Part 22

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.२२


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

चमचाभर जिणे जगताना

================

-- डाॅ. अनुजा जोशी

वास्तवाचे नेमके वर्णन करणा-या व पंचसंवेदनांनी समृद्ध असणा-या शंकर रामाणी यांच्या अनोख्या प्रतिमाविश्वाचे दर्शन घडवणारी 'गर्भागार' या संग्रहातील ही कविता. 'गर्भागार' मधील अनेक कविता वास्तवाचे व जीवन संघर्षाचे नेमके वर्णन करत प्रगल्भ जीवनदृष्टी देतात. ही कविताही तशीच नेमके व सचित्र बोलते.

वास उडून गेलेले चमचाभर जिणे :

तुझ्या माझ्या

खोलीभर खंबीर संसाराच्या

घरकुलातला कडवट, घुस्मटगार

अनाथ अंधार, घायाळलेल्या एकाकी

पाखरासारखा निपचित.

आगेमागे

उद्दाम इमारतींच्या अनपढ सावल्या

घरट्याच्या सर्वस्वावर सर्वदूर

कोसळलेल्या.

तुझे माझे

टीचभर अस्तित्वही झाकोळलेले.

मात्र

अपंगाला लाडकी लेक

तशी उत्तरेला एक थोटी खिडकी

आणि तिथूनच दूरात झिळमिळणारा

धुतल्या

आभाळाचा एक पांढराफेक तुकडा

वास उडून गेलेले

चमचाभर जिणे जगताना...

हे कवीचे अगदी सामान्य, एका खोलीपुरते- म्हणून 'चमचाभर जिणे' आहे. आणि अफाट जीवनातला हा आपल्या वाट्याला आलेला चमचाभर तुकडा बेचव नि बिनवासाचा झाला आहे असे कवी सांगतो आहे. एका लहानशा अंधा-या कुबट खोलीतला हा तोडका मोडका संसार. जिवाची घुसमट करणारा. कटू अनुभवच पदरी बांधून देणारा आहे. खोलीतल्या अंधाराला घुस्मटगार, अनाथ, घायाळलेल्या पाखरासारखा निपचित अशी विशेषणे लावून प्रतिकूलतेची व असहाय्यतेची तीव्रताच कवीने अधोरेखित केली आहे. पण असे असले तरी खंबीरपणे दोघे हा संसार करताहेत. या घायाळ घरट्याच्या आसपास आगेमागे उद्दाम इमारतींच्या अनपढ सावल्यांची गर्दी आहे. उंच इमारतींच्या वळचणीला वसलेल्या एखाद्या गल्लीत,एखाद्या चाळीत हे बि-हाड-बाजले मांडलेले असावे. इमारतींच्या म्हणजेच सुखवस्तू जगण्याच्या सावल्या घरट्यावर कोसळल्याचाच भास होतो आहे व या वीतभर खोलीत दोघांचे टीचभर अस्तित्वही झाकोळून गेले आहे. परिस्थितीचा काळोख इथे पहिल्या ओळीपासून असा क्रमाक्रमाने दाट होत गेला आहे.

मात्र या परिस्थितीवर मात करण्याचे धैर्य आतून मिळते ती एक साधीशी गोष्ट आहे, वेगळ्या नजरेने बघितलेली! 'अपंगाला लाडकी लेक तशी उत्तरेला एक थोटी खिडकी' असे तंतोतंत प्रतिमाउपयोजन रामाणी इथे करतात. अपंगाला मूल हाच एकमेव आधार व त्यातही ती मुलगी. म्हणजे जरा जास्तच लाडकी. त्याचप्रमाणे कवीच्या काळोखाच्या खोलीला कुठूनतरी एक उजेडाचा संदर्भ मिळतो आहे. खोलीतल्या अंधा- या जिण्याच्या असंख्य प्रश्नांचे उत्तर म्हणून उत्तरेला असणारी ही थोटी किंवा छोटी खिडकी प्रकाशाचा एक तुकडा दाखवते आणि चित्र एकदम बदलून जातं. त्या खिडकीतून 'दूरात झिरमिळणारा धुतल्या आभाळाचा एक पांढराफेक तुकडा' नजरेत भरतो आणि कवी सुखावतो. चमचाभर जिण्यातल्या घोर अंधारात धुतल्या तांदुळासारख्या स्वच्छ आभाळाचा तुकडा दिसण्याने कवी आश्वस्त होतो. इथे चमचाभर जिणे, धुतल्या आभाळाचा पांढराफेक तुकडा या रससंवेदनात्मक परिणाम करणा-या प्रतिमा वेगळ्या परिमाणांच्या रुपात व वेगळ्या पद्धतीने इथे आल्या आहेत. जिणे चमचाभरच आहे, पण अखेरीस ते चवीने सेवन करायचे आहे असा निश्चय होतो आहे. व्यक्तीगत आयुष्यातील या अडीअडचणींबद्दल कवितेतून बोलता बोलता ही कविता असे जीवन जगणा-या असंख्यांची होऊन जाते, हे तिचे समष्टी सामावून घेणारे कालातीत मूल्य!


आपले भोग अापणच भोगायचे, भोगून पार झाले की 'दूरात झिरमिळणा-या उजेडाच्या तुकड्या'सारखं काहीतरी पदरी पडेल अशी निर्मळ आशा कवी करतो व ते तसं होतंही. संसारातला घनतिमीर पार करताना कवीची ही संवेदनशीलताच त्याला सृजनशील बनवते व सामान्य आयुष्याचं 'चमचाभर' एवढं काढलेलं सारसत्व 'चविष्ट'होऊन जातं.