खोटे वाटणीपत्र - Forged Partition Deed
खोटे वाटणीपत्र - Forged Partition Deed
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
सदर वाटणीपत्र दस्तामध्ये हे सर्व अंगठ्याचे ठसे एकाच व्यक्तीचे असल्याचे दर्शवण्यात आले आहे!
माझ्या आईच्या वडिलांच्या मुर्त्यूनंतर काही वर्षांनी जे वाटणीपत्र बनवले, खोटे का आहे?
खालील लिंकवर खोटे वाटणीपत्र जोडले आहे. त्यावर क्लिक करून ते पाहता येऊ शकते.
माझ्या आईच्या वडिलांच्या मुर्त्यूनंतर काही वर्षांनी खोटे वाटणीपत्र बनवले.
माननीय चंदगड (Case No: 89/2018) आणि गडहिंग्लज (Case No: 7/2020) दिवाणी न्यायालयांच्या निकालानुसार मी, कै नाना सुबराव पाटील यांची ज्येष्ठ मुलगी सिध्द झाली आहे. या दोन्ही न्यायालयांमध्ये पराभूत होऊनही श्री महादेव पाटील यांनी सदर दस्त दाखल केले नव्हते, यावरून त्यांनी हे दस्त सप्टेंबर 2022 नंतर बनवून घेतले असणार यावर शंका घेण्यास वाव आहे, हे खालील गोष्टीवरून सिध्द होते:
माझे वडील कै नाना पाटील हे नेहमी सही / हस्ताक्षर करत असताना, वाटणीपत्रावर अंगठ्याचे ठसे आहेत. पुराव्यासाठी त्यांच्या सहीचे पुरावे सोबत जोडले आहेत.
हे दस्त बनवताना ते सही न करता येण्याइतके आजारी होते का? तसे असेल तर त्या दस्तामध्ये तसा उल्लेख का करणेत आला नाही? वाटणीपत्र तयार करण्याच्या वेळी प्रमुख व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती सक्षम असावी लागते.
एकाच व्यक्तीच्या आंगठाचे ठसे आणि रेषा नैसर्गिकपणे समान असतात. पण येथे कै नाना पाटलांचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेले आंगठाचे ठसे वेगवेगळे आहेत. सोबत जोडलेल्या ठस्यांच्या उन्नत प्रतिमा पाहा.
कै नाना पाटील यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी उमटवलेल्या अंगठ्यांच्या आकारात अवास्तव विसंगती आहेत.
कै नाना पाटील हे अंगकाठीने नाजूक प्रकृतीचे होते, पण या दस्तावर त्यांचे आंगठाचे ठसे भरभक्कम व्यक्तीसारखे अगडबंब दिसतात.
हे दस्त जुने स्टॅप मिळवून त्यावर लिहिले गेले आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे. ब्लेड आणि खोडरबरच्या साहाय्याने त्या मूळ दस्तावरील नाव, पत्ता आणि इतर जुन्या नोंदी वाचता येत नसल्या तरी नष्ट केल्याचे स्पष्ट दिसते. खोटे दस्त नोंदवण्यासाठी ठग लोंकाकडून ही जुनी पद्धत वापरली जात असे. त्यावरील मूळ नोंदी नष्ट आणि जुनी लिखावट का नष्ट केली गेली आहे, याविषयीचा संयुक्तिक तर्क दिला गेलेला नाही.
एखाद्या नैसर्गिक आणि कायदेशीर वारसदाराचे हक्क, तिचे वडील केवळ स्व:अर्जित मालमत्तेवरच विशिष्ट कारणास्तव नाकारू शकतात; पिढीजात किंवा परंपरागत जमिनीवर किंवा संपत्तीवर ते शक्य नाही. कुणीही केवळ इतर वारसांचा हक्क डावलण्यासाठी परंपरागत मालमत्तेचे किंवा जमिनींचे वाटणीपत्र करू शकत नाही. तहसिल रजिस्ट्रार कार्यालयाने दस्तात नोंदलेल्या सर्व मिळवती कै नाना पाटलांच्या स्वअर्जित मिळकती आहेत याची खात्री केलेली नाही.
भारतीय वारसा कायदा, 1956 नुसार, मुलं ही वडिलांची नैसर्गिक वारसदार मानली जातात आणि त्यानुसार त्यांना वडिलांच्या मिळकतीमध्ये नैसर्गिक समान हक्क आहे. वडिलांनी इच्छापत्र / वाटणीपत्र लिहिले असो वा नसो, मुलाला कायदेशीररित्या वारसा हक्क मिळण्याचा अधिकार आहे. तरिही माझा हा कायदेशीर वारसा हक्क का नाकारण्यात आला, याचे संयुक्तिक कारण वाटणीपत्रात देण्यात आलेले नाही.
बापाने आपल्या प्रथम मुलीचा नैसर्गिक वारसा हक्क का हिरावून घेतला आहे, याचे संयुक्तिक कारण दस्तऐवजामध्ये नमूद केलेले नसेल, तर असा दस्त रद्द होऊ शकतो.
श्री महादेव पाटील हा जर कायद्यानुसार सरळ वारस होता, तर त्याला सदर व्यक्तीला वाटणीपत्र करून घेणेची गरज का वाटली? तेही त्याने आपल्याला इतर कोणी सरळ वारस नसलेले लिखित मान्य केलेले असताना? त्याचे कोणते संयुक्तिक कारण देण्यात आलेले नाही.
श्री स. स. कांबळे, हे दस्त बनवून देणारे दुय्यम निबंधक, चंदगड, हे कोणत्या कालावधीत - किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत चंदगड तहसिल कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होते, शिवाय ते दिनांक 28/06/2000 रोजी कार्यरत होते का, याची माहिती आम्हाला तहसिल कार्यालयाकडून देण्यात आली नाही.
शिवाय सदर दस्तावरील श्री स. स. कांबळे, दुय्यम निबंधक, चंदगड यांच्या दस्ताची आपण पुष्टी तहसिल कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही.
सदर वाटणीपत्रानुसार दिनांक 28/06/2000 रोजी जे सरकारी टॅक्स भरलेले आहेत, त्या बिलिंगची आम्हाला अधिकृत कॉपी देण्यात आली नाही.
पंचवीस वर्षांपूर्वी सामान्यपणे खेडेगावांतून मोठ्या कुटूंबातूनही वाटणीपत्र केले जात नव्हते असे कळते. मग सदर व्यक्तीने आपण एकुलता एक मुलगा आहे, हे लिखित मान्य केल्यानंतरसुद्धा ते वाटणीपत्र का केले, याचा कोणताही तर्क दिलेला नाही.
सकारण केलेल्या तक्रारीचे गंभीर स्वरूप गृहित धरून; आम्ही दस्तावरील शिक्के, अधिकृत चिन्हे, कागद आणि शाईचे फॉरेन्सिक विश्लेषण करून दस्ताचे वय निश्चित करून, शिवाय नोटरी आणि साक्षीदार प्रमाणाची पडताळणी करुन माहिती देण्याच्या आमच्या सकारण विनंतीची तहसिल कार्यालयाकडून दखल घेतली गेली नाही.
सदर दस्ताचे आमच्याकडे केवळ झेरॉक्स असलेने आम्हाला दिनांक 28/06/2000 सालामध्ये दस्तावेजावर आणि स्टॅम्प पेपरवर वॉटरमार्क किंवा इतर सुरक्षा वैशिष्ट्ये असायची का? या दस्तामध्ये ती समाविष्ट आहेत का? याची तहसिल कार्यालयाकडून पडताळणी करून मिळाली नाही.
कागदपत्रावर स्वाक्षरी करणारे अधिकारी आणि कागदपत्र तयार करणारा विभाग या दस्ताचे प्रमाणीकरण / अधिकृतता मान्य करतात का? याचेही तहसिल कार्यालयाकडून उत्तर मिळाले नाही.
जर वाटणीपत्र वारस हक्काचा गैरवापर दर्शवत असेल तर ते खोटे ठरू शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला वारसात असलेला हक्क वाटणीपत्रात समाविष्ट नसेल, तर ते भारतीय वारसा कायद्यानुसार रद्द ठरू शकते
चंदगड तहसिल कार्यालयाने हे दस्त कोणतीही गैर प्रक्रिया न करता बनवले गेले आहे, याची पुष्टी केली नाही. अलिकडेच तहसिल कार्यालयामध्ये खोटे दस्त तयार करून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रचंड मोठा गैरप्रकार उघडकीला आल्याने काही अधिकाऱ्यांना दंडितही करण्यात आले होते, हे खेदाने नमुद करावे लागते. सोबत तत्सबंधी पुरावा जोडला आहे.
शिवाय तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गैरप्रकारामुळे ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई सदर कार्यालय करते का? किती लोकांना अशी सविनय नुकसान भरपाई देण्यात आली? तसे नसेल तर, नागरीकांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? याविषयी तहसिल कार्यालयाकडून उत्तर मिळाले नाही.
सदर वाटणीपत्राच्या खरेपणाबद्दल आणि प्रामाणिकताबद्दल मला सकारण गंभीर शंका आहेत. दस्तऐवजात काही विसंगती आहेत ज्या हे वाटणीपत्र खोटे असल्याची रास्त शंका निर्माण करतात.
आमच्या तर्क आणि पुराव्यानुसार, हा दस्त खोटा असून अलिकडच्या एक-दोन वर्षांत बनवलेला वाटतो.
सदर वाटणीपत्राच्या खरेपणाबद्दल आणि प्रामाणिकताबद्दल मला सकारण गंभीर शंका आहेत. दस्तऐवजात काही विसंगती आहेत ज्या हे वाटणीपत्र खोटे असल्याची रास्त शंका निर्माण करतात.
आमच्या तर्क आणि पुराव्यानुसार, हा दस्त खोटा असून अलिकडच्या एक-दोन वर्षांत बनवलेला वाटतो. आम्ही तो आमच्या अक्षेपासह येथे नोंदवलेला आहे. सत्य समजण्यास आपण सक्षम आहे यावर आमचा विश्वास आहे.
भारतीय उत्तराधिकार कायद्याच्या / Indian Succession Act कलम 33 नुसार, जर एखादे वाटणीपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले तर ते रद्दबातल ठरवले जाऊ शकते. वाटणीपत्र किवा वसियत "लॅक ऑफ ड्यु एक्झिक्यूशन" म्हणजे योग्य पद्धतीने आणि कायदेशीर आवश्यकतांनुसार तयार किंवा अंमलात आणले गेले नसेल तर, असे दस्तऐवज वैध मानले जाऊ शकत नाही आणि रद्द ठरू शकते. केवळ नोंदणीकृत असल्यामुळे कोणतेही दस्तऐवज खरे मानले जाणार नाहीत. वादग्रस्त आणि शंकास्पद परिस्थितीमध्ये बनवलेल्या दस्तानुसार मालमत्तेच्या नोंदीमध्ये बदल करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांकडे नाहीत. हे निष्कर्ष नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या निर्णयात तंतोतंत दिलेले आहेत. हे निर्णय खोट्या आणि बनावट दस्तऐवजांचा वापर रोखण्यास महत्त्वाचे ठरणारे आहेत. (IN THE SUPREME COURT OF INDIA: Civil Appeal Nos. 6805, 6803-6804 of 2013 and 8627 of 2014).
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे की, खोट्या दस्तऐवजांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना नैसर्गिक न्याय आणि समान संधीचा लाभ मिळण्याचा अधिकार नाही. जर कोणी खोटे दस्तऐवज तयार केले, तर त्यांचे मुलभूत नैसर्गिक न्याय हक्क नाकारले जातील. Null and Void नुसार, त्यांचे प्रस्थापित हक्कही रद्दबातल होतील. अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना न्यायाची समान संधी दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
2018 आणि 2020 साली श्री महादेव नाना पाटील यांनी माझ्याविरुद्ध दावा दाखल केला होता. पण न्यायालयाने स्पष्ट शब्दांत मी सह-मालक असल्याचे सिध्द होत असलेचे नोंदवले आहे. कोर्टाने त्याने कोर्टासमोर महत्त्वाची तथ्ये लपविल्याने निषेधही नोंदवला आहे. त्यानंतर मी माझे नाव माझ्या वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेच्या नोंदीत समाविष्ट करण्यासाठी, त्या विभागून मिळण्यासाठी, आणि त्याच मालमत्तेवर बेकायदेशीरपणे केलेले विक्रि करार, फेरफार रद्द करण्यासाठी, माननीय चंदगड दिवाणी न्यायालयात दिनांक 23-08-2023 ला R.C.S./109/2023 हा दावा सादर केला आहे. तो दावा प्रभावित करणेसाठी हे दस्त बनवण्यात आले आहे. कृपया चार्जशीट दाखल करण्याबरोबरच, माझ्या दाव्या संदर्भात न्यायालयाला या गैरप्रकाराबाबत सूचित करण्यात यावे अशी विनंती आहे.
मी श्रीमती शांताबाई मारुती जाधव (लग्नापूर्वी अनुसया / अनुबाई नाना पाटील), मु. पो. रामपूर / डुक्करवाडी, तालुका चंदगड येथील रहिवासी आहे. माझे वडील कै नाना सुबराव पाटील हे मांडेदुर्ग, तालुका चंदगड येथील रहिवासी होते. माझे वडिल दिनांक 18 नोव्हेंबर 2003 रोजी निधन पावले. त्यांच्या निधनानंतर आमच्या वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेवर मी कायदेशीर हक्कदार आहे. हिंदू वारसा कायदानुसार, आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वारस प्रथम ज्येष्ठ मुलगी म्हणून मी, आणि माझा कनिष्ठ सावत्र भाऊ आणि कनिष्ठ सावत्र बहिण आहोत.
माझ्या वडिलांचा कै नाना सुबराव पाटील यांचा दिनांक 01 ऑक्टोबर 1952 रोजी माझ्या आईशी कै यल्लूबाई हिच्याशी तत्कालीन वैधिक पद्धतीने समाजमान्य विवाह झाला होता. त्या दोघांचे मी प्रथम अपत्य होते. त्यानंतर त्यांनी कै लक्ष्मीबाई हिच्याशी दुसरा विवाह केला. श्री महादेव नाना पाटील आणि सौ सरस्वती भैरू गावडे ही त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेली अपत्ये आहेत.
माझा सावत्र भाऊ आणि बहिण अनुक्रमे श्री महादेव नाना पाटील आणि सौ सरस्वती भैरू गावडे यांनी माझा कायदेशीर हक्क नाकारला होता. कै नाना सुबराव पाटील यांनी स्वतःच्या हयातीत चंदगड सब रजि. दस्त नं. ८५८/२००० या दस्ताने ता. २८/०६/२००० रोजी दावा मिळकतीचे वाटणीपत्र केले होते, असा नवीनच दावा केला आहे. पूर्वीच्या दोन्ही केसमध्ये हार होऊनही प्रतिवादीने दावा मिळकतीचे वाटणीपत्र कोर्टात सादर केले नाही, ते अचानक कसे निर्माण झाले, हे एक गौडबंगालच होते. प्रतिवादीने नमुद केलेल्या सदर "दावा मिळकती वाटणीपत्राची" सत्यप्रत मिळाल्यानंतर ती खोटी असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
डॉक्ट्रिन ऑफ लिस पेंडन्स तत्वानुसार वादग्रस्त मालमत्तेचा खटला चालू असताना, त्या खटल्यात अंतर्भूत असलेल्या अचल संपत्तीचे हस्तांतरण केले जाऊ शकत नाही. खटल्याच्या दरम्यान मालमत्तेची विक्री, हस्तांतरण बेकायदेशीर ठरवले गेले आहे, ज्यामुळे दुसऱ्या पार्टीच्या अधिकारावर विपरीत परिणाम होतो. बहुदा तत्कालीन सर्कल आणि तलाठी यांच्या संगनमताने खटला चालू असतानाच सदर वादग्रस्त मालमत्तेचे फेरफार केले गेले.
चंदगड आणि गडहिंग्लज या दोन्ही न्यायालयांनी श्रीमती अनुबाई ही कै नाना पाटील यांची प्रथम मुलगी आहे, याची याआधीच पुष्ठी केली आहे. त्यामुळे केवळ माझा वारसाहक्काने मिळणारा मालमत्तेवरील हक्क नाकारण्यासाठी, त्यानी हे खोटे वाटणीपत्र बनवून घेतले आहे.
2023 च्या सुधारित कायद्यामुळे फॉरेन्सिक तपासणी प्रक्रिया अधिक जलद आणि प्रभावी झाली आहे. पोलिसांना परवानगीशिवाय फॉरेन्सिक तपासणीचे अधिकार मिळाल्यामुळे तपास प्रक्रियेत गती आली आहे. ई-रजिस्ट्रेशन प्रणाली सुरू करण्यात आल्याने आणि ऑनलाइन FIR नोंदणी प्रणालीमुळे गुन्ह्यांची नोंदणी अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे. या सर्व सुधारणांमुळे पीडितांना न्याय लवकर मिळण्यास मदत होईल. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत.
संबंधीत तक्रारीला अनुसरून आवश्यक माहिती सोबत जोडलेल्या PDF मध्ये विस्तृतपणे पुराव्यानिशी संकलित केली आहे. कृपया त्याचे अवलोकन करावे आणि आम्हाला तत्परतेने न्याय मिळवण्यासाठी मदत करावे ही विनंती. शिवाय संबंधीतांना कारवाईविषयी आम्हाला वेळोवेळी अवगत करावे ही विनंती.
धन्यवाद!
श्रीमती शांताबाई मारुती जाधव
मु. पो. रामपूर (डुक्करवाडी),
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र,
पिन – 416507.
इतर संदर्भ:
उपरोक्त विषयास अनुसरून सविनय विनंती करते की, मी अर्जदार यांचे माननीय दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, चंदगड येथे दिवाणी दावा क्रमांक R.C.S./109/2023 (सीएनआर क्रमांक: MHKO140005472023) प्रदीर्घ काळासाठी प्रलंबित आहे. सदर दाव्यातील विरोधी पक्ष हे खटलेची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याने खटल्यांची सुनावणी आज अखेर होऊ शकलेली नाही.
माननीय चंदगड दिवाणी न्यायालयाच्या निकालानुसार मी, माझे नाव माझ्या वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेच्या नोंदीत समाविष्ट करण्यासाठी, त्या विभागून मिळण्यासाठी, आणि त्याच मालमत्तेवर बेकायदेशीरपणे केलेले फेरफार रद्द करण्यासाठी, सदर न्यायालयात दावा सादर केला आहे.
Case Details:
R.C.S./109/2023
सीएनआर क्रमांक: MHKO140005472023
दाखल तारीख: 23-08-2023
सदर दाव्याला अनुसरून दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी प्रतिवादीने न्यायालयात दाखल केलेल्या कैफियत मध्ये विलक्षण विपर्यास मांडला आहे. त्यांनी माननीय चंदगड आणि गडहिंग्लज दिवाणी न्यायालयांच्या याच संदर्भात पारित झालेल्या निकालानुसार "मी कै नाना सुबराव पाटील यांची मुलगी असलेचे" सिध्द झाल्याचा थोडासाही उल्लेख केलेला नाही. पेक्षा त्यांनी ती बाब खूप धूर्तपणे लपवायचा प्रयत्न केला आहे.
सदर केस बेकायदेशीर पध्दतीने प्रभावित करण्याचा प्रतिवादीचा प्रयत्न नुकताच आमच्या निर्दशनास आलेला आहे.
प्रतिवादीने बरेच खोटे दावे प्रतिज्ञापत्रासह न्यायालयात दाखल केले आहेत, त्यातील प्रमुख असे:
1. प्रतिवादीने याच चंदगड दिवाणी न्यायालयामध्ये निकाली निघालेला "मी कै नाना सुबराव पाटील यांची मुलगी असलेचे" सिध्द झाल्याचा मुद्दा पुन्हा मांडला आहे. निकाली निघालेला मुद्दा त्याच न्यायालयात उपस्थित करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे.
2. प्रतिवादीने नमुद केलेले "दावा मिळकतीचे वाटणीपत्र" ही केवळ न्यायालयीन प्रोसिजरचा गैरफायदा घेऊन केस विलंब करण्याचा बनाव आहे. अशी बेकायदेशीर क्लुप्ती त्यांनी गडहिंग्लज दिवाणी न्यायालयात वापरून केस हेतुपूर्वक तीन वर्षे प्रलंबित ठेवली होती. न्यायालयाला आपल्याकडे काहीतरी महत्वाचे दस्त असल्याचे भासवत दिशाभूल करत राहिला होता.
3. प्रतिवादीने कै नाना सुबराव पाटील यांनी स्वतःच्या हयातीत चंदगड सब रजि. दस्त नं. ८५८/२००० या दस्ताने ता. २८/०६/२००० रोजी दावा मिळकतीचे वाटणीपत्र केले होते, असा नवीनच दावा केला आहे. नमूद केलेले "दावा मिळकतीचे वाटणीपत्र" आम्ही RTI अंतर्गत मिळवले असता, ते अनेक बाबीवरून खोटे व Forged असल्याचे लक्षात आले. त्यासंबंधीचे तथ्य आणि पुरावे खाली दिले आहेत. पूर्वीच्या दोन्ही केसमध्ये हार होऊनही प्रतिवादीने दावा मिळकतीचे वाटणीपत्र कोर्टात सादर केले नव्हते.
4. माननीय चंदगड आणि गडहिंग्लज दिवाणी न्यायालयात केस प्रलंबित असताना, वादातील शेतजमिनीमध्ये प्रतिवादीने बेकायदेशीर फेरफार, हस्तांतरण आणि विक्री करार केले आहेत. बेकायदेशीर फेरफारचे दाखले सोबत दिले आहेत.
5. प्रतिवादी सदर न्यायालयामध्ये यापूर्वीच सिध्द झालेले अनेक मुद्दे सबळ कारणाविना पुनः पुन्हा सादर करून न्यायालयाच्या निष्पक्षपाती निकालावर नकळत संभ्रम निर्माण करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे
6. माझ्या मुलांवरही याच व्यक्तीने खोटी फौजदारी केस माननीय फौजदारी न्यायालय चंदगड येथे (Case Number: Cri.M.A./0000170/2020) दाखल करून चार वर्षे उलटून गेल्यानंतरही फिर्यादीतर्फेच पुरावा देणेसाठी मुदतीचा अर्ज दाखल केला जातो आहे!!!
7. न्यायालयाची फसवणूक - प्रतिवादीने आमच्या ग्रामपंचायतीने माझा लग्न दाखला दिला नाही असा दावा करून न्यायालयाची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात, ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधीने कोर्टात हजर राहून मूळ रजिस्टर दाखवून दाखला योग्य असल्याची पुष्टी केली होती. माझ्या पतीचे वडील आमच्या लग्नापूर्वीच मृत झाले होते, त्यामुळे त्या दाखल्यावर 'पालक' म्हणून असलेला, चुलत मोठ्या भावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करून वकिलांनी कोर्टामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार, पालक म्हणजे बायोलॉजिकल फादर किंवा पालन करणारा कुणीही नातलग असू शकतो. प्रतिवादीच्या वकिलांनी असा संभ्रम निर्माण करणे त्यांच्या अज्ञानाचे लक्षण आहे.
8. Suffering from loco-motor disability - प्रत्यक्षांत तो ट्रॅक्टर आणि दुचाकी चालवतो. Locomotor disability चा दावा केलेली ही व्यक्ती बोजड वाहने चालवते. अवजड वाहन परवाना (Heavy Driving Licence) Locomotor disability असलेल्या व्यक्तीला दिला जात नाही. एकीकडे व्यक्ती लोकोमोटर अपंगत्वाचा दावा करत असून, दुसरीकडे ती भारी वाहने चालवते - हे विरोधाभासी आहे. यावरून सदर व्यक्तीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चुकीची माहिती दिली असावी.
9. Left eye is permanently blind - त्याच्या डाव्या डोळ्याला अपघाती जखम झाली आहे हे खरे आहे, पण त्यामुळे अंधत्व आले आहे, असा खोटा बहाणा केला गेला. तो ट्रॅक्टर आणि दुचाकी चालवतो.
10. Old aged personality - 2018 ला केस दाखल केली गेली त्यावेळी त्याचे वय 48 होते - या वयाच्या व्यक्तीला म्हातारे समजले जात नाही - प्रौढ समजले जाते. न्यायालयाची सहानभुती मिळवण्यासाठी खोटा दावा केला.
11. Totally Denied the relations - कायदेशीर दस्तामधून ते पूर्वीच सिध्द झाले आहे, तरीही माझी आणि सावत्र भावाची DNA Test करून ही शंकाही दूर केली जाऊ शकते. दोघांची आई वेगळी असली तरी बापाकडून आलेले अर्धे DNA विज्ञानानुसार समान असतात. शिवाय DNA चाचणीचे परिणाम कायदेशीरदृष्ट्याही मान्य असतात.
12. जरी वडिलांनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी एका अपत्याचा हक्क डावलून दावा मिळकतीचे वाटणीपत्र केले तरीही, असे वाटणीपत्र कायदेशीररित्या अमान्य किंवा अवैध ठरवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, हक्क डावललेले अपत्य न्यायालयात जाऊन आपला हक्क सांगू शकते आणि मिळकतीचा योग्य वाटा मिळवण्याचा दावा करू शकते. न्यायालय डावललेल्या अपत्याला त्यांचा हक्क देऊ शकते.
13. या दस्ताची कोर्टात सिध्दता होते का, हे पाहावे लागेल. पुढे, ते खरे आहे कि खोटे, हेही सिध्द होणे आवश्यक आहे. आणि खरे असल्यास, ते इतर कायदेशीर वारसांचा हक्क डावलण्यास तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरू शकते का, हे पाहावे लागेल.
14. भारतीय वारसा कायदा, 1956 नुसार, मुलं ही वडिलांची नैसर्गिक वारसदार मानली जातात आणि त्यांना वडिलांच्या मिळकतीमध्ये नैसर्गिक समान हक्क आहे. वडिलांनी इच्छापत्र लिहिले असो वा नसो, मुलाला कायदेशीररित्या वारसा हक्क मिळण्याचा अधिकार आहे.
15. वाटणीपत्रामध्ये कै नाना पाटील यांच्या सर्वांत ज्येष्ठ मुलीचा उल्लेख का नाही, केवळ सावत्र कनिष्ठ मुलांचा का आहे? या विषयीचा चंदगड दिवाणी न्यायालयाचा निकाल सोबत जोडत आहे. एखाद्या वारसाचा हक्क नाकारतानासुद्धा त्याचा हक्क का नाकारला गेला आहे; त्याचा उल्लेख कायद्यानुसार आवश्यक आणि अनिवार्य ठरवला गेला आहे. आपल्या प्रथम मुलीचा नैसर्गिक वारसाहक्क बापाने का हिरावून घेतला आहे, त्याचे संयुक्तिक उत्तर सदर दस्तामध्ये नसेल तर ते रद्द / बाद ठरवले जाऊ शकते.
महत्वाची नोंद: वरील नोंदीत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार कृपया आम्हाला द्यावेत.
आम्ही गंभीरतेने येथे नोंदवत आहोत कि, माननीय चंदगड आणि गडहिंग्लज न्यायालयांचा निकाल डावलून / अव्हेरून कै नाना सुबराव पाटील, मांडेदुर्ग यांच्या मालमत्तेमधे केले गेलेले सर्व फेरफार आपोआपच रद्दबादल होतात. न्यायालयाचा निकाल हा कायद्याने अंतिम आणि बंधनकारक असतो. न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन न करणे हा कायद्याचा अवमान मानला जातो. न्यायालयाने दिलेला निर्णय, निर्देश किंवा आदेश न पाळणे, तो अंमलात आणण्यास टाळाटाळ करणे किंवा त्यासंबंधी खोटी कागदपत्रे तयार करणे, हा गंभीर गुन्हा समजला जातो
माननीय न्यायालयांच्या निकालानुसार माझे नाव माझ्या वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेच्या नोंदीत समाविष्ट करावे, त्या विभागून मिळण्यासाठी तजवीज करावी आणि त्याच मालमत्तेवर बेकायदेशीरपणे केलेले फेरफार रद्द करावेत, आणि संबंधीतांना केलेल्या कारवाईविषयी अवगत करावे ही विनंती.
... न्यायालनीय प्रक्रियेशी संबंधित काही मुद्दे आणि पुरावे सोबत जोडले आहेत...
माननीय महोदय,
मी श्रीमती शांताबाई मारुती जाधव (लग्नापूर्वी अनुसया / अनुबाई नाना पाटील), मु. पो. रामपूर / डुक्करवाडी, तालुका चंदगड येथील रहिवासी आहे. माझे वडील कै नाना सुबराव पाटील हे मांडेदुर्ग, तालुका चंदगड येथील रहिवासी होते. माझे वडिल दिनांक 18 नोव्हेंबर 2003 रोजी निधन पावले. त्यांच्या निधनानंतर आमच्या वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेवर मी कायदेशीर हक्कदार आहे. हिंदू वारसा कायदानुसार, आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वारस प्रथम ज्येष्ठ मुलगी म्हणून मी, आणि माझा कनिष्ठ सावत्र भाऊ आणि कनिष्ठ सावत्र बहिण आहोत.
माझ्या वडिलांचा कै नाना सुबराव पाटील यांचा दिनांक 01 ऑक्टोबर 1952 रोजी माझ्या आईशी कै यल्लूबाई हिच्याशी तत्कालीन वैधिक पद्धतीने समाजमान्य विवाह झाला होता. त्या दोघांचे मी प्रथम अपत्य होते. त्यानंतर त्यांनी कै लक्ष्मीबाई हिच्याशी दुसरा विवाह केला. श्री महादेव नाना पाटील आणि सौ सरस्वती भैरू गावडे ही त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेली अपत्ये आहेत.
माझा सावत्र भाऊ आणि बहिण अनुक्रमे श्री महादेव नाना पाटील आणि सौ सरस्वती भैरू गावडे यांनी माझा कायदेशीर हक्क नाकारला होता. त्यामुळे मी माननीय न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार होते, पण तत्पूर्वीच माझ्या सावत्र भावाने चलाखी करत माझ्याविरुद्ध स्वतःच केस दाखल केली. त्यांनी प्रथम माननीय न्यायालय चंदगड येथे आणि तेथे हार झाल्यानंतर माननीय न्यायालय गडहिंग्लज येथे दावा दाखल केला होता.
मी सदर दोन्ही माननीय न्यायालयांच्या शेवटच्या निकालाच्या (Final Order on Exhibit) प्रति सोबत जोडत आहे.
माननीय चंदगड कोर्टचा (CIVIL AND CRIMINAL COURT CHANDGAD) निकाल संदर्भ थोडक्यात:
माझ्या सावत्र भावाने माझा कायदेशीर हक्क नाकारण्यासाठी दिनांक 19 जून 2018 रोजी CNR Number: MHKO140003122018, Filing Number: 105/2018, Case Type: R.C.S. - Regular Civil Suit, Registration Number: 89/2018 ही केस माननीय चंदगड न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नोंदवले कि, मी सह-मालक असल्यामुळे माझ्यावर असा आदेश लागू होऊ शकत नाही.
माननीय गडहिंग्लज कोर्टचा (ADDL SESSIONS COURT GADHINGLAJ) निकाल संदर्भ थोडक्यात:
माननीय चंदगड कोर्टचा निकाल माझ्या बाजूने आल्याने सावत्र भावाने नंतर माननीय गडहिंग्लज कोर्टमध्ये दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी CNR Number: MHKO080001212020, Filing Number: 66/2020, Case Type: Civil M.A. - Civil Misc. Application, Registration Number: 7/2020, ही अपिल केस माननीय गडहिंग्लज न्यायालयात दाखल केली होती. पण त्याही न्यायालयाने त्यांचा दावा रिजेस्ट केला.
माननीय न्यायालय चंदगड यांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2019 रोजी आणि माननीय न्यायालय गडहिंग्लज यांनी दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या निकालानुसार, माझा वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेवरील हक्क कायदेशीरपणे स्थापित झाला आहे. साहजिकच माझ्या वडिलांच्या मुर्त्यूनंतर कै नाना सुबराव पाटील यांच्या जमिनीत केले गेलेले सर्व फेरबदल आपोआपच बेकायदेशीर ठरतात.
मी विनंती करते कि, माझ्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल करण्यास प्रतिबंध केला जावा. जसे कि जमिनीत फेरबदल करणे, जमिन विकणे, झाडे तोडणे किंवा मालमत्तेचे कोणत्याही प्रकारे नुकसान करणे म्हणजे न्यायालयाच्या निकालाचा अपमान करणे आहे.
सदर दोन्ही न्यायालयांच्या निकालानुसार मी कै नाना पाटलांची जेष्ठ मुलगी असल्याचे सिद्ध होत असल्याने, माझे अधिकार आबाधित ठेवून माननीय न्यायाधीश महोदयानी - माझ्या वडिलांच्या मृत्यूपासून करण्यात आलेले सर्व फेरफार, विक्री करार रद्द करणाचे आदेश काढावेत.
ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, कलम 52 नुसार, भारतातील कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात षडयंत्र करून अचल संपत्तीचा कोणत्याही इतर पक्षाकाराच्या अधिकारांवर परिणाम होईल अशा प्रकारे हस्तांतरण करण्यावर प्रतिबन्ध घालण्यात आला आहे. जर एखाद्या पक्षाने न्यायालयात दावा प्रलंबित असताना अचल संपत्तीचे हस्तांतरण केले, तर त्याला न्यायालयाचा अपमान (contempt of court) मानले जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. डॉक्ट्रिन ऑफ लिस पेंडन्स तत्वानुसार वादग्रस्त मालमत्तेचा खटला चालू असताना, त्या खटल्यात अंतर्भूत असलेल्या अचल संपत्तीचे हस्तांतरण केले जाऊ शकत नाही. खटल्याच्या दरम्यान मालमत्तेची विक्री, हस्तांतरण बेकायदेशीर ठरवले गेले आहे, ज्यामुळे दुसऱ्या पार्टीच्या अधिकारावर विपरीत परिणाम होतो.
भारतीय न्याय संहिता , २०२३: कलम 335, 336, 337, 338, 339, 340, 341, 342, 343, 344 नुसार फोर्जरी अंतर्गत बनावट दस्तऐवज तयार करणे, खोटी नोंद करणे, मालमत्ता बळकावण्यासाठी खोटे दस्त निर्माण करणे. कोणत्याही फोर्जड दस्तऐवजाचा उपयोग वास्तविक म्हणून करणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा फोर्जरीप्रमाणेच आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार (Bharatiya Nyaya Sanhita, 2023), जर कोणी खोटे दस्तऐवज तयार करून जमीन दडपण्याचा प्रयत्न केला असेल, तर या प्रकरणात खालील कलमे लागू होऊ शकतात:
1. कलम 302 (पूर्वीचे IPC 420 - फसवणूक):
या कलमानुसार, जर कोणी कोणालाही खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केली असेल आणि त्याद्वारे मालमत्तेचे नुकसान केले असेल, तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो.
2. कलम 324 (पूर्वीचे IPC 467 - जाली दस्तऐवज तयार करणे):
या कलमांतर्गत, जर कोणी जाली (खोटे) दस्तऐवज तयार केले, विशेषतः मालमत्तेशी संबंधित, तर गंभीर गुन्हा मानला जातो.
3. कलम 325 (पूर्वीचे IPC 468 - फसवणुकीसाठी खोटे दस्त तयार करणे):
जर खोटे दस्त फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केले गेले, तर या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो.
4. कलम 326 (पूर्वीचे IPC 471 - खोटे दस्त उपयोगात आणणे):
या कलमानुसार, जर खोटे दस्त तयार करून ते वापरले गेले असतील, तर दोषी व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
5. कलम 305 (पूर्वीचे IPC 465 - साधारण फर्जीवाड़ा):
खोटे दस्त तयार करणे हे साधारण फर्जीवाड़ाच्या अंतर्गत येते.
6. कलम 327 (पूर्वीचे IPC 472 - सील, सरकारी चिन्हे यांचा गैरवापर):
जर सरकारी सील, स्टॅम्प किंवा कागदपत्रांचा खोटा वापर केला गेला असेल, तर हा गुन्हा गंभीर मानला जातो.
7. कलम 36 (पूर्वीचे IPC 120B - गुन्हेगारी कट - Criminal Conspiracy):
जर खोटे दस्त तयार करणे हा एका कटाचा भाग असेल, तर या कलमानुसार गुन्हा दाखल करता येतो.
शिवाय जमिनीशी संबंधित कोणतेही खोटे दस्त तयार केल्यास किंवा चुकीचे कागद वापरल्यास Registration Act 2023 आणि Maharashtra Land Revenue Code अंतर्गत गंभीर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
कायद्यापुढे भावनेला काही महत्व नसतं, तेथे पुरावे लागतात, हे माहीत असूनही केवळ दावा नक्की काय आहे याचे कारण पूर्णपणे स्पष्ट व्हावे, यासाठी मी माझ्याविषयी थोडक्यात लिहीत आहे.
माझा बाबा वयाने वृध्द झाल्यानंतर, सावत्र भावाने आणि सावत्र आईने मला माहेरच्या घरी पाय ठेऊ दिला नाही. मी प्रत्येक वार्षिक यात्रेला किंवा मध्यंतरी बाबाला बघायला गेले, तरी ते लोक मला माहेरची पायरी चढू देत नसत. बाहेरूनच बाबाला आणि कुलदैवताला नमस्कार करून मी परत येत असे. घरांतून माझ्याकडे पाहात माझा कमजोर बाप हात जोडून रडायचा आणि मी माहेरच्या दारात उभी राहून रडायची.
एके दिवशी अचानक बाबा माझ्या घरी आला आणि धाय मोकलून रडायला लागला. क्रित्येक वर्षांनंतर बापाचा हात हातात घेऊन मीही मनसोक्त रडले. खूप रडून झाल्यावर तो सावरला आणि "आयुष्यात काहीच केलं नाही गे लेकी तुझ्यासाठी. दुसऱ्या बायकोच्या भीतीने तुझ्या लग्नात एक दमडीही खर्च करू शकलो नाही आणि तुला एखादी माहेरची साडी द्यायचीही मला हिंमत झाली नाही. सख्खा बाप जिवंत असताना मामाच्या बाबाने तुझं लग्न लावून दिलं. हे पाप कसं फेडणार गं मी? आता तुझ्यासाठी काही करतो म्हटलं तर, पोरगा मारतो मला. जमिनीचे सगळे कागद सोबत घेऊन आलोय. चंदगडला जाऊया चल, माझी अर्धी जमीन मी तुझ्या नावावर आजच करून देतो, एव्हढे मला करू दे. नाहीतर मेल्यावर माझ्या आत्म्याला शांती काही मिळणार नाही. नको म्हणू नको."
माझ्या बापाने खूपच हट्ट केला, पण मी मानले नाही. त्याला खाऊंपिऊं घालून परत पाठवले. बापाने माझ्या उंबऱ्यात पाय ठेवलेली ती पहिली आणि शेवटची वेळ ठरली.
कसा कोण जाणे पण सावत्र भावाला या गोष्टीचा सुगावा लागला. त्यानंतर माझ्या सावत्र भावाने आणि सावत्र आईने, मी सावत्र भावाला विष घातले आणि डोक्यात पाटा घालून मारायचा प्रयत्न्य केला, आणि केवळ त्याच्या गळ्यात पांडुरंगाचा गोप असल्याने तो वाचला, असा ब्रभा सर्वत्र पसरवला. त्यानंतर अश्राप पोर म्हणून माझ्याविषयी असलेली माहेरच्या गावातली अपुलकीही संपली. त्यानंतर तर माहेरच्या गावाची वेसही मला परकी झाली. माझा बाप चांगला होता, पण दुबळा आणि सादाभोळा होता. माझा बाबा वारल्याची बातमी त्रयस्थामार्फत मला समजली आणि माहेराला जोडून ठेवणारा माझा शेवटचा दुवाही संपला.
माझ्या बापाशी लग्न करण्यासाठी त्याच गावात राहणाऱ्या सावत्र आईनेच षडयंत्र रचलं होतं, हे खूप उशिराने सर्वांना समजलं. माझ्या साध्याभोळ्या आईला उलटीपालटी कामे करायला सांगून, माझी आई खुळी आणि वेडी आहे असे चित्र निर्माण करण्यात ती यशस्वी झाली. आणि बाबाने आम्हा दोघांना परकं करून, तिच्याबरोबर दुसरे लग्न केले.
नवऱ्याने टाकलेल्या तरुण पोरीला घरी कसे आणि किती वर्षें ठेऊन घेणार, असा विचार करून माझ्या आईचेही दुसरे लग्न करून दिले गेले. आणि मी आई-बाप असूनही पोरकी झाले - मामाच्या घरी निराधार वाढले. पोरीच्या आई-बापात दोष आहे असे ठरवून, माझे लग्न अपंग व्यक्तीबरोबर लावून दिले गेले. माझ्या मामाच्या घरीही कायमचं अठराविश्व दारिद्रय होतं, मला लग्नात एखादी नवीन साडी देता यावी म्हणून माझ्या मामाच्या बाबाला उसनवारी करावी लागली होती. न आई, न बाप, न सासर धड. माझा नवरा अपंग आहे, माझी मागे माहेरी कुणी विचारपूस करणारे नाही, आधार नाही, म्हणून मी बारा दिवसांची बाळंतीण असतानाही सासरच्या लोकांनी वर्षभराचे शेणखत मला गायरीतून बाहेर काढायला लावले. यावरून आपण कल्पना करू शकता कि, माझे आयुष्य कसे खडतर गेले असेल.
माझे माहेर मांडेदुर्ग. माझे माहेरचे नाव अनुसया / अनुबाई. माझ्या बाबाने, कै नाना सुबूराव पाटील यांनी दोन लग्ने केली. मी त्यांच्या पहिल्या बायकोची एकुलती एक मुलगी. माझी आई खूपच भोळी होती, तिला शेतीची कामे आणि व्यवहार फारसा जमत नसे. हिच्याबरोबर आपला जन्म कसा निभावणार, असे सांगून माझ्या बाबाने जुन्या रितीरिवाजाप्रमाणे तीचा काडीमोड घेतला आणि गावातल्याच एका दुसऱ्या मुलीशी दूसरे लग्न केलं. आपल्या तरुण मुलीचं आयुष्य कसं निभावणार असे वाटल्याने, तिच्या बाबाने आपल्या या काडीमोड घेतलेल्या मुलीचंही दुसरं लग्नं लावून दिलं. आणि मला मांडेदुर्गला, म्हणजे स्वतः च्या बापाकडे पाठवलं. सावत्र आईने लहाणपणी माझा खूप छळ केला. काही काम केल्याशिवाय ती मला जेवण देत नसे. सात-आठ वर्षांची असल्यापासून सकाळी डोंगराला जाणाऱ्या रस्त्यावर शेण गोळा केल्याशिवाय मला चहाही भेटत नसे. एकदा शेजारच्या मैत्रिणींबरोबर खेळताना शेण गोळा करायचं राहुन गेलं, या कारणासाठी माझ्या सावत्र आईने माझं डोकं दगडाच्या पायरीवर एवढ्या जोराने आपटलं की, माझ्या कपाळाचा मासाचा तुकडा पायरीला चिकटून तुटून गेला.
वेदनेने किंचाळत रडत मी बाहेर पळून गेली. आजूबाजूचे लोक सावत्र आईचा तो प्रताप बसून हादरून गेले. त्यांनी डॉक्टरकडे नेऊन माझ्यावर उपचार केले. सर्व लोकांनी मिळून घरी जाऊन सावत्र आईला शिव्या दिल्या, एवढंच नाही तर पोलिसांना सांगून जेलमध्ये पाठवायची धमकी दिली. तेव्हा ती घाबरली आणि यापुढे आपण असं काही करणार नाही, असं शपथेवर सांगितलं. सावत्र आई या अश्राप पोरीचा केव्हातरी घात केल्याशिवाय राहणार नाही, असं वाटल्याने शेजारी-पाजारीही माझ्यावर लक्ष ठेवून राहू लागले. वारंवार माझी विचारपूस करू लागले. दोनएक वर्षानी पुन्हा असाच प्रकार घडला. घाबरून मध्यरात्री मी शेजारच्या घरांत पळून गेली. शेजा-यांनी मला कणगीखाली लपवलं आणि सावत्र आईला ती इकडे आली नाही अस सांगितलं. त्या भल्या लोकांनी भल्या पहाटे उजाडण्याअगोदर मला गुपचूप माझ्या मामाच्या गावी डुक्करवाडीला पोहोचतं केलं. आणि माझ्या मामाच्या बाबाला सांगितलं, लेक जिवंत पाहिजे असेल तर पुन्हा मांडेदुर्गला पाठवू नका. त्यानंतर काही वर्षे मामाच्या बाबाने मला मांडेदुर्गला पाठवलं नाही.
माझा बाप चांगला होता, पण तो दुसऱ्या बायकोला खूप घाबरायचा. तो आपल्या मुलीचा छळ होताना बघायचा, कळवळायचा, पण बायकोचा विरोध करायची हिंमत त्याच्यात नव्हती. पण काही वर्षांनी काही ति-हाईत माणसं घेऊन तो डुक्करवाडीला आला आणि यापुढे असं काही होणार नाही, असं पटवून मला पुन्हा मांडेदुर्गला घेऊन गेला. एव्हांना माझ्या सावत्र आईला एक मूलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली होती. त्यानंतर माझा छळ काही झाला नाही, पण कामे मात्र रग्गड करून घेतली जायची. मी फारशी तिकडे राहायची नाही. माझ्या मामाच्या घरीच माझं बालपण गेले. त्या काळच्या रितीरिवाजानुसार माझ्या आईच्या आणि बापाच्या संसारांत दोष आहे, असे सिध्द झाल्याने माझ्या मामाच्या बाबाने नाईलाजाने गावातच एका अपंग माणसाशी माझे लग्न लावून दिले. माझा सख्ख बाप परक्यासारखा लग्नमंडपाबाहेरूनच परस्पर अक्षता टाकून गेला! लेकीच्या लग्नाचा खर्च राहिला बाजूला, स्वतःच्या लेकीला एक माहेरची साडी द्यायची हिंमतही त्याला झाली नाही. लहानपणी मला कुशीत घेऊन असहाय्यपणे तो ओकसाबोक्शी रडायचा आणि माझे छोटे हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी माझी माफी मागायचा. त्याच्यासाठी मी सगळा त्रास मुकाट विनातक्रार सोसत राहायची.
माझ्या लग्नानंतरही माझा बाबा ति-हाईत माणसं घेऊन माझ्या सासरला आला आणि केवळ माहेरवाशीला माहेर असावे या समजुतीपोटी मला पुन्हा माहेराला पाठवून दिले गेले. मला काय वाटतं कधी कुणी मला विचारलंच नाही. दुसऱ्यानीच परस्पर नेहमी माझ्या आयुष्याचे निर्णय घेऊन टाकले. मग लग्नानंतर मी माहेराला सणासुदीला जाऊ येऊ लागले. पण माहेरची ओढ मात्र वाटत नसे. सावत्र आईचा दुजाभाव समजून यायचा. माझ्या मुलांना टाळून ती स्वतःच्या पोरीच्या मुलांना लपवून खाऊ द्यायची. सणांचा दिवस संपवून मी आणि माझी सावत्र बहीण एकाच दिवशी सासरी जायला निघालो तरी, ती दुसऱ्याच्या घरी बनवून आपल्या लेकीला परस्पर गोडधोड बनवून द्यायची आणि मला "चारच भाकरी बनवून घे गं, आमचं पीठ संपवून जाशील!" असा टोमणा मारायची. बाहेर पडण्याअगोदर नेमकी ती मला पाणी आणायला विहीरीवर पाठवून गुपचूप माझ्या पिशव्या तपासायची. तसे करताना बऱ्याच वेळा मी तिला पाहिलं, पण तिचा हा व्यवहार कधी बंद झाला नाही. सावत्र आई कमालीची ड्रॅमेबाजही होती, इतरांसमोर ती सावत्र मुलीशी स्वतःच्या पोटच्या पोरीपेक्षाही खूप प्रेमाने वागायची. ती आपल्या मुलीची दारातूनच पाठवणी करायची, पण सावत्र मुलीला मात्र गावच्या वेशीबाहेर सोडायला यायची. गावाचे लोक सावत्र मुलीवरचे तिचे प्रेम पाहून गहिवरून जायचे. त्यामुळे एकाच वेळी तिची दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य व्हायची, गावच्या लोकांचे कौतुकही मिळायचे आणि सावत्र आईने सासुरवाशीण लेकीला सोबत काहीच गोडधोड बनवून दिलेलं नाही, हे इतरांना समजायचा धोकाही टळायचा! पण मला त्याचं काही वाटायचं नाही, आपसूक बापाला भेटायला मिळतं, हेच माझ्यासाठी अप्रूप होतं.
माझ्या सासरचे एकत्र कुटुंब अचानक वेगळे झाले, माझ्या पदरात एक अपंग नवरा, सोड झालेली नणंद आणि तीन ते अकरा वर्षांची चार मुलं यांची जबाबदारी आली. माझ्या मोडक्या नवऱ्याला शेतजमीन कसता येणार नाही, असे कारण देऊन त्याला घरातील हिश्श्याशिवाय काहीच जमीन वाटणीला देऊ नये, असा पंचांच्या संमतीने सर्वमान्य तोडगा काढण्यात आला! जवळ पैसा नाही, खायला अन्न नाही, मोठया दिराने घरातली सगळी भांडी-कुंडी, मालमत्ता केवळ आपल्या मालकीची आहे, असा दावा करून, आम्हाला एखादं भांडं, ताट, किंवा मडकंही दिलं नाही. मोठया आशेने मी काही मिळतं का पाहू म्हणून माहेरी आले. बापाला सगळी अडचण सांगीतली, शेजारीपाजारीही विचारपूस करून गेले. सावत्र आईने एका भल्या मोठया टोपल्याला कपडा गुंडाळून माझ्या डोक्यावर ठेवून यावेळी माझी दारातूनच पाठवणी केली. गल्लीच्या टोकाला मोरेंच्या आईने "लेकी तुला वेगळे टाकलेत असं कळलं, लंगड्या नवऱ्याला घेऊन कसा संसार करायचा गे बाये तू? सावत्र आईने लेक वेगळी झाली म्हणून काय काय दिलं?" अशी आस्थेने विचारणा केली. मी म्हणाले, मला माहित नाही, अगोदरच कायमाय बांधून ठेवलं होतं. अंधार व्हायला आला, एकटीच जायचे आहे, म्हणून तशीच लगबगीने आले. मोरे आईने, काय दिलं ते पाहू दे, म्हणत हट्टाने माझी टोपली उतरवून घेतली आणि वर बांधलेला कपडा सोडला. आत पायलीभर तांदूळ, एक जुनं भांडं आणि एक जुना तांब्या होता. मोरे आईने "माझ्या लेकी, काय गे तुझे नशीब, लिंपण लावलेले तिचे ढिगभर कणग्या-तट्टे जळले का गे", अशा सावत्र आईला लाखोल्या वाहात आपल्या घरातून डाळ, हरभरे, भुईमूग यांनी टोपली भरून दिली.
सावत्र बहीण डोक्यात पाटा घालून आपल्या सावत्र भावाचा जीव घेते, असा देखावा उभा करून सर्व गावाला आणि पाहुण्यांना, मी त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, हे चित्र सावत्र भावाने सर्वांना पटवून दिले. हा कलंक माझ्या कपाळावर कायमचा राहीला. कपाळाचं कुंकू पुसलं, पण हा डाग काही पुसला गेला नाही. आजही मी नित्यनेमाने वर्षांतून एकदा माहेरच्या गावी जाऊन माझ्या घरासमोर उभी राहून रस्त्यातूनच कुलदेवताला हात जोडून येते. माझा सदाभोळा दुबळा बाप आज जिवंत नाही, पण त्याचा अशांत आत्मा तिथेच कुठेतरी घुटमळत असेल आणि नेहमीसारखाच भरल्या डोळ्यांनी हात जोडून माफी मागत असेल, असे मला वाटून जाते.
त्या अफवांच्या गोंगाटात माझे कुणीही ऐकून घेतले नाही, अशा वेळी त्या गावातली अशी एकच व्यक्ती माझ्या बाजूने ठामपणे उभी राहिली आणि माझ्यावरचा आरोप खोटा आहे, यावर तिचा पूर्व विश्वास होता - ती त्यक्ति होती माझ्या सावत्र आईची सख्खी बहिण!
माझ्यावर माझ्या मामाच्या बाबानंतर कुणी खरेखरे निर्वाज्य प्रेम केलं असेल, तर ती माझ्या सावत्र आईची सख्खी बहिण होती. हे आश्चर्यजनक होतं. पण ती साधीभोळी आणि मनानेच खूप चांगली होती. तिने आयुष्यभर माझ्यावर सख्ख्या आईसारखी माया केली, जीव लावला. वेळप्रसंगी माझ्यासाठी ती आपल्या सख्ख्या बहिणीलाही खडसावायची. तिचे सासर माझ्या माहेरच्या घरापासून थोड्याच अंतरावर होते.
आज ती मायाळू मावशी नाही, माझा साधाभोळा बाबा नाही, माहेरचे जुने जाणते निष्कपट लोक नाहीत - पण सावत्र भावाने, सावत्र आईने आणि सावत्र बहिणीने माझ्या कपाळावर लावलेला कलंक मात्र आजही तसाच ठसठशीत आहे…..
धन्यवाद!
श्रीमती शांताबाई मारुती जाधव
मु. पो. रामपूर (डुक्करवाडी),
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र,
पिन – 416507.
टिप: 1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या कायद्यानुसार, इलेक्ट्रॉनिक दस्त अधिनियम, 2024 (Electronic Documents Act, 2024) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील दस्त वैध आणि ग्राह्य मानले जातात, हे आपण जाणताच. या कायद्यानुसार, इलेक्ट्रॉनिक दस्त, डिजिटल स्वाक्षरी, आणि ई-प्रमाणपत्रांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. यामुळे विविध व्यवहार, करार, आणि दस्त कागदी स्वरूपाच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारले जाऊ शकतात.
धन्यवाद!
श्रीमती शांताबाई मारुती जाधव
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India