सखाहरी बर्डे
...अन् त्याच्या पदकांनी सजल्या झोपडीच्या भिंती
(दै. अग्रो वन मध्ये दि. ०४ मार्च २०११ रोजी आलेला अनिल देशपांडे यांचा लेख)
राहुरी - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहुरी येथील मुलनमाथा भागात झोपडीत राहणाऱ्या सखाहरी बर्डे या युवकाने
आजवर विविध क्रीडाप्रकारांत विशेष नैपुण्य सिद्ध केले आहे. आजवर त्याने चाळीसपेक्षा जास्त पदके मिळवली आहेत. त्याच्या झोपडीच्या भिंतीही आता या पदकांना लटकवण्यासाठी कमी पडू लागल्या आहेत. शरीरसौष्ठव या प्रकारातच त्याला पुढे करिअर करावयाचे आहे, मात्र आता त्याला खरी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी कोणीतरी आपल्याला दत्तक घ्यावे अशी अपेक्षा सखाहरी व्यक्त करतो.
सखाहरीची परिस्थिती अत्यंत गरिबीची; मात्र त्यामुळे कुठे त्याच्यातील कर्तृत्वाला धुमारे फुटणे थांबले नाही. चौथीत असताना त्याने प्रज्ञाशोध परीक्षेत पहिले प्रमाणपत्र मिळवले. त्याला कुस्तीचे जन्मजातच आकर्षण. कुस्तीत त्याला "महाराष्ट्र केसरी' गुलाब बर्डे यांचे मार्गदर्शन मिळत आहे, मात्र कुस्तीपेक्षा त्याला अधिक आकर्षण आहे ते शरीरसौष्ठव स्पर्धेचे. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला, त्यानंतर या क्षेत्रात त्याने विविध स्पर्धांत ठसा उमटवला. अनेक चॅम्पियनशी लढताना त्याच्यासमोर जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात, तेव्हा त्याचे वडील त्याला प्रोत्साहन देतात. "उद्याची लढाई तूच जिंकणार,' असा आत्मविश्वास ते सखाहरीला देतात. आई-वडिलांचा आशीर्वाद ही मोठी शक्ती असल्याची सखाहरीची धारणा, त्यामुळेच वयाच्या सातव्या वर्षापासून दिवसाचा प्रारंभ आई-वडिलांच्या दर्शनानेच तो करतो. आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर अरनॉल्डला तो आदर्श मानतो. आग्रा येथील "मिस्टर इंडिया' स्पर्धेस जाण्यासाठी त्याला दोन हजार रुपयांची गरज होती. त्यासाठी आईचा दागिना गहाण ठेवावा लागल्याचे तो सांगतो. त्या स्पर्धेत गतवर्षी तो दहाव्या क्रमांकावर आला. सकाळी पाच वाजता त्याचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी दोन तास व सायंकाळी एक तास तो मेहनत घेतो. सध्या तो बारावीची परीक्षा देत आहे. आई शेतमजुरी करते. सखाहरीलाही मजुरीच्या कामावर जावे लागते. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या तयारीत व्यायामाबरोबरच सकस आहाराची जोड गरजेची आहे. मात्र या बाबतीत तर खूपच निराशाजनक परिस्थिती आहे. सकस तर सोडाच पण साध्या रोजच्या आहाराची त्याला भ्रांत आहे. कारण आता वडील मजुरीची कामे करू शकत नाहीत.
त्याने मिळवलेल्या पदकांनी झोपडीच्या भिंती व्यापून गेल्या आहेत. पावसाळ्यात छप्पर गळायला लागले की सर्व पदके आणि चषक तो एका पोत्यात ठेवतो. त्याला नगरचे इरफान शेख व राजेंद्र सातभाई यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. मात्र या बाबत अधिक प्रशिक्षणाची त्याला गरज आहे. त्याची झोपडी त्याच्या घरातील अठराविश्वे दारिद्यावर प्रकाश टाकते, मात्र या झोपडीत प्रवेश केल्यावर त्या झोपडीतील भिंतीवरील पदके त्याच्या या क्षेत्रातील कर्तृत्वाकडे त्याच्या उंचीकडे त्याचे लक्ष वेधून घेतात.
सखाहरीचे यश
- नगर जिल्हा स्पर्धेत प्रथम
- सलग तीन वर्षे "राहुरी श्री'
- पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत "मोरेश्वर श्री'चा मानकरी
- राज्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक
- औरंगाबादमधील "एम. बी. बी. ए.' स्पर्धेत द्वितीय क्रमांक
- नगरमधील बहुतेक शरीरसौष्ठव स्पर्धांत चमकदार कामगिरी
- छत्रपती चषक, महापौर चषक, नगर श्री, महानगर श्री असे अनेक किताब पटकावलेत.
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१९२७८० / ९८९०३६६००२