सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान मियॉंसाहेब बाबा
राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉं गांचे ग्रामदैवत व सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले मियॉंसाहेब बाबा. त्यांच्या बद्दल ज्ञात असलेला इतिहास असा की, शके 794 च्या ताम्रपटात देवळालीच्या चतुःसिमेत त्याकाळी टकली या गांवाचा उल्लेख आढळतो. त्याकाळी टकली गांवी जागृत असे मिनी नाथाचे व काली मातेचे भव्य असे हेमाडपंथी मंदिर होते. सन 1600 च्या सुमारास मुस्लिम राजवटीत हे मंदिर उध््वस्थ झाले व त्याजागी छोटीसी मस्जीद बांधण्यात आली. मियॉं नामक अवलीया मुस्लीम धर्माचे प्रसारकार्य व सेवा धर्मासाठी टकली गांवी आले. नाथांचे व कालीचे मंदिर जरी उध्दवस्थ झाले तरी त्यांचा वास येथेच होता. एका रात्री मियाँच्या स्वप्नात नाथांनी दृष्टांत देवून सर्व थरातील समाजाची व पिडीतांची सेवा करुन त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी त्यांना आर्शिवाद दिला.
तेच मियॉं पीडीतांची सेवा करुन त्यांचे दुःख निवारण करणा-या या बाबांवर अनेक लोकांची श्रध्दा बसली तेच बाबा म्हणजे मियाँसाहेब. मियॉंसाहेब बाबांच्या पदस्पर्शाने पूर्वीच्या टकली गांवचे नांव बदलून मियॉंनी टकली म्हणजेच आजची टाकळीमियॉं असे नामकरण तयार झाले. मोहंमद पैगंबरानंतर इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी व प्रचारासाठी इस्लाम धर्मोपदेशक बाहेर पडले. त्यापैकी एक म्हणजे मियॉंसाहेब बाबा होते.
टाकळीमियॉं येथे मियॉंसाहेबांचा आकर्षक असा मोठा दर्गा आहे. या दर्ग्यात बाबांची समाधी आहे. दर्ग्याजवळच पाण्याची बाख आहे. बाबा समाधी स्थळपासून पहाटे 4 वाजता घोडयावर बसून बाहेर पडतात व या बाखेत येतात असा लोकांचा समज आहे. त्यामुळे बाबांना उठविण्यासाठी पहाटे 4 वाजता नगारा वाजवला जातो. तसेच सायंकाळी 7 वाजताही हा नगारा वाजविला जातो. इंदोरच्या होळकर महाराजांचा नजराणा त्याकाळी बाबांच्या सेवेत येत असे. महाराजांनी मियॉंसाहेब बाबांच्या नांवाने इनाम म्हणून मोठी जमीन दिली आहे. अक्षयतृतीया नंतर येणा-या शुक्रवारी बाबांची मोठी यात्रा भरविली जाते. आदल्या दिवशी गुरुवारी गोदावरी नदीवरुन कावडीने पाणी आणून गंगेच्या पाण्याने बाबांच्या समाधीस स्नान घालण्यात येते. ग्रामस्थ दिवाळी प्रमाणे घरोघर सडा, रांगोळी करुन यात्रेची सुरुवात करतात. जातपात न पाळता ब्राम्हणांच्या घरात शुध्द तुपाचा मलिद्याचा नवैद्य दाखविला जातो. समाधीस स्नान घालण्याचा अधिकार येथील ढोबळे कुटूंबियांना आहे. त्यारात्री संदलची फुलांची चादर समाधीस अर्पण करण्यात येते. हा मान येथील मगर कुटूंबियांना आहे. दुसरे दिवशी नवस फेडीचा कार्यक्रम मातेस प्रारंभ होतो. गोडभात, कोंबडे, बकरे यांची कंदुरी, मलिदा, शेरणी, पेढे, नारळ, फुलांची चादर असे बोलल्याप्रमाणे नवस फेडले जातत. या रात्री छबीना मिरवणूक निघून शोभेची दारु आतषबाजी करण्यात येते. या काळात मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शेवटच्या दिवशी शनिवारी कुस्तंच्या हगामा होवून यात्रेची सांगता केली जाते. बाबांवर अनेक लोकांची श्रध्दा असल्याने मुंबई, पुणे, बीड, सोलापूर, उस्मनाबाद, नाशिक आदि भागांतून भाविक श्रध्देने या यात्रेस येतात. आपसातील मतभेद विसरुन ग्रामस्थ एकात्मतेचा व सर्वधर्मसमभावाच्या भावनेने या यात्रेत सहभागी होतात. हे बाबांच्या श्रध्देमुळे सहज साध्य होवून जाते.
- वेणूनाथ शिंदे, टाकळीमियाँ
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०