Part 1

सदर (गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१


अलक्ष लागले दिवे - अनुजा जोशी

गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने या सदरात दरवेळी त्यांची एक कविता व तिचे समीक्षण- आस्वादन अशा स्वरुपात आपण शंकर रामाणी यांचा 'काव्यजागर' सुरु करत आहोत.

कातरवेळ,आभाळवाटा,पालाण,दर्पणीचे दीप व गर्भागार हे त्यांचे पाच मराठी कवितासंग्रह. त्यापैकी 'आभाळवाटा' या संग्रहातील 'अलक्ष लागले दिवे' ही रामाणींच्या शैलीची ओळख सांगणारी एक महत्वाची कविता.

कुशीत दु:ख झोपले पिकून झोंबली निशा

विवस्त्र सावल्यांसवे नसांत वाहते नशा


अवेळ हुंगते कुणी मनात गंध माळुनी

धुक्यात वाट धुंडिते घरात वात लावुनी


तमात जीव गुंफिता सुदूर विश्व जागले

तुला न पाहिले; उरी तुझी प्रकाशपाऊले


नशेत स्वप्न वाहते: उडून भागले थवे...

व्यथालयांत माझिया अलक्ष लागले दिवे

घोर निबीड अंध:कार व तो कापत जाणारे प्रकाशमान दिवे ही संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिमांकित होऊन रामाणींच्या समग्र कवितेत अनेकदा येते. याच कल्पनेचे अजून एक तेजस्वी वलय 'अलक्ष लागले दिवे' या कवितेत दिसते. एका सखोल चिंतनाच्या क्षणी 'अलक्ष' दिवे लागल्याचा हा उद्गार आहे. या कवितेत जी एक विलक्षण आत्मानुभूती आहे तशाप्रकारच्या आध्यात्मिक जाणिवा हे रामाणींच्या कवितेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.


एक निरंतर व्यथा-वेदना सोसणारं मन हे जणू 'व्यथालय' - व्यथेचं घरच झाल्याचं जाणवतं आहे. जिथे दु:ख कवीच्या कुशीत झोपलं आहे! प्रतिकूलतेच्या काळोखात,जीव आकांताने दु:खाशी झोंबी घेतो आहे, झगडतो आहे. रात्र पिकून काळी दाट झाली आहे. गर्द झाली आहे आणि काळोखाच्या विवस्त्र सावल्यांची नशाच जणू नसानसात भिनली आहे. अशा बिकट अवस्थेत मनोमन गंधभारित झालेले कुणीतरी, ही 'अवेळा'ची वेळ हुंगून घेते, वाट शोधत येते व व्यथेच्या घरातल्या दाट काळोखात वात लावून जाते!


कुणीतरी येतं. जे दिसत नाही. पण ते काळोखात दिवा लावून जातं. कुणाची तरी प्रकाशपावलं उरी उजळल्यासारखी वाटतात. धुक्याची धूसर वाट, स्वप्नांचा अवघड घाट, या वाटेवरचे उडून भागलेले प्रयत्नांचे थवे व व्यथेचा गाढ तिमीर त्या अनामिक तेजाने उजळला आहे असं वाटतं. हा कसला प्रकाश आहे? त्याचा स्रोत कोणता? इथे सोहिरोबानाथांचा 'अंतरीचा ज्ञानदिवा' आठवतो! तेज तेच ; ज्ञानदिव्याचं, भक्तीदिव्याचं, पण इथे रामाणींचे दिवे 'अलक्ष' आणि तेही त्यांच्या 'व्यथालयात' लागलेले! हे अंतरीचे 'अलक्ष' भक्तीदिवे अाहेत.


'अलक्ष' हा शब्द ज्ञानेश्वरी व इतर संतसाहित्याच्या प्रभावातून अाला आहे. ('अलख निरंजन' मधला 'अलख' म्हणजेही 'अलक्ष'च) सश्रद्धतेचे व गाढ जीवननिष्ठांचे रामाणींचे हे 'दिवे'- ज्यांची लक्ष वगैरे मोजमापामधे गणती होऊ शकत नाही- असे अमोज असंख्य - अ लक्ष लागले दिवे! --- असं व्यथेच्या काळोखाच्या आरपार होणारं भरभरुन तेजाळलेलं हे संवेदन!

येतूला ना तेतुला ।

आयता ना रचिला ।

बोलता ना उगला ।

अलक्षपणे ।। १३।।११११

ज्ञानेश्वरीत 'अलक्ष' हा शब्द असा आला आहे. हे आत्म्याचे वर्णन आहे. आत्मा हा निर्विषय आहे आणि त्यामुळे तो एवढा नाही की तेवढा नाही. (एतुला - तेतुला) स्वयंभू नाही की कृत्रिम नाही. (आयता ना रचिला) बोलणारा नाही की मूक नाही (उगला- उगी- निमूटलेला) तो जसाच्या तसाच असतो. अविकृत असतो. अप्रत्यक्ष,अदृश्य असेही या 'अलक्ष'चे अर्थ आहेत. रामाणींचे 'अलक्ष' दिवे हे असे अदृष्टाचे, अदृष्यात लागलेलेही आहेत. अशा अनेक अर्थछटा रामाणींच्या 'अलक्ष'या शब्दयोजनेत दिसतात. 'झाड अलक्ष कळांचे माथा माळिते गगन', 'आभाळ आपल्या अलक्ष हातांनी तिला (आईला- मृत्यूनंतर) वेंगून राहिले होते' असा अन्यत्रही वेगवेगळ्या संदर्भात 'अलक्ष' हा शब्द कवितांमधून आला आहे.


व्यथा सोसण्याचं आंतरिक बळ वाढविण्याचे हे निरनिराळे मार्ग कवीमन शोधून काढतं आहे. आनंदाच्या लहरींचा प्रश्नच नाही, प्रश्न असतो तो दु:खाचा ,व्यथेचाच! दु:ख कसं सोसलंय भोगलंय हे महत्वाचं. पाडगावकरनी म्हटल्याप्रमाणे "कण्हत कण्हत की गाणं म्हणत" हे महत्वाचं. रामाणींच्या कवितेत तर नुसतं गाणं नव्हे, तर दु:खाचा तिमिर पार करायला प्रकाशाचं गाणं येतं. असंख्य- अ लक्ष दिवे प्रकाशाचं संगीत घेऊन येतात व व्यथेचं काळोखं सुन्न मानसघर या 'तेजस' संवेदनेने भरुन भारुन नादावून जातं. तेजाळून उठतं.