Part 8

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.८


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर)

अशी सजवीन तुला

=============

-- अनुजा जोशी

प्रेमभावनेत शारिरीकतेच्या पल्याड असणारा मनोभाव व मनांच्याही पुढे, निती-अनितीच्या गुंत्यांना सोडवत आत्म्यापर्यंत पोचणारी अधि-आत्मिकता/प्रेमात्मियता अशी शंकर रामाणी यांच्या प्रेम-पालाणाची दीर्घ झेप आहे. रागरुसवे आठवणी तगमग विरह मीलन समजूत विश्वास संयम संतृप्ती संभोग अभोग असे विभ्रम सामान्यपणे प्रेमकवितेत येतातच, पण रामाणींची प्रेमकविता प्रेमाबद्दल अजूनही काही वेगळं बोलते. वरील सर्वांबरोबरच प्रेमाबद्दलच्या आध्यात्मिक- अपार्थिव- अलोकिक जाणिवांमधूनही ती व्यक्त झालेली दिसते.

अशी सजवीन तुला

स्पर्श सुगंध माळीन

हिर्व्या नजरेचा चुडा

तुझ्या हातात घालीन

चंद्र निथळले डोळा

निळे तंद्रीचे उखाणे

रोमरोमात वेचती

किती चकोर चांदणे

असे अनावर आता

झाले काळजाचे काठ

कोण चुंबित निघाले

खोल भरतीची वाट

मोरवा-याचे घुंगरु

तुझ्या पायांत बांधीन

दिठी-मिठीचा उत्सव

भाळी अदृष्य रेखीन

तुला सजवीन त्याच्या

उरी-पोटी सोनकळा

मधे झुलतोच आहे

आहे - नाहीचा हिंदोळा

असं अशारिरी प्रेमाचं उत्कट दर्शन व शरीरांना ओलांडणारं निखळ मनोमीलन रामाणींच्या 'दर्पणीचे दीप' या कवितासंग्रहातील 'अशी सजवीन तुला' या कवितेत येतं.


बरेचदा चपखलशा निसर्गप्रतिमांमधूनच प्रेमाचे विभ्रम कवितेत येतात. प्रेमातली तृप्ती जितकी तुडुंब तितक्याच तीव्रतेचा विरह दिसतो. जितकी तीव्र आस तितका अलिप्त कोरडेपणा असतो. जितकी गाढ आसक्ती तितकीच करकरीत विरक्ती, जेवढी प्रेमाची अर्थपूर्णता तेवढेच विकार-वासनांचे अर्थशून्यत्व, भोग-अभोग, शारीर-मानस अशी भावशिखरे जागोजागी दिसतात. "चैत्रदुपारशा देही पिके चांदणे चोखिले " किंवा "तिच्या देहवाटा भरतीच्या लाटा" असं म्हणणारं कवीमन वरील कवितेत हा शारिरभाव ओलांडतं व केवळ मन:श्रुंगाराने आपल्या सखीला सजवतं आहे. राधेच्या मधुराभक्तीचंच हे रुप आहे का?


सखीच्या केसात स्पर्शाचा सुगंध माळणारा व आपल्या हिर्व्या नजरेचा चुडा तिच्या हातात घालणा-या कवीच्या डोळ्यात स्वप्नांचे चंद्र निथळताहेत. व ते 'निळे तंद्रीचे उखाणे' तो तिला घालतो आहे. रोमरोमात नादणारे चकोर व चकोरांच्या मनातल्या चांदण्याच्या ओढीविषयी तो बोलतो आहे. आतुर शरीरं- पण कदाचित मीलन न होऊ शकणारी, संकोचणारी, तगमगणारी - लौकिक ओलांडून अमूर्त भावाने भारित अशा एकमेकांच्या मनांकडे झेपावतात व मनांच्या स्थिती एकरुप होतात. ती आस - ती ओढ - ती 'खोल भरतीची वाट' इथे ओळीओळीत अालेल्या अर्थपूर्ण प्रतिमांमधून सूचित होते. कवी एकेक सुंदर मनसाज घालून आपली प्रीतच सखीच्या अंगावर सजवतो आहे

अशारिरी श्रृंगाराची ही निसर्गरम्य रीत पुढे एका मोहक 'मोरवा-याच्या घुंगरांशी' खेळू लागली आहे...यात आलेला 'मोरवारा' व त्याचे घुंगरु सखीच्या पायात बांधणं हे शब्द- स्पर्श- रुपसंवेदनांचं- रंगीत पिसा-यासारख्या रंगविभ्रमांचं अलवारपण आहे; जे शब्दांशी समरसूनच तरलपणे अनुभवायला हवं! दिठी-मिठी एक झालेल्या आठवणींचा हा उत्सव कवी सखीच्या भाळावर अदृष्यपणे रेखतो आहे. या कल्पनाचित्रात शेवटी गंमत अशी की, अशारिरी प्रेमाला उरी पोटातून उठणा-या सोनकळांची - आनंदलहरींची चाहूल लागली आहे व अशा शरीर व मनोमीलनाच्या सीमारेषेवर - 'आहे- नाहीच्या हिंदोळ्यावर' ही कविता झुलते आहे...


मनांच्या गोड संभ्रमित अवस्थेत, होकार नकारांच्यामधे, शारीर-अशारीराच्यामधे, लौकिक- अलौकिकाच्या मध्यसीमेवर झुलणारा हा रामाणींचा प्रेमझुला आहे !