Part 14

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१४


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

कविता: केळपानाच्या

==============

-- अनुजा जोशी

काळोखात, व्यथा-वेदनेत व संघर्षाच्या वा-यावादळाशी सतत टक्कर देत राहिलेली रामाणींची कविता निरागस प्रेमाचं एक हळवं 'केळपान'ही असोशीने आपल्या हृदयात जपते. मनाच्या तरलतेच्या दर्पणामधे हे भावकोमल पान डोकावून पाहू लागते तेव्हा कवीला त्याच्या सखीबरोबरच्या नात्याचे गुपित उलगडते! खडतर दैवगतीचे खेळ सतत सोसणा-या कवीच्या आयुष्याला गोड कलाटणी देणारं हे सुरेख 'केळपान' आहे.

१.

माझे-तुझे नाते

केळपान

न्हातेधुते..

२.

केळपानावर

ओली

पौष उन्हाची तिरीप

तशी

येतेस समीप

३.

खुळ-

- खुळा चैत्रवारा :

केळपानात कापरा...

तुझा

गरतीचा ऊर

घरघाईने घाबरा

४.

बोलू नका,

सांगू नका

कसे

एवढ्यात आले

कुण्या नवेलीला न्हाण...

किती हिर्वे केळपान!

शंकर रामाणी यांच्या 'दर्पणीचे दीप' या कवितासंग्रहातील 'कविता:केळपानाच्या' अशा शीर्षकाची, चार तुकड्यांमधे लिहीलेली ही कविता तरलतेचा एक सुंदर नमुना आहे.


या कवितेवर बोलायचं म्हणजे एक हिरवं ओलं तजेलदार केळीचं झाड नजरेसमोर आणायचं. खरं तर केळीला 'केळीचं झाड' असं म्हणणंसुद्धा फार रुक्ष.रोखठोक.गंभीर. तिच्या हळवेपणाला न मानवणारं! म्हणून वा-यावर मान डोलावणारी, आपल्याच नादात मुरकत असणारी एक लडिवाळ पोपटहिरवी केळ नजरेसमोर आणायची! असं म्हणुया. या केळीचं अंग पाण्याने भिजलंय. पान न् पान् कंच ओलं होऊन निथळतंय. केळ जणू काही कुणाच्या तरी (किंवा इथे कवीच्याच) प्रांजळ भावनेत भिजलीय. स्वच्छ पारदर्शी नितळ मनांचं, हे कवीचं न् त्याच्या सखीचं 'न्हातं धुतं नातं' आहे. कोवळी वयं, कोवळी उत्सुकता या केळपानात आहे. साध्या वा-याच्या झुळुकीने तुरुतुरु फाटणारा आतर-कातर भाव आहे. काळजाची धडधड-धास्ती आहे. काहूर आहे. पौषपिवळ्या उन्हाची कोवळी तिरीप पानावर पडावी तसं सखीचं समीप येणं आहे. घट्ट मिठीच्या आधीचा आवेग थोपवून धरलेली ही गोड हुरहूर आहे!


'खुळ - खुळा चैत्रवारा' हे कवीच्या अवखळपणाचं भांबावलेपणाचं प्रतिमेने काढलेलं चित्र! काही निरागस अबोध पा-यासारखं हाती लागतंय याची जाणीव होऊन जीव खुळावतो किंवा खुळखुळा झाल्यागत नादावतो व तो रंगबिरंगा 'खुळ- खुळा चैत्रवारा' केळपानात शिरतो आहे. पाण्यात हळुवार पाऊल टाकावं तशी ही कविता मनात शिरते. पहिल्या तुकड्यात काहीतरी घडत असल्याची नुसती जाणीव करुन देते, दुस-यात विरघळणा-या मनांच्या समीप घेऊन जाते. तिस-यात गाढ असोशी व धास्तीही दिसते व शेवटी प्रेमाची खूण मनाला पटते. सारं काही पाकळी उलगडावी इतक्या हळुवारपणे व न कळता जसं घडतं तसं कविता सांगते. कवी अल्लड आहे व सखी त्याच्यापेक्षा थोडी गरती- समंजस-प्रौढ आहे. घरी जायची घाई घाई करणा-या तिला हे 'असे' काहीतरी होण्याची भिती वाटते आहे. सखीच्या उरातली ती धडधडही जशीच्या तशी कवितेत उतरली आहे.


बोलू नका ,सांगू नका. काहीतरी घडलं आहे. गुपित कळलं तर आहे आणि काही कळलं असं वाटतंही नाहीए. पण काहीतरी नवं न् गोड घडलं आहे एवढं नक्की. 'न्हाणुल्या' वयातली ही कोवळीक व मनात निरागस फुलणारी प्रेमभावना आजवर कैरी, चिंचा, जांभुळ,कमळं अशा अनेक प्रतिमा-रुपकांमधून अनेक कथा कविता चित्रपटांमधून लिहीली व दाखवली गेलीय. त्याच तरल कोवळ्या बागेत लपत छपत एकमेकाला गाठणारी रामाणींची ही अल्लड जोडगोळी- ओल्या किरणांत, न्हात्याधुत्या प्रेमात बिचकणारी नाजूकशी केळ नि तिचं लोभस भाबडं 'केळपान!'