कृपया आम्हाला तुमचे साहित्य आणि कला pendsesamaj@gmail.com या ईमेलवर पाठवा. आम्ही ते या पृष्ठावर प्रकाशित करू.
साहित्य आणि कला
कै.श्री. माधव वासुदेव पेंडसे यांचे साहित्य
https://www.youtube.com/@chitrapendse - You Tube channel of Mrs. Chitra Pendse
गायत्री पेंडसे यांची चित्रे, कला, हस्तकला, customised भेटवस्तू
फुलांनी फुललेली चैत्रकविता
वसंताने सजवली
सृष्टीची चैत्रगौर
'हळदकुंकवाने माखले
बहावा गुलमोहोर
केशरी पलाशपुष्पे
अग्निशिखेसम तेजाळली
ती गडद रंगवेणी
केशकलापी माळली
जांभळ्या ताम्हणीची
माळ गळयात घातली
मोतीया गंधपुष्पांची
आभूषणे ल्याली
नाजूक गुलबक्षी
फुले उशीरा दुपारी
सृष्टी नटते सजते
अशी प्रत्येक प्रहरी
रंग रुप रस गंधाचे
वाहती उष्म वात
सृष्टीसौंदर्याचे गूज
पोचते दशदिशात
-प्रीती महाजन
कुलवार्ता, जून २०२४
पेंडसे संमेलन
साजरा जाहला आनंद सोहळा ।।धृ।।
सेहसंमेलन, एकोणिस नोव्हेंबरला ।
स्मरले तेव्हा, पूर्वसुरींना आपल्या ।
समाजक्रण फेडण्याचा मानस अपुला ।।१।।
प्रगती अन् संघटन ध्येय ।
गरजूंना द्यायचे आर्थिक साह्य ।
पारितोषिके देती गुणवंतांना ।।२।।
कार्य गौरव प्रमोदजींचा केला ।
कुलभूषण पुरस्कार संदीपजींना ।
पेंडसे जनांच्या प्राप्त ते आदराला ।।३।।
सुमेधाताई करिती, तपे दोन महान कार्याला ।
अति उंचावर, प्राणवायू प्लांट, जवानांना दिला ।
तळमळ पाहुनी त्यांची, जीव दिपला ।।४॥।
असे मेहनती कार्यकारी मंडळ ।
हस्ते सुमेधाताईंच्या, वेबसाइट प्रकाशन ।
तांत्रिकतेचा आरंभ सुरेख झाला ।।५।।
संगम हॉल मिळे संमेलना ।
सुग्रास भोजन, सुखवी रसना ।
उधाण येई आनंदाला ।।
सौ. माधरी श्रीकृष्ण पेंडसे
कुलवार्ता, ऑक्टोबर २०२३
शारदा स्तवन
जयतु जयतु देवी शारदे ।
विद्येचे वरदान तू आम्हासी दे ।।धृ।।
वीणा तुझिया करात वाजे ।
मयुरावरी तव मूर्ती विराजे
प्रेममय दृष्टीने पाहसी शारदे ।।१।।
करूणामयी तू करू वंदने
मुख तव विलसे सात्विकतेने
भवसागर तरू तव कृपाप्रसादे ।।२।।
सौ. माधुरी पेंडसे
कुलवार्ता, जुलै २०२३
श्री गणेश वंदन
अमूर्त मूर्त ही तुझी मनी साकारते ।
गणराया तव दर्शन घडते ।।धृ।।
निराकार परी ओंकार रूप हे ।
आपद समयी आठवताहे सत्यं शिवं सुंदरम हे ।
वरद रूप मम हृदयी विराजते ।।१।।
कुलवार्ता, जुलै २०२३
अरे मित्रा ! मी खरोखर मधुमेही आहे !!
असे विधान मी माझ्या खास मित्र परिवारात केल्यावर दोन तीन जणांना आश्चर्याचा धक्काच बसला.
वयाची पच्याहत्तरी उलटून गेल्यावर सुध्दा मी आरोग्यवान ज्येष्ठ नागरीक आहे. आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये पंचवीस वर्षे मी स्पोर्टस् शिक्षक असल्याने सुसंवादी जीवनशैली जगत आहेच. सुमारे तेरा वर्षांपूर्वी माझी पत्नी लिव्हरच्या असाध्य दुखण्याने आजारी पडली. K.E.M. हॉस्पिटलमध्ये नामवंत डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले. परंतु यश आले नाही. त्या सहा महिन्याच्या काळातील मानसिक - भावनात्मक ताण तणावांनी मला मधुमेह हा विकार जडला.
आमच्या फॅमिली डॉक्टरांनी (डॉ. पुरोहित) सुमारे वर्षभर वेळोवेळी मधुमेहाची यथासांग शास्त्रीय माहिती व उपाय योजना याबाबत मला बहुमोल मार्गदर्शन केले. गेली सुमारे १२ वर्षे मी मधूमेही असून वैद्यकीय औषधी गोळया घेऊन मी त्याला नियंत्रणात ठेवले आहे. याबाबत माझे वैयक्तिक अनुमान निष्कर्ष
खालील प्रमाणे आहेत.
“पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या.”
१) मी मधुमेही आहे म्हणून मनाने बिलकूल खचून न जाता “अतिथी देवो भव!” म्हणून त्याचे स्वागतच करा !! म्हणजे तुमचा मानसिक ताण तणाव निघून जाईल व प्रतिकार शकती वाढीस लागेल !!
२) आधुनिक वैद्यकीय रोग निदान व औषधी उपाय योजनांचा वापर करा. वैद्यकीय शिबीरे व योग निबंधाचा वापर करून ज्ञानात भर घातल्याने आपले जीवन अधिक सुसह्य होत असते. त्या दृष्टीने गेली ५० वर्षे एकाच रोगासाठी कार्य करणारी डायबेटीक असोसिएशन पुणे ही अग्रगण्य पहिलीच संघटना आहे. “निष्काम सेवेचे आणि सामाजिक जाणीवेचे” हे द्योतक आहे.
३) आपल्या आरोग्याचा रस्ता आणि प्रेमाचा झरा हा आपल्याच पोटातून जात असतो. आपला आहार शारीरीक गरज व जीवनशैलीतून कमी जास्त स्वरूपात होत असतो. जीभेला फसवून आपण एकही अन्नपदार्थ पोटात घालू शकत नाही. आपल्या पंचेंद्रिये व कर्मेद्रियांचा वापर व सहभाग आपल्या भोजनात होत असतो. आपल्या आहारावर योग्य ते नियंत्रण मात्र जरूर ठेवणे आवश्यक आहे.
४) शरीर माद्यं खलू धर्म साधनम् । या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तिने नियमितपणे कमीत कमी ४० मिनीटे व्यायाम करणे आवश्यकच आहे. आधुनिक जिमखाना, हास्यक्लब, योगसाधना, सूर्यनमस्कार, पोहणे, गिर्यारोहण, पदभ्रमंती इ. अनेक व्यायाम प्रकार आहेत. आपल्या वयोमानानुसार, प्रकृति मानाप्रमाणे प्रत्येकाने आपले आरोग्य सुव्यवस्थित ठेवावे.
५) आदर्श व सुसंस्कृत भारतीय नागरीकाचे आयुष्यमान आता ८० वर्षे झाले आहे. सकारात्मक दृष्टि व सामाजिक जाण ठेवून आपण सर्व आनंदी व समाधानी जीवन जगण्याची उमेद बाळगू या !! कारण आपणच “ आपल्या जीवनाचे खरेखुरे शिल्पकार” आहोत.
झटकून टाका भूत आणि भविष्यकाळ
तरच आनंदी करु शकाल वर्तमानकाळ
ग. ह. पेंडसे, ठाणे
कुलवार्ता, जानेवारी २०१४
मनशक्ती - एक प्रबळ उर्जास्थान
परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व प्राणीमात्रात मानावाचा जन्म हा सर्व श्रेष्ठ प्राणी मात्र आहे. प्रतिपरमेश्वर होण्याचे सामर्थ्य त्याने मानवास मुक्त हस्ते बहाल केले आहे. ही अदभुत किमया त्याने हृदयाच्या मूशीत बेमोलूम साठविलेली आहे.
आपल्या आयुष्याचे सोने करावयाचे असेल तर वेळेचा सदुपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. आपले मन अव्याहत गतिमान असते. ते एक सुदर्शन चक्रच आहे. जीवनाच्या इति पासून अंतापर्यंत हे कालचक्र फिरतच असते. मनास विविध प्रकारच्या सोळा शक्ती असतात. त्यांची सकारात्मक गुंफण करून समाज जीवनाचा सुंदर गोफ मनाच्या सामर्थ्याने आपण विणावयाचा आहे.
अत्यंत सामान्य लहानशी मुंगी सुध्दा प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रचंड डोंगर शिखर पादाक्रांत करते. धृव बाळाने घनघोर तपश्चर्या करुन आपले अढळ स्थान प्राप्त केले.
नॅनो विज्ञान युगामुळे जीवन अतिशय गतीमान होत आहे. प्रतिकुल परिस्थिती असूनही भविष्याचा वेध घेत आपण प्रगतीशील बनावयाचे आहे.
थोर विचावंत वसिष्ठ क्री म्हणतात
मनो यत् करीति ततकृतं भवति ।
यत् न करोति तत् नकृतं भवति ।
अत: मन एव ही कर्ता न देह: ।
मनच कर्ता असल्याने आपण निश्चयाने जे जे करावयाचे ठरवू तेच आपण कृतीने करू शकतो. संकल्प, कृति आणि सिध्दी या यशाच्या त्रिगुणात्मक पायर्या आहेत.
One who can relax the mind, can repair, recover, recharge & walk the target of successful life.
आपली जागृत इच्छाशक्ती म्हणजे मनशक्ती होय !!
मानवी अहंपणाचे अडसर दूर झाले की प्रबळ आत्मशक्तीचे निर्भर झरे वाहू लागतात. त्या निर्मळ पाण्याचे झरे नव्हे गंगौध आपणा सर्वांना खूप प्रसन्नता, समाधान देत चित्तवृत्ती फुलवीत पुढे जात असतात !
मनाच्या “शिव शक्तीचे” हेच चिरंतन रहस्य होय !!
गणेश हरी पेंडसे, ठाणे
कुलवार्ता, डिसेंबर २०१३
आरती भावईदेवीची
जयदेवी जयदेवी श्री भावई-देवी
कृपेची साऊली आम्हावर ठेवी ।।धृ॥।
सात्विक तेजस्वी रूप आईचे
दोन्ही बाजूस गजराज उभे
महिरप भोवती खुलूनी दिसे
गाभारा ज्योतींनी उजळून जाई ।।१॥।
तळयात समोरी कमळे सुंदर
नारळ पोफळी फुलवेली फार
दीपमाळ विराजे अंगणी समोर
आम्हावरी तू प्रसन्न हो आई ।।२॥।
लेकरांवर वर्षाव करी गे कृपेचा
समूळ उच्छेद कर संकटाचा
आसरा सदा दे तुझ्या कुशीचा
भक्ति श्रध्दा राहो आमुच्या हृदयी ।1३।।
कुलस्वामिनी तू पेंडसे कुळाची
पांखर घालीसी आम्हावर साची
तुझिया चरणी लीन हो आम्ही
सन्मार्ग आम्हा तू आई दाखवी ।।४॥।
कुलवार्ता, डिसेंबर २०१३
कोचरे येथील भावईदेवीचा पुन:प्राणप्रतिष्ठापन सोहळा
कोचरे गावातील पेंडसे, करंदीकर, सिध्दये, नातु मराठे वगैरे कुटुंबाना चालुक्य घराण्यांनी उपजिविकेकरिता कोचरे गावातील काही जमीन दिली होती. काही अडचणीमुळे ती सर्व कुटुंबे गाव सोडून गेली तरी ग्रामदेवता व कुलदेवता यांना विसरले नाहीत. भावई देवीची मुर्ती अभिषेक व पूजा या मुळे झिजलेली होती. त्यामुळे ती बदलण्याचे ठरविले. त्यासाठी कमिटी स्थापन झाली देवाला कौल लावला असता प्रतिष्ठापनेचा मान पेंडसे कुटुंबियांना मिळाला व त्यामुळे श्री. योगेश व सौ. उर्वी पेंडसे यांनी धार्मिक विधीची जबाबदारी घेतली. चैत्र वद्य अष्टमी शा. श. १९३५ बृहस्पतीवार विजय नाम संवत्सर (दि. २ मे २०१३) ह्या शुभदिनी नवीन मुर्तीची स्थापना झाली.
नवीन मूर्ती “गुडीगर' या कलाकाराने घडविली. स्थापना करताना गाभारा मोठा करायचा ठरविले व श्री. पपु चौधरी यांनी ती जबाबदारी पार पाडली. आता गाभाऱ्यात ३/४ व्यक्ती बसुन दर्शन घेऊ शकतात.
या सोहळयास श्री. व सौ. लिमये, श्री. व सौ. वैद्य, किशोर करंदीकर, अनिल पेंडसे, वासुदेव पेंडसे, प्रकाश पेंडसे परिवार, टेंगशे गुरूजी, डॉ. विश्वास सिधये, भावई देवी उत्सव कमिटीचे सभासद व गावकरी उपस्थित होते.
या मुर्तीचे चांदीचे नाणे बनवायचे ठरले आहे. तसेच सदर सोहळयासाठी पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोल्हापूर, सावंतवाडी (धाकुरी व तुळस) येथून भक्त उपस्थित होते.
कुलवार्ता, सप्टेंबर २०१३
आरती श्री वेळेणेश्वराची
जयदेव जयदेव श्री वेळणेश्वर
सागरतीरी आला श्री शिवशंकर ।।धृ।।
गाभार्यातली पिंड शंभूची
छत्रचामरे वरती नागाची
धवल फुलांची आरास सुंदर ।।१।।
कैलास राणा आला भूवरी
अंतरी उमले भक्ति साजिरी
वंदन करी तुज, नभीचा भास्कर ।।२।।
कुलदैवत आम्हा सकलांचे हो तू
बिल्वपत्र वाहू, असे शुध्द हेतु
अभिषेक करू या महादेवावर ।।३।।
वाणी तोकडी, मम शब्द अपुरे
सूर सानुला, भाव त्यात रे
कृपा करीसी सर्वदा, तू विश्वंभर ।1४॥।
सौ. माधुरी श्रीकृष्ण पेंडसे, घाटकोपर
कुलवार्ता, डिसेंबर २०१३
गुरूपौर्णिमा
परमेश्वराला आपण आतीव श्रध्देने “ब्रह्मांडनायक” असे म्हणतो. या विधात्याने प्रचंड मोठी जीवसृष्टी, पशु, पक्षी, प्राणी निर्माण केलेले आहेत. मनुष्य योनि ही मात्र सर्वश्रेष्ठ मानली जात असते.
मानवी जन्माचे सार्थक आपापले कर्तव्य पार पाडण्यातच आहे. लो. टिळक म्हणतात आपण जे काही करतो ते कर्मच होय. कर्मसिध्दांत असे सांगतो की कर्माचे फळ कालसापेक्ष व परिस्थितीनुसार मिळत असते.
कोणतेही ज्ञान हा अखेर एक अनुभवच असतो. हा अनुभव येण्याकरता योग्य ते प्रयत्न आवश्यकच असतात. अशा प्रयत्नांची दिशा ठरविणारी व्यक्ती म्हणजे गुरु हा आदर्श मार्गदर्शक असतो. लोहचुंबकासारखी प्रगतीची उत्तर दिशा हे गुरूचे कर्तव्य होय.
भक्तीयोग म्हणजे ईधरचरणी स्वत:ला पूर्णपणे वाहून घेणे. सर्व ईथ्वरासाठी करणे. ईश्वरातच विलीन होणे. ध्यान घारणेतून आपण ईश्वरा समीप जात असतो.
गुरू शिष्यानुभव हा सुध्दा एक योग आहे अनुभूती आहे. योग हा शब्द “युग” धातूपासून झाला आहे. युग या शब्दाचा अर्थ आपल्या अस्तित्वाच्या - असणेपणाच्या चार पायर्या जोडण्याची क्रीया करतात.
पहिली पायरी म्हणजे शरीर व मन जोडणे. संकल्परुपी चित्र मनाने करावे. त्यानुसार कृति करावी. विविध कृतीने कौशल्य प्राप्त होत असते.
मन आणि बुध्दी एकमेकांना जोडणे ही दुसरी पायरी होय. आपल्या बुध्दिला जे पटेल. रूचेल योग्य वाटेल ते करणे मनास निश्चित आवडते. सामाजिक जाणीवेतून बुध्दि चातुर्याने समाज प्रगतिशील बनत असतो. लो. टिळकांनी महाराष्ट्रात गणेशोत्सव जनमानसात असाच रूजविला.
तिसरी पायरी आपल्या बुध्दिला आपल्या आत्म्याला जोडणे. आपण कोण आहोत? मी म्हणजे शरीर नव्हे, भावना किंवा बुध्दी नव्हे. सर्वांच्या पलिकडे माझे सत् स्वरूप अस्तित्व म्हणजे मी आहे असे समजणे याचा अनुभव घेणे होय. ह्याच धारणेतून याचा अनुभव येत असतो.
भक्ति योगात ईश्वरावर श्रध्दा असणे आवश्यक असते. विचारापेक्षा भावना भक्ति मार्गात अधिक प्रबळ असतात.
ज्ञान, भक्ति, कर्म या सोपान मार्गाचा अवलंब करून सत्यं, शिवं, सुंदरम् अशा चिरंतन ब्रह्मानंदाचा अमृतानुभव घेणे हेच मानवी जीवनाचे सार्थक होय !!
ग. ह. पेंडसे (माजी अध्यक्ष)
कुलवार्ता, सप्टेंबर २०१३