Part 13

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१३


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

दिवे लागले रे

=========

-- अनुजा जोशी

'दिवे लागले रे' ही कविता म्हणजे शंकर रामाणी हे आपल्याला माहीत आहे. पण याचा अर्थ आपल्याला फक्त 'तम' माहीत आहे. आणि आता त्याचा 'तळ' अनुभवायचा आहे! हा 'तम' रामाणी या 'मराठी काव्यप्रभू'चा आहे. त्याला 'अमित' अशा परिमाणांच्या 'मिती' आहेत. त्याला प्रातिभ उंची आहे.आशयाचा पैस आणि गहनाची खोली आहे. हा तम म्हणजे केवळ अंध:कार नव्हे; तर गूढाच्या तळाशी रामाणींनी आत्मसाक्षात्काराचे दिवे उजळले, त्याचा तो 'उजाळा'आहे, 'उजवाड' आहे! या कवितेतून 'तमाच्या तळा'शी लागलेल्या याच आत्मप्रकाशी दीपज्योती अनुभवायच्या आहेत.

दिवे लागले रे, दिवे लागले रे,

तमाच्या तळाशी दिवे लागले

दिठींच्या दिशा खोल तेजाळताना

कुणी जागले रे?कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी

असे झाड पैलाड पान्हावले

तिथे मोकळा मी मला हुंगिताना

उरी गंध कल्लोळुनी फाकले...

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा

कुणी देहयात्रेत या गुंतले?

आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्

उष:सूक्त ओठात ओथंबले...

'पालाण' या गाजलेल्या कवितासंग्रहातील रामाणींची ही गाजलेली कविता. पं.जितेंद्र अभिषेकी व पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी दोन वेगवेगळ्या मूडच्या वेगवेगळ्या चालीत गाऊन ही अजरामर केली आहे. ही एकाचवेळी गूढगंभीर,हसती खेळती, दर्दभरी,आनंदी कोणत्याही मूडची भासू शकते. अनेक अर्थवलये तिला आहेत.


दुर्दैव,प्रतिकूलता व व्यथा वेदनांच्या निबीड काळोखाने व्यापलेली जीण या कवितेच्या पार्श्वभूमीला आहे. आसपास भोवताली डोळ्यासमोर दाट काळोख,पण दिठी मात्र तेजस मार्गाच्या प्रतिक्षेत आहे. अशातच एका क्षणी तमातून तेजाकडे जाण्याची प्रखर इच्छाशक्ती अंत:करणात जागली आहे. 'दिवे लागले रे' हे त्याच उर्जस्वलाचं फूल आहे!


'झाड' ही एक अमूर्त संकल्पना रामाणींच्या समग्र कवितेत वारंवार येते. ते झाड कधी नवनिर्मितीचे असते.कलेचे,आनंदाचे असते. कधी निराकाराचे,अदृष्ट शक्तीच्या पाठराखणीचे असते. या कवितेतले 'झाड' हे मनातल्या तेजस संवेदनेचे, दूरवर पैलाडी गंधभारलेसे उभे व मातेच्या मायेसारखे पान्हावलेले आहे! कवी झाडाच्या कुशीत शिरतो. कोवळा हळवा होतो. स्वत:लाच हुंगतो. तेव्हा लौकिक गुंत्यांपासून अंतर्बाह्य मोकळे झाल्याचे व त्याच्या कृपेच्या गंधकल्लोळाने लपेटून गेल्याचे त्याला जाणवते. त्याच्या पुष्पवृष्टीने कवीची रिती ओंजळ भरुन जाते.


पहिल्या कडव्यात दाटलेला अंधार, दिठीला लागलेली आस, दुस-या कडव्यातला साक्षात्कार, तिस-या कडव्यात एका अद्भुत उजेडाचे दान पदरात टाकतो. पानगळीनंतर येणारा चैत्र हे अवघ्या आयुष्याचेच चित्र. या टप्प्यावर रोमारोमांत जिववंत वाहणा-या व निरंतर सळसळणा-या 'चैत्रवाटां'ची देखणी 'देहयात्रा' कवीला दिसते. देहयात्रेची आसक्तीही आहे व मुक्तीही हवी आहे असं विचित्र गुंतलेपणही जाणवतं. आणि या तिमिरद्वंद्वातून मुक्ती देणारे दिवेही त्याच तिमीरतळाशी खोलवर उजळलेले दिसतात. इथेच काळरात्रीच्या कडा दूरवर धूसर-आरक्त होत असल्याची, कुठेतरी आशेचं तांबडं फुटणार असल्याची ग्वाही मिळते. तमाच्या खोल तळाशी आत्मज्ञानाचे दिवे लागल्याचं आकळतं. व रात्रीच्या काळोखाला पार करत अदृष्टाच्या कृपेचं 'उष:सूक्त' होऊन कवितेची ओळच ओठावर येते- 'दिवे लागले रे दिवे लागले रे.."


रामाणींनी समग्र कवितेत तम,अंधार, काळोख,तिमिर,रात्र,अवस हे सारे वेगवेगळ्या तीव्रतेचे रंगवले आहेत. इथेही परिस्थितीचा अंधार वेगळा, दैवाचा तम वेगळा व मनातल्या दैन्याचा काळोख वेगळा आहे! दारात एक दिवा ठेवला की 'अंधार' नाहीसा होतो. दैवदाटला 'तम' केवळ इच्छाशक्तीच्या उर्जादीपाने भेदता येतो व मनाच्या दैन्याचा 'काळोख' दूर करायला आत्मप्रकाशाचं उषासूक्त गावं लागतं. कवी आनंदित झाला आहे तो हे तिन्ही 'तिमिर' उजळल्यामुळे!


परिस्थितीच्या अंधाराच्या दारी 'दिवे लागल्या'चं कवी सांगतो आहे. दैवाच्या रित्या ओंजळीत पुष्पवृष्टी करणारं झाड फुलल्याच्या साक्षात्काराचा उर्जादीप त्याला गवसतो आहे आणि मनभर दाटलेल्या व्यथा वेदनांच्या काळोखाला पार करत आत्मज्ञानाच्या प्रकाशाचं 'उषासूक्त' ओठावर उमलून येतं आहे! आधिभौतिक,आधिदैविक व आध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या दु:खांना, तापांना 'तापत्रय' म्हटले गेले आहे. या तापत्रयी दिवा,सूर्य व आत्मज्ञान ही उजेडाची तीन रुपं! कवीला ही तिन्ही गवसतात आणि 'तमाच्या तळाशी' दिवे उजळणारी रामाणींची ही त्रिगुणात्मक 'दीपावली' हे तिन्ही तिमिर पार करत जाते.