Part 11

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.११


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

या संपन्न निनावी गावांत

================

-- अनुजा जोशी

रामाणींच्या समग्र कवितेत 'झाड' ही संकल्पना/प्रतिमा विविधप्रकारे ठिकठिकाणी आली आहे. हे झाड कधी अष्टांगी मोहरलेले असते,कधी ते "तिन्ही त्रिकाळ फुलते दारी नवलाचे झाड" असेही असते. "सलीलसुंदर सुवर्णी पंख पालवित झाडे आकाशात उडून गेली' असेही ते अनोखे असते.तर कधी 'झाड वाजते मनात ओला अबोधाचा वाळा' असा झाडाचा नाद कवितेला ऐकू येतो. शब्द स्पर्श रुप रस गंध यातल्या कोणत्याही संवेदनेने हे झाड अनुभवता येते. पण पुढील कवितेत या सर्वाहून अजून वेगळे असे 'झाड' आले आहे.

हे एक संपूर्ण अनोळखी गाव.

कातरवेळ.

मेणबत्तीच्या प्रकाशातून संदिग्ध.

एव्हाना माझ्या पाऊलकथांच्या व्यथा

ओसंडून रुजूं रुजूं झालेल्या सर्वत्र.

केवळ वेताळ-वेळेलाच सरावलेल्या

डोळ्यांनी

इथल्या एका रहिवाशाला खुणावलें

तेव्हा तो खोल उन्मळून म्हणाला,

'या जहन्नम प्रदेशांत

कधी फुटत नाही आभाळाला सूर्य,

म्हणून आषाढसरींसारखा कोसळणारा

काळोख

जपून आहे उदयास्ताच्या पल्याड

आपले उज्ज्वल सनातन शोक.'

तेव्हापासून देहयात्रेच्या या अटळ.

वळणावर

निवाऱ्याला एक घर आहे,

घराला अंगण आणि

अंगणात एक निराकाराचें झाड...

अदृष्टाच्या नजरेने कसून न्यहाळलें

तर कणाकणांतून किनारलेली त्याची

प्रकाशपालवी

तुडुंब मांझ्या रंध्रांरंध्रांत मोहरतांना दिसेल

या संपन्न निनावी गावांत.

शंकर रामाणी यांच्या 'पालाण' या कविता संग्रहातील 'या संपन्न निनावी गावांत' या कवितेत 'एक निराकाराचे झाड' आले आहे. 'दर्पणीचे दीप'मधे तर याच शीर्षकाची अजून एक कविताही आहे. एका गाढ चिंतनाच्या क्षणी आलेली ही आत्मिक अनुभूती असावी. 'मेणबत्तीच्या प्रकाशाहून संदिग्ध अशा कातरवेळी' डोळ्यासमोर आलेलं हे अनोळखी गावाचं एक चित्र आहे. अर्थातच ते संदिग्ध चित्र आहे. पण त्यात कवीच्या व्यथा ओसंडून रुजू झाल्या आहेत.


'वेताळ वेळे'ला सरावलेल्या डोळ्यांना इथला अंधार माहित झाला आहे. 'वेताळ वेळ' ही आक्रित, विपरित घडवणारी वेळ आहे. ही भयसूचक आहे. या वेळेला सरावल्या डोळ्यांनी इथल्या एका रहिवाशाला खुणावले व या गावाबद्दल विचारले तर तो अर्थातच तिथली अंधारी, बिकट परिस्थिती सांगतो. तो म्हणतो हा 'जहन्नम प्रदेश' आहे. कधीच सूर्य न उगवणारा, किण्ण् काळोखाचा,दैन्याचा, दुरावस्थेचा प्रदेश आहे. पण इथला काळोख आषाढसरींसारखा कोसळतो. उदय- अस्त दोन्हींच्याही पल्याड तो आहे. व आपले उज्वल सनातन शोक तो तिथे जपून राहिला आहे. रामाणींच्या कवितेतील काळोखाची व्याप्ती ही अशी उदयास्ताच्याही पल्याड गेलेली आहे!


आयुष्याला 'देहयात्रा' असा सुरेख शब्द रामाणी वापरतात. या देहयात्रेचे अटळ वळण असणारे हे गाव आहे. हा दु:खाचा काळोखाचा 'जहन्नम प्रदेश'च आहे. पण तमातून पार होण्याची असोशी इतकी प्रबळ आहे की, कवीला या तमभरल्या गावात, साक्षात्कार झाल्यासारखे एक घर, घराला एक अंगण व अंगणात एक निराकाराचे झाड बहरले आहे असे सारे नजरेसमोर दिसते आहे. आणि आता कवी अदृष्टाच्या नजरेने हे झाड न्याहाळतो आहे.


हे कवीच्या कलेचे,सृजनाचे झाड असू शकते. ईश्वरी कृपेचे असू शकते. अदृष्ट शक्तीचे असू शकते. प्रतिभेचे,आत्मज्ञानाचे, आत्मप्रकाशाचे असू शकते.. नेणिवेचे असू शकते! त्या झाडाला प्रकाशाची पालवी फुटली आहे व ती कवीच्या रंध्रारंध्रात मोहरुन आलीय. म्हणून आता कवी या काळोख्या निनावी गावाला 'संपन्न गाव' असे संबोधतो आहे. काळोखाला प्रकाशाची जरतारी किनार देणा-या, प्रकाशाची पालवी फुटलेल्या आध्यात्मिक जाणीवेतून आलेले हे रामाणींचे 'निराकाराचे झाड' ही एक दिव्य अनुभूती म्हणून कवितेशी समरसून समजून घ्यावी लागते.