किफायतशीर शेतीचे 'डॉ. वने मॉडेल'
- अनिल देशपांडे
1970 च्या दशकात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा दहावी पास होतो. 'दहावीनंतर पुरे झाले बाबा शिक्षण, आता शेती कर', असं वडील सांगतात., पण भावंडांत मोठे असलेले चुलतभाऊ या पोराला मी डॉक्टर करणार असा निर्धार व्यक्त करतात. पुढं आयुर्वेद वैद्यकशास्त्राची पदवी पहिल्या क्रमांकानं प्राप्त करत हा मुलगा गावी परततो. गावात रुगणांना तपासताना आरोग्याबरोबर शेतीच्या समस्यांवरही उपाय करण्याचा विचारांच बीज त्याच्या मनात खोलवर रुजतं.... आणि मग सुरु झालेला हा प्रवास आता पोचलाय तो कमी खर्चात किफायतशीर शेती करण्याचा 'वने मॉडेल' पर्यंत. आपले शेत हे कृषी विस्ताराचं केंद्र बनवलेल्या डॉ. दत्तात्रेय वने यांचा हा प्रवास....
आरडगांव, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथीलन वने कुटुबाचा पसारा तसा मोठाच. घरात लहान-मोठी मिळून 30 माणसांचा राबता. जमीन 70 एकर, पाटपाणी आणि विहीर बागायती पाणी आणि त्याच्या बरोबरीने शेतात नि घरात समृध््दीचे वारे वाहत होते. यादवराव वने यांचा कुटुंब प्रमुख म्हणून दरारा मोठाच. पैशांची जीवनमूल्यांची नि विचारांची समृध्दी ही साजेशीच! 9 नोव्हेंबर 1960 ला या कुटुंबात सहदेव वने आणि कासूबाई यांना अपत्यप्राप्ती झाली. दत्तात्रेय असे त्याचे नाव ठेवले.
घरात जन्मजात संपन्नता असली तरी कष्ट हा मात्र कुटुंबाचा स्थायीभाव होता. प्राथमिक शिक्षण वने वस्तीवर झाल्यावर दत्तात्रेय माध्यमिक शिक्षणासाठी टाकळीमियॉंच्या शाळेत जाऊ लागला. दररोजची पाच किलोमीटरची पायपीट शाळेबरोबरच शेतातील छोटी-मोठी कामे, घरासाठी सरपण आणणे, सारवून घेणे अशी कामे करतानाच कष्टाच्या कामाची कोणतीही लाज बाळगता कामा नये असा संस्कार अंगी बनला. टाकळी मियाँच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात 1974 च्या शिक्षक दिनी सर्व शाळा मुला मुलींनीच चालविली. दत्तात्रेय वने त्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक होते. भविष्यकाळात या समाजासाठी त्याला शिक्षकाची, गुरुची भूमिका करावयाची, असे नियतीचे संकेतच असावेत, असे आज डॉ. दत्तात्रेय वने यांना वाटते.
दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यावर आता पुढे शिकण्याऐवजी दत्तात्रेयने शेतीच करावी असे वडील सहदेव- अप्पा यांना वाटत होतेञ अशा वेळी कुटुंबातील ज्ञानदेव वने व व्याही निवृत्ती सोनवणे यांनी मात्र अप्पांजवळ 'दत्तात्रेयला शिकू द्या, त्याला डॉक्टर होऊ द्या, आपल्या कुटुंबात कोणीच डॉक्टर नाही', असे सांगितले. ज्ञानदेव वने (बी.एस्सी. अॅग्री, एल.एल.बी.) 21 भावंडांत सर्वात मोठे, त्यामुळे त्यांचा आग्रह मोडणे अप्पांना शक्यच नव्हते. बीएएमएसच्या प्रवेशासाठीची सर्व खटपट ही आबासाहेबांनी अर्थातच ज्ञानदेव वने यांना केली. अप्पा ज्या वेळी आजारी होते व आबासाहेबांची डोळयांची शस्त्रक्रिया नगरला जेव्हा झाली, तेव्हा त्यांची शुश्रूषा करता करता सेवाभाव हा जीवनाचा स्थायीभाव बनला. गंगाधरशास्त्री, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या माथेरान सहलीचे नियोजन दत्तात्रेयने केले. महाविद्यालयात पहिल्या वर्षी प्रथम, तर पुढची दोन वर्षे ते विद्यापीठात पहिले आले. शेवटच्या वर्षात वने तू विद्यापीठात पहिले यायलाच हवे, असा आग्रह इतका मित्रांचा झाला, की त्या अपेक्षांचे दडपण आले नि आता आपल्याला परीक्षाच द्यायची नाही म्हणून ते परत आले. नैराश्याच्या या गर्तेतून चुलत बंधू आबासाहेब यांनीच त्यांना बाहेर काढले. याच काळात वने नाही तर महाविद्यालयाच्या सहलीस मुलींना आम्ही पाठविणार नाही असे सर्व सहाही पालकांनी सांगितले. परिणामी सहल गेलीच नाही. अशीच विश्वासार्हता केवळ महाविद्यालयातच नव्हे, तर समाजात मिळवायची असे ठरविले.
शेवटच्या वर्षी ते पुन्हा पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे एम.डी. करावे असा प्राचार्य डॉ. हरिभाऊ वाकळे आणि प्रा. एस.एच. होळकर यांचा आग्रह होता., पण आता मी किती दिवस शेती करायची, माझ्याच्याने आता ती होत नाही या वडिलांच्या आर्त हाकेने डॉ. दत्तात्रेय यांनी घरी येण्याचे ठरविले. विद्यापीठात सर्वप्रथम आल्याची बातमी सांगण्यासाठी जेव्हा ते घरी आले, तेव्हा वातावरण पावसाचे होते. वाटयाने केलेल्या शेतात पिकलेल्या भुईमुगाच्या शेंगांचे पोते डॉ. दत्तात्रेयने ट्रेलरमध्ये उचलून टाकण्यास मदत केली. तेव्हा पदवीधर असलेला वाटेकरी अप्पांना म्हणाला, 'शहरात ऐवढे यश कोणी मिळवले असते तर त्याचे घर दीपमाळांनी उजळून निघाले असते, येथे मात्र तुमचा मुलगा भुईमूग शेंगांची पोते उचलतो आहे'.
वडिलांबरोबर शेती करावयास सुरवात करतानाच मानोरी गावात 1984 ला दवाखाना टाकला. डॉ. दत्तात्रेय यांनी प्रथम गावात स्लॅबचा दवाखाना बांधला नि 1988 च्या दरम्यान अप्पांना ह्दय विकाराचा धक्का आला नि जानेवारी 1989 ला अप्पांचा आधार गेला. 11 नोव्हेंबर 1989 ला स्वप्नपूर्ती या घराची वास्तुशांती झाली, पण अप्पा त्या घरात नव्हते ही स्मृती आजही दत्तात्रेयच्या काळजात घर करुन आहे.
दवाखान्याच्या निमित्ताने रुग्णांशी अर्थात शेतीशी, शेतकज्यांच्या प्रश्नांशी जवळून संबंध आला. रुग्ण स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारी सांगता सांगताच शेतीतले प्रश्न, समस्या सांगू लागले. शेती हा समस्यांचा महासागर आहे. या काळया आईची सेवा करण-यांची दुःखे काही अशांने कमी करण्यासाठी काही तरी केले पाहिजे ही भावना प्रबळ झाली. शेतीत काही प्रयोग करुन या समस्यांची उत्तरे शोधावीत असे वाटले. हे प्रयोग करण्यासाइ जमिनीची वाटणी करुन घेतली. मानोरीतील शेती वाटयाला आली. शेती हे शास्त्र आहे ते समजून घेण्यासाठी कृषी शास्त्राच्या तीर्थक्षेत्राकडे अर्थातच कृषी विद्यापीठाकडे 1991 मध्ये ते गेले. कृषी संशोधकांकडून शास्त्र समजून घेतांना असे लक्षात आले, की विद्यापीठातील शास्त्र लोकांना समजणे जरा अवघडच आहे. शास्त्रज्ञांची भाषा शेतक-यांना समजण्यासाठी ती साधी-सोपी व्हायला हवी. शास्त्र शेतक-यांना कळले नाही तर वळणार कसे, सन 1984 ते 1989 या काळात दवाखाना बघून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. शेतीच्या वाटणीबरोबरच कर्जही वाटयाला घेतले होते. पायाभूत सुविधांची उपलब्धी करण्यासाठीच्या खर्चातून मोठा कर्जबाजारी झाले. मनात नैराश्य आले. काही जमीन विकून कर्जमुक्त व्हावे असा विचार आला. त्याचवेळी मित्राचे सासरे अॅड. रघुनाथ पाटील, दसनूर, ता. रावेर, जि. जळगांव शेतावर आले होते. शेतात पायाभूत सुविधांची उपलब्धी महत्वाची आहे. त्यांना दिलासा दिला, डॉ. वने निराशेच्या गर्तेतून बाहेर आले.
परंपरागत पध्दतीने पाणी देण्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्यामुळे पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी सन 1988 ला तुषार सिंचन पध्दतीचा वापर केला. त्यासाठी प्राथमिक दहा हजाराचा खर्च आला. या पध्दतीने कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली 1991 मध्ये भुईमुगाचे प्रात्यक्षिक घेतले. शेतकरी भुईमुगाचे बियाणे करीत नाहीत. डॉ. वने मात्र प्रारंभापासून ते तयार करुन त्याची विक्री करतात. तुषार सिंचनावर पहिल्या वर्षी हरभरा घेतला. रोपांची संख्या आवश्यक तेवढी ठेवता यावी म्हणून हरभरा टोकण पध्दतीने लावला. पुढील वर्षीच्या प
प्रयोगात रोग, कीड नियंत्रणासाठी पट्टा पध्दत विकसित केली. सापळा पिकांची लागवड केली.
कृषी विद्यपीठ हे कृषी शास्त्राचे ज्ञानाचे मोठे भांडार आहे. असंख्य शेतकरी त्या ज्ञानाचे भुकेलेले आहेत. त्यांचे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी हे ज्ञानाचे भांडार त्यांच्यामार्फत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे आणि ते मलाच केले पाहिजे. या माऊलीच्या जाणिवेतून संशोधक विस्तार कार्यास प्रारंभ झाला. त्याच वेळी रब्बी हंगामातील गहू व कांदा या पिकांच्या बाबतीतही प्रयोग शेतात सुरुच होते.
रब्बी हंगाम खरिपाच्या तुलनेत बराचसा शाश्वत. पाणी किती उपलब्ध आहे नि त्यात कोणती पिके घेता येतील याचा अंदाज बांधता येतो. या नगदी पिकांचे बियाणे शेतकरी स्वतःच्या शेतात तयार करु शकतो, त्यामुळे बियाण्याच्या बाबतीत शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो. ही तीनही पिक तुषार पध्दतीने घेता येतात, त्यामुळे पाणी उत्पादकता वाढते. ही तीनही पिके साठविता येतात, त्यामुळे मूल्यवृध्दी करता येते. त्यामुळे कोरडवाहूतील हरभ-याबरोबरच गजू आणि कांदा या पिकांची निवड केली. तुषार सिंचनावर कांदा या प्रयोगाची ही वाट त्यांनीच प्रथम दाखविली. गुरु हा समाजाचा वाटाडयाच असतो, दिशादर्शकच असतो, मग इतरांनी जे कोणी केले नाही ते मी करुन पाहिन. चांगले फलदायी झाले तर इतरांनाही हा मार्ग दाखवीन, असा विचार मनी प्रबळ होता. कांद्याच्या नंतरच्या प्रयोगात गादीवाफ्यावर रोपवाटिका केली. एकूण क्षेत्राच्या 95 टक्के क्षेत्रावर लागवड पध्दती विकसित केली. गव्हाची एकेरी सिंगल पेरणी केली. पुढे टोकण पध्दतीने गहू लागवडीचा प्रयोग देशात बहुतेक प्रथम डॉ. वने यांनीच केला. कमी खर्चात, कमी पाण्यात पिकाची उत्पादकता वाढवून शेती किफायतीशर ठरू शकते याचे एक मॉडेल डॉ. वने या नावाने 15 वर्षांच्या प्रयोगशीलतेतून विकसित झाले.
शेतातील प्रत्येक रोप बोलत असते. रोपाची भाषा शेतक-यांनी समजून घेतली पाहिजे. शती एक प्रयोगशाळा आहे. ती सतत वेगळे काहीतरी शिकवत असते ती शिकण्याची वृत्ती प्रयोगशीलता, संशोधकतेची दृष्टी शेतक-यांनी आत्मसात केली पाहिजे, असे डॉ. वने यांना वाटत आले. माझी शेती यशस्वी झाल्यावर माझ्यापुरता मी असा संकुचित विचार करणारेही अनेक जण असतात, पण गुरुस्थानी असलेल्यांचा विचार व्यापक समग्र असतो. 'जे जे आपणांशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकळ जन' या समर्थ रामदास स्वामी यांच्या ओळीतून पुढचा कृषी विस्तार कार्याचा प्रवास सुरु झाला.
1998 ला तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः मानोरीच्या शेतात आले, डॉ. वने यांनी केलेल्या प्रयोगातील समग्रता त्यांच्या दूरदृष्टीला भावली. राज्य सरकारच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव डॉ. वनेंकडून मागवून घ्या, असे फर्मानच त्यांनी कृषि अधिका-यांना सोडले. त्याचवर्षी हा पुरस्कार मिळाला. याचवर्षी कडधान्य संशोधने प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. मसूद अली हरभ-यावरील प्रयोग पाहण्यासाठी आलेृ हरभ-याचे 36 क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन येऊ शकते, यावर खरे तर त्यांचा विश्वासच बसला नाही. डॉ. वनेंच्या यशोगाथेला त्यांनी इंडियन फार्मिंगमध्ये मानाचे स्थान दिले. सन 2007-08 मध्ये कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना डॉ. वने यांचे शेतातील कार्य, जिल्हाभर राबविलेल्या शाश्वत शेती अभियान कार्यक्रमातून जवळून पाहण्याचा योग आला. डॉ. वने यांच्या 20 वर्षांच्या प्रयोगात त्यांच्या पत्नी शोभा यांची त्यांना मिळालेली मोलाची साथ महत्वाची आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारच्या जिजामाता पुरस्काराने त्यांनी शोभा वने यांना सन्मानित केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, आत्मा-अहमदनगर आणि सकाळ-अहमदनगर आणि सकाळ- अॅग्रोवन, सिध्द समाधी योग यांच्या साथीने कृषी विस्तार कार्यातील इथपर्यंतचा प्रवास झाला. या प्रवासात अनेक जण भेटले यांच्यातील चांगुलपणा, गुण शोधून ते आत्मसात करण्याची गुणग्राहकता मी दाखविली आणि त्यातूनच माझे व्यक्तिमत्व घडत गेले, असे डॉ. वने नम्रपणाने नमूद करतात.
पत्नी शोभाकडून काटकसर, बचत शिकायला मिळाली, तर काकू लक्ष्मीबाई कडून भेदभाव करायचा नाही हे शिकायला मिळाले. कृषी खात्यामुळे विस्तार कार्य करण्याची संधी मिळाली. 'अॅग्रोवन' मधील लेखमालिका ते 'अॅग्रो आयडॉल' या प्रवासात लाखो शेतक-यांसमोर सर्वदूर पोचता आले. कानाकोप-यांतून शेतकरी त्यांच्या समस्यांबाबत फोनवरुन त्यांना सल्ला विचारु लागले. कुठल्याही लाभाची अपेक्षा न धरता डॉ. वने शेतक-यांना मार्गदर्शन करु लागले. निराशेच्या गर्तेत असलेल्या अनेकांना शेतीतच पाय रोवून राहण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांची तोटयातली शेती नफ्याची झाली. शेतीचे हिशेब लिहिण्याचे महत्व त्यांना समजू लागले. आयुष्यातील पथ हा दुर्गम, अवघड डोंगरघाट, गुरुविण मज कोण दाखविल वाट. असे गुरुपण या वाटचालीतून केव्हा मिळत गेले ते त्यांनाही कळले नाही. शेतकरी बांधवांच्या हिताचा, कल्याणाचा विचार याशिवाय गुरु विचार दुसरा कोणता असणार. विविध ठिकाणचे शेतकरी मेळावे, त्यातील भाषणे, दूरदर्शन, आकाशवाणी व विविधि चॅनेल्सवरील मुलाखती यांतून कृषी विस्तारातून शेतीच्या यशाचा मंत्र डॉ. वने सांगत आहेत. त्यांच्या शेतातील शिवारफेरीतून राज्यातील व राज्याबाहेरीलही अनेक शेतकरी प्रभावित झाले आहेत. त्यांचा नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गौरव झाला आहे. मुंबई दूरदर्शन व झी 24 तास या वाहिन्यांनीही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शेती संबंधित धोरणात्मक निर्णय घेणा-या विविध समित्यांवर ते प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या शेतीतवर 'फार्मलेड एक्स्टेन्शन सेंटर' बनविण्याची त्यांची कल्पना आहे. कृषी विद्यापीठाचे शास्त्र शेतक-यांना त्यांच्या साध्या सोप्या भाषेत देण्याचे काम डॉ. वने करीत आहेत. प्रश्न आपला आहे, आपण किती हाताने घेणार आहोत, घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घेणा-यांची संख्या वाढविण्यात गुरु डॉ. वने यांचे समाधान वाढणार आहे.
- डॉ. दत्तात्रय वने
मो. 9822274226
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०