सावत्र मुलगी!!!
सावत्र मुलगी!!!
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
******* सावत्र मुलगी!!! *******
माझा बाबा वयाने वृध्द झाल्यानंतर, सावत्र भावाने आणि सावत्र आईने मला माहेरच्या घरी पाय ठेऊ दिला नाही. मी प्रत्येक वार्षिक यात्रेला किंवा मध्यंतरी बाबाला बघायला गेले, तरी ते लोक मला माहेरची पायरी चढू देत नसत. बाहेरूनच बाबाला आणि कुलदैवताला नमस्कार करून मी परत येत असे. घरांतून माझ्याकडे पाहात माझा कमजोर बाप हात जोडून रडायचा आणि मी माहेरच्या दारात उभी राहून रडायची.
एके दिवशी अचानक बाबा माझ्या घरी आला आणि धाय मोकलून रडायला लागला. क्रित्येक वर्षांनंतर बापाचा हात हातात घेऊन मीही मनसोक्त रडले. खूप रडून झाल्यावर तो सावरला आणि "आयुष्यात काहीच केलं नाही गे लेकी तुझ्यासाठी. दुसऱ्या बायकोच्या भीतीने तुझ्या लग्नात एक दमडीही खर्च करू शकलो नाही आणि तुला एखादी माहेरची साडी द्यायचीही मला हिंमत झाली नाही. सख्खा बाप जिवंत असताना मामाच्या बाबाने तुझं लग्न लावून दिलं. हे पाप कसं फेडणार गं मी? आता तुझ्यासाठी काही करतो म्हटलं तर, पोरगा मारतो मला. जमिनीचे सगळे कागद सोबत घेऊन आलोय. चंदगडला जाऊया चल, माझी अर्धी जमीन मी तुझ्या नावावर आजच करून देतो, एव्हढे मला करू दे. नाहीतर मेल्यावर माझ्या आत्म्याला शांती काही मिळणार नाही. नको म्हणू नको."
माझ्या बापाने खूपच हट्ट केला, पण मी मानले नाही. त्याला खाऊंपिऊं घालून परत पाठवले. बापाने माझ्या सासरच्या उंबऱ्यात पाय ठेवलेली ती दुसरी आणि शेवटची वेळ ठरली.
कसा कोण जाणे पण सावत्र भावाला या गोष्टीचा सुगावा लागला. त्यानंतर माझ्या सावत्र भावाने आणि सावत्र आईने, मी सावत्र भावाला विष घातले आणि डोक्यात पाटा घालून मारायचा प्रयत्न्य केला, आणि केवळ त्याच्या गळ्यात पांडुरंगाचा गोप असल्याने तो वाचला - पांडुरंगाने डोक्यात घातलेला पाटा वरच्यावर झेलला आणि विष उतरलं, असा ब्रभा सर्वत्र पसरवला. त्यानंतर अश्राप पोर म्हणून माझ्याविषयी असलेली माहेरच्या गावातली अपुलकीही संपली. त्यानंतर तर माहेरच्या गावाची वेसही मला परकी झाली. माझा बाप चांगला होता, पण दुबळा आणि सादाभोळा होता. माझा बाबा वारल्याची बातमी त्रयस्थामार्फत मला समजली आणि माहेराला जोडून ठेवणारा माझा शेवटचा दुवाही संपला.
सासर सोडून आपल्या नवऱ्या मुलांसह माहेरला कायमचे राहायला आलेल्या माझ्या आत्याने आपलं बस्तान तेथे कायम करण्यासाठी माझ्या आईचा संसार मोडायचा षडयंत्र रचलं होतं, हे खूप उशिराने सर्वांना समजलं. माझ्या साध्याभोळ्या आईला उलटीपालटी कामे करायला सांगून, जेवणात - शेतकामात गडबड करून, माझी आई खुळी आणि वेडी आहे असे चित्र निर्माण करण्यात ती यशस्वी झाली. आणि बाबाने कसलीही शहानिशा करता आम्हा दोघांना परकं करून, आपला संसार कसा निभावणार म्हणून दुसरे लग्न केले. माझ्या आत्याने त्याच्या दुसऱ्या लग्नातही असाच प्रताप करून बिबा घालायचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या बापाला सर्व प्रकार लक्षांत आला. त्याने आपले दुसरे लग्न वाचवण्यासाठी आत्याला गावांतच दुसरीकडे घर बांधून दिलं आणि दोन एकर शेती करून खायला दिली.
मी पाच सहा वर्षांची झाल्यानंतर नवऱ्याने टाकलेल्या तरुण पोरीला घरी कसे आणि किती वर्षें ठेऊन घेणार, असा विचार करून माझ्या आईचेही दुसरे लग्न करून दिले गेले. आणि मी आई-बाप असूनही पोरकी झाले - मामाच्या घरी निराधार वाढले. पोरीच्या आई-बापाच्या संसारात दोष आहे असे ठरवून, माझे लग्न अपंग व्यक्तीबरोबर लावून दिले गेले. न आई, न बाप, न सासर धड. माझा नवरा अपंग आहे, माझी मागे माहेरी कुणी विचारपूस करणारे नाही, आधार नाही, म्हणून मी बारा दिवसांची बाळंतीण असतानाही सासरच्या लोकांनी वर्षभराचे शेणखत मला गायरीतून बाहेर काढायला लावले. त्या प्रसंगात मी जगेन याची महिनाभर खात्री दिली नाहती. यावरून आपण कल्पना करू शकता कि, माझे आयुष्य कसे खडतर गेले असेल.
माझ्या नणंदेने आयुष्यभर माझा आई म्हणून सांभाळ केला. कोणी आईही आपल्या लेकीसाठी करणार नाही इतक्या हालअपेष्ठा झेलल्या. मृत्यूच्या दारात असलेल्या आपल्या आईला दिलेल्या वचनासाठी तिने आपला संसार वाऱ्यावर सोडला. " लेकी, तुझे भाऊ माझ्या मोडक्या पोराचं लग्न कधीच करायचे नाही म्हणतात. तू त्याचं लग्न लावून देशील आणि बहिण म्हणून नाही, तर आई म्हणून त्याचा सांभाळ करशील असं वचन दे, तरच मी सुखाने मरेन." आईला दिलेल्या वचनाखातर तिने स्वतःचा संसार वाऱ्यावर सोडला. त्यातच काहीशा आजाराने तिची एकुलती मुलगीही वारली आणि संसारातून तिचे मन उडून गेले. तिने नवऱ्याला तू दुसरं लग्नं करून तुझा दुसरा संसार उभा कर - मी आईचे वचन मोडले तर तिच्या आत्माला शांती मिळणार नाही असे सांगितले. तिच्या नवऱ्याने काही वर्षे विनवण्या करण्यात घालवली आणि ती हट्ट सोडणार नाही हे लक्षांत आल्यावर दुसरे लग्नं केले. पण स्वतःच्या मृत्यूपर्यंत तो "साहेब कसे आहात!" अशी विचारपूस करत घरापर्यंत यायचा. आपल्या बायकोला तो गंमतीने "साहेब!" म्हणायचा. माझ्या नणंदेवरची त्याची माया ओढही आयुष्यभर टिकून राहिली. सोड घेतल्यानंतरही बायकोची काळजी कळणाऱ्या नवऱ्याचं नातं समजणं तसं सोपं नाही . . .
माझी नणंद माझ्या मामाच्या बाबाकडे जाऊन "तुझ्या अनुचं माझ्या भावाबरोबर लग्न ठरवूया मामा" अशा वारंवार विनवण्या करायची. माझा मामाचा बाबा तिच्यावर संतापून सुनावायचा, "माझी सोन्यासारखी पोर तुझ्या मोडक्या पोराला देईन असं वाटतं कसं तुला? तिला विहिरीत ढकलून देईन पण तुझ्या मोडक्या भावाबरोबर तिचं लग्नं लावून देणार नाही!" पण तिने हट्ट सोडला नाही. चार वर्षे मागे लागून " माझा भाऊ मोडका आहे, पण तुझ्या पोरीच्या आई बापाच्या संसारात दोष आहे, त्यामुळे तिचं दुसरीकडे लग्नं ठरणे अवघड आहे." असं पटवून देण्यात यशस्वी झाली. आणि माझे एका अपंग व्यक्तीबरोबर लग्नं झाले.
माझे माहेर मांडेदुर्ग. माझे माहेरचे नाव अनुसया / अनुबाई. माझ्या बाबाने, कै नाना सुबूराव पाटील यांनी दोन लग्ने केली. मी त्यांच्या पहिल्या बायकोची एकुलती एक मुलगी. माझी आई खूपच भोळी होती, तिला शेतीची कामे आणि व्यवहार फारसा जमत नसे. हिच्याबरोबर आपला जन्म कसा निभावणार, असे सांगून माझ्या बाबाने जुन्या रितीरिवाजाप्रमाणे तीचा काडीमोड घेतला आणि गावातल्याच एका दुसऱ्या मुलीशी दूसरे लग्न केलं. आपल्या तरुण मुलीचं आयुष्य कसं निभावणार असे वाटल्याने, तिच्या बाबाने आपल्या या काडीमोड घेतलेल्या मुलीचंही दुसरं लग्नं लावून दिलं. आणि मला मांडेदुर्गला, म्हणजे स्वतः च्या बापाकडे पाठवलं. सावत्र आईने लहाणपणी माझा खूप छळ केला. काही काम केल्याशिवाय ती मला जेवण देत नसे. सात-आठ वर्षांची असल्यापासून सकाळी डोंगराला जाणाऱ्या रस्त्यावर शेण गोळा केल्याशिवाय मला चहाही भेटत नसे. एकदा शेजारच्या मैत्रिणींबरोबर खेळताना शेण गोळा करायचं राहुन गेलं, या कारणासाठी माझ्या सावत्र आईने माझं डोकं दगडाच्या पायरीवर एवढ्या जोराने आपटलं की, माझ्या कपाळाचा मासाचा तुकडा पायरीला चिकटून तुटून गेला.
रक्ताने चिंब होऊन वेदनेने किंचाळत रडत मी बाहेर पळून गेली. आजूबाजूचे लोक सावत्र आईचा तो प्रताप बसून हादरून गेले. त्यांनी डॉक्टरकडे नेऊन माझ्यावर उपचार केले. सर्व लोकांनी मिळून घरी जाऊन सावत्र आईला शिव्या दिल्या, एवढंच नाही तर पोलिसांना सांगून जेलमध्ये पाठवायची धमकी दिली. तेव्हा ती घाबरली आणि यापुढे आपण असं काही करणार नाही, असं शपथेवर सांगितलं. सावत्र आई या अश्राप पोरीचा केव्हातरी घात केल्याशिवाय राहणार नाही, असं वाटल्याने शेजारी-पाजारीही माझ्यावर लक्ष ठेवून राहू लागले. वारंवार माझी विचारपूस करू लागले. दोनएक वर्षानी पुन्हा असाच प्रकार घडला. घाबरून मध्यरात्री मी शेजारच्या घरांत पळून गेली. शेजा-यांनी मला कणगीखाली लपवलं आणि सावत्र आईला ती इकडे आली नाही अस सांगितलं. त्या भल्या लोकांनी भल्या पहाटे उजाडण्याअगोदर मला गुपचूप माझ्या मामाच्या गावी डुक्करवाडीला पोहोचतं केलं. आणि माझ्या मामाच्या बाबाला सांगितलं, लेक जिवंत पाहिजे असेल तर पुन्हा मांडेदुर्गला पाठवू नका. त्यानंतर काही वर्षे मामाच्या बाबाने मला मांडेदुर्गला पाठवलं नाही.
माझा बाप चांगला होता, पण तो दुसऱ्या बायकोला खूप घाबरायचा. तो आपल्या मुलीचा छळ होताना बघायचा, कळवळायचा, पण बायकोचा विरोध करायची हिंमत त्याच्यात नव्हती. पण काही वर्षांनी काही ति-हाईत माणसं घेऊन तो डुक्करवाडीला आला आणि यापुढे असं काही होणार नाही, असं पटवून मला पुन्हा मांडेदुर्गला घेऊन गेला. एव्हांना माझ्या सावत्र आईला एक मूलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली होती. त्यानंतर माझा छळ काही झाला नाही, पण कामे मात्र रग्गड करून घेतली जायची. मी फारशी तिकडे राहायची नाही. माझ्या मामाच्या घरीच माझं बालपण गेले. त्या काळच्या रितीरिवाजानुसार माझ्या आईच्या आणि बापाच्या संसारांत दोष आहे, असे सिध्द झाल्याने माझ्या मामाच्या बाबाने नाईलाजाने गावातच एका अपंग माणसाशी माझे लग्न लावून दिले. माझा सख्ख बाप परक्यासारखा लग्नमंडपाबाहेरूनच परस्पर अक्षता टाकून गेला! लेकीच्या लग्नाचा खर्च राहिला बाजूला, स्वतःच्या लेकीला एक माहेरची साडी द्यायची हिंमतही त्याला झाली नाही. लहानपणी मला कुशीत घेऊन असहाय्यपणे तो ओकसाबोक्शी रडायचा आणि माझे छोटे हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी माझी माफी मागायचा. त्याच्यासाठी मी सगळा त्रास मुकाट विनातक्रार सोसत राहायची.
माझ्या लग्नानंतरही माझा बाबा ति-हाईत माणसं घेऊन माझ्या सासरला आला आणि केवळ माहेरवाशीला माहेर असावे या समजुतीपोटी मला पुन्हा माहेराला पाठवून दिले गेले. मला काय वाटतं कधी कुणी मला विचारलंच नाही. दुसऱ्यानीच परस्पर नेहमी माझ्या आयुष्याचे निर्णय घेऊन टाकले. मग लग्नानंतर मी माहेराला सणासुदीला जाऊ येऊ लागले. पण माहेरची ओढ मात्र वाटत नसे. सावत्र आईचा दुजाभाव समजून यायचा. माझ्या मुलांना टाळून ती स्वतःच्या पोरीच्या मुलांना लपवून खाऊ द्यायची. सणांचा दिवस संपवून मी आणि माझी सावत्र बहीण एकाच दिवशी सासरी जायला निघालो तरी, ती दुसऱ्याच्या घरी बनवून आपल्या लेकीला परस्पर गोडधोड बनवून द्यायची आणि मला "चारच भाकरी बनवून घे गं, आमचं पीठ संपवून जाशील!" असा टोमणा मारायची. बाहेर पडण्याअगोदर नेमकी ती मला पाणी आणायला विहीरीवर पाठवून गुपचूप माझ्या पिशव्या तपासायची. तसे करताना बऱ्याच वेळा मी तिला पाहिलं, पण तिचा हा व्यवहार कधी बंद झाला नाही. सावत्र आई कमालीची ड्रॅमेबाजही होती, इतरांसमोर ती सावत्र मुलीशी स्वतःच्या पोटच्या पोरीपेक्षाही खूप प्रेमाने वागायची. ती आपल्या मुलीची दारातूनच पाठवणी करायची, पण सावत्र मुलीला मात्र गावच्या वेशीबाहेर सोडायला यायची. गावाचे लोक सावत्र मुलीवरचे तिचे प्रेम पाहून गहिवरून जायचे. त्यामुळे एकाच वेळी तिची दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य व्हायची, गावच्या लोकांचे कौतुकही मिळायचे आणि सावत्र आईने सासुरवाशीण लेकीला सोबत काहीच गोडधोड बनवून दिलेलं नाही, हे इतरांना समजायचा धोकाही टळायचा! पण मला त्याचं काही वाटायचं नाही, आपसूक बापाला भेटायला मिळतं, हेच माझ्यासाठी अप्रूप होतं.
माझ्या सासरचे एकत्र कुटुंब अचानक वेगळे झाले, माझ्या पदरात एक अपंग नवरा, सोड झालेली नणंद आणि तीन ते अकरा वर्षांची चार मुलं यांची जबाबदारी आली. माझ्या मोडक्या नवऱ्याला शेतजमीन कसता येणार नाही, असे कारण देऊन त्याला घरातील हिश्श्याशिवाय काहीच जमीन वाटणीला देऊ नये, असा पंचांच्या संमतीने सर्वमान्य तोडगा काढण्यात आला! जवळ पैसा नाही, खायला अन्न नाही, मोठया दिराच्या घरातली सगळी भांडी-कुंडी, मालमत्ता केवळ आपल्या मालकीची आहे, असा दावा करून, आम्हाला एखादं भांडं, ताट, किंवा मडकंही दिलं नाही. मोठया आशेने मी काही मिळतं का पाहू म्हणून माहेरी आले. बापाला सगळी अडचण सांगीतली, शेजारीपाजारीही विचारपूस करून गेले. सावत्र आईने एका भल्या मोठया टोपल्याला कपडा गुंडाळून माझ्या डोक्यावर ठेवून यावेळी माझी दारातूनच पाठवणी केली. गल्लीच्या टोकाला मोरेंच्या आईने "लेकी तुला वेगळे टाकलेत असं कळलं, लंगड्या नवऱ्याला घेऊन कसा संसार करायचा गे बाये तू? सावत्र आईने लेक वेगळी झाली म्हणून काय काय दिलं?" अशी आस्थेने विचारणा केली. मी म्हणाले, मला माहित नाही, अगोदरच कायमाय बांधून ठेवलं होतं. अंधार व्हायला आला, एकटीच जायचे आहे, म्हणून तशीच लगबगीने आले. मोरे आईने, काय दिलं ते पाहू दे, म्हणत हट्टाने माझी टोपली उतरवून घेतली आणि वर बांधलेला कपडा सोडला. आत पायलीभर तांदूळ, एक जुनं भांडं आणि एक जुना तांब्या होता. मोरे आईने "माझ्या लेकी, काय गे तुझे नशीब, लिंपण लावलेले तिचे ढिगभर कणग्या-तट्टे जळले का गे", अशा सावत्र आईला लाखोल्या वाहात आपल्या घरातून डाळ, हरभरे, भुईमूग यांनी टोपली भरून दिली.
सावत्र बहीण डोक्यात पाटा घालून आपल्या सावत्र भावाचा जीव घेते, असा देखावा उभा करून सर्व गावाला आणि पाहुण्यांना, मी त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, हे चित्र सावत्र भावाने सर्वांना पटवून दिले. हा कलंक माझ्या कपाळावर कायमचा राहीला. कपाळाचं कुंकू पुसलं, पण हा डाग काही पुसला गेला नाही. आजही मी नित्यनेमाने वर्षांतून एकदा माहेरच्या गावी जाऊन माझ्या घरासमोर उभी राहून रस्त्यातूनच कुलदेवताला हात जोडून येते. माझा सदाभोळा दुबळा बाप आज जिवंत नाही, पण त्याचा अशांत आत्मा तिथेच कुठेतरी घुटमळत असेल आणि नेहमीसारखाच भरल्या डोळ्यांनी हात जोडून माफी मागत असेल, असे मला वाटून जाते.
त्या अफवांच्या गोंगाटात माझे कुणीही ऐकून घेतले नाही, अशा वेळी त्या माहेरातली अशी एकच व्यक्ती माझ्या बाजूने ठामपणे उभी राहिली आणि माझ्यावरचा आरोप खोटा आहे, यावर तिचा पूर्व विश्वास होता - ती त्यक्ति होती माझ्या सावत्र आईची सख्खी बहिण!
माझ्यावर माझ्या मामाच्या बाबानंतर कुणी खरेखरे निर्वाज्य प्रेम केलं असेल, तर ती माझ्या सावत्र आईची सख्खी बहिण होती. हे आश्चर्यजनक होतं. पण ती साधीभोळी आणि मनानेच खूप चांगली होती. तिने आयुष्यभर माझ्यावर सख्ख्या आईसारखी माया केली, जीव लावला. वेळप्रसंगी माझ्यासाठी ती आपल्या सख्ख्या बहिणीलाही खडसावायची. तिचे सासर माझ्या माहेरच्या घरापासून थोड्याच अंतरावर होते.
आज ती मायाळू मावशी नाही, माझा साधाभोळा बाबा नाही, माहेरचे जुने जाणते निष्कपट लोक नाहीत - पण सावत्र भावाने, सावत्र आईने आणि सावत्र बहिणीने माझ्या कपाळावर लावलेला कलंक मात्र आजही तसाच ठसठशीत आहे.
============================================================
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India