Part 5

सदर (गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.५


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

हिरवे हिरवे मळे मनाचे

===============

-- अनुजा जोशी

श्रावणातली पाचूगर्द हिरवळ व कंच ओलेती हिरवाई अंगभर माळून हिरव्यागार झालेल्या मनाचे हे मळे आहेत. शंकर रामाणी यांच्या 'आभाळवाटा'या काव्यसंग्रहातली 'हिरवे हिरवे मळे मनाचे' ही कविता म्हणजे श्रावणातल्या रुजल्या सजल्या मनाचा 'पाचूउत्सव'च आहे.

हिरवे हिरवे मळे मनाचे; हिरवा पक्षी उडे

हिरवे हिरवे नेसुन काही नजर नभाला भिडे

तंद्रीतच परि लयीत झुलतो अवकाशाचा झुला

दिशादिशांतुन गळे जुईचा गीतगंध कोवळा

हिरवळलेली शेज; मदालस स्पर्शसुखाचा सडा

भोवळलेले गात्र गात्र अन् मुखात श्रावणविडा

हिरवे हिरवे मळे मनाचे; हिरवा पक्षी दडे

पैलथडीच्या पल्याड कोठे प्राणांचे चौघडे

असं हे हिरवं श्रावणसूक्त आहे. मनाच्या हिरव्या मळ्यांतून आसेचा हिरवा पक्षी भरारला आहे. त्या पक्षाचा नजरेने पाठलाग करावा तर नजरच हिरवे हिरवे काही नेसून नभाला भिडल्यागत जाणवते आहे. वा-यावर विहरणारा हा नजरेचा हिरवा पदर बघताना अर्थातच मळ्यांपासून आभाळापर्यंत एकसंध हिरवाईच व्यापून राहिली आहे असा भास कवीमनाला होतो आहे. याच हिरव्या तंद्रीत मोकळ्या अवकाशाचा झुला झुलतो व ओल्या दिशांतुन जाई जुईच्या ओठातल्या गाण्याचा परमळ गळू लागतो अशी ही श्रावणधुंदी आहे. पण या धुंदफुंद हिरवाईची नशा तर अजून पुढेच आहे.


रामाणींनी अन्य काही कवितांमधूनही हिरवाईचा असा देखणा सोहळा रंगवला आहे. तो पाहताना 'समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पांचवा महिना' ही बाकीबाब बोरकरांची तिरंगी आशयाची एक गंमतही इथे आठवते. कोकणीत हिरव्या रंगाला 'पांचवा'(पाचूसारखा) रंग म्हणतात. शिवाय श्रावण हा मराठी ५ वा महिना व तो सृष्टीच्या गर्भावस्थेचाही जणू ५ वा व 'पांचवा' महिना असल्याचं बोरकर म्हणतात.


रामाणींचा हा पाचूरंग अजूनच वेगळा व हळवा आहे. त्यांनी पोळल्या पथांना फुटावी हळवी 'श्रावणपांच' या नवीन कल्पनेतून पोळलेल्या पावलांसाठी 'पांचवीचार' श्रावणकळा मागितली आहे. श्रावणाच्या ऊनपावसात चमचमणारी पाचूसारखी हिरवाई 'श्रावणपांच' या शब्दामधून हुबेहूब चित्रीत झाली आहे. तसेच अजून एक वेगळा अलोकिक विभ्रम म्हणून, एक गूढरम्य 'पाचवी दृष्टी' ही रामाणींनी दिली आहे. 'गर्भागार' संग्रहातल्या एका कवितेत, वेगळ्या संदर्भात ती येते. त्या कवितेच्या शेवटी 'कुठे तू! जडे पाचवी पूर्णदृष्टी मला अर्थसंपन्न हे सोहळे' असा, पाचूची म्हणून 'पाचवी' हा नवा (मराठी) शब्दप्रयोग येतो. पण अर्थात शब्दगंध मात्र ('पांचवी' या कोकणी शब्दाचा) प्रादेशिकच येत राहतो. लौकिक चौफेर दृष्टीच्या पुढे जात अजून एक ५ वी, पाचूगर्द व पूर्णदृष्टी नजरेला जडल्याचे व त्या 'पाचव्या' दृष्टीने एका अलौकिकाच्या दर्शनाचा भास होण्याचे अर्थसंपन्न सोहळे रामाणींनी त्या कवितेत रंगवले आहेत.

अशा गच्च श्रावण हिरवाईच्या मागे भरगच्च उभी असलेली कवितेतली ही 'श्रावणपांच' हिरव्या मळ्यांमधे आता एक रम्य प्रणयचित्र अनुभवते. हिरवळीच्या शेजेवर प्रियेच्या- मदालसेच्या स्पर्शसुखाचा जणू सडाच पसरल्यागत भासू लागतो. थरथरत्या अधीर गात्रांना हिरवाईचीच भोवळ व त्यांच्या मुखात चक्क 'श्रावणविडा' रंगतो आहे! श्रावणाला रंगरूप,गंध,स्पर्श अशा संवेदनांनी अनुभवल्यानंतर 'श्रावणविड्या'च्या रुपात आता त्याचा श्रुंगाररसही प्राशन केल्याचं व अर्थातच पैलथडीच्याही पल्याड, मीलन झालेल्या प्राणांचे चौघडे वाजू लागल्याचं ऐकू येतं. शब्द स्पर्श रुप रस गंध अशा पंचेंद्रिय संवेदनांनी श्रावणाची ही 'संवेदनपंचमी' साजरी होत असतानाच स्वप्नांचा हिरवा पक्षी उरात पुन्हा दडून बसतो व हिरव्या मनाच्या मळ्यात श्रावणगीत बागडू लागतं.