हे संकेतस्थळ कशासाठी
हे संकेतस्थळ कशासाठी
गुरुर्ब्रह्म: गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वर: |
गुरु: साक्षात् परब्रह्म: तस्मै श्रीगुरवे नम: ||
गुरूची महती सांगणारा हा संस्कृत श्लोक कोणाला परिचित नाही? गुरूला साक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्याइतके जरी महत्त्व दिले जात असले, तरी हे गुरुजी बहुधा अध्यात्मिक, पारमार्थिक क्षेत्रातीलच अभिप्रेत असतात. शुद्ध ऐहिक, भौतिक क्षेत्रांत आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आयुष्यभर जिवाचे रान करणार्या आणि ज्यांना ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्याइतकेच महत्त्व (ते स्वत: पूर्णपणे नास्तिक असूनही) त्यांच्या विद्यार्थिवर्गाने प्रदान केले अशा एका विद्वान गुरुजींचा, त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी या ‘डॉ. पु.ग.सहस्रबुद्धे विचारमंच’ या संकेतस्थळाचा जन्म झाला आहे.
डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे (१९०४ - १९८५) उर्फ पुगस हे या गुरुजींचे नाव. प्रथम पुण्याच्या सुप्रसिद्ध नू.म.वि.प्रशालेतील एक नामवंत शिक्षक म्हणून व नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील एक निष्णात प्राध्यापक म्हणून त्यांनी फार मोठा लौकिक मिळविला. एक अत्यंत प्रसन्न, प्रगल्भ, संपन्न व आकर्षक आणि तरीही चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचे, वर्गात कमालीची शिस्त व शांतता राखणारे प्रभावी शिक्षक; व्रतस्थ वृत्तीचे, व्यासंगी, तळमळीचे शिक्षक; शिक्षकाचा पेशा हे एक व्रत आहे - विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविणे, त्यांना उत्तम नागरिक बनविणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे अध्यापकांचे कार्य होय, अशी ध्येयनिष्ठा रक्तात भिनलेले, खर्या अर्थाने लोकशिक्षक या पदवीस पात्र असलेले अध्यापक; शिक्षकांनी सतत वाचन, लेखन, मनन, चिंतन यांच्या सहाय्याने आपल्या ज्ञानाची उंची वाढवीत राहिली पाहिजे व त्यासाठी त्यांनी आजन्म विद्यार्थी राहिले पाहिजे, असा आग्रह धरणारे व त्याप्रमाणे आचरण करणारे अध्यापक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षांसाठी अतिशय कसोशीने उत्कृष्ट तयारी करून घेणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती.
पुगस हे मराठी या विषयातील पहिलेच पीएच.डी. होते. त्यावेळी म्हणजे १९३८-३९ साली पीएच.डी. हा प्रकारच इतका नवा होता की त्याच्या प्रक्रियेबद्दल मुंबई विद्यापीठातील अधिकार्यांना काहीसा संभ्रमच असावा. (पुणे विद्यापीठाचा तर अजून जन्मही झाला नव्हता.) अखेर पुगसंशीच सल्लामसलत करून त्यांनी प्रसिद्ध वैचारिक लेखक श्री. वामन मल्हार जोशी यांची मार्गदर्शक व ‘साहित्यसम्राट’ नरसिंह चिंतामण उर्फ तात्यासाहेब केळकर यांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली. तथापि पुगसंची तोपर्यंत एक विद्वान लेखक म्हणून इतकी ख्याती झालेली होती की जोशी यांनी काही ‘मार्गदर्शन’ न करताच व केळकरांनी काही ‘परीक्षण’ न करताच शिफारस केल्यावर विद्यापीठाने पुगसंना पीएच.डी. प्रदान केली! स्वत: पुगसंनी दूरदर्शनच्या एका मुलाखतीत ही माहिती दिली होती!!
शिक्षक म्हणून त्यांची योग्यता केवढी महान आहे, याचा प्रत्यय ‘शिक्षण प्रसारक मंडळी’च्या सुवर्णमहोत्सवाच्या वेळी आला. या समारंभाचे मुख्य अतिथी पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई हे होते. यावेळी जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील एकेका प्रथितयश व संस्थेशी संबंधित व्यक्तीचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या व्यक्तींची निवड करण्यासाठी नेमलेल्या समितीने पुगसंचे नाव एकमताने, दुसर्या कोणत्याही नावाचा विचारसुद्धा न करता निश्चित केले! संस्थेमध्ये अनेक नामवंत, शिक्षक-प्राध्यापक होते व त्यांच्यामुळेच संस्थेचे नाव खूप मोठे झाले होते. तरी असे व्हावे हा केवळ चमत्कार नव्हे, तर संस्थेने पुगस यांच्यातील शिक्षकाला दिलेली ती मानवंदनाच होती!
त्याचवेळी बृहन्महाराष्ट्रात विचारवंत व प्रभावी वक्ते म्हणून आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, आगरकर, लो. टिळक, श्री. म. माटे इ. तत्त्वचिंतकांच्या मालिकेतील विचारप्रवर्तक निबंधकार म्हणूनही त्यांनी आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. शिक्षक, वक्ते व निबंधकार या तिन्ही नात्यांनी त्यांनी आयुष्यभर आपल्या विद्यार्थ्यांना व एकंदरीत सर्व मराठी समाजाला समाजकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, अर्थकारण, लोकसत्ता, समाजवाद इ. विषयांसंबधींचे आपले सर्व मौलिक विचारधन मुक्तहस्ताने वाटले. ते करीत असताना आपल्या राष्ट्राचे कल्याण हा एकमेव हेतू त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला होता व त्यासाठी विद्यार्थ्यांची व्यक्तित्वे केवळ कलावादी न होता राष्ट्रसंग्रामाला तोंड देणारी, त्यागी, कर्तृत्वसंपन्न व्हावीत अशी तळमळ त्यांच्या मनाला सतत लागलेली असे. विशाल जीवनाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांनी शिस्तप्रिय, क्रियाशील, विवेकी, ध्येयवादी, चारित्र्यसंपन्न बनावे असाच त्यांना सतत ध्यास लागलेला असे. त्यासाठी त्यांनी विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, ज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा, तर्कनिष्ठा, बुद्धिस्वातंत्र्य, विचारीपणा, शिस्त, बुद्धिप्रामाण्य, राष्ट्रनिष्ठा, प्रवृत्तिवाद, लोकशाही, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, प्रयोगशीलता, स्वत: अवलोकन करण्याची वृत्ती, अंधपणे काहीही न स्वीकारण्याचा निश्चयीपणा, ध्येयवाद, नीतिधर्म यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या व एकंदरीत सर्व नागरिकांच्या मनांवर करण्यासाठी आपली वाणी आणि लेखणी अविरत झिजविली; योजना, संघटना, कर्तृत्व, रेखीवपणा, सुनिश्चितपणा, काटेकोरपणा, बुद्धीची शिस्त, वाणीची व लेखणीची शुद्धता, कुशाग्रता इ. गुणांचे महत्त्व त्यांच्या मनांवर ठसविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी स्त्रीचे व्यक्तित्व, जातिभेद, जुने कर्मकांड, अस्पृश्यता, पुनर्विवाह, घटस्फोट इ. सामाजिक प्रश्न, मार्क्सवाद, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, इतिहास-मीमांसा, क्रांतिशास्त्र, समाजसंघटना, धर्म आणि विज्ञान यांचा संग्राम, लोकशाहीतील भ्रष्टाचार, धर्म व लोकशाही, कायद्याचे राज्य व लोकशाही, लोकशक्ती, पक्षसंघटना, मुद्रणस्वातंत्र्य, शब्दप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, लोकशाही व मानवी कर्तृत्व, भांडवलशाही व लोकसत्ता, रशियन, अमेरिकन, युरोपियन, भारतीय लोकसत्ता, मार्क्सवाद - विरोधविकासवाद, ऐतिहासिक जडवाद, वर्गविग्रह, कामगारवर्गाचे आर्थिक क्रांतीतले स्थान, युरोप-अमेरिकेतील सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय चळवळी, पाश्चात्य धर्म व पौर्वात्य धर्म, पूर्णत्वाची लालसा, मानवतेचे महान प्रयोग, सामाजिक संघटनेचे माहात्म्य, कम्युनिस्टांनी केलेली भारतीय इतिहासाची विटंबना, महाराष्ट्राचे वैभव, वास्तवाची अभिरुची, कलेतील नवनिर्मिती, नव्या अंधश्रद्धा असे असंख्य विषय वाचकांच्या व श्रोत्यांच्या पुढे मांडून त्यांचे सांगोपांग विवेचन केले आणि ते करताना त्यांनी मिशनर्याची तळमळ, प्रचारकाची तडफ व श्रद्धावंताची निष्ठा दाखविली. परंतु त्यांनी तत्त्ववेत्त्याच्या, शास्त्रज्ञाच्या भूमिकेतून केवळ तात्त्विक स्वरूपाचे, शास्त्रीय विवेचनात्मक लेखन केले नाही; तर आपल्या लेखनाला व वक्तृत्वालासुद्धा ‘इतिहास निरूपणा’चे स्वरूप देऊन आपल्या वाचकांवर व श्रोत्यांवर, आपल्या विचारांच्या समर्थनार्थ, संपूर्ण जगाच्या इतिहासातील घटनांच्या, चळवळींच्या, प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्रांबद्दलच्या, सांगोपांग माहितीचा त्यांनी धुवाधार वर्षाव केला. त्यामुळे त्यांचे प्रतिपादन क्लिष्ट न होता, ते सर्वसामान्य सुशिक्षित नागरिकांच्या, अगदी ग्रामीण भागांतील नागरिकांच्याही, तसेच तरुण विद्यार्थ्यांच्या आवाक्यात आले, मनोरंजकही बनले. त्यामुळे ज्ञानप्रसाराचा त्यांचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकला. मराठी भाषेचे अध्यापक असलेल्या एका व्यक्तीच्या ज्ञानाचा, व्यासंगाचा हा कल्पनातीत आवाका पाहून मन स्तिमित होऊन जाते आणि खरोखरच अशी विभूती अशा युगात (जेव्हा ज्ञानसाधने, दळणवळणाची साधने, संपर्क-प्रचार-प्रसारसाधने आजच्या तुलनेने फारच कमी प्रमाणात उपलब्ध होती) या पृथ्वीतलावर अवतरली होती का असा संदेह मनात निर्माण होतो.
आपल्या हयातीतच एक ‘दंतकथा’ किंवा ‘आख्यायिका’ बनण्याचे भाग्य फारच थोड्या व्यक्तींना लाभते, जसे ते आज, उदाहरणार्थ, अमिताभ बच्चन व सचिन तेंडुलकर यांना लाभले आहे. पुगसना देखील हे भाग्य लाभले होते, ही विशेष आनंदाची व कौतुकाची गोष्ट आहे. प्रख्यात बालसाहित्यकार कै. श्री. ना. धों. ताम्हनकर यांचा ‘गोट्या’ हा खट्याळ मानसपुत्र प्रसिद्धच आहे व दूरदर्शनच्या कृपेने तो नवयुगातील बालकांचा (आणि मोठ्यांचादेखील!) लाडका बनलेला आहे. ताम्हनकरांच्या एका कथेत गोट्या एका लग्नसमारंभासाठी पुण्याला गेला होता, तेव्हा पुण्यातील प्रसिद्ध नू.म.वि.प्रशाला आणि तेथील ख्यातनाम शिक्षक सहस्रबुद्धे व मुख्याध्यापक नाना नारळकर यांचे आपण दर्शन घेतलेच पाहिजे, अशी त्याला अगदी तळमळ लागून राहिली होती! त्यामुळे लग्नसमारंभातून युक्तीने पसार होऊन तो शाळेत येऊन धडकला; पण दुर्दैवाने त्यादिवशी शाळेला सुटी होती. त्यामुळे निराशेने तेथून निघून जात असताना त्याला एक उंचेपुरे, धिप्पाड गृहस्थ दिसले. त्यांनी गोट्याची मोठ्या आस्थेने चौकशी केली व तो इतक्या दुरून शाळेचे व तेथील गुरुजींचे दर्शन घेण्यास आलेला आहे, हे पाहून त्यांनी स्वत: त्याला सर्व शाळा हिंडून दाखविली. निदान शाळेचे तरी दर्शन झाले म्हणून समाधान मानणार्या गोट्याला नंतर कळले की ते गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वत: नाना नारळकरच होते! आणि आपण त्यांना साधा नमस्कारही केला नाही, अशी त्याला नंतर चुटपुट लागून राहिली! बालसाहित्यात अजरामर झालेला गोट्या आणि शिक्षणक्षेत्रातील हे दोन महर्षी यांची ताम्हनकरांनी रंगविलेली ही कथा अतिशय हृदयंगम आहे! पुगस यांच्या कर्तृत्वास योग्य तो वाव देण्याचे श्रेय, विशेषत: सुरुवातीच्या काळात, नि:संशयपणे श्री. नाना नारळकर यांच्याकडेच जाते. त्यामुळे जणू त्या दोघांना गोट्याबरोबर एकत्र आणून ताम्हनकरांनी त्यांच्या कर्तृत्वाला एक अनोखी सलामी दिली व त्या दोघांची एक जितीजागती आख्यायिकाच बनवून टाकली, असे वाटते!!
अशाप्रकारे, विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात व अर्थात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही, किंकर्तव्यमूढ झालेल्या तरुण पिढीला व एकंदर मराठी मनाला त्यांनी कमालीच्या कळकळीने जे वैचारिक मार्गदर्शन केले, ते आजही तितकेच उपयुक्त ठरेल याची खात्री वाटते. आज भारतीय समाजाची नैतिक पातळी इतकी खालावलेली आहे की या गोष्टीची विशेष आवश्यकता वाटते. परंतु, आज त्यांची पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत आणि नव्या पिढीला तर त्यांच्या कार्याचा फारसा परिचयही नाही. तो परिचय करून देण्यासाठी व त्यांचे सर्व विचारधन मराठी वाचकांना, विशेषत: तरुणांना, विद्यार्थ्यांना, निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे विचारमंच’ या संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे. १९६४ साली त्यांचा षष्ट्यब्दपूर्ती समारंभ साजरा झाला तेव्हा प्रसिद्ध करण्यात आलेला “डॉ. सहस्रबुद्धे: व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन” हा गौरवग्रंथही त्यांच्या इतर साहित्याबरोबर येथे सादर केला आहे. या गौरवग्रंथाद्वारा वाचकांना पुगसंच्या व्यक्तित्वाचा व त्यांच्या कार्याचा उत्कृष्ट परिचय होईल. पुगसंचे सर्व साहित्य संगणकीकृत करून या संकेतस्थळावर वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी मराठी वाचकांनी त्यांचे वाङ्मय मन:पूर्वक वाचावे, त्यावर चिंतन करावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा समाजकार्यासाठी व राष्ट्रकार्यासाठी उपयोग करावा, अशी आग्रहाची विनंती आहे.
पुगस यांच्या लेखनावर भरपूर विचारमंथन व्हावे अशी आमची कळकळीची इच्छा आहे. तरी वाचकांनी आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया, सूचना आम्हाला suhas.v.sahasrabudhe@gmail.com येथे अवश्य कळवाव्यात. आपले विचार, अवश्य तर संपादित करून, या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
स्वगृहे पूज्यते मूर्ख: | स्वग्रामे पूज्यते प्रभु: ||
स्वदेशे पूज्यते राजा | विद्वान् सर्वत्र पूज्यते ||