Tarkhad3

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

संत गाडगे महाराजांचे अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

आधी सांगितल्या प्रमाणे, मी महाराष्ट्रातील थोर संतांपैकी एक श्री गाडगे महाराज यांबद्दल सांगण्यासाठी माझी स्मरणशक्ती उजागर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते पूर्वसूचना न देता कधी संध्याकाळी आमच्या खार येथील बंगल्याला भेट देत असत आणि भल्या पहाटेच्या प्रहरी निरोप घेत असत. मी त्यांना स्वतः पाहिलं आहे. ते रंगीबेरंगी कपड्याचे तुकडे जोडून शिवलेला पोषाख घालत असत आणि आपलं डोक कापडाच्या एका फडक्याने बांधत असत. त्यांच्या अशा पेहरावामुळे ते गोधडी महाराज किंवा गोधडी बाबा ह्या नावाने सुद्धा ओळखले जायाचे.

ते चामड्याचे "चढाव" चप्पल म्हणून घालायचे आणि त्यांच्या हातात नेहमी बांबूची काठी असायची. झिजण्यापासुन रक्षणासाठी बांबूच्या काठीला खाली लोखंडी आवरण होतं. ते श्री विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते आणि नेहमी पांडुरंग… पांडुरंग… म्हणत असायचे. मला वाटतं दासगणू महाराज, जे आपल्या कीर्तनांतून साई महिमेचा प्रसार अवघ्या महाराष्ट्रभर करायचे, त्यांनी त्यांची ओळख आमच्या कुटुंबाला करून दिली. संत गाडगे महाराजांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा मुख्यतः, दिन गांजलेल्या जनांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणे हा होता. ते त्यांना स्वच्छतेचे महत्त्व ही शिकवत असत आणि अवघ्या महाराष्ट्रभर गावांतील रस्ते झाडून स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत. 'स्वच्छता हा देव' आहे अशी त्यांची शिकवण होती. फक्त स्वच्छताच, गावांना रोग आणि महामाऱ्यांपासून मुक्त करू शकते, हा त्यांचा सर्व गावकऱ्यांना संदेश असायचा.

अर्थात, हे कार्य करत असताना जर त्यांना श्रीमंत लोकांकडून देणग्या मिळाल्या तर ते त्या जमा करून गावातील गरजू लोकांना वाटत असत. साई बाबांच्या महासमाधी नंतर, माझे आजोबा संत गाडगे महाराजांना कापडाचे ताग दान करू लागले. माझी आई स्वतःच्या हातांनी गोधडी शिवायची आणि जेव्हा पण गाडगे बाबा आमच्या घरी भेट द्यायचे तेव्हा ती त्यांना ती प्रदान करायची. ते मग तिला आशीर्वाद द्यायचे आणि ती गोधडी स्वतःच्या वैयक्तिक वापरा करता घेऊन जायाचे. मला वाटतं की त्या काळचे लोक ज्या प्रेम व स्नेहाची वृष्टी करायचे, तसं आजच्या काळी सापडणे कठीण आहे.

आधी सांगितल्या प्रमाणे संत गाडगे महाराज हे माझ्या वडिलांना बंगला विकत घेण्यास प्रेरित करण्यास कारणीभूत होते. ते जवळपास नेहमीच अनवाणी चालायचे आणि त्यांनी खार येथे एक बंगला बघितला होता जो माझ्या वडिलांनी १९२३ साली रु. १५०००/- या किमतीला थेट विकत घेतला होता. त्या काळी, जुन्या खार येथे ते एकमेव बांधकाम होतं आणि मला आठवतं की बंगल्याच्या गच्ची वरून आम्हाला रेल्वे स्टेशन, माउंट मेरी चर्च ई. कोणत्याही अडथळ्याशिवाय दिसायचं. जेव्हापण गाडगे बाबा यायचे, ते माझ्या आईला आदेश द्यायचे, जी मग त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी आणि झुणका बनवायची आणि त्या रात्री आम्ही सर्व जेवण म्हणून झुणका भाकर खायचो. माझ्यावर विश्वास ठेवा की त्या पदार्थाची उत्कृष्ट चव माझ्या स्मरणामध्ये कायमची घर करून राहिली आहे. रात्रीच्या जेवणानंतर संत गाडगेबाबा त्यांच्या विविध गावांतील पदायात्रांच्यावेळी प्राप्त झालेले त्यांचे अनुभव सांगायचे. गाडगेबाबा हे निश्चितपणे सामान्य मनुष्य नव्हते तर देवाचे आणखी एक दूत होते. मी आता तुम्हाला सांगणार आहे, माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर कोणता दैवी अनुभव मिळाला, जेव्हा ते त्यांच्या बरोबर पंढरपूर येथे गेले.

गाडगे बाबा हे पंढरपूर या तीर्थक्षेत्री नियमित भेट देणारे वारकरी होते. तिथे भेट देणे हे तीर्थाटन आहे. ते श्री विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते आणि मोकळ्या वेळी पांडुरंग…पांडुरंग… म्हणत सतत आपला नामजप करत असत. एकदा माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं की त्यांची आयुष्यात कधी श्री पांडूरंगांशी भेट झाली आहे का. गाडगे बाबांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे चलण्यास सांगितलं. ते माझ्या वडिलांना म्हणाले की त्यांना तेथे एका तीर्थयात्रेकरू सारखे राहावे लागेल आणि त्यांच्या आरामशीर बंगल्यात उपलब्ध असलेल्या सुख सोयींपासून दूर राहावे लागेल. माझ्या वडिलांनी मग पंढरपुरास आपली दुसरी भेट, संत गाडगे बाबांबरोबर आरंभली.

त्यांनी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात बांधलेल्या एका तंबूत मुक्काम केला. संपूर्ण दिवसभर ते महाराजांबरोबर हिंडले आणि त्यांनी (महाराजांनी) स्वच्छतेची कामं कशाप्रकारे हाती घेतली ते पाहिलं, कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या भोवती गोळा झालेल्या व शांतपणे त्यांचे उपदेश ऐकणाऱ्या दिन जनांना सल्ला दिला. माझ्या वडिलांना संत गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याची बऱ्यापैकी कल्पना आली आणि संध्याकाळी ते तंबूत परत आले. माझ्या वडिलांनी पाहिलं की तंबूत तीन चटया अंथरलेल्या आहेत आणि प्रत्येक चटईबरोबर एक घोंगडी ठेवण्यात आलेली आहे आणि रॉकेलचा कंदील तंबूच्या मध्यभागी लावण्यात आलेला आहे. गाडगे बाबांनी माझ्या वडिलांना आराम करण्यास सांगीतला आणि ते जाऊन, खाण्यासाठी झुणका भाकर आणत आहेत असं म्हणाले. माझ्या वडीलांची जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांनी त्यांना तिसरी चटई आणि तिचा वापर कोण करणार आहे याबद्दल विचारलं. गाडगे बाबा त्यांना म्हणाले की ते त्यांना सांगण्यास विसरले की एक रात्र राहाण्याकरता त्यांचा एक पाहुणा येणार आहे आणि पहाट होण्यापूर्वीच तो निघून जाईल. पाहुणा त्यांना कोणतीही गैरसोय करणार नाही. त्यांनी सांगीतलं की ते जेव्हाही पंढरपूरला येतात तेव्हा हा पाहुणा त्यांना रात्री सोबत देतो. हे सांगितल्यावर गाडगे बाबा तंबूतून निघून गेले. लवकरच तंबूत अंधार होऊन राहिला होता आणि तापमान सुद्धा कमी झालं होतं. माझ्या वडीलांना पेंग येऊ लागली आणि ते झोपी गेले. ते गाडगे बाबांच्या हाकेने उठले, ज्यांनी माझ्या वडिलांकरता झुणका भाकर आणली होती. त्यांनी त्यांची क्षमा मागितली कारण त्यांनी पाहुण्याबरोबर आधीच आपलं रात्रीचं जेवण उरकलं होत आणि माझ्या वडिलांना जेवण करण्यास सांगीतलं कारण ते फार भुकेले असतील. तोपर्यंत ते फेरपटका मारण्याकरता नदीच्या किनाऱ्यावर जात आहेत असं म्हणाले. माझ्या वडिलांनी त्या पाहुण्याकडे पाहिलं. त्याने धोतर घातला होता आणि वर उघडाच होता. त्याचा वर्ण भिल्लांसारखा गडद काळा होता आणि त्याचे डोळे जळणाऱ्या कोळशासारखे लाल होते. त्याच्या खांद्यावर घोंगडी होती. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की संपूर्ण तंबू कस्तुरीच्या उग्र सुवासाने भरून गेला होता, ज्याचा वास माझ्या वडिलांनी पूर्वी कधीही अनुभवला नव्हता. ते दोघे तंबू सोडून गेले आणि माझे वडील आपले रूचकर जेवण करू लागले. होय हे खरं आहे की त्यांनी असं रुचकर जेवण पूर्वी कधीच चाखलं नव्हतं. कस्तुरीच्या सुवासाने आपलं काम केलं आणि माझे वडील जेवण घेऊन झाल्यावर लगेच गाढ झोपी गेले. ते सकाळी कोंबड्याच्या आरवण्याच्या मोठ्या आवाजाने उठले.

गाडगे बाबा आधीच जागे होते. त्यांनी माझ्या वडिलांना तोंड धुण्यास व गरम चहा पिण्यास सांगितला, जो मातीच्या भांड्यात ठेवलेला होता व त्यांची वाट बघत होता. माझ्या वडिलांनी पाहुण्याबद्दल चौकशी केली, तेव्हा गाडगे बाबा त्यांना म्हणाले की पाहुणा आधीच चहा पिउन निघून गेला होता कारण त्याला मंदिर उघडण्याआधीच कामावर हजार व्हायचं होतं. माझ्या वडिलांना थोड विचित्र वाटलं की ------आणि त्यांनी महाराजांना विचारलं की त्यांनी पाहुण्याची ओळख त्यांच्या बरोबर का करून दिली नाही. गाडगे बाबांनी मग माझ्या वडिलांना सांगितलं की त्यांना वाटलं की माझ्या वडिलांनी पाहुण्याला ओळखलं असावं कारण पंढरपुरात त्या पाहुण्याची ओळख करून देणे गरजेचे नाही. माझ्या वडिलांनी त्यांना सांगीतलं की रात्री ते त्या पाहुण्याला निट पाहू शकले नाहीत आणि त्यांना वाटलं की सकाळी तो जाण्यापूर्वी, महाराज निश्चितपणे त्याची ओळख करून देतीलच. मग महाराजांनी त्यांना सांगितलं की तो पाहुणा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर पंढरपूरचा विठोबा होता. त्यांनी माझ्या वडिलांना विचारलं की त्यांना, त्यांनी मागे बंगल्यात त्यांना (गाडगे बाबांना) विचारलेल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का ते. आता माझ्या वडिलांना त्या गोड आणि संम्मोहित करणाऱ्या कस्तुरीच्या सुवासामागचे रहस्य आकळले. माझे वडील म्हणायचे की कस्तुरीचा सुवास त्यांच्याबरोबर बराच काळ राहिला आणि त्यांना श्री विठोबांची उपस्तीथी जाणवून देत राहिला.

संत गाडगे बाबांनी एक सुखद अनुभव सुद्धा दिला. ते काळाच्या ओघाबरोबर वृद्ध झाले होते आणि त्यांची आमच्या बंगल्यातील शेवटची भेट सुद्धा अविस्मरणीय होती. ते नेहमी यायचे ते घोंगडी आणि काठी घेऊन आणि आमच्या घरातून निरोप घेऊन जाताना आपल्या चीजवस्तू घेऊन जायाचे. त्यांच्या शेवटच्या भेटीच्या वेळी, ते त्यांची काठी घेऊन जायाला विसरले. खरं पाहू जाता प्रत्यक्षात ते घेऊन जायाला विसरले नव्हते किंबहुना मला वाटतं की त्यांनी, स्मृतीची खुण म्हणून, ती जाणुनबुजून मागे ठेवली असावी. मी हे असं म्हणतो कारण त्यांची चालण्याची पद्धत अशी होती की ते काठी शिवाय चालू शकले नसते. माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याचा शोध घेऊन त्यांची काठी त्यांना परत देण्याबाबत एकमेकांबरोबर सल्ला-मसलत केली. पण त्यांना शोधून काढणं शक्य नव्हतं कारण ते खऱ्या अर्थाने "महाराष्ट्राचे भटकणारे संत" होते, जे नेहमी दिनांच्या सेवेत असायचे.

माझे आईवडील त्या काठीला अत्यंत पवित्र वस्तू मानायचे आणि ती आमच्या चंदनी मंदिराच्या जवळ ठेवली होती. माझ्या आईवडिलांनी त्यांची एक तसबीर विकत घेऊन ती आमच्या चंदनी मंदिरात ठेवली जेणे करून त्यांची नित्य पूजा होईल, कारण, तुम्ही वाखाणाल की, ते त्यांच्यासाठी दैवतासमान होते.

प्रिय वाचकांनो, मला खात्री वाटते, तुम्हा सर्वांना हा अध्याय सुद्धा मनोरंजक वाटला असेल. मला पुन्हा एकदा वाटतं, की आज आपण अशा संत व आपल्या मध्ये असणाऱ्या देव दूतांना मुकत आहोत आणि निस्सीम भक्त, ज्यांची संतांप्रती निस्वार्थी भक्ती आहे, अशांचे अस्तित्व सुद्धा मुकत आहोत.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

संत संगती प्राप्त होणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. पूर्व पुण्याई केली असेल तर ती प्राप्त होते. पाडुरंग हा संतांच्या हृदयात वास करतो म्हणून जे संतांना अनन्य शरण आले आहेत त्यांना तो सहज साध्या आहे. किंबहुना संत आणि अनंत हे काही वेगवेगळे नाहीत. ते एकच आहेत, म्हणून त्यांनमध्ये भेद पाहू नाहे.

आपण संतांना अनन्य शरण आलो पाहिजे आणि त्यांची भक्ती सेवा केली पाहिजे. यातच आपला परम उत्कर्ष आहे. ते आपल्याला स्वार्थ (संसारामध्ये बरकत) व परमार्थ (आध्यात्मिक प्रगती) दोन्ही साधून देतात. =================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

लेखकाचे स्वतःचे अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

मला खात्री वाटते की माझ्या वडिलांचे हे अमुल्य अनुभव वाचल्यावर, तुम्ही असा विचार करण्यास प्रवृत्त व्हाल की, मी सुद्धा स्वतःचे काही अनुभव गोळा केले असतील. तसं पाहिलं तर, मी ह्या पैकी एक अनुभव एका भक्त असणाऱ्या बाईंना सांगितला. त्या मला म्हणाल्या, की मला माझ्या वडिलांप्रमाणे व त्याच गुणवत्तेचे अध्यात्मिक अनुभव मिळाले नसतील, पण ज्या अर्थी मी अशा "पुण्यात्म्याच्या" घरी जन्म घेतला आहे, त्या अर्थी त्यांच्यापासून थोडं तरी पुण्य वारस म्हणून प्राप्त केलं असेल आणि म्हणून काही अनुभव मिळाले असतील जे निश्चितपणे आजच्या काळच्या सगळ्या साई भक्तांना सांगण्यायोग्य असतील. अशाप्रकारे, मी त्या "पुण्याचा" काही भाग त्या सर्वांमध्ये वाटू शकतो. त्या बाईंच्या प्रतिक्रियेने मला भावनिक धक्का दिला आणि मी निश्चय केला की माझ्या दृष्टीने ते कितीही लहान व क्षुद्र असले तरी मला तुम्हा सर्वांपुढे, मी आतापर्यंत जे काही अनुभवलं ते उजागर केलं पाहिजे. अशा प्रकारे, मी माझी "साई प्रीती" व माझ्या तर्फे साई सेवेचं प्रतिक व्यक्त करू शकतो.

माझं पूर्ण नाव आहे, वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड. आमच्या नावांमागे एक छोटी गोष्ट आहे. ती अशी आहे. माझ्या पणजोबांनी, त्यांच्या सर्व पुत्रांची नावं अशी ठेवली की त्यांच्या पाहिल्या नावाचा शेवट "द्र" या अक्षराने होईल. या सिद्धांताचे प्रणेते हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर नोबेल पारितोषिक प्राप्त कै. श्री रविंद्रनाथ टागोर होते. असं घडलं की इंग्लंडला जाण्यापूर्वी ते माझ्या पणजोबांबरोबर त्याच्या चौपाटी येथील बंगल्यात राहिले होते. इंग्रजांच्या आचारपद्धतीची ओळख व्हावी हा ह्या मागचा उद्देश्य होता, कारण त्या काळी तर्खड कुटुंब ह्या साठी फार प्रसिद्ध होतं. कै. रविंद्रनाथ हे ज्योतिष शास्त्राचे चाहते होते आणि त्यांनी त्या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी माझ्या पणजोबांची कुंडली तयार केली आणि ह्या निष्कर्षापर्यंत आले की तर्खड हे इंद्र देवापासून निर्माण झाले आहेत आणि म्हणून त्यांनी स्वतःला (पुरुष मंडळींनी) त्या नावाने ओळखलं पाहिजे. म्हणून त्यांनी माझ्या पणजोबांकडे त्यांच्या पुत्रांना तशा प्रकारे नाव ठेवण्याचा आग्रह केला. माझ्या पणजोबांना ते पटलं असावं आणि त्यांनी त्यांच्या पुत्रांची नावं रामचंद्र(माझे आजोबा), ज्ञानेंद्र ई. ठेवली. माझ्या आजोबांनी त्यांच्या दोन पुत्रांना सत्येंद्र व ज्योतिंद्र अशी नावं दिली. पुढे ज्योतिंद्र यांनी त्यांच्या पुत्रांची नावं रवींद्र(माझे थोरले बंधू) व वीरेंद्र(मी स्वतः) अशी ठेवली. रवींद्र यांनी त्यांच्या मुलाचं नाव देवेंद्र ठेवलं आणि मी माझ्या मुलाचं नाव महेंद्र ठेवलं.

अर्थात, माझ्या बालपणापासून मी आमच्या घरात दर गुरुवारी सायंकाळी होत असलेल्या साई आरतीला उपस्थित असतो आणि हा विधी आज मितीपर्यंत चालू आहे. सुदैवाने माझी पत्नी सुद्धा साई भक्त आहे. ती ५ वर्षांची असल्यापासून नेहमी शिर्डीला भेट देत आहे. मी सर्वात पहिल्यांदा शिर्डीला भेट दिली ते १८ वर्षांचे असताना, आणि ते सुद्धा दोन मित्रांबरोबर ज्यांची नावं आहेत अमर भगातानी आणि शशी भाटिया. विवाहानंतर मी सासुरवाडीच्या घरात राहायाला लागलो. माझ्या पत्नीचे वडील, ती ५ वर्षांची असतानाच निर्वाण पावले होते आणि त्या दोघ्या बाईमाणसांना घरात एक पुरुष माणूस असण्याची गरज भासली. माझी सासू आणि पत्नी दोघीही साई भक्त असल्यामुळे माझ्या 'साई संस्कारांमध्ये' कोणताही अडथळा आला नाही, उलट ते वाढत वाढतच गेले.

====================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

शिर्डीतील गुरुपौर्णिमा

मी माझ्या सासू बरोबर शिर्डी येथील गुरुपौर्णिमा उत्सवाला उपस्थित राहू लागलो आणि माझ्या सर्वोत्तम स्मृतीप्रमाणे मी सलग १८ गुरुपौर्णिमा उत्सवांना उपस्थित राहिलो. तुम्हा सर्वांना ठाउक असेल की गुरुपौर्णिमा उत्सव हा तीन दिवसांचा असतो आणि यातील एक कार्यक्रम असतो तो म्हणजे साई सच्चरित्रातचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड वाचन, ज्याला 'अखंड पारायण' म्हणतात. साई भक्तांना आपली नावं नोंदवायची असतात आणि एका लहान मुलाकडून ५४ नावं बिनक्रमाने (चिठ्या टाकून) निवडली जातात. त्यांना द्वारकामाईत बाबांच्या तसबिरीसमोर साई सच्चरित्रातचे अध्याय वाचायचे असतात. अशा एका पौर्णिमा उत्सवात, मी सुद्धा माझ नाव दिलं आणि ९ हा आकडा मला देण्यात आला. ह्याचा अर्थ असा होता की मला ९ वा अध्याय वाचायचा होता, ज्याच्यात तर्खड कुटुंबियांचे साईंप्रती असलेले प्रेम व भक्ती यांचे वर्णन केलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, हे फार आनंददायी होतं. मी द्वारकामाईत अध्याय वाचल्यावर, मला प्रतिफळ म्हणुन एक नारळ व साईंची तसबीर प्रसाद रूपाने देण्यात आली. ही तसबीर आवरणबद्ध करून फोटो फ्रेम मध्ये बसवण्यात आली आणि नित्य पूजेसाठी आमच्या घरी ठेवण्यात आली. आजमितीपर्यंत दर सकाळी, जेव्हा मी अंथरुणातून उठतो तेव्हा मी ह्या तसबिरीसमोर उभा राहातो आणि नमस्कार करतो आणि श्री साईंकडे प्रार्थना करत म्हणतो, "हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा".

====================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

विज्योत ची निर्मिती

प्रिय वाचकांनो, माझं असं मत आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतः बरोबर एक तीव्र इच्छा बाळगुन असतो. माझे वडील आम्हाला आठवण करून देत असत की ते सुद्धा श्रीमंत माणूस होते ज्यांच्या कडे बंगला, गाडी व भांडारगृह होता, जो चीनी मातीच्या भांड्यांमध्ये भरून ठेवलेल्या सर्व प्रकारच्या मिष्टान्नाने भरलेला होता. अर्थात, त्यांच्या जीवनाच्या पुढच्या काळात हे सर्व नाहीसं झालं होतं. मी त्यांचा शेवटचा मुलगा होतो. म्हणून स्वाभाविकपणे मी एक तीव्र इच्छा बाळगुन होतो की भगवंताची इच्छा झाली तर ती गमावलेली संपत्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने झटेन. अर्थात मुंबईत स्वत:चा बंगला असणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. माझी पत्नी सुद्धा खार येथील एका बंगल्यात वाढली. म्हणून ही संयुक्त इच्छा होती की स्वतःचा बंगला असावा जेणेकरून कमीतकमी आमच्या म्हातारपणात, वेळ आरामात घालवता येईल. मग १९९१ मध्ये आम्ही वानगाव येथे ६ गुंठ मापाची जागा विकत घेतली. (वानगाव हे मुंबई पासून १०० कि. मि. अंतरावर पश्चिम रेल्वेचं एक स्थानक आहे). मला माझ्या कंपनीकडून कर्ज मिळणं शक्य झालं आणि १९९३ पर्यंत आम्हाला वानगाव येथे स्वतःचा बंगला बांधता आला. आम्ही त्याला 'विज्योत' असं नाव ठेवलं. फार काळ आधी, १९६० मध्ये, जेव्हा मी पुण्याला गेलो होतो तेव्हा माझ्या शाळेच्या मित्राने मला एक बंगला दाखवला होता ज्याचं नाव होतं "लकाकी". तो बंगला होता प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मणराव काकासाहेब किर्लोस्कर यांचा. तुम्हाला त्या नावा मागचं रहस्य कळेल जर तुम्ही त्यांच्या नावाची पहिली अक्षरं काढून जोडली तर. म्हणजेच ल - का - कि. आम्हाला आमचा खार येथील बंगला आर्थिक अडचणींमुळे १९५९ मध्ये विकावा लागला होता. लकाकीला बघितल्यावर माझ्या १६ वर्षांच्या बाल मनाला तेव्हा एकच विचार आला होता की जर यदा कदाचित मी माझा बंगला बांधला तर मी त्याचं नाव विज्योत ठेवीन.

=====================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

आबा पणशीकर यांच्या कडून साई प्रसाद

अर्थात मुख्य गोष्ट पुढे आहे. जेव्हा आम्ही आमच्या बंगल्याचा आराखडा बनवला तेव्हा आम्ही पूजा व ध्यान साधण्याच्या हेतूने एक छोटं संगमरवरी मंदिर ठेवण्याचा निश्चय केला. मंदिर तयार झालं आणि आम्हाला त्यात साई बाबांची सजीव आकाराची रंगीत तसबीर ठेवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले पण आम्हाला तशी तसबीर भेटली नाही. तो एप्रिल १९९३ चा महिना होता. मुंबईने मार्चच्या महिनात दुर्दैवी बॉम्बस्फोट पाहिले होते आणि लोक अनोळखी व्यक्तीशी बोलायला भीत असत. एके दिवशी संध्याकाळी उशिरा एका अनोळखी व्यक्तीने आमच्या दरवाज्याची घंटी वाजवली. माझ्या पत्नीने दरवाजा उघडला, तेव्हा एक अनोळखी माणूस आग्रह करत होता की त्याला विशेषकरून मला भेटायचं आहे. तो माझ नाव सांगू शकत नव्हता म्हणून माझी पत्नी त्याच्या ओळखीबद्दल काहीशी शंका बाळगुन होती. मग मी हस्तक्षेप केला आणि त्यांनी मला ओळखलं. त्यांनी आठवण करून दिली की आम्ही शिर्डीत लेंडी बागेत भेटलो होतो आणि मी त्यांना बाबांचे अनुभव सांगितले होते. आता मात्र मला स्पष्ट झालं होतं की ते साई मंदिर पुणे येथील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मी त्यांना घरात येण्यास अनुमती दिली. तेव्हा आमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून आम्ही त्यांना जेवण दिलं आणि त्यांनी स्वीकार केला. आमच्या चर्चेच्या वेळी, मी त्यांना आमच्या साईंच्या रंगीत तसबिरीच्या इच्छेबद्दल सांगितलं. त्यांनी त्वरित उत्तर दिलं की आम्हाला सजीव आकारची तसबीर एका चित्रकाराकडून कॅनव्हासवर काढून घ्यावी लागेल आणि जर का आम्ही रंगीत तसबीर शोधत असू तर फक्त श्री आबा पणशीकरच आम्हाला मदत करू शकतात. त्यांच्याकडे श्री प्रभाकर पणशीकर यांचा दूरध्वनी क्रमांक होता, जे मराठीतील प्रसिद्ध रंगमंच कलाकार होते आणि आबा पणशीकर यांचे धाकटे बंडू होते.

मी मग त्यांना दूरध्वनी केला आणि श्री आबा पणशीकर यांचा दूरध्वनी क्रमांक प्राप्त केला आणि त्यांना दूरध्वनी केला. माझी रंगीत तसबिरीसाठीची विनंती ऐकल्यावर ते एवढेच म्हणाले की ते मे महिन्यात मुंबईत येणार आहेत आणि तेव्हा मी त्यांची त्यांच्या भावाच्या घरी प्रभादेवी येथे भेट घेऊ शकतो. मग मी मे पर्यंत वाट बघितली आणि एका शनिवारी संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित केली. २२ मे १९९३ला आम्ही सर्व गेलो, माझी पत्नी कुंदा, माझी मुलगी सुजल आणि माझा मुलगा महेंद्र. मला त्यांच्या बद्दल काहीच कल्पना नव्हती. एक भगवे वस्त्र परिधान केलेले व रुद्राक्ष माळा घातलेले पुरुष आमच्या समोर आले. श्री आबा पणशीकर यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि मी हात जोडून नमस्कार केला आणि माझ्या कुटुंबाची ओळख करून दिली. ते जवळपास माझ्यावर रागावले आणि म्हणाले की आम्ही रिकाम्या हाताने कसे काय आलो आणि हार पेढे ई. का नाही आणले. मी थोडा आश्चर्यचकितच झालो कारण त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हत की त्यांनी आमच्यासाठी तसबीर आणली होती. मी काही करून चूक काबुल केली आणि त्वरित सिद्धिविनायक मंदिर परिसरात गेलो आणि फुलांचा हार आणि काही पेढे विकत घेतले. ते मग आत गेले आणि स्वतः बरोबर एक विशाल आकाराचा चित्रकाम ठेवण्याचा खोका घेऊन आले. त्यांनी तो ऊघडला आणि चित्रकाम करण्याच्या कागदाचा रोल काढला. त्यांनी ती गुंडाळी उघडली आणि तेथेच आमचे साई आमच्या समोर होते, जे त्यांच्या विख्यात सिंहासनावर बसले होते आणि त्यांचे चिरंतन स्मितहास्य आम्हाला देत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मी त्या रंगीत तसबिरीला हार घातला, जी १ मी.मी. जाड कोडॅक कागदावर छापण्यात आली होती आणि सर्वांना पेढे वाटले. श्री आबांनी मग त्यावर एक मजकूर लिहिला "वीरेंद्र, कुंदा, सुजल, महेंद्र यांस आबा पणशीकर यांसकडून साई प्रसाद" आणि खाली सही केली. ते मग म्हणाले, "हा तुमचा खजीना घ्या". वाचकांनो माझ्यावर विश्वास ठेवा, तो माझ्या आयुष्याचा सुवर्ण क्षण होता. माझी वाचाच स्तब्ध झाली आणि काय करावे ते समजलेच नाही. निःसंशय, हा माझ्यासाठी अमूल्य खाजीना होता. मी पाकीटातून रु. १००१/- काढले आणि त्यांना देऊ केले पण त्यांनी ते घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की ते बाबांचे फोटो विकत नाहीत. मग मी त्यांना ते पैसे त्यांच्या लंडन येथील साई मंदिराकरिता दक्षिणा म्हणून घेण्यास सांगितले. फार अवघडपणे त्यांनी ते मान्य केलं पण पैशे हातात घेतले नाहीत आणि मला ते टेबलावर ठेवायला सांगितले. त्यांनी मग आमच्या पूर्व इतिहासाबद्दल विचारणा केली. मी मग त्यांना माझ्या वडीलांच्या साई बाबांबरोबर असलेल्या सानिध्याबद्दल सांगितलं. ते ऐकल्यावर, त्यांनी अक्षरशः मला आलिंगन दिलं आणि म्हणाले की त्यांना त्या दिवशी आपल्या जीवनाचा सर्वोच्च आनंद प्राप्त झाला आहे. ते भावूक झाले, आत गेले आणि एक रुपयाची दोन नाणी आणली आणि मला दिली. मी ती घेतली आणि त्यांच्या समोर नमस्कार केला आणि म्हणालो, "आता, मला बाबांचा खरा प्रसाद मिळाला". त्यांनी त्याचा अर्थ विचाराला. मी म्हणालो की "ही दोन नाणी बाबांच्या विश्व संदेशाचे प्रतिकआहेत, म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी, जो त्यांनी त्यांच्या जीवन काळात सबंध जगाला दिला". आबा माझ्या स्पष्टीकरणाने गहिवरून गेले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि ते असं म्हणाले की त्यांना त्या दिवशी खरा साई भक्त भेटला होता आणि त्यांनी मला आलिंगन दिलं.

मग आबांनी आम्हाला स्वतःची कहाणी सांगितली. त्यांचे वडील गिरगावच्या गणपती मंदिराचे मुख्य पुजारी होते आणि ते जेव्हा ८ वर्षांचे होते तेव्हा एक मुस्लीम फकीर त्यांच्या आवारात आला आणि त्याने साई बाबांचा फोटो त्यांना दिला. आबांनी फकिराला सांगितलं की ते एका ब्राम्हणाचे पुत्र आहेत आणि म्हणून एका मुस्लीम बाबाचा फोटो त्यांच्या घरात ठेवण्याची त्यांना स्वतःला अनुमती नाही. फकीर म्हणाला "बेटे, अब तू इसे मत ले, पर तेरी किस्मत मे लिखा है की तू इसकी जिंदगीभर सेवा करेगा और इसकी फोटो लोगोंको बॉंटा करेगा". त्या फकीराची भविष्यवाणी १०० टक्के खरी होती आणि आबा पणशीकर त्यांच्या शेवटपर्यंत साई बाबांच्या सेवेत होते. मला क्षमा करा ही विनंती करतो; मी त्यांना कैलासवासी आबा पणशीकर असं संबोधायला पाहीजे होतं कारण ते आता आपल्या मध्ये नाहीत.

त्यानंतर मी त्या मौल्यवान तसबिरीला आवरणबद्ध करण्याची उपाययोजना केली आणि तिच्यासाठी एक चांगली लाकडी फ्रेम तयार केली. १९९३ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आम्ही वानगाव येथील "विज्योत" या आमच्या बंगल्यातील छोट्या साई मंदिरात तिची स्थापना केली. तेव्हापासून आम्ही आमची गुरु पौर्णिमा तेथेच साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करतो.

तर हा होता माझा स्वतःचा छोटा स्वानुभव. मी जेव्हा इच्छा होईल तेव्हा शिर्डीला भेट देतो. मी आता एक सेवानिवृत्त व्यक्ती आहे आणि साईंच्या कृपेने एक आरामदायी जीवन जगत आहे. आम्ही आता बाबांकडे फक्त ही प्रार्थना करतो की आमच्या दोन्ही मुलांना सुद्धा जीवनसाथी म्हणून साई भक्तच मिळावेत, जेणेकरून तर्खड कुटुंबाची साई बाबांप्रती असलेली प्रेम व भक्ती अशीच चालू राहावी.

शेवटी मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की त्यांनी साई बाबांनी आपल्याला दिलेले दोन महामंत्र कधीच न विसरावेत -- ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. जर कोणी हे दोन मंत्र खरोखर पाळले तर बाबा आपल्या इच्छा न चुकता पुरवतात. मी माझे अनंत नमस्कार अर्पण करून आणि आपल्या चीर-प्रेममय साई बाबांना ही खाली दिलेली यथायोग्य घोषणा म्हणत वंदन करतो आणि आता हे पुस्तक संपवू इच्छितो.

"अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजा धीराज योगीराज परब्रम्ह

श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय"

======================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

सांताक्रूझ, मुंबईचे श्री ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड यांनी शिर्डीच्या साई बाबांबरोबरच्या आपल्या जिवंत अनुभवांचा चांगला वृत्तांत दिला होता. खरं पाहू जाता, त्यांच्या कथनातून ते साई बाबांची शिकवण चांगल्या प्रकारे उजागर करत आहेत. हे कथन, वाचकांना तर्खड कुटुंबाची बऱ्यापैकी ओळख सुद्धा करून देत आहे.

लेखक व प्रकाशक श्री वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड हे सेवानिवृत्त अभियंता आहेत, जे सांताक्रूझ, मुंबई येथे राहतात, ज्याबद्दल मुंबईतील साई भक्तांना माहिती असेल. लेखकांनी एकूण १७ अध्याय लिहिले आहेत ज्यापैकी १६ अध्याय हे त्यांच्या वडिलांचे स्वानुभव आहेत, जे ते निव्वळ आपल्या स्मृतीच्या आधारे मांडू शकले आणि वाचक, कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी लिहिलेल्या श्री साई सच्चरित्राबरोबर ते जुळवून पाहू शकतात.

श्री वीरेंद्र तर्खड यांनी त्यांच्या वडिलांच्या स्वानुभवांचा वृत्तांत साई भक्त वाचकांना दिला आहे आणि मी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. साई बाबांच्या सानिध्यात ज्योतिंद्र यांनी अनुभवलेल्या घटना ह्या साईंच्या सामर्थ्याचे बऱ्यापैकी वर्णन करतात, ज्या लेखकाने त्यांची स्मृती जिथवर आठवण करून देईल, तिथवर वस्तुस्थितीशी सुसंगत अशा प्रकाशित केल्या आहेत. लेखक एका अनोख्या पद्धतीने त्यांच्या वडिलांचा श्री साईंशी असलेला निकट ऋणानुबंध व्यक्त करत आहेत, जो माझ्या मते कौतुकास्पद आहे. मला असं वाटत की हे कथन असं सुचवतं की जेव्हा भक्त शिर्डीला जातात तेव्हा त्यांनी समाधी मंदिराचे व खंडोबा मंदिराचे दर्शन घेतले पाहिजे आणि साईंच्या शिकवणी आचरणात आणल्या पाहिजेत - म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी - जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनात सहजतेने मार्गक्रमण करता येईल.

श्री बाबासाहेब तर्खड यांना आपलं आयुष्य सुखकर करता आलं. माझे आजोबा व साई बाबांचे एक सर्वात जवळचे भक्त श्री म्हाळसापती चिमणाजी नगारे (भगत) यांनी ते पाहिलं. मला खात्री वाटते की ह्या पुस्तकाच्या वाचनाने साई भक्त वाचकांना काही मार्गदर्शन व आत्म-संतुष्टी प्राप्त होईल. हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकदा साई बाबांच्या जवळ घेऊन जाते असं मला ही प्रस्तावना लिहिताना वाटतं. मी, जो श्री म्हाळसापतींचा नातू आहे, मला ही प्रस्तावना प्रस्तुत करताना सम्मानित झाल्यासारखं वाटतं. वास्तविकपणे, मी ह्याला आमच्या कुटुंबाचा खरा सम्मान झाला असं समजतो.

रामचंद्र आत्माराम तर्खड उर्फ बाबासाहेब तर्खड यांनी श्री दासगणू महाराज यांच्या संगतीने शिर्डीतील श्री साई बाबा संस्थांनच्या स्थापनेत फार मोठं योगदान केलं होतं आणि ते संस्थांनचे पहिले खजिनदार होते. त्यांनी पुढे जाउन 'साई लीला' हे मासिक प्रकाशित केलं आणि मासिकाच्या सर्वात पहिल्या अंकासाठी प्रस्तावना लिहिली होती, आणि अशा प्रकारे इतिहास घडवला. मला सर्व साई भक्तांना सांगावसं वाटत की कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी लिहिलेल्या साई सच्चरित्राचा ९ वा अध्याय हा तर्खड कुटुंबाची साई बाबांप्रती असलेल्या शुद्ध भक्तीचा खरा खुरा वृत्तांत देतो.

शेवटी मी असं म्हणून प्रस्तावना संपवू इच्छितो :-

"अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह

श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय"

येणाऱ्या काळात, श्री साई बाबांच्या ह्या कथा असंख्य साई भक्तांकडून चांगल्या प्रकारे स्मरणात ठेवल्या जातील, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि अशाप्रकारे मी ही प्रस्तावना माझे आजोबा श्री म्हाळसापती यांच्या स्मृतीस समर्पित करत आहे, ज्यांनी श्री साई बाबांच "आओ साई" असं म्हणत खंडोबा मंदिरासमोर स्वागत केलं होतं.

मी आता ही प्रस्तावना श्री वीरेंद्र ज्योतींद्र तर्खड यांच्याकडे प्रकाशनासाठी सुपूर्द करत आहे.

मनोहर मार्तंड नगारे

===================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

परिचय

प्रिय वाचकांनो, मी हे सत्य अनुभव लिहिण्यापूर्वी तुम्हा सर्वांकडे क्षमा याचना करतो, ह्या एकाच कारणासाठी की हे माझे स्वतःचे अनुभव नाहीत, पण हे आम्हाला आमचे वडील श्री ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड यांनी ते हयात असताना वेळोवेळी कथन केले होते. माझ्या बालपणी, मी जेव्हा त्यांना कथन करताना ऐकायचो, तेव्हा ते मला काल्पनिक परीकथे प्रमाणे वाटायचे. जेव्हा मी मोठा झालो, आणि मला शिर्डीच्या श्री साई बाबांचे अलौकिक सामर्थ्य माहित झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या वडिलांनी साई बाबांबरोबरील आपल्या १० वर्षाच्या सानिध्यात काहीतरी दिव्य अनुभवलं होतं आणि तो त्यांच्या आयुष्याचा मौल्यवान संपत्ती ठेवा होता, जो एकाध्या सामान्य माणसाला प्राप्त करण्यासाठी अवघड आहे. मला नेहमी वाटायचं की हा मौल्यवान ठेवा तुम्हा सर्वांसाठी उघड केला पाहिजे पण आपली रोजची दिनचर्या अशी असते की अशा अध्यात्मिक लिखाणाकरता समर्पित करण्यासाठी आपल्याला वेळ भेटणे अवघड असतो.

मी साई बाबांच्या कर्मभूमी शिर्डीला आतापर्यंत अनेक वेळ भेट दिली आहे आणि ह्या भेटींच्या वेळी, मी बऱ्याच साई भक्तांना भेटलो आहे. ह्या भेटींच्यावेळी, एक स्वाभाविक प्रश्न उभा राहायचा की मी सुद्धा साई भक्त आहे का. मला तसं जाहीर करताना थोडा संकोच व्हायचा कारण माझे वडील ज्याप्रकारे साई पूजा करायचे, मी त्या प्रकारच्या भक्ती सेवेच्या जवळपास सुद्धा नव्हतो आणि त्या साई भक्तांना सांगायचो की श्री साई बाबांबरोबर माझा विशिष्ट प्रकारचा संबंध जोडला गेला आहे तो माझ्या वडिलांच्या त्यांच्या सानिध्यामुळे, जेव्हा ते हयात होते आणि शिर्डीत कार्यरत होते आणि हेच मुख्य कारण आहे, मी शिर्डीला का भेट देतो ह्याचे. मुख्यतः आमच्या तर्खड कुटुंबीयांत तीन व्यक्ती आहेत ज्या अशा संपर्कासाठी प्रमुखपणे कारणीभूत ठरल्या. माझी आजी, माझे आजोबा रामचंद्र आत्माराम तर्खड आणि माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड. ह्या तीन व्यक्ती श्री साई बाबांच्या संपर्कात आल्या आणि त्यांचा संग १९०८ ते १९१८ असा चालला, म्हणजेच साईंनी महासमाधी घेईपर्यंत चालला. त्यांच्या संगतीमुळे, पुढे, तर्खड कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी साई बाबा हे देव बनले.

मग तो साई भक्त, माझ्या वडिलांनी अनुभवलेला एखादा दिव्य अनुभव कथन करण्याची मला विनंती करायचा. मी तेव्हा माझ्या मनाला येईल ते सांगून त्याचं समाधान करायचो. हे घडायचं ते एका स्थळी - ते म्हणजे शिर्डीतील लेंडी बाग येथे. अनुभव ऐकल्यावर भक्त नेहमीच माझ्या समोर नमस्कार करायचा आणि माझ्या पायाला स्पर्श करायचा. मला तेव्हा फार संकोच वाटायचा. एकदा असं घडलं की पुण्यातील एका साई मंडळाने मला पुण्याला येउन, असे अनुभव पुण्यातील साई अनुयायांना कथन करण्याची विनंती केली. मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पुण्याला जाउन त्याचं समाधान केलं. तो कार्यक्रम २ तास चालला आणि माझा कथन झाल्यावर, मला नमस्कार करण्यासाठी, माझ्यासमोर एक मोठी रांग होती. मी कौटुंबिक माणूस असल्यामुळे, अशा कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निश्चय केला, या साध्या कारणासाठी की ते माझ्या वडिलांचे अनुभव होते आणि मी कथन करत असताना काही चूक करू शकतो. त्याच वेळी मी निश्चय केला की मी सेवानिवृत्त झाल्यावर, माझ्याकडे पुष्कळ मोकळा वेळ असेल, ज्याचा वापर मी तर्खड कुटुंबियांचे हे जगावेगळे अनुभव लिहिण्याकरता करेन. अर्थात, हेतू हा आहे की माझी शिर्डी साई बाबांप्रती असलेली भक्ती व प्रेम व्यक्त करणे. १८ जुन २००३ रोजी मला ६० वर्षं पूर्ण झाली व आज १५ ऑगस्ट २००३, म्हणजेच आपल्या लाडक्या भारत देशाच्या ५७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, मी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली आहे.

प्रिय साई भक्त वाचकांनो, मला हे सांगावसं वाटतं की मी मा. हेमाडपंत म्हणजेच कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर नाही, ज्यांनी चिरायू असं श्री साई सच्चरित्र लिहिलं. मी नियमितपणे हे पवित्र पुस्तक वाचतो, ज्यात ५४ अध्याय आहेत, जे शिर्डी साई बाबांच्या जीवन कालावधीच्या कार्याचा वृत्तांत देतात. ह्या पवित्र पुस्तकात काही घटना आहेत, त्या जेव्हा घडल्या तेव्हा माझे वडील सुद्धा शिर्डीत उपस्थित होते आणि मी विनम्रपणे तुम्हाला त्या सांगणार आहे, त्याच प्रकारे, ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी त्या पहिल्या होत्या आणि मला सांगितल्या होत्या. प्रिय वाचकांनो, मला कृपया क्षमा करा कारण मी ह्या घटनांची नेमकी तारीख व वेळ सांगण्यास असमर्थ आहे पण १९०८ ते १९१८ ह्या कालावधीत, माझ्या वडिलांनी शिर्डीला १७ वेळा भेट दिली होती आणि प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचा मुक्काम ८ दिवस ते एक महिना एवढा असायचा. ह्या १७ भेटींच्या दरम्यान, माझ्यावर विश्वास ठेवा, की माझ्या वडिलांना श्री साई बाबांच्या दिव्य शक्तींचा प्रत्यक्ष अनुभव आला, ज्या खऱ्या अर्थाने अदभुत होत्या. वास्तविक, मला वाटतं की त्यांनी ह्या स्वतःच लिहिल्या पाहिजे होत्या कारण ते सेंट झेवियर ह्या शाळेत शिकले होते. अर्थात, माझ्या लिहिण्याचा एकमेव हेतू निव्वळ असा आहे की श्री साई बाबांवर असलेली आमची गहन व प्रामाणिक श्रद्धा व्यक्त करावी, ज्याने मला अत्यंत मनःशांती प्राप्त होते.

प्रिय साई भक्त वाचकांनो, मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यावर, तुम्हाला वाटेल की मला सुद्धा काही दैवी अनुभव आले असतील, पण मी नम्रपणे सांगतो की, माझ्या वडिलांना ज्या प्रकारचे अनुभव मिळाले होते त्या प्रकारचे मला निश्चितपणे मिळाले नाहीत. माझी अशी धृढ समजूत आहे की माझे वडील हे श्री साई बाबांच्या संपर्कात येणे त्यांचा नशिबात लिहिलं होतं, बहुधा त्यांच्या पूर्व पुण्याई मुळे असेल आणि त्यांचे अनुभव हे सर्व त्यांच्या विवाहाच्या आधीचे होते म्हणजेच वय वर्ष १४ ते २५ या कालावधीतले. कित्येक वेळा मला आश्चर्य वाटतं की अशी दिव्य शक्ती अनुभवल्यानंतर, माझ्या वडिलांनी कौटुंबिक जीवन का स्विकारलं? तर त्या स्थितित, मी नसतो आणि कदाचित हे पुस्तक सुद्धा अस्तित्वात आलं नसतं.

आता तर्खड कुटुंबाची संक्षिप्त ओळख. आमचं मूळ जाव आहे तर्खड गाव जे वसईच्या किल्ल्यानजिक आहे. म्हणून आमचं आडनाव तर्खडकर. इतिहास काही असा आहे की माझ्या पूर्वजांनी थोर मराठा योद्धा चिमाजी आप्पा यांचा बाजूने पोर्तुगीजांविरुद्ध वसई किल्ल्याचं युद्ध लढलं होतं व त्यांना ह्या युद्धात पराभूत केलं होतं. त्यांच्या शौर्याची नोंद घेत, चिमाजी अप्पा यांनी त्यांना तर्खड गावाची जहागिरी दिली. पुढे इंग्रजांनी हा किल्ला मराठ्यांकडून घेतला आणि माझ्या पणजोबांचे वडील पांडुरंग तर्खड हे मुंबईला स्थलांतरित झाले. त्यांनी त्यांचा बंगला विल्सन महाविद्यालयाच्या नजीक चरनी रोड चौपाटीला बांधला. पांडुरंगांना दोन मुलं होती - दादोबा आणि आत्माराम. यापैकी दादोबा हे फार प्रसिद्ध व्याकरणकार झाले व त्यांनी मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी व्याकरणाची पुस्तकं लिहिली जेणेकरून ते इंग्रजी भाषा बरोबर बोलू व लिहू शकत होते. दुसरे पुत्र आत्माराम हे व्यवसायाने डॉक्टर होते. ते मुंबईचे भूतपूर्व व्हाईसरॉय(राजाचे प्रतिनिधी) यांचे कौटुंबिक डॉक्टर होते. माझे आजोबा रामचंद्र आत्माराम तर्खड हे सुत वस्त्र उद्योगातील तज्ञ होते आणि ते खटाव गिरणी उद्योग समुहाचे सचिव होते. त्यांनी त्यांचं घर दार वांद्रे येथे स्थापन केलं होतं आणि पुढे शिर्डी साई बाबांच्या सान्निध्यात आले. ते शिर्डी साई संस्थानचे संस्थापक सदस्य तसेच पहिले खजिनदार होते. त्यांनी दासगणू महाराजांना सर्वतोपरी सहाय्य देऊ केलं, जे बाबांचा संदेश मुंबई तसेच महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवत होते. जेव्हा तुम्ही शिर्डी साई समाधी मंदिराला भेट द्याल, तेव्हा तुम्हाला त्या काळच्या बाबांच्या भक्तांच्या फोटोंमध्ये त्यांचे फोटो दिसतील. कै. अण्णासाहेब दाभोळकर यांनी विख्यात साई सच्चरित्र हे पुस्तक लिहिलं आहे, ज्यात शिर्डीतील बाबांच्या त्यांच्या जीवन काळातील लीला विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत.

साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय तर्खड कुटुंबियांचे साई बाबांबरोबरचे अनुभव कथन करतो. ९ व्या अध्यायात सांगितलेले बाबासाहेब तर्खड हे माझ आजोबा आहेत. ज्या श्रीमती तर्खड सांगण्यात आल्या आहेत, ती माझी आजी आणि त्यांचा मुलगा सांगण्यात आला आहे ते माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड. ह्या पुस्तकात जे जीवन अनुभव मी सांगणार आहे ते मुख्यतः माझे वडील ज्योतिंद्र यांचे आहेत. ते १५ जून १८९५ ला जन्मले आणि १६ ऑगस्ट १९६५ ला त्याचं निर्वाण झालं. लेखकाची संक्षिप्त माहिती देणे या क्षणी योग्य राहील. माझं नाव आहे वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड, ज्योतीन्द्रांचा दुसरा मुलगा. पहिला मुलगा म्हणजे रवींद्र, ज्याचं निर्वाण झालं आहे. मी व्यवसायाने एक अभियंता आहे आणि दोन कंपन्यांमध्ये व्यवस्थापकिय अधिकारी म्हणून काम केलं आहे, क्रॉम्पटन ग्रिव्ज व सिमेन्स इंडिया. सध्या मी एक सेवानिवृत्त व्यक्ती आहे आणि सांताक्रूझ येथे राहात आहे.

प्रिय साई भक्तांनो, हे पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्हाला माझी भेट घ्यायची इच्छा झाली तर अवश्य घ्या पण निव्वळ साई बाबांप्रती असलेली आपली परस्परांची भक्ती व्यक्त करण्यासाठी.

-- वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड

==================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई सच्चरित्रातले इतर प्रसंग

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय वाचकांनो, मला पुन्हा एकदा वाटतं की ह्या अध्यायातले प्रसंग हे मुख्यतः त्या लोकांसाठी आहेत, ज्यांनी साई सच्चरित्र वाचलं आहे. अर्थात निःसंशयपणे इतरांनाही हे बऱ्यापैकी मनोरंजक वाटेल. साई सच्चरित्रामध्ये पुष्कळ घटना सांगितलेल्या आहेत जेव्हा माझे वडील तेथे शिर्डीमध्ये उपस्थित होते, आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी त्या सांगितल्या होत्या, ज्या मी तुम्हा सर्वांसमोर मांडणार आहे. मला खात्री वाटते, की कित्येक भक्त जे त्या वेळी तेथे उपस्थित होते, त्यांनी सुद्धा तेच अनुभवलं असेल. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला ते थेट माझ्या वडिलांकडून ऐकावयास मिळालं आणि जसं ते माझ्या स्मृतीत साठवलं गेलं, तसच मी ते तुमच्यापुढे उघड करणार आहे. मला निश्चितपणे वाटतं की जर मी कुठे चुकलो तर तुम्ही मला क्षमा कराल.

===================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

श्रींबरोबरचे इतर अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय वाचकांनो, आधी सांगितल्याप्रमाणे, माझ्या वडिलांनी शिर्डीला १७ वेळा भेट दिली होती आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ७ दिवस ते एक महिना असायचा. त्यांच्या मुक्कामाच्या वेळी, त्यांना बाबांच्या अशा काही मनोरंजक लीला अनुभवायला मिळायच्या की त्यांना शिर्डी सोडून जावसं कधीच वाटायचं नाही. अर्थात बाबांकडून निघण्याचा आदेश मिळताच ते शिर्डीतून निघून जायचे. माझ्या वडिलांकडे ह्या अनुभवांचा चांगला संग्रह होता, जे मी कदाचित सर्व आठवू शकणार नाही. ह्या अध्यायात, मी तुम्हाला ह्यातील काही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जे साई सच्चरित्रात वर्णन केलेल्या अनुभवांच्या व्यतिरिक्त आहेत. मला खात्री वाटते की त्या काळच्या साई भक्तांनी असे कित्येक मनोरंजक अनुभव पहिले असतील आणि त्यांनी ते आपल्या प्रियजनांना सांगितले असतील. मी तुम्हाला ते सांगत आहे ते निव्वळ श्री साईंबद्दल माझं प्रेम व भक्ती व्यक्त करण्यासाठी.