Part 18

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१८


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

मला जन्मांधाला

===========

-- डाॅ. अनुजा जोशी

"मला अजून चांगली कविता लिहिता यायला हवी" असे वयाच्या सत्तराव्या वर्षीही म्हणणा-या रामाणींनी, मनात कविता जागी होऊन फुलू फळू येऊन गवसण्याचे, निसटण्याचे व तिच्या निर्मितीप्रक्रियेचे सगळे टप्पे समग्र कवितेत शब्दबद्ध केले आहेत.'रोम रोम अंगारता फुली फुले ग्रीष्मगर्भ,ऐसे खोल खोल काही अनुभवावे दुर्लभ' असे उत्कट अनुभव ठायी ठायी आले आहेत. 'आभाळवाटा' संग्रहातील शंकर रामाणी यांच्या 'मला जन्मांधाला' या कवितेत सतत हुलकावण्या देणारी कवितेची वीज अघटित रुपांमधे भेटू आली आहे.

मला जन्मांधाला अवचित नवे नेत्र फुटले

मृगाच्या मातीचे नवल हिरवे खोल रुजले

मनाच्या मेघांचे धन पिकुनिया कुंभ झरती

अनंगाच्या रानी अवखळ फिरे जीण गरती

मला जन्मांधाला अबलख पुन्हा पंख जडले

विराटाचे नाते नकळत उरी नग्न भिनले

अमेच्या ओठींचे जहर पिऊनी ध्वान्त विरते

जरेच्या भोगांचे वसन भगवे जीर्ण ढळते

मला जन्मांधाला अघटित असे विश्व स्फुरले

अगाधाच्या दारी बसुन झुरता पुण्य फळले

द्युतीचे सोनेरी वलय फुलुनी गंध गळती

अता प्रारब्धाचे विहग नवखे पंथ पुसती

कविता गवसण्यापूर्वीच्या स्वत:च्या जिण्याला इथे चक्क 'जन्मांध' म्हटलं आहे! कवी सांगतो आहे की, त्याच्या जन्मांध जिण्याला कवितेचे नेत्र फुटतात व खोल जाणिवांमधे रुजलेली हिरवी अंत:सृष्टी त्याला दिसते. पिकू पिकू आलेले,जड सावळे झालेले मनमेघांचे कुंभ त्या सृष्टीवर बरसताना दिसतात. कवीला आपली रापली-खापलेली गरती (प्रौढ)जीण नवी कोवळी अवखळ होऊन अनंगाच्या रानी दुडकत धावू लागल्याचा भास होतो. कविता, पुढे जगण्याचा आणखी कायापालट करुन टाकते. जगण्याला पंख फुटलेल्या अबलख घोड्याचे नव यौवन लाभते. शब्दांच्या यौवनाचा हा घोडा आवेशपूर्ण व विराटाचं नातं उरी भिडलेला-इतका सशक्त आहे. विराटाचा पैस कवेत घेण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. अर्थातच ही अश्वशक्ती प्राप्त झाल्यावर जरेच्या भोगांचे भगवे वसन- विरक्ती-विराग हे सारे अंगावरुन गळून पडल्याचे कवी सांगतो आहे. अंध जिण्याच्या- घोर अमावास्येच्या ओठींचे जहर प्राशून म्हणजेच सारे भोग भोगून झाल्यानंतर आता ती अवघी तगमग निववणा-या शब्दांचे- कवितेचे दान पदरी पडल्याचे जाणवते आहे. कुठल्यातरी एका आत्मसाक्षात्काराच्या क्षणी,कुठलं तरी अगाध पुण्य फळाला आल्यासारखी, नवी दृष्टी व जाणिवांचे पंख जडून कवीला हे नवे विश्व लाभते आहे. त्या विश्वाचे वेगळे गंधित तेजवलय कवीला मिळते आहे व प्रारब्धाचे पक्षी नव्या वाटा शोधू लागल्याचे कवी शेवटी सांगतो आहे. आत्मपरीक्षणाची अशी लखलखीत नजरच कवितेने बहाल केली आहे.


नवे नेत्र,अबलख पंख,मनमेघांचे कुंभ, अनंगाचे रान, जरेच्या भोगांचे जीर्ण भगवे वस्त्र, प्रारब्धाचे पक्षी अशा ओळीओळींमधे आलेल्या अनोख्या प्रतिमांनी सजलेली, शिखरिणी वृत्तातली ही कविता त्या विशिष्ट लयीत म्हणताना आकलनाचा एक वेगळा आनंद अनुभवावा अशी आहे. प्रतिभेचे चक्षू कवीला किती दिव्य, सर्वदर्शी,सर्वस्पर्शी जाणवले आहेत याचं रम्य चित्रण ती करते. जन्मांध जिण्याच्या घोर काळोखाला मिळालेले 'द्युतीचे सोनेरी वलय' ही शेवटी आलेली प्रतिमा 'तमाच्या तळाशी दिवे लागल्या'च्या अनुभूतीचेच एक तेजस आवर्तन आहे.