सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१७
(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')
अंधारात विराट विश्व विरते
=================
-- डाॅ. अनुजा जोशी
'अाभाळवाटा' कवितासंग्रहातील शंकर रामाणी यांची ही एक महत्वाची कविता. कडकडीत उपरोध व गूढरम्य अशा अतितरल संवेदनांमधून ही जीवनाचं सत्य दर्शन घडवते.
अंधारात विराट विश्व विरते नि:स्तब्धता लेवुनी
शून्याकार मनांत मात्र अजुनी जागे मुके वादळ
कोठे गूढ तळी विचित्र हलती छाया खुज्या
भेसुर
माझ्यांतील कुणी अशब्द तिथली हुंगी
उदासीनता
निद्रेच्या थडग्यात जीव निजले मृत्यूच मारी
मिठी
प्रेतांना उबवीत जागत बसे आत्मा स्मशानांत
या
मोहाचे घट फोडिले कितिक हे वैय्यर्थ सारे
पटे ...
दृष्टीला न दिसे असे अतुल मी काहीतरी पाहतो
मृत्यूची दुनिया कुठे विसरलो? ते सत्य आहे
कुठे?
मेंदीहून सुरक्त नाजुक असा हाती तुझा हात
गे!
इथे एक भेसूर अंधारचित्र (किंबहुना जगण्याचंच चित्र) रंगवलं आहे. वरुन सुंदर दिसणारं जग आतून कुरुप अशा जीवनव्यवहाराने भरलं आहे अशा एका वेगळ्या सत्याची जाणीव कवीला कुठल्यातरी गाढ तंद्रीत असताना होते. कदाचित काही विराट-भव्य परंतु लौकिकाच्या बेगडी सुखाचं दर्शन घडविणारं समोर उभं ठाकलं असावं! दिवसा डोळ्यांना दिसणारं भव्य दिव्य विश्व काळोखात बुडत जातानाची ही वेळ आहे. अंधार हा सत्य होऊन समोर आल्यावर त्यात हे रंगारंग विश्व विरत असल्याची जाणीव शून्याकार कवीमनाला होते आहे, ज्यात भावभावनांची वादळे अजून जागी आहेत. संदिग्धता आहे. संभ्रम आहे. समोर दिसणा-या अंधारशून्याचा ते अर्थ लावते आहे. अंधारात हलणा-या खुज्या जगण्याच्या सावल्या व उदासीनता हुंगणारे मनाच्या आतले अंतर्मन या सगळ्याचा एक गूढ अनुभव ते घेते आहे.
काळोख दाट झाल्यावर निद्रिस्त झालेल्या जगाला रामाणींनी 'निद्रेच्या थडग्यात निजलेले जीव' अशी एक भयावह प्रतिमा वापरली आहे, जी मृत्यूसूचक आहे. आणि थडगी असलेल्या या स्मशानांत प्रेतांना उबवीत बसलेला आत्मा अशीही त्यापुढची भेसूर जाणीव आहे. मृत्यू या अंतिम सत्याचा सहज स्वीकार इथे केला आहे. एकप्रकारचा कमाल उपरोध या प्रतिमांमधून सूचित करायचा आहे. लौकिकाच्या माया मोहामधे अडकलेल्या या दुनियेसाठी कवी 'मोहाचे घट फोडिले कितीक हे' असे म्हणतो व इथेच जगण्यातल्या वैय्यर्थतेचे आकलन त्याला होते आहे. निरर्थकाची जाणीव होते आहे.
असे असले तरी हृदयीची गाढ जीवननिष्ठा या कुरुपाच्या जाणीवेतून कवीला वेगाने बाहेर काढते. दृष्टीला न दिसणारे अतुलनीय असे काही त्याच्या दृष्टीसमोर तरळू लागते आणि शेवटच्या दोन ओळींत हे भयाण अंधारचित्र एकदम बदलते; जेव्हा 'मेंदीहून सुरक्त नाजूक असा हात' हाती येतो! पण अर्थात हे कळते न् कळते तोच लगेचच अजून एक वेगळी कलाटणी अशी मिळते की, खरी मृत्यूची दुनिया ती वर वर्णन केलेली नसून,मेंदीहून सुरक्त असणारी आरक्त मोहदुनिया हीच खरी मृत्यूदुनिया असल्याची जाणीव कवीला होते! आधी कळलेली जीवनाची वैय्यर्थता व नंतर त्याचाही झालेला कळस तसेच आधीच्या भेसूरचित्राचे बदललेले रम्य रुपडे हे अजूनच भयाण असल्याचे आकळणे हे सारे भारदस्त अशा शार्दूलविक्रीडीत वृत्तामुळे अधिक परिणामकारकपणे मनाला भिडते. या वृत्ताच्या विशिष्ट चालीत ही कविता म्हणताना आशयाचे विविध पदर चांगल्याप्रकारे उलगडत जातात हे आवर्जून अनुभवायला हवे. रामाणींनी या कवितेप्रमाणेच मालिनी,मंदाक्रांता,शिखरिणी, भुजंगप्रयात अशाही काही वृत्तांमधे तंत्रशुद्ध व आशयगर्भ रचना केलेल्या दिसतात. ते त्यांच्या कवितेचे तत्कालिन काव्यप्रवाहातले श्रेष्ठ प्रातिनिधीक मूल्यच आहे.
या कवितेला एक रोचक पार्श्वभूमी आहे. रामाणींचं फुटबाॅलच्या खेळावर अतिशय प्रेम.१९६० ची गोष्ट. "गोव्यातील पोलीस ग्राउंडवर फुटबाॅलचा सामना बघत होतो. आणि सामना बघताना अचानक मला कविता आली.. मग मॅच बघायचे सोडून ग्राउंड ओलांडून जवळच्या हाॅटेलमधे आलो. एका पेन्सिलीने सिगारेटच्या पाकिटावर भराभर कविता उतरवली, 'अंधारात विराट विश्व विरते नि:स्तब्धता लेवुनी'.. या कवितेपासून माझ्या कवितेचे रुप बदलले. मला स्वत:चा सूर सापडला. माझी अस्सल कविता मला तेव्हा सापडली" असं रामाणींनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. नंतर ही कविता श्री.पु.भागवतांच्या साक्षेपी संपादकीय नजरेतून चोख ठरुन पहिल्यांदा 'सत्यकथे'त प्रसिद्ध झाली. पुढे श्रीपुंच्या 'मौजे'नेच ही कविता असलेला 'आभाळवाटा'हा संग्रह प्रकाशित केला आणि तिथूनच रामाणींची कविता 'पालाण', 'दर्पणीचे दीप', 'गर्भागार' अशा क्रमाने स्वत:चा ठसा उमटवत उत्तरोत्तर लक्षणीय ठरत गेली. या पार्श्वभूमीचा कवितेच्या आशयाशी थेट कार्यकारणभाव लावता येत नाही. केवळ गूढाच्या निर्मितीचे गूढ म्हणून ही आठवण जागवणे आनंददायी वाटले,एवढेच.
रामाणींना असणारं गूढाचं वेड या कवितेतून पहिल्यांदा समोर आलं. अज्ञाताचं आकर्षण व त्याच्यावरची श्रद्धा, सखोल जीवनचिंतन आणि जगण्याच्या सकारांनी तमाचा तळ शोधण्याची आस हे सारं निष्ठेने जपणा-या त्यांच्या प्रतिभाधर्माचे रम्य दर्शनच ही कविता घडवते.