ManacheShlok2

|| Shri Ganeshaya Namah ||

|| Shri Sharada Namah ||

|| shri Sadguru Namah ||

श्री मनाचे श्लोक - १०१ ते २०५

जया नावडे नाम त्या यम जाची।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥

म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।

मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥

One who does not like the name of God, Yama tortures him.

One in whose mind, arise doubts and negative thoughts regarding the name of God, he gets the bad bad hell.

That is why, one should repeat the name of God, with utmost respect.

On repeating the name of God by your speech, the bad qualities in you (ego, anger, hatred, jealousy, selfishness etc.) go away naturally.

अती लीनता सर्वभावे स्वभावें।

जना सज्जनालागिं संतोषवावे॥

देहे कारणीं सर्व लावीत जावें।

सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥

One must be most humble, by all means, naturally

One must satisfy all the people and the virtuous ones.

One must employ his body for service and good cause.

One must worship God with form, with utmost respect.

हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।

देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥

परद्रव्य आणीक कांता परावी।

यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥

While singing the glory of Hari (doing Kirtan), one must be filled with love for Lord Rama.

One must forget his body consciousness, while expounding the glory of God.

O My mind, shun away desire for others wealth and others wife from the heart.

क्रियेवीण नानापरी बोलिजेंते।

परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥

मना कल्पना धीट सैराट धांवे।

तया मानवा देव कैसेनि पावे॥१०४॥

विवेके क्रिया आपुली पालटावी।

अती आदरे शुद्ध क्रीया धरावी॥

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।

मना कल्पना सोडिं संसारतापा॥१०५॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।

विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥

दया सर्वभुतीं जया मानवाला।

सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥

मना कोपआरोपणा ते नसावी।

मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।

मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥

O my mind, let there be no anger filled accusations

O my mind, let thy intellect be (merged) with Saints

O my mind, give up company of the fallen and wicked

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

जनी हीत पंडीत सांडीत गेले।

अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥

तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।

मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।

दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।

विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥

तुटे वाद संवाद तेथें करावा।

विविके अहंभाव हा पालटावा॥

जनीं बोलण्यासारिखे आचरावें।

क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥

बहू शापिता कष्टला अंबऋषी।

तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥

दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।

कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥

गजेंदु महासंकटी वास पाहे।

तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥

उडी घातली जाहला जीवदानी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥

अजामेळ पापी तया अंत आला।

कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥

अनाथासि आधार हा चक्रपाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥

अजामेळ - अजामेळ नावाचा ब्राम्हण

पापी - दुराचारी, पातकी

तया - त्याला, त्याचा

अंत - देहांत, मृत्यू

आला - आला

कृपाळूपणे - देवाच्या कृपेमुळे

तो - तो ब्राम्हण

जनीं - जगातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून

मुक्त - मुक्त

केला - देवाने त्याला केला

अनाथासि - अनाथांसाठी, दिन दुबळ्यांसाठी

आधार - आधार

हा - हा

चक्रपाणी - सुदर्शन चक्र धारण करणारा देव'

नुपेक्षी - उपेक्षा करत नाही

कदा - कधीही

देव - देव

भक्ताभिमानी - भक्तांबद्दल अभिमान बाळगून आहे

अजामेळ नावाच्या ब्राम्हणाचा जेव्हा देहत्याग झाला, तेव्हा त्याचे पापाचरण असून देखील देवाने त्याला कृपाळूपणे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्रदान केली.

हा सुदर्शन चक्र धारण करणारा देव (चक्रपाणी), अनाथांचा आधार आहे.

देव आपल्या भक्तांची कधीही' उपेक्षा करत नाही तसेच भक्तांबद्दल अभिमान बाळगून आहे.

अजामेळ ब्राम्हण आधी सदाचारी होता आणि त्याचे सर्व आचार विचार चांगले होते पण एके दिवशी तो वनात गेला असता तिकडे एक शूद्र पुरुष व वेश्या स्त्री यांचा मैथुन प्रसंग पाहून त्याची बुद्धी फिरली व त्याने त्या वेश्येला घरात स्थान देऊन तिच्याशी विवाह केला. आपल्या चांगल्या कुळातील पत्नीचा त्याग केला. पुढे वेश्येला खुश ठेवण्यासाठी व घर चालवण्यासाठी तो गैर मार्गाने धन अर्जित करू लागला. त्याने सर्व शास्त्रोक्त आचार विचार सोडून दिले.

परंतु देहांताच्या वेळी जेव्हा त्याच्या पाप आचरणामुळे त्याला यमदूत घेऊन जायाला आले, तेव्हा तो आपला सर्वात लहान पुत्र 'नारायण' यावरील असलेल्या मायेमुळे, त्याला जोरजोराने हाका मारु लागला. जरी त्याने आपल्या पुत्राला हाक मारली तरी ते देवाचे नाव असल्यामुळे तिकडे विष्णुदूत आले आणि त्यांनी त्याला यमदूतांच्या तावडीतून सोडवले. हे जीवनदान भेटल्यानंतर अजामेळाला आपली चूक समजली व त्याने पुढे भक्ती मार्ग स्वीकारला व हरिद्वारला गेला. पुढे त्याला वैकुंठ धामाची प्राप्ती झाली व तो मुक्त झाला. ह्या पौराणिक कथेवरून देवाचं नाम घेण्याचं माहात्म्य कळून येतं.

विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।

धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।

जना रक्षणाकारणे नीच योनी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।

म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥

न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।

तया कारणें वामनू चक्रपाणी॥

द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥

अहल्येसतीलागी आरण्यपंथे।

कुडावा पुढे देव बंदी तयांते॥

बळे सोडितां घाव घालीं निशाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥

तये द्रौपदीकारणे लागवेगे।

त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥

कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥

तये = त्या भक्त असलेल्या

द्रौपदीकारणे = दौपदीसाठी

लागवेगे = लगबगीने

त्वरे = त्वरित

धावतो = धावतो, धावला

सर्व = सर्वकाही

सांडूनि = सोडूनि

मागे = मागे

कळीलागि = ह्या कलियुगात, ह्या वितंडवादी कलियुगातील लोकांसाठी

जाला = झाला, अवतार घेतला

असे = आहे

बौद्ध = गौतम बुद्ध

मौनी = मौनव्रत धारण केलेला, शांततेचा मार्ग शिकवणारा

नुपेक्षी = उपेक्षा करत नाही

कदा = कधीही

देव = देव, श्री राम

भक्ताभिमानी = भक्तांबद्दल अभिमान बाळगून आहे

जेव्हा द्रौपदीने चीरहरण होत असताना देवाचा धावा केला, तेव्हा त्या भक्त असलेल्या दौपदीसाठी, देव हातातले सर्व काही सोडून, लगबगीने त्वरित धावत गेला. तिला वस्त्र पुरवून तिचं चीरहरणापासून रक्षण केलं.

ह्या वितंडवादी कलियुगातील लोकांसाठी, देवाने मौनव्रत धारण करून शांततेचा मार्ग शिकवणाऱ्या गौतम बुद्धांचा अवतार घेतला. देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही तसेच तो भक्तांबद्दल अभिमान बाळगून आहे.

अनाथां दिनांकारणे जन्मताहे।

कलंकी पुढे देव होणार आहे॥

तया वर्णिता शीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥

अनाथां = अनाथांसाठी

दिनांकारणे = दिन-दुबळ्यांसाठी, त्यांच्या रक्षणाकरिता

जन्मताहे = देव जन्म घेतो, देव वारंवार अवतार घेतो

कलंकी = कल्की अवतार

पुढे = भविष्यात

देव = देव

होणार = अवतार घेणार

आहे = आहे

तया = त्याला, देवाला

वर्णिता = गुणांचे वर्णन करता

शीणली = थकली

वेदवाणी = सर्व वेद शास्त्र

नुपेक्षी = उपेक्षा करत नाही

कदा = कधीही

देव = देव, श्री राम

भक्ताभिमानी = भक्तांबद्दल अभिमान बाळगून आहे

अनाथ तसेच दिनदुबळ्या जनतेच्या रक्षणाकरिता, देव वारंवार अवतार घेतो. भविष्यात देव कल्की अवतार घेणार आहे.

त्याच्या गुणांचे वर्णन करता करता सर्व वेद शास्त्र थकून गेले. देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही तसेच तो भक्तांबद्दल अभिमान बाळगून आहे.

जनांकारणे देव लीलावतारी।

बहुतांपरी आदरें वेषधारी॥

तया नेणती ते जन पापरूपी।

दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।

कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥

देहेभावना रामबोधे उडाली।

मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥

मना वासना वासुदेवीं वसों दे।

मना कामना कामसंगी नसो दे॥

मना कल्पना वाउगी ते न कीजे।

मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥

गतीकारणे संगती सज्जनाची।

मती पालटे सूमती दुर्जनाची॥

रतीनायिकेचा पती नष्ट आहे।

म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥

मना अल्प संकल्प तोही नसावा।

सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥

जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।

रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥

भजाया जनीं पाहतां राम एकू।

करी बाण एकू मुखी शब्द एकू॥

क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।

धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले।

तयाचेनि संतप्त तेही निवाले॥

बरें शोधल्यावीण बोलो नको हो।

जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।

जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥

तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।

तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥

नसे गर्व आंगी सदा वीतरागी।

क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥

नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।

इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥

धरीं रे मना संगती सज्जनाची।

जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥

बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।

महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥

भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।

भयातीत तें संत आनंत पाहे॥

जया पाहतां द्वैत कांही दिसेना।

भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।

परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥

देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।

जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥

भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।

जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।

जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।

अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥

अभावे कदा पुण्य गांठी पडेना।

जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।

गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥

गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।

जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥

म्हणे दास सायास त्याचे करावे।

जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥

गुरू अंजनेवीण तें आकळेना।

जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥

कळेना कळेना कळेना कळेना।

ढळे नाढळे संशयोही ढळेना॥

गळेना गळेना अहंता गळेना।

बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥

अविद्यागुणे मानवा उमजेना।

भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥

परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।

परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥

जगी पाहतां साच ते काय आहे।

अती आदरे सत्य शोधुन पाहे॥

पुढे पाहतां पाहतां देव जोडे।

भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥

सदा वीषयो चिंतितां जीव जाला।

अहंभाव अज्ञान जन्मास आला॥

विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।

जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।

अकस्मात आकारले काळ मोडी॥

पुढे सर्व जाईल कांही न राहे।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥

फुटेना तुटेना चळेना ढळेना।

सदा संचले मीपणे ते कळेना॥

तया एकरूपासि दूजे न साहे।

मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥

निराकार आधार ब्रह्मादिकांचा।

जया सांगतां शीणली वेदवाचा॥

विवेके तदाकार होऊनि राहें।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥

जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।

जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥

जनीं पाहता पाहणे जात आहे।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।

नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥

म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥

खरें शोधितां शोधितां शोधिताहे।

मना बोधिता बोधिता बोधिताहे॥

परी सर्वही सज्जनाचेनि योगे।

बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥

खरे - खरे ज्ञान, आत्म्याचे ज्ञान किंवा परब्रम्हाचे ज्ञान, म्हणजे आपण देह-मन-बुद्धी नसून स्वतः परब्रह्म म्हणजेच सर्वव्यापक व सर्वशक्तिमान देव आहोत ह्याचा अनुभव घेणे.

शोधिता शोधिता शोधिताहे - शोधण्याचा आपण खूप प्रयत्न करत असतो

मना - मनाला

बोधिता बोधिता बोधिताहे - काही बोध होतो का त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो

परी - पण

सर्वही - हे सर्व गुह्य ज्ञान

सज्जनाचेनि - संत, सज्जन, गुरु ह्यांचा

योगे - संग झाल्यावरच प्राप्त होते

बरा - चांगल, पक्क

निश्चयो - आत्म्याच निश्चयपूर्वक ज्ञान

पाविजे - प्राप्त होते

सानुरागे - .अनुरागासहित, प्रेमासहित, गुरु जो प्रेमाने अनुग्रह देतो त्यामुळेच

खरे काय* ते शोधण्याचा आपण खूप प्रयत्न करत असतो. मनाला काही बोध होतो का त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो.

पण हे सर्व गुह्य ज्ञान आपल्याला गुरूचा संग झाल्यावरच प्राप्त होते. गुरु जो प्रेमाने अनुग्रह देतो त्यामुळेच आपल्याला आत्म्याच पक्क निश्चयपूर्वक ज्ञान प्राप्त होते.

खरे काय* - म्हणजे आपण देह-मन-बुद्धी नसून स्वतः परब्रह्म म्हणजेच सर्वव्यापक व सर्वशक्तिमान देव आहोत ह्याचा अनुभव घेणे. ह्यालाच आत्म्याचे ज्ञान किंवा परब्रम्हाचे ज्ञान म्हणतात.

बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।

परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥

मना सार साचार ते वेगळे रे।

समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।

समाधान कांही नव्हे तानमाने॥

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।

समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥

महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे।

खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥

द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।

तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।

बरे पाहता गूज तेथेचि आहे॥

करी घेउ जाता कदा आढळेना।

जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥

म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।

अतर्कासि तर्की असा कोण आहे॥

जनीं मीपणे पाहता पाहवेना।

तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥

बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे।

जया निश्चयो येक तोही न साहे॥

मती भांडती शास्त्रबोधे विरोधें।

गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे॥१५७॥

श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।

स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥

स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।

मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।

तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥

अहंभाव ज्या मानसीचा विरेना।

तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥

नको रे मना वाद हा खेदकारी।

नको रे मना भेद नानाविकारी॥

नको रे मना शीकवूं पूढिलांसी।

अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥

अहंतागुणे सर्वही दुःख होते।

मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥

सुखी राहता सर्वही सूख आहे।

अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥

अहंतागुणे नीति सांडी विवेकी।

अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥

परी अंतरी अर्वही साक्ष येते।

प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।

देहातीत ते हीत सांडीत गेला॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।

सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥

मनें कल्पिला वीषयो सोडवावा।

मनें देव निर्गूण तो ओळखावा॥

मनें कल्पिता कल्पना ते सरावी।

सदा संगती सज्जनाची धरावी॥१६४॥

देहादीक प्रपंच हा चिंतियेला।

परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥

हरीचिंतने मुक्तिकांता करावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥

अहंकार विस्तारला या देहाचा।

स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥

बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥

बरा निश्चयो शाश्वताचा करावा।

म्हणे दास संदेह तो वीसरावा॥

घडीने घडी सार्थकाची धरावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥

करी वृत्ती जो संत तो संत जाणा।

दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥

उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।

परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥

नसे अंत आनंत संता पुसावा।

अहंकारविस्तार हा नीरसावा॥

गुणेवीण निर्गुण तो आठवावा।

देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥

देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी।

विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥

तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे।

म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥

असे सार साचार तें चोरलेसे।

इहीं लोचनी पाहता दृश्य भासे॥

निराभास निर्गुण तें आकळेना।

अहंतागुणे कल्पिताही कळेना॥१७१॥

स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या।

स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या॥

मुळीं कल्पना दो रुपें तेचि जाली।

विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली॥१७२॥

स्वरुपी उदेला अहंकार राहो।

तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥

दिशा पाहतां ते निशा वाढताहे।

विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना।

भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो।

दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥

विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।

परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥

हरू जाळितो लोक संहारकाळी।

परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा।

असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥

जगी देव धुंडाळिता आढळेना।

जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥

तुटेना फुटेना कदा देवराणा।

चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥

कळेना कळेना कदा लोचनासी।

वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥

जया मानला देव तो पुजिताहे।

परी देव शोधुनि कोणी न पाहे॥

जगी पाहता देव कोट्यानुकोटी।

जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले।

तया देवरायासि कोणी न बोले॥

जगीं थोरला देव तो चोरलासे।

गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥

गुरु पाहता पाहता लक्ष कोटी।

बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥

मनी कामना चेटके धातमाता।

जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु।

नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू।

जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू ॥१८१॥

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।

क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥

मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।

मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे ॥१८२॥

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।

कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥

प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।

तयाचेनि योगे समाधान बाणे ॥१८३॥

नव्हे तोचि जाले नसे तेचि आले।

कळो लागले सज्जनाचेनि बोले॥

अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।

मना संत आनंत शोधीत जावे ॥१८४॥

लपावे अति आदरे रामरुपी।

भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी॥

कदा तो जनी पाहतांही दिसेना।

सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥१८५॥

सदा सर्वदा राम सन्नीध आहे।

मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥

अखंडीत भेटी रघूराजयोगू।

मना सांडीं रे मीपणाचा वियोगू ॥१८६॥

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।

परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥

मना भासले सर्व काही पहावे।

परी संग सोडुनि सुखी रहावे ॥१८७॥

देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे।

विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥

विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे।

परी संग सोडुनि सुखी रहावे ॥१८८॥

मही निर्मिली देव तो ओळखावा।

जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥

तया निर्गुणालागी गूणी पहावे।

परी संग सोडुनि सुखे रहावे ॥१८९॥

श्री गणेशाय नमः

श्री शारदा नमः

श्री सद्गुरू नमः

ज्या देवाने ही पृथ्वी (तसेच पृथ्वीवरील डोंगर, दर्या, झाडे, नद्या इ. निसर्ग) निर्माण केली, त्या देवाला आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच पृथ्वीवरील निसर्गाची कलाकृती पाहून, आपल्याला त्या मागे देवाचा हात आहे हे जाणून देवाच्या सामर्थ्याबद्दल अचंबा वाटला पाहिजे व त्या देवाचे स्वरूप जाणण्याची आपल्याला ओढ निर्माण झाली पाहिजे.

त्या निर्गुण देवाला (म्हणजेच ब्रम्हाला किंवा आत्म्याला) जाणले असता (म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असता) आपल्याला तात्काळ मोक्ष प्राप्त होतो.

त्या नाव व रूप नसलेल्या निर्गुण देवाला (म्हणजे ब्रम्हाला) आपण दृश्य श्रुष्टीच्या चराचरात पाहिले पाहिजे.

तरीही आपण सर्व रामरहित आसक्ती व विषयांची संगत सोडून, देवामध्ये सुखी व समाधानी राहिले पाहिजे.

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।

पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥

तया निर्विकल्पासि कल्पित जावे।

परि संग सोडुनि सुखे रहावे ॥१९०॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना।

तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना॥

परब्रह्म तें मीपणे आकळेना।

मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥१९१॥

मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥

तया खुण ते हीन दृष्टांत पाहे।

तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥

नव्हे जाणता नेणता देवराणा।

न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।

श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥

वसे हृदयी देव तो कोण कैसा।

पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥

देहे टाकिता देव कोठे पहातो ।

परि मागुता ठाव कोठे रहातो ॥१९४॥

बसे हृदयी देव तो जाण ऐसा।

नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥

सदा संचला येत ना जात कांही।

तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥१९५॥

नभी वावरे जा अणुरेणु काही।

रिता ठाव या राघवेवीण नाही॥

तया पाहता पाहता तोचि जाले।

तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥१९६॥

नभासारिखे रुप या राघवाचे।

मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥

तया पाहता देहबुद्धी उरेना।

सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥१९७॥

नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे।

रघूनायका ऊपमा ते न साहे॥

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे।

तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥१९८॥

अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे।

तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥

अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे।

दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे ॥१९९॥

कळे आकळे रुप ते ज्ञान होता।

तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥

मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।

तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥२००॥

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।

मनी मानसी द्वैत काही वसेना॥

बहूता दिसा आपली भेट जाली।

विदेहीपणे सर्व काया निवाली ॥२०१॥

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।

परी अंतरी पाहिजे यत्न केले॥

सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।

धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥२०२॥

मना सर्वही संग सोडूनि द्यावा।

अती आदरे सज्जनाचा धरावा॥

जयाचेनि संगे महादुःख भंगे।

जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥

श्री गणेशाय नमः

श्री शारदा नमः

श्री सदगुरु नमः

मना - हे मना

सर्वही - रामरहित इतर सर्व

संग - आसक्ती, सांसारिक गोष्टींचं आकर्षण, सांसारिक नाती गोती यांवर असलेली माया.

सोडुनि द्यावा - सोडून दे, त्याग कर, पाठ फिरव

अति आदरे - अत्यादराने, अतिशय आदराने, श्रेष्ठ आदराने.

सज्जनाचा - सज्जनाचा संग, सदगुरूचा संग

धरावा - धरावा, करावा

जयाचेनि - ज्याच्या म्हणजे सदगुरुच्या केवळ

संगे - संगाने, संगतीने

महादुःख - जीवदशेबरोबर आलेली मोठी दुःखे - जन्म (गर्भवास), मृत्यू , जरा, व्याधी इ.

भंगे - नाहीशी होतात, मिथ्या आहेत हे कळतं.

जनीं - जनांना, लोकांना

साधनेवीण - कुठलीही कठोर साधना (प्रयत्न) न करता. उ. उपवास, जप, शरीराला कष्ट देणे. सहजरित्या

सन्मार्ग - योग्य मार्ग, भगवंताचा मार्ग, चांगला मार्ग.

लागे - प्राप्त होतो

हे मना, तुझी इतर सर्व ठिकाणी असलेली आसक्ती (रामरहित आसक्ती) सोडून दे. अत्यंत आदराने सदगुरुचा संग धर.

ज्याच्या केवळ संगतीने आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून जन्म (गर्भवास), मृत्यु, जरा, व्याधी इ. (जीवदशेबरोबर आलेली महादुःखे ) नाहीशी होतात (मिथ्या आहेत हे कळल्यामुळे).

ज्याच्या केवळ संगतीने, लोकांना कुठलीही कठोर साधना न करता विनासायास सन्मार्ग म्हणजेच भगवंताचा मार्ग प्राप्त होतो.

मना संग हा सर्वसंगास तोडी।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥

मना संग हा साधना शीघ्र सोडी।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥२०४॥

मना - हे मना

संग - सज्जन संग, सदगुरूचा संग

हा - हा संग

सर्व - इतर सर्व

संगास - रामरहित आसक्तीस, सांसारिक गोष्टींचं आकर्षण, सांसारिक नाती गोती यांवर असलेली माया यांस

तोडी - तोडतो, सोडवतो, नष्ट करतो

मना - हे मना

संग - सज्जन संग, सदगुरूचा संग

हा - हा संग

मोक्ष - मोक्ष, सिद्धावस्था

तत्काळ - लवकरच, लगेच, शीघ्र गतीने

जोडी - प्राप्त करून देतो

मना - हे मना

संग - सज्जन संग, सदगुरूचा संग

हा - हा संग

साधका - साधकास, आध्यात्मिक करणाऱ्या जीवास

शीघ्र - लवकरच

सोडी - सोडवतो (भवबंधनातून, जीवदशेतून, जीवदशेबरोबर येणाऱ्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इ. दुःखापासून

मना - हे मना

संग - सज्जन संग, सदगुरूचा संग

हा - हा संग

द्वैत - द्वैत, आपण सुख-दुःख भोगणारे एक वेगळे जीव आहोत हि भावना

निःशेष - पूर्णपणे, समूळ

मोडी - नष्ट करतो, घालवतो

हे मना, हा सदगुरूचा संग, इतर सर्व रामरहित आसक्तीस नष्ट करतो. (नैसर्गिक रित्या, कुठल्याही बळजबरीविना)

हे मना, हा सदगुरूचा संग लवकरच सिद्धावस्था प्राप्त करून देतो.

हे मना, हा सदगुरूचा संग, साधकास लवकरच भवबंधनातून सोडवतो.

हे मना, हा सदगुरूचा संग, साधकाची द्वैतावस्था पूर्णपणे नष्ट करतो.

मनाची शते ऐकता दोष जाती।

मतीमंद ते साधना योग्य होती॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।

म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥२०५॥

मनाची शते - मनाचे शंभराधिक (२०५) श्लोक

ऐकता - ऐकल्यास (व मनन केल्यास)

दोष जाती - माणसाच्या अंतरंगातले दोष ( काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य इ. ) निघून जातात. हे दोष तसेच राहिले तर माणसाच्या हातून पाप घडते व त्याची शिक्षा म्हणून त्याला दुःख भोगावे लागते.

चढे - प्राप्त होते, वाढते

ज्ञान - आध्यात्मिक ज्ञान, शहाणपण

वैराग्य - अनासक्ती, ईश्वराव्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीवर आसक्ती नसणे (ती नश्वर आहे हे जाणल्यामुळे )

सामर्थ्य - आध्यात्मिक अधिकार, प्रपंच तसेच परमार्थात चोख कामगिरी करण्याची शक्ती.

आंगी - स्वतःमध्ये

मतिमंद - जढ - मूढ बुद्धी असलेले जीव, आध्यात्मिक शहाणपण नसलेले लोक, केवळ प्रपंचात मग्न असलेले व म्हणून अध्यात्माचे/ धर्माचे ज्ञान नसलेले लोक.

ते - ते लोक

साधना योग्य - आध्यात्मिक साधना करण्यास योग्य होतील. आध्यात्मिक शाळेत त्यांचा प्रवेश होईल व तेथून त्यांची पुढे आध्यात्मिक प्रगती होईल.

होती - होतील

म्हणे - म्हणतात

दास - समर्थ रामदास स्वामी

विश्वासता - मनाच्या श्लोकांवर विश्वास ठेवल्यास

मुक्ती - मुक्ती, मोक्षपद

भोगी - सुख प्राप्त होते, अनुभवास येते

ह्या श्लोकामध्ये मनाचे श्लोक ऐकण्याची फलश्रुती सांगण्यात आली आहे.

मनाचे २०५ श्लोक ऐकल्यास व त्यांचे मनन केल्यास, माणसाच्या अंतरंगातले दोष (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य इ.) निघून जातात.

जड - मूढ बुद्धीचे लोकही आध्यात्मिक साधना करण्यास पात्र होतील. तसेच श्रवण केल्याने स्वतःमध्ये ज्ञान, वैराग्य भाव व सामर्थ्य उत्पन्न होते.

श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मनाच्या ह्या २०५ श्लोकांवर विश्वास ठेवल्यास, मोक्षसुख प्राप्त होईल.