‘धर्मनिरपेक्षतावाद’ हा आजच्या राजकारणात कळीचा मुद्दा बनलेला आहे, किंबहुना राजकारण्यांनी हेतुपुरस्सर ‘सेक्युलर' या शब्दाचा सोयिस्कर अर्थ काढून तो तसा बनविला आहे. ‘सर्वधर्मसमभाव’ हा सेक्युलॅरिझमचा केवळ एक भाग आहे, त्यात विज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, पारलौकिक धर्माची सामाजिक, राजकीय व्यवहारांतून फारकत करणे (याचाच खरा अर्थ धर्मनिरपेक्षता) इ. अनेक गोष्टी अपेक्षित असतात. त्या सर्व विसरून तद्दन जातीयवाद, प्रादेशिकतावाद, पंथवाद, फुटीरतावाद यांचा क्षुद्र स्वार्थासाठी वापर करणारे कुटिल राजकारणी ‘सेक्युलर' म्हणून मिरविताना आपल्याला नेहमी दिसतात. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा हा ग्रंथ अशा राजकारण्यांच्या आणि त्यांना निवडून देणाऱ्या जनतेच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातल्यावाचून राहणार नाही!