Part 12

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१२


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

मर्म

===

-- अनुजा जोशी

रामाणींची कविता आत्म्याचा स्वर श्रद्धेने आळवते. आत्मप्रकटीकरणाशी इमान राखते. आत्मानुभूती चपखलपणे व्यक्त करते. आयुष्याचा संघर्ष, धडपड, व्यथा-वेदना- पीडांचा भोग-भोगवटा व त्यांचे अपरिहार्य अटळपण हे सारे ती आत्मिक जाणीव म्हणून समजून घेते. नशीबाला दोष देऊन दु:खात कुढत राहण्यापेक्षा परिस्थितीकडे तटस्थपणे बघत संघर्ष करायला शिकवते.बळ देते. विश्वास देते.अंधारातून वाट काढल्यावरच उजेड हाती आला आहे याची जाणीव कविताच कवीला करुन देते!

माझी पांगुळ पुण्याई: चार भिंतींचे घर्कुल

आत मांडीयेली चूल आयुष्याची

चूल पेटून पेटेना : नाही कळलीच गोम

निखारते रोमरोम फुंकताना

किती सोसलेपणाचे रुद्र उत्स्फूर्त उन्हाळे

कधी वेताळ वादळे विश्वव्यापी

असा अंतरी-बाहेरी उठे उर्मट कोल्हाळ

वाटे उडेल छप्पर सर्वस्वाचे

परी अवचित येते कुणी काळजाचे भेटी

दीप लागतात काठी, काळोखाच्या

श्वासाश्वासांत कोवळे शेज करी तेजब्रम्ह

राती उजेडाचे मर्म आकळले

शंकर रामाणी यांची 'दर्पणीचे दीप' या संग्रहातील 'मर्म' ही कविता म्हणजे कभिन्न काळरात्रीत गवसलेले 'उजेडाचे मर्म' आहे व ते गवसल्याचे ती कसे सांगते आहे पहा.


लौकिक जगाचे व्याप-ताप सोसत भोगत असणारे सामान्य आयुष्य अचानक एका वेगळ्या सार्थकाचा- साक्षात्काराचा अनुभव घेते ही आध्यात्मिक जाणीव या कवितेत आली आहे. सत्कर्मांच्या थोड्या थोडक्या पुण्याईला व त्यातून मिळालेल्या मोडक्या तोडक्या बळाला इथे 'पांगुळ पुण्याई' असा चपखल शब्द आला आहे. संसाराचा हा पांगुळ गाडा जीव हाकतो आहे. ही अल्प स्वल्प पुण्याई अशी की चूल फुंकताना रोमरोम निखारते आहे. पण त्याने चूल मात्र पेटत नाही व याची गोम कळेनाशी झाली आहे. वेताळासारखी अगोचर अनियंत्रित अशी विश्वव्यापी- 'वेताळ वादळे' कवीच्या चार भिंतीच्या घरकुलातही शिरली आहेत. संघर्षाचे उग्र उन्हाळे भाजून काढताहेत. 'अंतरी बाहेरी उठे उर्मट कोल्हाळ' असा आतबाहेर उडालेला हाहा:कार आहे. आणि अपार सोसण्याच्या या वा-या-वादळात आता सर्वस्वाचे छप्परच उडून जाईल, अशा आकांताच्या वेळीच नेमका कवीला एक साक्षात्कार होतो आहे! अंत:करणातली जगण्याची भक्ती, सश्रद्धभावच हा साक्षात्कार घडवतो व भयाण काळोखाच्या काठी दिवे लागल्याचं कवीला दिसतं आहे. कुणीतरी अवचित काळजाच्या भेटीला आलंय असं वाटणं; हे आत्मिक बळ असू शकतं. दीर्घकाळ काळोखात घुसमटणा-या श्वासात कोवळे तेजब्रम्ह रुजू येतेय असे 'राती उजेडाचे मर्म' कवीला आकळते आहे. काळोखाच्या गर्भात तेजाच्या बीजाची शेज(शय्या)अशी अज्ञात शक्तीची आत रुजवण झाल्याचा धीर येतो आहे.


इतक्या साध्या सोप्या शब्दात 'सामान्य जगण्यातलं अध्यात्म' ही कविता सांगते. जीवनाची गहनगूढ व जटील तत्वज्ञाने तरल कवितिक भाषेत मांडणारी रामाणींची आध्यात्मिक जाणिवांची कविता यासाठीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सामान्य जिवाला जाणवणा-या सुखदु:खांच्या संवेदना ती तितक्याच साधेपणाने व्यक्त करते व साक्षात्कार- सार्थकाचे क्षण पदरी घालते. लौकिकात मुक्तीची-मोक्षाची अनुभूती देते. अशी, सोसण्यापासून सार्थकापर्यंतच्या सर्व पाय-यांवरुन तिची वाटचाल झालेली दिसते. आणि पुन्हा हा सारा प्रवास विद्रोहाने,उद्वेगाने नव्हे तर सात्विकभावाने व सश्रद्धतेने केला आहे हे फार महत्वाचे. 'राती उजेडाचे मर्म आकळले' ही सुभाषितासारखी काव्यपंक्ती हे गाढ आत्मनिष्ठेतून गवसलेले जगण्याचे मर्म आहे. परिस्थितीच्या तडाख्यातून तावून सुलाखून हाती आलेले ते जीवनाचे परिपूर्ण आकलन आहे.