Part 3

सदर (गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.३

(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

तीन उन्हाचे दगड ठेविले

================

- अनुजा जोशी

तीन उन्हाचे दगड ठेविले

आणि रांधले जिणे

माध्यान्हीचा सूर्य ढाळतो

माथ्यावर चांदणे

पदराखाली बाळ जपावे

जखम तशी झाकिली

अंगाईला मुकी-भुकी

मम हृदयाची स्पंदने

दो दिवसांच्या मुशाफरीला

फुटे गर्द पालवी

नसांतल्या घनगर्द तमाची

घमघमली कानने

तीन उन्हाचे दगड ठेवुनी

आज रांधले जिणे

'उन्हाच्या तीन दगडांची चूल मांडणारी' 'आभाळवाटा' या कवितासंग्रहातील ही कविता, शंकर रामाणी यांच्या समग्र कवितेचा लसावि म्हणता येऊ शकेल अशी आहे. सुमारे ५० वर्षापूर्वी लिहीलेली ही कविता आजच्या यंत्र तंत्रयुगाच्या वर्तमानातही तितक्याच चपखलपणे लागू पडते हे या कवितेचे महत्वाचे सार्वकालिक मूल्य!


ऊन सोसण्याची आणि त्या धगीवर 'जिणे रांधण्याची' ही रटमटती असोशी नवी-जुनी वगैरे असू-होऊ शकत नाही. चुलीचे दगड असोत किंवा गॅसशेगडीचे खूर असोत,रटमटणं तेच आहे. तेच होतं. तेच राहिल. तीन उन्हाचे दगड यांसारखी त्रिकालाबाधित प्रदिप्त राहणारी प्रतिमा ही खास रामाणीशैली. या जिण्यामधे पदराखाली झाकलेल्या बाळासारखी जखम (वेदना) झाकलेली आहे. तिचे जाहीर प्रदर्शन नाही. आविर्भाव नाही. आवाज चढवलेला नाही. संयमाने दु:ख सोसलं आहे असं दिसतं आहे. दु:खाला अशी मुकी आणि भुक्या स्पंदनांची अंगाई म्हटली आहे. सहनशक्तीने त्याला जोजवलं व झोपवलं आहे. वेदना,व्रण,भूक, सोसणं,जळणं हे सारं एकत्र शिजवणारं हे जिणं आहे. ही 'दो दिवसांची मुशाफरी' आहे. उन्हाच्या चुलीवर रटमटून या संघर्षमय मुशाफरीला गर्द पालवी फुटली आहे. आयुष्यात खोलवर मुरलेल्या काळोखासाठी 'नसानसांत भिनलेली दाट तमाची अरण्ये' अशी एक वेगळीच भावोत्कट प्रतिमा इथे उमटली आहे. उन्हाच्या आचेवर त्यांचा घमघमता वास कवी अनुभवतो आहे.. उन्हाला चव व अंधाराला गंध आला आहे!


माध्यान्हीचा सूर्य चांदणे ढाळणारा, पालवी दग्ध फुटलेली, हृदयाची मुकी स्पंदने अंगाई गाणारी असा विरुद्ध विलास या जिण्यामधे आहे. उन्हाचे तीन दगड ही एकूण जगण्याचीच त्रिमिती आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आतून लागत असलेली दु:खाची,संघर्षाची आच, हे त्रिमितीय- तीन दगडांवरचं जिणं रांधते आहे असे कवी सांगतो आहे. सोसण्याचं भोगण्याचं आंतरिक बळ, अशाप्रकारच्या कमाल संवेदना घेऊन रामाणींच्या समग्र कवितेत रसरसून व्यक्त झालं आहे. संकटात, निराशेत तोंडचं पाणी पळणे, जगण्याची चव निघून जाणे, जीण सपक होऊन जाणे,निरस बेचव होणे अशा स्वरुपात प्रतिकूलतेचे अनुभव लोक घेत असतात. पण कवी मात्र खडतर परिस्थितीचा विचार 'धगीवर जीण रांधणे' असा भिन्न व सकारात्मकतेने करतो व बिकट परिस्थितीच्या तोंडी सुखाचा घास भरवतो! कवीच्या खडतर व्यक्तिगत आयुष्याचे पडसादही या कवितेत आहेत. व्यष्टीच्या जिण्याबद्दल बोलता बोलता समष्टीचं जगणंही इथे सहज सहज कवेत घेतलं आहे, म्हणून ही कविता कवीच्या स्वत:च्या व त्या अनुषंगाने एकूणच मानवी जीवनाच्या धगधगत्या वास्तवाचं रुपचित्र ठरते.