नवसपूर्ती करणारी मानोरीची रेणुकामाता

     अवघ्‍या महाराष्‍ट्राची कुलस्‍वामीनी तुळजाभवानी, कोल्‍हापूरची महालक्ष्‍मी, माहुरची रेणूकामाता आणि सप्‍तशृं‍गीगडाची सप्‍तशृंगी देवी ही महाराष्‍ट्रातील देवीची साडेतीन शक्‍तीपीठे आहेत.  अहमदनगर जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यात पूर्वेला सुमारे बारा किलोमीअर अंतरावर मुळा नदी तिरावर मानोरी गांवातही माहूरच्‍या रेणूकादेवीचा वास असून त्‍या ठिकाणी रेणूकामाता मंदिराची उभारणी केलेली आहे.  असे म्‍हणतात की, राहुरी येथील मतानी बाबा, गोंधळे व गुलदगड हे माहुर येथील रेणूका मातेचे निस्‍सीम भक्‍त होते.  ते नियमित न चुकता माहुरगडला रेणुकामातेच्‍या दर्शनाला जात असत.  त्‍यावर देवीने प्रसन्‍न होवून त्‍यांना वर मागितला त्‍यावर त्‍या दोन व्‍यक्‍तींनी त्‍यांचे गांवी येवून वास करावा अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली. रेणुकामातेने सांगितले ठिक आहे, मात्र तुम्‍ही पुढे चालत रहा जर तुम्‍ही मागे वळून पाहिले तर मी त्‍या ठिकाणी प्रकट होवून तिथेच स्‍थापना करावी.  ठरल्‍याप्रमाणे त्‍या दोन व्‍यक्‍ती चालत मानोरी गांवापर्यंत आले मात्र अनावधानाने त्‍यांनी मागे वळून पाहिले आणि त्‍याच ठिकाणी रेणूकामाता प्रकट होवून स्‍थापना करण्‍यात आली.  मानोरी गांवचे पूर्वीचे नांव रेणापूर असे होते मात्र देवीच्‍या स्‍थापनेनंतर मानोरी असे रुपांतर झाले. त्‍यानंतर देवीने सस्‍वरुपात प्रकट होवून माहूरगडावरील तांदळे आहेत तेथे महारुद्र आणि श्रीसुताचा अभिषेक केल्‍यानंतर स्‍वयंभू तयार झाले आणि माहूरगडची रेणूकामाता मानोरी येथे स्‍थापन झाली.  मानोरी गांवातील काही भक्‍तांना स्‍वप्‍नात येवून सांगितले की नवमीच्‍या दिवशी जो कोणी उपासना करुन सां‍गता करील त्‍यास देवी प्रसन्‍न होईल अशी अख्‍यायिका आहे.

     सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी म्‍हणजे सन 1867 साली गांवक-यांनी लोकवर्गणीतून रेणुकामातेचे मंदिर उभारले.  दिवसेंदिवस रेणूकातेचा महिमा वाढत असल्‍याने सन 1980 साली रेणूकामाता ट्रस्‍टची निर्मिती केली.  देवीच्‍या पुजा अर्चेसाठी इंग्रजांच्‍या काळातील नऊ एकर जमीन देण्‍यात आली.  देवीचे जागृत देवस्‍थान असलेने संपूर्ण महाराष्‍ट्राच्‍या कानाकोप-यातून भाविक रेणूकामातेच्‍या दर्शनासाठी हजेरी लावतात त्‍यामुळे त्‍याचे निवासस्‍थानासाठी निवासही बांधण्‍यात आलेले आहे. देवीची स्‍थापना झाल्‍यापासून गोंधळी दशरथ पुंजाजी सोनवणे यांचे वडिलोपार्जीत भोपे देवीचे भगत म्‍हणून देवीसमोर उभे असतात.  आरती-पूजाअर्चा रघुनाथ घाडगे करतात. नवरात्र उत्‍सव काळात देवीची मोठी यात्रा भरते.  या काळात किर्तन, प्रवचन, गोंधळाचे आयोजन केले जाते.  ट्रस्‍टच्‍या वतीने नऊ दिवस फराळाचे आयोजन करतात.  सुवासिनीचे नवैद्य, नवसपूर्ती, आषाढी एकादशीला पंढरपूर पालखी इत्‍यादी कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात.  चैत्र पौर्णिमेला देवीचा उत्‍सव साजरा करण्‍यात येतो.

     अशा प्रकारे 1970 सालापासून रेणुकामाता देवस्‍थान ट्रस्‍ट रेणूकामाता बरोबरच विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्‍वर, हनुमान, लक्ष्‍मीमाता, मुंजोबा मंदिर इत्‍यादी देखभालही ट्रस्‍टच्‍या वतीने करण्‍यात येत असल्‍याचे ट्रस्‍टचे अध्‍यक्ष गेणूजी आढाव यांना सांगितले.  तसेच अलिकडे महाराष्‍ट्र शासनातर्फे ट्रस्‍टला 'क' मानांकन दर्जा प्राप्‍त झालेला असून दूरवरुन येणा-या भाविक भक्‍तांना मोठया प्रमाणात सोयी सुविधा ट्रस्‍टतर्फे करुन देण्‍यात येतील.

- राजेंद्र आढाव

 हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.

पत्ता-  ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,

विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,

संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८

भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०

              ९९२३५ ९२७८०

फेसबुक प्रोफाईल