Part 15

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१५


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

पेन्शनर

======

-- अनुजा जोशी

गाढ जीवनचिंतनातून आलेल्या कविता हा शंकर रामाणी यांच्या कवितांचा एक विशेष पैलू आहे. त्यांच्या 'दर्पणीचे दीप' या कवितासंग्रहातील 'पेन्शनर' ही एक वेगळी कविता हे याचेच उत्तम उदाहरण. ही कविता एका पेन्शनरची मनस्थिती व वस्तुस्थिती यांविषयी बोलते.


'काळाच्या पवमान तर्कटी टापा' म्हणणारे रामाणी पहिल्याच ओळीत पेन्शनरच्या अंगावरुन वेगाने वाहून गेलेल्या काळाला, टापा टाकत वेगाने जाणा-या घोड्याच्या रुपात बघतात. गेलेला काळ रुपात भरधाव वेगाने निघून गेल्याचं या पेन्शरला जाणवतं आहे. तो त्याच्या टापा मोजत बसला आहे. हातून निसटून गेलेल्या आयुष्याविषयीची चुटपुट व बरीवाईट मोजदाद हाच कवितेचा पहिला उद्गार आहे.


रामाणींचा प्रतिमाविलास नेहमीच लक्ष खिळवून ठेवणारा. उन्हाळी माळाचा मग्रूर विस्तार, मनाचे माजघर,वादळवेंगेत सापडलेलं जहाज,प्राणांचे पंखतुटे पाखरु, क्षितीजमेरेचा जांभूळपिका वास असा जाणिवांवर अलगद मोरपिस फिरवणारा कल्पनाविलास ही खास रामाणीशैलीच. या कवितेत एकेका ओळीत आलेल्या प्रतिमा व त्यातून चित्रीत होणारी पेन्शनरची भावावस्था समरसून वाचली पाहिजे.

पेन्शनर: काळाच्या पवमान तर्कटी टापा

एकान्तात मोजत बसलेला,

उन्हाळी माळाचा मग्रूर विस्तार नजरेच्या

घोटात गिळून टाकणारा;

विझू विझू दिवसाचे ओझे डोईवर;

धुमसत्या सावल्यांची जीवघेणी धग,

सोसलेल्या आघातांचे अलंकार मनाच्या

माजघरात दडवून ठेवणारा.

रंगमावळतीचे सायंकाळी आभाळ,

विरत चाललेले मुलतानी सूर,

गोरजधूळ हुंगीत परतणाऱ्या गाईंचा

असंथ धपापणारा ऊर,

विषण्ण वाळवंटी स्तब्धता,

सुदूर शांत समुद्रात अचानक वादळवेंगेत

सापडलेल्या जहाजाचा अनाहूत आक्रोश,

फाटलेला शोकान्तिक धूर...

सर्वत्र पायउतरणीच्या वाटा;

तरीपण अजून कसा चढणीचाच उत्कट.

भास,

पायतळीच्या मसण-मातीला

क्षितिजमेरेचा जांभुळपिका वास,

प्राणाचे पंखतुटे पाखरू थकुन चूर;

ओथंबून आलेली नीज;

अस्थियात्रेच्या वाटेवर मलूल रेंगाळणाऱ्या

सूर्यकिरणांचे श्वास...

अंग अंग अनंतातीत स्पर्श;

नकळत असंगाशी जडलेला संग.

पेन्शनर:

तुकोबाच्या डोळ्यांत उमलून नुमललेला

एक आर्त दुर्लक्षित अभंग..

शेवटी 'पेन्शनर' ला 'तुकोबाच्या डोळ्यांत उमलून नुमललेला एक आर्त दुर्लक्षित अभंग' असं रामाणी म्हणतात इथे पेन्शनरच्या एका वेगळ्याच व अभंग असलेल्या व्यथेनेच जगण्याचे सार्थक केल्याचे दिसते.तुकोबाच्या संदर्भामुळे पेन्शनरच्या सामान्य जिण्यातील व्यथेला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभल्याचे दिसते.