Part 24

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.२४


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

पेणे

====

-- डाॅ. अनुजा जोशी

'दर्पणीचे दीप' या शंकर रामाणी यांच्या कवितासंग्रहामधील 'पेणे'नावाच्या एका कवितेत 'पालखीचे पेणे करणं' ही देवळांच्या जत्रोत्सवांमधील पद्धत एका वेगळ्या आशय-संदर्भात येते.

इथे-तिथे ओला

हिरवा आरंभ

दिठीलाही कोंभ

फुटू आले

व्यथेची आगळी

आषाढ-लक्षणे

पालखीचे पेणे

घाईघाई

अशी ती दोनच कडव्यांची- अल्पाक्षरी कविता आहे. जत्रेमधे किंवा देवांच्या उत्सवांमधे प्रदक्षिणेत, मिरवणुकीत एकाच्या खांद्याला पालखी जड झाल्यावर किंवा उभे राहून आरत्या,पदं म्हणायची असतील तर पालखी एका लाकडी दंडावर टेकवून उभी केली जाते. किंवा मानकरी आळीपाळीने पालखी नुसतीच दुस-याकडे देऊन 'खांदेपालट' करतात, याला कोकणीत पालखीचे 'पेणे करणं' म्हणतात. पण कवितेतल्या पेण्यांना वेगळा संदर्भ आहे.'पेणे' या कवितेत कवी त्याच्या खांद्यावरच्या काव्यपालखीचे किंवा खांद्यावरच्या व्यथेच्या पालखीचे 'पेणे' करतो आहे.


ओला हिरवा आरंभ आहे. पहिल्या पावसातल्या दिठीलाच जणू कोंभ फुटू आलेत व दृष्टीच हिरवीगार झालीय असं वाटावं अशी गच्च हिरवाई सभोवती आहे. या गच्च हिरवेपणात आपली वैराण ग्रीष्मव्यथाही हिरवीगार झालेली कवीला जाणवते व वैराणव्यथेत 'आगळी वेगळी - हिरवी आषाढ-लक्षणे' दिसू लागतात.


ही व्यथा आजवर कवीने त्रासत,वैतागत सोसलेली नाही, तर ती त्याने पालखीसारखी, सात्विकभावाने व समरसून वाहून नेली/ आणली आहे किंवा व्यथेची पालखी आनंदाने इथवर आणली आहे. आता तिचा, रखरख व्यथेचा खांदा फक्त कवी बदलणार आहे. आणि तिचे पेणे करुन तिला तो ओल्या हिरव्या ऋजू खांद्यावरुन आता वाहून नेणार आहे.


पालखीचा खांदेपालट बरेचदा असा जलद "घाई-घाई" च केला जातो. एखाद्या देवळाचा उत्सव- पालखी- गर्दी-झांजा ढोलांचा आवाज - अवसर-भार आलेले-फुलांचा उदवातींचा धुपाचा वास- आणि त्यात भोई "घाई - घाई" करत खांदेपालट करत पालखी पुढे नेतात. प्रदक्षिणा घालतात.


अजून एक आशय छटा जाणवते. पाऊस येतो तो अशीच प्रचंड 'घाई घाई' नि गडबड उडवून देतो ... सांसारिक व्यावहारिक प्रतिकूलता असणा-या कवीची व्यथाही आता वेगळी आषाढलक्षणे दाखवणार आहे. कारण आता 'पाऊस आलाय' व त्याच्या नव्या अडचणी सुरु होणार आहेत. उन्हाळ्यातली कामं हा एक भयंकर त्रासदायक प्रकार कोकण किनारपट्टीवर असतोच,पण पावसाच्या कामांचा 'ओला त्रास' हा त्याहीपेक्षा भयानक असतो. 'व्यथेची वेगळी आषाढलक्षणे ' ती हीच असावीत असे म्हणायलाही पुरेसा वाव आहे. उन्हाची रखरख आणि पावसाची झोड दोन्हींमधली कामं जगण्याच्या संघर्षाची व तापदायकच!


पण आता या सर्वांवर मात करत कवी व कविता हे व्यथापालखीचे दोघे भोई आपले खांदेच बदलण्याचा एक वेगळाच खांदेपालट करुन टाकणार असावेत. ग्रीष्माचा रुखा सुका खांदा व आषाढाचा ओला हिरवा खांदा असे 'पेणे' करत संघर्षमय जगण्याची ही पालखी पुढे वाहून नेणार असावेत.

गोव्यातली मोठमोठी मंदिरं, संस्थानं व घुमट्यांभोवती सतत श्रद्धापूर्वक वावरणारी लोकसंस्कृती व तिचे भक्तीमय संस्कार रामाणींच्या कवितेत असे ठळकपणे दिसून येतात. अंधारमयी व्यथामार्गाने पण अखेर जीवननिष्ठेचाच दिवा हाती धरुन रामाणींच्या कवितेने दु:खाला असे पालाण घातलेले दिसते.