Part 21

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.२१


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

पुण्याई

=====

-- डाॅ. अनुजा जोशी

अस्ताच्या आकाशात पाहिलेले हे उद्याच्या उदयाचे स्वप्न आहे. या रंगविभोर देखण्या अस्तानंतर उद्याच्या उदयाचा योग आहे हे कुठल्याशा पुण्याईचंच फळ आहे अशी कवीची धारणा आहे. तीव्र इच्छाशक्ती असलेलं प्राणांचं पाखरू पहाटरंगांच्या परमळात न्हाऊन निघालं आहे असा आभास ओहोळतो आहे.

अप्रूप रंगांचे

अस्ताचे आकाश

आतून वेगळा

ओहळे आभास

...देखिला देखणा

कोवळा उत्सव

कोठून कळेना

उठती आरव

दूरात उडाले

अनोखे पाखरू

पाहते कवेत

क्षितिज सावरू

शिटूक डोळुले

पर्मळे पहाट

माणिक मोलाची

घटिका आरक्त

संभ्रम-झांजरी

नारिंगी नवाई

अलक्ष कळांची

पारज पुण्याई

शंकर रामाणी यांच्या 'गर्भागार'संग्रहातील 'पुण्याई' ही कविता सूर्यास्ताच्या लाल केशरी विभ्रमांचे अप्रूप वाटत असताना नारिंगी नवाईचा सूर्योदयही पाहते. तिन्हीसांजेला काळोखत जात असताना आतून कुठूनतरी उद्याच्या उजेडाचे आरवणे कवीला ऐकू येते. लगोलग जगण्याची आस एक अनोखं पाखरू होऊन भरारते आणि अवघं क्षितीज पंखावर तोलू बघते. अथांगाला कवेत सावरु बघते. इवल्या डोळ्यांचं हे 'शिटूक पाखरू' ही रामाणींच्या कवितेची प्रादेशिक खासियत आहे. असा एखादा अस्सल मातीच्या गंधाचा शब्द हे कवितेचं आशयसंपृक्त सौंदर्यस्थळच ठरतं. या फुलावरुन त्या पानावर, या फांदीतून त्या झाडावर तुडतुडणारं ते शिटूक-सडसडीत-धीट पाखरु माणिकमोलाच्या आरक्त घटिकेत न्हाऊन निघाल्याचं कवीला दिसतं आहे.


रंगांचा- रुपसंवेदनेचा एक देखणा आविष्कार ही कविता घडवते. अस्ताच्या आकाशात दिसणारे लाल गुलाबी केशर पिंजर रंग आणि स्वप्नातल्या सूर्योदयाच्या घटिकेचे माणकासारखे तांबडे,गुलाली,नारिंगी रंग असा रंगमेळा इथे जमला आहे. आकाशात दिसतो आहे तो मावळतीचा- विरक्तीचा केशरी रंग खरा की मनातल्या उगवतीचा-आसक्तीचा आरक्त रंग खरा? अशा संभ्रमात कवी पडला आहे. या संभ्रमाच्या सायंकाळी तो एक झांजरवेळ अनुभवतो आहे. यातूनच अस्ताला जाणा-या क्षितीजाकडे पाहताना त्याला एक दिव्य भास होतो आहे. अलक्ष कळांनी भरगच्च फुललेला पारिजातक खोल मनात गंधाळल्याचं व ती अलक्ष-अदृष्ट-अलौकिकाची 'पारज पुण्याई' गाठीशी असल्याचं कवीला जाणवतं आहे. प्राजक्त फुलाचं सुकुमारत्व कवितेतल्या या आध्यात्मिक जाणिवेला आहे. सूर्योदयाच्या 'नारिंगी नवाई'ची नवलाईही कवीला वाटते आहे.


सदैव अशाश्वतीच्या टांगत्या तलवारीखाली असणा-या भंगुर आयुष्यात सारे माहित असूनही आपण उद्या उजाडणारच असे गृहित धरुन चालतो. अचानक एखादं फूल माळेतून तुटून पडावं तसं मृत्यूचं दर्शन समोर घडलं की क्षणभर थबकतो,बिथरतो. पण पुन्हा पुढच्याच क्षणी पुढे सरकतो. गळून पडण्याचा विचार टाळत सरकत राहतो. प्राजक्ताच्या मोहक सड्याने गंधाळून जात असताना कोमल प्राजक्त फुलाच्या नश्वरतेचा विचार नजरेआड होत राहतो. म्हणून जीवन अथांग आहे, पण मोहमयी जगणं भंगुर आहे हे भान सतत जागं असायला हवं. या पार्श्वभूमीवर किंवा अशा जीवनविषयक सखोल चिंतनातूनच रामाणींनी 'आज मावळून उद्याचा दिवस उजाडणे' हे कोणत्यातरी पुण्याईचे फळ आहे असे म्हटले अाहे. उदयास्ताच्या चाकावर फिरणा-या, आपल्या वाट्याला आलेल्या इवल्या जगण्याविषयीची ही कृतज्ञ व कृतार्थ जाणीव आहे.