Part 19

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१९


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

झाड

====

-- डाॅ. अनुजा जोशी

'कधी सहेतुक निर्हेतुक कधी मी तव दारावरुनी जावे' असा अबोध निरागस मनातला प्रीतीभाव किंवा 'विरघळून अंतर ऐल पैल एक व्हावे/अशावेळी काळजाला लाख लोचन फुटावे' असे हळवे प्रेम रंगवणारी

रामाणींची 'कातरवेळ'(१९५९) या पहिल्या संग्रहातील प्रेमकविता पुढे पुढे 'त्वचेच्या वाटेवरली' आश्चर्यकारक वळणे घेत प्रगल्भ उंचीवर पोचते. 'झाड' ही शंकर रामाणी यांची 'आभाळवाटा' संग्रहातील कविता,'त्वचेच्या वाटेवरचे' हे वळण मोहाचे आहे की प्रेमाचे आहे ते शोधते आहे.

त्वचेच्या वाटेवरल्या वळणाची

जातच जगावेगळी :

त्या तिथेच असते एक निनांवी झाड

केवळ दोन मनांच्या मिळणीच्या

मध्यान्हीला हिरवेकंच...बहराला येणारे

कुठून कुणास ठाऊक

कशी स्वप्नाळून जागी होतात तेव्हा

मूठभर मदनमस्त पाखरे

त्या झाडाच्या एखाद्या फाल्गुनफांदीवर

घरटे सजवून राहिलेली

मला नकळत.

त्वचेच्या वळणाची वाट संपते

तेथेही पुन्हा ते झाड असते

रंध्रारंध्रात संपूर्ण पालवलेले

आणि त्या मूठभर पाखरांचे

प्राजक्तधुंद उषासूक्त माझ्या अरळ

ओठांवर

माझ्याच काचेच्या डोळ्यांत आंदुळणाऱ्या

विषण्ण, निद्रिस्त विश्वाला

अकारण जागवणारे

किती म्हटले तरी 'प्रेम' म्हणजे काय हे सांगण्यात गद्यलेखन कुंपणापर्यंतच धाव घेऊ शकते. प्रेमाच्या आसपास-जवळपास-निकट- निकटतम पोचू शकते ती कविताच! इंग्लिश- हिंदी कविता- उर्दू शायरीने प्रेमाला उत्तमरित्या पेललं,तसंच संस्कृत व मराठी कवितेनेही! कालिदासादि प्रभृतींनंतर आधुनिक काळात अनिल, बोरकर,पु.शि.रेगे,विंदा, इंदिरा संत, पाडगांवकर अशांबरोबरच 'एक निनावी झाड- केवळ दोन मनांच्या मिळणीच्या मध्यान्हीला बहराला येणारे' रामाणींनीही लावले.


प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी स्पर्शसंवेदनेच्या अतितरल प्रतिमा या कवितेत येतात. झाड ही प्रतिमा काव्याचे,जाणिवांचे, अनुभूतींचे, साक्षात्काराचे रुप होऊन समग्र कवितेत येतेच. पण इथे तर ते निनावी ,अमूर्त प्रीतीभावाचेही हिरवेगार रुपडे झाले आहे. 'त्वचेच्या वाटेने निघाल्या गौळणी', 'त्वचेच्या रानात पोर नंदाचा शिरेना', 'स्पर्शाचे गांव' अशा अन्यत्र आलेल्या प्रतिमांच्या रांगेतलेच हे त्वचेच्या वाटेवरचे वळण! त्या वळणावरचे हे झाड दोन मनांच्या मिळणीच्या माध्यान्हीला हिरवेकंच बहरलेले आहे. मिळणीचा- मीलनाचा हा गाढ आसक्तीचा, एकमेकांच्या ओढीचा तीव्र प्रहर आहे. त्याच्या फांदीला 'फाल्गुनफांदी' म्हणून फांदीवरच्या मोहक बहराची चाहूल रंगविली आहे. त्यावर स्वप्नांची 'मूठभर मदनमस्त पाखरे' किलबिलताना कवी ऐकतो आहे. जी कवीच्या नकळतच झाडावर घरटे बांधून राहिली आहेत.


ही झाली वळणावरची स्वप्नाळू जादू. आसक्त बहराच्या वळणावरचं झाडाचं हे हिरवंकंच पालावणं कवी समजून घेऊ शकतो. पण त्याला आश्चर्य वाटतेय ते, वळण संपल्यानंतरही झाडावर अस्तित्वात असणा-या मोहक किलबिलाटाचं. मोहमयी आसक्तीतून बाहेर आल्यासारखे वाटत असताना पुन्हा एक नवल घडते आहे. पूर्वी स्पर्शामुळे उगवलेले ते झाड आता स्पर्श निमाल्यानंतरही रंध्रारंध्रात अदृष्यपणे पालवलेले जाणवते आहे. काचेचे डोळे असणा-या व्यथामय विषण्ण निद्रिस्त आयुष्याला या अलोकिकाच्या प्रेमल उषासूक्तामुळे वेगळी जाग आल्याचे व ते विश्व 'अकारण'च जागल्याचे कवी सांगतो आहे. जसा त्याचा उलगडा नाही, तसा याचाही उलगडा कवीला होत नाहीए.


प्रेम ही एक निसर्गदत्त देणगी आहे. पृथक्करण करता न येण्यासारखा तो एक गोड भावनांचा गुंता आहे, इतका की तो दैवी वाटावा किंवा तो एक दैवी भावनांचा गुंता आहे,इतका की त्याचे कसले पृथक्करण करता न यावे! हा रम्य गुंता सोडवण्याचा प्रयत्न ही कविता करते. गुंता सोडवता सोडवता अभावित गुंत्यात अडकते. गोड गूढाच्या वाटेवर तिला मोह- निर्मोह -आसक्ती-विरक्ती दोन्ही आहेत. पण कोणत्याही स्थितीत ती प्रेमाचे सान्निध्य अनुभवते आहे. प्रतिमांच्या वळणा वळणाने जात आपल्याच फांद्याफांद्यांमधे फुलणा-या प्रेमाचा गंध हे निनावी झाड शोधते आहे.