विठ्ठलाची आरती
विठ्ठलाची आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥