Part 6

सदर (गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.६


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

सातजणी

=======

- अनुजा जोशी

शंकर रामाणी यांच्या कवितेला तमाच्या तळाचं आकर्षण तसंच गूढाचं अलोट वेडही! सावळी सांजवेळ,गाढ काळोख,दाट अवस अंधार,निबीड तमाची रात्र असे तिमिरविभ्रमांचे गूढ वेगवेगळ्या तीव्रतेने कवितेत प्रतिमांकित होते. सांजवेळेचं असंच एक रम्य गूढ त्यांच्या 'दर्पणीचे दीप' या कवितासंग्रहातील 'सातजणी' या कवितेत येतं.


सांजघडी सातजणी

पाणियाला गेल्या

सावल्यांत हरवून

वाट विसरल्या

वाट विसरल्या आणि

विसरल्या घाट

सातजणींच्या सावल्या

झाल्या घनदाट.

खोल सावळल्या तरी

सावरल्या काय?

मनमोरांना फुटले

इथे तिथे पाय...


म्हटली तर फार गूढ ,पण गूढाभोवती फिरणा-या धाग्याचं टोक धरुन माग काढत गेलं तर आकलनाच्या नितळ तळाशी पोचता यावं अशी गूढ अनुभूती देणारी ही कविता! यातली 'सातजणी' ही प्रतिमाच गूढ वलये पसरवत शब्दांच्या आडोशाला उभी आहे. 'सातजणी'ला वेगवेगळ्या अर्थछटा आहेत. सांजवेळी अंगाशी दाट होत जाणा-या काळोखात, काळोख्या डोहात विसर्जित झालेले हे सप्तरंग असावेत, जे कवितेच्या शेवटी आकळतात. दिवसाच्या सप्तरंगी जिण्याचं सावळ्या काळ्या अंधारात होत जाणारं विसर्जन व विसर्जनानंतर मनमोरांना फुटणा-या पायांतून सुरु होणारं हे नवसर्जन विलोभनीय आहे.


पण एक गंमत अशी की,जगण्याचे हे रंग इथे नुसते 'ते सातजण' नाहीत, तर ते 'त्या सातजणी' अाहेत!म्हणजे हे अजून काहीतरी वेगळं आहे. कदाचित असंही असू शकतं की, दिवसाच्या ढळण्याबरोबर अटळ काळोख ज्यांनी स्विकारला आहे,अशा त्या 'इच्छा' आहेत. आणि त्याहीपुढे जाऊन असं वाटतं की,सांजवेळी पाणियाला गेलेल्या व परतून काठावर न येता,तिथे डोहातच खोल सावळलेल्या अशा त्या 'अपूर्ण इच्छा'असाव्यात का?


'अपूर्ण इच्छां'च्या पार्श्वभूमीवर इथे लगोलग गोवा व कोकणात सांगितली जाणारी 'साती आसरां'ची लोककथा व 'सातबाया/सात मातृकां'च्या पूजनाची प्रथा आठवते. इंद्राच्या दरबारातल्या सात अप्सरा(साती आसरा) शापामुळे पृथ्वीवर येतात.वनदेवता व जलदेवता बनून वनात,तलावात राहू लागतात. वाटसरुंना आपल्या नृत्य गायनाने आकर्षून खेचून पाण्यात नेऊ लागतात. म्हणून संध्याकाळी पाण्याजवळून जाताना गाण्याचा आवाज आला तर लक्ष द्यायचे नाही असा लोकसमज आहे व त्यांच्या अपूर्ण इच्छांचा त्रास न होता त्या प्रसन्न रहाव्यात म्हणून पूर्वापार त्यांच्या पूजनाची प्रथा आहे.


गोमंतकीय लोकजीवनात आणखी एक 'कुंडे-कुस्कुराची गोष्ट'ही सांगितली जाते.रात्री उठून आंबोळ्या खाणा-या ब्राम्हणाच्या सात मुलींची गोष्ट आहे,तीच ही! गोव्यात त्या गरीब ब्राम्हणाला त्याची बायको(आंबोळ्यांऐवजी) पोळे(घावणे) करुन वाढते. सातही मुली एकेक करुन उठतात नि ब्राम्हणाला पोळे मिळतच नाही,तो उपाशी राहतो. मग रागाने त्या सातहीजणींना तो जंगलात सोडतो. गोष्टीत पुढे मोठ्या सहाजणींच्या नशीबात धनदौलत व धाकटीकडे कणी-कुंडा-कुस्कर असं येतं. धाकटीचं नावच 'कुंडे-कुस्कुर' पडतं.पण पुढे दुर्दैवी कुंडे- कुस्कुरच नशीबवान ठरते अशी ती गोष्ट आहे.

वरील दोन्ही मिथकांच्या सूक्ष्म छटा 'सातजणी' या कवितेत आहेत असं वाटतं. सातजणींनी- अपूर्ण इच्छांनी- दुर्दैवाच्या खोल जळात राहणं म्हणजे शाप भोगणं. अटळाला शरण जाणं. पण कवीच्या इच्छा हा बुडण्याचा शाप नाकारतात. त्याला त्याची 'कविता' ही उ:शापासारखी लाभलेली असल्यामुळे इच्छांचे मनमोर पाय फुटून इथे -तिथे नर्तन करु लागतात!


गूढाचा गुंता असा सुटला म्हणता म्हणता पुन्हा संदिग्धता जाणवते. व गूढ दुर्बोध आहे असं म्हणता म्हणता अॅबस्ट्रॅक्ट चित्रासारखं काही आकळतंय असंही जाणवतं. ग्रेस,दि.पु. चित्रे,आरती प्रभू,सदानंद रेगे यांच्या कवितेलाही हेच गूढाचं वेड आहे. प्रत्येकाच्या गूढाचा पोत वेगवेगळा आहे. रामाणींच्या गूढाचं वैशिष्ट्य हे की,त्याला आध्यात्मिकतेचा स्पर्श आहे. जीवनश्रद्धेचा गंध अाहे. 'सातजणी' या कवितेच्या गूढाला शेवटी असाच सकारांचा सप्तरंगी पिसारा लाभतो. कातरवेळच्या धूसर अंधारात, डोळ्यातल्या 'पाणियाला गेलेल्या' अपूर्ण इच्छा अशा काही हलतात, त्यांच्या आयुष्यावरच्या छाया अशा काही गडद होत जातात, की डोळ्यात एक सावळी आशा तरळते व सफल इच्छांचे मनमोर दारी नाचताहेत असे सुखस्वप्न त्या आपल्या अंधारडोळ्यांनी बघू लागतात.