Part 9

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.९


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर)

काळोखाच्या कावळ्यांना

=================

-- अनुजा जोशी

'काळोख' ही एक गोष्ट रामाणींच्या कवितेत आकंठ भरली आहे. तम-अंधार- काळोख-रात्र-अवस या वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या तीव्रतेने व्यक्त झाल्या आहेत. रामाणी शैलीच्या खास प्रतिमांमधून हा 'काळोख' शब्दांत गडद होत गेला आहे. काळोखाचे कावळे, काळोखाचे काळवीट, काळे-कावळे मांजर, कांबळा काळोख, काळोखाचे रडे,अंधाराचे दीप,तमाची कानने, अंधाराची स्तने अशा वेगवेगळ्या काळोखप्रतिमांमधून दु:ख,वेदना,सल, संघर्ष, प्रतिकूलता,अभाव,भोगवटा या सा-या गोष्टी व्यक्त झाल्या आहेत. 'काळोखाचे कावळे' ही अशीच एक अगम्य दैवगतीला, दु:खभोगाला रंगरुपात साकार करणारी समर्थ प्रतिमा.

काळोखाच्या कावळ्यांना

येते अवेळीच जाग

खोल हुंकाराच्या तळी

धुमसते काळी आग

काळोखाच्या कावळ्यांची

रिघे पैलपार हाक

किनारते अवसेला

एक जीवघेणी झाक

काळोखाच्या कावळ्यांशी

बोलू जाता बोलवेना

त्यांची नजर कोरते

खोल अदृष्टाच्या खुणा

शंकर रामाणी यांच्या 'आभाळवाटा' या कवितासंग्रहातील 'काळोखाच्या कावळ्यांना' या कवितेत, पीडा-भोग- दैन्य-दुर्दैवाला अवेळीच जाग येते. ध्यानी मनी नसताना दु:ख समोर ठाकते. आणि कोवळा हुंकार फुटावा तिथून - त्या लवलव कोंभाच्या तळातून- काळी आग धुमसू लागते असे हे कठोर प्राक्तन आहे!


कावळा या पक्ष्याला परंपरेने पितरं, मृतात्म्यांच्या पिंडादि भक्षण कार्यात वापरले. अपूर्ण इच्छांशी जोडले. काकस्पर्श, काकबळी, काकवंध्या इ.प्रथा-संकल्पना त्याला चिकटल्या. एकाक्ष भेदक नजर ,काळा रंग ,कर्कश आवाज अशा बाह्यरुपामुळे असेल का कदाचित,पण विनाकारण त्याची सांगड धार्मिक,आध्यात्मिक व काही अभद्र गोष्टींशीही घातली गेली. असा कार्यकारणभाव न कळता अचानक पदरी पडलेल्या घोर दु:खासाठी रामाणींनी 'कावळे' ही सार्थ प्रतिमा वापरली आहे.


कवितेतल्या 'काळोखाच्या कावळ्यांचं' अज्ञात कारणांनी येणं हे आयुष्याला टोचून खाणारं आहे. दु:खाची ही कर्णकर्कश हाक काळीज भेदून आरपार जाते व घनघोर अवसेला त्या काळ्या हाकेचीच एक जीवघेणी किनार व काळी झाक लाभल्याचं कवी सांगतो आहे. मनाच्या या सुन्न बधीरावस्थेत 'काळोखाच्या कावळ्यांशी बोलू जाता बोलवेना' अशी हतबल व असहाय्यतेची जाणीव होते आहे. थोडीफार लाभलेली अदृष्टाची कृपा व त्या कृपेचे ठसेही आपल्या भेदक नजरेने हे कावळे कोरुन काढताहेत,पिंजून टाकताहेत अशी तीव्र दु:खानुभूती या कवितेत येते..

कावळे आले इथे अन् कावळे आले उडू

जे ललाटी लख्ख होते ते पुन्हा गेले दडू

असे कावळे 'पालाण' या कवितासंग्रहात पुन्हा येतात. कावळ्यांचं येणं जाणं हा इथे कठोर नियतीने आयुष्याशी चालवलेला अगम्य खेळ आहे. दैवाच्या खेळाची कारणमीमांसा कुठे करता येते? तो भेदक नजरेचा काळा पक्षी कधीही कुठूनही येईल,सुखावर चोच मारेल, झडप घालेल,हिसकावेल,उडून जाईल,कधी दूर राहिल.. कसेही.. त्याच्या मनात असेल तसे!


हो. पण दुसरी एक चांगली अर्थछटाही या प्रतिमेच्या आडोशाला उभी आहे. ज्ञानेश्वरांनी याच कावळ्याला 'काऊ' म्हटलं आणि 'पैलतोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' मधल्या कावळ्याने 'काऊ' होऊन 'पंढरीच्या राऊ'च्या येण्याची शुभवार्ता दिली! तसेच रामाणींचे हे 'दु:खाचे कावळे' दु:खामागून येणा-या सुखाचा शकुनही सूचकपणे सांगतात व दिलासा देऊन जातात.


खरे तर, कावळा हा एक निरागस पक्षी. इतर पक्ष्यांच्या तुलनेत थोडासा धीटच. हुशार. स्मरणशक्ती असलेला. त्याला असे वाईट नजरेने का बघावे? दु:खाच्या बाबतीतही असा विचार केला तर, दु:खालाही केवळ काळे अभद्र का मानावे? दु:खाकडे वेगळ्या सकारात्मकतेने बघितले तर? 'सुखाच्या आगमनाची पाऊलवाट तयार करणारं ते दु:ख' असं म्हणून दु:खाचा विचार करता येईल ना?तसा विचार केला तर रामाणींच्या 'काळोखाचे कावळे' हे नुसते काळेकर्कश नसून ते अर्थांचा रंगरंगीत किलबिलाट करणारे पक्षी म्हणून समजून घेता येऊ शकतील ना?