Part 10

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.१०


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

माझिया दारांत

==========

-- अनुजा जोशी

कवीला स्वत:मधल्या सृजनशीलतेचे कुतुहल असतेच. कविता म्हणजे नेमके काय याचा शोध वर्डस्वर्थच्या 'स्पाॅन्टॅनिअस फ्लो'पासून केशवसुतांच्या 'आकाशीच्या वीजे'पर्यंत सगळीभर व्यापून उरला आहे. जसा वारा जाणवतो पण दिसत नाही तसेच कवितेचेही! ती लिहीली जाते पण नेमकी कशी लिहीली ते कवीचे कवीलाही कळत नाही. मग ती आंतरिक खळबळ त्याला कवितेतूनच सांगावीशी वाटते. रामाणींच्या कवितेत तर हे सांगणा-या निसर्गप्रतिमांचा रंगीबेरंगी मेळाच भरला आहे. 'मला कविता येते' असे रामाणी म्हणत. सुचणे,लिहिणे हे शब्द त्यांना मान्य नव्हते. मग ते कधी 'मनात वाजणारे झाड' म्हणत, कधी 'आले कुठून मोर हे मिसळले माझ्यात केव्हातरी' असे त्यांना वाटे, कधी ते 'परदेशी पांथ'असत. या कवितेत त्यांना मनाच्या दारांत शब्दांचा चिवचिवाट ऐकू आला आहे.

माझिया दारांत

चिमण्या आल्या

अबोल काहीसे

बोलून गेल्या

कळले सारे नि

कळले नाही

मनाची अबोध

हासली जुई

दाटून दिशांत

उतला गंध

झडली जाणीव

गळले बंध

प्राणांस फुटले

अद्भुत पंख

तंद्रीत भिनला

आकाशडंख

माझिया दारांत

चिमण्या आल्या

अागळेवेगळे

सांगून गेल्या

शंकर रामाणी यांच्या 'आभाळवाटा' संग्रहातील


'माझिया दारांत' या कवितेत आलेल्या चिमण्या 'अबोल काहीसे' सांगणा-या आहेत. त्या काय सांगतायत ते कवीला कळले आहे नि कळलेही नाही असे वाटते आहे. जो काही गोड संभ्रम निर्माण झालाय त्याने अबोध मनाची जुई खुदकन् हसल्यागत जाणवतंय. मन चिमणं पाखरु होऊन बागडू लागलंय. त्याला नाजूक जुईचा गंध येतोय. मनात आनंदाच्या लहरी उठवणारं हे काहीतरी आहे! मनजुईच्या त्या आनंदगंधाने आसमंत भरुन गेला आहे. आणि दाटल्या दिशांतही तो मावेनासा होऊन आता उतू चालला आहे. ही अवस्था आहे देहाने विदेही होण्याची! जड शरीराची जाणीव झडून सारे बंध गळून पडल्याची. स्थूलातच सूक्ष्म झाल्याची!


पण हो, एवढ्यावरच थांबत नाही ही विदेही अनुभूती. ती अजून पुढची तलम तंद्री गाठते, ज्या तंद्रीला 'आकाशडंख' भिनला अाहे! आकाशडंख,गगनडंख, मुरलीधरसा शीळ घालणारा वारा,मुकुंदमिठी हे अद्भुत नवे शब्द ही खास रामाणीशैली. इथे 'आकाशझेपे'चा डंख झालेली गाढ तंद्री पुढे आणखीच वेगळी किमया करते. आत्मिक जाणिवांना झालेला हा डंख इतका तीव्र की त्यातून प्राणाला अद्भुतसे पंख फुटून तो भरारल्याचं,अतितरल झाल्याचं मनजुईला जाणवतं आहे. रामाणींच्या कवितेतली आध्यात्मिकता चिमण्या पाखराच्या रुपात इतकी मोहक नि अलवार झाली आहे.


शब्दांच्या या चिमण्या दारांत येतात न् जे काही आगळंवेगळं सांगून जातात त्याचीच कविता झाली आहे की काय?असेलही. किंवा कदाचित काही वेगळं वेगळं असू शकेल. या दाणा टिपणा-या सुखाच्या क्षणांच्या चिमण्या असतील, चोचीत काडी घेतलेल्या आठवणींच्या चिमण्या असतील, जोडगोळीने येणा-या प्रेमाच्या चिमण्या असतील, त्या कल्पनांच्या,स्वप्नांच्या,इच्छा-आकांक्षांच्याही असतील. गोड गुपितांच्या,भास-आभासांच्या- इवल्या इवल्या श्वासांच्या- हाती लागून निसटलेल्या क्षणांच्या असतील... ज्याची त्याची मनजुई जे जे चिमणे विभ्रम घेईल ते ते.