Part 2

सदर (गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.२

(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

उन्हाचे आरसे झाले

============

-- अनुजा जोशी

शंकर रामाणी यांच्या आरसालख्ख प्रतिमाविश्वाची सार्थ खूण पटवणारी 'दर्पणीचे दीप'या कवितासंग्रहातील ही एक कविता.


प्रतिमा हे, कवीने शब्दांनी काढलेलं अनुभवाचं चित्र असतं किंवा प्रतिमा हा कवीच्या हृदयासमोर ठेवलेला दर्पणच असतो असे म्हटले तर, रामाणींच्या या प्रतिमादर्पणात त्यांच्या हृदयी ठसलेल्या निसर्गाची विभोर रुपं उमटलेली दिसतात. चपखल प्रतिमांमधून ठायी-ठायी आध्यात्मिकतेची आभा व आत्मप्रकटीकरण येतं. मानवी वृत्ती-प्रवृत्ती- भाव-भावना या विविध निसर्गघटक- ऋतू- प्राणी-पक्ष्यांच्या रुपात प्रतिमांकित झालेल्या दिसतात.एक गाढ व्यथा,दु:ख व करकरीत एकटेपण दिसतं. सृजनाची चाहूल,ओढ व आस दिसते. स्वत:तल्या कवितेचा शोध घेतलेला दिसतो. प्रस्तुत कवितेत 'ऊन्हाचे आरसे'या प्रतिमेतून एक वेगळेच विश्व कवी पाहतो आहे व रणरण सोसल्यानंतर हिरवे सृजन फुलू येण्याची सुचिन्हे त्याला दिसताहेत.


उन्हाचे आरसे झाले

देखिले रूप नेटके

उन्हाळी तल्खुरी तंद्री

निराळे विश्व जागले

दिठीचे बांधले सेतू

जिव्हारी सूर्य जन्मले

प्रकाशी उतल्या वाटा

जाणती दक्ष पाऊले

नागवी भोगिली माती

कोणते बीज पेरिले

विदेही झडल्या धारा

ललाटी मेघ वाजती

कुणाची दाटुनी कूस

गर्भाचे दान मोकळे

वेगळे ओखता काही

बिंबले शून्य दर्पणी

स्तब्ध अशा भरदुपारी रणरणत्या उन्हाचे आरसे करुन कवी एक निराळे विश्व पाहतो. उन्हाची तल्खी न् जिवाची काहिली होत असताना त्यातच एक रखरखती तंद्री लागते ज्यासाठी उन्हाळी 'तल्खुरी तंद्री' हा नवीन शब्दप्रयोग केलेला दिसतो. या रखरख तंद्रीमधे ऊनभरले हे जळते अंतर पार करण्यासाठी दिठीने बांधलेले सेतू, जिव्हारी जन्मणारे दाहक संघर्ष सूर्य व मृगजळातून झिरमिळत फुटणा-या वाटा प्रकाशाने उतू चाललेल्या या आरशांमधे दिसतात. लख्ख ऊन्ह नागव्या भुईला भोगत असल्याचं विस्मयकारी चित्र आरशामधे दिसतं. प्राक्तनाचे भोग आले तसे स्विकारल्याची व न कुढता, न रडता रसरशीतपणे भोगल्याची ही जाणीव आहे! भुईच्या उदरात उन्हाने तप्त जाणिवांचं बीज पेरल्याचं जाणवतं. आणि इतकी रखरख सोसल्याचं फलित म्हणून 'विदेही झडल्या धारा/ ललाटी मेघ वाजती' हे बरसणारं भाग्य उदयास येईल अशी आस मनाला लागते. तापल्या भुईच्या अोटीत पडलेलं हे ऊन्हाचं गर्भदानच पुढे हिरवं सृजन फुलवेल अशी आशा निर्माण होते. असा 'वेगळे ओखता काही बिंबले शून्य दर्पणी'चा प्रत्यय उन्हाच्या अारशामधे न्याहाळून बघताना कवी घेतो. 'ओखणे' म्हणजे डोकावून बघणे किंवा न्याहाळणे. प्रादेशिक बोलीच्या प्रभावातून आलेल्या या क्रियापदासारखे अनेक वेगळे शब्दप्रयोग रामाणींनी मराठी कवितेत रुजू केले आहेत.


यशोदेला बाळकृष्णाच्या मुखामधे ब्रम्हांड फिरताना दिसतं, तसं जणू उन्हाच्या झगझगीत आरशामधे न्याहाळून डोकावून बघितल्यावर कवीला शून्याकार विश्व नजरेस पडतं. 'दर्पणी पाहता रुप न दिसे वो आपुले' याप्रमाणे उन्हाच्या आरशामधे न्याहाळल्यानंतर स्वत: चे रुप न दिसता शून्यरुप विश्व कवीला दिसतं. आणि तेव्हा अजून एक किमया घडते- कवितेच्या शेवटी ऊन्हाचा आरसा हा साधा 'आरसा' न राहता तो ब्रम्हांडाची आभा दाखवणारा 'दर्पण' होऊन जातो! रामाणींच्या 'दर्पणीचे दीप' या कवितासंग्रहात तर अशाप्रकारच्या प्रतिमादर्पणांची लखलखती मालिकाच समोर येते.