Part 16

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१६


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

पुनवेला अर्थ आज

=============

-- अनुजा जोशी

प्रतिकूलतेतून वाट काढत हाती आलेले सुखाचे फूल हुंगताना त्यामागचा दु:खाचा गंधही स्मरणात ठेवावा लागतो. रामाणींची कविता, सोसलेपणाचा व भोगलेल्या व्यथा वेदनांचा हाच काळोख सतत उर्जा म्हणून उराशी बाळगते. 'पुनवेला अर्थ आज अवसेच्या संदर्भी' असं एखाद्या सुभाषितासारखं जीवनमूल्य अगदी सोप्या भाषेत ही कविता हाती ठेवते.

काठ काठ हुंगित मी

रात्र रात्र भग्न फिरें;

आसवांत मुरलेलें

लोचनात गीत झुरे.

सावल्यांत विर्घळले

धरतीचें दुःख मुकें;

गात्र गात्र पांघरतें

मौनाचें गर्द धुर्के.

या धुक्यांत लपलेली

जपलेली गूढ व्यथा;

ऐलपैल ना; मधेच

फसलेली मात्र कथा

रात्र रात्र पोशित मी

गहन तमाच्या गर्भीं;

पुनवेला अर्थ आज

अवसेच्या संदर्भी

'आभाळवाटा' या कवितासंग्रहातील 'पुनवेला अर्थ आज' ही शंकर रामाणी यांची कविता पुनवेच्या चांदण्यात न्हाताना टिपूर चांदण्याआधीची अमावास्या आठवते आहे.


अस्ताव्यस्त भरकटलेले आयुष्य किनारा शोधते आहे. 'काठ काठ हुंगित मी रात्र रात्र भग्न फिरे' अशी बिकट वहिवाट आहे. पण या दु:खाच्या काळातही एक दुर्दम्य आशा (जणू आसू होऊन) डोळ्यात चमकते आहे. आसवात मुरलेले हे गीतच डोळ्यात तरळते आहे असे कवी सांगतो आहे. चांदणराती धरतीच्या अंगावर पडणा-या झाडापेडांच्या सावल्या हे धरतीचे मुके दु:ख आहे असे कवीला वाटते आहे व तो ही अनुभूती स्वत:च्या बाबतीत घेत आपल्याच अंधारदेहावर मौनाचे धुके पांघरल्याचे अनुभवतो आहे. नेणिवेतला असा एखादा सूक्ष्म अनुभव शब्दात आणण्याचे हे मोठेच कसब रामाणींच्या समग्र कवितेत जिथे तिथे दिसते.


या अनुभवात अजूनही एक सूक्ष्मतर जाणीव दडली आहे. अंगावर पांघरलेलं मौनाचं गाढ धुकं काहीतरी लपवतंय. काहीतरी जपतंय. ते काय आहे?त्या मौनातही अजून काही आहे?होय. हे मौन, एक गूढ अशी व्यथा उराशी बाळगून आहे! ना ऐल, ना पैल अशा मधेच फसलेल्या कहाणीची- काठ सोडून भरकटलेल्या कथेची ही व्यथा आहे! कवितेच्या सुरुवातीला आलेला, काठ सुटल्याचा संदर्भ इथे पुन्हा अधोरेखित होतो. ही कवितेची तंत्रशुद्धता आहे. आशयाचा मंत्र मनात पक्का असला की कविता आपसूकच तंत्रातही अशी चपखलपणे बसून जाते!


अशा दुष्कर रात्रीमागून रात्री तमाच्या गर्भात पोसून परिपक्वपणे दु;ख सोसलं आहे. व्यापक तमात रात्रीचा तुकडा वेगळा असणं ही वेगळी अर्थछटा आहे. 'वेदनेच्या डहाळीला माझी व्यथा झाली फूल' ,दूरात पाखरु गेले दिगंत पांघरु' अशी मोठ्यात छोटा गोल बसवावा तशी व्यापकात विशिष्ट अशाप्रकारची रचना अन्यत्र अनेकठिकाणी रामाणींच्या कवितांतून दिसते. या कवितेतील 'तमाच्या गर्भात रात्र पोसणे' या कल्पनेचे आकलनही तशाच प्रकारे करुन घेतले तर अधिक स्पष्टपणे होते. इथला तम व्यापक आहे. व्यापक मातृभावनारुप आहे. आणि तिच्या गर्भात कवीचा व्यथामय काळोख पोसला गेला आहे! घनतिमीराने भरलेल्या अमावास्येचा असा संदर्भ आजच्या पुनवेला आहे. 'अमेच्या प्रवाहासवे वाहताना तमी पोळुनी पक्व व्हावे जिणे' असे एका कवितेत येते. त्यातही 'पक्व होण्यासाठी तमात पोळले जाणे' यामागे हेच आशयसूत्र आहे. 'माझ्या मुखी आली/ अंधाराची स्तने/ओठात चांदणे फोफावले' असेही एका कवितेत येते. त्यात काळोखाच्या स्तन्यावर ओठात चांदणे फुलण्याचा संदर्भही हाच आहे. रात्र रात्र पोसणारा गाढ अवसेचा तमच पौर्णिमेच्या पार्श्वभूमीला आहे. पुनवेला तिचा चांदणअर्थ दु:खाच्या काळ्याकुट्ट अवसेमुळेच प्राप्त झाला आहे !