शिल्पावशेषांचे भांडार- कणगर
राहुरी पासून जवळ असलेले 'कणगर' हे लहानच गाव. जुन्या गावच्या पांढरी मध्ये आजही घरांचे पाये, जुनी खापरे आदि अवशेष आढळतात. काही वर्षांपूर्वी येथे सुमारे २००० वर्षांपूर्वीचे अवशेष सापडल्याची नोंद आहे. साहजिकच इतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून हे गाव महत्वाचे ठरले.
प्रत्येक गावच्या नावामध्ये काही तरी इतिहास असतो तो दंतकथा, आख्यायिकांच्या माध्यमातून ऐकावयास मिळतो. कणगर गावा संबंधीही अशाच काही दंतकथा ऐकावयास मिळतात.
मच्छिंद्र नाथांना आपल्या गुरूच्या झोळीत सोन्याची वीट पाहून त्याचा मोह झाला. कनका विषयीचा मोह दूर करण्याच्या हेतूने गोरक्षनाथांनी ती वीटफेकून दिली हे मच्छिंद्र नाथांना कळले, तेव्हा ते शोक करू लागले. गोरक्ष नाथांनी आपल्या योग सामर्थ्याने डोंगरच सोन्याचा करून टाकला. त्यातील मतितार्थ लक्षात आला. गोरक्षनाथांनी त्या सोन्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तो पुन्हा पहिल्यासारखा केला. या डोंगरावरूनच गावचे नाव कनकगिरी असे पडले. अशीच दुसरी एक दंतकथा सांगितली जाते. गहिनीनाथांचे हे जन्मस्थान असून डोंगरावर त्यांचा आश्रम होता. त्याच संदर्भात नरहरी मसू यांचा 'नवनाथ भक्ती सागर' या ग्रंथाच्या २३ व्या अध्यायात पुढील संदर्भ मिळाले.
परि कर्मद पुतळा गहिनीनाथा, येथे आणावा वाटते ll
ऐसे मोहक एकोणी वचन, म्हणे गंधर्व पाठवीन ll
कोलींगे सहित मधु ब्राह्मण, बालाबह आणावया ll
मग चीत्रासेनी सांगोनी वृत्तांत, पत्र लिहिले मधु विप्राते ll
गंधर्व जीवोनी कनकगिरीनी, भेटोनी कालींगे माधुविप्रशी ll
मग आनंदोत्सव वृत्तांतासी, निवेदिले सकळ तेथ ll
या दंतकथावरून कनकगिरी या स्थळाशी नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांचा संबंध येतो. नरहरी मसू याचा नवनाथ भक्तिसागर ऐतिहासिक दृष्ट्या अविश्वासार्ह मानले असले तरी त्यांनी परंपरेने जतन केलेली माहिती नाकारता येत नाही.
एखाद्या वसूचा, स्थळाचा, काळाचा किंवा इतिहासाचा अभ्यास करतांना दंतकथांना महत्वाचे स्थान दिले जात नाही. त्या दंतकथा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत, परंतु त्या दंतकथा शी समकालीन अवशेष उपलब्ध झाल्यास इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी अवशेष यांच्या बरोबरच या दंतकथा महत्वाचा दुवा मानाव्या लागतील. याचे उदाहरण म्हंजी कणगर गावातील बुबळेश्वरचे मंदिर. मंदिर दरीत आहे. मंदिराच्या परिसरात यादव कालीन शिल्पावाशेषांचे अमोल भांडार आहे. मूर्तींचे सौंदर्य अप्रतिम आहे. शिव-पार्वती, लक्ष्मी-नारायण आदि चतुर्भुज महलक्ष्मी अभ्यासले असता दंत कथांशी बर्याच प्रमाणात साम्य दाखवतात. या मंदिरांच्या स्थापने संबंधीची दंतकथा पुढील प्रमाणे आजही ऐकवीत येते. मच्छिंद्रनाथ आपले शिष्य गोरक्षनाथ यांच्या बरोबर जात असताना वाटेत विश्रांती साठी थांबले. त्यांना भूक लागली. गोरक्षनाथ झोळी घेऊन गावात भिक्षा मागण्यास गेले. तेथील ब्राम्हणाच्या घरी प्रीतृश्राद्ध होते. तेथे भरपूर भिक्षा मिळाली. मच्छिद्र नाथांना जेवणातील वडे फार आवडले, त्याच्या साठी गोरक्षनाथ पुन्हा त्या घरी भिक्षा मागायला गेले. तेथील गृहिणीला ते ढोंगी शिष्य वाटले. म्हणून तिने ''तुझ्या डोळ्याचे बुबुळ काढून दिलेस तरच भिक्षा देईन'' अशी आत घातली. गोरक्षनाथांनी बुबुळ काढून ठेवले. मच्छिंद्रनाथांनी योग सामर्थ्याने पुन्हा बुबुळ निर्माण केले. हि घटना जेथे घडली त्या शिव मंदिरास बुबुळेश्वर असे म्हणतात.
या गावात शिरण्यापूर्वी डोंगरातील गुहेत जगदंबा देवीचे मंदिर आहे. तेथे यादवकालीन मूर्ती आढळतात. त्यात गणपती, नागदेवतेच्या मूर्ती आहेत.
'शाक्त पंथाचे' हे महत्वाचे स्थान असावे. या गुहेत कोरीव शिल्प अपेक्षित आहे परंतु तसे आढळत नाही. याचे कारण लेणी खोडून त्यात देवीची स्थापना करणे हि घटना उत्तर कालीन आहे. प्राचीन काळी नैसर्गिक गुहान्माध्येच अशा देवता स्थापन करण्याची पद्धत होती याचे उदाहरण म्हणजे सप्तशृंगी गडावरील देवीचे स्थान. याच डोंगराच्या मध्यावर पाच फुटी दिगंबर जैन मूर्ती पडलेल्या आढळतात. त्यांची शिरे व पाय तोडलेले असले तरी या मूर्तींची प्रमाण बद्धता व सौंदर्य पाहता त्या किमान नवव्या किव्वा दहाव्या शतकातील असाव्यात. या संपूर्ण पठारावर मंदिराचे अवशेष आढळत नाहीत. येथे एक जुना तलाव होता असे म्हणतात, परंतु मूर्तीवरून कल्पना केल्यास प्रचंड मंदिराचे अवशेष दिसावयास हवे होते, परंतु ते नसल्याने या मूर्ती कर्नाटकातील गोमतेश्वराप्रमाणे पठारावर उभ्या केल्या असाव्यात असे वाटते.
या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बुबुळेश्वर मंदिराच्या जवळील बाख. मंदिराच्या जवळून जाणार्या ओढ्या जवळ कुंठ असल्याची कथा सांगितली जाते. त्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रसाद तनपुरे, सुरेश जोशी, प्रा. शेख, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उत्खनन करण्याचे ठरविले. त्यामध्ये खडकात कोरलेली, पाय-या असलेली मोठी बाख आढळली. पाय-यांवर शिवपिंडी हि आढळल्या. त्याच बरोबर अनेक मानवी हाडे व रक्षाही आढळली. हि बाख पिंडदान, अस्थी विसर्जनासाठी वापरात असत. याच बाखेत यादव कालीन मूर्ती व अवशेष आढळून आले. त्यामुळे हि बाख १६-१७ व्या शतकापर्यंत वापरात असावी. मात्र बाख तिच्या खोड कामावरून ६-७ व्या शतकातील असावी असे तज्ञांचे मत आहे. या बाखेजवळ काही भागाचे उत्खनन केले पाहिजे. त्याच प्रमाणे गावातील ग्रामपंचायती जवळ एका पारावर दुर्मिळ अशी बौध कुबेराची मूर्ती आणि बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धाची मूर्ती दिसते. त्याच प्रमाणे श्रीगणेश, विठ्ठल-रुख्मिणी या मूर्ती नाविन्यपूर्ण आहेत.
-बबलू जोशी, नगर
This website is developed by
Computronics Cyber Cafe,
Prop. Nilesh Manohar Pande,
Main Road, Shivaji Chowk, Rahuri,
Tal. Rahuri, Dist Ahmednagar
Phone: (02426) 2-3-4-5-6-8
Mobile: 9850192780 /9890366002