मागील कार्यक्रम - पेंडसे समाज कल्याण मंडळाचा वर्धापन दिन, दिनांक २६ एप्रिल २०२५
पेंडसे समाज कल्याण मंडळाचा वर्धापन दिन दि. ११ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात साजरा
झाला.
संमेलन स्थळ: "सक्षम" दिव्यांगांकरिता शिकवणी, वरद हाऊसिंग सोसायटी, विठ्ठल वाडी, सुजाता मस्तानी जवळ, हिंगणे, पुणे - ५१
वर्धापन दिन वृत्तांत
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पेंडसे समाज कल्याण मंडळाचा वर्धापन दिन एका नवीन सामाजिक उपक्रमांतर्गत "सक्षम" दिव्यांगांकरिता शिकवणी, हिंगणे-पुणे येथे दि. २६ एप्रिल २०२५ रोजी साजरा करण्यात आला. प्रथम सकाळी ११ वाजता सर्व पेंडसे-महाजन मंडळी कार्यक्रमस्थळी एकत्र जमली. चहा-बिस्किटांचा आस्वाद घेऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सूत्रसंचालन करणाऱ्या सौ.अंजली मिलिंद यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. माधव पेंडसे "सक्षम"च्या संचालिका सौ. श्वेता लिमये, कार्याध्यक्षा सौ. हेमांगी महाजन, कार्यवाह श्री. राजीव पेंडसे यांना दीपप्रज्वलन करून स्थानापन्न होण्याची विनंती केली. नंतर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यांत मरण पावलेल्या निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मग कु. प्राजक्ला लिमये आणि कु. इरा कुलकर्णी या "सक्षम"च्या विद्यार्थिनींनी अत्यंत सुश्राव्य असे ईशस्तवन सादर केले.
त्यानंतर प्रास्ताविक सादर करताना मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. हेमांगी महाजन म्हणाल्या की मंडळाचा वाढदिवस "सक्षम" च्या बालगोपाळांबरोबर साजरा करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे. त्यानंतर "सक्षम" बद्दल माहिती देताना सौ. श्रुती लिमये म्हणाल्या की त्यांच्या दिव्यांग मुलीला प्राजक्ताला शिकविताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. विशेष मुलांच्या शाळेत शिकवतानाही असे जाणवले की या मुलांच्या गरजा तिथे पूर्ण होत नाहीत. काही पालकांनी केलेल्या आग्रहामुळेच मी क्लास सुरु केला. जून २४ मध्ये ५ मुले दहावीसाठी तर ३ मुले पाचवीच्या मुक्त शाळेतून परीक्षा देण्यासाठी येऊ लागली. जी सर्व उत्तम गुण मिळून उत्तीर्ण झाली. मागील शैक्षणिक वर्षात क्लासमधील मुलांची संख्या २३ झाली, ज्यात १३ मुले दहावीची, ५ मुले पाचवीची, तर इतर मुले लेखन-वाचन, गणित दोष सुधारण्यासाठी येत होती. त्यांना शिकवण्यासाठी आम्ही Video खेळ साहित्य, अनेक Flash Cards, प्रत्यक्ष स्थळांना भेटी. तसेच सर्व सणवार साजरे करणे. किल्ला बनविणे, सहली नेणे असे उपक्रम राबवित असतो.
त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष श्री. माधव पेंडसे यांनी सौ. श्वेता लिमये आणि सौ. मधुरा कुलकर्णी यांना रु.२०,०००/- धनादेश सुपूर्द केला. यावेळी उत्स्फूर्तपणे श्रीमती सुनेत्रा पेंडसे, सौ. योगिनी मराठे, सो. माधुरी बापट यांनीही "सक्षम" ला वैयक्तिक देणगी दिली. सौ. अंजली पेंडसे यांनी "सक्षम" ला १० बेंचेस दिले.
मग "सक्षम" बद्दल दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त करताना लिमये आणि कुलकर्णी मॅडमच्या कामाची खूप प्रशंसा केली. एका दिव्यांग विद्यार्थ्याने सुंदर मनोगत आणि मग नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळविली.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री. माधव पेंडसे यांनी सौ. लिमये आणि सौ. कुलकर्णी या दिव्यांगासाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे असे सांगत त्यांचे कौतुक केले. अशा मुलांसाठी, त्यांच्या शालेय शिक्षणसाठी खूप वेगळी तयारी करून घ्यावी लागते. ती जिद्द लागते, सातत्य लागते. असे सांगत अध्यक्षांनी पुन्हा एकदा लिमये मॅडमना शाबासकी दिली व "सक्षम" च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सौ. योगिनी मराठे यांनी आभारप्रदर्शनाचे गोड काम केले व नंतर मंडळातर्फे देण्यात आलेल्या मटार करंजी व कैरीच्या पन्ह्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.
अशा रितीने या दिव्यांग मुलांच्या जडणघडणीत आपला खारीचा वाटा उचलून मंडळाने आपला वर्धापन दिन साजरा केला. मनात एक आगळे समाधान आणि लिमये, कुलकर्णी मॅडमबद्दल कृतज्ञता घेऊन सर्व पेंडसे-महाजन मंडळी आपापल्या घरी रवाना झाली.
मागील कार्यक्रम - पेंडसे समाज कल्याण मंडळाचे ३३ वे वार्षिक स्नेहसंमेलन, दि. ११ जानेवारी २०२५
पेंडसे समाज कल्याण मंडळाचे ३३ वे वार्षिक स्नेहसंमेलन, दि. ११ जानेवारी २०२५
पेंडसे समाज कल्याण मंडळाचे ३३ वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. ११ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात साजरे झाले.
यावर्षी पेंडसे समाज कल्याण मंडळ तर्फे देण्यात येणारा कुलभूषण पुरस्कार सायकल संग्राहक श्री. विक्रम रमेश पेंडसे पुणे यांना देण्यात आला.
संमेलनाध्यक्षा म्हणून सौ. विद्याताई संजय कुलकर्णी उपाध्यक्षा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था या लाभल्या.
संमेलन स्थळ: मोरेश्वर सभागृह पानमळा सिंहगड रोड पुणे
सायकल संग्राहक श्री. विक्रम रमेश पेंडसे पुणे
आपला जन्म ६ जून १९६६ रोजी पुणे येथे झाला. पहिली ते दहावी टिळकनगर विद्यामंदिर आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पेंढारकर कॉलेज, डोंबिवली येथे आपण पूर्ण केलेत. प्रचलित शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपली आवड ओळखून पुण्यात येऊन आपण एका गॅरेजमध्ये स्कूटर मोटरसायकल दुरुस्तीचे काम शिकायला सुरुवात केलीत. १९९७ मध्ये आपण डायमंड मोटरसायकल्स हे स्वत:चे गॅरेज कर्वेनगर, पुणे येथे सुरू केलेत. १९९२ पासून आपण मोटरसायकल जमवायला सुरुवात केलीत. १८ मे २०१७ रोजी जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून आपल्या छंदाचे रूपांतर आपण “विक्रम पेंडसे सायकल म्युझियम यामध्ये केलेत.
१९९५ मध्ये पाहण्यात आलेल्या १९४० मधल्या बीएसएफ पॅराडूपर या फोल्डेबल सायकल पासून आपल्या सायकल संग्रहाची सुरुवात झाली. त्यानंतर आपण झपाटल्यासारखा हा संग्रह वाढवतच नेलात. या आपल्या संग्रहात नॉर्टन, एरियल, वेस्पा, लॅमरेटा, आरडी 350, यामाहा RX 100 अशा अनेक दुचाकी आहेत, तशाच ऑस्टिन 7, ऑस्टिन 8, ऑस्टिन ए 40 या कारही. आपल्या संग्रहालयात गेल्या शंभर वर्षांत वापरल्या गेलेल्या दीडशेहून अधिक दुचाकी तीन चाकी सायकल. त्याचबरोबर सायकलचे स्पेअर पार्ट, दिवे, हवेचे पंप, ट्रल किट इत्यादींचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. सायकली व्यतिरिक्त आपल्या या संग्रहालयात जुन्या पद्धतीचे म्हणजे गेल्या 100 वर्षाहून अधिक काळात वापरले गेलेले रेडिओ, घड्याळे, दिवे, इस्त्रया, वजने- मापे, शिवण यंत्रे स्वयंपाकाची भांडी, विविध घरगुती उपकरणे इत्यादींचाही मोठा संग्रह आहे.
चाकोरी बाहेरील काही करायला गेलं की घरातील सदस्यांचा खंबीर पाठिंबा आणि सहभाग याशिवाय हे शक्यच होत नाही. आपल्या सुविद्य सहचारिणी सौ. अनघा कायद्याच्या पदवीधर आहेत आणि आता होम मेकर, तर मुलगी अदिती एमकॉम झाली असून या अनोख्या संग्रहालयाची व्यवस्था आणि देखभाल बघते.
असा आगळावेगळा संग्रह जपणाऱ्या विक्रम रमेश पेंडसे यांना कुलभूषण पुरस्कार प्रदान करताना पेंडसे समाज कल्याण मंडळाला अतिशय आनंद होत आहे.
पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या ३३ व्या संमेलनाध्यक्षा सौ. विद्याताई संजय कुलकर्णी
आपल्या ३३ व्या संमेलनाला एक अशा अध्यक्षा लाभलेल्या आहेत ज्यांनी स्वतःचे शिक्षण, समाजसेवा आणि समाजाचे शिक्षण यामध्ये भरीव कार्य केले आहे. त्या मूळ सोलापूरच्या आहेत आणि आता पुण्यात स्थायिक आहेत. न्युक्लिअर फिजिक्स मध्ये त्यांनी M.Sc. असे पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्य केले. त्यानंतर मुंबईतील भारतीय विद्या भवन या प्रथितयश महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर ११ वी आणि १२ वी या शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे काम त्यांनी सुरू केले. सोलापूर आणि पुणे येथे त्यासाठी त्यांनी आपले क्लासेस चालवले. २०१६ पासून त्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून काम करू लागल्या. आता त्यांच्याकडे संस्थेच्या उपाध्यक्षा अशी जबाबदारी आहे. २०२३ पासून SNDT संस्थेच्या सिनेट सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. एकाच वेळी अशा अनेक शैक्षणिक जबाबदाऱ्या त्या सांभाळत आहेत.
हे काम करत असतानाच त्यांनी Acupressure Therapist चे शिक्षण घेतले आणि थेरपिस्ट म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी ग्राहक तक्रार मंच सोलापूरच्या सदस्या म्हणून पाच वर्षे काम केले आणि सध्या ग्राहक तक्रार मंच पुणे आणि महाराष्ट्र राज्य स्तरावर समन्वयक म्हणून काम करीत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे काम त्यांनी या सर्व काळात अखंडपणे चालवले आहे.
हे सर्व करीत असताना कुलकर्णी कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अतिशय कुशलतेने सांभाळली आहे. त्यांचे पती श्री. संजय कुलकर्णी हे भारतातील एक प्रथितयश शैक्षणिक आणि व्यावसायिक समुपदेशक म्हणजेच एज्युकेशन अँड करिअर कौन्सिलर आहेत. त्यांचा मुलगा सुजित चार्टर्ड अकाउंटंट आहे. मुलगी रमा गायिका आहे. अशा एक उच्च शिक्षित, शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या, कौटुंबिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी, समाजाच्या उन्नतीसाठी विविध मार्गांनी झटणाऱ्या कार्यकर्त्या आपल्याला संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून लाभल्या आहेत हे आपले सर्वांचे भाग्य आहे.
स्नेहसंमेलन वृत्तांत
पेंडसे समाज कल्याण मंडळाचे स्नेहसंमेलन 'मोरेश्वर सभागृह', सिंहगड रोड, पुणे येथे दि. ११ जानेवारी २५ रोजी आयोजित केले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत मंडळी नियोजित ठिकाणी जमली. प्रथम चहापान झाल्यावर समारंभाच्या सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे गणेशपूजन झाल्यावर सौ. अंजली मिलींद यांनी दीपप्रज्वलन करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री श्रीकृष्ण पेंडसे, कार्याध्यक्षा सौ. हेमांगी महाजन, कार्यवाह श्री. राजीव पेंडसे संमेलनाध्यक्षा सौ. विद्या कुलकर्णी कुलभूषण पुरस्काराचे मानकरी श्री. विक्रम पेंडसे या सर्व मान्यवरांना व्यासपीठाजवळ बोलावले.
दीपप्रज्वलनानंतर सौ. अंजलीने या सर्वांना व्यासपीठावर आसनस्थ होण्यास सांगितले. या मंगल सोहळ्याची सुरुवात सौ. गौरी चिन्मय हिच्या सुमधुर ईशस्तवनाने झाली. त्यानंतर रामलल्लांना आयोध्येत स्थापन होऊन एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने रामरक्षा स्तोत्र आणि मारुतीस्तोत्र सर्व मंडळींनी एकसुरात म्हणून या घटनेस मानवंदना दिली.
त्यानंतर मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. हेमांगी महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, आपण आत्ता गणेशपूजन, परमेश्वराचा आठवा अवतार परशुराम यांचेही पूजन केले. शिवाय रामरक्षा म्हणून मागच्या वर्षीच्या श्रीरामांच्या स्थापनेचेही स्मरण केले. अशा पवित्र वातावरणात आता आपण स्नेहसंमेलन पुढे नेत आहोत. पूर्वीच्या मंडळींनी जे परिश्रम केलेत त्यांच्यामुळे आपण आज इथवर वाटचाल केली आहे अजुनही या मंडळींची प्रकाशकाका, माधवकाका यांच्या मार्गदर्शनाची जरूर आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्षा विद्याताई कुलकर्णी यांचा परिचय कार्यकारिणी सदस्या सौ. विदुला नरेंद्र यांनी करून दिला. मंडळाच्या वतीने त्यांना शाल. श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कार्याध्यक्षा सौ. हेमांगी यांनी सत्कार केला. त्यानंतर स्मरणिकेचे प्रकाशन करण्याची सौ. अंजलीने मान्यवरांना विनंती केली. श्री. महेश पेंडसे यांनी उपस्थितांना पेढे वाटले. 'कुलभूषण' चे मानपत्र वाचन सौ. अंजली ने केले आणि संमेलनाध्यक्षा विद्याताई कुलकर्णी यांच्या हस्ते यंदाचे कुलभूषण पुरस्काराचे मानकरी श्री. विक्रम पेंडसे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अंजलीने श्री. विक्रम पेंडसे यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. ते म्हणाले मी अजिबात व्यासपीठावर बोलणारा माणूस नाहीये माझ्या घरातील मंडळींच्या म्हणजे माझे वडील, बायको, मुलगी यांच्या पाठिंब्यामुळे मी हे सायकलींचे म्युझियम करू शकलो आहे. एका तीन चाकी छोटया सायकलपासूनच्या संग्रहाची वाटचाल आणि अनुभव त्यांनी थोडक्यात सांगितले, ते अतिशय रंजक होते. त्यानंतर उपस्थित वयोवृध्द श्री. शशिकांत मराठे, श्री. नंदकुमार पेंडसे, डॉ. अशोक पेंडसे, श्री. विनय मराठे यांचा गुलाबपुष्प देऊन मंडळाच्या वतीने कार्यवाह श्री. राजीव पेंडसे यांनी सत्कार केला. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पेंडसे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
संमेलानाध्यक्षा सौ. विद्याताई कुलकर्णी यांना मनोगत व्यक्त करण्यास सौ. अंजलीने सांगितले त्या म्हणाल्या, भगवान परशुराम, श्रीराम यांना वंदन करून रामरक्षा मारुतीस्तोत्र पठण तसेच सुरेल आवाजातलं सौ. गौरीचे ईशस्तवन अशा पवित्र वातावरणात मला बोलायला संधी मिळते आहे. मला हा संमेलनाध्यक्ष म्हणून जो बहुमान दिलात त्याबद्दल धन्यवाद. ९० साली सुरु झालेल्या या मंडळाचा आज ३३वा स्नेहमंमेलन सोहळा होतो आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत ३३०० विद्यार्थिनी आहेत. ही संस्था १८९६ साली सुरु झाली ती आज १२८ वर्षे तितक्याच जोमाने कार्यरत आहे. २०१६ पासून मी या संस्थेत कार्यरत आहे. सामाजिक व शैक्षणिक संदर्भात ब्राह्मण समाज खूप पुढे आहे. वेळप्रसंगी समाजाचा विरोध पत्करूनही कार्य करीत राहणे हे आपल्या genes मध्येच आहे. नवीन पिढीलाही आपण ही जाणीव करून दिली पाहिजे आज श्री. विक्रम पेंडसे यांनी जे केले आहे ते खरोखर अलौकिकच आहे. पेंडसे समाज कल्याण मंडळ शंभरी पूर्ण करो ही सदिच्छा.
त्यानंतर मंडळातर्फे कार्यवाह श्री. राजीव पेंडसे यांनी सौ. कुलकर्णी यांना महर्षि कर्वे शिक्षण संस्थेच्या नावाने रु. ११,०००/- चा धनादेश दिला. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आज संमेलनाच्या प्रसंगी उपस्थिती समाधानकारक आहे. आजघडीला १३०० सभासद मंडळी या संस्थेशी संबंधित आहेत. मागेही मी म्हणालो तसं स्थानिक पातळीवर कार्य करावे पुणे, ठाणे, मुंबई व्यतिरिक्त सुध्दा छोटे छोटे गट स्थापन करून गणेशोत्सव, दिवाळी वगैरे सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन मुलांच्या स्पर्धा घ्याव्यात, उपक्रम करावेत मुख्य मंडळाच्या संपर्कात राहून हे कार्य करावे. त्यानंतर सौ. अंजलीने श्री. शंतनू परांजपे याच्याबद्दल माहिती सांगितली 'विकसित भारत युवा नेतृत्व' साठी याचे नामांकन झाले आहे. आज दिल्लीला पंतप्रधानांकडून त्याचा सत्कार होणार आहे. मंडळातर्फे त्याचे अभिनंदन ! त्यानंतर संमेलनास प्रथमच उपस्थित असलेले सभासद यांचेही अभिनंदन केले व स्वतःचा परिचय करून देण्यास सांगितले. मुग्धा गोरक्ष (खोपोली), आरती प्रदीप नित्सुरे पूर्वाश्रमीची पेंडसे, शीतल महाजन, स्नेहा महाजन यांची स्वतःची सायन्सची प्रयोगशाळा आहे. दत्तात्रय मोरेश्वर महाजन यांची ती सून आहे. तसेच अनेक वर्षे मंडळाला सेवा देणाऱ्या कै. भार्गव महाजन यांची सून नम्रता अनिल महाजन उपस्थित होत्या. आपटे प्रशालेतील मुख्याध्यापिका प्राची पेंडसे यांनीही आपला परिचय करून दिला. त्या म्हणाल्या, माझ्या नातीचा १०व्या वर्षीचा वाढदिवस सर्पमित्र असलेल्या माझ्या मुलाने आगळावेगळा म्हणजे ५० सर्प घरी आणून साजरा केला. उपस्थित सर्व मंडळी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात great आहेत हे जाणवले.
सरतेशेवटी सौ. विदुला नरेंद्र यांनी आभारप्रदर्शन केले आणि आजीव सभासद नसतील त्यांनी रजिस्ट्रेशन डेस्क वरून फॉर्म घेऊन आजीव सभासद व्हावे असे सांगितले.
शेवटी सौ. गौरी चिन्मय यांच्या साथीने सर्वांनी पसायदान म्हटले आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला आणि स्नेहसंमेलन यशस्वी झाल्याची भावना घेऊन मंडळी आपापल्या घरी परतली.
मागील कार्यक्रम - वार्षिक सर्वसाधारण सभा, दि. २२ सप्टेंबर २०२४
वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४
आपले मंडळाचे आजीव सभासद, हितचिंतक आणि सन्माननीय सभासद यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता खालील विषयांवर चर्चा/विचार विनिमय करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेली होती.
सभेचे स्थळ : शुभम पार्टी हॉल, कोयना,
जी विंग, ग्राऊंड फ्लोर,
शांतीबन, बोरिवली (पूर्व),
मुंबई - ४०० ०६६
मागील कार्यक्रम - वर्धापन दिन २०२४, ७ एप्रिल २०२४
पेंडसे समाज कल्याण मंडळाचा वर्धापन दिन आपण रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ या दिवशी गतवर्षीप्रमाणे एका वेगळया सामाजिक उपक्रमाने साजरा केला.
कार्यक्रमाची वेळ :- रविवार दि. ७ एप्रिल २०२४, सकाळी ११ वाजता
ठिकाण
१) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर गुरूकुल
स. क्र. ५०१६, गल्ली नं. ६, कुडोलकर कॉलनी,
तळेगाव, दाभाडे - ४१० ५०६, जि. पुणे.
२) इंद्रायणी सेवा समिती न्यास संजीवनी मुंलींचे वसतीगृह
अवधूत कृपा, १३५, तपोधाम कॉलनी,
तळेगाव, दाभाडे - ४१० ५०६, जि. पुणे.
वर्धापन दिन वृत्तांत
मंडळाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे एक वेगळा सामाजिक उपक्रम हाती घेऊन ७ एप्रिल २०२४ या दिवशी एक म्हणजे 'सावरकर गुरुकुल' 'तळेगाव जिथे मुलांच्या शिक्षणाची व निवासाची सोय केलेली आहे तसेच दुसरे विश्व हिंदू परिषद संचालित इंद्रायणी सेवा समिती न्यास यांचे “संजीवनी मुलींचे वसतिगृह' येथे साजरा झाला. प्रथम सकाळी ११ वाजता मंडळी सावरकर गुरूकुल तळेगाव येथे पोहोचली. चहा कॉफी घेतल्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली. सौ. अंजली पेंडसे ह्यांनी सूत्रे हाती घेतली. प्रथम तिने मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पेंडसे, सावरकर गुरूकुलचे संचालक श्री. शिरोडकर, कार्यध्यक्षा सौ. हेमांगी महाजन, कार्यवाह श्री. राजीव पेंडसे आणि कोषाध्यक्षा सौ. वर्षा यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सौ. प्रज्ञा पेंडसे यांनी सुश्राव्य ईशस्तवन सादर केले.
त्यानंतर सर्वप्रथम सौ. हेमांगी यांनी प्रास्ताविक केले त्या म्हणाल्या यावर्षी पेंडसे समाज कल्याण मंडळाचा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस. तुम्हा मुलांसोबत साजरा करतोय याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतोय. नंतर संचालक श्री. शिरोडकर यांना मनोगत मांडण्यास सौ. अंजली ने सांगितले. श्री. शिरोडकर म्हणाले, “ही संस्था २००० सालापासून अविरत चालू आहे. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे या हेतूने हे कार्य सुरु केले. काही विद्यार्थी घरी ऐकत नाहीत, काहींच्या घरी पालकांना वेळ नसतो, कधीकधी आर्थिक परिस्थिती बेताची असते, मुलांनी अभ्यास केलाय की नाही हे रोजच्या रोज बघायला घरी वेळ नसतो. हा सर्व विचार करुन आम्ही विद्यार्थ्यांची इथे शिक्षणाची आणि निवासाची सोय केलेली आहे. जातीपातीचा विचार करत नाही परमेश्वराच्या कृपेने आत्तापर्यंत कुठेही निधी संकलनासाठी जायची गरज भासली नाही. कुणी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, मोठया पोस्टवर, ऑफिसर झालेत. पण ते आम्ही बोनस समजतो. बाकी नुसते चांगल्या मार्गात आहेत त्यांचेही आम्हाला कौतुकच आहे.”
त्यानंतर पेंडसे समाज कल्याण मंडळातर्फे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पेंडसे यांनी श्री. शिरोडकर यांचा सत्कार करून त्यांना रु. १५०००/- चा चेक सुपूर्द केला.
त्यानंतर श्री. नरेंद्र पेंडसे यांनी मुलांना गोष्ट सांगण्यास सुरूवात केली. ते म्हणाले, “सावरकरांचे दोन गुण विशेष होते देशभक्ती आणि धाडस आणि त्यासाठी त्यांचं दैवत होत शिवाजी महाराज तर त्यांचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.” असे म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कशी शपथ घेतली. सवंगडयांना विश्वासात घेऊन ही शपथ त्यांनी आजन्म कशी पाळली हे सविस्तर सांगून धाडस देशभक्ती, सावधगिरी या गुणांना अधोरेखित करत त्यांनी शिवाजी महाराजांच चरित्रच थोडक्यात उभं केलं आणि उपस्थितांनी व मुलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
त्यानंतर श्री. श्रीकृष्ण पेंडसे आपल्या भाषणात म्हणाले,” आमच्या लहानपणी आम्हाला शिक्षकांनी आदर्श व्यक्तींचे गुण आत्मसात करण्यास सांगितले. तुम्ही सुध्दा आता अभ्यासात एकाग्र झाले पाहिजे. वाईट मैत्री करायची नाही, पुस्तक हा आपला उत्तम मित्र आहेच. अभ्यासाबरोबर खेळ, वाचन हे ही छंद जोपासावे.”
शेवटी सौ. श्रावणी श्रीकांत यांनी आभार प्रदर्शन केले.
सर्व कार्यक्रम संपल्यावर मंडळींनी चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यवाह श्री. राजीव, श्री. महेश आणि कोषाध्यक्षा सौ. वर्षा यांनी मंडळातर्फे मुलांना बेसनाचे लाडू खाऊ म्हणून वाटले.
त्यानंतर सर्व मंडळी पेंडसे समाज मंडळाचे तात्पुरते कार्यालय तळेगाव येथे आली. थोडी विश्रांती घेऊन दुसर्या ठिकाणी म्हणजे संजीवनी मुलींचे वसतिगृह येथे भेट देण्यास निघाली. तिथे गेल्यावर तेथील मुलींनी केलेला चहा घेतला व पुन्हा सौ. अंजलीने सूत्रसंचलन करण्यास सुरूवात केली. मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पेंडसे, संजीवनी वसतिगृहाच्या संचालिका आसावरी बुधकर, कार्यध्यक्षा सौ. हेमांगी महाजन, कार्यवाह श्री. राजीव पेंडसे आणि कोषाध्यक्षा सौ. वर्षा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सौ. प्रज्ञा राजीव यांनी शादास्तवन म्हटले. सौ. हेमांगी महाजन यांनी मंडळाचा उपक्रम विशद केला. त्यानंतर वसतिगृहाच्या संचालिका आसावरी बुधकर यांनी तेथील विद्यार्थिनींचा दिनक्रम सांगितला. दूरदर्शनच्या ऑडिशन मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनीने एक भक्तीगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींनी मिळून एक सांधिक गीत एका सुरात गाऊन सर्वांची मने जिंकली. इथेही मुलींना खाऊ म्हणून बेसन लाडू दिले. तसेच संचालिका आसावरी बुधकर यांना मंडळातर्फे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पेंडसे यांनी रु. १५,०००/- चा चेक सुपूर्द केला. त्यानंतर सौ. विदुला पेंडसे यांनी राणी दुर्गावतीची गोष्ट मुलींना छान रंगवून सांगितली. शिवाय मुलींना अभ्यासाबद्दल काही टीप्स दिल्या. लक्षात ठेवण्यासाठी एखाद्या गोष्टीकडे मन एकाग्र 'करून लगेच झोपणे, डाव्या हाताने लिहिणे अशा काही क्लुप्त्या सांगितल्या. विद्यार्थिनींना प्रश्न विचारुन बोलते केले. भविष्यात तुम्हाला कोण व्हायचंय असे विचारल्यावर 'कोणी डॉक्टर इंजिनियर, पोलीस, भातीय लोकसेवा आयोगात काम करायचंय, गायिका व्हायचंय अशी निरनिराळी उत्तरे दिली. प्रत्येकीला ओळख करून द्यायला सांगितल्यावर पुढे येउन 'श्रीराम' नावाचा उच्चार करून स्वत:चे नाव, किती वर्षापासून इथे आणि 'कोठून आलो हे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समिती मधले संस्कार त्यांच्यावर 'होत आहेत हे जाणवले.
अशा रितीने मंडळाने सामाजिक भान राखत आपला खारीचा वाटा देउन वर्धापन दिन साजरा केला आणि असाच वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यावर शिक्कामोर्तब झाले. मनात खूप समाधान घेऊन मंडळी आपापल्या घरी परतली.
मागील कार्यक्रम - पेंडसे समाज कल्याण मंडळाचे ३२ वे स्नेहसंमेलन, १९ नोव्हेंबर २०२३
पेंडसे समाज कल्याण मंडळाचे ३२ वे स्नेहसंमेलन रविवार १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संगम हॉल, संगम सोसायटी विवेकानंद पुतळ्याच्या मागे पुणे सातारा रोड पद्मावती पुणे येथे संपन्न झाले.
ह्या वेळी कर्नल संदीप पेंडसे यांना कुलभूषण पुरस्कार आणि श्री. प्रमोद पेंडसे यांना विशेष कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कर्नल संदीप पेंडसे यांनी लष्करातील २० वर्षांची सेवा पूर्ण केली असून या त्यांच्या कादकिर्दीत “चीफ ऑफ आर्मी” कडून चार वेळा उत्तम कामगिरीबाबत चीफ कमेंडेशन कार्ड त्यांनी प्राप्त केले. तसेच UN Medal, Op Vijay Medal,Sainya Seva Medal, SpecialService Medal, Siachen Glacier Medal, Clasp J&K to Sainya Seva Medal अशा आठ मेडत्सनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
कर्नल संदीप यांना २६ जानेवारी २०२३ रोजी भारत सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या विशिष्ठ सेवा मेडल (VSM) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९-२०२२ या तीन वर्षांमध्ये आर्मी च्या नवीन गणवेशा करिता केलेल्या कामाबद्दलच्या तसचे आर्मी मुख्यालय दिल्ली येथे बजावलेल्या कामगिरीबद्दलच्या “उल्लेखनीय उच्च दर्जाच्या सेवेकरिता” त्यांना हे पदक बहाल करण्यात आले. अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाला “कुलभूषण” म्हणून गौरविणे मंडळासाठी अत्यंत भाग्याची, अभिमानाची बाब आहे.
श्री. प्रमोद यांची 'पेंडसे अँड असोसिएटस्' नावाची आर्किटेक्टस् आणि इंटिरियर डिझायनर स्वयंचलित कंपनी आहे. त्यांनी देशात, परदेशात अनेक पंचतारांकित हॉटेल्सच्या इंटिरियर डिझायनिंगचे सल्लागार म्हणून काम पाहिले तर पॅलेस ऑफ व्हील्स, डेक्कन ओडिसी आणि गोल्डन चॅरिऑट गाडयांचे सर्व डब्यांचे इंटिरियर डेकोरेशन केले. व्यवसाय सांभाळून त्यांनी पॅटिगची कलाही जोपासली. त्यांच्या तैलचित्रांचे, पेटिंगचे प्रदर्शनही भरविण्यात आले. अशा या हरहुन्नरी कलाकार व्यक्तिमत्वाला 'विशेष कार्यगौरव पुरस्कार' देताना मंडळाला अतिशय आनंद होत आहे.
ह्या वर्षी आपल्याला दोन उत्तुंग व्यक्तिमत्व लाभली ही मंडळासाठी सन्मानाची बाब आहे. ह्यांना सन्मानित करण्यासाठी तितक्याच विशेष संमेलनाध्यक्षा आपल्याला लाभल्या. सिर्फ या सैनिकांसाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या संस्थेच्या संचालिका व आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी ज्यांचे राखीबंधु आहेत अश्या सुमेधाताई चिथडे. ह्यांनी आपले स्त्रीधन आणि देणगीतून सियाचीन सारख्या दुर्गम भागात आपल्या सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लॅंट उभारून दिला.
मागील कार्यक्रम - वर्धापन दिन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पाट्या आणि वह्या भेट, ९ जुलै २०२३
पेंडसे समाजकल्याण मंडळाचे उधिष्ट: सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी व कोणत्याही कल्याणकारी कामासाठी उपक्रम हाती घेऊन कार्यान्वित करणे
----x----
"पेंडसे समाज कल्याण मंडळाचा" वर्धापन दिन रविवार 9 जुलै 2023 रोजी एका वेगळ्या म्हणजेच "समाजसेवेतून ज्ञानदान" अशा पद्धतीने साजरा केला.
आपण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतील जनजाती समाजातील मुलींसाठी पाट्या आणि वह्या भेट दिल्या.
कार्यक्रम स्थान :- महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था आश्रमशाळा, कामशेत, पुणे मुंबई जुना हायवे, मावळ तालुका, पुणे.
कार्यक्रम स्वरूप :- सकाळी 11 वाजेपर्यंत आश्रमशाळेत पोचणे. तेथील मुलींना पाट्या, वह्या देणे. गप्पागोष्टी करणे. भोजन करून 2 वाजता परतीच्या प्रवासासाठी निघणे.
"पेंडसे जनकल्याण मंडळ" ठाणे-मुंबई प्रायोजित
अल्टिमेट व्हॉइस अकॅडेमि प्रस्तुत
नवा कोरा - करकरीत कार्यक्रम
... बोलू कौतुके
समृद्ध मराठी साहित्याची मुक्त मुशाफिरी. संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन
आणि सहभाग व्हॉइस गुरु दीपक वेलणकर
निवेदन : मीनल दातार
सहभाग : वैशाली जोगळेकर, विकास देसाई, प्रीती कामत,
राधिका भोसेकर, शिल्पा विचारे, समिरा नवलकर