Part 25

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र. २५


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

वारा आणि आजी

============

-- डाॅ. अनुजा जोशी

प्रतिमा, प्रतिकं व रुपकांचा देखणा आविष्कार घडविणा-या शंकर रामाणी यांच्या कवितेत ऋतु,ऋतुचक्रे व निसर्ग यांची तंतोतंत वर्णने येतात, जी मनाच्या भावस्थितींचे तरल चित्रण करतात. 'वारा आणि आजी' ही 'गर्भागार' या संग्रहातील कविता नवे प्रतिमांकित शब्दप्रयोग, उपमारुपी विशेषणे व उत्कट जाणिवांमधून उतरलेले असे एक

'भावनिसर्गचित्र'च आहे.

पिकून जर्द पिवळ्या

झालेल्या पानासारखी माझी

दीर्घायुषी आजी:

आठवली कालच अकस्मात तिच्या

प्रौढ आयुष्यातला कालकूटसा काळाकुट्ट

काळ अस्वस्थ अशांततेत पुढे

सरकत गेलेला....

मी एक

कुक्कुलं बाळ होतो तेव्हा.

आजी सांगायची :

माझ्या लहानपणी वारा

पिसाळलेल्या कोल्ह्यागत कधी कधी

परसदारी सुलतानसा अचानक

प्रगट होऊन रबरी चेंडू फेकल्यासारखा

झाडे-झुडुपे मुळासकट उपटून

आपटायचा

वारा:

वांड; जातीचाय मुर्दाड;

सहाही ऋतूचे नेम-नियम

त्याला कधी पटले वा

रुचले नाहीत.

भर हिवाळ्यात :

नुकत्या नुकत्या मोहर फुटलेल्या

आंब्याकाजूंना

तो कुस्करून, पिंजून काढायचा...

भर दिवसा :

काळ्या घनघोर मेघांना अवकाशात.

डिवचून

अख्ख्या पृथ्वीवर प्रलयाचे थैमान

मांडायचा....

'महापुरे झाडे जाती....

अशी सर्वाचीच भयाण भिगुळ स्थिती !

किती काळ !

सूर्यप्रकाशाचा कणदेखील कुणी कधी

तेव्हा पाहिला नसेल.

पाखरांची किंचीत किलबिलही नसलेल्या

त्या पूर्णपणे नष्ट,निष्प्राण झालेल्या

तैमूर-लंगड्या युगात...

आजीने

आम्हां धिटुकल्यांना दिलेल्या ओल्याचिप्प

गोधड्या गच्च पांघरुन

अनामिक भीतीने आम्ही मुले एकमेकांना

खेटूनच झोपायचो.

एके दिवशी

आजीने आम्हाला ऐकवलं :

वारा

मुरलीधरसा शीळ घालीत

बासरी घुमविल्यागत अवखळ

हिंडू-फिरू लागला सर्वत्र...

जिथे-तिथे

अपाप हिरवे हिरवेगार झाले

आसमंत :

मोराला निळाभोर पिसारा फुटल्यासारखे.

सहाही ऋतू सुस्नात सुगंधित...

नुकतीच मनसुख न्हाऊन बाहेर आलेली

नवोढा जणू !

केवळ वाऱ्यानेच ही जादू

किमया केली असे

आजी म्हणाली...

मी अजाण!

मला तर काही केल्या काही आठवत

नाहीय.

केवळ पुसट आठवतात ते

आजीने नकळत

आभाळाकडे पहात जोडलेले हात...

'पिकून जर्द पिवळ्या झालेल्या पानासारखी माझी दीर्घायुषी आजी' असं आजीचं वर्णन करुन कवितागत लहान मुलगा तिची आठवण सांगतो आहे. पिकल्या पानाचं हे जर्द पिवळेपण कवीला पहिल्यांदा लक्षात आणून द्यायचं आहे. आजीला अशा पानासारखी म्हणताना आयुष्याचा दीर्घकाळ तिने झेललेले सोसलेले ऋतू व थंडी ऊन वा-या-पावसाशी दिलेली टक्कर कवीला आठवते आहे. आजी तिच्या आयुष्यातला 'कालकूटसा काळाकुट्ट काळ' पार करुन येते व आयुष्यभरच भणाणता वारा कसा परतवते याची कवीच्या कुक्कुलपणातली ही आठवण आहे.


आजी पहिल्यांदा आठवण काढते ती पिसाळल्या कोल्हयासारख्या वांड मुर्दाड वा-याची. तो वारा दारी अचानक सुलतानासारखा प्रगटायचा आणि झाडापेडांना रबरी चेंडूसारखा आपटून फेकायचा. ऋतूंचे नियम झुगारुन द्यायचा. लगडत्या आंब्याकाजूंना कुस्करायचा. वेगवेगळ्या नव्या प्रतिमा व उपमा इतक्या नेमकेपणाने येतात की ती भयभीत, 'भयाण भिंगुळ स्थिती' डोळ्यासमोर जिवंत होत जाते. कच्च्या बच्च्या नातवंडांना आजी गोधड्या पांघरुन निजवते. बिकट परिस्थितीने ओल्याचिप्प झालेल्या गोधड्यांमधे लेकरं भितीने एकमेकांना खेटून झोपतात नि आजी जणू फाटल्या आभाळालाच ठिगळं लावत राहते. या जुनाट बिकट व असहाय्य अशा भयाण काळाचं वर्णन करण्यासाठी रामाणींनी 'तैमूर लंगड्या युगात'ही एक वेगळीच मिथकाचा संदर्भ असलेली प्रतिमा वापरली आहे. कवितेतली ही सशक्त सौंदर्यस्थळे बघत कविता अनुभवायला हवी.


हा भयाणाचा वारा टोलवणारी आजी एकदिवशी त्याचं दुसरं रुपही मुलांना ऐकवते. रौद्राचं थैमान घालणारा वारा अचानक एके दिवशी मुरलीधरासारखा शीळ घालत,बासरी घुमवत मजेत इकडे तिकडे फिरु लागल्याचं सांगते. आसमंत मोरपिसा-यागत फुललेला आणि मनभर न्हालेल्या नवयुवतीसारखा सुस्नात सुगंधित झाल्याचं आजी सांगते. भयाण चित्र पालटून जाण्याची किमयाही या वा-यानेच केलीय असं आजीने म्हटल्याचं कवीला आठवतं व आठवतात ते आजीचे आभाळाकडे बघत जोडलेले हात! कवीला नेणतेपणी त्याचा अर्थ कळत नाही ,पण आता त्याच्या जाणिवांमधे तो अदृष्टाचा वारा अवतरतो. तो केवळ वारा नसून ती अटळ अशी कालगती असल्याचं जाणवतं. कविताभर आलेला वारा त्या कालगतीचे रुपक बनतो. आणि त्याची बरी-वाईट आवर्तने धीटपणे पेलणारी आजी, सुखदु:खाचे जीवनचक्र फिरवणा-या त्या अगाध कालगतीला- अथांगाला- आभाळाला हात जोडते!