Part 20

सदर (दै.गोमन्तक)- अलक्ष लागले दिवे - लेख क्र.२०


(गोमन्तकीय कविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा 'काव्यजागर')

काळीभोर हार्मनी

============

-- डाॅ. अनुजा जोशी

वेदनेने ठसठसत असणारी आणि काळ्याकभिन्न काळोखाचा ठाव घेत जाणारी रामाणींची कविता ख्रिस्ताच्या वेदनेशी अनेकदा समरस होताना दिसते. किंबहुना त्या पवित्र प्राक्तन वेदनेत आकंठ बुडून निर्मळ काळीभोर होत ओघळताना दिसते.

वर्षाऋतू :

सर्द संध्याकाळ अर्धी

मुर्धी अस्तावलेली.

आषाढमध्य,

नुकते नुकतेच

घड्याळात सात वाजलेले.

आहे-नाहीसा चिप्प

उदास उजेड....

घरालगतच्या चर्चच्या मध्यावरचा

एकाकी क्रूस

अविश्रांत तुफानी पाऊसझडीत.

निथळणारा...

खोलीतल्या

खुर्चीवर बसल्या बसल्या किलकिल्या

दाराच्या फटीतून खोलवर जाणवतेय

'त्या'चे

बर्फगार क्रुसिफिक्शन

असहाय !

ऐलपैल एकरूप

आणि

सर्वत्र ओहळणारी एक अनाम

काळीभोर हार्मनी..

शंकर रामाणी यांच्या 'गर्भागार' या संग्रहातील 'काळीभोर हार्मनी'ही कविता सायंकाळी सावल्या गडद होत जाताना एका उदात्त वेदनेचे काळे- सावळे संगीत ऐकवते.


आषाढाच्या मध्यावरची अविश्रांत तुफानी पाऊसझडीची संध्याकाळ. अर्धी मुर्धी अस्तावलेली. आहे म्हणावा तर नाही आणि नाही म्हणावा तर आहे असा, म्हणजे आहे-नाहीसा चिप्प उजेड . एवढेच उजेडाचे अंधुक अस्तित्व. तेही पावसाने कुंद होत विरत चाललेले. अंधार सावळत चाललेला. काळसावल्या काळोखत पसरत असलेल्या. गारेगार सर्द वातावरण आणि बेछूट कोसळणारा काळा पाऊस. अशा पावसाळी सायंकाळीच्या गर्द गारठ्यात कवी बंद घरात खुर्चीवर बसला आहे. समोर घराचं दार किलकिलं उघडं आहे. आणि त्या फटीतून समोरच्या चर्चच्या मध्यावर उभा असलेला पाऊसझडीत निथळणारा क्रूस कवीला दिसतो आणि कवी एकदम स्तब्ध होतो. पावसाच्या न सोसणा-या थंडीत त्याला खोलवर काही वेगळंच भासतं. त्या क्रूसावर ख्रिस्ताचं बर्फगार असहाय क्रूसिफिक्शन त्याला दिसतं,जाणवतं.


पाऊसझडीत भिजलेला पण भयाण नि:स्तब्धतेचा हा एक रक्तकाळा क्षण समरसून अनुभवल्यानंतर पुढच्याच क्षणी एक वेगळाच साक्षात्कार कवीला होतो. सुमधूर संगीताची लहर प्रत्यक्ष उमटण्याआधीची सम ज्या एका स्तब्ध क्षणी सुरु होते,पकडली जाते अशाप्रकारचा तो पुढचा क्षण असतो. स्तब्धतेनंतर सूर उमटवणारा! अशाच एका क्षणी ख्रिस्ताच्या असहाय क्रूसिफिक्शनच्या प्राणांतिक वेदनेतून क्षमेचा निर्मळ सूर उमटला होता. त्यातूनच दयार्द्र करुणेचे परमपवित्र संगीत जन्माला आले होते. नियतीने जणू देहावर खिळेठोक करवून ते कायावाद्य वाजवले व तडफडणा-या प्राणांतून क्षमेचे संगीत उमटले! कवीच्या नेणिवेमधे हा सोसण्याचा सूर आहे,हे गीत आहे,हे वेदनेचे संगीत आहे. नि:स्तब्धतेच्या क्षणानंतर येणारा पुढचा क्षण हा या करुणामयी सूरांचा आहे, जो कवी पुढे अनुभवतो आहे.


एव्हाना सायंकाळ तुडुंब निथळून, जणू विरघळत जात ऐल पैल एक झालेला व अखंड अंधार पसरलेला कवीला दिसतो आहे. आणि आता एका जीवव्याकुळ हार्मनीचे सूर आसमंतात उमटत असलेले कवीला ऐकू येताहेत.. तुफानी पाऊसझडीचं संगीत, पावसाची अविराम धारांची लय आणि सर्द गारठलेली काळीभोर वेळा असा एक सुरेख वाद्यमेळ जमलेला जाणवतो आहे.


'आव्हे मारीया' या आत्मकथनपर कवितेत 'नियतीने ललाटी अमानुष अविश्रांत खिळेठोक करुनही मी जगतोय माझे अपरिहार्य आयुष्य' असे रामाणींनी म्हटले आहे. इथे या कवितेतही व्यथावेदनेनांनी भरलेले कवीचे लौकिक आयुष्य पार्श्वभूमीला आहे व दैवाच्या क्रूसावर चढल्यानंतर त्या काळोखवेदनांमधून सूर उमटण्याची आस कवीला आहे.!म्हणूनच कवीला क्रूसिफिक्शनच्या जाणिवेमधून हार्मनीचे सूर कानावर पडताहेत असा दिव्य भास होतो आहे. क्रूसावर खिळेठोक झाल्यानंतर शरीरभर ओघळणा-या रक्तातल्या करुणेची संथ शांत लय काळोखात ओहळणा-या या 'काळ्याभोर हार्मनी'च्या आर्त अनाम सुरांना आहे.