Part 23

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.२३


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

धालो

====

-- डाॅ. अनुजा जोशी

गोव्याच्या लोकपरंपरा व उत्सवांचे संदर्भ शंकर रामाणींच्या मराठी व कोकणी कवितेतही अनेक ठिकाणी येतात. 'जोगलांचे झाड'या त्यांच्या पहिल्या कोकणी कवितासंग्रहामधील 'धालो' नावाच्या या कवितेत एक वेगळंच 'म्होवाळ' चांदणं मालनीच्या अंगावर मोहरलं आहे.

"खूंय गो गेलेलें?"

"दालां गेलेलें;

पुनवेच्या माटवां नितळ

चान्नें वेंचीलें"

"केदनां नाचीलें?"

"राती नाचीलें

नदरेचें फूल 'त्ये'च्या;

खोप्यां खोयीलें"

"कोणे देखीलें?"

"ना गे देखीलें

फुगडे -भारा

फांत्या-पारा

काळीज शेणोलें"

"दालां नाचीलें

काळीज शेणोलें?"

"कोंब्या-सादार

तन्न्या आंगार

चान्ने शिंवरेलें

चान्ने चोंवरेले..."


पौषातली दुधाळ चांदण्याची पौर्णिमा आहे. गोव्यातल्या एखाद्या आडखेड्यात धालोत्सव रंगतो. कष्टकरी मालनी 'धाल्याच्या मांडा'वर जमतात. सारवलेलं अंगण, तुळशीवृंदावना भोवती सुरेख रेखलेली रांगोळी, झुरुमुरु थंडी दव धुकं.. नऊवारी लुगडी नेसून,नथी घालून केसात आबोलीची फाती माळलेल्या 'मालनी' गात गात फुगडीचा फेर धरतात. मांडवातून, झावळ्यांच्या छतातून झिरपणारं चांदणं साध्यासुध्या मालनींवर मायेची पखरण करीत राहतं.


"कुठे गेलेली गो ?"

"धाल्या गेलेली गो "

पुनवेच्या माटवाखाली

चांदणं वेचलं गो "

"कधी नाचली गो?"

"राती नाचले गो

फूल त्याच्या नजरेचं

खोप्यात खोवलं गो"

"कुणी पाहिलं गो?"

"नाही पाहिलं गो,

फुगडी भरात

पहाटपारात

काळीज सांडलं गो

"धाला नाचली गो

काळीज सांडलं गो?"

"कोंब्या-सादी

तरण्या अंगी

चांदणं पखरलं गो

चांदणं मोहरलं गो.."

धाल्याच्या रात्री मांडवाखाली चांदणं वेचून आलेली ही मालन काहीतरी गोड गुपित उराशी बाळगत आली आहे. एकजण तिला विचारतेय कुठे गेलेली, कधी नाचलेली, कुणी बघितलंय का ..? हीसुद्धा जुजबी उत्तरं देतेय.. धाल्याला गेलेली, रात्री नाचलेली.. पण हिला काहीतरी कळलंय. काहीतरी नाकळलंय.. आणि ही आपली हरवलीय! ही हरवलीय हे नक्की.


असं काय झालंय धाल्याच्या रात्री नाचताना? ही पहाटपारी घरी आलीय पण येताना 'त्याच्या' नजरेचं फूल आपल्या खोप्याला खोवून आली आहे! फुगडीच्या भारात रात्रभर खेळता खेळता पहाटेला काळीजच हरवून बसली आहे. कोंब्या-सादावर मनातही गुलाबी झुंजुमुंजु झालीय आणि हिच्या कोवळ्या अंगावर चांदणशिंपण झाली आहे, चांदणं मोहरलं बहरलं आहे! पहाटदवासारखी अशी हुरहूर लावणारी एक अलवार कल्पना कविताभर चित्रमयतेने साकारते. आशयाला लयीत डोलायला लावते. नाचायला लावते.


गोमंतकीय कष्टकरी मालनीचं भावविश्व रामाणींनी या कवितेत उत्तमप्रकारे रेखाटलंय. लोकगीताच्या शैलीत व सुरेख लयीत लिहीलेल्या या कवितेची भाषा 'खूंय गो गेलेले' या पहिल्या प्रश्नापासूनच गोव्याच्या आदिम वस्त्यांच्या वेगळ्या बोलीत अवतरते आणि एक गोड भावछटा घेऊन अवघा तरल आशय समर्थपणे व्यक्त करते. कविता पुन्हा पुन्हा वाचावी आणि ही लय पुन्हा पुन्हा अंगात मुरवून घ्यावी असे वाटत राहते. प्रादेशिकतेचे असे तलम पदर उलगडविणे ही खास 'रामाणीय' उत्कटता आहे. या उत्कटतेमुळेच गोंयकार मालनीच्या तनामनात रंगलेला हा 'धाला' आपल्याही ओठावर गुणगुणू लागतो, पावलात रुणझुणू लागतो. काळजात रुंजी घालत राहतो.