मला सांगावयास अभिमान वाटतो की डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे (१९०४ - १९८५) हे माझे काका होते आणि आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे माझी पहिली बरीच वर्षे त्यांच्याच सहवासात गेली. त्यांना स्वत:ला मुले नसल्याने त्यांनी आमच्यावरच (मी व माझा मोठा भाऊ) मुलांसारखे प्रेम केले. घरी आम्ही सर्व त्यांना बाळूकाका म्हणत होतो.
माझा जन्म १९५० सालचा. मी. M.Sc. पर्यंत शिक्षण घेतले व नंतर इंडियन बँक या चेन्नईच्या राष्ट्रीयीकृत बँकेत २५ वर्षे अधिकारी म्हणून काम केले. मुलाला नोकरी लागली की घरातील वडीलधार्यांना नेहमीच आनंद होतो; तसाच तो तेव्हा त्यांनाही झाला. पण त्यांना विशेष आनंद झाला कारण (त्याकाळी समजली जाणारी) एवढी मानाची नोकरी मला कोणाच्याही वशिल्याशिवाय मिळाली! त्यांनी जरी असंख्य विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली असली, तरी मला नोकरी मिळविण्यासाठी मदत करण्याची त्यांना मनापासून इच्छा नव्हती! कारण निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर मला नोकरी मिळावी असे त्यांना मनापासून वाटत होते!! मी १९९८ साली वरिष्ठ प्रबंधक या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली; तोपर्यंत नोकरीच्या निमित्ताने बराच काळ बाहेरगावी राहावे लागल्याने ऐन उमेदीच्या काळात मला त्यांच्या सहवासाचा लाभ होऊ शकला नाही. तसेच लहानपणी त्यांच्या सहवासात असूनही आमच्या वयांत खूप मोठे अंतर असल्याने त्यांचा मोठेपणा मला तेव्हा कळू शकला नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फारसा लाभही मला मिळाला नाही. न कळत त्यांचे काय संस्कार झाले असतील तेवढेच. तरीही त्याकाळचे काही अनुभव माझ्या मनावर चांगलेच ठसले आहेत आणि तेव्हा नाही, तरी आता त्यांचे महत्त्व कळत असल्यामुळे ते येथे सांगण्याचा मोह आवरत नाही.
अतिशय प्रथितयश शिक्षक असूनही मला त्यांच्या शिकविण्याचा अनुभव दोनदाच मिळाला. अगदी लहानपणी मला त्यांच्याकडून इंग्रजी शिकण्याचे भाग्य लाभले. (ते मराठीचे शिक्षक होते हे विसरू नका!) पण ही शिकवणी फारच जगावेगळी होती. पहिल्या दिवशी मी शिकवणीसाठी गेलो, तेव्हा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक आणण्यास त्यांनी मला फर्माविले. त्यातील एक अग्रलेख काढून त्यांनी तो मला अगदी काळजीपूर्वक वाचावयास सांगितला. मला अर्थातच त्यातील असंख्य शब्दांचा अर्थ कळला नाही व त्यामुळे तो अग्रलेख अजिबात समजला नाही. तेव्हा त्यांनी इंग्रजी-मराठी शब्दकोश माझ्या हातात ठेवला (मला तो लेख समजणार नाही, हे जणू त्यांनी आधीच ओळखले होते!) आणि एक वही मला देऊन त्या लेखातील अडलेले सर्व शब्द एकाखाली एक व त्यांच्या समोर त्यांचे अर्थ (शब्दकोशात बघून) लिहिण्यास सांगितले. पुन्हा एकदा ती वही वाचून मिटवून ठेवावयाची व मग केवळ आठवणीच्या जोरावर तो अग्रलेख, जमेल तितका, तंतोतंत लिहून काढावयाचा अशी त्यांची आज्ञा झाली. मी लिहिलेला लेख व मूळचा टाईम्समधील लेख यांची तुलना केली की चांगले इंग्रजी व आपले इंग्रजी यांतील फरक कळेल असे त्यांनी मला सांगितले! त्यानंतर लगेच हाच उद्योग पुन्हा एकदा करून, पुन्हा तशी त्यांनी मला तुलना करावयास लावली आणि त्या दिवशीचा इंग्रजीचा अभ्यास संपला, असे जाहीर केले! अशा पद्धतीने मी बरेच दिवस रोज एका अग्रलेखाचा अभ्यास केला व त्यामुळे माझ्या इंग्रजी भाषेत कमालीचा फरक पडला! परकी भाषा शिकविण्याच्या त्यांच्या या अनोख्या पद्धतीतून त्यांच्यातील अभिजात शिक्षकाचे, तेव्हा नाही तरी, आज मला नक्कीच दर्शन घडते आहे.
घरातील सर्वांत लहान मुलगा म्हणून वर्तमानपत्रांची रद्दी विकण्याची कामगिरी माझ्याकडे येत असे. वरील इंग्रजी शिकवणीचा परिणाम होऊन मी एक उपद्व्याप, घरातील कोणाची परवानगी न घेता, करू लागलो - रद्दीच्या पैशातून त्याच रद्दीवाल्याकडून इंग्रजी रहस्यकथा विकत घेऊ लागलो! अर्ल स्टॅन्ले गार्डनरच्या (पेरी मेसन हा प्रसिद्ध वकील याचाच मानसपुत्र!) बहुतेक सर्व कथा मी याच पैशातून विकत घेतल्या आणि आश्चर्य म्हणजे त्याबद्दल बाळूकाकांकडून शाबासकी मिळविली! वाचनसंस्कृती म्हणतात ती बहुधा हीच असावी! आमच्या घरातील वाचनसंस्कृतीचे आणखी एक उदाहरण मला माझी शालान्त परीक्षा चालू असतानाच बघावयास मिळाले. बाळूकाका हे सुप्रसिध्द लेखक असल्यामुळे आमच्याकडे असंख्य नवीन पुस्तके नेहमीच येत असत. ऐन परीक्षेच्या वेळी एक नवी गाजलेली कादंबरी आमच्याकडे येऊन दाखल झाली आणि अस्मादिकांनी परीक्षेची पर्वा न करता ती सर्वप्रथम ताब्यात घेऊन वाचावयास सुरुवात केली व भृकुटी उंचावून विचारणार्या प्रत्येकाला (त्यांत बाळूकाका नव्हते!) ठणकावून माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे उत्तर दिले! आज परीक्षांच्या दिवशी घराघरांचे जे रणांगणांत रूपांतर होते, ते पाहिले की मी तेव्हा हे धाडस कसे केले याचे मोठे आश्चर्य वाटते! बहुधा हीच ती आमची वाचनसंस्कृती असावी!
बाळूकाकांच्या शिकविण्याच्या हातोटीचा दुसरा प्रत्यय मला मी दहावीत असताना आला. त्यावेळी आमच्या नू.म.वि. प्रशाळेतून दहावीच्या निवडक विद्यार्थ्यांना मराठी साहित्य परिषदेच्या ‘साहित्यप्राज्ञ’ या परीक्षेसाठी पाठविले जात असे. ही परीक्षा एफ.वाय. बी.ए.च्या तोडीची समजली जात असे. म्हणजे तो अभ्यास आमच्या दृष्टीने अतिशय अवघड असाच होता. पण शाळेने आमची कसून तयारी करून घेतली होती. तरी एक पुस्तक (वा. म. जोशी यांचा निबंध-संग्रह) समजण्यास फारच अवघड होते. परीक्षेच्या २ दिवस आधी बाळूकाकांनी माझ्या तयारीची चौकशी केली व मी माझी अडचण तोंड वाकडे करून सांगितली. तेव्हा त्यांनी ते पुस्तक माझ्याकडून मागून घेतले व दिवसभर त्याचा अभ्यास करून मला त्या पुस्तकावरील १२-१३ प्रश्नांची यादी दिली. प्रत्येक प्रश्नाच्या अपेक्षित उत्तराचे ६-७ मुद्देही काढून दिले. सर्व प्रश्नांची उत्तरे निबंधाच्या स्वरूपातच द्यावयाची होती. या मुद्द्यांच्या आधारे सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून काढण्यास त्यांनी मला फर्माविले. रात्रभर जागून मी तो उद्योग केला व माझे सर्व लिखाण त्यांच्या हातात ठेवले. दिवसभर त्यांनी ते कसून तपासले, त्यात काही सुधारणा करायला लावल्या आणि त्या पुस्तकाचा अभ्यास संपला, असे जाहीर केले! दुसर्या दिवशी परीक्षेत त्यांतीलच सर्व प्रश्न आले व उत्तम गुण मिळवून मी ‘साहित्यप्राज्ञ’ झालो! जणू काही त्यांनीच तो पेपर काढला होता! एखाद्या विषयावर आणि अर्थातच तो शिकविण्याच्या पद्धतीवर एखाद्या शिक्षकाचे किती कमाल प्रभुत्व असू शकते, याचेच हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
बस! त्यांच्यातील शिक्षकाशी माझी एवढीच प्रत्यक्ष ओळख!
एक विचारवंत व लेखक म्हणून डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे हे किती थोर आहेत, हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु, माणूस म्हणून ती. बाळूकाका किती थोर होते हे मी नक्कीच सांगू शकतो. आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. तरी बाळूकाकांचे पितृतुल्य वडील बंधू कै. ती. अप्पा यांनी अपार कष्ट करून त्यांचे शिक्षण केले. ते ऋण कायम लक्षात ठेवून त्यांनी आपल्या सर्व भावंडांचे शिक्षण केले. माझे वडील त्यांचे सर्वांत धाकटे भाऊ. त्यांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी बनारसला पाठविले होते व त्यांच्या खर्चासाठी ते दरमहा ५० रु. पाठवीत असत. त्याकाळी त्यांना शाळेतील शिक्षक म्हणून पगार तेवढाच मिळत असे व संसाराच्या इतरही अनेक जबाबदार्या ते उचलीतच होते. त्यामुळे केवळ भावाच्या शिक्षणासाठी म्हणून, आपली सर्व तत्त्वे बाजूला ठेवून ते काही श्रीमंत मुलांच्या घरी जाऊन शिकवण्या घेत असत! नंतर पुढेही त्यांनी माझ्या व माझ्या भावाच्या शिक्षणासाठी अनमोल मदत केली. तशी ती त्यांनी त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांनाही केली! त्यामुळे आमच्यासाठी विशेष काही केले आहे, असे ते कधीच भासवीत नसत! खरोखर त्यांचे हे आमच्यावरील ऋण कधीच फिटण्यासारखे नाही.
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे विचार आजही अत्यंत उपयुक्त आहेत अशी अनेकांची धारणा आहे. परंतु त्यांची पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे सर्व साहित्य संगणकीकृत करावे आणि त्याचे एक संकेतस्थळ करून ते सर्वांना, विशेषत: तरुणांना - विद्यार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून द्यावे अशी एक कल्पना मांडण्यात आली होती. मला ती फारच आवडल्याने मी स्वत:च हे काम करावे आणि त्यांचे कार्य अमर करण्यास हातभार लावावा व त्यांचे ऋण अंशत: तरी फेडावे, असे मी ठरविले. याचाच परिणाम म्हणजे या ‘डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच’ नामक संकेतस्थळाचा जन्म! त्यांचे सर्व साहित्य संगणकीकृत करून येथे सादर केले आहे. माझी सर्वांना अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे काम आपण पोचवावे आणि याबाबतीत आपल्या बहुमूल्य सूचना मला अवश्य कळवाव्यात, ज्यामुळे पुगसंच्या विचारांचा प्रसार करण्यास मदत होईल.
१९६४ साली त्यांचा षष्ट्यब्दपूर्ती समारंभ साजरा झाला तेव्हा प्रसिद्ध करण्यात आलेल्या “डॉ. सहस्रबुद्धे: व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन” या गौरवग्रंथातील आपल्या ‘वाणी आणि लेखणी’ या आपल्या संक्षिप्त आत्मचरित्रात्मक लेखात त्यांनी म्हटले आहे की, “वाणी आणि लेखणी झिजवून मी ३६ वर्षे अध्यापन केले. आता विद्यार्थ्यांजवळ मला गुरुदक्षिणा मागावयाची आहे. त्यांनी लोकशाही या श्रेष्ठ धर्माचा सांगोपांग अभ्यास करून आपल्या वाणीने व लेखणीने भारतीय जनतेची लोकसत्ताक राज्याला अवश्य ती मन:क्रांती घडवून आणावी. ही दक्षिणा मला मिळाली तर मी स्वत:ला कृतकृत्य समजेन.” परंतु ही गुरुदक्षिणा त्यांना देण्याचे कार्य अजूनही पूर्णपणे पार पडलेले नाही; ते नव्या पिढीतील विद्यार्थीवर्गाने पूर्ण करावे ही सदिच्छा मी व्यक्त करतो आणि त्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होईल अशी मी आशा करतो.
सुहास वसंत सहस्रबुद्धे
“पूर्वेश”, स. क्र. १६, गणेशनगर,
वडगाव धायरी, पुणे ४११०४१.
भ्रमण दूरध्वनी: ८१४९१९५३९५.
suhas.v.sahasrabudhe@gmail.com