Page 7

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.७


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

आईचे माहेर

=========

-- अनुजा जोशी

शंकर रामाणी यांच्या तरल भावविश्वाची खूण पटविणारी 'दर्पणीचे दीप' या कवितासंग्रहातील ही कविता. एका लहान मुलाला येणारी ही आजोळच्या वाटेवरची आठवण; जिला अंगाईचा वास आहे. आणि ती आठवण आईचा पान्हा चोरल्याच्या आठवणीत भिजलेली आहे.

आजोळली आठवण

तिला अंगाईचा वास

अर्ध्या झोपेत आईचा

पान्हा चोरल्याचा भास

आई निघाली माहेरा

झुले वर खाली मेणा

भोई धापले घाटीत

वाट उतार घेईना

कोठे भरारले राघू

थोडे थरारले रान

हले भितीने आईच्या

ओले काळजाचे पान

गाव पायथ्याला,आणि

उन्हे पांगली मनात

स्वप्नी भेटल्यासारखे

उभे आजोळ दारात

माहेरले रोमरोम

आई शब्दांच्या पल्याड

तिच्या चंद्रचाहुलीचा

उतू गेला उजवाड

दाट झोपेत आईचा

स्तन शिणलेला ओठी

तिच्या पदराला किती

गूढ भविष्याच्या गाठी ...

आई मेण्यात बसून माहेराला निघाली आहे. सोबत हा बाळही आहे. मेणा वर खाली होतो तसा आईचा जीवही माहेरच्या ओढीने हेलकावतो आहे. वाट बिकट नि चढणीची. मेण्याचे भोई ही चढण चढताना दमतात धापतात तरी मेणा उताराला लागत नाही असं एक सुरेख हेलकावणारं चित्र कवी बालमनात शिरुन रंगवतो आहे.

आजोळच्या वाटेवरच्या या हिंदोळ- आठवणीला 'आजोळली आठवण' म्हणणे ही यातली गोड गंमत आहे. रामाणींनी समग्र कवितेत असे अनेक नवे शब्द, शब्दांची रुपे, वेगळी विशेषणे व प्रतिमांची नवी क्रियापदी रुपे वापरली आहेत. उदा. खोल दु:ख ठिणगावे, पाचोळले पुण्य हुंगिते गाभारा, अवघ्या उदासीचे कोकिळले रान यातील ठिणगावे,पाचोळले,कोकिळले ही प्रतिमांची क्रियापदी रुपे,आशय नेमक्या शब्दांत पुरेपूर सामर्थ्याने व्यक्त करतात. याच कवितेत शेवटी आलेल्या 'माहेरले रोमरोम आई शब्दांच्या पल्याड' या कल्पनेमधे माहेरच्या ओढीने आईचे रोमरोम मोहरुन येण्याला 'माहेरले' रोमरोम असा नवा चपखल व सुरेख शब्दप्रयोग रामाणींनी केला आहे. हे सारे सौंदर्य बारकाईने न्याहाळत कवितागत बालकाची ही आजोळची दुधाळ आठवण आस्वादायला हवी.


मेणा चढण चढतो आहे. माहेर अजून खूप दूर आहे.भोई धपापताहेत. रानातली वाट आहे. सभोवतीच्या रानात मधेच राघू-पाखरं भरारताहेत व त्या भिरभिरीने रान थरथरावं तसं आईच्या काळजाचं ओलं पान मधेच भितीने हलतं अाहे. ही कसली भिती आहे? ही कसली हुरहूर आहे? आईच्या काळजाची ही लकलक कसली? 'चंद्रचाहुलीचा उजवाड उतू जाणारी' मेण्यात बसलेली ही आई भरल्या दिसांची आहे! तिच्या पदराखाली तिचा हा मोठा दूधपिता बाळ आहे. आणि या दोन जिवांना सांभाळणारी मेण्यात बसलेली आई अशी स्वत:च एक हळवा मेणा बनली आहे! तिच्या लकलक काळजात दोन कोवळ्या जिवांची काळजी क्षणभर दाटून येते आहे.. विलक्षण कोवळा थरार व मायदुधी तरंग तरलपणे या कवितेत उतरला आहेत.


सायंकाळी उन्हे पांगतात आणि पायथ्याशी गाव दिसू लागते. दुधपित्या झोपेतून जाग्या झालेल्या बाळाला स्वप्न समोर उभे राहिल्यासारखे आजोळ समोर दिसू लागते. झोप की जाग की स्वप्न कळत नाहीसे होते. दाट झोपेत आईचा शिणलेला स्तन ओठी आल्याची तृप्त आठवण व तिचा पदर सासपत असताना बाळहाताला लागलेल्या गूढ भविष्याच्या गाठी ही सारी 'अाजोळली आठवण' कवी बाळमनाने लिहीतो आहे. आई, आजोळ व त्याभोवतीच्या त्याच्या या दुधभिजत्या आठवणींची ही लडिवाळ कहाणी आहे.