Part 4

सदर (गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.४

(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

स्वैर भटकावे

=========

- अनुजा जोशी

शंकर रामाणी यांच्या कोमलकंठी कवितेत रमणीयशा निसर्गप्रतिमा येतात. प्रादेशिकतेचे रम्य दर्शन ही तर त्यांच्या कवितेची देखणी अंगकांतीच. 'कातरवेळ'हा रामाणींचा नव्या नवलाईचा,गोड हळव्या प्रेमाचा व जीवनचिंतनात्मक निसर्गकवितांचा पहिलावहिला कवितासंग्रह. पु.शि.रेगे यांची मर्मज्ञ प्रस्तावना असलेला. आजची 'स्वैर भटकावे' ही त्यातली कविता हे इथल्या रमणीय निसर्गाचे व त्यानुरुप मनात फुलणा-या भावविभ्रमांचे पाचूहिरवे रुपडेच!

कधी स्वैर भटकावे कुळागरांत शीतल

गर्द मख्मली छायांची घ्यावी अंगावर शाल

डोळे भरुन पहावे धुंद हिरवे वैभव

खुळ्या पाटाच्या पाण्याशी पिटकुळीचे लाघव

कशी छळते केळींना शीळ उनाड वा-याची

कानगूज मोग-याचे न्हात्याधुत्या अबोलीशी

तुष्ट मशींग;पोपटी--पानवेलीचा विळखा;

तळी जुईचा कोमल भाव दर्वळला मुका

चिंच उभी तळ्याकाठी चाफा रुतला मनात..

वेड्या पोफळी उगाच तिला पाहती पाण्यात

गोव्याचा संपन्न निसर्ग, लोकजीवन, संस्कृती व बोलीतल्या भाषांचे पडसाद रामाणींच्या समग्र कवितेत अलवारपणे उतरलेले दिसतात. निसर्गाची सुबत्ता इथे भरघोस प्रतिमांकित होते. इथे फुलणारे-वाढणारे अनेक वृक्ष-झाडे- फुलेझाडे,रानंवनं शेतं मळे ऋतू व त्यांचे विविध संदर्भ कवितेत जागोजागी येतात.

किती गोड जोड्या जोड्या आणि त्रिकूटं या कवितेत वावरतायत पहा! कुळागरात एकमेकींच्या हातात हात घातलेल्या शीतल छाया व आपल्या अंगावर पडणा-या त्यांच्या मऊ शाली, पाटाचं पाणी व पिटकुळी,उनाड वारा आणि हळव्या केळी,गंधाळला शुभ्र मोगरा आणि बिनवासाच्या तांबड्या आबोल्या, तुष्टपुष्ट शेवग्याला बिनधास्त विळखा घालणा-या पानवेली नि तळातली संकोची जाई जुई, चिंच- चाफ्याच्या आंबटचिंबट जोडीला हेव्याने पाण्यात पाहणा-या साध्या सरळसोट पोफळी अशी सगळी मानवी भावसैरच निसर्गात घडते आहे.


रम्य हिरवाईवर हा कविपिंड पोसला गेलेला असल्यामुळे फांदीला पान फुटावं इतक्या सहजगत्या ही गोमन्तकीय प्रदेशपालवी रामाणींच्या काव्याला फुटते. बोरकरांची 'माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे'आठवावी तशी ही रामाणींची 'स्वैर भटकावे' ही कविता. 'कातरवेळ' या पहिल्या संग्रहात निसर्गाचे विभ्रम टिपणारं नवोदित कवीमन उत्कटपणे बागडताना दिसतं. नवीन लिहिता हात असला तरी जाणिवांचं नवखेपण नव्हे तर अनोखेपण दिसायला तिथूनच सुरुवात होते.


या कवितेत एक देखणा रंग-गंधोत्सव आहे. हे सारं गोमन्तकीय मनाचंच हिरवं जगणं- वाढणं- फुलणं आहे. लालचुटुक फुलांचे घोस व लाल मण्यांसारखी गोडसर फळं घेऊन बारोमास फुलणारी पिटकुळी/पटकुळीण कुळागरात रानावनात सगळीकडे दिसते. एरवी रानात ऊन वारा झेलणारी पिटकुळी कुळागरात पाण्याच्या घसघसत्या प्रवाहात टुकुटुकु करुन फुलांच्या माना हलवत असते. पाटाच्या पाण्याचा खुळुखुळु नाद व तिचं त्यात घोसांच्या माना डोलावणं हे सारं ''खुळ्या पाटाच्या पाण्याशी पिटकुळीचे लाघव'' या एका ओळीत पुरेपूर सामावतं व सचित्र होतं.."मला घे,मला घे" म्हणत ही झाडकळ,हे रान, हे 'हिरवं लाघव' जसं बोरकर व इतर सर्वच गोमन्तकीय जेष्ठांच्या कवितेत आपसूक येत होतं तसं ते रामाणींच्या कवितेलाही वेंगत येत असावं असं उगीचच मला इथल्या कुळागरांमधून फिरताना वाटतं आणि माझ्या कवितेलाही इथल्या पाचूरानाची अशीच ओली साद येत रहावी अशी प्यास मनाला लागून राहते. एखाद्या संवेदनशील मनाला सृजनाची चाहूल लावण्याचं सुरेख सर्जन ही कविता करते.