दशावताराची आरती
दशावताराची आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपी स्थापिसी स्वधर्म ॥धृ॥
अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनी ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त तुझा लागतां शंखासुरा वर देसी ॥१॥
रसातळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कासव झालासी ।
दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरूप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥२॥
पांचवे अवतारी बळीच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी ।
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठसी ॥३॥
सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ।
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥४॥
मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतीस कोटी देव बंदी हरिले सीतेला ।
पितृवचनालागी रामें वनवास केला ।
मिळुनी वानरसेना राजाराम प्रगटला ॥५॥
देवकी-वसुदेव बंदीमोचन त्वां केले ।
नंदाघरी जाऊनी निजसुख गोकुळा दिधले ।
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम पाहुनी श्रीकृष्ण भुलले ॥६॥
बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिला धर्म म्हणुनी ना दिससी देवा ।
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवी-जाह्नवी द्यावी निजसुखानंद सेवा ॥७॥