्त ।
सर्वदा तो जीवनमुक्त ।
त्याच्या दर्शनें पुनीत ।
पुनर्जन्म न होत प्राणियां ॥ ९२ ॥
अनेक उदके समुद्रउदरीं ।
नाना वर्ण धेनु क्षीर क्षीरीं ।
अभिन्नरूपें निर्धारीं ।
सर्वांतरी एकचि ॥ ९३ ॥
घटाकाश मठाकाश ।
उपाधिभेदें भिन्न वेष ।
महदाकाश निर्विशेष ।
द्वैताचा लेश नाढळे ॥ ९४ ॥
भिन्न भिन्न प्रकृति ।
कर्मवेषे दिसती आकृति ।
घेऊन जीवपणाची बुंथी ।
विविध भासती नामरूपे ॥ ९५ ॥
नाना अलंकारीं सुवर्ण ।
तैसा जीवात्मा पूर्ण ।
तेथे नाही वर्णावर्ण ।
कार्यकारणातीत तें ॥ ९६ ॥
या स्वानुभवें गुरुभक्त ।
वर्तती ते जीवन्मुक्त ।
गुरुरूप ते वेदोक्त ।
जें कां विरक्त सर्वस्वें ॥ ९७ ॥
अनन्यभावें गुरुगीता ।
जपतां सर्व सिध्दि तत्त्वतां ।
मुक्तिदायक जगन्माता ।
संशय सर्वथा न धरीं तूं ॥ ९८ ॥
सत्य सत्य हें वर्म ।
मी बोलिलो सर्व धर्म ।
नाही गुरुगीतेसम ।
तत्त्व परम सत्गुरु ॥ ९९ ॥
एक देव एक जप ।
एक निष्ठा परंतप ।
सत्गुरु परब्रह्म स्वरूप ।
निर्विकल्प कल्पतरू ॥ १०० ॥
माता धन्य पिता धन्य ।
याति कुल वंश धन्य ।
धन्य वसुधा देवी धन्य ।
धन्य धन्य गुरुभक्ति ॥ १०१ ॥
गुरुपुत्र अपंडित ।
जरी मूर्ख तो सुनिश्चित ।
त्याचेनि सर्व कार्यसिध्दि होत ।
सिध्दांत हा वेदवचनीं ॥ १०२ ॥
शरीर इंद्रियें प्राण ।
दारा पुत्र कांचन धन ।
श्रीगुरुचरणावरून ।
वोवाळून सांडावे ॥ १०३ ॥
आकल्प जन्म कोडी ।
एकाग्रमनें जपता प्रौढी ।
तपाची हे फळजोडी ।
गुरुसी अर्धघडी विमुख नोहे ॥ १०४ ॥
ब्रह्मादिक देव समर्थ ।
त्रिभुवनीं वंद्य यथार्थ ।
गुरुचरणोदकावेगळे व्यर्थ ।
अन्य तीर्थ निरर्थक ॥ १०५ ॥
सर्व तीर्थांत तीर्थ श्रेष्ठ ।
श्रीगुरुचरणांगुष्ठ ।
निवारी संसारकष्ट ।
पुरवी अभीष्ट इच्छिले ॥ १०६ ॥
हे रहस्यवाक्य तुजपुढे ।
म्यां कथिले निजनिवाडे ।
माझेनि निजतत्त्व गौप्य उघडे ।
करूनि वाडेकोडे दाखविले ॥
मुख्य गणेशादि वैष्णव ।
यक्षकिन्नर गणगंधर्व ।
तयांसही सर्वथैव ।
हें अपूर्व न वदे मी ॥ १०८ ॥
अभक्त वंचक धूर्त ।
पाषांडी नास्तिक दुर्वृत्त ।
तयांसी बोलणे अनुचित ।
हा गुह्यार्थ पैं माझा ॥ १०९ ॥
सर्व शास्त्रांचे मथित ।
सर्ववेदांतसंमत ।
सर्व स्तोत्रांचा सिध्दांत ।
मूर्तिमंत गुरुगीता ॥ ११० ॥
सकल भुवनें सृष्टी ।
पाहतां व्यष्टी समष्टी ।
मोक्षमार्ग हा दृष्टी ।
चरणांगुष्ठीं सत्गुरुच्या ॥ १११ ॥
उत्तरखंडीं स्कंदपुराणीं ।
ईश्वरपार्वतीसंवाद वाणी ।
गुरुगीता ऐकतां श्रवणीं ।
विश्वतारिणी चिद्गंगा ॥ ११२ ॥
हे गुरुगीता नित्य पढे ।
तया सांकडे कवण पडे ।
तत्काळ मोक्षद्वार उघडे ।
ऐक्य घडे शिवस्वरूपी ॥ ११३ ॥
हे न म्हणावी प्राकृतवाणी ।
केवळ स्वात्मसुखाची खाणी ।
सर्व पुरवी शिराणी ।
जैसा वासरमणि तम नाशी ॥ ११४ ॥
श्रोतयां वक्तयां विद्वज्जनां ।
अनन्यभावें विज्ञापना ।
न्यूनपूर्ण नाणितां मना ।
क्षमा दीनावरी कीजे ॥ ११५ ॥
हे गुरुगीतेची टीका ।
न म्हणावी जे पुण्यश्लोका ।
पदपदार्थ पाहतां निका ।
दृष्टी साधकां दिसेना ॥ ११६ ॥
आवडीची जाती वेडी ।
वाचे आले तें बडबडी ।
मूळ ग्रंथ कडोविकडी ।
न पाहतां तांतडी म्यां केली ॥ ११७ ॥
नाही व्याकरणीं अभिनिवेश ।
नाही संस्कृतीं प्रवेश ।
धीटपणे लिहितां दोष ।
गमला विशेष मनातें ॥ ११८ ॥
परी सलगी केली पावासवें ।
तें पंडितजनीं उपसहावे ।
उपेक्षा न करूनि सर्वभावे ।
अवधान द्यावे दयालुत्वें ॥ ११९ ॥
विकृतिनाम संवत्सरीं ।
भाद्रपदमासीं भृगुवासरीं ।
वद्य चतुर्थी नीरातीरी ।
ग्रंथ केला समाप्त ॥ १२० ॥
आनंदसांप्रदाय वंशोद्भव ।
माध्यंदिन शाखा अभिनव ।
गुरुगीतेचा अनुभव
हृदयीं स्वयमेव प्रगटला ॥ १२१ ॥
सहजपूर्ण निजानंदे ।
रंगला तो साधुवृंदे ।
श्रवण करावा स्वच्छंदे ।
ग्रंथ निर्द्वंद्व गुरुगीता ॥ १२२ ॥
इति श्री गुरुगीता संपूर्णा ।
श्रीसत्गुरु निजानंदार्पणम् अस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ॥
ॐ तत्सत् ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥