कुरणवाडीसह १९ गावांना मिळणार पाणी
वीज बिलाची थकबाकी महावितरणकडे जमा
राहुरी। दि. 6 (वार्ताहर)
लोकमत शुभवर्तमान - थेट मुळा धरणातून कार्यान्वित केलेल्या कुरणवाडी १९ गाव पाणी पुरवठा योजनेची थकबाकीपोटी रक्कम महावितरणकडे जमा करण्यात आली. त्यामुळे बंद पडलेली पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्र्यांनी आदेश देऊन देखील पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित झाली नव्हती. त्यामुळे ४0 हजार लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाणीपुरवठा योजनेकडे २0 लाख रुपये महावितरणचे बील बाकी होते. त्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यात आले होते. आंदोलन केल्यानंतर ३ लाख रुपये भरा, असे महावितरणने सांगितले होते. त्यानंतर बिलाची आणखी मागणी करण्यात आली. १३ व्या वित्त आयोगाचा ११ गावांनी निधी जमा केला. काल दुपारी ६ लाख ७१ हजार रुपये महावितरण कार्यालयात धनादेशाद्वारे जमा करण्यात आले, असे सज्रेराव घाडगे यांनी सांगितले. मुळा धरणजवळ असतानाही ऐन उन्हाळ्यात १९ गावातील ग्रामस्थांना भटकंती करावी लागली. राहुरी तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागला. भयानक परिस्थिती लक्षात घेता आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधीतून कणगर, कानडगाव, तांभेरे, चिंचविहिरे कुपनलिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Daily Sarwamat 6 June 2012